कोकणकड्यावरील ती रात्र

Submitted by दुर्गभूषण on 1 October, 2012 - 10:08

१५ ऑगस्ट २०११ रोजी माझ्या ट्रेकिंग चा श्रीगणेशा झाला आणि पहिला ट्रेक होता हरिश्चंद्रगड. माझ्या त्या पहिल्या भेटीतच त्या निसर्गाने मला भुरळ घातली. त्यानंतर जवळ जवळ वर्षभर नळीच्या वाटेने जायचे भरपूर प्रयत्न केले पण असफल. बरोबर एका वर्षाने नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडला जायचा योग जुळून आला तो सुद्धा दस्तुरखुद्द अरुण सावंत यांच्या सोबत. लगेच सुरज मालुसुरे ला होकार करून टाकला.( नुकताच या पठ्ठ्याने एकट्याने लोणावळा-भीमाशंकर म्हणजे लोभी ट्रेक केला. ) पुढे अरुण सावंत सरांचा ट्रेक काही कारणांमुळे रद्द झाला आणि अजून एक ग्रुप नळीच्या वाटेने जाणार असे उज्वलाला कळले. थोड्या नाखुशीनेच होकार कळवून टाकला.
ठरल्याप्रमाणे कल्याण स्टेशनला रात्री ११ वाजता आम्ही जमलो आणि २ जीप मधून आम्ही वल्हीवरे उर्फ बेलपाडा गावाकडे कूच केले. रात्री २ वाजता आम्ही गावात पोहचलो आणि आमचा वाटाड्या कामा याच्या घराच्या वऱ्हांड्यात आम्ही मुक्काम ठोकला. मला काही रात्रभर झोप आली नाही आणि आजूबाजूची मंडळी रात्रभर घोरण्याची अंताक्षरी खेळत होते. सकाळी ६.३० वाजता सर्व उठले आणि चहा घेवून आपल्या सोयीनुसार वाघ ससे पकडायला गेले. गावातील लोकांचा दिवस आमच्या आधीच सुरु झाला होता. नदीवर आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी लगबग सुरु झाली होती. मीही माझे नवीन action trekking बूट घालून गेलो. बुटांना आणि मला एक मेकांची सवय नसल्यामुळे मी ३ वेळा तरी पाण्यात पडलो. आणि ३ ऱ्या वेळी तर कंबरभर पाण्यात . साहजिकच pant मधील मोबाईलने राम म्हटले. मग झटपट आवरून ओळख परेड साठी जमलो. आम्ही १७ जण या ट्रेक साठी होतो त्यामधील आमचा लीडर मिरोन ने हा ट्रेक २० पेक्षा जास्त वेळा केला होता पण पावसाळ्यात पहिल्यांदाच. या ट्रेक साठी २ जण खास हैदराबाद वरून आले होते. त्यातील वेंकी रेड्डी याने गेल्या ४ वर्षात सह्याद्री मधील १५० पेक्षा जास्त ट्रेक केले आहेत. आणि कालसुद्धा हा पठ्ठ्या लोहगड करून आला होता आणि हरिश्चंद्रगड ट्रेक च्या दुसऱ्या दिवशी तो विही धबधबा rapelling करणार होता. हरिश्चंद्रगड तर त्याने पाचेक वेळा केला होता. त्याचे 'सह्याद्री' बद्दल चे प्रेम आणि आकर्षण पाहून माझी छाती अभिमानाने २ इंच जास्तच फुगली.

बेलपाडा गावात एक समूह छायाचित्र
nw (6).jpgnw (1).jpg

सकाळी ७.४५ वाजता आमच्या १९ जणांच्या चमूने नळीच्या वाटेकडे कूच केले. गाव सोडताच कोकणकड्याचे विलोभनीय दर्शन होऊ लागले. पावसाळा असल्यामुळे कड्याने अजूनही धुक्याची चादर पांघरून घेतली होती.
थोड्यावेळातच आम्ही एका नदीसदृश्य ओहळाजवळ येवून पोचलो आणि हाच ओहळ आम्हाला शेवट पर्यंत साथसोबत करणार होता. आता हळूहळू कोकणकडा आणि रोहिदास शिखर यांचे दर्शन होवू लागले होते.
निसर्गाने विविध फुलांची सगळीकडे मुक्तहस्ताने उधळण केली होती. सकाळचे ९ वाजून गेले होते तरी कोकणकडा पूर्णपणे दृष्टीक्षेपात येत नव्हता. कामा कडून कळले कि भवानी धारेतून अजून एक वाट वर गडावर जाते. मिरोन ला म्हटले आता पुढल्यावेळी ती वाट करूयात. सकाळचे १० वाजले होते आणि आम्ही एका छोट्या धबधब्याच्यावर येवून ठेपलो. इथे जरा विश्रांती, तहानलाडू-भूकलाडू, फोटो सेशन करून पुढे कूच केले. वाटेत पहिला प्रस्तर लागला. नळीच्या वाटेत असे एकूण ५ प्रस्तर आहेत असे अनंता ( आमचा दुसरा वाटाड्या ) कडून कळले. पहिला प्रस्तर तसा सोपा असल्यामुळे आरामात पार केला. या ट्रेक मध्ये २ लोक सोडून बाकीचे सर्व अनुभवी ट्रेकर होते.
nw (8).jpg

११ वाजता आम्ही दुसऱ्या प्रस्ताराजवळ पोहचलो. हा प्रस्तर म्हणजे १५ फुटांचा एक कातळ होता आणि त्यावरून छोटा ओहळ वाहत होता. कामा आणि अनंता ने त्यांच्या paragon magic slippers ने हा चित्त्याच्या वेगाने पार केला. त्यांनी वर जावून रोप लावला. त्या नंतर मी आणि सुजित रोपचा आधार न घेता हा प्रस्तर चढून गेलो. आणि आम्हाला कोकणकडा सर केल्याचा आनंद झाला. नंतर स्वाती ने कातळ चढायला सुरुवात केली.
मिरोन ला कदाचित काहीतरी घडणार याचे संकेत आधीपासूनच मिळाले होते म्हणून तो स्वातीच्या मागोमाग चढू लागला. आणि पुढे एका क्षणी स्वातीचा हात सटकला आणि ती आणि दोन मोठे दगड खाली कोसळले. खाली मिरोन ने तिला अलगद झेलली पण त्यातील एक दगड मिरोन च्या मांडीवर आदळला. नशीब स्वाती नाही आदळली इति मिरोन . नंतर दीप्ती ने चढायला सुरुवात केली आणि तिची परीक्षा घ्यायला वरूण राजाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आणि पुढचे होल्ड्स तिला दिसेनात. मी वरून दीप्तीच्या कंबरेला बांधलेला दोर खेचून तिला वर ओढून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण दीप्ती च्या वाजनापुढे माझे प्रयत्न थिटे पडले. कशीबशी ती वर पोहचली. आता पाळी हैदराबादकर प्रवीणची होती. पाण्याचा मारा टाळण्यासाठी त्याने पोहताना घालतात तासाला चष्मा घातला होता. प्रवीण ने त्याची भलीमोठी ट्रेकिंग bag घेवून चढण्यास सुरुवात केली पण त्याला त्याची bag मागे खेचत होती. थोडेसे वर पोहचल्यावर पाणी थेट त्याच्या तोंडावर आदळू लागले तशी त्याची बोबडी वळली. पावसाचा जोर वाढला होता आणि त्याला काहीच दिसत होते. खालून वेंकी तेलगु मध्ये आणि मी वरून इंग्लिश मध्ये त्याला सूचना देत होतो पण त्याला काहीच ऐकायला येत नव्हते. तो अक्षरशः त्या patch वर पोहत होता. त्याची ती अवस्था पाहून माझी मात्र हसून हसून मुरकुंडी वळली होती. शेवटी प्रवीण ने त्याची मोठी bag वरून खाली टाकली आणि तो वर पोचला. वर पहिले तर एका मोठ्या दगडावर एक वानरसेना बसली होती. पण आमच्या सारख्या मोठ्या माकडांना पाहून त्यांनी धूम ठोकली.
nw (4).jpgnw (26).jpg
आता खरी नळीची चढण सुरु झाली होती. नळीचा हा भाग सांधण दरीची आठवण करून देत होता. फरक एवढाच कि सांधणला मोठे खडक आहेत आणि इथे निखळणारे छोटे दगड. पूर्ण वाट तुटलेल्या खडकांची बनलेली आहे. आता आम्ही नळीच्या अखेरच्या टप्प्यात पोहचलो होतो. आता बाजूला रोहिदास शिखर, त्यावरची लिंगी स्पष्टपणे दिसत होते. आता आम्ही ३ ऱ्या कातळाजवळ पोहोचलो. कामा आणि अनंता ने इथे आधीच एक शिडी लावून ठेवली होती. त्या शिडीला धातूच्या पायऱ्या असल्यामुळे त्यावरून चढणे अगदीच दिव्या होते. वर बांधलेल्या २ ऱ्या एका दोराचा आधार घेत कातळाला पाय लावून मी कसाबसा वर चढलो. इथून पुढे एक उजवा आणि एक डावे वळण घेत ती वाट पुढे जाते. इथून चालताना खूप सावधगिरी बाळगावी लागत होती कारण एक चूक आणि ...... वरून फक्त फुले वाहायची.

nw (3).jpgnw (30).jpg
पुढे अजून एक उजव्या हाताला वळण घेवून आम्ही ४ थ्या कातळजवळ येवून ठेपलो. ह्याची उंची जरी जास्त नसली तरी शेवाळामुळे तो धोकादायक बनला होता. नेहमीप्रमाणे कामा आणि अनंता paragon magic ने वर पोहचले आणि सर्वाना पुढे ओढून घेतले. ४ वाजले होते आणि इथे मी माझा नेहमीचा भाकरी आणि मश्रूम चा डबा खावून घेतला. तरी सर्वाना वर खेचायला ४५ मिनिटे गेली. आम्ही वर चालायला सुरुवात केली आणि मग एका विस्तीर्ण पठारावर येवून पोचलो. ते पार करून ६ वाजता आम्ही शेवटच्या कातळाजवळ येवून पोचलो. सुजित, भास्कर, कामा वगैरे आधीच वर पोहचले होते. हा सुद्धा ८-१० फुटाचा कातळ होता जो शेवाळाने पूर्ण भरलेला होता.
nw (7).jpg

आम्हाला काहीही करून अंधार पडायच्या आत गुहेत पोहचायचे होते. मग असा विचार आला कि मुलींना आधी वर पाठवूयात. सर्वात वजनाने हलकी असल्यामुळे रोहिणीला याचा पहिला मान मिळाला. तिने दोराला धरून कातळ चढायला सुरुवात केली पण तिचे tennis shoes कातळावरून घसरत होते. एका क्षणी असे वाटले कि हि आता पडणार आणि ती सरळ खाली आली. नशीब तिचे फक्त गुढघे कातळाला घासले. खाली मिरोन ने तिला अलगद झेलले. मग एक खेळाडू बाद झाल्यामुळे पुढील वजनी गटातील उज्वलाने कातळ चढायला सुरुवात केली. इथे उज्वलाने झोपून, बसून, लोळून एवढ्या प्रकारचे नमस्कार घातले कि विचारून नका. नंतर एक एक करून सर्वजण वर पोहचले तेव्हा रात्रीचे ८.१० वाजले होते.
सर्व दोर गुंडाळून विजेरीच्या उजेडात आम्ही पुढे चालू लागलो. आता पुढे आपल्या काय वाढून ठेवले आहे याची पुसटशीसुद्धा कल्पना आम्हाला नव्हती. पाउस, धुके यामुळे १० फुटांपलीकडचे सुद्धा काही दिसत नव्हते. बहुतेक आम्ही कोकणकड्याचा अगदी उजवीकडे होतो. मी, मिरोन, अंबरीश आणि कुणाल आम्ही बाणाच्या खुणा कुठे दिसतात का ते पाहत होतो. दिसलेल्या २ बाणानुसार आम्ही थोडे पुढे आलो. आता पुढे एकही बाण दिसत नव्हता. कामा आणि अनंता ला आम्ही आधीच गुहेत जागा पकडायला पाठवले होते. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पडला. आमचा एक walky - talky कामा कडे होता पण तो गुहेत पोचला असल्यामुळे त्याला संपर्क होत नव्हता. मग मिरोन गुहेत जेवण बनवणाऱ्या तुकारामला फोन केला. फोन खाली पाचनई गावात त्याच्या सौ कड आम्ही सांगितले कि आम्ही रस्ता चुकलो आहोत, कुणाला तरी मदतीकरिता पाठवा. सौ ने आम्हाला सांगितले कि पुढे नाला आहेत तो पार करून पुढे या. गुहेत संपर्क होवू शकणार नाही. एवढ्या पावसात कोण कशाला येईल आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला वाचवायला ? एक आशा होती कि कामा आणि अनंता येतील आपल्याला शोधत.
nw (10).jpg

मग मिरोन आणि अजून दोघे पुढे रस्ता शोधायला गेले आणि आम्ही आहोत तिथेच घोळका करून उभे राहिलो. आमच्या पुढेच आम्हाला एका धबधब्याचा आवाज येत होता. काही क्षणातच मिरोन आणि दोघे समोरच्या टेकडीवरती दिसेनासे झाले. आता त्यांना जावून दीड तास होवून गेला होता. मधेच त्यांचा ए-ओ असा आवाज येत होता. आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून त्यांना प्रतिसाद देत होतो. मग वाटले ते एकमेकांना आवाज देत असावेत. थोड्यावेळाने न राहवून रोहिणीने तुकारामच्या सौ ना फोन लावला आणि तिच्या मोडक्या तोडक्या मराठी मध्ये ती म्हणाली " ताई आम्ही हरवले आहे, तुम्ही कुणाला तरी संदेश द्याल का " तिच्या पुढे डोक्यात प्लास्टिक ची पिशवी घालून सुजित बसला होता आणि हसत होता. पण आता फोने हातात घेवून बोलायचे त्राण त्याच्यात नव्हते. मिरोन त्याचा फोन रोहिणी कडे ठेवून गेला होता आणि या लोकांचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी रोहिणी ने कुणालला फोन केला. तो म्हणाला कि ते लोक वर हरवले आहेत आणि खाली काहीच दिसत नाही आहे कुणीतरी आम्हाला घ्यायला वर या. सुजित आणि वेंकी लगेच वर गेले आणि त्यांना घेवून आले. ते आल्यावर कळले पुढे काहीच रस्ता दिसत नाही आहे. खूप धुके आहे आणि ते लोकच वर हरवले होते. ते आम्हाला आवाज देत होते पण त्यांना आमचा आवाज येत नव्हता.
nw (17).jpg

अशा रीतीने सर्व मार्ग बंद झाले होते आणि उजाडे पर्यंत आहोत तिथेच बसू यात असा निर्णय एक मताने घेण्यात आला. मग heatlon mat खाली अंथरू यात आणि स्लीपिंग mat अंगावर घेवू असे ठरले. पावसाचा जोर कमी झाला होता आणि आम्ही फक्त तोंडावर प्लास्टिक किंवा स्लीपिंग चटई आणि बाकीचा पावसात असे हळूहळू आडवे झालो. जशी मांजरीची पिल्ले झोपतात तसे आम्ही एकमेकांच्या कुशीत, पायावर पाय टाकून आडवे झालो. रात्रीचे ११ वाजले होते अजून पूर्ण रात्र बाकी होती. दोन अभिषेक आणि त्यांचा एक मित्र तर जाळीदार चटई घेवून झोपले होते. झोपले म्हणजे सर्व रात्रभर जागेच होते. आता उज्वलाने तिचे blaket काढले पण पाऊस आला तर ते भिजून आणखीन ओले होईल आणि उद्या वजन वाढेल यावरून मी तिचे बरेच डोके खाल्ले. आता रात्रीचे २ वाजले होते आणि पावसाला सुरुवात झाली होती. तोंडावर प्लास्टिक असून सुद्धा कुठून कुठून पाणी अंगात शिरत होते. मी तसा नास्तिक माणूस पण पाउस थांबवा म्हणून मी देवाचा धावा सुरु केला आणि पाउस वाढला. तो आता थांबायचे नावच घेत नव्हता.
वेंकी आणि प्रवीण ने राहण्यासाठी तंबू आणले होते पण अशा वातावरणात त्यांचा काहीच उपयोग नव्हता. शेवटी त्यांनी सुद्धा ते अंगावर पांघरून म्हणून घेतले. मी सतत थोड्याथोड्या वेळाने वाजले किती म्हणून अंबरीश ला विचारात होतो. झोप तर येत नव्हती आणि डोक्यात विचारांचे थैमान सुरु होते. मधेच वाटले त्या बाजूच्या धबधब्याचे पाणी अचानक वाढले तर ? नुसत्या कल्पनेने अंगावर शहर आला. अचानक डोक्यात विचार आला आपण मोकळ्या जागेत पडलो आहोत, अशा ठिकाणी साप, विंचू असतात. आता मात्र डोळ्यासमोर सापच साप दिसू लागले. एक एक मिनिट एका तासाएवढा वाटत होता. आजूबाजूला झोपलेल्यांची सुद्धा चुळबुळ सुरूच होती. पावसाचा जोर वाढतच चालला होता. उज्वलाचे ब्लंकेत पूर्ण ओले झाले होते. बाजूला दोन अभिषेक आणि सुमन वेताची चटई डोक्यावर घेवून बसले होते. आणि काय आश्चर्य कुणीतरी चक्क घोरत होते. अशा स्तिथीत कुणी झोपू शकते काय ? पावसाने आणि थंडीने सर्व अक्षरशः थरथरत होते, माझे तर दात वाजत होते. सर्वांच्या तोंडचे पाणी पाळले होते.

nw (22).jpg
तेवढ्यात कुणीतरी म्हणाले 'उजाडले' , आता पाऊस थांबला होता पण तोंडावरून प्लास्टिक काढायची इच्छा होत नव्हती. तरी पण नराहवून प्लास्टिक बाजूला काढले तर सगळीकडे धुकेच धुके. सहज उजव्या बाजूला पहिले तर २०-२५ फुटांवरच कड्याचे टोक होते. डाव्या बाजूला तो रात्रभर झोप उडवणारा धबधबा कोसळत होता. आता ६.४५ झाले होते थोडे आणखीन स्पष्ट दिसायला लागले. ज्या टेकडीवर काळ मिरोन रस्ता शोधात होता तेथेच दोन पायवाटा स्पष्ट दिसत होत्या. लगेच सर्व समान आवरले आणि अंथरलेल्या चटई उचलल्या आणि पाहतो तर काय ज्या दगडावर आम्ही झोपलो होतो त्यावरच एक बाण होता.
लगेच समोरील पायवाटेने चालू लागलो आणि १० मिनिटात कोकणकड्यावर पोहचलो. कड्यावर लावण्यात आलेले कठडे उन्मळून पडले होते किंवा कुणीतरी पडले होते. जोरदार वारा, ढग आणि धुके याशिवाय काहीच दिसत होते. कड्यापासून गुहेकडे जाण्यासाठी ५-५ पावलांवर दिशादर्शक बाण होते. आम्ही झरझर गुहेच्या दिशेनं चालू लागलो आणि समोरून कामा आणि अनंता येताना दिसले. कामा आणि अनंता रात्री कड्यापर्यंत येवून परत गेले होते. कदाचित त्यांनी आमची अशाच सोडली असावी. गुहेजवळ पोहचताच देवळाचे शिखर दिसले आणि मनोमन शंकराला नमस्कार केला.
nw (21).jpgnw (33).jpg
आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही अशी रात्र आम्ही हरिश्चंद्रगडच्या कोकणकड्यावर काढली होती. खरच निसर्गासमोर माणूस किती खुजा आहे ना ?
nw (32).jpgnw (25).jpgnw (35).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

2nd rock patch ujawya hatala warti chadhun ghal change karto to khupach avaghad aahe.

Amachya paiki ek hi mawala aasa navhata ki maza complete trek safe zala ase chhati thokun sangu shakat hota.

पावसाळी रात्री काळोखात ८ वाजता २० लोकांना सोबत घेऊन करायचा हा ट्रेक नव्हे. सगळे हातीपायी धड राहिलेत हे वाचून बरं वाटलं.म्स्त्च अनुभव.

Pages