आरती सप्रेम..!

Submitted by देवचार on 25 September, 2012 - 02:52

"श्रींच्या आरतीस पाच मिनिटांत सुरूवात होत आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर मंडपात उपस्थित राहावे."

अशी 'अलाऊंसमेंट' नऊ ते साडेनऊ पर्यंत निदान चार-पाच वेळा तरी केल्याशिवाय कुणीही अजिबात मंडपात प्रकट होत नाही. आमच्या चाळीत हे असले एकेक नग आहेत.

"आरती ना, कधीं म्हणून होतें का ती साडेंनवाच्या आधीं? तूं जेवांयस वाढ तोंवर. मग जातों सांवकाश पावणेंदहा पर्यंत. कसेबसे कर्पूरगौरास आरती ओवाळण्यापर्यंत पोहोचलें असतील तोवर!" हे आमचे आपटेबुवा. "आरत्या म्हणाव्यात तर यांनी" असा यांच्या नावाचा डंका आहे! म्हणजे सुखकर्ता दु:खहर्ता, लवथवती विक्राळा, दुर्गे दुर्घट भारी, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती, युगे अठ्ठावीस, येई वो विठ्ठले वगैरे 'सर्वसामान्य' (हा त्यांनीच या सगळ्या आरत्यांना बहाल केलेला शब्द! ), कोणाही माणसाला म्हणता येतील अशा आरत्या म्हणून झाल्या की मगच यांचं इंजिन चालू होते. तोवर हे आपले कुठेतरी कोपर्‍यात सुपारी कातरत, पिष्टन साफ करत पडलेले असणार! बरं आता बाकी पब्लिकपैकी एकजण वेळेवर येईल तर शप्पथ. कुणाला कुणा एका 'अधुर्‍या कहाणी'त इंटरेस्ट तर कुणाचं 'उधाण वार्‍याचं मन' बंड करून त्यांना घरात बसवून ठेवी! शेवट रडत खडत साडेनवापर्यंत सगळे आपापल्या झांजा, टाळ वगैरे घेऊन मंडपात हजर होणार. बरं, झांजा वाजवण्यास काही विशेष कौशल्य लागत नसलं तरी प्रत्येकाला आपापल्या घरच्या झांजा घेऊनच आरतीस उपस्थिती लावायची असते. जणू आपण झांजा वाजवल्या नाहीत तर तो गजानन (नि इतर सर्वच देव) समस्त भक्तगणांकडे दुर्लक्षच करणार आहे. मग त्या सगळ्या झांजांचे ते 'अनाहत ध्वनी' अपार गर्जले नि आपल्याला जमेल त्या सुरांत प्रत्येकाने आरत्या म्हणावयास सुरूवात केली की त्या बिचार्‍या भगवंताचीच दया येते हो. पण मग 'अठरा पद्मे वानरांच्या भुभु:कारा'चा त्यास ऑलरेडी एक्स्पिरीयन्स असल्याने मी निश्चिंत होऊन जातो!

मग त्या तबला, मृदंग, झांजा, टाळांच्या गजरात सगळं वातावरण न्हाऊन निघतं. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे सुरांचा बाजार मांडत (किंवा उठवत, कसंही! ) आरत्या म्हणत असतो! कुणी तारसप्तकात लीलया खेळत मोठ्या उत्साहात पीतांबरधारी लंबोदरास आळवत असतो तर कुणी अरुंद बोळात अडकल्यासारखं एकाच सुरात, आपलंच तुंड वक्र करून सरळ शुंडेच्या विघ्नहर्त्यास आळवत असतो! पण तो जो काही गजबजाट असतो तो श्रवणीय असतो खरा! आणखी एक गमतीचा भाग म्हणजे आरत्यांतले शब्द! काही लोकांना माहितीच नसतं की आपण चुकीचं म्हणतोय! पण कसं आहे, शेवटी भावना महत्त्वाची! ते शब्द चुकीचे म्हटल्याने कुणाचं काही वाईट होणार नाही पण आरत्यांत म्हटले जाणारे चुकीचे शब्द टिपायला मजा येते खरी! आमच्याकडे दहांतली निदान सहा माणसे "दास रामाचा वाट पाहे सदना, संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे" असंच म्हणतात! म्हणजे काय? गजानन बाकी कधी पावला नाही तरी चालतंय! पण संकष्टीला पावायलाच हवा!

सुखकर्ता दु:खहर्ता संपली की पटवर्धनांच्या बंड्याला "नाना परिमळ दुर्वा" म्हणायची असते, तो सुरू करतोही. पण पटवर्धनकाका, त्याचेच वडील, पहिल्या 'सर्वसामान्य' आरत्यांचे इन-चार्ज असल्याने, नि त्यांना कदाचित 'नाना परिमळ' येत नसल्याने, "लवथवती विक्राळा" चालू करून बंड्याकडे तिसरा डोळा उघडल्याच्या थाटात एक जळजळीत कटाक्ष टाकतात नि बंड्या बिचारा हिरमुसला होऊन मागे होतो. शंकराची आरती म्हणताना अगदी मंडपात तांडव चालू असते सगळ्यांचे. "व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी" म्हणताना एकेकाला हा असला जोश येतो, की सांगून सोय नाही. मृदंगही जोरजोरात कडाडू लागतात, टाळ दाही दिशी घुमू लागतात. सोसायटीतल्या सर्व नंदीबैलांचं परमेश्वराचं गुणगान करताना रौद्र तांडव सुरू असतं! शिवाची आरती संपून दुर्गेची आरती सुरू झाली की बॅटन महिलामंडळाकडे पास केलं जातं! आता सगळ्या महिषासुरमर्दिन्यांचा आपापल्या घरातल्या महिषापेक्षा आपण वरचढ कशा आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू होतो! मागे कुठेतरी देसाईकाकू जोरजोरात टाळ्या पिटत घोगर्‍या आवाजात, मोठ्या तल्लीनतेने दुर्गेचं गुणगान करत असतात. त्यात यमी, त्यांची धाकटी लेक, त्यांच्या पायात घुटमळत असते. तिला आलेला असतो कंटाळा आणि तिला प्रसाद कधी मिळतो याचंच अप्रूप जास्त असतं. आता तिची बिचारीची आशा तिच्या या जगदंबेवाचून कोण पुरवणार? म्हणून मग ती सारखी, "आई, प्लशाद कदी वातनाल?" विचारू लागते. तिला जगदंबा हळूच खुणेनेच "मग मग" असं सांगते. तिचं पुन्हा तेच. थोड्या वेळाने मात्र देसाईकाकू वैतागतात. मग

"प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां..
अगो गप्प बैस की जरा कार्टे..
अंबे तुजवाचोनि कोण पुरवील आशा..
आता फटके देईन हां मी मनू..
जय देवी जय देवी.. काय आहे गं सारखी कटकट तुझी..
सुरवर ईश्वर वरदे.."

फाट्ट... एक फटका पडतो मनुला.. की मग पुढे दत्तगुरूंच्या आरतीला मनुच्या "भ्यांऽऽ" अशा कोरसची भर पडते! एकीकडे पंढरीची नियमित वारी करणारा म्हादेव कुंभार पांडुरंगाची आरती कधी सुरू होते याची अठ्ठावीस युगांपासून वाट बघत असल्यासारखा चेहरा करून, जांभया देत टाळ्या वाजवत उभा असतो! मग तिथे "दत्त दत्त ऐसे लागले ध्यान.." झालं की याचं हरपलेलं मन ताळ्यावर येत. मग गर्दीतून सगळ्यात पुढे जाऊन उभा राहण्यासाठी म्हादेवाचा आटापिटा सुरू होतो! कुणाच्यातरी लक्षात येतं "अरे हो.. हा म्हादेव कुंभार. जाऊ दे जाऊ दे त्याला पुढे.." मग त्याला वाट करून दिली जाते! पुढे जाता जाता कुणाला चुकून पदस्पर्श झाला तर त्या मनुष्याला तिथल्या तिथं आधी नमस्कार करून तो पुढे सरकणार. अशा गर्दीच्या वेळी सुद्धा नियम म्हणजे नियम, त्यांत जराही सूट नाही, हां. हातांतल्या चिपळ्या वर करून स्वारी हळूहळू गर्दीतून पुढे सरकत असते. शेवटी कसाबसा तो "जय देव जय देव जय पांडुरंगा.." करत पुढे पोहोचतो! मग जणू त्याच्या अंगी नामदेवच येतात. मुक्त चिपळ्या वाजवत, अगदी तल्लीन होऊन गिरक्या घेत नाचेल काय, पुलंच्या हरीतात्यांसारखी हवेतल्या हवेत डुबकी मारून चंद्रभागेतलं स्नान उरकून घेईल काय, विठोबाची आरती म्हणजे सोहळा असतो अगदी सोहळा! मग "येई वो विठ्ठले" सुरू झाली की सगळ्यांच्या नजरा आपोआप आपटेबुवांना शोधू लागतात. कारण सर्वांनाच येणारी ही यादीतली शेवटची आरती असते! इकडे म्हाद्येव कुंभाराचा 'पंढरपुरी असणार्‍या मायबापास' एक साष्टांग प्रणिपात घालून झालेला असतो! तिथे 'पिवळा पीतांबर गगनी झळकू लागला' की गर्दीतून वाट काढत पुढे येणारी आपटेबुवांची पीतांबर (अर्थात पिवळं पडलेलं बनियान) धारण केलेली लंबोदर आकृती दिसू लागते! आणि सगळ्यांना "चालत गर्दीतुनि माझा कैवारी आला" अशी भावना होऊन "हुश्श.." होतं.

आणि मग आपटेबुवा सूत्रे हाती घेतात! खर्जातला आवाज नि सुरांचं पुरेसं ज्ञान असल्याने कमालीच्या संथ लयीत त्यांनी म्हटलेल्या आरत्या अत्यंत श्रवणीय असतात! इतका वेळ गजबजाट करणारी बाकी सर्व मंडळी आपटेबुवांनी "उत्कट साधुनि शीळा सेतु बांधोनि" सुरू केलं की आपोआप रामानं वानरसेनेला शिस्तीत आणावं तसं शिस्तीत झांजा वाजवत, टाळ्या वाजवत श्रवणभक्ती करू लागतात! आमच्यासारखे एखाद दोन जणं तेवढाच आवाज मोठा करून शायनिंग मारतात तेवढ्यात. पण समुद्राच्या खवळणार्‍या लाटा अचानक शांत प्रवाही व्हाव्यात तसं काहीसं होतं आपटेबुवांनी आरत्या म्हणायला सुरूवात केली की!

"निजबळे निजशक्ती सोडविली सीता,
म्हणुनि येणे झाले अयोध्ये रघुनाथा,

आपटेबुवा म्हणताहेत नि बाकी मंडळी फक्त शिस्तीत झांजा वाजवताहेत. खरंच इतका प्रसन्न सोहळा असतो तो! मग पुढं

आनंद वोसंडे वैराग्य भरता,
आरती घेऊनि आली कौसल्या माता"

झालं की "हं.." असं म्हणून आपटे बुवा सर्वांच्या दिशेनं हात हलवून "चला, म्हणा" अशी खूण करतात की सगळ्यांना कळतं काय म्हणायचंय ते. नि पब्लिक चालू होतं. "जयदेव जयदेव निजबोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा, जयदेव जयदेव!" श्रीरामाच्या नामात नक्कीच एक वेगळीच शक्ती आहे! उगाच नाही ते दगड तरंगले समुद्रावर! अहो तेव्हा निदान समुद्राच्या पाण्याचा तरी आधार होता, आमच्या सोसायटीतले एकेक दगड हे असे हवेत तरंगत असतात रामाची आरती म्हणताना!

श्रीरामाच्या आरती पाठोपाठ हनुमंताची आरती होते, महालक्ष्मीची होते, पंचायतानाची होते, द्शावताराची होते, धूपारती होते, अनेक आरत्या होतात! दशावताराच्या आरतीत आम्हा पोरांचा नुस्ता धिंगाणा चालू असतो नि सगळी मोठी मंडळी देखील हसत असतात, त्यामुळे आम्ही आणखीच चेकाळतो! मग "प्रल्हादाकारणेंऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" ला पंधरा सेकंदांनी श्वास सुटला तरी एकदा ब्रेक घेऊन परत.. "हेऽऽऽऽऽऽऽऽहे.." असं ताणत ढोलकी वाजवणार्‍याचा पेशन्स टेस्ट केला जातो! शेवटी कल्कीपर्यंत पोहोचेपर्यंत नुसता "वनी आनंद, भुवनी आनंद, आनंदी आनंद वनभुवनी" झालेला असतो! किती छान, निर्मळ, खेळीमेळीचं वातावरण असतं ते! मग लोटांगणं वगैरे घालून झाली की आपटेबुवा अतिशय सुंदर देवे म्हणतात, मंत्रपुष्प म्हणतात! "एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति: प्रचोदयात्" प्रमाणे लक्ष्मी, विष्णु, रूद्र, दुर्गा, दत्त, ब्रह्म, आदित्य, अग्नि, श्रीराम, सीता, हनुमंत, श्रीकृष्ण, नृसिंह, परशुराम, इंद्र, सरस्वती, शनि, शंख, मंत्र, तंत्र इ. प्रमाणे एकवीस गायत्रीपुष्पं अर्पण करतात! नुसतं ऐकत राहावंसं वाटतं! केवळ अप्रतिम! तास-तास चालणारी ती आरती म्हणजे एक विलक्षण सोहळाच असतो! गणेशोत्सवाचे सर्वच दिवस उत्साहाचेच असतात मात्र हा सार्वजनिक आरतीचा सोहळा हृदयात घर करून राहिलेला आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्याच सोसायटीत, कॉलनीत, चाळींत, वाडीत, मंडळात थोड्याबहुत फरकाने हा सोहळा पार पडत असेलच याची खात्री. प्रत्येकाचा हा सोहळा असाच निरंतर चालू दे अशी गजाननाकडे एकच प्रार्थना! जीव आहे तोवर सप्रेम आरती करत राहू नि संस्कृतीचं हे लेणं पिढ्यानपिढ्या पुढं चालवू!

आरती सप्रेम मोरया पार्वतीनंदना!

** वरील सर्व पात्रे (आपटे, रेडे, नंदीबैल, म्हशी सगळीच ) काल्पनिक आहेत. बाकी आम्ही स्वतः आरत्यांच्या सुपार्‍या घेतो! पुढल्या गणेशोत्सवासाठी त्वरित संपर्क साधणे. येत्या पाडव्यापूर्वी बुकिंग केल्यास घसघशीत डिस्काऊंट! **

जुनंच लिखाण आहे. माबोवर गणेशोत्सवाच्या निमित्तानं प्रथमच प्रकाशित करत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लैच भारी लिहिता की राव !!!

आजवर फक्त खूप वेळ लागतो या एकाच कारणाने मी कोणतेही गद्यलेखन फारसा वाचत नसे

आता तुमचे लेखन आवर्जून वाचावे लागणार असे दिसते आहे
असो प्रयत्न करीन नक्की ......'

धन्यवाद

आपला नम्र
-वैवकु