दरवळणारे गाव फुलांचे उजाड झाले

Submitted by -शाम on 1 October, 2012 - 08:28

दरवळणारे गाव फुलांचे उजाड झाले
ऋतू कसे माणसांप्रमाणे लबाड झाले ?

मायेची मोहाची किमया आहे सगळी
भल्या-भल्यांच्या मेंदूमध्ये बिघाड झाले

त्यांनासुद्धा विकेंड असतो पार्टी असते
कसे कळावे कधी लेकरू उनाड झाले

तुझ्या भुकेला अंतच उरला नाही आता
बघता बघता तुझे माणसा गिधाड झाले

इथे कशाला दंगल करता धर्मान्धांनो
जे झाले ते तिकडे सीमेपल्याड झाले

याच भयाने मनातले विझवितो निखारे
उडेल भडका जर एखादे चहाड झाले

अजूनही ये-जा दु:खांची तशीच आहे
जरी खिळखिळे आयुष्याचे कवाड झाले

कळले नाही इतका कचरा कुठून आला
जीवन म्हणजे आठवणींचे कबाड झाले

.................................... शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजूनही ये-जा दु:खांची तशीच आहे
जरी खिळखिळे आयुष्याचे कवाड झाले

कळले नाही इतका कचरा कुठून आला
जीवन म्हणजे आठवणींचे कबाड झाले<<<

वा वा, सगळी गझलच आवडली आणि हे शेर तर फारच

Pages