तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते

Submitted by रसप on 2 October, 2012 - 00:08

चर्चा करण्यासाठी नविन विषयही होते
त्यांना चर्चा हरण्याचे पण भयही होते

ज्यांना माफी मिळते ज्यांची गयही होते
त्यांच्या दानाची देवास सवयही होते

जखमच होते गेलेल्या प्रत्येक क्षणाची
क्वचितप्रसंगी एक लाघवी सयही होते

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

तिच्या गुंतण्यावरची बंदी गळ्यातले सर..
पण नजरेला होकाराचे भयही होते

सुरुवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो
हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते

तिला पाहिल्यावर हृदयाची साद वाढली
धडधडते ठोके मग चुकले लयही होते

नाक कान डोळे अन होते हात-पायही
प्रेमानंतर कळले एक हृदयही होते

त्या काळी मी विचारले तर 'नको' म्हणाली
तिचेच नंतर जगणे 'जीतू'मयही होते

....रसप....
२७ सप्टेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/10/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जखमच होते गेलेल्या प्रत्येक क्षणाची
क्वचितप्रसंगी एक लाघवी सयही होते

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

छान शेर.

मिसरे खूप सहज आलेले आहेत. अभिनंदन!! सुलभता हा गझलेतला चांगला गुण आहे.

नाक कान डोळे अन होते हात-पायही
प्रेमानंतर कळले एक हृदयही होते>> वाहवा Happy

धन्यवाद मान्यवरहो..!

कणखरजी,

>> मिसरे खूप सहज आलेले आहेत. <<

ही प्रतिक्रिया माझ्यासाठी लाखमोलाची आहे. कारण माझा हा प्रयत्न असतो की कविता असो वा गझल, त्यात कृत्रिमता जाणवू नये. क्वचितच मी ह्या प्रयत्नात यशस्वी होतो, पण जिथे-जिथे होतो, त्या त्या ओळी मला आवडतात.

मस्त रे जितू
कवाफी वाह!!ही हा भरीचा शब्द मानला जातो सहसा पण ही तुझी प्रतिभा आहे की तू त्याची जाणीवही होवू दिली नाहीस
रदीफ नेहमीची 'होते' अशी असली तरी ती नाविन्यपूर्ण पद्धतीनी हाताळलीस
सहजसुन्दरता तर ओतप्रोत भरलेली आहे या गझलेत खूप छान रे

धन्यवाद या गझलेकरता

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

ऐवजी

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत कारण वयही होते

असं वाचून पाहिलं. अर्थ खूपच बदलला.

धन्यवाद !

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते....

हेच जास्त सहज वाटतय...

मस्त गझल रणजित.

ज्यांना माफी मिळते ज्यांची गयही होते
त्यांच्या दानाची देवास सवयही होते

जखमच होते गेलेल्या प्रत्येक क्षणाची
क्वचितप्रसंगी एक लाघवी सयही होते

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

नाक कान डोळे अन होते हात-पायही
प्रेमानंतर कळले एक हृदयही होते

फार आवडले हे शेर !!

तिच्या गुंतण्यावरची बंदी गळ्यातले सर... हे नाही समजले.

उत्तम गझल.
अभिनंदन आणि शुभेच्छा !

ज्ञानेश जी,

अभिप्रायाबद्दल धन्यवाद. खरं तर मी ह्या शेराविषयी स्पष्टीकरण अपेक्षित केलंच होतं. तो लिहितानाच मला जरा गुंतागुंतीचा वाटला, पण मी मुद्दामच अधिक उलगडलं नाही. कारण इथला विचारच जरा गुंतागुंतीचा आहे.
असो. प्रयत्न करतो.

"तिच्या गुंतण्यावरची बंदी गळ्यातले सर..
पण नजरेला होकाराचे भयही होते"

तिच्या गुंतण्यावरची बंदी = ती गुंतत आहे किंवा तिला गुंतावंसं वाटत असावं किंवा ती गुंतू शकत नाही कारण तिच्यावर तशी बंदी आहे/ पाबंदी आहे/ तिला मनाई आहे/ तिला बंधन आहे. कसलं ? "गळ्यातले सर". म्हणजे तिचं मंगळसूत्र. म्हणजे लग्न झालं आहे म्हणून ती गुंतू शकत नाही. हे ती स्वत:ही जाणते. पण 'नजर' ? नजर लपवू शकत नाही. काही तरी झाक तिच्या नजरेतून दिसतेच आणि जोडीला दिसतं एक भय की, 'माझ्या नजरेला त्याने 'ओळखलं' आणि समजा त्याने होकार दिला, तर.....? तर बंधनं झुगारता येतील मला..? मी रोखू शकेन स्वत:ला..? आणि जर मी बंदीला न जुमानता पाऊल उचललं तर काय होईल ? समाज काय म्हणेल, घरचे काय म्हणतील, तो व्याभिचार असेल का ? ई. ई.'

पटलं, नाही पटलं... अवश्य सांगा. अजून सहजता येण्याच्या दृष्टीने काही बदल सुचवता आल्यास अवश्य सुचवा... मी विचार करीन.

....रसप....

ओके, अर्थ आला लक्षात. सर = मंगळसूत्र हे मला ठाऊक नव्हते.
चांगला शेर आहे.

माझा जुना शेर आठवला-

"किती पवित्र दोर हा तिच्या गळ्यात बांधला
तिचा न उंबर्‍यातुनी निघेल पाय यापुढे.."

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळाजड झाले काळे सर

- ना. धों. महानोर

=====================================

किती पवित्र दोर हा तिच्या गळ्यात बांधला
तिचा न उंबर्‍यातुनी निघेल पाय यापुढे.

ग्रेट !

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते
>>>>>>>

सुंदर गझल एकदम सहज उतरलीये.

"किती पवित्र दोर हा तिच्या गळ्यात बांधला
तिचा न उंबर्‍यातुनी निघेल पाय यापुढे.."....

आहाहा.... अफलातून शेर ज्ञानेशजी!

(अवांतर- हा दोर इतका पवित्र असतो कि तो तुटला तरीही तिचा पाय उंब-याबाहेर पडू शकत नाही .)

-सुप्रिया.

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

सुरुवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो
हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते
हे दोनच शेर आवडले!

मिसरे फार सहज आले आहेत, त्यामुळे फार आवडले..

रसप, one of ur very good ones!

जखमच होते गेलेल्या प्रत्येक क्षणाची
क्वचितप्रसंगी एक लाघवी सयही होते

नाक कान डोळे अन होते हात-पायही
प्रेमानंतर कळले एक हृदयही होते

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

मस्त मस्त! Happy

सुरुवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो
हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते
दुसरी ओळ लयीत वाचता येत नाहीये... अजून एक, नसण्याची आणि सवयही हे दोन्ही वापरण्याऐवजी, नसण्याची सवयही अथवा नसण्याचीच सवय असं केलं तर?

@आनंदयात्रीजी,

'सवय'चा 'ही' काफियाच्या बंधनामुळे काढता येणार नाही; लयीबाबत विचार करतो.

खूप खूप आभार !

'सवय'चा 'ही' काफियाच्या बंधनामुळे काढता येणार नाही>>>

होय जितू मीही हेच सान्गायला इथे आलो होतो !!

लयीबाबत आणि त्या च बाबत मात्र नचिकेतजी म्हणताय्त ते बरोबरच आहे रे .मीही यवार विचार करून पाहतो आहे. माण्डतोय..... बघ रुचतोय का ते!!

हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते>>>> मूळ मिसरा

हळूहळू मग ती नसल्याची सवय् ही होते >>>>>>>>>मला सुचलेला बदल

लयीनुसार असा बघ !!

गागागा गा । गा गागागा । (गा गा) गागा
हळूहळू मग । ती नसल्याची । (सवय् ही ) होते

आता यातला 'य्' हा दोष काढायचा प्रयत्न करून पाहतो ...........सवयही हा अख्खा शब्द जसाच्यातसा रहावा असे मलाही वाटते आहेच......................

हळूहळू ती नसल्याचीच सवयही होते

आता खरा पेच आला !!

तो 'सवयही' तला ही र्‍ह्स्वही करता येत नाहीये अन् स काढताही येत नाहीये त्यामुळे एका मात्रेचा मेळ कसा बसवायचा हे पाहता पाहता पुन्हा भरीचा च येतोचय की सारखा मधेमधे !!

'नसल्याची 'त बदल करायचा का मग?? बघू काय होतय ते ..........

हळूहळू मग 'ती नाही !!'ची सवयही होते.....

शुद्ध स्वरूपात मात्रा मोजल्यास अशा होतील

लगालगा गा गा गागा गा लललगा गागा

नाही यार एक ल जास्तचय !! वर या बदलामुळे ओळीची सहजताही जातेय हो ना !!

____

दमलो बाबा मी विचार करून
आता तूच मार्ग काढ यातून

आपण देवसराना बोलावूया का ? सीरीयसली ते या बाबतीत हुशार आहेतच . मी मुळीच चेष्टा करत नाहीये
मागे मी एक काफिया सुचतच नव्हता म्हणून देवसराना अक्षरशः शरण गेलो होतो त्यान्नी खरोखरच मोठ्या दिलाने मदतसुद्धा केली होती

आता आपल्याशी त्यान्चे उघडउघड पटत नाही त्यामुळे ते स्वतः इकडे येतील कि नै शन्काच आहे
ट्राय करायला काय हरकत आहे नै का ?/
तू म्हणत असशील तर देवसराना विचारू का मी या बाबत?

कळव ......................

वैवकु!!

रणाजित,
पण सर म्हणजे गळ्यातले, कुठलेही.
काळी सर म्हटल्याने मंगळसूत्राची प्रतिमा येते. एरवी नाही Happy

अनेक वेळा असेल माझा पाय घसरला
थोडी होती संगत थोडे वयही होते

नाक कान डोळे अन होते हात-पायही
प्रेमानंतर कळले एक हृदयही होते

<< क्लास !

वैवकु,

लेट मी थिंक.........

======================

बागेश्रीजी,

>> पण सर म्हणजे गळ्यातले, कुठलेही.<<

बरोबर आहे तुमचं... आत्ताच माझ्या एका मित्राशी ह्याचबाबत बोललो. त्यानेही हेच सांगितलं. पण म्हणजे त्यात मंगळसूत्रही आलंच ना ?

==========================

सर्वांचे आभार !

रणजीत!
तुझ्या या गझलेवर आज मी(वेळ काढून, तुझ्यावरच्या लोभापोटी) सखोल चिंतन केले. मला जाणवलेल्या गोष्टी अशा.............

मतला(शेर नंबर १) मला असा लिहावासा वाटला (हा तुझ्या शेरास पर्यायी नाही. केवळ एक खयाल म्हणून पहा)

चर्चा करण्याजोगे कितिक विषयही होते!
पण, चर्चा हरण्याचे त्यांना, भयही होते!!

शेर नंबर २....अर्थ नीट समजला नाही. त्यामुळे खयाल देता आला नाही.

शेर नंबर ३..........सुंदर! लाघवी सय म्हणजे सुखद स्मृती का? हवीहवीशी वाटणारी आठवण, असे आहे का?

शेर नंबर ४..........अप्रतिम!

शेर नंबर ५...........मला असा खयाल मांडावा वाटला (पर्यायी नाही रे बाबा)

मंगळसूत्र म्हणावे की, ती लक्ष्मणरेषा?
नजरेमध्ये लंघायाचे भयही होते!

शेर नंबर ६........अप्रतिम!

शेर नंबर ७...........अर्थ स्पष्ट होत नाही, विशेषत: दुसरी ओळ.
मला असा खयाल सुचला...........

तिला पाहिल्यावर हृदयाची धडधड वाढे!
तिला भेटलो की, मग सारे लयीत होते!!

शेर नंबर ८.........सशक्त नाही वाटला!
मला असे सुचले.............

बुद्धीची, देहाची परवा करायचो मी......
प्रेम म्हणाले तुजला एक हृदयही होते!

शेर नंबर ९..........ठीक!
मला असे सुचले.............

किती लाजते, किती टाळते ती जीतूला,
तिचेच नंतर जगणे ‘जीतू’मयही होते!

............प्रा.सतीश देवपूरकर
...............................................................................

रणजीत,
तुझा शेर नंबर ६ असा आहे...........

सुरुवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो
हळूहळू त्या नसण्याचीच सवयही होते

मला तरी या शेरात काहीही खटकले नाही! मला तो निर्दोष व अप्रतिम वाटला.

पण आताच मी या शेरावरील वरील चर्चा वाचली!
जर ‘च’ आणि ‘ही’ यातील ‘च’ काढायचा झाला तर असे करता यावे...............
पहा तुला कसे वाटते ते. तुझ्या दुस-या ओळीतील शब्दयोजना, अर्थ कायम राखून, बदलावी लागेल. तरच ‘च’ काढला जावू शकतो..........
मला सुचलेला बदल असा................

सुरवातीला ती नसल्याचा त्रास वाटतो!
पण, नसण्याची, नंतर तिच्या सवयही होते!!
>.........प्रा.सतीश देवपूरकर

वाह !

प्रोफेसर साहेब.... ह्या प्रतिसादासाठी तुम्हाला दाद ! आज मला तुमचा प्रतिसाद, 'प्रतिसाद' वाटला, 'शिकवणी' नाही! (हलके घ्यावे!)

आपण मांडलेले विचार खूप आवडले.
शेर क्र. २ - अत्यंत भंकस शेर आहे, असं माझं मीच म्हणीन. खरोखरच मला तो नीट जमलाच नाहीये. मी त्यावर अजून विचार करीन.

आपण सुचविलेल्या इतर काही गोष्टींवरही विचार करीन...... पण उद्या... (काय आहे... आमच्या 'मंडळी' तुमच्या 'मंडळी'इतक्या समजूतदार नाहीत... रात्री ऑनलाईन येण्यास पूर्ण मनाई असते आम्हांस..!)

bagh Jitoo mee mhanalo hoto ki nai; Dev sir khoop chaangale aahet mhanoon, fakt vaagataat "vaaitt" asalyaa saarakhe !!;)

Pages