मिसळम पाकम गट्टम गट्टम्!-खमंग कटलेट-तिखट-सुलेखा.

Submitted by सुलेखा on 26 September, 2012 - 01:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गणपती बाप्पाला नानाविध फळे,पंचामृत,मोदक,लाडू,पंचपक्वान्ने,सुग्रास भोजन याबरोबर त्यांना आवडेल असा "खमंग कटलेट"चा नैवेद्य मनोभावे अर्पण केला आहे.
या खमंग कटलेट साठीचे साहित्य असे आहे.
१ मोठा बटाटा उकडलेला .[मावे त भाजुन घेतला तरी चालेल.]
१/४ वाटी तांदुळाचा भात.[भात करताना त्यात १ टी स्पुन तूप घालावे.]
साधारण किसलेला बटाटा व भात यांचे प्रमाण बरोबरीचे असावे.
३ टेबलस्पुन किसलेले चीज..
१ लहान गाजर मोठ्या भोकाच्या किसणीवर चिरुन घ्या किंवा अगदी बारीक तुकडे कापा .साधारण २ टेबलस्पुन हवे.
२ टेबलस्पुन मटार दाणे./[अमेरिकन कॉर्न ही चालेल.]
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची..[या चवीनुसार घ्याव्या.]
१ टेबलस्पुन किसलेले आले.
२ टेबलस्पुन काजुतुकडे.
२ लहान पालकाची पाने---७-८ पुदिना पाने.[दोन्ही चिरुन घ्यावी.]
१ टी स्पुन मिरेपुड .
अर्ध्या लिंबाचा रस-साधारण १टेबलस्पून.
मीठ चवीनुसार.
१ वाटीभर ब्रेडक्रम्स --मी आटा ब्रेड चे केले आहेत.
१ टेबलस्पुन कॉर्न फ्लोअर,
१ सफरचंद मध्यम आकाराचे.
१ वाटी तेल तळण्यासाठी.
हे लागणारे मुख्य जिन्नस---
khamang katalet-1.JPG

२ टेबल स्पून साखर .
१ टी स्पून दालचिनी पुड.
१ /२ टी स्पून लवंग पुड,
१/४ टी स्पून काळीमिरी पूड,
१/२ टी स्पुन काश्मिरी तिखट.
१/४ टी स्पुन मीठ,
१ टेबलस्पुन लिंबाचा रस.

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम सफरचंदाची आंबटगोड चटणी करायची आहे .
त्यासाठी सफरचंदाची जाडसर साले काढा ३ ते ४ साले काढायची आहेत [बाकीचे सफरचंद तसेच सालासकट ठेवायचे ]व त्याचे लहान लहान तुकडे करा्. साधारण २ टेबलस्पुन इतके हवेत.हे कटलेट साठी वापरायचे आहेत उरलेले सफरचंद सालासकट किसुन घ्या.
कढईत २ टेबलस्पून साखर घालुन मंद आचेवर त्याचे कॅरेमल करुन घ्या.म्हणजेच चमच्याने सतत ढवळत त्याचा पाक करुन घ्यायचा आहे.त्यासाठी पाणी अजिबात घालायचे नाही.सोनेरी रंगाचा पाक तयार झाला कि त्यात सालासकट किसलेले सफरचंद घालुन ढवळा.छान परतले गेले कि त्यात दालचिनी पूड,लवंग पूड आणि तिखट घाला.पुन्हा एकदा ढवळा .गॅस बंद करुन त्यात लिंबाचा रस घाला.पुन्हा एकदा छान ढवळुन घ्या व एका बाऊल मधे ही आंबट गोड चटणी काढुन ठेवा.

आता कटलेट तयार करायचे आहेत.
उकडलेला बटाटा किसुन घ्या.
त्यात किसलेले चीज व आले ,गाजर,मटार दाणे, सफरचंदाचे सालीसकट तुकडे ,चिरलेली हिरवी मिरची,पालक-पुदिना पाने घालुन कालवा.
आता त्यात शिजलेला भात व चवीप्रमाणे मीठ ,लिंबाचा रस ,मिरेपुड ,काजु तुकडे घालुन पुन्हा एकदा सगळे मिश्रण कालवुन घ्या.
कढईत तळण्यासाठी तेल तापत ठेवा.
या मिश्रणाचे कटलेट च्या साच्याने /नसल्यास हाताने आपल्या आवडेल तसा आकाराचे कटलेट बनवा
एका ताटलीत ब्रेड क्रम्स व दुसर्‍या ताटलीत कॉर्न फ्लोअर घ्या.
प्रत्येक कटलेट आधी ब्रेड क्रम्स च्या ताटलीत दोन्ही कडुन घोळवून,तळहातावर हलक्या हाताने [त्याचा मूळ आकार बदलणार नाही असे] दाबुन घ्या.पुन्हा एकदा कॉर्न फ्लोअर मधे घोळवुन दाबुन घ्या.कोर्न फ्लोअर मुळे ब्रेड क्रम्स चिकटुन रहातील व गरम तेलात सोडल्यावर सुटणार नाहीत.
कढईतील तेल छान तापले कि त्यात कढई व तेलाच्या आकारमानाप्रमाणे २ किंवा ३ कटलेट तळण्यासाठी सोडा.आता मध्यम आचेवर झार्‍याने दोन्हीकडुन उलटवत सोनेरी रंगावर तळा.असे सर्व कटलेट तळुन घ्या.

khamang katalet-2.JPG

सफरचंदाच्या गोड चटणी बरोबर बाप्पासाठी आगळा-वेगळा खमंग कटलेट चा तिखट नैवेद्य तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात एकुण ८ कटलेट तयार होतात.
अधिक टिपा: 

उकडलेला बटाटयात पाण्याचे प्रमाण नसावे .अन्यथा मिश्रण थोडे पातळसर होईल.
किसलेल्या चीज चे प्रमाण अजुन वाढवले तरी चालेले.
शॅलो फ्राय न करता तव्यावर अगदी थोडेसे तेल सोडुन भाजता येतील तसेच कटलेट ला दोन्हीकडुन तेलाचे बोट फिरवुन मावेत भाजुन घेता येतील.
पुदिना व सफरचंदाच्या सालीची चव छान येते.मेथीची पाने,कसूरी मेथी,कोबी ,बीट.ओले शेंगदाणे,मोड आलेले मूग मिश्रणात घालता येतील.
सफरचंदाच्या चटणी साठी आधी साखरेचे कॅरेमल तयार केले कि चटणीला सुरेख सोनेरी रंग येतो.त्यात लिबूरस ,दालचिनी व लवंगेची चव जाणवते.आंबट-गोड व थोडीशी तिखट चव लहान मुलांनाही आवडते.

माहितीचा स्रोत: 
मायबोली गणेशोत्सव २०१२ ची पाककृती मिसळम मिसळम गट्टम स्पर्धा...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages