मिसळम पाकम गट्टम गट्टम्!-खमंग कटलेट-तिखट-सुलेखा.

Submitted by सुलेखा on 26 September, 2012 - 01:30
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गणपती बाप्पाला नानाविध फळे,पंचामृत,मोदक,लाडू,पंचपक्वान्ने,सुग्रास भोजन याबरोबर त्यांना आवडेल असा "खमंग कटलेट"चा नैवेद्य मनोभावे अर्पण केला आहे.
या खमंग कटलेट साठीचे साहित्य असे आहे.
१ मोठा बटाटा उकडलेला .[मावे त भाजुन घेतला तरी चालेल.]
१/४ वाटी तांदुळाचा भात.[भात करताना त्यात १ टी स्पुन तूप घालावे.]
साधारण किसलेला बटाटा व भात यांचे प्रमाण बरोबरीचे असावे.
३ टेबलस्पुन किसलेले चीज..
१ लहान गाजर मोठ्या भोकाच्या किसणीवर चिरुन घ्या किंवा अगदी बारीक तुकडे कापा .साधारण २ टेबलस्पुन हवे.
२ टेबलस्पुन मटार दाणे./[अमेरिकन कॉर्न ही चालेल.]
१ बारीक चिरलेली हिरवी मिरची..[या चवीनुसार घ्याव्या.]
१ टेबलस्पुन किसलेले आले.
२ टेबलस्पुन काजुतुकडे.
२ लहान पालकाची पाने---७-८ पुदिना पाने.[दोन्ही चिरुन घ्यावी.]
१ टी स्पुन मिरेपुड .
अर्ध्या लिंबाचा रस-साधारण १टेबलस्पून.
मीठ चवीनुसार.
१ वाटीभर ब्रेडक्रम्स --मी आटा ब्रेड चे केले आहेत.
१ टेबलस्पुन कॉर्न फ्लोअर,
१ सफरचंद मध्यम आकाराचे.
१ वाटी तेल तळण्यासाठी.
हे लागणारे मुख्य जिन्नस---
khamang katalet-1.JPG

२ टेबल स्पून साखर .
१ टी स्पून दालचिनी पुड.
१ /२ टी स्पून लवंग पुड,
१/४ टी स्पून काळीमिरी पूड,
१/२ टी स्पुन काश्मिरी तिखट.
१/४ टी स्पुन मीठ,
१ टेबलस्पुन लिंबाचा रस.

क्रमवार पाककृती: 

सर्व प्रथम सफरचंदाची आंबटगोड चटणी करायची आहे .
त्यासाठी सफरचंदाची जाडसर साले काढा ३ ते ४ साले काढायची आहेत [बाकीचे सफरचंद तसेच सालासकट ठेवायचे ]व त्याचे लहान लहान तुकडे करा्. साधारण २ टेबलस्पुन इतके हवेत.हे कटलेट साठी वापरायचे आहेत उरलेले सफरचंद सालासकट किसुन घ्या.
कढईत २ टेबलस्पून साखर घालुन मंद आचेवर त्याचे कॅरेमल करुन घ्या.म्हणजेच चमच्याने सतत ढवळत त्याचा पाक करुन घ्यायचा आहे.त्यासाठी पाणी अजिबात घालायचे नाही.सोनेरी रंगाचा पाक तयार झाला कि त्यात सालासकट किसलेले सफरचंद घालुन ढवळा.छान परतले गेले कि त्यात दालचिनी पूड,लवंग पूड आणि तिखट घाला.पुन्हा एकदा ढवळा .गॅस बंद करुन त्यात लिंबाचा रस घाला.पुन्हा एकदा छान ढवळुन घ्या व एका बाऊल मधे ही आंबट गोड चटणी काढुन ठेवा.

आता कटलेट तयार करायचे आहेत.
उकडलेला बटाटा किसुन घ्या.
त्यात किसलेले चीज व आले ,गाजर,मटार दाणे, सफरचंदाचे सालीसकट तुकडे ,चिरलेली हिरवी मिरची,पालक-पुदिना पाने घालुन कालवा.
आता त्यात शिजलेला भात व चवीप्रमाणे मीठ ,लिंबाचा रस ,मिरेपुड ,काजु तुकडे घालुन पुन्हा एकदा सगळे मिश्रण कालवुन घ्या.
कढईत तळण्यासाठी तेल तापत ठेवा.
या मिश्रणाचे कटलेट च्या साच्याने /नसल्यास हाताने आपल्या आवडेल तसा आकाराचे कटलेट बनवा
एका ताटलीत ब्रेड क्रम्स व दुसर्‍या ताटलीत कॉर्न फ्लोअर घ्या.
प्रत्येक कटलेट आधी ब्रेड क्रम्स च्या ताटलीत दोन्ही कडुन घोळवून,तळहातावर हलक्या हाताने [त्याचा मूळ आकार बदलणार नाही असे] दाबुन घ्या.पुन्हा एकदा कॉर्न फ्लोअर मधे घोळवुन दाबुन घ्या.कोर्न फ्लोअर मुळे ब्रेड क्रम्स चिकटुन रहातील व गरम तेलात सोडल्यावर सुटणार नाहीत.
कढईतील तेल छान तापले कि त्यात कढई व तेलाच्या आकारमानाप्रमाणे २ किंवा ३ कटलेट तळण्यासाठी सोडा.आता मध्यम आचेवर झार्‍याने दोन्हीकडुन उलटवत सोनेरी रंगावर तळा.असे सर्व कटलेट तळुन घ्या.

khamang katalet-2.JPG

सफरचंदाच्या गोड चटणी बरोबर बाप्पासाठी आगळा-वेगळा खमंग कटलेट चा तिखट नैवेद्य तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात एकुण ८ कटलेट तयार होतात.
अधिक टिपा: 

उकडलेला बटाटयात पाण्याचे प्रमाण नसावे .अन्यथा मिश्रण थोडे पातळसर होईल.
किसलेल्या चीज चे प्रमाण अजुन वाढवले तरी चालेले.
शॅलो फ्राय न करता तव्यावर अगदी थोडेसे तेल सोडुन भाजता येतील तसेच कटलेट ला दोन्हीकडुन तेलाचे बोट फिरवुन मावेत भाजुन घेता येतील.
पुदिना व सफरचंदाच्या सालीची चव छान येते.मेथीची पाने,कसूरी मेथी,कोबी ,बीट.ओले शेंगदाणे,मोड आलेले मूग मिश्रणात घालता येतील.
सफरचंदाच्या चटणी साठी आधी साखरेचे कॅरेमल तयार केले कि चटणीला सुरेख सोनेरी रंग येतो.त्यात लिबूरस ,दालचिनी व लवंगेची चव जाणवते.आंबट-गोड व थोडीशी तिखट चव लहान मुलांनाही आवडते.

माहितीचा स्रोत: 
मायबोली गणेशोत्सव २०१२ ची पाककृती मिसळम मिसळम गट्टम स्पर्धा...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखाजी, हा सुधा तुमचा पदार्थ मस्त आहे स्पर्धेतला!

ती गोड्-तिखट चटणी मस्त लागत असेल ना?

चटणी अगदी सोपी आहे .साखरेचा बिनपाण्याचा पाक मंद आचेवर सतत ढवळत करायचा आहे.ढवळल्याने साखर तळाला चिकटणार नाही.पाकाचा रंग व त्यामुळेच फायनल चटणीचा रंग सुंदर येतो. एकदा पाक तयार झाला कि सफरचंदाचा किस घालुन अगदी २ च मिनिटे परतायचे आहे व इतर मसाला पुड मिसळायच्या कि झाली चटणी तयार. ही चटणी जास्त प्रमाणात करुन फ्रिज मधे टिकवता येते.

मस्त च आहे कल्पना ! नक्की करून बघणार.

<< त्याचे लहान लहान तुकडे करा्. साधारण २ टेबलस्पुन इतके हवेत.हे कटलेट साठी वापरायचे >>

कटलेट च्या कृती मधे सफरचंदाचे तुकडे घालण्याबद्दल लिहायचं राहिलय बहुतेक.

कटलेट च्या कृती मधे सफरचंदाचे तुकडे घालण्याबद्दल लिहायचं राहिलय बहुतेक.
>>>
आता कटलेट तयार करायचे आहेत.
उकडलेला बटाटा किसुन घ्या.
त्यात किसलेले चीज व आले ,गाजर,मटार दाणे, सफरचंदाचे सालीसकट तुकडे ,चिरलेली हिरवी मिरची,पालक-पुदिना पाने घालुन कालवा.

लिहिलंय की! Happy

मला ती रांगोळी भारीच आवडली >>
पंक्तीतल्या पानांभोवती ठेवतात ती मोत्यांची महिरप आहे ना?

प्लीज माझ्या शंकेचं निरसन करा- कटलेटमध्ये सफरचंदाचे तुकडेच ठेवले आणि कटलेट शॅलो फ्राय केले, तर सफरचंद शिजतं का? शिवाय, खाताना ते तुकडे मध्ये येत नाहीत का? त्यापेक्षा सफरचंद किसून घातलं तर?

पौर्णिमा,
सफरचंदाची जाडसर साले सुरीने काढुन घ्यायची.म्हणजे साधारण पाव इंच जाडीचे साल .त्याचे लहान तुकडे करायचे आहेत्..त्यामुळे शॅलो फ्राय केल्यावर ते अर्धवट शिजतात.अन कटलेट खाताना अधेमधे त्याची गोडसर चव छान लागते.त्याचबरोबर इतर चवीही जाणवतात्.[पुदिना,पालक्,हि.मिरची,मिरेपुड ,लिंबुरस इ.]सालासकट असल्याने मेणचट लागत नाही शिवाय सालांचा लाल रंग सुंदर दिसतो.किसुन घातले तर पुर्ण कटलेट्च गोड चवीचे होईल..
निंबुडा,
होय. या ताटाभोवतीच्याच ,मोत्यांच्या २ महिरपी आहेत. एकानंतर त्यावर दुसरी महिरप माडली आहे.
मानुषी,
काय झाले."नो लिसनींग "म्हणजे तुला आवडले नाही का?

पौर्णिमा, लाल मऊसर जातीची असतात, त्या सफरचंदाचे तूकडे शिजतील. हिरव्याचे थोडे कमी शिजतील, पण अगदीच कच्चेही राहणार नाहीत. तसेच सालीसकट वापरल्याने, तूकडे विरघळून हरवणारही नाहीत.

दोन्ही पाककृत्या मस्त!! फोटोही मस्त दिसतोय.

अ‍ॅपलसॉस/ चटणीची कृती एकदम भारी आहे. (पण स्पर्धेच्या नियमांत बसणार का? Sad )

पूनम, एरवी सफरचंद खाताना आपण तसेच खातो ना? मग कटलेटमधे शिजलं काय आणि नाही शिजलं काय Wink

वॉव, काय सुरेख, सुबक दिसत आहेत कटलेट्स. फार फार आवडली ही कृती. नक्की करुन बघणार. चटणी पण एकदम वेगळीच. धन्यवाद सुलेखा Happy

अ‍ॅपलसॉस/ चटणीची कृती एकदम भारी आहे. (पण स्पर्धेच्या नियमांत बसणार का? ) >>> कटलेट्स स्पर्धेच्या नियमांत बसत आहेत. चटणी आपल्याला मिळालेला बोनस Happy

अगो, स्पर्धेच्या नियमांत <<१०) एका प्रवेशिकेत एकच पाककृती असावी>> असे आहे, म्हणून मी तसे लिहिले Happy

नियम गोंधळात टाकणारे आहेत खरे Happy एका प्रवेशिकेत एकच पाककृती हवी म्हणजे दोन वेगवेगळ्या पाककृती देऊन अर्धे जिन्नस एकात, अर्धे दुसर्‍यात असे करुन यादी पूर्ण करु नये असे म्हणायचे असावे.
मुख्य पाककृती अगदी नियमांप्रमाणे आहे. यादीतले सगळे जिन्नस त्यात वापरले आहेत. त्यात वापरुन उरणारे सफरचंद चटणीत वापरुन संपवायची कल्पना खरंतर फारच भारी आहे. स्पर्धेसाठी कटलेट्सचा विचार करावा आणि चटणी ही जास्तीची टीप म्हणून धरावी.
बघू, संयोजक काय निर्णय घेतात ( का परत नियम बदलतात. ) Wink

३ टेबलस्पुन किसलेले चीज..
१ लहान गाजर मोठ्या भोकाच्या किसणीवर चिरुन घ्या किंवा अगदी बारीक तुकडे कापा .साधारण २ टेबलस्पुन हवे.
२ टेबलस्पुन मटार दाणे./[अमेरिकन कॉर्न ही चालेल.]
एक वाटीभर ब्रेडक्र्न्ब. >> हे ४ मुख्य घटक का ? कि पालक-पुदिना पाने ४थ मुख्य घटक.
पाककृती छान आहे, दिसत पण छान आहे. स्पर्धेच्या नियमात बसते ही ... पण जसा लोकल मध्ये ४थ सीट बसत तसा ४थ घटक बसलेला वाटतो.

Pages