हलकट जवानी - बोरिंग कहाणी - (Heroine Movie Review)

Submitted by रसप on 22 September, 2012 - 00:56

images (1).jpg

आजची तुमची जी स्वाक्षरी आहे, ती पूर्वी कशी होती ? आठवतं ? माझ्या बाबतीत सांगतो. माझ्या स्वाक्षरीत माझ्या नावाचं संक्षिप्त स्वरूप होतंच, पण ते प्रत्येक अक्षर अगदी सुस्पष्ट नाही, तरी हलक्यानेच पण असायचं. नंतर, रोज रोज तीच स्वाक्षरी करता करता काही अक्षरं आपोआपच पुसट-पुसट होत जाऊन, आज तर त्यांची जागा सरळ रेषेनेही घेतली आहे !
एखादा पार्श्वगायक, त्याचं एखादं अत्यंत गाजलेलं गाणं त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात गात असतो. वारंवार तेच ते गाणं गाता गाता त्या गाण्यातील काही जागा तो जरा 'हलक्यानेच' गायला लागतो. हे तुम्हाला कधी जाणवलं आहे का ?
थोडक्यात काय... तर एकच कृती तुम्ही वारंवार करत असाल तर त्या कृतीत एक सफाई येते आणि सफाईदारपणे तीच कृती वारंवार करता करता त्यात शॉर्ट-कट्स येतात.. परिपूर्णता ओलांडल्यानंतर परिपूर्णतेचा आभास येऊ लागतो.
'हिरोईन' पाहिल्यावर दिग्दर्शक मधुर भांडारकर ह्याच आभासापर्यंत पोहोचला आहे, असं जाणवलं. पेज थ्री, कॉर्पोरेट, सत्ता, चांदनी बार, फॅशन सारख्या सिनेमांतून त्या-त्या आयुष्याची, समाजाची गडद बाजू(च) रंगवणारा हा दिग्दर्शक 'हिरोईन'मध्येही चंदेरी दुनियेची गडद बाजू(च) रंगवायचा एक प्रयत्न करतो, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्याच आधीच्या काही सिनेमांची प्रेरणा आणि 'डर्टी पिक्चर'चा प्रभाव दाखवत राहतो.

'माही अरोरा' (करीना) एक प्रस्थापित 'हिरोईन' - अभिनेत्री नव्हे, 'हिरोईन'च. चेन स्मोकर, दारुडी आणि मानसिकरीत्या अस्थिर. माहीच्या सिनेक्षेत्रातील कारकीर्दीमधील उच्चपदापासून उतरणीच्या काळाला चित्रित करणारा हा सिनेमा. अगदी अपेक्षित घटनाक्रमांच्या कमजोर कुबड्यांचा आधार घेत हा प्रवास आपल्यासमोर मांडला जातो. विवाहित, पण घटस्फोट होऊ घातलेल्या एका सुपरस्टारसोबत (आर्यन - अर्जुन रामपाल) प्रेमप्रकरण, त्यांचे शारीरिक संबंध, मग पार्टीतील विक्षिप्त वर्तणूक, नशेतील तमाशे, मग 'ब्रेक-ऑफ', मग आघाडीच्या क्रिकेटपटूशी लफडं, नंतर त्याच्याशी ब्रेक ऑफ, कारकीर्दीची घसरण, इतर सहकलाकारांशी रस्सीखेच आणि एकमेकांवर कुघोडी करण्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत खाली उतरणं असं सगळं होत होत अखेरीस हा सिनेमा एका अत्यंत अस्वीकारार्ह शेवटाला पोहोचतो, तेव्हा प्रेक्षकाला पावणे तीन तास वाया गेल्याची पक्की पावती मिळते.

सलीम- सुलेमान ह्यापेक्षा वाईट संगीत देऊ शकतील, असं मला तरी वाटत नाही. शीर्षक गीत तर इतकं बंडल आहे की सुरुवातीलाच डोकं फिरावं ! 'धूम'च्या चोरलेल्या धूनवर बेतलेल्या धूनचं बहुचर्चित 'हलकट जवानी' सुद्धा अगदीच पिचकवणी. 'सांईया रे..' हे एकच गाणं त्यातल्या त्यात सुसह्य वाटलं आणि कानांवर अत्याचार झाला नाही.

'दिल तो बच्चा हैं..' डब्ब्यात गेल्यावर कदाचित मुद्दाम आपल्या 'होम पीच'वर येण्याचा मधुर भांडारकरचा हा प्रयत्न त्याच्या दरज्याला अनुरूप वाटतच नाही.

राहता राहिला प्रश्न खुद्द 'हिरोईन'चा. तिच्यावर सारी मदार येते. ह्या व्यक्तिरेखेत मूलभूत असलेल्या हळवेपणामुळे ती बऱ्यापैकी छाप सोडते. पण अधिक विचार केल्यास, करीनाच्या अभिनयात तिच्या धूम्रपान आणि मद्यपानाचा महत्त्वाचा 'रोल' आहे. ते वगळल्यास ती काही विशेष चमक दाखवत नाही. जो काही परिणाम साधला जातो, तो त्या व्यक्तिरेखेमुळे व गेट-अपमुळे, असं मला वाटलं.

कधी कधी अतिविचार केल्यानेसुद्धा काम फिसकटतं, अति-प्रयत्न केल्यानेही नेमका उलट परिणाम साधला जातो, कदाचित तसं काहीसं ह्या 'हिरोईन' चं झालं असावं. ह्यात कुठलाही Casual दृष्टीकोन नसावा असं म्हणून मी माझ्या मनाची समजूत घालून मधुर भांडारकरला क्षमा करतो आणि लौकरात लौकर सावरण्याची शुभेच्छा देतो.

रेटिंग - *१/२
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/heroine-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टायटल आणि फोटो, यावरुन कथेची कल्पना आलीच होती.
या क्षेत्रात करियर करुनही डिग्नीटी संभाळून, इतर क्षेत्रातही भरीव कार्य केलेल्या नर्गिस, वैजयंतीमाला, हेमामालिनी, आशा पारेख, वहिदा रेहमान..... अशा अनेक कलाकार, चित्रपटाचा विषय नाही का होऊ शकत ?

पण अधिक विचार केल्यास, करीनाच्या अभिनयात तिच्या धूम्रपान आणि मद्यपानाचा महत्त्वाचा 'रोल' आहे

जे प्रोमोज दिसताहेत त्यावरुन देहप्रदर्शनाचाही महत्वाचा रोल आहे असे वाटतेय.

कथा काय असणार हे आधीच माहित होते पण सादरीकरणाविषयी थोडीफार उत्सुकता वाटतेय. बघुया, जमतेय का बघायला ते.

याच विषयावर दाक्षिणात्य भाषेतला एक अतिशय सुंदर चित्रपट ब-याच वर्षांपुर्वी दुरदर्शनवर पाहिलेला. त्यातल्या हिरविनीचे नाव भैरवी होते. कोणाला चित्रपटाचे नाव माहित असेल तर सांगा.

ऑस्कर विजयासाठी तडजोडी करणार्‍या अभिनेत्रीच्या जीवनावर एक हॉलीवूडी चित्रपट आला होता . त्यात शेवटी तिने काय काय केले याचे कन्फेशन असते .१९८० च्या दरम्यान. तो कोणता?

तो माहित नाही, पण व्हुपी गोल्डबर्गचा, एकपात्री, टेलिफोन, नावाचा चित्रपट आला होता असे वाचले. मला बघायचा आहे तो. मी त्या चित्रपटाचा उल्लेख, विक्रम गोखले यांच्या एका लेखात वाचला होता.

@रणजित-
रिव्ह्यू लिहायला कोणी प्रायोजक मिळालेत की डोअरकीपरशी दोस्ती आहे बॉस? Wink
इतका झटपट नवा सिनेमा कसा पाहून होतो तुझा दरवेळी?

बाकी आटोपशीर रिव्ह्यू छान.
मधुर भांडारकरकडून अपेक्षा असतात नेहमीच. त्यामुळे सिनेमा नक्की बघंणार.

>>>पण अधिक विचार केल्यास, करीनाच्या अभिनयात तिच्या धूम्रपान आणि मद्यपानाचा महत्त्वाचा 'रोल' >>><<

ह्याचा अर्थ कळला नाही. Sad कोणी प्रकाश टाकेल का?)

ज्ञानेशजी,

>> इतका झटपट नवा सिनेमा कसा पाहून होतो तुझा दरवेळी?<<

'वीकली ऑफ' शुक्रवारी असल्याने मला नवीन सिनेमे बहुतेकवेळा पहिल्या दिवशी पाहाता येतात.. Happy

@झंपी,

>>>पण अधिक विचार केल्यास, करीनाच्या अभिनयात तिच्या धूम्रपान आणि मद्यपानाचा महत्त्वाचा 'रोल' >>><<

ह्याचा अर्थ कळला नाही. कोणी प्रकाश टाकेल का?)

काहीही झालं की ती सिगरेट लाइट करते आणि गटागट बॉटम्स अप नीट पेग मारते... ते केल्यावर मग तिच्या चेहर्‍यावर भाव झळकू लागतात - असा एकंदरीत अनुभव !! Light 1

ओह ओके.
धन्ह्यवाद.

मूवी पुर्ण आपटलाय... फक्त बर्फीचे ५ होते तर दोन शो हिरोइनचे थेटरात एकच दिवस हिरोइनला रीलीज होवून...
डर्टी पिकचर्स वेगळ्या कवरात दिसतोय..

हे विसरून जा रे. आता अय्या बघा. राणी बै आपल्या मराठी साडी अन नथ तन्मणीत जाम गोड दिस्ते आहे.
बर्फी परत बघणे परवडले. करीनाचे उगीचच नखरे फार बोअर करतात. अय्या रिलीज डेट ओक्टोबर १२.

पाहिला नाहि पाहणेहि शक्य नाहि. ३/४ महिन्यात येइलच टिव्हिवर तेव्हा पाहु.
मधुर भांडारकर आता तेच तेच दळण दळायला लागलाय. पहिले एक दोन पिक्चर चांगले होते फक्त.

काहीही झालं की ती सिगरेट लाइट करते आणि गटागट बॉटम्स अप नीट पेग मारते... ते केल्यावर मग तिच्या चेहर्‍यावर भाव झळकू लागतात - असा एकंदरीत अनुभव >>> हे सही आहे Lol

मधुर ला नक्की काय दाखवायचे होते कळत नाही. विषयात तर काही नावीन्य दिसत नाही. करीना ही एक प्रचंड लोकप्रिय हीरॉइन आहे व केवळ ती असल्याने लोक जबरी गर्दी करतील अशा समजातून याचे मार्केटिंग झालेले दिसते.

ज्याच्याबरोबर सुरूवातीला लीडिंग रोल केले त्याच्या आईचा रोल नंतर करावा लागतो व नंतरही तो म्हातारा हीरो तरूणाचे रोल करत राहतो व लोकांनाही ते चालते. हीरॉइनचे लग्न झाल्यावर सहसा तिचे चित्रपट चालत नाहीत. पडद्यावर अंगप्रदर्शन करणार्‍या अभिनेत्रीला लोक प्रत्यक्षातही 'चालू' समजतात. खरे अभिनेत्रीप्रधान चित्रपट भारतात क्वचितच असतात वगैरे या क्षेत्रातील अभिनेत्रींचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एखादी 'हीरॉईन' कशी हाताळते, केवळ व्यसने व लफडी दाखवणे हे खूप स्टीरीओटायपिंग झाले. पण अफेअर्स प्रत्यक्षात करणे व त्याहीपेक्षा चित्रपटप्रसिद्धीसाठी त्याचे होणारे मार्केटिंग हाताळणे, इतर हीरॉइन्समधले राजकारण, स्वतः व्यसने व लफडी यांना बळी न पडता इतरांना पुरून उरणे व योग्य वेळ आल्यावर ग्रेसफुली स्पर्धेतून बाजूला होऊन इतर रोल्स करत राहणे किंवा दुसर्‍या क्षेत्रात जाणे - असे काहींनी यशस्वीरीत्या केलेले असेल. त्याचे काही चित्रण असले असते तर आवडले असते.

आपल्याला सहसा न दिसणारी या अभिनेत्रींच्या जीवनातील 'दुसरी बाजू' दिसायला हवी. चित्रपट बघितल्यावर त्या गोष्टींचा सामना करणार्‍या हीरॉइन्सबद्दल किंवा किमान या चित्रपटातील त्या व्यक्तिरेखेवर एकदम इम्प्रेस होऊन आपण बाहेर पडायला पाहिजे. अशी काहीतरी अपेक्षा होती या विषयावर येणार्‍या चित्रपटाबद्दल.

तर काहीतरी 'हटके' वाटले असते. ती अपेक्षा प्रत्यक्षात जे आहे त्यापेक्षा असंख्य पट जास्त होती असे या परीक्षणावरून दिसते Happy

फॅशन सिनेमातल्या काही गोष्टी जशाच्या तश्या उचलल्यात. करिनाचे काजळभरले डोळे, गे फॅशन डिझायनर्स.... (ही दाखवायलाच हवेत का? किंवा ते गेच असतात हे दाखवण्याचा अट्टहास. एक उर्मट पत्रकार..
मला तर अख्ख्या सिनेमात करिनापेक्षा कुठे कुठे दिव्या दत्ता काकणभर सरस वाटली. तिचे ड्रेसेस आणि जंक ज्वेलरी... आणि तिचं स्वत:ला कॅरी करणं.. अफलातून...

मधुरने निराशा केली खरी. पण हे अगदीच अनपेक्षित होतं, असंही नाही.

पण तरी सिनेम्यातल्या काही (मोजक्याच) चांगल्या गोष्टी लिहायला हव्यात.

१) रणवीर शोरेने केलेला ऑफ बीट फिल्म्स बनवणारा बंगाली दिग्दर्शक. स्वतःच्या कामाबद्दल आत्मविश्वास (आणि शिवाय थोड्या उर्मटपणा आणि सनकीपणाकडे झुकणारा अभिमान) निर्माता, स्टार्स यांच्याशी त्यांची जागा दाखवून देणारं त्याचं वागणं इ. सारं या गुणी कलाकाराने अगदी छोटी भुमिका असूनही भारी दाखवलं आहे.

२) आपण चित्रपटातल्या 'ग्रे शेड्स' असलेल्या भुमिका आता हळुहळू स्वीकारायला सुरूवात केली आहे. पण प्रत्यक्ष जीवनात आपल्या आवडत्या स्टार्सवर अमुकतमुक शिक्के मारायला, त्यांना त्याच रूपात बघायला आपल्याला अजूनही फार आवडतं. उदा. हा रोमँटिक, ही इमोशनल, ती बिनधास्त, हा बाईलवेडा, ही प्रचंड टेलेंटेड, तो खूप परफेक्शनिस्ट, ती आक्रमक अन पझेसिव्ह, ही खूप व्यवहारी, हा दानशूर आणि कनवाळू, ती सनकी, हा चक्रम, ही सतत स्वस्त प्रसिद्धी शोधणारी.. असे अनेक प्रकारचे शिक्के. यांच्या अधलंमधलं किंवा मिक्शर असलेलं रसायन आपण सहज चालवून घेत नाही. तसं रसायन असलं तर कितीही गुणी अभिनेता / अभिनेत्री असूनही आपण त्यांना आपल्या भावविश्वातलं सर्वात वरचं स्थान किंवा सुपरस्टारपद सहसा देत नाही. 'तुझी स्वतःची काहीतरी ठाम आणि पहिल्या क्षणातच समोर येईल, पटकन दिसून येईल- अशी इमेज बनव' असा सल्ला 'हिरॉईन'ला एका जाणत्या आणि हुशार पत्रकाराकडून मिळतो, आणि त्याचे व्यावसायिक परिणामही लगेच दिसतात. हे सारं दाखवलेलं आवडलं.

३) स्टार्सच्या छोट्यामोठ्या गोष्टींपासून ते थेट त्यांचं करियर घडवण्याची / बिघडवण्याची ताकद असलेली सिनेपत्रकाराच्या रूपातली दिव्या दत्ता. आपल्या ताकदीची प्रचंड जाणीव असलेली, प्रत्येक सेकंदाला तो अ‍ॅटिट्युड दाखवणारी ही भुमिका छान जमून आली आहे.

या काही ठिकाणी 'मधुर भांडारकर' टच जरूर जाणवला.

आपल्याला सहसा न दिसणारी या अभिनेत्रींच्या जीवनातील 'दुसरी बाजू' दिसायला हवी >>> हा विचार मधुरने केला नसेल असं वाटत नाही. पण मग एकंदर प्रकरण फारच सामान्य आणि चकचकाट नसलेलं होऊन जाईल, अशी सार्थ भिती वाटली असावी. 'अशा' पद्धतीने स्टिरिओटाईप व्हायचं, ते 'तशा' पद्धतीने होऊ या- असा शेवटी व्यावहारिक निर्णय घेतला गेला असावा. रिलेशनशिप्सचा घोळ, दारू आणि सिगरेट, आयटम साँग, गे पात्रं, समलिंगी प्रकरणं आणि इतर काही गोष्टीही याच व्यवहाराचा विचार करून घुसडल्या असाव्यात. (एकदा तर समलिंगी प्रकरणाचा उपयोग चक्क बोधीवृक्षासारखा केला जातो आणि अचानक ज्ञानप्राप्ती होते, साक्षात्कार वगैरे होतो- असंही आहे. यामागे दिग्दर्शकाची काहीतरी थॉट प्रोसेस नक्की असेल, पण मला ती कळली नाही.)

वर दिनेशदा यांनी म्हटल्याप्रमाणे 'या क्षेत्रात करियर करुनही डिग्नीटी संभाळून, इतर क्षेत्रातही भरीव कार्य केलेल्या' स्टार्सची वगैरे कहाणी दाखवली असती, तर बॉक्स ऑफिसवर ती कितपत अपील झाली असती, ही शंका आहेच- हे एक; आणि शिवाय मधुरला अनेक वर्षे सुपरस्टारपदावर असलेल्या नायिकेपेक्षा जरा अस्थिर, सतत भावनांच्या आहारी जाणार्‍या नायिकेचीच कहाणी मांडायची असेल- हे दुसरं. मधुरच्या आधीच्या सिनेम्यांचा पोत बघता हा दुसरा विषयच त्याला जास्त अपीलींग आणि वास्तव वाटला असावा. पण बॉक्स ऑफिसही अशा कुणाच्या 'वाटण्या'कडे फारसं लक्ष देत नाही; आणि सिनेम्यात गुंतवलेल्या पैशांच्या वसुलीचा प्रश्न उद्भवला, की चकचकाटाचा आणि मेलोड्राम्यांचा मोह शेवटी टळत नाही आणि या दोन्ही गोष्टी पुन्हा सिद्ध झाल्याच.