व्यक्तीस्वातंत्र्य- शांता आजीचं..?? छे..!!

Submitted by अमृता०१ on 28 September, 2012 - 11:47

कॉलेज सुरु झाल्यापासून सगळ्यात सुखाची गोष्ट होती म्हणजे रोज ज्या बस नि मी जायचे त्या बस चा थांबा घरासमोरच होता..बस यायच्या आधी २ मिनिट खाली पळायच आणि बस पकडायची..सगळा कसं सोप्पं होतं! जेंव्हा जेंव्हा मी सकाळी 7 वाजता जायचे तेंव्हा साहजिक च बस ला गर्दी असायची..ऑफिस, शाळेतली मुलं त्यांच्या आया, सकाळच्या शिफ्ट चे कामगार इ. पण त्या बरोबर गर्दी असायची ती म्हताऱ्या अज्ज्यांची! ! मला नेहमी प्रश्न पडायचा कि या सगळ्याजणी एवढ्या सकाळी सकाळी जातात कुठे? थोड्या दिवसांनी लक्षात आलं कि किराणा समान, ताजी भाजी आणायला जातात बऱ्याच जणी, आणि काहींना ताजा ब्रेंड हवा असतो ! साहजिक च आहे म्हणा..हल्ली सगळेच एकदम फिटनेस फ्रीक्स! त्या सगळ्या अज्ज्यांमध्ये एक आज्जी मला आजही स्पष्ट लक्षात आहेत..जख्ख म्हताऱ्या, जाड चष्मा, संपूर्ण शरीर कोट आणि स्वेटर नि झाकलेलं आणि सोबत वॉकर! साधारण ७५+ असाव्यात. माझी त्यांच्याशी ओळख वगैरे नव्हती पण मी त्यांना ४-५ वेळा बस मध्ये वॉकर चढवून आणि उतरवून दिला होतं..हो! त्यांना स्वतः वॉकर उचलता येत नव्हता. प्रत्येक वेळी त्या कोणालातरी मदतीसाठी विचारीत असत. आमची बस एका जॉगिंग पार्क जवळून जायची आणि या आज्जी नेहमी तिथेच उतरायच्या आणि २ तासांनी जेंव्हा हीच बस पुन्हा परत जायची तेंव्हा तिच्याबरोबर वापीस..! मी त्यांचा हा कार्यक्रम बऱ्याच वेळा पहिला होतां..आणि प्रत्येक वेळी मला वाटायचा कि या इतक्या म्हताऱ्या आणि थकलेल्या कायम एकट्याच कशा काय जातात?? आजही त्यांना बस मध्ये वॉकर चढवून दिला, हसून त्यांनी "Thanks म्हटलं आणि नेहमीच्या जागेवर जाऊन बसल्या.

त्यांच्याकडे बघून मला दापोली ला आबांच्या समोर राहणाऱ्या शांता आज्जीची आठवण यायची. मी तरी तिला आत्तापर्यंत कधीही "शांत" बसलेलं पहिला नाही..झी मराठी वरच्या स्मिता तळवलकर च्या मालिकेत शोभावी इतकी ideal आज्जी होती ती! उठल्या उठल्या पटापट स्वतःच आवरून स्वयपाक करणे, नातवांना उठवणे, पारस बाग साफ करायला आलेल्या विठ्ठल ला सूचना देणे, किशोर काका ला बँकेतून पासबुक आणायची आठवण करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगीता काकूशी ( स्वतःच्या सुनेशी) आवरता आवरता गप्पा मारणे. त्यांचा घर म्हणजे काही "साने व्हिला" किंवा "साने'ज रेसिडेन्स" वगैरे नव्ह्तं. छोटंसं,बसक, टिपिकल कोकणातलं घर. सकाळ पासून मधु आजोबांकडे लोकांची वर्दळ असायची..कोर्टात जायच्या आधी ते थोडावेळ लोकांना घरी भेटायचे. शांता आज्जी आल्या गेल्याचा चहा आणि विचारपूस नं चुकता करायची..तिचा संपूर्ण आयुष्य या बाकी लोकांभोवातीच गुंतल होतं. ती आणि माझी आज्जी एकदम घट्ट मैत्रिणी! आणि आम्ही पण तिला नातवंडासारखेच. आजूबाजूच्या सगळ्या बायका, गावातल्या कोळीणी तिला म्हणायच्या " शांते, रुपयाचं नशीब घेऊन आलीस गो..पोरं बाळा सुनांना कायी कमी न्हाय..असा भरलेलं, हसरं घर रवळनाथाच्या कीर्पेनी मिळतंय बघ..!" तेंव्हा मला त्याचा काहीच वाटायचं नाही पण या बसमधल्या आज्जीना पाहून वाटलं कि हे त्यांचा एकटेपण स्वताहून मागून घेतलेलं आहे कि नं मागता मिळालेलं? शांता आज्जीला कधी असं वाटलं असेल का कि मी माझ्या साठी जगतच नाहीये का? माझा सगळा वेळ पोरा बाळांच आणि आल्या गेल्याचं करण्यात जातोय का? मी कधी जाऊ जॉगिंग ला किंवा विंडोशोप्पिंग ला?

किती वेगळ्या कल्पना आहेत नं या? आमच्याकडे म्हणजे, जितका घर समृद्ध आणि भरलेलं तितकं घर आणि कुटुंब सुखी-समाधानी..प्रत्येक वेळी सण साजरे करायला सगळ्यांनी नं बोलावता एकत्र यायचं, बारस , वाढदिवस, लग्न-मुंजीच्या पंगतीत पैजा लावून लावून हादडायचं..रविवारी दुपारी नं चुकता सगळ्यांचा पत्त्याचा डाव आणि संध्याकाळी साधवरण भात आणि बिरड्याची उसळ..! दिवाळी मध्ये घरात जास्तीत जास्त गर्दी असावी आणि शक्य तितके सगळे आज्जी आजोबा आपल्याकडे यावेत..मग प्रत्येकाने येताना कमीत कमी काजू कतली आणि जास्तीत जास्त ड्रेस किंवा एखादा छानस पुस्तक या रेंज मधलं काहीतरी आणावं आणि या सगळ्याच्या वर एकत्र फराळ आणि जोरजोराने हसणे..

कुठल्या शांता आज्जीला असं वाटणार नाही कि माझं कुटुंब असं आनंदी असू नये..भले मला थोडा त्रास पडला, १-२ आठवडे भजनी मंडळ चुकलं, कंबर आणि गुढगे भरून आले तरी चालतील..!

कधी कधी वाटतं माणसातला "मी" इतका मोठा आहे का कि त्यामुळे "आम्ही" झाकोळला गेलाय? याचा अर्थ कायमच अहंकार नसून कदाचित व्यक्तीस्वातंत्र्य असाहि असू शकतो ! आणि प्रत्येक संस्कृती, देश, जीवनपद्धती याचाही फरक पडणारच म्हणा ! ६३ वर्षाची आई आणि ३० वर्षाची मुलगी २ शेजारशेजारच्या बिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या घरात आपापला संसार थाटून राहतात..वीकेंड ला एकमेकींकडे appointment घेऊन जातात, आणि अगदीच प्रेम उतू गेला तर शनिवारी रात्री एकत्र पिक्चर बघायला जातात पण तिकिट काढायचं मात्र आपापलं.. एकदा हीच आई एका सकाळी घराच्या पायऱ्या उतरताना सटकून पडली तेंव्हा संध्याकाळी एका सदगृहास्तानी तिला मुलगी सहज रस्त्यात भेटली म्हणून " Jenny, your mother is not welll..when you get time, you should visit her" असा सल्ला दिला.

तसच हे बसमधल्या आज्जीचं थरथरत चालणं, अस्थिर नजर सारखी इकडे तिकडे भिरभिरण, आणि दरवेळी वॉकर चढ उतरवायच्या वेळी कोणाकडे तरी आशेने बघणं..खूप कीव यायची मला..कधी कधी वाटायच कशासाठी आहे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा चा अट्टाहास? स्वतःच्या आवडीच्या २ गोष्टी करता याव्यात म्हणून हे असं जगणं? तिच्या मुलामुलींबरोबर राहिली असती तर अस स्वातंत्र्य मिळाला नसतं तिला??

नकळत शांता अज्जीचा प्रसन्न आणि हासरा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तीच्या आठवणीनी टचकन पाणी आलं डोळ्यात! बाकीचांची बडदास्त ठेवण्यात सारा जन्म गेला तिचा पण तिच्या आवडी निवडी हि तेवढ्याच जोपासल्या तीनं..भले रोज स्वतःसाठी वेळ देता आलं असेलच असं नाही..पण साऱ्या कुटुंबाचा आनंद कितीतरी मोठा होतं तिच्यासाठी..

खाड्कन..एकदम आवाज झाला कसलातरी..मी भानावर आले! पहिल तर आज्जी बसमधून उतरताना पडल्या..मी पटकन पुढे होऊन त्यांना आधार दिला..बाकीचे एक दोनजण पण मदतीला धावले. त्यांना नीट उभ केलं..आणि वॉकर पुन्हा उभा करून दिला..थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या " I am fine..sorry for the trouble and thanks"!

आणि सावकाश पावले टाकल चालायला लागल्या. मी बस मध्ये जाऊन बसले पुन्हा आणि बस सुरु झाली..खिडकीतून पाठमोऱ्या आज्जी मला अजून दिसत होत्या..थरथरणारी,जड आणि उसना आत्मविश्वास आणून पावले टाकणाऱ्या..

मी खिडकीतून बाहेर बघत होते..आभाळ मगाशीच दाटून आलं होतं...आणि अखेर सरींनी कोसळायला सुरवात केली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे अजून नाती, इतकी तूटलेली नाहीत, याचा अभिमान वाटतो. >>> हे सरधोपट विधान आहे... व्यक्तिस्वातंत्र्यात वाढलेल्या माणसाला तो म्हातारा झाल्यावर ते व्यक्तीस्वातंत्र्य घालवावस वाटेल का? ते रुचेल का? व्यक्तीस्वातंत्र्य आणि आप्तस्वकियांच प्रेम हे एकमेकाला ऑपोसींग आहे हे फारस बरोबर नाही.

इथे ८०/९० वर्शाची माणस ज्या आत्मविश्वासाने रहातत ते पहाण्यासारख आहे. एकटेपणा एकट राहिल्यानेच येतो हे कुठले तत्वज्ञान? भारतात भरलेल्या घरात एकाकी जिवन जगणार्‍या वृद्धांची संख्या कमी आहे का ? चार माणसात व त्यांचच करण्यात हयात गेलेली लोके ज्यांना स्वतःकडे बघायला फुरसत मिळालि नाही स्वःला काय आवडत ह्यासाठी कधी वेळच देता आला नाही ते जेंव्हा ही अजुबाजुची माणसे दूर जातात तेंव्हा जास्त एकाकी होतात..... असहाय्य होतात...

तेंव्हा इथल्या आजी आणि देशातल्या चारचौघांच करण्यात हयात घालवलेल्या आजी ह्यांची तुलना, त्यांच्या एकटेपणाची तुलना बरोबर नाही...

बाकी सायो + १

छान

पेशवा, बरोबर.
मलाही इथे वयस्कर माणसं ज्या आत्मविश्वासाने एकटं रहातात, स्वतःचा छंद जोपासण्यात वेळ घालवतात किंवा वेळ घालवायला आणि चार पैसे मिळवायलाही बारीक सारीक काम करतात त्याचं कौतुक वाटत आलं आहे.

भारतात 'एकटं रहाणं म्हणजे अरेरे' टाईपचे समज मला झेपत नाहीत.
अमृता, तुम्ही उल्लेख केलेल्या भारतातल्या आजींना स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगणं माहित असेल का? किंवा तुम्हीच म्हणल्याप्रमाणे मनात आलं की उठलं आणि निघालं टाईमपास करायला असं शक्य झालं असेल का?

> मनात आलं की उठलं आणि निघालं टाईमपास करायला असं शक्य झालं असेल का?

तसं मनात येऊच शकत नाही कारण अनेक बायकांचा असा समज झाला असतो की आपलं आयुष्य हे इतरांकरताच ...

पेशवा , सायो १०००००+

अतिशय स्टीरीओटाईप दृष्टीकोन आहे.

<<कुठल्या शांता आज्जीला असं वाटणार नाही कि माझं कुटुंब असं आनंदी असू नये..भले मला थोडा त्रास पडला, १-२ आठवडे भजनी मंडळ चुकलं, कंबर आणि गुढगे भरून आले तरी चालतील..! >>>
हे म्हण्जे कैच्या कैच. कुटुम्ब आनंदी रहाण्यासाठी आजीने मरेपर्यंत शारीरिक कष्ट करत रहायचे ? स्वतःच्या आवडीनिवडी दूर लोटायच्या ? आजीला कष्ट न देता कुटुम्बाला आनंदी रहाता येत नाही का ? Happy

बाकी तुमचा दोन्हीकडचा अनुभव कमी आहे किन्वा फक्त तुम्हाला सोयीस्कर अशाच गोष्टींची नोंद घेतली आहेत असे वाटते.

बापरे! हि चर्चा तर थोडी वेगळ्या वळणावर गेली..

सर्वात महत्त्वाचे: या लेखनात कुठल्याही परिस्थीची तुलना करणे हा हेतू नाही..हे खरे घडलेले अथवा अनुभवलेले प्रसंग आहेत,कल्पनाविलास नाही! त्यामुळे काय वाईट काय चांगले किंवा कोण चूक आणि कोण बरोबर अशी चर्चा थोडीशी विसंगत ठरेल असं वाटतंय..

बाकी सर्व प्रतिक्रिया या वैयक्तिक विचारसरणी, जडण घडण, आलेले किंवा न आलेले अनुभव याला अनुसरून आहेत त्यामुळे इथेही सर्वांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर!

<कुठल्या शांता आज्जीला असं वाटणार नाही कि माझं कुटुंब असं आनंदी असू नये..भले मला थोडा त्रास पडला, १-२ आठवडे भजनी मंडळ चुकलं, कंबर आणि गुढगे भरून आले तरी चालतील..>

एका एफेम वाहिनीवर रविवारी दुपारी हिंदी कथा, चित्रपटगीते गुंफून ऐकवल्या जातात. त्यातल्या एका कथेतल्या शांताआजींची बहीण त्यांच्याकडे पाहुणी आली होती. बहिणीने आजींचे ब्रेनवॉश केले. शांताजींनी एक दिवस भजनी मंडळातल्या बायकांना गुढघे दुखताहेत असे सांगून टांग दिली. घरी मात्र भजनाला जातो असे सांगून दोन्ही बहिणींनी थेटरात दुपारचा सिनेमा टाकला.

कल्पनाविलास नाही म्हणताना आजींचा आत्मविश्वास उसना आहे हे ठरवण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य घेतलेच आहे.

डेलिया-

कुटुम्ब आनंदी रहाण्यासाठी आजीने मरेपर्यंत शारीरिक कष्ट करत रहायचे ? स्वतःच्या आवडीनिवडी दूर लोटायच्या ? आजीला कष्ट न देता कुटुम्बाला आनंदी रहाता येत नाही का ? >> हे पूर्णपणे तुमच्या दृष्टिकोनावर आधारित आहे.

हे सगळं करणं हे त्या आजीला फार मोठा त्याग केला आहे असं वाटत च नसेल तर...तुम्हाला तसा वाटतं म्हणून तुम्ही म्हणणार कि त्यांना व्यक्तीस्वातंत्र्य नाही..आणि त्या स्टीरीओटाईप आहेत. इथे राहणाऱ्या वयस्कर व्यक्तीचं १००% नाही तर १५०% टक्के कौतुक आहे फक्त म्हणून आपल्या इथे कुटुंबाच्या आनंदात आपलं आनंद मानणारी लोकं स्टीरीओटाईप ठरत नाहीत.

आणि दोन्ही कडचा अनुभव कमी आहे कि जास्त आहे यापेक्षा काय आहे हे कदाचित जास्त महत्वाचे..! प्रत्येकाला भेटलेल्या व्यक्ती आणि आलेले अनुभव अर्थातच सारखे नसणार..

>>या लेखनात कुठल्याही परिस्थीची तुलना करणे हा हेतू नाही>> तसा हेतू नसेलही पण तुमच्याही नकळत भारतातल्या भरल्या कुटुंबात रहात त्यांच्यासाठीच खपण्यात आनंद मानणार्‍या शांताआजी आणि बसमध्ये अट्टाहासाने, झेपत नसताना एकाकी व्यक्तीस्वातंत्र्य उपभोगणार्‍या (बिचार्‍या) आजींची तुलना तुमच्याकडून केली गेलीच की. आणि म्हणूनच विषयाला वेगळं वळण लागलं.

तुम्हाला तसा वाटतं म्हणून तुम्ही म्हणणार कि त्यांना व्यक्तीस्वातंत्र्य नाही..आणि त्या स्टीरीओटाईप आहेत. >> अहो आजीना नाही 'स्टीरीओटाईप ' म्हण्ले मी !! तुमच्या या लेखाला म्हणाले होते 'स्टीरीओटाईप '.
भारतीय लोक, कुटुम्बे म्हण्जे अगदी ऊतू जाणार्‍या भरगच्च जिव्ह्याळ्याने जोडलेली आणि परदेशी विशेषकरून पाश्चात्य लोक , कुटुम्बे म्हण्जे अगदी कोरडी , तूट्क , स्वार्थी ई . ई . 'स्टीरीओटाईप ' गोष्टी मांडणारे लेख अनेक येत असतात त्यातलाच तुमचा एक.
जरा डोळे उघडून बघितलत तर जाणवेल नाती सगळीकडे सारखीच असतात. पाश्चात्य आई ही मुलावर , नातवंडावर तेव्हढेच प्रेम करते जसे एक भारतीय आई करेल. तुम्हाला भारतीय नात्यात सगळे गोड गोडच दिसतेय आणि पाश्चात्य कुटुम्बामधे काहीच प्रेम दिसत नाहीये , म्हणुन म्हण्ले तुमचा अनुभव खूपच तोकडा, वरवरचा असावा.

कधी कधी वाटायच कशासाठी आहे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा चा अट्टाहास? स्वतःच्या आवडीच्या २ गोष्टी करता याव्यात म्हणून हे असं जगणं? तिच्या मुलामुलींबरोबर राहिली असती तर अस स्वातंत्र्य मिळाला नसतं तिला?? >>> अमृता ह्या ठिकाणी कंपॅरिझन झाली आणि कदाचीत जजमेंट सुधा असे नाही का वाटत?

हे सगळं करणं हे त्या आजीला फार मोठा त्याग केला आहे असं वाटत च नसेल तर...>>> बरोबर पण मग हे सोशिअल कंडिशनिंग कि वैयक्तिक चोईस ... त्या देशातील शांताआज्जीला हा प्रष्ण विचरलात का? असती तिला संधी तिच्या आवडची क्शेत्रात नाव कमवायची काम करायची तर तिने काय केले असते हे विचारलेत? फार मोठा त्याग वाटत नाही कारण त्याग कशाचा करायचा? ज्या व्यक्तीस्वातंत्र्याला अट्टाहास म्हणता तो काय आहे? त्याचा उपयोग काय? त्याची किंमत किती ? ह्याची शांताआजीला कल्पना होती का? ती कल्पना असून जर तिने निवड केली तर त्याग वगैरे म्हणता येईल अन्यथा जे ती जगली तसच जगणे तिने पहिले होते तिला माहित होते. ते ती उत्त्म जगली असे म्हणता येईल... पण त्यात व्यक्तीस्वातंत्र्याला काय वाव होता?

व्यक्तीस्वातंत्र्य मानणार्‍या व्यक्तीना मदत लागत नाही. त्या व्हुल्नरेबल नसतात. व्यक्तीस्वातंत्र्य मानणार्या व्यक्ती माणुसघाण्या व म्हणुन एकल्कोंड्या असतात?अशा व्यक्तीच्या कुटुंबात प्रेम नसते ह्याची परिणीती वृद्धापकाळात एकटेपणा येण्यात होते असा नकळत सब-सूर लेखात जाणवतो आहे तो तुम्हाला अपेक्षित आहे का?

एकदा हीच आई एका सकाळी घराच्या पायऱ्या उतरताना सटकून पडली तेंव्हा संध्याकाळी एका सदगृहास्तानी तिला मुलगी सहज रस्त्यात भेटली म्हणून " Jenny, your mother is not welll..when you get time, you should visit her" असा सल्ला दिला. >>> तुम्ही लिहिलेली घटना खरी असेल पण दिसतं तसंच असेल असं नाही. आपल्याकडेही मुलांना त्रास नको म्हणून काही आईवडील छोटी आजारपणं मुलांपासून लपवतात तसंही असू शकेल Happy परदेशात हे नेहमी असंच असतं असंही काही नाही आणि भारतात नसतंच असंही नाही. माझे निरीक्षण हे की मनुष्यस्वभाव सगळीकडे थोडाफार सारखाच, समाजव्यवस्थेचं वळण वेगळं असल्याने बाह्य, सगळ्यांना दिसणार्‍या आयुष्यात फरक वाटू शकतो.
अजून एक वेगळं वळण, कालचीच घटना म्हणून आठवलं. काल एक अगदी जख्ख म्हातारे आजोबा, धड चालताही येत नव्हतं, आमच्या बसमध्ये चढले. हाताशी इथे सगळ्यांकडे असते तशी शॉपिंगची ट्रॉली. ( तशी बरीच एकटी फिरणारी म्हातारी माणसं आजूबाजूला दिसतातच पण हे विशेषच थकलेले होते. बसमधून खाली पाऊल टाकायलाही बराच वेळ लागला. ) पहिली क्षणभराची उस्फूर्त प्रतिक्रिया वाईट वाटणे, अशा अवस्थेत एकटं का राहावं लागत असेल, भारतात काय झालं असतं अशीच झाली. मग वाटलं की भारतातही एखाद्यावर अशी वेळ येणार नाही असं अजिबात नाही. पण समजा आलीच तर ... अशा अवस्थेत भारतातल्या रस्त्यांवर इथल्यासारखं फिरता येईल ? साधा रस्ता क्रॉस करायचा तर भसाभसा वाहनं अंगावर येतात, रस्त्याच्या कडेने चाललं तरीही येतातच, नीट वॉकवे नाहीत, रस्ता ओलांडायला सिग्नल नाहीत. बसमधून उतरताना पडलं तर ड्रायव्हर उतरुन मदत करेल ह्याचे चान्सेस काय ? मुळात ते नीट चढे-उतरेपर्यंत बस चालू न करण्याइतका निवांतपणा आहे ? आणि पडल्यावर इथल्यासारखी पाच-दहा मिनिटांत वैद्यकीय मदत मिळेल ह्याची तरी काय शाश्वती आहे ?
मला इथे येऊन भारत आणि पाश्चिमात्य देशांत तुलना करत बसण्यात काही रस नाही, इच्छाही नाही. पण ही तुलना अशासाठी केली की आपल्याकडे झेपत नसतानाही मुलांचं करत राहायचं, स्वतःच्या इच्छा मारायच्या हे चित्र दिसत असेल तर ते एकटं जगता येण्याच्या असमर्थतेतूनही आलेलं असेल. मुलांवर अवलंबून राहायचंय, आपल्याला गरज आहे म्हणून मग तडजोड करायची. नेहमीच असेल असं नाही पण ही बाजू सुद्धा लक्षात घेतली जावी. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक नको ( अतिरेक कुठल्याही गोष्टीचा वाईटच, अति लिप्ताळेपणाचाही वाईटच ! ) पण माफक व्यक्तीस्वातंत्र्य कुणाला आवडणार नाही ?
मला नाही वाटत, आपल्या मर्जीने बाहेर पाय मोकळे करायला जाता येणं किंवा शक्य असेल पायातपाय न घालता मुलांच्या जवळपास कुठेतरी राहून स्वतंत्र तरी सुरक्षित आयुष्य जगणं हा स्वातंत्र्याचा अट्टहास आहे Happy

ललितलेख म्हणून लिहिलेले आहे.
सबब वरीलपैकी कोणत्याही प्रकारचे मतप्रदर्शन, न करता, 'छान लिहिले आहे.' इतकेच म्हणतो.

this editor is having some issue. previous editor was better with marathi writing.

I strongly believe, this is individual's choice. some people like it to be with lots of people, some people like to stay alone. Which ever way you choose, you be ready to face the consequences.
but i hate hypocrites, who will not give anything when it is their turn, but always ready to take anything or demand that it is childrens duty to do some stuff. But parent have never any duties in their mind. i hate such hypocrites.

शैली उत्तम आहे पण विचार अजिबातच पटले नाहीत. विचारांची परिपक्वता हवीय. वैयक्तिक मत काहीही असू शकतं म्हणा. पण लेख ज्या दिशेने झुकतो आहे ते नाही पटलं.
अर्थात ललित विभागात चलता है!!

हे खरे घडलेले अथवा अनुभवलेले प्रसंग आहेत,कल्पनाविलास नाही! >>> असे लिहिले आहे म्हणून चर्चा करणे मला गैर वाटले नाही. कथा किंवा बाकी काहीही फिक्शन म्हणून लिहितो तेव्हा लेखकाकडे अमूक एक पात्र असे का वागले ह्याचे स्पष्टीकरण मागण्याला काही अर्थ नसतो Happy
'ललित' ह्या प्रकाराबद्दल मनात अजून गोंधळच आहे. कल्पनाविलास असेल तर गोष्ट वेगळी पण जेव्हा ते प्रकट चिंतन ह्या स्वरुपात लिहिले जाते तेव्हा लेखकाच्या विचारांना चॅलेंज केले जाणे स्वाभाविक आहे असे वाटते. कल्पनाविलास असेल तर शैलीविषयी, त्या ठराविक चौकटीत ते जग, त्यातल्या पात्रांचे वागणे कितपत convincingly चितारले आहे त्यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते Happy

ललित' ह्या प्रकाराबद्दल मनात अजून गोंधळच आहे. कल्पनाविलास असेल तर गोष्ट वेगळी पण जेव्हा ते प्रकट चिंतन ह्या स्वरुपात लिहिले जाते तेव्हा लेखकाच्या विचारांना चॅलेंज केले जाणे स्वाभाविक आहे असे वाटते. >>अगो++

कथा असेल तर ते पात्र तसं वागलं असं म्हणू शकतो (आणि तरीही माझ्या मते प्रत्येक कथा/कादंबरी - ही लेखकाची मतं/अनुभव घेऊन येत असते. आणि ती आवडणार्‍या वाचकाचीही).
पण ललितात मतं मांडली आहेत - ती खटकू शकतातच!

बाकी थोडसं धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती स्टाईल वाटलच..
उदा. मला भरपूर माणसं आजूबाजूला असलेली आवडतात म्हणून माझ्या शेजारणीलाही आवडावीतच असं नाही. she can be on her own & still be happy
त्यामुळे गृहितक जरा जनरलाईज्ड वाटली..
परत शांताआजीला म्हातारपणी माणसं आहेत ह्याचा आनंद वाटला असेल, पण समजा तरुणपणी मनासारखं करुन खाता येण्याचही स्वातंत्र्य नसेल तर? (बाकीच स्वातंत्र्य जाऊद्या)..
शेवटी प्रत्येक घेतलेल्या, न घेतलेल्या निर्णयाचा एक प्राईस टॅग असतो.

अहो डेलिया..

तुम्ही कशाला स्टीरीओटाईप म्हणताय ते अगदी नीट कळतंय मला..आणि त्याचं कारण तुमचा या विषयांकडे बघायचा दृष्टीकोण "स्टीरीओटाईप" आहे अगदी टिपिकल..
तुमचा अनुभव एवढा व्यापक आणि खोलवरचा असल्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल कि इतर अनुभव किंवा इतर प्रकारचे लोक अस्तित्वातच नाहीयेत..असो!

पाश्चात्य कुटुंबात प्रेम दिसत नाही असा माझं अजिबात दावा नाही (तो तुम्ही करून घेतलेला समज आहे) फक्त या लेखनात तश्या अनुभव बद्दल नमूद केलं आहे..याचा अर्थ बाकी अनुभव आले नाहीत असा होत नाही..सर्वसाधारणपणे!

तुमच्या भावना कुठल्याही कारणाने दुखावल्या गेल्या असतील तर माफी!

बाकी सर्वांच्या टीका आणि प्रतिसाद बद्दल धन्यवाद..

व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक नको >> ह्याला अनुमोदन!
लेख आवडला!
लोक लगेच कीस का पाडतात कोणास ठाऊक! वाचा ...छान आहे/नाही म्हणा ...पुढे सरका!

मला तरी तुलनेची गरज वाटत नाहीये.... ललित म्हणून वाचले.

आपापला देश त्यानुसार जडणघडण, त्यानुसार आपापले दृष्टीकोन...... बरे/वाईट दोन्हीही रिलेटिवच....

लेखनशैली छाने.

लेखनशैली छान आहे. शांताआज्जी आणि त्या वॉकरवाल्या आज्जी दोघींनाही स्वतःच्या ईच्छेप्रमाणे जगायला मिळाले असावे ही ईच्छा आणि मिळावे ही शुभेच्छा.

त्या वॉकरवाल्या आज्जीच्या देशातील कोणी शांताआज्जीच्या आयुष्यात डोकावली तर कसा लेख लिहील, असा विचार आला.

Pages