किल्ली!

Submitted by अमेलिया on 21 September, 2012 - 10:08

आज उशीर झालेला असतो. मी घाई घाईने आवरून निघते. असंख्य वाहनांच्या गर्दीने वाहणारे दहा सिग्नल्स वागविणारा माझा ऑफिसचा रस्ता डोळ्यासमोर दिसू लागतो. आणि ते घडते. माझ्या दुचाकीची किल्ली जागेवर नसते. तिच्या जोडीला सुखाने नांदत असणाऱ्या घराच्या तीन किल्ल्याही गायब असतात मी सगळे घर शोधते. आवरलेल्या-पसरलेल्या गोष्टींची उलथा-पालथ करते. कुठेच ती चिरपरिचित खणखण ऐकू येत नाही.. मग मी माझ्या शत्रूची मदत घ्यायचे ठरवते. काल शेवटची तिला कुठे पहिली होती हे आठवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना अचानक माझ्या वरच्या मजल्यावरचा दिवा पेटतो. काल कारने हिंडत होतो नाही का.. कुलूप लावताना घेतली होती पण तिला बरोबर. मग कदाचित आता ती कारमध्येच पडली असेल कुठेतरी... माझ्या दुसऱ्या शत्रूचे कारस्थान असणार.. अजून काय!

एक तरी क्लू मिळाल्याच्या आनंदात मी घराचा दरवाजा ओढून घेते. हो हो कारची किल्लीही घेतलेली असतेच बरोबर. मग पार्किंग मध्ये जाऊन कारची कसून तपासणी होते. पण तिथेही ती नसतेच. आता मात्र पहिल्या शत्रूने नेहेमीप्रमाणेच दगा दिल्याच्या वैतागात मी असतानाच दुसऱ्या शत्रूचीही चाल यशस्वी झाल्याचे माझ्या लक्षात येते. कारण मी डूप्लिकेट किल्ली घरात आहे हे लक्षात न आल्यामुळे घराला कुलूप लावून खाली आलेली असते. वेळ या सगळ्याची गम्मत बघत पुढे पुढे पळत असतो.

आता काय सगळ्या सिग्नल्सना कारमधून तोंड देत अजून काही मिनिटे उशिरा पोहोचायचे.. पण मग माझ्या दुचाकीची किल्ली? गेली कुठे ती? तिच्याबरोबरच्या त्या घराच्या किल्ल्या? हरवल्या आणि मिळाल्या कोण भामट्याला तर? सहा महिन्यांपूर्वीच घेतलेली माझी होंडाची दुचाकी कोणी नेउही शकतो पळवून. आणि घराच्या किल्ल्या म्हणजे काय कमी जोखमीची गोष्ट आहे का? माझे मन वैरीही चिंतणार नाही ते चिंतू लागते.. आता तसे पहिले तर चोराला कसे कळणार की हीच माझ्या घराची किल्ली आहे ते आणि माझ्या घराचा हा हा पत्ता आहे ते.. पण तरीही. माझ्या त्याच्या किल्ल्यांच्या जुडग्याची मला परोपरीने आठवण होऊ लागते. कारने जाणे वैतागवाणे वाटू लागते. माझी दुचाकी कसे मला गल्ली-बोळातून फटी-फटीतून, खाच-खळग्यातून सफाईदार पणे सुमारे सात ते दहा मिनिटे लवकर पोहोचवत असे याची तीळ तीळ जाणीव होऊन माझे मन कण कण कष्टी होऊ लागते. नवऱ्याला फोन करावा का असा दुबळा विचार मनात येतो. पण तो काय बोलणार हे शब्द न शब्द माहित असल्याने ती गोष्ट टाळलेलीच बरी असा हुशार विचार करून मी शेवटी कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसते.

सिग्नल नंबर तीनवरून वळण घेताना अचानक माझा नंबर एकचा शत्रू माझ्यावर उदार होतो. आणि मला आठवते की काल जेव्हा कर्वे रस्त्यावर गाडी पार्क केली होती तेव्हा खाली उतरताना काहीतरी पडल्याचा खणकन आवाज जरूर आला होता बरे का! तो आवाज आठवायच्या नादात मी एका बुलेटवरच्या हिरोच्या शिव्याही ऐकूनही प्रत्युत्तर न करताच पुढे येते. एरवीचा माझा लढाउ बाणाही माझ्या हरवलेल्या किल्ल्यांमुळे हरवलेला असतो. मी जरा कमी रहदारीची जागा बघून तिथे गाडी बाजूला थांबवते आणि जोरजोरात विचार करू लागते. साऱ्या घटनांच्या पाउलखुणा मला एकच सुचवू लागतात.. काल जेथे रस्त्यावर पार्क केली होतीस कार तिथे चल. तुम्हारी खोयी हुई चीज तुम्हे मिल जाएगी बच्चा..

मग होणाऱ्या उशिराला आणखी संधी द्यायचे ठरवत मी कर्वे रस्त्याच्या दिशेने माझे कार-चक्र फिरवते. दोन जास्तीच्या सिग्नल्सना माझ्या साहचर्याचा लाभ देत मी काल जेथे गाडी पार्क केली होती अशा त्या स्थानी जाऊन पोहोचते. अखंड, अव्याहत वाहनांचा ओघ अंगावर झेलणाऱ्या त्या रस्त्याच्या कडेला मोठ्या कौशल्याने मी माझी चारचाकी उभी करते. येणारा प्रत्येक एसेमेस 'तिचाच' या उत्साहाने बघणाऱ्या नवयुवकाप्रमाणे रस्त्याच्या कडेचा प्रत्येक दगड, गवताचा पुंजका मी अधाशासारखा बघू लागते. तितक्यात जाणवते, मागे उभे राहून कोणीतरी माझ्याकडे बारीक लक्ष ठेवतेय. मी डोळ्याच्या कडेतून हळूच बघते तो एक आजोबा जागेवरच थबकून मी काय करतेय हे उत्सुकतेने बघत असतात. आजोबाच तर आहेत असे म्हणून मी माझा शोध चालू ठेवते. माझी लाडकी किल्ली मला कुठेच दिसत नाही. कुणा चोराने ऑलरेडी ढापलेली आहे हे मनात येऊन मी दुःखी-कष्टी होते. आता जेव्हा नवऱ्याला हे कळेल तेव्हा कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल याच्या कल्पनेने मला माझ्या दोन्ही शत्रूंचा भयंकर राग येऊ लागतो. आणि अचानक डोळ्यांत जमा होणाऱ्या पाण्याच्या थेम्बातून एका कापलेल्या विजेच्या दिव्याच्या पाईपमध्ये ती मला दिसते. माझा क्षणभर विश्वासच बसत नाही.

तिथेच एक शीळ मारत मी त्या पायपात हात घालते. थोड्याफार प्रयत्नांनंतर माझी सखी माझ्या हातात विसावलेली असते. माझे सगळे अंदाज बरोबर ठरलेले असतात. माझ्या नंबर एकच्या शत्रूने माझी साथ दिलेली असते. माझ्या दोन्ही शत्रूंच्या कारस्थानामुळे होऊ घातलेली माझी बदनामी टळलेली असते. म्या लयीच खुश होते. आणि रस्त्यातच एक उडी मारून 'येस्स' म्हणते. तितक्यात लक्षात येतं, अजूनही ते आजोबा माझ्याकडेच बघत असतात. पण आता मात्र त्यांच्याही चेहेऱ्यावर हसू उमटलेलं असतं. मी त्यांना हात उंचावून किल्ल्यांचा जुडगा दाखवते आणि खुणेनेच सांगायचा प्रयत्न करते की इथे पडला होता हो माझ्या ... मुळे. त्यांना समजले की नाही कळत नाही पण मी कार मध्ये बसेपर्यंत ते तसेच माझ्याकडे बघत उभे राहतात. पुढे जाताना त्यांना हात करावा म्हणून मी डावीकडे बघते तो मला दिसते की ते हळूच आपले डोळे टिपत आहेत. तेवढ्यात मागचा बाईकवाला ओरडायला लागतो म्हणून मी पुढचा गिअर टाकते आणि त्या प्रवाहात ओढली जाते.

किल्ली मिळाल्याच्या आनंदात मी रहदारीचे नियम मोडणाऱ्या कुठल्याही रेसवाल्याला एकदाही शिवी न देता गुणगुणत ऑफिसला पोहोचते. आणि अचानक मला जाणवते... ही किल्ली इतकी सुरक्षित राहावी, कोणा येणाऱ्या-जाणाऱ्याच्या नजरेला पडू नये आणि मालकाला आठवण झालीच तर त्याला ती परत मिळावी म्हणून कोणी मुद्दामच त्या पायपात तर टाकून ठेवली नसेल ना? मला किल्ली मिळाल्यावर आजोबांच्या डोळ्यांत पाणी का आले असावे हे मला आता लख्ख जाणवते.
त्यांना थँक यू म्हणायला हवे होते, नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं लिहीलयं!......... माझी पण त्यादिवशी किल्ली हरवली ..आणि आता रोज नवरा मी किति वेंधली आहे हे एकून दाखवतो.....

अरे!! अचानक एवढे प्रतिसाद!! आर. के., माझी ही किल्ली शोधलीस त्याबद्दल खूप धन्यवाद! Happy
तुम्हां सर्वांचेच वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप आभार! Happy

छान लेख.
मला वाटतंय की उडी मारून येस्स आणि लांबून दाखवलेली किल्ली यातून त्यांना थँकयू पोचले असणार.

Pages