व्यक्तीस्वातंत्र्य- शांता आजीचं..?? छे..!!

Submitted by अमृता०१ on 28 September, 2012 - 11:47

कॉलेज सुरु झाल्यापासून सगळ्यात सुखाची गोष्ट होती म्हणजे रोज ज्या बस नि मी जायचे त्या बस चा थांबा घरासमोरच होता..बस यायच्या आधी २ मिनिट खाली पळायच आणि बस पकडायची..सगळा कसं सोप्पं होतं! जेंव्हा जेंव्हा मी सकाळी 7 वाजता जायचे तेंव्हा साहजिक च बस ला गर्दी असायची..ऑफिस, शाळेतली मुलं त्यांच्या आया, सकाळच्या शिफ्ट चे कामगार इ. पण त्या बरोबर गर्दी असायची ती म्हताऱ्या अज्ज्यांची! ! मला नेहमी प्रश्न पडायचा कि या सगळ्याजणी एवढ्या सकाळी सकाळी जातात कुठे? थोड्या दिवसांनी लक्षात आलं कि किराणा समान, ताजी भाजी आणायला जातात बऱ्याच जणी, आणि काहींना ताजा ब्रेंड हवा असतो ! साहजिक च आहे म्हणा..हल्ली सगळेच एकदम फिटनेस फ्रीक्स! त्या सगळ्या अज्ज्यांमध्ये एक आज्जी मला आजही स्पष्ट लक्षात आहेत..जख्ख म्हताऱ्या, जाड चष्मा, संपूर्ण शरीर कोट आणि स्वेटर नि झाकलेलं आणि सोबत वॉकर! साधारण ७५+ असाव्यात. माझी त्यांच्याशी ओळख वगैरे नव्हती पण मी त्यांना ४-५ वेळा बस मध्ये वॉकर चढवून आणि उतरवून दिला होतं..हो! त्यांना स्वतः वॉकर उचलता येत नव्हता. प्रत्येक वेळी त्या कोणालातरी मदतीसाठी विचारीत असत. आमची बस एका जॉगिंग पार्क जवळून जायची आणि या आज्जी नेहमी तिथेच उतरायच्या आणि २ तासांनी जेंव्हा हीच बस पुन्हा परत जायची तेंव्हा तिच्याबरोबर वापीस..! मी त्यांचा हा कार्यक्रम बऱ्याच वेळा पहिला होतां..आणि प्रत्येक वेळी मला वाटायचा कि या इतक्या म्हताऱ्या आणि थकलेल्या कायम एकट्याच कशा काय जातात?? आजही त्यांना बस मध्ये वॉकर चढवून दिला, हसून त्यांनी "Thanks म्हटलं आणि नेहमीच्या जागेवर जाऊन बसल्या.

त्यांच्याकडे बघून मला दापोली ला आबांच्या समोर राहणाऱ्या शांता आज्जीची आठवण यायची. मी तरी तिला आत्तापर्यंत कधीही "शांत" बसलेलं पहिला नाही..झी मराठी वरच्या स्मिता तळवलकर च्या मालिकेत शोभावी इतकी ideal आज्जी होती ती! उठल्या उठल्या पटापट स्वतःच आवरून स्वयपाक करणे, नातवांना उठवणे, पारस बाग साफ करायला आलेल्या विठ्ठल ला सूचना देणे, किशोर काका ला बँकेतून पासबुक आणायची आठवण करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगीता काकूशी ( स्वतःच्या सुनेशी) आवरता आवरता गप्पा मारणे. त्यांचा घर म्हणजे काही "साने व्हिला" किंवा "साने'ज रेसिडेन्स" वगैरे नव्ह्तं. छोटंसं,बसक, टिपिकल कोकणातलं घर. सकाळ पासून मधु आजोबांकडे लोकांची वर्दळ असायची..कोर्टात जायच्या आधी ते थोडावेळ लोकांना घरी भेटायचे. शांता आज्जी आल्या गेल्याचा चहा आणि विचारपूस नं चुकता करायची..तिचा संपूर्ण आयुष्य या बाकी लोकांभोवातीच गुंतल होतं. ती आणि माझी आज्जी एकदम घट्ट मैत्रिणी! आणि आम्ही पण तिला नातवंडासारखेच. आजूबाजूच्या सगळ्या बायका, गावातल्या कोळीणी तिला म्हणायच्या " शांते, रुपयाचं नशीब घेऊन आलीस गो..पोरं बाळा सुनांना कायी कमी न्हाय..असा भरलेलं, हसरं घर रवळनाथाच्या कीर्पेनी मिळतंय बघ..!" तेंव्हा मला त्याचा काहीच वाटायचं नाही पण या बसमधल्या आज्जीना पाहून वाटलं कि हे त्यांचा एकटेपण स्वताहून मागून घेतलेलं आहे कि नं मागता मिळालेलं? शांता आज्जीला कधी असं वाटलं असेल का कि मी माझ्या साठी जगतच नाहीये का? माझा सगळा वेळ पोरा बाळांच आणि आल्या गेल्याचं करण्यात जातोय का? मी कधी जाऊ जॉगिंग ला किंवा विंडोशोप्पिंग ला?

किती वेगळ्या कल्पना आहेत नं या? आमच्याकडे म्हणजे, जितका घर समृद्ध आणि भरलेलं तितकं घर आणि कुटुंब सुखी-समाधानी..प्रत्येक वेळी सण साजरे करायला सगळ्यांनी नं बोलावता एकत्र यायचं, बारस , वाढदिवस, लग्न-मुंजीच्या पंगतीत पैजा लावून लावून हादडायचं..रविवारी दुपारी नं चुकता सगळ्यांचा पत्त्याचा डाव आणि संध्याकाळी साधवरण भात आणि बिरड्याची उसळ..! दिवाळी मध्ये घरात जास्तीत जास्त गर्दी असावी आणि शक्य तितके सगळे आज्जी आजोबा आपल्याकडे यावेत..मग प्रत्येकाने येताना कमीत कमी काजू कतली आणि जास्तीत जास्त ड्रेस किंवा एखादा छानस पुस्तक या रेंज मधलं काहीतरी आणावं आणि या सगळ्याच्या वर एकत्र फराळ आणि जोरजोराने हसणे..

कुठल्या शांता आज्जीला असं वाटणार नाही कि माझं कुटुंब असं आनंदी असू नये..भले मला थोडा त्रास पडला, १-२ आठवडे भजनी मंडळ चुकलं, कंबर आणि गुढगे भरून आले तरी चालतील..!

कधी कधी वाटतं माणसातला "मी" इतका मोठा आहे का कि त्यामुळे "आम्ही" झाकोळला गेलाय? याचा अर्थ कायमच अहंकार नसून कदाचित व्यक्तीस्वातंत्र्य असाहि असू शकतो ! आणि प्रत्येक संस्कृती, देश, जीवनपद्धती याचाही फरक पडणारच म्हणा ! ६३ वर्षाची आई आणि ३० वर्षाची मुलगी २ शेजारशेजारच्या बिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या घरात आपापला संसार थाटून राहतात..वीकेंड ला एकमेकींकडे appointment घेऊन जातात, आणि अगदीच प्रेम उतू गेला तर शनिवारी रात्री एकत्र पिक्चर बघायला जातात पण तिकिट काढायचं मात्र आपापलं.. एकदा हीच आई एका सकाळी घराच्या पायऱ्या उतरताना सटकून पडली तेंव्हा संध्याकाळी एका सदगृहास्तानी तिला मुलगी सहज रस्त्यात भेटली म्हणून " Jenny, your mother is not welll..when you get time, you should visit her" असा सल्ला दिला.

तसच हे बसमधल्या आज्जीचं थरथरत चालणं, अस्थिर नजर सारखी इकडे तिकडे भिरभिरण, आणि दरवेळी वॉकर चढ उतरवायच्या वेळी कोणाकडे तरी आशेने बघणं..खूप कीव यायची मला..कधी कधी वाटायच कशासाठी आहे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा चा अट्टाहास? स्वतःच्या आवडीच्या २ गोष्टी करता याव्यात म्हणून हे असं जगणं? तिच्या मुलामुलींबरोबर राहिली असती तर अस स्वातंत्र्य मिळाला नसतं तिला??

नकळत शांता अज्जीचा प्रसन्न आणि हासरा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तीच्या आठवणीनी टचकन पाणी आलं डोळ्यात! बाकीचांची बडदास्त ठेवण्यात सारा जन्म गेला तिचा पण तिच्या आवडी निवडी हि तेवढ्याच जोपासल्या तीनं..भले रोज स्वतःसाठी वेळ देता आलं असेलच असं नाही..पण साऱ्या कुटुंबाचा आनंद कितीतरी मोठा होतं तिच्यासाठी..

खाड्कन..एकदम आवाज झाला कसलातरी..मी भानावर आले! पहिल तर आज्जी बसमधून उतरताना पडल्या..मी पटकन पुढे होऊन त्यांना आधार दिला..बाकीचे एक दोनजण पण मदतीला धावले. त्यांना नीट उभ केलं..आणि वॉकर पुन्हा उभा करून दिला..थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या " I am fine..sorry for the trouble and thanks"!

आणि सावकाश पावले टाकल चालायला लागल्या. मी बस मध्ये जाऊन बसले पुन्हा आणि बस सुरु झाली..खिडकीतून पाठमोऱ्या आज्जी मला अजून दिसत होत्या..थरथरणारी,जड आणि उसना आत्मविश्वास आणून पावले टाकणाऱ्या..

मी खिडकीतून बाहेर बघत होते..आभाळ मगाशीच दाटून आलं होतं...आणि अखेर सरींनी कोसळायला सुरवात केली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैली खरच आवडली. खोटं कशाला बोलू.. पण एकटी रहाणारी वयस्कर मंडळी बघितली की.. प्रसंगानुरुप (आणि माझ्या मनाची त्यावेळची स्थिती.. म्हणजे आईला भारतात फोन केला तेव्हा तिला जरा बरं नव्हतं, अगदीच थकलेल्या आत्येशी बोलता आलं नाही, किंवा आई-बाबा नाटकाला गेले होते, खूप थकलेले काका अजून एकटे रहातायत आणि मज्जेत आहेत वगैरे वगैरे काहीही) ह्यातलं काहीही येतं. (मी सिडनीत असते)
समोरची थरथरणारी आज्जी अल्लाद गाडी चालवताना दिसली की तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पनांनी भरून येतं... इथे किती छान ना?...
समोरच्या थरथरणर्‍या आजोबांना एकट्यानं कचर्‍याचा डबा ढकलताना बघितलं की सुद्धा भरूनच येतं... किती वाईट ना...
शेवटी काय हे ललित लिहिलं तेव्हा काय काय साचून असेल मनात अन बाहेर पडलं असेल... त्यावर आहे सगळं.
सम्यक, सर्वव्यापक असा विचार असतो का खरच? (देव जाणे)
तो शक्यतो असावा.. शक्यतो Happy

अमृता.

प्रयत्न चांगला आहे. शांता आज्जीचं चित्रण आणखी स्पष्ट व्हायला हवं होतं. व्यक्तिचित्रणापेक्षा त्या व्यक्तीबद्दलच्या विच्रारांची जास्त गर्दी झालेली आहे लेखात.

भारत हा इतका मोठा आणि खंडप्राय देश आहे कि त्यात अमूक एका व्यक्तीने असंच वागायला हवं असं सांगायचा प्रयत्नही मला चुकीचा वाटतो. एका पेठेतून दुस-या पेठेत गेलं कि दुस-या देशात, संस्कृतीत गेल्यासारखं वाटतं. तुलना अनाठायी आहे म्हणूनच तुला जसं वाटेल तसंच लिही. तो तुझा अधिकार आहे. प्रतिक्रिया पचवणे हा ही लिखाणाचा एक भाग आहे. पण प्रतिक्रिया योग्यच असतील असंही नाही.

पुलेशु

( अतिरेक कुठल्याही गोष्टीचा वाईटच, अति लिप्ताळेपणाचाही वाईटच ! ) >> अगो +१
लेखनशैली आवडली, विचार पटले नाहीत >> +१
पुलेशु Happy

अगो आणो पेशवा ह्यांच्या पोस्ट्स आवडल्या. पटल्या.

एकत्र कुटुंबात सगळ्यांचे सगळे बायकांनी करीत राहणे ही कृती मला तरी पुढे मुला-सुनांनीच आपल्याला सांभाळावे ह्या अपेक्षेपोटी आणि एकटे राहू शकण्याच्या असमर्थतेतून आल्यासारखी वाटते. आता ही असमर्थता येण्याचे कारण बरेचसे सोशल कंडीशनिंग (सून, भाऊ, नवरा, आजी इ. नात्यांनी कधी कसे वागावे वै.) व व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीवच नसणे वा तिची प्रसंगी गळचेपी करणे हे वाटते.

लेखनशैली आवडली. पुलेशु.

दाद,

धन्यवाद! तुम्ही जी २ उदाहरणं दिली आहेत ज्यामध्ये दोन्ही वेळेला मन भरून येतं..एकदा कौतुकाने आणि एकदा वाईट वाटल्यामुळे ती अगदी योग्य आहेत..खूपच पटलं! आणि त्यामागचं कारण हि वेगळा देश, वेगळी जडण घडण, वेगळी परिस्थिती हेच असेल असं वाटतं..चूक बरोबर असं काही नाही. तुम्ही आणि किरण म्हणतात तसा जे प्रसंग पहिले/अनुभवले त्यावरच्या प्रतिक्रिया जास्त डिटेल नमूद केल्या गेल्या असतील माझ्याकडून..व्यक्तिचित्र किंवा प्रसंग अजून चांगले लिहू शकीन कदाचित आता पुढच्या वेळी..किमान तसा प्रयत्न तरी नक्कीच करीन.

धन्यवाद किरण!

अगो,

आपण मांडलेले सर्व विचार योग्य आहेत..वस्तुनिष्ठपणे ते मांडल्यामुळे ते नीट समजतायत सुद्धा!

एकदा हीच आई एका सकाळी घराच्या पायऱ्या उतरताना सटकून पडली तेंव्हा संध्याकाळी एका सदगृहास्तानी तिला मुलगी सहज रस्त्यात भेटली म्हणून " Jenny, your mother is not welll..when you get time, you should visit her" असा सल्ला दिला. >>> तुम्ही लिहिलेली घटना खरी असेल पण दिसतं तसंच असेल असं नाही.>>>> या मध्ये जी Jenny आहे (नाव बदललेले आहे) ती आणि मी एका घरात राहायचो त्यामुळे तिचे सर्वसाधारण विचार, तिचं तिच्या आई बरोबरच नातं याची मला थोडीशी माहिती होती. ति नेहमी सांगायची कि, तिच्या आई नि तिला वेगळा राहण्याबद्दल सुचवलं होतं ती कॉलेज मध्ये जायला लागल्यापासून..तीची वास्तविक तिच्या आई बरोबरच राहण्याची इच्छा होती कारण तिची आई बरीच आजारी असायची (हा कदाचित अपवाद असू शकतो कारण सर्वसाधारणपणे मुले स्वतःच्या इच्छेने वेगळी राहायला लागतात किंवा तशी पद्धतच आहे असं म्हणू शकतो) यामागे मुलांनी स्वतंत्र व्हावा वगैरे विचार पण असतील,माहित नाही..पण त्यावेळी मात्र मला हे थोडेसे अट्टाहास याकडे झुकते आहे असं वाटले.पण या सर्वाचा सुवर्ण मध्य म्हणून कि काय त्यांनी शेजारी शेजारीच पण दोन वेगवेगळी घरे घेऊन राहायला सुरवात केली..एकीच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आणि एकीच्या स्वतंत्र आयुष्याची सुरवात असं समजून मी सोडून दिलं!

मूळ लेखनातच थोडासा पुढचं मागचं लिहिलं असता तर बरं झालं असतं असं वाटतंय आता :प

तुम्ही जे बस प्रवासाचे उदाहरण दिले आहे ते योग्य आहे किंवा "आपल्याकडे झेपत नसतानाही मुलांचं करत राहायचं, स्वतःच्या इच्छा मारायच्या हे चित्र दिसत असेल तर ते एकटं जगता येण्याच्या असमर्थतेतूनही आलेलं असेल. मुलांवर अवलंबून राहायचंय, आपल्याला गरज आहे म्हणून मग तडजोड करायची.">> हे चूक कि बरोबर हे ठरवणं मात्र अवघड आहे असं वाटत..

प्रतिसाद आणि टीकाबद्दल सर्वांचे धन्यवाद..पुढचे लेखन सुधारण्याचा नक्की प्रयत्न करीन.

अवांतरः ललित ह्या विषयाबद्दल गोंधळ का म्हणे? ज्याचे काहीही नसते फलित त्याला म्हणतात ललित.

( हे अवांतर म्हणूनच घ्यावे. लेखाबद्दल काहीही म्हणणे नाही.)

Pages