आनंदी मन

Submitted by अजित अन्नछत्रे on 30 September, 2012 - 01:44

चेहऱ्यावरील स्मितहास्य - खरोखरीच, किती सुंदर अभिव्यक्ती आहे ही! तुम्ही अशी माणसे पाहिली आहेत? हो, हो! निश्चितच पाहिली असतील! अशी माणसं कि ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य असते! आजकालच्या धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या जीवनात चेहऱ्यावर एखादे वेळेस उमटणारे हसू हे सुद्धा फार दुर्मिळ झालाय! मग कायमच्या स्मित हास्याची काय बात? पण अशी माणसे समाजात काही वेळेस आढळतात! स्वतःशीच गुणगुणणारी, स्वतःच्याच नादात असणारी, चेहऱ्यावर लोभसवाण हसू बाळगणारी! जणू विधात्याने समाजात पेरलेले देवदूतच! हे देवदूत जणू आपल्या स्मित हास्यातून साऱ्या जगाला सांगत असतात, "बाबांनो, मनुष्याच जीवन पूर्णत्वाने जगणे हा किती आनंददायक अनुभव आहे! जरा आनंदी मनाने हा मध चाखा तरी!"

खरच, हे देवदूत आपल्या चेहऱ्यावर कायमचे स्मितहास्य आणतात तरी कुठून? खर तर, चेहऱ्यावरील या स्मितहास्याचे आनंदी मनाशी फार जवळचे नाते आहे! चेहऱ्यावरील स्मित हास्य म्हणजे जणू आनंदी मनाने आपल्या आनंदी स्थितीची दिलेली एक पोच-पावतीच! स्मित हास्य म्हणजे जणू आनंदी मनाचा कवडसा! मनच मुळात आनंदी नसेल तर चेहऱ्यावर स्मितहास्य येऊ शकेल का? आपल्या मराठीत एक म्हण आहे, "आडातच नसेल तर पोहोऱ्यात कुठ्न येणार?" तर चेहऱ्यावरील स्मितहास्यचा उगम हा केवळ आनंदी मनातच आहे!

माझ्या मते आनंदी स्वभाव आणि विनोदी स्वभाव यामध्ये फार फरक आहे - जसा स्मितहास्य आणि हास्य या मध्ये आहे. आनंदी व्यक्ती ही विनोदी असलीच पाहिजे हे काही जरुरी नाही. तसेच विनोदी व्यक्तीचे मन हे नेहेमीच आनंदी असते असे म्हणणेसुद्धा चुकीचे ठरेल! चेहऱ्यावर फुटलेले हसू हे एखाद्या विनोदाला दिलेली प्रतिक्रिया असू शकते. मग स्मित हास्याचे काय? स्मितहास्य हे सुद्धा एखाद्या विनोदाला दिलेली प्रतिक्रिया असू शकत नाही? जरूर असू शकते! पण विनोदाला दिलेली प्रतिक्रिया ही क्षणिक असते! पण चेहेऱ्यावर असणारे कायमचे स्मितहास्य? ते उसने आणि प्रतिक्रियात्मक असूच शकत नाही - ते तर केवळ आनंदी मनाचेच द्योतक आहे!

तर मग आनंद म्हणजे तरी काय? खर तर आनंदाची व्याख्या ही वयानुसार बदलत असते! पाळण्यातली तान्ही बाळे आपल्या मातेचा स्पर्श बरोब्बर ओळखतात - शाब्दिक संभाषणाविना! तोच स्पर्श त्यांना आनंददायक असतो. आणि या आनंदातूनच त्यांच्या चेहऱ्यावर उमटते स्मित हास्य! बऱ्याच वेळेला आपण असेही पाहतो कि लहान मुले झोपेतच हसतायत! कुठून येत हे त्यांच्या चेहऱ्यावर हसू? अस म्हणतात कि लहान मुलांचे संधान हे थेट देवाशीच असते. तेव्हां कदाचत लहान मुले ही झोपेत देवानी मारलेल्या विनोदाला हसत असावीत! शेवटी, हे जग, हे विश्व आहे तरी काय? देवानी केलेला एक विनोदच आहे! "अफाट विनोद" म्हणा पाहिजे तर!

आपलं जसजसे वय वाढत जाते तसतशी आनंदाची व्याख्या सुद्धा बदलत जाते. शैशवावस्थेत आपल्या मित्रांबरोबर खेळलेले खेळ, काढलेल्या खोड्या, ते पावसात भिजणे यातच काय तो आनंद! मला आठवतंय, आमच्या लहानपणी आमचे आनंद आणि गरजा या फार साध्या, सरळ आणि सोप्या होत्या. शालेय अवस्थेत मधल्या सुट्टीत केलेले उद्योग यात तर फार मोठा आनंद असायचा! त्यावेळात खाल्लेली चन्या-मन्या बोरे, बुड्ढी का बाल आणि रंगीत बर्फाचा गोळा या साऱ्या गोष्टी आठविल्या कि अजूनही तोंडाला पाणी सुटते! मधल्या सुट्टीत तर क्रिकेट आणि फुटबाल असं रंगायच, कि जणू त्यासाठीच आम्ही शाळेत जात असू!

तारुण्यावस्थेत आपल्या प्रिय व्यक्तीचे दर्शन आणि त्याच्या सहवासात मिळणारा आनंद हा काही आगळा-वेगळाच! आपल्या प्रियाचे सान्निध्य अन सहवास - बस, मनाला एव्हढीच काय ती आस! त्याच्या दर्शनातच सारं काहीं मिळत! त्या अबोल संभाषणात केवढा मतितार्थ साठलेला! तो जवळ असावा एव्हढीच काय ती इच्छा - मग त्याचे सान्निध्य एका बाजूला अन सार जग दुसऱ्या बाजूला!

पण "निर्मितीत दडलेला आनंद (Joy of creation)" हा काहीं वेगळाच! मग तुमचे वय काहीही का असेना! एखाद्या लहान मुलाचे, त्याने काढलेल्या पेंटिंग बद्दल कौतुक करून पहा, आणि बघा त्याचे डोळे लगेच कसे लकाकतात ते! "या अफाट जगात मी सुद्धा काहीं तरी करू शकतो" या भावनेत केव्हढा आनंद भरला आहे! एखाद्या चित्रकाराने काढलेले अद्वितीय पेंटिंग, किंवा एखाद्या गायकाने रंगविलेली मेहेफील, एखाद्या क्रिकेटपटूने टीमला अवघड परिस्थितून बाहेर काढताना मारलेले शतक, किंवा एखाद्या शास्त्रज्ञने लावलेला असाधारण शोध - या creations मध्ये फार मोठा आनंद दडलेला आहे!

ऐहिक सुखाच्या पलीकडे पोहोचलेल्या संत मंडळींच्या आनंदाचे काय वर्णन करावे? त्यांचे आनंद वेगळे आणि आनंद-स्त्रोतही वेगळे ! निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या या संतांच्या आनंदी मनाचे तुकारामांनी आपल्या अभंगात किती अचूक वर्णन केले आहे बघा:

वृक्ष-वल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती

वृक्ष-वल्ली आणि वनचरे हेच आमचे सगे-सोयरे! पशु पक्षांचेकानावर पडणारे मधुर कूजन यातच आमचा आनंद!

आकाश मंडप पृथ्वी आसन
रमे तेथे मन क्रीडा करू!

ना बंगला-इस्टेट, ना राजे-रजवाडे! जणू विधात्याने बनविलेली पृथ्वी हेच आमचे आसन अन माथ्यावर असलेले आकाश हेच आमचे छत! किती आनंदी आहे संतांचे मन!

संतांच्या या आनंदी मनस्थितीचे दर्शन आजही आपल्याला घडते ते पालखीच्या स्वरुपात! पालखी, एक वार्षिक आनंदसोहोळा! पंढरीच्या दर्शनाला आषाढ-कार्तिक महिन्यात निघणारी ही वारकऱ्यांची वार्षिक आनंदयात्रा! गेली शेकडो वर्षे ही परंपरा चालू आहे. अनवाणी पायांनी, स्वतःचे देहभान विसरून शेकडो मैल चालत जाणारे हे विष्णूभक्त! त्यांचा केवळ एकच ध्यास - विठूमाऊलीच दर्शन! संत नामदेवांनी वैष्णवांच्या या परमानंदी स्थितीचे अचूक वर्णन असे केले आहे:

काळ देहासी आला खाऊ,
आम्ही आनंदे नाचु-गाऊ!

हा देह काळाच्या मुखात गेला तरी बेहत्तर! आम्ही पांडुरंगाच्या नामस्मरणात गात आणि नाचतच राहणार! का? कारण हा देह जरी हरपला तरी त्यानंतर भेट होणार आहे ती त्याचीच! केवढा हा परमानंद!!

पण मग आजकालच्या धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या जीवनात आनंदी वृत्ती जोपासावी तरी कशी? अस म्हणतात कि चकोर पक्षाला पिठूर चांदण्या रात्री चंद्रकिरण टिपता येतात. दलदलीत वाढणाऱ्या कमलपत्रांवर पाण्याचा लवलेशही नसतो. आनंदी मनाची पण हीच recipe आहे! आनंदी मने ही आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या-वाईट अनुभवातून जरूर ती शिकवण घेतात, वाईट अनुभवांना खड्यासारखी बाजूला काढतात आणि चांगल्या अनुभवांचा संग्रह करण्याची क्षमता बाळगतात. आपण या क्षमता आपल्यात विकसित केल्या तर आपले आयुष्यही तितकेच आनंदी आणि समाधानी होऊ शकेल.

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिनधास्तजी -
"म्हणतात कि चकोर पक्षाला पिठूर चांदण्या रात्री चंद्रकिरण टिपता येतात. दलदलीत वाढणाऱ्या कमलपत्रांवर पाण्याचा लवलेशही नसतो. आनंदी मनाची पण हीच recipe आहे! "

फार मोठा विषय तुम्ही अगदि सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगीतलाय ! कैवल्याच्या चान्दण्याला भुकेला चकोर !!

माझ्या मते आनंदी स्वभाव आणि विनोदी स्वभाव यामध्ये फार फरक आहे - जसा स्मितहास्य आणि हास्य या मध्ये आहे. आनंदी व्यक्ती ही विनोदी असलीच पाहिजे हे काही जरुरी नाही. तसेच विनोदी व्यक्तीचे मन हे नेहेमीच आनंदी असते असे म्हणणेसुद्धा चुकीचे ठरेल! चेहऱ्यावर फुटलेले हसू हे एखाद्या विनोदाला दिलेली प्रतिक्रिया असू शकते. मग स्मित हास्याचे काय? स्मितहास्य हे सुद्धा एखाद्या विनोदाला दिलेली प्रतिक्रिया असू शकत नाही? जरूर असू शकते! पण विनोदाला दिलेली प्रतिक्रिया ही क्षणिक असते! पण चेहेऱ्यावर असणारे कायमचे स्मितहास्य? ते उसने आणि प्रतिक्रियात्मक असूच शकत नाही - ते तर केवळ आनंदी मनाचेच द्योतक आहे! >>>>>> अगदी पटले Happy

फार मोठा विषय तुम्ही अगदि सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगीतलाय --- सहमत १००००%

पु.ले.शु. Happy