निर्माण निर्मात्याचे

Submitted by चैतन्य दीक्षित on 19 September, 2012 - 13:24

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !
प्रत्येक वर्षी नवीन वर्षाचे कॅलेंडर घेतले की सगळ्यात पहिल्यांदा 'गणपती कधी?' हीच तारीख पाहतो. बहुतेक सगळ्यांचेच असे असावे. आहेच गणेशोत्सव सगळ्यांच्या अगदी जवळचा. माझ्यासाठी गणेशोत्सव खूप म्हणजे जवळचा! याचं कारण अर्थात् बाप्पांवरची श्रद्धा !अजून एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे, त्यांच्याच कृपेनं दरवर्षी मला गणपतीची मूर्ती करता येते. मी आठवीत असल्यापासून घरीच गणपतीची मूर्ती तयार करू लागलो.
आज चौदा वर्षे झाली, दर वर्षी न चुकता बाप्पा ही सेवा करवून घेतात. असो, नमनाला घडाभर तेल नको!
ह्या लेखाचं प्रयोजन म्हणजे, जे कुणी घरीच गणपतीची मूर्ती करू इच्छितात त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे काही मदत होईल अशा 'टिप्स' देणे आणि ह्या वर्षीच्या आमच्या बाप्पांची निर्मिती तुम्हा सगळ्यांना दाखवणे हे आहे.
सगळ्याच 'स्टेप्स' चे फोटो घेता आले नाहीत, पण जेवढे फोटो घेऊ शकलो तेवढय फोटोंच्या सहाय्याने लेख लिहितोय. चौदा वर्षे झाली असली तरीही 'मूर्तिकामाच्या' दृष्टीने सुधारणेला बराच वाव आहे. त्यामुळे काही सूचना असतील तर नक्कीच कळवा.
साहित्य- शाडूची माती (सपिटाच्या चाळणीने चाळून घ्यावी, नाहीतर अगदी बारीक खडे असण्याची शक्यता असते. मूर्तीचे फिनिशिंग करताना ते खडे वर येऊन, फिनिशिंग करणे अवघड होऊ शकते.), लाकडी पाट/ जाड प्लायवूडचा तुकडा, फिनिशिंगसाठी हॅक्सॉ ब्लेड, पोस्टर कलर, गोल्डन कलरची पूड, वॉर्निश (गोल्डन कलरसाठीच), देवाचे सोवळे रंगवण्यासाठी हवा असल्यास मोतिया रंग/ अ‍ॅक्रेलिक कलर.

माती व्यवस्थित मळून घेऊन हात धुवून कोरडे करावेत. कोरड्या हाताने मळलेली माती हातात घेऊन पाहावी.
हाताला चिकटत नसेल किंवा कमीत कमी चिकटत असेल, तर माती नीट मळली गेली असे समजावे.
पहिल्यांदाच मूर्ती तयार करणार असाल तर पूर्ण मूर्ती भरीव करावी आणि शक्यतो लहान मूर्ती करावी.
मी पोकळ मूर्ती तयार करतो. पोकळ मूर्ती तयार करताना ती नीट होईल ना? मधेच कोसळणार नाही ना? अशी काळजी वाटू शकते. त्यासाठी काशा (पूर्वी सोफ्यात असायचा) किंवा नारळाच्या शेंड्यांवर शाडूची कालवलेली माती लावून लहान भाकर्‍या तयार करून, आतून सपोर्टसाठी लावल्या की काळजी नाही! मी १-२ वर्षे असं केलं होतं, नंतर तेवढी गरज वाटली नाही.

पाट- लाकडी पाटावर प्रथम शाडूच्या मातीचा पाट तयार करायचा आहे. मातीच्या पाटाची बॉर्डर आखून घ्यावी. खालील फोटो पाहा.
From Bappa

पाट पूर्ण भरीव करायचा तर शाडूची माती खूप वापरावी लागते आणि मूर्तीही जड होते. त्यासाठी खालच्या फोटोप्रमाणे शाडूच्या मातीच्या पट्ट्या पाटाच्या चौकटीत लावल्या तर कमी मातीत पाट पूर्ण होऊ शकतो.
मी अशा पट्ट्या लावून, मधल्या पोकळीत वर्तमानपत्राचे बोळे लावतो. वर्तमानपत्र पूर्ण उघडून पाण्यात बुडवतो.
पेपरमध्ये पाणी शोषलं गेलंय हे पाहून त्याचा बोळा करतो, असे बोळे त्या चौकटीत लावतो. आणि नंतर त्यावर शाडूच्या मातीचे चपटे गोल तयार करून पाटाची वरची बाजू तयार करतो.

From Bappa

From Bappa

मूर्ती-

मूर्ती कशा प्रकारची करायची ह्यावर पुढची स्टेप अवलंबून आहे.
उदा. कमळात बसलेला गणपती करायचा असेल तर आधी कमळ तयार करायला हवे.
कमळ पाटापासून थोडे उंच करायचे असल्यास पाट सपाट न करता, मध्यभागी वर्तमानपत्र ओले करून त्याचे बोळे लावून थोडा उंचवटा तयार करायचा आणि त्याला आधी वरून शाडूची माती फासून घ्यायची. नंतर पाकळ्या वगैरे डिझाईन करता येते आणि अजून एक फायदा म्हणजे शाडू वाळला तरीही पाटापासून कमळ सुटे होणार नाही.
मी ह्या वर्षी 'सतार वाजवणारे बाप्पा' तयार करायचे ठरवले होते. माझी पत्नी सतार शिकत असल्याने सतार कशी असते? ती वाजवताना वादक कशा प्रकारे बसतो ह्याची मला पूर्ण कल्पना होती. तरीही इंटरनेटवर सतारवादकांचे फोटोही मी पाहिले हाताची आणि पायाची ठेवण कशी असावी ह्याची नीट कल्पना आल्यावर बाप्पांची 'बैठक' करायला घेतली. शाडूची माती चिकट असल्याने हवी तशी वळवता येते. पाय करण्यासाठी आधी पायाचा आकार लक्षात घेऊन तेवढ्या प्रमाणात मोठा चपटा गोल तयार करून, त्याची वळकटी केली (पोळी गुंडाळतो तशी) पाय गुडघ्यात दुमडला जातो त्यामुळे गुडघ्यापासून पावलापर्यंतच्या भागासाठी एक वळकटी, गुडघ्यापासून मांडी/कमरेपर्यंतच्या भागासाठी अजून एक वळकटी ह्या हिशोबाने एकूण ४ वळकट्या तयार करून घेतल्या आणि बैठकीच्या अनुषंगाने त्या एकमेकींना जोडल्या. जिथे जोड येतो तिथे शाडूची अजून एक चपटी पट्टी लावून जोडल्या जाणार्‍या दोन्ही वळकट्यांमध्ये शाडू मिसळून घेतला. शाडू मिसळून घेण्यासाठी हॅक्सॉ ब्लेडच्या काटेरी बाजूचा वापर केला. त्याने शाडूची माती नीट मिसळला जाऊन जोड पक्का होतो. ब्लेडच्या काटेरी बाजूने शाडू मिसळल्याने वरच्या बाजूला खूप खडबडीत दिसते ते ब्लेडच्या सपाट बाजूने पुन्हा सपाट करून घेतले. सतारवादकांच्या बैठकीला अनुसरून खालील फोटोप्रमाणे बैठक केली. जोडलेल्या २ पायांच्या ४ वळकट्यांना जोडून कमरेचा मागचा भागही जोडला (दुसरा फोटो)

(बैठक-१)
From Bappa

(बैठक २)
From Bappa

पायांवर देवाचे सोवळे/पितांबर येणार असल्याने आत्ता थोडं ओबड-धोबड वाटत असलं तरी हरकत नाही.
पायांचा ढोबळ आकार तयार झाल्यावर सोवळे तयार केले. सोवळ्याचा घोळदारपणा दाखवण्यासाठी आधी अशा पट्ट्या जोडल्या आणि ब्लेडने त्याही मूळ आकारात मिसळल्या.
(सोवळे- १)
From Bappa

(सोवळे-२)
From Bappa

पाऊल-
पाउले करतानाही बैठक कशी आहे ह्याचा विचार करणे महत्वाचे असते. पाऊल करताना सुरुवातीला बोटे सोडून असलेला पावलाचा भाग तयार केला. आणि मग पायांच्या बोटांच्या आकाराचे शाडूचे गोळे करून ब्लेडच्या टोकाने ते त्या आकारात मिक्स केले.
(पाऊल-१)
From Bappa

(पाऊल-२)
From Bappa

(पाऊल-३)
From Bappa

नंतर पोट तयार करायला सुरुवात केली. खालच्या फोटोत पोट थोडे आकाराने मोठे वाटेल, परंतु नंतर छातीचा भात तयार करताना ते कमी केले.
From Bappa

छाती आणि खांद्याचा भाग तयार करताना वरच्या फोटोतले पोट उंचीने थोडे कमी केले आणि बनियनला असतात तशा प्रकारे दोन पट्ट्या (रुंदीला जास्त) तयार करून त्या पोटाच्या भागाला जोडल्या. पुन्हा ब्लेडने शाडू नीट मिसळून घेतला. आणि नंतर त्या पट्ट्यांना पुढे आणि मागे आडव्या पट्ट्या लावून पाठीचा आणि छातीचा भाग तयार केला. (बनियनसारख्या केलेल्या दोन पट्ट्यातली गॅप पुढून आणि मागून भरून काढली.)
खालच्या फोटोत ह्याची थोडी-बहुत कल्पना येईल. (सतार तयार करून लावली असल्याने पूर्णपणे दिसत नाहिये)

From Bappa

आता छातीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हात तयार करण्यासाठी (पाय तयार करताना केल्या होत्या तशाच पण आकाराने जरा लहान) वळकट्या तयार करून जोडल्या. दोन हातांसाठी चार वळकट्या तयार केल्या. (खांद्यापासून कोपरापर्यंत एक आणि कोपरापासून मनगटापर्यंत एक- अशा प्रत्येक हातासाठी दोन)
हात फक्त मनगटापर्यंत करून मग पायाचे पाऊल केले तसे आधी हाताच्या पंजाचा बोटे सोडून उरलेला भाग केला. हाताच्या बोटांच्या आकाराच्या छोट्या वळ्या वळून त्या चिकटवल्या आणि ब्लेडच्या टोकाने नीट मिसळल्या. खालील फोटोत हाताचा अंगठ्याचा भाग उरलेल्या पंजात मिसळून झाला होता. बाकीची बोटे मात्र नुसती चिकटवली आहेत. नंतर ती ब्लेडने पंजाच्या भागात मिसळली.

From Bappa

पंजा तयार करून मनगटाजवळ जोडला आणि इथेही पंजा आणि मनगटाचा शाडू ब्लेडने नीट मिक्स करून घेतला. मिक्स झालेल्या जागेवर हातातले कडे करायचे असल्याने तिथे जास्त फिनिशिंग न करता, कडे करण्यासाठी तीन वळ्या करून तिथे जोडल्या. खालील फोटो पहा.
या फोटोत हाताचा अंगठा आणि इतर बोटे गरजेनुसार वळवली आहेत. बोटे वळवताना क्वचित बोटाची वळी मोडू शकते. लहान वळ्या लवकर वाळतात त्यामुळे असे होते. बोटाची वळी तयार करताना आधीच थोडीशी वाकवून तयार करणे हा एक उपाय आहे. सरावाने हे सहजसाध्य होते.

From Bappa

नंतर मानेचा भाग तयार करून त्यावर चेहरा जोडला.
दुर्दैवाने इथून पुढचे फोटो वेळे अभावी काढू शकलो नाही.
From Bappa

चेहरा जोडताना एक चेहर्‍याच्या उंचीएवढी रुंदी असलेली चपटी आयताकृती पट्टी तयार करून घेऊन ती मानेभोवती बाहेरून गुंडाळली. गालाच्या भागाचा फुगवटा दाखवण्यासाठी आतून तो भाग बाहेरच्या बाजूला दाबला. ब्लेडच्या सपाट बाजूने फिनिशिंग केले. नंतर त्यावर मुकुटासाठी शाडूचा चपटा गोल तयार करून पुरणपोळीच्या उंड्यासारखा खोलगट करून जोडला.
सोंड मात्र आतून पोकळ करता येत नसल्याने चेहर्‍यापेक्षा सोंड वजनात थोडी जड होते. त्यामुळे ती जोडताना/जोडल्यानंतर निखळून पडू शकते. म्हणून सोंड जिथे जोडायची तिथे ब्लेडच्या टोकाने थोड्या खाचा पाडून ठेवायच्या. खाचांबर बोटाने थोडे पाणी सोडायचे आणि मग सोंड जोडायची. जेणेकरून सोंड चेहर्‍याला नीट चिकटेल. सोंड चिकटवल्यानंतर बाहेरून शाडूची छोटी पट्टी सोंड+चेहरा जिथे जोडलाय तिथे आडवी ठेवून पट्टीचा वरचा भाग चेहर्‍याच्या शाडूत आणि पट्टीचा खालचा भाग सोंडेच्या शाडूत मिसळला.
फोटो देता येत नसल्याने, केवळ वर्णनाने कदाचित खूप किचकट वाटेल म्हणून इथेच थांबतो.
पूर्ण झालेला गणपती:

From Bappa

रंगवून पूर्ण झालेला गणपती:

From Bappa

मोरया!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देखणी गणेशमूर्ती!!! उंदीरही गोजिरवाणा झालाय. (उंदराच्या पायात) आणि गणपतीच्या हातात वाद्यांची कल्पना फार आवडली. पायरीपायरीनं दाखवल्यामुळे घडवण्याच्या प्रोसेसची कल्पना आली.
काय कौशल्य आहे!

सगळे खुप तपशीलवार, समजेल असे लिहिले आहेस. अशी पोकळ मूर्ती करणे अतिशय कौशल्याचे काम. शिवाय आतून कोणताही आधार न घेता केलयस हे खुपच अवघड काम. सगळ्या टिप्सही खुप छान. अतिशय सुबक बनलीय मूर्ती.
बाप्पाची पावले ( जरा उचललेला अंगठा, पायाचा गोलवा), डोळे, हात ( सतारीवर टेकलेला बरोब्बर अँगलचा अंगठा), चेह-यावरचा एक आश्वासक भाव, सतारीवरचे नक्षीदार मोर ( जे रंग चढवल्यानंतर दिसत नाहीयेत, त्यांना थोडा फिका रंग दिला तर ? ), रंगवल्यानंतर पितांबराचे झळाळून उठणारे रेशमीपण, उंदीरमामा अन त्यांचा मृदुंग - त्याची शाई अन वादीही ( याचा जरा क्लोज अप दे ना ) , पाटावरचे चारी सोनेरी उठाव, सगळेच फार फार सुरेख, सात्विक !
चैतन्य खुप सुरेख, सुंदर कला आहेत तुझ्या कडे Happy
हे सगळे पाहताना, वाचताना मागे तुझी बासरी वाजत होती मनात Happy
शाब्बास !

आता पुन्हा पाहताना जाणवलं. सतार वाजवताना थोडं उजवीकडे झुकायला होतं ( भोपळ्याच्या दिशेने). तुझा बाप्पानेही ही ही पोज घेतलीय Happy कित्ती बारीक सारिक गोष्टी लक्षात घेतल्यास तू ! ___/\___

अवलला संपूर्ण अनुमोदन......

कमाल आहे रे बाबा चैतन्या तुझी......

_____/\_______

बापरे, केवळ महान ! किती सुबक मूर्ती बनवलीये ! कमाल आहे तुमची ! ___/\___
तपशीलवार कृती दिल्याने समजायलाही सोप्पं गेलं. उंदीरमामा पण खूप आवडले.

चैतन्य...

अगदी खरे सांगतो.. तयार झालेला गणपती (शेवटचे चित्र) अक्षरशः जिवंत भासते... मग प्रत्यक्षात मूर्ती तर स़जीवच असेल रे.
__/ \__

तुझ्यावर अशीच गणपतीची अखंड कृपादृष्टी असू दे...!!

अहाहा! खुपचं सुन्दर !! बाप्पाची पावले आणी चेहर्यावरिल सात्विक भाव. डोळे छान रंगवले आहेत. ते रंगवण्यात जरा जरी चुक झाली तरी मुर्तीच्या चेहर्यावरचे भाव बदलतात. खरचं खुप छान!

सुंदर !

एक नंबर! अप्रतिम.
श्रींची वस्त्रे रंगवण्यासाठी कोणते रंग वापरलेत?
सह्हीच आहेत ते रंग.
आमच्या गावी टिळक आळीत पूर्वी असा मोतिया गणेश असायचा.

घरी गणपती बनवणार्याना गरगरीत पोट बनवता येत नाही
अस निरीक्षण होतं.
या बाप्पाचं पोट मात्र मस्त गरगरीत आहे.

खूपच सुंदर.
ग्रेट आहेस चैतन्य.

प्रथम तुझ्या बाप्पाला वंदन
आणि त्यानंतर
तुलाही ____/\____

बापरे, फारच कठीण वाटलं. बाप्पांचा वरदहस्तच पाहिजे अशी कलाकारी जमण्यासाठी.
मूर्ती अतिशय सुरेख आणि सुबक झाली आहे __/\__ ! Happy

Pages