कोकणकड्यावरील ती रात्र

Submitted by दुर्गभूषण on 1 October, 2012 - 10:08

१५ ऑगस्ट २०११ रोजी माझ्या ट्रेकिंग चा श्रीगणेशा झाला आणि पहिला ट्रेक होता हरिश्चंद्रगड. माझ्या त्या पहिल्या भेटीतच त्या निसर्गाने मला भुरळ घातली. त्यानंतर जवळ जवळ वर्षभर नळीच्या वाटेने जायचे भरपूर प्रयत्न केले पण असफल. बरोबर एका वर्षाने नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडला जायचा योग जुळून आला तो सुद्धा दस्तुरखुद्द अरुण सावंत यांच्या सोबत. लगेच सुरज मालुसुरे ला होकार करून टाकला.( नुकताच या पठ्ठ्याने एकट्याने लोणावळा-भीमाशंकर म्हणजे लोभी ट्रेक केला. ) पुढे अरुण सावंत सरांचा ट्रेक काही कारणांमुळे रद्द झाला आणि अजून एक ग्रुप नळीच्या वाटेने जाणार असे उज्वलाला कळले. थोड्या नाखुशीनेच होकार कळवून टाकला.
ठरल्याप्रमाणे कल्याण स्टेशनला रात्री ११ वाजता आम्ही जमलो आणि २ जीप मधून आम्ही वल्हीवरे उर्फ बेलपाडा गावाकडे कूच केले. रात्री २ वाजता आम्ही गावात पोहचलो आणि आमचा वाटाड्या कामा याच्या घराच्या वऱ्हांड्यात आम्ही मुक्काम ठोकला. मला काही रात्रभर झोप आली नाही आणि आजूबाजूची मंडळी रात्रभर घोरण्याची अंताक्षरी खेळत होते. सकाळी ६.३० वाजता सर्व उठले आणि चहा घेवून आपल्या सोयीनुसार वाघ ससे पकडायला गेले. गावातील लोकांचा दिवस आमच्या आधीच सुरु झाला होता. नदीवर आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी लगबग सुरु झाली होती. मीही माझे नवीन action trekking बूट घालून गेलो. बुटांना आणि मला एक मेकांची सवय नसल्यामुळे मी ३ वेळा तरी पाण्यात पडलो. आणि ३ ऱ्या वेळी तर कंबरभर पाण्यात . साहजिकच pant मधील मोबाईलने राम म्हटले. मग झटपट आवरून ओळख परेड साठी जमलो. आम्ही १७ जण या ट्रेक साठी होतो त्यामधील आमचा लीडर मिरोन ने हा ट्रेक २० पेक्षा जास्त वेळा केला होता पण पावसाळ्यात पहिल्यांदाच. या ट्रेक साठी २ जण खास हैदराबाद वरून आले होते. त्यातील वेंकी रेड्डी याने गेल्या ४ वर्षात सह्याद्री मधील १५० पेक्षा जास्त ट्रेक केले आहेत. आणि कालसुद्धा हा पठ्ठ्या लोहगड करून आला होता आणि हरिश्चंद्रगड ट्रेक च्या दुसऱ्या दिवशी तो विही धबधबा rapelling करणार होता. हरिश्चंद्रगड तर त्याने पाचेक वेळा केला होता. त्याचे 'सह्याद्री' बद्दल चे प्रेम आणि आकर्षण पाहून माझी छाती अभिमानाने २ इंच जास्तच फुगली.

बेलपाडा गावात एक समूह छायाचित्र
nw (6).jpgnw (1).jpg

सकाळी ७.४५ वाजता आमच्या १९ जणांच्या चमूने नळीच्या वाटेकडे कूच केले. गाव सोडताच कोकणकड्याचे विलोभनीय दर्शन होऊ लागले. पावसाळा असल्यामुळे कड्याने अजूनही धुक्याची चादर पांघरून घेतली होती.
थोड्यावेळातच आम्ही एका नदीसदृश्य ओहळाजवळ येवून पोचलो आणि हाच ओहळ आम्हाला शेवट पर्यंत साथसोबत करणार होता. आता हळूहळू कोकणकडा आणि रोहिदास शिखर यांचे दर्शन होवू लागले होते.
निसर्गाने विविध फुलांची सगळीकडे मुक्तहस्ताने उधळण केली होती. सकाळचे ९ वाजून गेले होते तरी कोकणकडा पूर्णपणे दृष्टीक्षेपात येत नव्हता. कामा कडून कळले कि भवानी धारेतून अजून एक वाट वर गडावर जाते. मिरोन ला म्हटले आता पुढल्यावेळी ती वाट करूयात. सकाळचे १० वाजले होते आणि आम्ही एका छोट्या धबधब्याच्यावर येवून ठेपलो. इथे जरा विश्रांती, तहानलाडू-भूकलाडू, फोटो सेशन करून पुढे कूच केले. वाटेत पहिला प्रस्तर लागला. नळीच्या वाटेत असे एकूण ५ प्रस्तर आहेत असे अनंता ( आमचा दुसरा वाटाड्या ) कडून कळले. पहिला प्रस्तर तसा सोपा असल्यामुळे आरामात पार केला. या ट्रेक मध्ये २ लोक सोडून बाकीचे सर्व अनुभवी ट्रेकर होते.
nw (8).jpg

११ वाजता आम्ही दुसऱ्या प्रस्ताराजवळ पोहचलो. हा प्रस्तर म्हणजे १५ फुटांचा एक कातळ होता आणि त्यावरून छोटा ओहळ वाहत होता. कामा आणि अनंता ने त्यांच्या paragon magic slippers ने हा चित्त्याच्या वेगाने पार केला. त्यांनी वर जावून रोप लावला. त्या नंतर मी आणि सुजित रोपचा आधार न घेता हा प्रस्तर चढून गेलो. आणि आम्हाला कोकणकडा सर केल्याचा आनंद झाला. नंतर स्वाती ने कातळ चढायला सुरुवात केली.
मिरोन ला कदाचित काहीतरी घडणार याचे संकेत आधीपासूनच मिळाले होते म्हणून तो स्वातीच्या मागोमाग चढू लागला. आणि पुढे एका क्षणी स्वातीचा हात सटकला आणि ती आणि दोन मोठे दगड खाली कोसळले. खाली मिरोन ने तिला अलगद झेलली पण त्यातील एक दगड मिरोन च्या मांडीवर आदळला. नशीब स्वाती नाही आदळली इति मिरोन . नंतर दीप्ती ने चढायला सुरुवात केली आणि तिची परीक्षा घ्यायला वरूण राजाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आणि पुढचे होल्ड्स तिला दिसेनात. मी वरून दीप्तीच्या कंबरेला बांधलेला दोर खेचून तिला वर ओढून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण दीप्ती च्या वाजनापुढे माझे प्रयत्न थिटे पडले. कशीबशी ती वर पोहचली. आता पाळी हैदराबादकर प्रवीणची होती. पाण्याचा मारा टाळण्यासाठी त्याने पोहताना घालतात तासाला चष्मा घातला होता. प्रवीण ने त्याची भलीमोठी ट्रेकिंग bag घेवून चढण्यास सुरुवात केली पण त्याला त्याची bag मागे खेचत होती. थोडेसे वर पोहचल्यावर पाणी थेट त्याच्या तोंडावर आदळू लागले तशी त्याची बोबडी वळली. पावसाचा जोर वाढला होता आणि त्याला काहीच दिसत होते. खालून वेंकी तेलगु मध्ये आणि मी वरून इंग्लिश मध्ये त्याला सूचना देत होतो पण त्याला काहीच ऐकायला येत नव्हते. तो अक्षरशः त्या patch वर पोहत होता. त्याची ती अवस्था पाहून माझी मात्र हसून हसून मुरकुंडी वळली होती. शेवटी प्रवीण ने त्याची मोठी bag वरून खाली टाकली आणि तो वर पोचला. वर पहिले तर एका मोठ्या दगडावर एक वानरसेना बसली होती. पण आमच्या सारख्या मोठ्या माकडांना पाहून त्यांनी धूम ठोकली.
nw (4).jpgnw (26).jpg
आता खरी नळीची चढण सुरु झाली होती. नळीचा हा भाग सांधण दरीची आठवण करून देत होता. फरक एवढाच कि सांधणला मोठे खडक आहेत आणि इथे निखळणारे छोटे दगड. पूर्ण वाट तुटलेल्या खडकांची बनलेली आहे. आता आम्ही नळीच्या अखेरच्या टप्प्यात पोहचलो होतो. आता बाजूला रोहिदास शिखर, त्यावरची लिंगी स्पष्टपणे दिसत होते. आता आम्ही ३ ऱ्या कातळाजवळ पोहोचलो. कामा आणि अनंता ने इथे आधीच एक शिडी लावून ठेवली होती. त्या शिडीला धातूच्या पायऱ्या असल्यामुळे त्यावरून चढणे अगदीच दिव्या होते. वर बांधलेल्या २ ऱ्या एका दोराचा आधार घेत कातळाला पाय लावून मी कसाबसा वर चढलो. इथून पुढे एक उजवा आणि एक डावे वळण घेत ती वाट पुढे जाते. इथून चालताना खूप सावधगिरी बाळगावी लागत होती कारण एक चूक आणि ...... वरून फक्त फुले वाहायची.

nw (3).jpgnw (30).jpg
पुढे अजून एक उजव्या हाताला वळण घेवून आम्ही ४ थ्या कातळजवळ येवून ठेपलो. ह्याची उंची जरी जास्त नसली तरी शेवाळामुळे तो धोकादायक बनला होता. नेहमीप्रमाणे कामा आणि अनंता paragon magic ने वर पोहचले आणि सर्वाना पुढे ओढून घेतले. ४ वाजले होते आणि इथे मी माझा नेहमीचा भाकरी आणि मश्रूम चा डबा खावून घेतला. तरी सर्वाना वर खेचायला ४५ मिनिटे गेली. आम्ही वर चालायला सुरुवात केली आणि मग एका विस्तीर्ण पठारावर येवून पोचलो. ते पार करून ६ वाजता आम्ही शेवटच्या कातळाजवळ येवून पोचलो. सुजित, भास्कर, कामा वगैरे आधीच वर पोहचले होते. हा सुद्धा ८-१० फुटाचा कातळ होता जो शेवाळाने पूर्ण भरलेला होता.
nw (7).jpg

आम्हाला काहीही करून अंधार पडायच्या आत गुहेत पोहचायचे होते. मग असा विचार आला कि मुलींना आधी वर पाठवूयात. सर्वात वजनाने हलकी असल्यामुळे रोहिणीला याचा पहिला मान मिळाला. तिने दोराला धरून कातळ चढायला सुरुवात केली पण तिचे tennis shoes कातळावरून घसरत होते. एका क्षणी असे वाटले कि हि आता पडणार आणि ती सरळ खाली आली. नशीब तिचे फक्त गुढघे कातळाला घासले. खाली मिरोन ने तिला अलगद झेलले. मग एक खेळाडू बाद झाल्यामुळे पुढील वजनी गटातील उज्वलाने कातळ चढायला सुरुवात केली. इथे उज्वलाने झोपून, बसून, लोळून एवढ्या प्रकारचे नमस्कार घातले कि विचारून नका. नंतर एक एक करून सर्वजण वर पोहचले तेव्हा रात्रीचे ८.१० वाजले होते.
सर्व दोर गुंडाळून विजेरीच्या उजेडात आम्ही पुढे चालू लागलो. आता पुढे आपल्या काय वाढून ठेवले आहे याची पुसटशीसुद्धा कल्पना आम्हाला नव्हती. पाउस, धुके यामुळे १० फुटांपलीकडचे सुद्धा काही दिसत नव्हते. बहुतेक आम्ही कोकणकड्याचा अगदी उजवीकडे होतो. मी, मिरोन, अंबरीश आणि कुणाल आम्ही बाणाच्या खुणा कुठे दिसतात का ते पाहत होतो. दिसलेल्या २ बाणानुसार आम्ही थोडे पुढे आलो. आता पुढे एकही बाण दिसत नव्हता. कामा आणि अनंता ला आम्ही आधीच गुहेत जागा पकडायला पाठवले होते. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पडला. आमचा एक walky - talky कामा कडे होता पण तो गुहेत पोचला असल्यामुळे त्याला संपर्क होत नव्हता. मग मिरोन गुहेत जेवण बनवणाऱ्या तुकारामला फोन केला. फोन खाली पाचनई गावात त्याच्या सौ कड आम्ही सांगितले कि आम्ही रस्ता चुकलो आहोत, कुणाला तरी मदतीकरिता पाठवा. सौ ने आम्हाला सांगितले कि पुढे नाला आहेत तो पार करून पुढे या. गुहेत संपर्क होवू शकणार नाही. एवढ्या पावसात कोण कशाला येईल आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला वाचवायला ? एक आशा होती कि कामा आणि अनंता येतील आपल्याला शोधत.
nw (10).jpg

मग मिरोन आणि अजून दोघे पुढे रस्ता शोधायला गेले आणि आम्ही आहोत तिथेच घोळका करून उभे राहिलो. आमच्या पुढेच आम्हाला एका धबधब्याचा आवाज येत होता. काही क्षणातच मिरोन आणि दोघे समोरच्या टेकडीवरती दिसेनासे झाले. आता त्यांना जावून दीड तास होवून गेला होता. मधेच त्यांचा ए-ओ असा आवाज येत होता. आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून त्यांना प्रतिसाद देत होतो. मग वाटले ते एकमेकांना आवाज देत असावेत. थोड्यावेळाने न राहवून रोहिणीने तुकारामच्या सौ ना फोन लावला आणि तिच्या मोडक्या तोडक्या मराठी मध्ये ती म्हणाली " ताई आम्ही हरवले आहे, तुम्ही कुणाला तरी संदेश द्याल का " तिच्या पुढे डोक्यात प्लास्टिक ची पिशवी घालून सुजित बसला होता आणि हसत होता. पण आता फोने हातात घेवून बोलायचे त्राण त्याच्यात नव्हते. मिरोन त्याचा फोन रोहिणी कडे ठेवून गेला होता आणि या लोकांचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी रोहिणी ने कुणालला फोन केला. तो म्हणाला कि ते लोक वर हरवले आहेत आणि खाली काहीच दिसत नाही आहे कुणीतरी आम्हाला घ्यायला वर या. सुजित आणि वेंकी लगेच वर गेले आणि त्यांना घेवून आले. ते आल्यावर कळले पुढे काहीच रस्ता दिसत नाही आहे. खूप धुके आहे आणि ते लोकच वर हरवले होते. ते आम्हाला आवाज देत होते पण त्यांना आमचा आवाज येत नव्हता.
nw (17).jpg

अशा रीतीने सर्व मार्ग बंद झाले होते आणि उजाडे पर्यंत आहोत तिथेच बसू यात असा निर्णय एक मताने घेण्यात आला. मग heatlon mat खाली अंथरू यात आणि स्लीपिंग mat अंगावर घेवू असे ठरले. पावसाचा जोर कमी झाला होता आणि आम्ही फक्त तोंडावर प्लास्टिक किंवा स्लीपिंग चटई आणि बाकीचा पावसात असे हळूहळू आडवे झालो. जशी मांजरीची पिल्ले झोपतात तसे आम्ही एकमेकांच्या कुशीत, पायावर पाय टाकून आडवे झालो. रात्रीचे ११ वाजले होते अजून पूर्ण रात्र बाकी होती. दोन अभिषेक आणि त्यांचा एक मित्र तर जाळीदार चटई घेवून झोपले होते. झोपले म्हणजे सर्व रात्रभर जागेच होते. आता उज्वलाने तिचे blaket काढले पण पाऊस आला तर ते भिजून आणखीन ओले होईल आणि उद्या वजन वाढेल यावरून मी तिचे बरेच डोके खाल्ले. आता रात्रीचे २ वाजले होते आणि पावसाला सुरुवात झाली होती. तोंडावर प्लास्टिक असून सुद्धा कुठून कुठून पाणी अंगात शिरत होते. मी तसा नास्तिक माणूस पण पाउस थांबवा म्हणून मी देवाचा धावा सुरु केला आणि पाउस वाढला. तो आता थांबायचे नावच घेत नव्हता.
वेंकी आणि प्रवीण ने राहण्यासाठी तंबू आणले होते पण अशा वातावरणात त्यांचा काहीच उपयोग नव्हता. शेवटी त्यांनी सुद्धा ते अंगावर पांघरून म्हणून घेतले. मी सतत थोड्याथोड्या वेळाने वाजले किती म्हणून अंबरीश ला विचारात होतो. झोप तर येत नव्हती आणि डोक्यात विचारांचे थैमान सुरु होते. मधेच वाटले त्या बाजूच्या धबधब्याचे पाणी अचानक वाढले तर ? नुसत्या कल्पनेने अंगावर शहर आला. अचानक डोक्यात विचार आला आपण मोकळ्या जागेत पडलो आहोत, अशा ठिकाणी साप, विंचू असतात. आता मात्र डोळ्यासमोर सापच साप दिसू लागले. एक एक मिनिट एका तासाएवढा वाटत होता. आजूबाजूला झोपलेल्यांची सुद्धा चुळबुळ सुरूच होती. पावसाचा जोर वाढतच चालला होता. उज्वलाचे ब्लंकेत पूर्ण ओले झाले होते. बाजूला दोन अभिषेक आणि सुमन वेताची चटई डोक्यावर घेवून बसले होते. आणि काय आश्चर्य कुणीतरी चक्क घोरत होते. अशा स्तिथीत कुणी झोपू शकते काय ? पावसाने आणि थंडीने सर्व अक्षरशः थरथरत होते, माझे तर दात वाजत होते. सर्वांच्या तोंडचे पाणी पाळले होते.

nw (22).jpg
तेवढ्यात कुणीतरी म्हणाले 'उजाडले' , आता पाऊस थांबला होता पण तोंडावरून प्लास्टिक काढायची इच्छा होत नव्हती. तरी पण नराहवून प्लास्टिक बाजूला काढले तर सगळीकडे धुकेच धुके. सहज उजव्या बाजूला पहिले तर २०-२५ फुटांवरच कड्याचे टोक होते. डाव्या बाजूला तो रात्रभर झोप उडवणारा धबधबा कोसळत होता. आता ६.४५ झाले होते थोडे आणखीन स्पष्ट दिसायला लागले. ज्या टेकडीवर काळ मिरोन रस्ता शोधात होता तेथेच दोन पायवाटा स्पष्ट दिसत होत्या. लगेच सर्व समान आवरले आणि अंथरलेल्या चटई उचलल्या आणि पाहतो तर काय ज्या दगडावर आम्ही झोपलो होतो त्यावरच एक बाण होता.
लगेच समोरील पायवाटेने चालू लागलो आणि १० मिनिटात कोकणकड्यावर पोहचलो. कड्यावर लावण्यात आलेले कठडे उन्मळून पडले होते किंवा कुणीतरी पडले होते. जोरदार वारा, ढग आणि धुके याशिवाय काहीच दिसत होते. कड्यापासून गुहेकडे जाण्यासाठी ५-५ पावलांवर दिशादर्शक बाण होते. आम्ही झरझर गुहेच्या दिशेनं चालू लागलो आणि समोरून कामा आणि अनंता येताना दिसले. कामा आणि अनंता रात्री कड्यापर्यंत येवून परत गेले होते. कदाचित त्यांनी आमची अशाच सोडली असावी. गुहेजवळ पोहचताच देवळाचे शिखर दिसले आणि मनोमन शंकराला नमस्कार केला.
nw (21).jpgnw (33).jpg
आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही अशी रात्र आम्ही हरिश्चंद्रगडच्या कोकणकड्यावर काढली होती. खरच निसर्गासमोर माणूस किती खुजा आहे ना ?
nw (32).jpgnw (25).jpgnw (35).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख क्रमश आहे का? नाही थोडक्यात संपवलात म्हणून विचारले.
बाकी हरिश्चंद्रगड.ट्रेक, कोणत्याही ऋतुत लोभसवाणाच वाटतो.

धन्यवाद.

बापरे...कसला भयाण अनुभव आहे...मानलं तुम्हाला...भर पावसात नळीच्या वाटेनी चढलात आणि कोकणकड्यावर मुक्काम...वाचूनच शहारा आला अंगावर....
साष्टांग नमस्कार.....

आपल्या सोयीनुसार वाघ ससे पकडायला गेले >> Lol
पण त्यातील एक दगड मिरोन च्या मांडीवर आदळला. नशीब स्वाती नाही आदळली इति मिरोन >>
खालून वेंकी तेलगु मध्ये आणि मी वरून इंग्लिश मध्ये त्याला सूचना देत होतो पण त्याला काहीच ऐकायला येत नव्हते. तो अक्षरशः त्या patch वर पोहत होता.>> Rofl

इथून पुढे एक उजवा आणि एक डावे वळण घेत ती वाट पुढे जाते. इथून चालताना खूप सावधगिरी बाळगावी लागत होती कारण एक चूक आणि ...... वरून फक्त फुले वाहायची.>> सर्वात डेंजरस वळण.. गेला तर हाती नाही लागायचा..

इथे उज्वलाने झोपून, बसून, लोळून एवढ्या प्रकारचे नमस्कार घातले कि विचारून नका. >> Lol

राहण्यासाठी तंबू आणले होते पण अशा वातावरणात त्यांचा काहीच उपयोग नव्हता. शेवटी त्यांनी सुद्धा ते अंगावर पांघरून म्हणून घेतले.>> अरेरे Lol

आणि काय आश्चर्य कुणीतरी चक्क घोरत होते. अशा स्तिथीत कुणी झोपू शकते काय ? >> Rofl

वर्णन वाचून सॉल्लिड Lol ग्रुपट्रेकिंगमध्ये होणार्‍या विनोदांची आठवण झाली.. ह्या वाटेने थंडीमध्ये गेलोय (तेव्हा तोच शालोम अ‍ॅडवेन्चर्सवाला मिरॉन होता) सो परिस्थितीची पुरेपुर कल्पना आली काय गोची झाली असेल ते..

खरच निसर्गासमोर माणूस किती खुजा आहे ना ? >> मग थोडे पाउस ओशाळल्यानंतरच जायचे ना.. कशाला ती धोकादायक मस्ती.. ऑगस्टचा पाउस म्हणजे तडाखेबंदच असणार.. थोडे इकडे तिकडे झाले तर जीवाला धोका आहे तिथे.. सप्टेंबरमध्ये केला असता तर ठीक होते एकवेळ..

Trekking kase nasave he dakhavnari hee post ahe.
Savistar nantar lihitoch.

नाळीची वाट हा भयाण प्रकार आहे. खूप वर्षांपूर्वी मी पावसाळ्यात हा ट्रेक केला होता. पण तेव्हा अरुण सावंत हा कसलेला गिर्यारोहक म्होरक्या म्हणून होता. त्यामुळे वाट फार सोपी वाटली. अर्थात आम्ही अवघे ५ जण होतो. मात्र पावसाळी रात्री काळोखात ८ वाजता २० लोकांना सोबत घेऊन करायचा हा ट्रेक नव्हे. सगळे हातीपायी धड राहिलेत हे वाचून बरं वाटलं.

-गा.पै.

मी तसा नास्तिक माणूस पण पाउस थांबवा म्हणून मी देवाचा धावा सुरु केला आणि पाउस वाढला. तो आता थांबायचे नावच घेत नव्हता.>>>> Lol

___/\___
एक चूक आणि ...... वरून फक्त फुले वाहायची.>>>>:(

हेम सर येउदे आता सविस्तर.>>>>+१

मस्त जबरी अनुभव...
तुमच्याप्रमाणे माझाही ट्रेकिंगचा श्री गणेशा हरिश्चंद्रगडावरच झाला ... Happy

काही खटकलेले मुद्दे..
१. नळीची वाट' सारख्या ट्रेकला तांत्रिक चमू सक्षम हवा. इतक्या मोठ्या संख्येने सहभागींसाठी १ नेता आणि हैद्राबादचे दोघे, असे धरले तरी हे खूप अपुरे होते. (वेंकी हे GHAC(great hyderabad adventure club)चे कां?)
२. इतक्या मोठ्या संख्येने सहभागींना न्यायच्या आधी पावसाळ्यातच पायलट ट्रेक आयोजकांतर्फे व्हायला हवा होता. त्यामुळे त्यांना किती सहभागी वेळेआधी नेऊ शकतो याचा अंदाज आला असता आणि सगळे नवखे असते तरी वेळेचा अंदाज चुकला नसता.
३. दोन्ही वाटाड्यांना गुहेत जागा धरायला पाठवण्याऐवजी एका वाटाड्याबरोबर नेत्यांपैकी एखादा जायला हवा होता. त्यामुळे एक वाटाड्या ग्रुपच्या हाताशी राहिला असता. अशा परिस्थितीत त्यांचा अनुभव अमुल्य असतो.
४. दोन्ही वाटाडे रात्री येऊन परत गेले, त्यांनी ग्रुपची शोधाशोध करतांना हाका कां मारल्या नाहीत??
५. सहभागी पडली आणि नेत्याने झेलली असे वर्णन आले आहे. सहभागीला बिले दिला नव्हता कां? जर दिला नसेल तर कां?
यामध्ये आयोजकांच्या त्रुटी दिसत आहेत. तुम्ही लेख लिहितांना लेखाचा आशय साहस म्हणून जरी गृहीत धरला असेल तर तो 'वेडं साहस' यामध्येही मोडणार नाही. कारण वेडं साहस वैयक्तिक पातळीवर असतं. दुर्दैवाने अपघात झाला असता तर तुम्ही अशा गंमतभाषेत लिहू शकला नसता.
.. आणि अपघाताच्या बहुतेक शक्यतांमधून तुम्ही गेलात.

या ट्रेक ने मला बरेच कांही दिले .... ती रात्र माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय रात्र होती .... त्यासाठी नशीब लागत !!
या ट्रेक साठी आम्ही १७ मावळे आणि २ गावकरी असे १९ जण होतो ... या मध्ये बहुतेकाने हा ट्रेक नळीच्या वाटेने ३ - ४ वेळा केला होता ... आमचा म्होरक्या मिरोन ने तर २० + वेळा केला आहे फक्त नळीतून ... venky त्याच्या मित्रा (प्रवीण ) बरोबर हैदराबाद हून या ट्रेक साठी आला होता ...तो हैद्राबाद ला राहतो ....आणि त्याने हैद्राबाद - मुंबई up down करून सह्याद्रीतले 150+ ट्रेक केले आहेत ... असे या ट्रेक मध्ये एका पेक्षा एक अव्वल कसदार मावळे होते ... येथे फक्त मिरोन आयोजक नव्हता तर .... सगळे जण आयोजकाच्या भूमिकेत होते .... त्यामुळे हेम सर म्हणतात तसे काही आम्हा कोणालाही वाटले नाही ... माणूस म्हणजे तो कळत - नकळत काही चुका करतो ... त्या दिवशी आम्ही संद्याकाळी ६ वाजता कोकणकड्या जवळ च्या शेवटच्या कातळाजवळ पोहोचलो .. आम्हाला वाटले आता आम्ही आरामात अंधार पडायच्या आत गुहे पर्यंत पोहोचू ... म्हणून कामा ला आम्ही पुढे गुहेकडे पाठवले .... मला नाही वाटत हा निर्णय चुकीचा होता .... त्या मुळेच तर आम्हाला ती रात्र उपभोगता आली ... त्या रात्रीने आम्हाला भरपूर काही शिकवलं ... हा ट्रेक आम्ही १८ - १९ ऑगस्ट २०१२ ला केला ..... आणि ३० ऑगस्ट २०१२ ला आम्ही अलंग - मदन ला गेलो ... पुन्हा २२ - २३ सेप्तेम्बेर ला नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडला गेलो ....
.... आणि ब्लोग बद्दल बोलायचे झाले तर ...आम्ही १७ जणांनी या ट्रेक चा जो आनंद उपभोगला आहे तो शब्दात नंक्कीच मांडता येणार नाही ... हा ब्लोग भूषण ने मस्त लिहिलंय .. तो काही Yo Rocks सारखा अव्वल दर्जाचा लेखक नाही ... त्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे ब्लोग लिहिण्याचा ... त्यामुळे ... जर काही या लिखाणात चुका असतील ( सहभागी पडली आणि नेत्याने झेलली अशी वर्णने ... ) तर त्या गोड मानून घ्या ...आणि पुढील ब्लोग अलंग - मदन साठी भूषण ला आशीर्वाद द्या Happy

एक अविस्मरणीय रात्र !!
काही त्रुटी असतीलही परन्तु साऱ्यांच्या सहकार्याने आणि एकजुटीने सारे व्यवस्थित पार पडले .....
मैत्रीचे नविन आणि मजबूत बन्ध बनले .....

उत्तम लिखाण दुर्गभूषण... !!

दुर्गभूषण, हेमची अनुभवी पोस्ट पॉझिटिव्हली घ्या. Happy त्यातील मुद्दे पटण्यासारखे आहेत.
.. आणि अपघाताच्या बहुतेक शक्यतांमधून तुम्ही गेलात.>>>>हे टाळता आले पाहिजे.

त्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे ब्लोग लिहिण्याचा ... त्यामुळे ... जर काही या लिखाणात चुका असतील तर त्या गोड मानून घ्या ...>>>>> काहीही चुका नाही. सुरेख वर्णन केले आहे. मात्र ते वाचताना सगळ्यांना काळजी वाटली ती प्रत्येकाच्या पोस्टमधुन व्यक्त झाली आहे.

अलंग-मलंगचा वृतांत लवकर येऊ द्या. Happy

जिप्सीच्या संपुर्ण पोस्टला अनुमोदन..

मित्रा..इथे लिखाणाबद्दल प्रश्णच नाहीये.. मिश्कील शैलीत लिहीले आहे.. फक्त एकच इतका धोका नको रे पत्करायला.. खासकरुन ते दोन तीन नवखे होते त्यांना घेउन.. जिथे एरवी कुठल्याही खडकाचा/दगडाचा भरवसा नसतो तिथे एक साधी चुक किती महागात पडली असती.. माझे वैयक्तिक मत तरी एवढेच की भर पावसात करण्याजोगा तो ट्रेक नाहीये.. सप्टेंबर ऑक्टोबरपासून त्यातल्या त्यात ठिक आहे.. जुलै-ऑगस्ट हे महीने बिग नो नो !

असो सगळे सुखरुप गेलात तेच बरे.. नि अशा अनुभवात सहभागी झालेल्या ट्रेकर्समध्ये जे काय मैत्रीचे बंध निर्माण होतात त्याला तोड नाही हे मात्र खरे.. तोच एक मोठा प्लसपॉईंट ठरतो.. नि भन्नाट अनुभव ठरतो.. बाकी मात्र सबकुछ रामभरोसे.. नसिब अपना अपना... मीदेखील असा काहीसा अनुभव एक दोन ग्रुपबरोबर घेतला होता. तेव्हा मजा वाटली होती.. पण आता बरेच काही कळून चुकलेय.. नि शक्यतो ग्रुपबरोबर जाणे टाळतो आता..

<<१. नळीची वाट' सारख्या ट्रेकला तांत्रिक चमू सक्षम हवा>> हे खरेय.. पण होते काय की जो सक्षम चमू ठेवतो तिकडे फी जास्त असते.. त्यात बहुतांशी ट्रेकर्स कॉलेजला जाणारे वा दोनदोन आठवडयांनी करणारे असतात त्यांच्यासाठी मग तो सक्षम चमूवाल्यांचा ट्रेक परवडेबल नसतो.. नि जे लोक्स कमी पैश्यात ट्रेक आयोजित करतात तिथे काही छोटया छोट्या गोष्टी चुकून दुर्लक्षित होतात जसे बिल्यांचा तुटवडा वा बिलेच नसतो.. पण लिडरशीप वगैरे सगळे ठिक असते.. सहभागी ट्रेकर्संना बरेच स्वातंत्र्य दिले जाते सो ते खूप एन्जॉय करतात.. त्यांच्याकडून देखील कामे नकळतपणे करुन घेतली जातात.. बोलायच्या भाषेत HELP... मग होते काय की करणार्‍याचा आत्मविश्वास दुणावतो वा असे वाटते की आपण स्वतःनेच ट्रेक पार केला आहे.. शिवाय इथे 'फारच' वाटणारे काटेकोर नियम नसतात... त्यांना 'सर' नको 'यार' हवा असतो.. अतिप्रोफेशनलपणा नको असतो.. तर दुसरिकडे ट्रेक आयोजनात तोटा नको म्हणून वा व्यवहारिक विचाराने म्हणून ग्रुपचा आकारही वाढवण्याचा धोका पत्करला जातो.. त्यामुळे मोठीच्या मोठी रिस्क घेउनच त्यातल्या त्यात परवडेबल दरात ट्रेक आयोजित केले जातात.. अगदी बहुतांशी कठीण ट्रेकची श्रेणीदेखील मध्यम म्हणून घोषित करतात.. साहाजिकच तरुणवर्ग अश्य ग्रुप्सकडे जास्त वळतो.. पण काही म्हणा अश्या ट्रेकींगग्रुप्समुळे आमट्रेकर (!) असले भारी ट्रेक अनुभवतो हे मात्र सत्य आहे.. ज्याला कळते वळते वा जो नियमित ट्रेक करतो तो अश्या परिस्थितीत स्वतःला बरोबर निभावतो.. पण ज्याला कश्याचे काय माहित नसते त्याची होणारी हालत मात्र बघेबल नसतेच.. सो अश्या ग्रुप्सबरोबर ट्रेक करताना आपण स्वतः किती पात्र आहोत, ट्रेकमध्ये कितपत धोका आहे वा ट्रेकआयोजकांची कितपत तयारी आहे हे ठरवूनच ट्रेक करावा...नवख्यांनी मात्र सरळ सक्षम तांत्रिक चमूच्या ट्रेकची वाट धरावी... इति मम निरिक्षणम निष्कर्षम भाषणम संपुर्णम... Proud
जल्ला काय पण करा पण जीवाला सांभाळा ! तरच आम्हाला वृत्तांत वाचता येतील.. Proud कल्ला काय.. Happy

अनुभव जबरीच आणि लिखाण पण खासच.
पण हेम आणि यो चा सल्ला जरुर विचारात घ्या. अर्थात आता तुम्हाला अनुभव आलाच आहे म्हटल्या वर तुम्ही परत असा धोका पत्करणार नाही ही आशा.

पु. ले. शु.

हायला.
मला वाचूनच कापरे भरले. लिहिलेय मस्त, पण करायला अजिबात जाऊ नये.

हेम आणि यो रॉक्स यांना अनुमोदन.
आमट्रेकर (!) ,इति मम निरिक्षणम निष्कर्षम भाषणम संपुर्णम... जल्ला काय पण करा पण जीवाला सांभाळा ! तरच आम्हाला वृत्तांत वाचता येतील.. कल्ला काय >> +१०००

लेखन सुंदर आहे... लै भारी अनुभव

यो आणि हेमला अनुमोदन... विनाकारण धोका पत्करुन हौस भागवू नये. ट्रेकच्या आधी सुरक्षेचा विचार होणे गरजेचे आहे.

अनुभव भारीच आहे... पण पूर्ण प्लॅन केल्यानंतर जर असा अनुभव आला असता तर त्यात अधिक थ्रिल वाटलं असतं.. हे वाचताना का कुणास ठाऊक, पण ट्रेकचा प्लॅन आणि पूर्वतयारीच कमी पडली असं वाटत राहिलं... अशा आपणहून ओढवून घेतलेल्या थ्रिलमध्ये धोकेच अधिक असतात..

पुढील भटकंतीला शुभेच्छा Happy

प्रिय माबोकरांनो,प्रतिक्रियेबद्दल हार्दिक आभार. अनुभवी व्यक्तींच्या बहुमूल्य सल्ल्यांची व मार्गदर्शनाची आम्हास नित्य व नितांत गरज आहेच, तेव्हा अशीच कृपादृष्टी असू द्यावी हि नम्र विनंती.

आता आपल्या शंकांबद्दल थोडे -

१. आम्हा सहभागींना कोणत्याही क्षणी तांत्रिकतेचा अभाव जाणवला नाही, कारण गरजेच्या प्रत्येक क्षणी आम्हास तांत्रिक आधार होताच ( उदा. बिले, हार्नेस, कॅराबिनर ), किंबहुना माझ्या वैयक्तिक मतानुसार गरजेपेक्षा जास्तच ( उदा. तिसऱ्या प्रस्तरप्रसंगी शिडी असणे. ) !! तसेच, दोन स्थानिक लोकही तितकेच सक्षम गृहीत धरले जाऊ शकतात.

२. जरी पायलट ट्रेक झाला तरी प्रत्यक्ष ट्रेकची परिस्थिती हि भिन्न राहणारच कारण त्यात प्रामुख्याने सारेच घटक ( उदा. संख्या, क्षमता ) भिन्न असतात. पायलट ट्रेकने कल्पना जरी येत असली तरी तशीच परिस्थिती अपेक्षित नसावी.

३. शेवटच्या प्रस्तरास अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागला, पण कदाचित त्यामुळेच वर जायला वेळ लागला.
पण त्यामुळेच अशी अविस्मरणीय अशी रात्र ती सुद्धा कोकणकड्यावर अनुभवयास मिळाली.
यो च्या पोस्टला अनुमोदन , आजकाल ट्रेक्स थोडे आणि ओर्गानिझेर्स फार अशी परिस्थिती आहे.

आपल्या सर्वांच्या प्रेमळ सूचना, सल्ले आणि शुभेच्छा शिरसावंद्य.
आता लवकरच पावसाळी अलंग-मदन ट्रेक ची पोस्ट टाकतो.

बापरे...कसला भयाण अनुभव आहए मानलं तुम्हालाभर पावसात नळीच्या वाटेनी चढलात आणि कोकणकड्यावर मुक्काम...वाचूनच शहारा आला अंगावर

बापरे...कसला भयाण अनुभव आहए मानलं तुम्हालाभर पावसात नळीच्या वाटेनी चढलात आणि कोकणकड्यावर मुक्काम...वाचूनच शहारा आला अंगावर

varnan khup mast..
amhi pan 1 2 sep 2012 la offbeat barobar ha trek kela.
amhala jawalpass 12 tass lagale pan tabbal 8 leaders. 16 mawalyansathi asalyamule avadhi jeev gheni dhadpad karawi lagali nahi.
tasa ha trek pahilayndach ani bhar pawasalyatach kela ya peksha motha anubhav kai asel.

parat 15-16 oct la janyacha plan karat aahe konachi iccha asel tar swagatach.

Pages