दर्शन - लतादीदींचे

Submitted by skamble on 24 September, 2012 - 02:22

२८ सप्टेंबरला लतादीदी ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या एका कट्टर चाहतीने सांगितलेली ही एक आठवण. - (ज्योती कांबळे, Manchester, UK)
-------

२३ एप्रिल १९८९ ची सायंकाळ. बालगंधर्वाचा परिसर माणसांनी फुलून गेला होता. कार्यक्रम होता स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मानपत्र देण्याचा. कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच होता. त्यामुळे ज्यांच्याकडे निमंत्रण नव्हते ते रंगमंदिराच्या बाहेरच उभे होते. याची देही याची डोळा एकदा दीदींना पहावे अशी आशा ठेवुन रसिक ताटकळले होते. अशी संधी पुन्हा कधी मिळेल न मिळेल म्हणून सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीसही उत्सुक होतेच.

मी आणि माझी मैत्रीण रेणुका त्या गर्दीत अक्षरशः घुसलो आणि रंगमंदिराच्या पोर्चपर्यंत जाऊन पोहोचण्यात यशस्वी झालो. आमच्याकडे निमंत्रण पत्रिका असूनही आम्ही पोर्चमधेच थांबलो होतो – दीदींना जवळून बघता यावे म्हणून! येणाऱ्या प्रत्येक गाडीबरोबर उत्सुकता ताणली जात होती. घड्याळाकडे सारखं लक्ष जात होते. वेळेबाबत अतिशय काटेकोर असणाऱ्या दीदी सहाच्या ठोक्याला नक्की येणार ही खात्री होती. पण घड्याळाचा काटा पुढे सरकत नव्हता हेच खरं! हृदयाची धडधड आणि मनगटावरच्या घड्याळाची टकटक यांचा मेळ काही जमत नव्हता. यच्चयावत सगळे व्ही. आय. पी. आणि व्ही. व्ही.आय. पी. आपापल्या अलिशान गाड्यांमधून उतरून केव्हाच सभागृहात स्थानापन्न झाले होते. तेवढ्यात एकदम गलका झाला. आली, आली .... गाडी आली. पोलीसही पुढे धावले. त्या वेळी सहा वाजायला दोन मिनिटे कमी होती. काळ्या रंगाची गाडी झोकात आली आणि पोर्चमध्ये थांबली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खाली उतरले. पण त्यावेळी त्यांना पाहण्यात मला रस नव्हता. अर्थात योग्य सन्मानाने त्यांना आत नेण्यात आले आणि आमचा “इंतजार” पुन्हा सुरु झाला.

आणि बरोब्बर सहा वाजता एक पांढरी शुभ्र फियाट पद्मिनी पोर्च मध्ये येवून उभी राहिली. त्या गाडीची ऐट निराळीच होती. कोणी म्हणेल गाडीला काय ऐट असायची? ती काय सजीव वस्तू आहे? सगळ्या गाड्या सारख्याच. पण आपल्या दैवताच्या दर्शनासाठी धुंडीराज होऊन उभा राहिलेला भक्त असा नाही विचार करत! नाहीतर आपल्या सचिनची बॅट किंवा मधे इथल्या शाही लग्नात एका राजकन्येने वापरलेली हॅट यांचा लक्षावधीत लिलाव झाला नसता. तर सांगायचे काय कि मला ती गाडीही सुंदर वाटली. अजूनही वाटते. आणि गाडीतून उतरणारी व्यक्ती? ओहो! तिला पाहण्यासाठी गेले पंधरा दिवस मी जीवाचे रान केले होते. निमंत्रण पत्रिका मिळविण्यासाठी कोणाकोणाला किती फोन केले होते. शेवटी माझ्या एका मैत्रिणीचे वडील पुण्याचे नगरसेवक होते, त्यांच्याकडे माझी वर्णी लागली. आणि कार्यक्रमाच्या दिवशी हातात निमंत्रण पत्रिका फडकवत मी बालगंधर्वच्या स्वागतकक्षात उभी राहिले होते. त्या वातावरणाचा, त्या उत्साहाचा, त्या ओसंडत्या गर्दीचा, गर्दीतून होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावाचा मला “फील” घ्यायचा होता. त्या गर्दीचा एक भाग बनून जायचे होते. गाडीचे दार उघडले आणि ती अवतरली!! पांढरीशुभ्र साडी, तिला जांभळ्या रंगाची छोटीशी किनार, केसात मोगऱ्याचा गजरा माळलेला, कानात लखलखणारी हिऱ्याची कुडी! अर्थातच लता मंगेशकर!

रसिक गाडीकडे धावले. त्यांचाही आधी पोलीस अधिकारी धावले. गर्दीचा प्रचंड लोट उसळला. दीदींना एकदा डोळे भरून पाहायची सगळ्यांनाच इच्छा होती. प्रसंग अतिशय आनंदाचा आणि भावनिक होता. पोलिसांनी लतादीदींच्या भोवती कडे केले व त्यांना पुढे नेले. प्रवेशद्वाराजवळ पाच सुवासिनी त्यांना ओवाळणार होत्या. खास पुणेरी पध्दतीने त्यांचे स्वागत होणार होते. मी अक्षरशः थिजले होते. एकदा लतादीदींना जवळून पाहाव हे माझ अनेक वर्षांपासूनचे स्वप्न. ते प्रत्यक्ष साकार होतांना मात्र सगळ्या संवेदना बधीर झाल्या होत्या. स्वतःला चिमटा काढून बघावा अस वाटल पण तस करण्यासाठी माझा हातही हलवत नव्हता. औक्षण झाल आणि लतादीदी आत जायला निघाल्या. तशी मी भानावर आले आणि जाणवले एकदा दीदी आत गेल्या की मला त्यांच्याशी कधीच हात नाही मिळवता येणार. हात पुढे केला व हळूच हाक मारली, “हॅलो मॅडम!”. आणि काय आश्चर्य! लतादीदींनी वळून पहिले. त्या दोन पावल मागे आल्या आणि मी पुढे केलेल्या हातात आपला हात दिला. एक छानस स्मित देऊन त्या सभागृहात अदृश्य झाल्या! त्यानंतर काही वर्षांनी पत्रकारिता करताना मला लतादीदींना पुन्हा भेटण्याचा सुवर्णयोग आला. तोही दोन वेळा आणि त्यांच्या घरी जाऊन. तरीसुद्धा २३ वर्षापूर्वी घडलेला हा प्रथम दर्शनाचा प्रसंग असाचा असा आजही मला दिसतो.

आम्ही रंगमंदिराच्या सभागृहात गेलो. दोनच मिनिटात कार्यक्रम सुरु झाला. पुढच्या तिसऱ्या चौथ्या रांगेतच आमची जागा होती. पुणे महापालिकेतर्फे दीदींचा सन्मान करण्यात आला. त्यांना मानपत्र देण्यात आले. सगळाच कार्यक्रम अतिशय रेखीव व सुंदर झाला. आणि शेवटी सत्काराला उत्तर द्यायला लतादीदी उभ्या राहिल्या. असा “पिनड्रॉप सायलेन्स” यापूर्वी मी कधी अनुभवला नव्हता. सर्व श्रोत्यांनी कानात प्राण आणले होते. माझ्या शेजारीच सुरेश वाडकर बसले होते. एवढा वेळ इतरांची भाषणबाजी चालू असताना आमच्याशी मस्त गप्पा मारीत होते. आता मात्र लतादीदींचे बोलेणे ऐकायला त्यांनीही कान टवकारले.

मीही अर्थात मन लाऊन त्याचं बोलण ऐकल. पण खर सांगायचं तर एकही शब्द लक्षात नाही. हृदयावर कोरली गेली आहे ही माईकच्या मागे उभी राहिलेली लतादीदींची मूर्ती आणि भारावून टाकणारे ते गद्य सूर!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amazing!

मस्तच.
गेल्या वर्षी दिनानाथ फाऊंडेशन च्या 'सोनू निगम नाईट्स ' ला मी फक्त लता दीदींना बघता यावे म्हणून गेले होते. बक्षीस समारंभातील त्यांचे भाषण कानात प्राण आणून ऐकले. मिडीया फोटोग्राफर्स बरोबर पुढे जाऊन त्यांचे फोटो ही काढले, खूप छान वाटले.

२८ सप्टेंबर.....माझा आणि रणबीर कपूर चा पण वाढदिवस..... Happy
अर्थात लता दिदी ....लता दिदी आहेत....:)