ईश्वराची नसे दिरंगाई

Submitted by जयन्ता५२ on 20 September, 2012 - 10:39

ईश्वराची नसे दिरंगाई
प्रार्थनांना अवाजवी घाई

काल थेंबा विना दिवस गेला
आजचा हा प्रलय अजब भरपाई

जन्म गेला तिला विनवतांना
संमतीची तरी अपूर्वाई !

मोडला तो करार दोघांनी
वाळण्याचे बघेल ती शाई!

पर्वताला कुणी तरी सांगा
काल होतास एवढी राई

----- ---------------------- जयन्ता५२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयन्ता!
छान वाटली तुझी ही गझल! वृत्त जरा कठीण वाटले.
वृत्तावरील पकड अजून घट्ट व्हायला हवी.
खयाल ठीक वाटले.
अभिव्यक्ती अजून सशक्त करता यावी.
आता शेरनिहाय माझे निरिक्षण नोंदवतो.............

शेर नंबर १...........
ईश्वराची नसे दिरंगाई...............मिसरा सुलभ नाही वाटला. अजून सफईदार यायला हवा.

शेर नंबर २..........

सानी मिस-यात वृत्तदोष खटकतो. २ मात्रा जास्त झाल्या आहेत.

शेर नंबर ३...........

खयाल छान, पण शेर अजून सोपा, थेट व नि:संदिग्ध करता यावा.

शेर नंबर ४...............

वाळण्याचे बघेल ती शाई..........अर्थ पोचत नाही.

शेर नंबर ५.............

खयाल ठीक, अभिव्यक्ती जरा बदलावीशी वाटली.

वर दिलेल्या शेरनिहाय स्पष्टीकरणानुसार, मी तुझी ही गझल अशी वाचली...........

देव नाही करत दिरंगाई!
प्रार्थनांना अवाजवी घाई!!

काल दुष्काळ येउनी गेला....
प्रलय देणार काय भरपाई?

भांडलो कैकदा कडाक्याने;
भांडणाची तरी अपूर्वाई!

मोडला तो करार दोघांनी
वाळण्याच्याच आत ती शाई!

पर्वताला कधी कळायाचे?
काल तोही दिसायचा राई!

..............प्रा.सतीश देवपूरकर

प्रोफेसर साहेब,

तुमचा पहिला व चौथा पर्याय मस्त आहे.

जयन्तराव,

'आजचा हा प्रलय अजब भरपाई' यातील 'हा' हे अक्षर काढल्यास वृत्तात बसेल

गझल आवडली, सर्वच शेर आवडले. छान गझल!

-'बेफिकीर'!

जयन्ता!<<< Biggrin

छान वाटली तुझी ही गझल! <<< Biggrin

वृत्त जरा कठीण वाटले.<<< प्रोफेसर साहेब, लज्जित्ता वृत्त आहे, अक्षरगणवृत्त आहे हे! Uhoh

वृत्तावरील पकड अजून घट्ट व्हायला हवी.<< हा प्रलय, यातील वृत्तभंग सोडल्यास असहमत!

खयाल ठीक वाटले.<<< Uhoh चांगली गझल आहे ही, 'ठीक' काय?

धन्यवाद

-'बेफिकीर'!

चांगलीच...

प्रलयाचा शेर मस्त

मोडला तो करार दोघांनी
वाळण्याचे बघेल ती शाई!.. हा शेरही मला खूप आवडला

जयंतजी,
सुंदर गझल...

जन्म गेला तिला विनवतांना
संमतीची तरी अपूर्वाई !
व्वा..क्या बात है...
बाकी शेरही मस्त आहेत..
शुभेच्छा..

मला असे वाटते की 'प्रलय' हा शब्द ल-गा असाच उच्चारला जातो. त्याचे गा-ल उच्चारण अशक्य वाटते. (प्रोफेसरांचा पर्यायी शेरही त्यामुळेच गंडला आहे.) त्यामुळे नुसता 'हा' काढून जमणार नाही. लय जाईल.

मग आता-
१) 'आजचा हा प्रलय' ही शब्दरचना बदलायची नाही. (किंवा प्रलयचा गा-ल होऊ द्यायचा नाही.)
२) 'भरपाई' शब्द आवश्यक आहे आणि शेवटचे तीन गुरू त्याने ऑक्युपाय केले आहेत.

अशा परिस्थितीत फक्त एका लघुसाठी जागा उरते.
माबोवरचा कुठला सिद्धहस्त गझलकार वरील अटी पाळून हा मिसरा नव्याने लिहून लज्जिताची लाज राखेल? Happy
चालवा पाहू आपापली डोकी !

---------------------------

अवांतर- 'वाळण्याचे बघेल ती शाई' मधली मजा प्रोफेसरांनी कंप्लिटली मिस केली आहे.

सतिशजी,बेफि,ज्ञानेश,रसप
प्रतिसाद, चर्चा व मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार!
लज्जिता वृत्ता प्रमाणे 'हा' ची गरज नाही.
गा ल गा गा | ल गा | ल गा गा गा
आज चा प्रल | य अज | ब भर पा ई
किंवा
आजचा प्रलय क्रूर भरपाई

असेही चालेल.

सतिशजी,
या एका ओळीशिवाय वृत्तभंग झाला आहे असे वाटत नाही. आपल्या सूचना स्वागतार्ह! असाच लोभ ठेवा.

जयन्ता५२

देव* नाही करत दिरंगाई!
'पर्यायी'ची अवाजवी घाई!!

- असा एक मतला घेता येऊ शकेल का ?

(* इथे 'देव' वर श्लेष आहे.)

माफ करा मला वृत्ते त्यान्ची नावे लगावल्या यतिस्थाने नेमकी माहीत नसतात ..........त्यातही लज्जिता बद्दल काहीच माहीती नाही

काही वैयक्तिक मते ............

हे वृत्त मराठीत आभावानेच / रेअरली वापरण्यात येत असावे बहुधा त्यामुळे तशी सवयही नाहीये कानाला म्हणूनही मला असे वाटत असावे की यात मनाला जो आल्हाद मिळायला हवा जे लयी व छन्दान्चे मेन काम आहे ते साधले जात नाहीये

आता हे वृत्त इथे जसे हाताळ्ले आहे त्यात यतिभन्ग अनेक आहेत गा ऐवजी लल असे बदलही अनेक आहेत हे ही कानाला खटकण्याचे कारण असेल

प्रलय या शब्दाच्या आपण ३ मात्रा मोजत आहोत प्रल+य/ प्र+लय ...मुळात सन्स्कृतानुसार (तत्सम शब्द आहे हा !!) यात १(+१/२)+१+ १ =३+१/२ ;साडेतीन मात्रा आहेत यातल्या १/२ मात्रेचा हिशेब जास्त होतो अन इथे तो ज्या जागी वापरलाय त्या जागी हा 'ल -गा' चा घोळ शेवट्पर्यन्त अन् कानला खटकत राहतोच

ज्ञानेशजींनी लावलेल्या सर्व अटी पाळायच्या तर जेमतेम एका मात्रेला जागा उरते जिथे भरीचा शब्द वापरायचा तरी किमान २ मात्रा हव्यात

आजचा हा / प्रलय/ (1 मात्रा) भरपाई
गालगागा / लगा / गालगागा

प्रलय =प्रल+य =गा+ ल धरल्यास प्रा. साहेबांचीच ओळ परफेक्ट मानावी लागेल
(प्रलय हा शब्द गा +ल असा वाचावा व त्याची मूळ ओळीतली जागाही बदलावी हे प्रा. साहेबानी बरोबर ताडले आहे असॅ म्हणायला हरकत नाही )ब

बेफीजी म्हणाले तसे केवळ "हा" काढून वृत्तात बसते आहेच जयन्ताजीनी तसे त्यान्च्या प्रतिसादात लिहूनही दाखवलेय तेही बरोबरच आहे !!

एकुणात काय तर.....
१) त्या एकाच मूळ ओळीत जयान्ताजी हे साफ गंडलेत हे नक्की !!
२)ज्ञानेशाजीनी निदान एखादीतरी अट शिथिल करायला हवी

असो
मी आपले सुचेल ते लिहिले आहे त्यात तथ्य नसेल तर सोडून द्यावे ही विनन्ती

जयन्तराव, तुमची गझल उत्तमच आहे. 'लज्जिता-लाज' वाले ते विधान निव्वळ शाब्दिक कोटी करण्याच्या उद्देशाने(मोहाने) लिहिले गेले आहे. त्यात तुमच्या ओळीला कमी लेखण्याचा हेतू नाही. कृपया गैरसमज नसावा.
(या वृत्ताला 'लज्जिता' असे नाव आहे हेसुद्धा मला ठाऊक नव्हते. बेफिकीर यांच्या प्रतिसादामुळेच कळले.)

अवांतर- शब्दांच्या उच्चारानुसार- म्हणजे आपण बोलतांना कुठे वजन देतो त्यानुसार गण विचारात घ्यावेत, केवळ मात्रांची संख्या मोजू नये हा विचार आपणास पटतो का? माझ्या मते 'प्रलय' या शब्दाचे उच्चारानुसार ल-गा असेच गण होतील. गा-ल संभवत नाही. तुमचे मत काय?

ज्ञानेशजी नमस्ते

मराठीत नाहीत मोजत संस्कृतात अशा अर्ध्या पाव मात्रा असतात असे ऐकून आहे माझा त्यात तितका अभ्यास नाही

आता प्रलय शब्द उच्चारताना प्र+लय असा उच्चारतो आपण हे बरोबर आहे
मात्रा मोजताना १+(१+१) =३ धरतो

उच्चार करताना कितीही म्हटले तरी प्र अन प याना लागणारा वेळ समान नाहीये अंशभर जास्तच वेळ लागतो आपल्याला प्र म्हणताना पण मात्रा १ किंवा २ अशा मोजायाच्यात म्हणून आपण प्र ला १ मात्रा देतो आता १ च का देतो २ का नाही .......!!

बाजारात ५० पैसे चालतात २५ पैसे नाहीत .मग एखाद्या वस्तूचे देयमूल्य ३रु ७५ पैसे असेल तर आपण ४ रु मोजतो कि नै..... तशा प्रकारचा आहे हा हिशेब !!

प्र ला प पेक्षा जरा जरा जास्त वेळ लागला तरी आपण २ मात्रा न धरता १ मात्रा धरतो ही मराठी व्यवहाराची रीत असावी बहुधा (आतबट्ट्याचा व्यवहार!!)

त्याची आपण मात्रा मोजताना सवय लावली तरी जीभ कान याना ती भाषा समजत नाहीच ना ते बिचारे म्हणणार की बुवा आम्हाला काहीतरी खटकते आहे म्हणून

असो
आपणास माझे मत जाणून घ्यावेसे वाटले त्याबद्दल धन्यवाद ज्ञानेशजी !!

मी पूर्वी एकदा मायबोलीवर विचारपूस मधे एम्. कर्णिक काकाना प्रश्न विचारला होता त्यानी मला त्याना उपलब्ध असलेली माहिती सान्गीतली होती ती अशी होती .................................
___________________________________________

एम.कर्णिक
25 January, 2012 - 05:08
वैभवराव,
धन्यवाद.
सुभाषितांचे मराठीकरण करताना मी ती गण, मात्रा इत्यादींच्या संदर्भात अगदी तंत्रशुद्ध असावीत असा आग्रह ठेवला नाही. ती शक्य तितक्या सोप्या शब्दात असावीत आणि उच्चारायला सोपी जावीत हेच उद्दिष्ट ठेवले. संस्कृतमधल्या संधियुक्त शब्दांना मराठीत तितक्याच अक्ष्रारांच्या शब्दांचा पर्याय उपलब्ध असेलच असे नाही त्यामुळे गण, मात्रा, अक्षरे यांची बंधने थोडीफार सोयीनुसार शिथिल करून रचना कराव्या लागल्या आहेत.

आपला दुसरा प्रश्न जो संस्कृत वृत्तांतील मात्रांबाबतचा आहे त्याबद्दल. माझा यात सखोल अभ्यास नाही. मला माहिती असलेली मात्रांची परिमाणे द्रुत, लघु, गुरु आणि प्लुत अशी आहेत. द्रुत म्हणजे अर्धा लघु आणि प्लुत म्हणजे तीनपट लघु अर्थात सहा द्रुत.
१ द्रुत – अर्ध हस्व, उदाहरणार्थ – म्
१ लघु = २ द्रुत, - हस्व उदा. - म
१ गुरु = २ लघु = ४ द्रुत – दीर्घ – उदा. - मा
१ प्लुत = ३ लघु = ६ द्रुत – पुढे ओढलेले – उदा. - माऽऽ
मात्रांच्या भाषेत म्हणायचे झाले तर माझा ’तर्क’ असा की द्रुत म्हणजे अर्धी मात्रा, लघु म्हणजे एक मात्रा, गुरु म्हणजे दोन मात्रा आणि प्लुत म्हणजे तीन मात्रा. परंतु साधारणपणे जी वृत्ते भर्तृहरीने संस्कृत सुभाषितांसाठी वापरली आहेत ती उपेंद्रवज्रा, वसंततिलका, मालिनी, शिखरिणी, मंदाक्रांता, शार्दुलविक्रीडित, स्रग्धरा आणि काही इतर.

मला माहीत आहे की याने तुमच्या शंकेचे पूर्ण समाधान होत नाही. उपलब्ध असेल तर केदारपंडिताचा वृत्तरत्नाकर हा ग्रंथ मिळवून वाचा. मीही त्याच्या शोधात आहे.
पुन: एकदा मनःपूर्वक धन्यवाद.

______________________________________________

-------
------

धन्यवाद !!
-वैवकु

गझल 'मराठी' असल्याने संस्कृताचे नियम लावणे अनुचित वाटते.
मराठीत अर्धा मात्रा नसते.

माझ्या मते -

प्र ल य = १ १ १ = ३

उच्चारानुरूप ल +ल = गा करणे, हे मलाही पटते. त्या दृष्टीने "प्रलय = ल गा" अधिक समर्पक वाटतं.

सिरियस चर्चा अपेक्षित असल्यासः

===========================

मागे सुरेश भट या संकेतस्थळावर एक चर्चा झाली होती. त्यात माझे व ज्ञानेशचे जोरदार संवादही होते. पण तिची लिंक येथे देण्याचे कारण हे की ती चर्चा नेमकी याच वृत्ताबाबत ('लज्जिता डबल'- एकाच ओळीत दोन वेळा लज्जिता वृत्त) झाली होती व त्या चर्चेतही शब्दाचे नैसर्गीक वजन हा मुद्दा निघाला होता.

ती चर्चा येथे झाली होती.

त्यानंतर तेथील सर्वच गझलकार त्यावेळेसपेक्षा अधिक अनुभवी झाले, त्यांच्या गझलेत अधिक दर्द येऊ लागला. ज्ञानेश तेव्हाही आधीच एक सेलिब्रेटेड व गंभीर आणि परिपक्व गझलकार होता.

आता अश्या चर्चा फारश्या होत नाहीत. मायबोलीवर आजकाल अभिव्यक्तीवर अतिक्रमण अधिक होते. त्यामुळे मूळ गझलकार हतोत्साहीत होतो व गप्प बसू लागतो.

मात्र येथे शब्दाच्या नैसर्गीक वजनाचा मुद्दा निघालेला आहे. ही बाब चर्चा करण्यास पात्र आहे.

त्यावर माझे मतः

प्रत्येक शब्दाला नैसर्गीक उच्चाराप्रमाणे एक लगावलीचे वजन असते हे मान्यच. तसेच, गझलेमध्ये सुलभता, सीमलेस लय यामुळे आकर्षकता येते हेही मान्यच!

परंतु, शब्दांच्या या नैसर्गीक वजनाचा विचार करून गझल लिहिणे ही अट अधिक महत्वाची होणे तितकेसे पटत नाही.

(वैवकु यांनी म्हंटल्याप्रमाणे - संस्कृतमध्ये तसा नियम असल्यास माहीतही नाही, पण रसप यांच्या मताप्रमाणेच माझेही मत आहे की मराठी गझल लेखनाला संस्कृतचे नियम लावले जाऊ नयेत).

(खुद्द मराठीतही हा विचार, ही नैसर्गीक वजनाची अट, हे पाळून अनेक गझला, कविता झाल्याही असतील. पण ती अट खासकरून पाळणे हे बंधन गझल लेखनावर कवीने घालून घेऊ नये असे म्हणायचे आहे).

प्रलय या व अश्यासारख्या शब्दांमध्ये मात्र 'ती अट पाळली न गेल्याचे' खासकरून जाणवते हे खरेच. तसेच 'अजब' या शब्दाबाबतही जाणवते.

प्रलय व पूर या दोन शब्दांमध्ये प्रलय अधिक काव्यात्म शब्द आहे व पूर हा काहीवेळा तितकासा हानी न पोहोचवणारा असू शकला तरी प्रलय हा जीवितहानी व एकंदरच सृष्टीस हानी पोहोचवणारा या अर्थाने वापरला गेलेला शब्द आहे. त्यामुळे प्रलय या शब्दाला पूर हा शब्द नेमका पर्याय होऊ शकत नाही, असे म्हणता येईल. पण ज्या प्रकारे शेर बांधला गेला आहे, त्यात 'थेंबाविना' या शब्दाच्या विपरीत परिस्थिती 'पूर' या शब्दानेही कथित होईल असे मला तरी वाटते. (म्हणजे प्रलय हा शब्द नेमका व जोरकस आशयाचा आहे हे पटतेच, पण शेरात अभिव्यक्त झालेल्या खयालात पूर हा शब्दही आशयाला दिशाहीन करणार नाही असे वाटते). (अर्थात, पर्यायी शब्द या विषयावर चर्चाच नाही आहे हे कबूल, पण एकंदरच प्रलय या शब्दाच्या अस्तित्वाबाबत विचार चाललेला असल्याने असे म्हणत आहे).

(एक अवांतर - थेंबा आणि विना हे दोन शब्द वेगवेगळे लिहिणे गैर आहे असे माझे मत! तो एक शब्द म्हणून लिहिला जायला हवा असे वाटते).

त्यामुळे:

काल थेंबाविना दिवस गेला
आजचा पूर क्रूर भरपाई

असा शेर फारसा वेगळा होणार नाही असे वाटते. पण पूर आणि क्रूर हे दोन्ही शब्द ध्वनीसाधर्म्याचे व 'र' या अक्षरानेच अंत होणारे असल्याने ओळ उच्चारताना जीभ अडखळणार हे नक्की. त्यात पुन्हा भरपाई या शब्दातही 'र' आहेच आणि वर क्रूर मधील 'क्रू' या अक्षरातही तो अर्धा आहे. त्यामुळे 'एक अक्षर मग र' पुन्हा 'एक अक्षर आणि र' असे होत राहिल्याने सुलभता कमी होईल.

आजचा पूर खिन्न भरपाई - ही ओळ गैर ठरेल कारण भरपाई 'क्रूर' आहे व त्यामुळे मनाला खिन्नता आली आहे, भरपाईचे विशेषण खिन्न असू शकत नाही. (पण खिन्न या शब्दामुळे ओळ उच्चारायला सुलभ होईल. पण शेवटी आशयाची अचूकता सर्वाधिक प्राधान्याची).

आजचा पूर हीच भरपाई - यात 'हीच' भरीचा वाटेल, ठरेल.

मग आता 'आजचा' हा शब्द हवाच आहे का? तर 'काल' या पहिल्या ओळीतल्या शब्दामुळे रसिकाच्या व खुद्द कवीच्याही कर्णेंद्रियाला तो अपेक्षित असतो व त्याचा विचार गझलकार नकळतपणे गझल लेखन करताना करतो.

'आज प्रलयामधून भरपाई' अशी ओळ केल्यास शब्दांची नैसर्गीक वजने सांभाळली जातील असे वाटते कारण प्रलय या शब्दाचा वापर लगा किंवा गाल असा न होता 'गागा' असा होईल असे माझे मत! (म्हणजे इन फॅक्ट 'ललगा' असाच होईल, ज्यात नैसर्गीक वजन सांभाळाले जाईल).

पण मग या ओळीत 'अजब' हा शब्द येणार नाही. पण बहुतेक, अजबची गरजही उरणार नाही असे वैयक्तीक मत आहे.

ज्ञानेश यांनी म्हंटल्याप्रमाणे जर बंदिस्त ओळ करायची झाली तर:

आजचा हा प्रलय व भरपाई - अशी एक ओळ होईल, पण ती व्याकरणदृष्ट्या अपुरी ठरेल. म्हणजे 'व भरपाई' काय? भरपाई झाली, की प्रलय आणि भरपाई अश्या दोन्ही गोष्टी झाल्या वगैरे प्रश्न मनातल्या मनात उमटतील.

मला वाटते मराठीत असे अक्षर / व्यंजन नसावे की जे 'व' या अक्षराप्रमाणे तेथे अर्थपूर्णरीत्या वापरता येईल.

म्हणजे 'ग' व 'र' वापरल्यासः

आजचा हा प्रलय ग भरपाई - यात कोणा स्त्रीला हे सांगण्यात येत आहे असे व 'र भरपाई' हे ग्रामीण बाजाचे व हझलीश होईल.

'न' हे अक्षर काही प्रमाणात लागू होऊ शकेलही. 'आजचा हा प्रलय न भरपाई'! पण मग शेर सपाट होईल.

'च' हे अक्षर वापरल्यास ते प्रलय या शब्दाला जोडून घ्यावे लागेल. मग पुन्हा 'प्रलयच' या शब्दामुळे नैसर्गीक वजन अधिकच बिघडेल.

एकंदर, 'अजब' हा शब्द काढल्यास नैसर्गीक वजनात इतर शब्द 'शेराचा अर्थ फारसा न बदलवता' बसवता येतील असे वाटते.

इत्यादी!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

एकंदर, 'अजब' हा शब्द काढल्यास नैसर्गीक वजनात इतर शब्द 'शेराचा अर्थ फारसा न बदलवता' बसवता येतील असे वाटते.

सहमत आहे.

पूर हाच पर्याय मलाही योग्य वाटत आहे.

प्रलय हा शब्द 'थेंबाविना' ला जस्टीफाय करत नाही असे वाटते. कारण 'थेंबाविना'मध्ये तितकी आर्तता किंवा तितके कारूण्य नाही असे माझे मत. त्यामुळे पहिल्या मिसर्‍याला न्याय देताना 'प्रलय' हा शब्द वापरलाच न गेल्यास काही विशेष बिघडत नसावे.

अर्थात गझलकाराच्या मनातल्या शब्दयोजनेचा नितांत आदर आहेच.

Pages