हितगुज दिवाळी अंक २०१२ - संकल्पना

Submitted by संपादक on 28 September, 2012 - 02:27

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]

साहित्य पाठवण्यासंबंधी आधिक माहितीसाठी पहा - http://www.maayboli.com/node/38219


rangoli7b.jpg

नमस्कार सुजनहो !

चराचराला उजळून टाकणार्‍या दिव्यांच्या उत्सवासोबतच दरवर्षी येतो शब्दब्रह्माचाही उत्सव.. मायबोली हितगुज दिवाळी अंकाच्या रूपात!!
दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या मायबोलीच्या परंपरेचं हे तेरावं वर्ष! यावर्षीदेखील एक अभिरुचीपूर्ण आणि बहारदार अंक सादर करण्याचा संपादक मंडळाचा संकल्प आहे. साथ हवी आहे ती तुमच्या उत्साहाची, कलात्मकतेची आणि रसिकतेची...
श्रीगजाननाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही आवडत्या विषयावर लिहायला सुरुवात केली असेलच. त्याच्या जोडीला तुमच्या विविध कलागुणांना नवीन, खास दालनं खुली करुन देण्यासाठी संपादक मंडळ तुमच्यासमोर मांडत आहे काही संकल्पना...

rangoli5.jpg 'ऋतू आणि जाणिवा'

विविध ऋतूंच्या रूपात आपल्याला भेटणारा किमयागार निसर्ग.. आणि ह्या ऋतूंची आपल्या मनावर उमटणारी अगणित प्रतिबिंबं. कुठे नवीन प्रेमाचा पहिला पावसाळा, तर कुठे मैत्रीची ऊब शोधणारी कुडकुडती थंडी. देशोदेशींचे रंगीबेरंगी स्प्रिंग-फॉल्स, मोठाल्या साम्राज्यांनी अनुभवलेले उन्हाळे-पावसाळे, नात्याची नाजूक ओलसर पालवी, तर कधी निष्पर्ण फांद्या. कधी मनात होणारी शिशिराची पानगळ, तर कधी ग्रीष्माच्या लाहीतही तनामनात तेवणारे हेमंतातले लक्ष लक्ष दीप.

'ऋतू आणि जाणिवा' या संकल्पनेअंतर्गत येऊद्या तुमच्या मनातले ऋतू शब्दांत सजून.. अन् उलगडू द्या प्रत्येक ऋतूबरोबर तुमच्या मनात उमटलेल्या जाणिवांचे असंख्य पदर!

rangoli5.jpg'छंद माझा आगळा'

तिकिटांपासून ते माणसं जमवण्यापर्यंत, रेखाटनापासून ते पर्यटनापर्यंत, भांडी बनवण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली सोबत करणारे हे विविध छंद! प्रसंगी निराशेच्या गर्तेतून वर काढणारे, अनोळखी लोकांशीदेखील तुमची सहज ओळख करून देणारे, आयुष्याच्या कातरवेळी जिवलग स्नेह्यासारखे तुमची साथ करणारे, कधी कळत-नकळत तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन होणारे, माणसं जोडणारे, तर कधी चक्क या वेडापोटी माणसं तोडणारे... छंद!

अनेक रुपांत मनातल्या सर्जनाची ज्योत तेवत ठेवणारा तुमचा छंद आणि त्याचं तुमच्या आयुष्यातलं स्थान यांची ओळख करुन द्या रसिक वाचकांना.. 'छंद माझा आगळा' ह्या संकल्पनेच्या माध्यमातून!

rangoli5.jpg रसिकहो, मायबोलीच्या दिवाळी अंकात तुमच्या जोडीनं तुमचे आजीआजोबा, आईवडील, मुलं, मित्रपरिवार या सगळ्यांना सामील करून घ्यायला आवडेल ना?
मग मांडा त्यांच्यासमोर परिसंवादाचा विषय 'तं तं तंत्रज्ञानाचा' ! जाणून घ्या त्यांची मतं आणि आम्हांलाही सांगा.

सात वर्षांच्या नातीचं सहजतेनं आयपॅड वापरणं असो की सत्तर वर्षांच्या आजोबांचं उत्साहाने व्हिडीओचॅट करणं असो, 'वाढता वाढता वाढे' म्हणत वेगानं अवघ्या विश्वाला व्यापणारं तंत्रज्ञान आज तुमच्या-आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलं आहे. नवनवीन आधुनिक साधनांनी सुलभ-सुकर केलेलं 'टेकी' आयुष्य जगत, 'ग्लोबल व्हिलेज'चे नागरिक म्हणून आपण समाधानी होत आहोत की कुठेतरी मनःशांती हरवत चाललो आहोत? आपल्या माणसांबरोबरचे विसाव्याचे चार क्षण, आपले आरोग्य, कमावतो आहोत की गमावतो आहोत? या आणि अशा नव्या युगाच्या विषयावरचे, तुमचे अन् तुमच्या घरातल्या जुन्या-नव्या पिढीचे विचार आमच्यापर्यंत पोचवा 'तं तं तंत्रज्ञानाचा' ह्या परिसंवादाच्या रुपात!

हितगुज २०१२ दिवाळी अंकासाठी तुमच्या आवडीच्या विषयांबरोबरच या संकल्पनांवर आधारित कथा / कविता / गझल / ललितलेखन / व्यंग्यचित्र / विनोदी लेखन / चित्रकला / प्रकाशचित्रे / हस्तकला / बालसाहित्य असे कुठल्याही स्वरुपातील साहित्य पाठवायचे आहे.

rangoli5.jpg'दिवाळी संवाद' म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून सुप्रसिद्ध लोकांच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेण्याची संधी! या अंकातही तुम्ही प्रतिभावान व्यक्तींची ओळख वाचकांना करून देऊन अंकाची रंगत नक्कीच वाढवू शकता. फक्त त्याआधी तुम्हांला संपादक मंडळाला त्या व्यक्तीचे नाव, कार्याचे स्वरुप याची माहिती कळवायची आहे व मुलाखतीसंदर्भात मंडळाची परवानगी घ्यायची आहे.

आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]

काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आम्हाला इथेच अथवा sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर जरूर संपर्क करा. संपादक मंडळ तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.

आपल्या संदर्भाकरिता खालील दुव्यांवर असलेली माहिती नक्कीच वाचनीय आहे.
१. हितगुज दिवाळी अंक २०१२ नियमावली

२. मालकीहक्क (Copyright)

३. शुद्धलेखनासंबंधी नियमावली

गुणीजनहो, चला मग... आता उत्साहाने सुरुवात करा दिवाळी अंकासाठी लेखन करायला!

आपले नम्र,
संपादक मंडळ, हितगुज दिवाळी अंक २०१२
---------------------------------------------------
दिवाळी अंकाच्या घोषणेसाठी प्रकाशचित्र वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल नंद्याचे संपादक मंडळातर्फे मनःपूर्वक आभार.

मायबोलीकरांनी केलेल्या विनंतीला मान देऊन साहित्य पाठवण्याची कालमर्यादा आम्ही एका आठवड्याने वाढवत आहोत.

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]

साहित्य पाठवण्यासंबंधी आधिक माहितीसाठी पहा - http://www.maayboli.com/node/38219

कुठवर पाहू, वाट सख्याची,
माथ्यावर चंद्र कि गं ढळला
अन, सखी बाई गं
येण्याचा वखत कि ग टळला

वाचकहो,
अंक येईस्तोवर फराळागिराळाचं आणा. जरा गप्पा मारत बसू हितंच. Happy

संपादक लोकहो,

दमानं होऊ द्यात. काहीतरी अडचण असल्याखेरीज असे होणार नाही याची खात्री आहे. सावकाश येऊ द्यात अंक. आम्ही वाट पाहतच आहोत. Happy

Pages