बस्के यांच्या लेखाबद्दल

Submitted by बेफ़िकीर on 17 September, 2012 - 04:13

ब॑स्केंचा सगळा नुस्ता पसारा हा ललितलेख अनेकदा वाचला. पहिले दोन दिवस त्यावर काही लिहिले नाही. पण त्या दोन दिवसांत कॉफी हाऊसवर त्या लेखाची लिंक दिली. सोबत लिहिले की हा लेख वाचावा.

लेखाचा प्रवास 'आपलेच विचार वाटणे' या स्थानकावर सुरू झाला, विचारांना चालना देणे या स्थानकावर मध्यंतर झाले आणि बेचैन वाटणे या स्थानकावर सांगता झाली. लेखाद्वारे एक अतिशय दिलचस्प प्रश्न समोर टाकला गेला, 'हे सगळे का'!

बस्केंचा लेख मला डोहावर आलेल्या तरंगाप्रमाणे वाटला. डोह शांत, गंभीर व गूढ असतो. एक तरंग डोहाचे गूढ उकलण्यास अपुरा पडतो. पण तो तरंग निर्माण होण्यामागे ते गूढच असते. तरंगही गूढ भासतो व असतो. या शिवाय पुन्हा तरंगाचे आणि डोहाचे गूढ एकच नसते, समान नसते, यामुळे मेंदूचा चिवडा होऊ शकतो, होतो.

बस्केंच्या लेखाची व्याप्ती बस्के ठरवणार. बस्केंच्या लेखाची रचना बस्के ठरवणार. वाचक, रसिक, आस्वादक प्रांजळ मते देणार. पण या प्रक्रियेत एक गोची आहे असे मला वाटते. डोहच आपला गूढ तरंग नेमका कसा आहे हे सांगत नसणे ही ती गोची. बस्के बस्केंबद्दलच बोलत आहेत. समान परिस्थितीतील प्रातिनिधिक व्यक्तीमत्वाची मते असे त्या लेखाचे स्वरूप नाही. बस्के त्या लेखातून वजा केल्या तर शून्य उरेल.

नक्श फरियादी है किसकी शोखी-ए-तहरीर का
कागजी है पैरहन हर पैकरे-तस्वीर का

मिर्झा गालिब यांचा जगन्मान्य सुपरिचित मतला.

कोणत्या चित्रकाराच्या चित्रकलेतील खोडसाळपणाची हे चित्र तक्रार करत आहे? प्रत्येक चित्राचा पोषाख कागदीच आहे. (इराणच्या बादशहासमोर आपली तक्रार मांडण्यास कोणाला जायचे असेल तर बादशहासमोर बोलणे मंजूर नव्हते. आपली तक्रार आपल्या कपड्यांवर लावलेल्या कागदांवर लिहून बादशहासमोर मान खाली घालून उभे राहण्याची प्रथा होती). प्रत्येक चित्र (पेंटिंग) कागदी असल्याचा संदर्भ घेऊन गालिब म्हणतात की ती चित्रे तक्रार करत आहेत, पण तक्रार कोणाची तर खुद्द चित्रकाराचीच. चित्रकाराने खोडसाळपणाने चित्रातले व्यक्तीकरण असुलभ करून ठेवलेले आहे. या मतल्यात 'चित्र' हे प्रतीक जर जिवंत माणसासाठी वापरले तर चित्रकार कोण होतो, त्याची खोडी कोणती आणि कागजी पैरहन म्हणजेच मानवी देह हे आपल्या लक्षात येते. मानवी देह आणि मानवी अस्तित्व हीच एक तक्रार आहे जी जगन्नियंत्यासमोर माणसाकडून सातत्याने मांडली जात आहे. त्या ईश्वराने खोडसाळपणे आपल्या आयुष्यात काम क्रोध मोह मत्सर या प्रकारचे अडथळे निर्माण करून ठेवलेले आहेत. एकीकडे माया आहे म्हणून जगाचा त्याग करण्याचा 'स्पिरिच्युअल' मार्ग चोखाळावासा वाटणे आणि दुसरीकडून मोहमयी दुनियेतील आकर्षणस्थाने आपल्याला त्यांच्याकडे खेचत राहणे या ताणाताणीची तक्रार एक आत्मा करू पाहात आहे. ही तक्रारही आत्मा निर्माण करण्यापुढेच केली जात आहे हे विशेष. (म्हणजे त्याशिवाय तक्रार ऐवण्यास वेगळी पर्यायी संस्था अस्तित्वात असूच शकत नाही).

बस्केंचा लेख बस्केंची 'कागजी पैरहन' आहे. ज्यावर तक्रार लिहिली आहे, हा गुंता का, ही माहितीची साठवण कशासाठी, यांचा उपयोग काय? माझी नेमकी प्राधान्ये काय, पुढे काय, हे सगळे का, अध्यात्माचा आरंभ होण्याइतके पोटेन्शिअल माझ्या प्रश्नांमध्ये आहे किंवा नाही? इत्यादी व अश्या प्रकारचे अनेक प्रश्न तक्रार स्वरुपात. पण बस्केंच्या लेखावर हा लेख मला लिहावासा वाटला याचे (माझ्यामते महत्वाचे) कारण म्हणजे बस्केंची ती तक्रार डोहावरच्या तरंगाप्रमाणे बाहेरील जगाला दिसत आहे, मुळात ती तक्रार निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या बस्केंना ती तक्रार काहीच सवाल करत नाही. कोणतेच स्पष्टीकरण मागत नाही. मी का निर्माण झाले हे विचारत नाही. तुझ्यामुळे मी निर्माण झाले हा प्रॉब्लेम आहे हे ठणकावून सांगत नाही. गुडीगुडी स्वरुपाने व भारत पाकिस्तान संबंध सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या भाषणाप्रमाणे ती तरंगासारखी उमटून जाते व संपते. तक्रार कागदावर लिहून बादशहासमोर येते, पण ते कागद परीधान केलेला माणूसच स्वतः बादशहासमोर येत नाही. तक्रारीला समोर वाचकांच्या स्वरुपात बादशहा मिळतो जो मनाला येईल ते निवाडे करतो, पण त्या तक्रारीला न्यायालय मिळत नाही जे तक्रारीच्या 'पुढे' बादशहाच्या स्वरुपात नसून तक्रारीच्या 'मागे' बस्केंच्या स्वरुपात आहे.

'असे मला वाटते / वाटले' म्हणून हा लेख लिहिण्याचे साहस करत आहे. उदारपणे लेख वाचावा व जरूर चर्चा व्हावी.

धन्यवाद!

=========================================

उत्स्फुर्तपणे मी जेव्हा मते मांडतो तेव्हा अत्यंत उद्धट, अती शहाण्याप्रमाणे लिहितो. लोक माफ करून टाकतात हा त्यांचा मोठेपणा. या निमित्ताने माझ्या अश्या प्रतिसादांसाठी मनापासून व खालमानेने दिलगीरी!

=========================================

प्रभावः

अपूर्णतेकडून अपूर्णतेकडे या प्रवासात सर्व सजीव व निर्जीव आहेत. पूर्णता हे जेथे कोणतेही अस्तित्व नसते ते गाव. विश्वातील कोणत्याही मटेरिअलला किंवा एनर्जीला हे गाव गाठणे शक्य नाही. अस्तित्वहीन असे काहीही आपल्याला ज्ञात नाही आणि इतकेच ज्ञात आह की काहीही अस्तित्वहीन असू शकत नाही. आपण दिवसभरात उच्चारतो त्या लाखो शब्दातील कोणताही शब्द तपासावा, अस्तित्वच नसलेली संकल्पना त्यात एकही नसेल. देव हा प्रकारही यातून सुटू शकत नाही. भूत हा प्रकारही यातून सुटू शकत नाही.

मुळात प्रवास अपूर्णतेचाच आहे. आरंभही अपूर्णतेपासून आणि अंतही तेथेच. त्या प्रवासात आपल्या स्वरुपात होत राहणारे बदल व त्यांना लागणारा कालावधी या दोन घटकांमधील सजीवसजीवातील वैविध्य, भिन्नत्व यातून श्रेष्ठकनिष्ठ या संकल्पनांची निर्मीती होते, जी कोणालाही मुळात अभिप्रेत नाही. विश्वनिर्मात्यालाही ती अभिप्रेत नाही. मात्र ती निर्मीती होते. आई ही मुलापेक्षा श्रेष्ठ का समजली जाते? तर आई मुलाला जन्म देते, त्याला वाढवते, संस्कार करते, मुलाच्या जडणघडणीच्या काळात ती मुलापेक्षा खूप सामर्थ्यवान, परिपक्व, अनुभवी, शिक्षिकेच्या भूमिकेत सहज शिरू शकण्यास पात्र असलेली, अशी असते. मुलगा पन्नास वर्षाचा झाल्यावर अनुभवी, सामर्थ्यवान तोही होतोच, पण तोवर त्याची आई अनुभवांनी अधिक समृद्ध झालेली असते. ती तेव्हाही त्याला चांगले शिकवण्याच्या भूमिकेत सहज वावरू शकते. आई व मुलगा हे फक्त एक उदाहरण घेतले.

आईला, मुलाला, मुलाच्या वडिलांना व समाजाला हे मान्य होत नाही की मानववंश पुढे जावा या नैसर्गीक उद्देशातील केवळ एक टप्पा त्या आईने व वडिलांनी गाठलेला आहे. 'सर्व काही आपण केले'या भूमिकेतून बाहेर आलेला माणूस अध्यात्माच्या मार्गावर पहिले पाऊल टाकतो. सहसा माणूस त्या भूमिकेतून बाहेर येत नाही. 'हे वडील आहेत, यांचा मान ठेवलाच पाहिजे' ही शिकवण कुटुंबव्यवस्था, चांगले वागणे, सुजाण नागरीक होणे व समाजस्वास्थ्य या सर्वांसाठी आवश्यक असली तरीही ती मानवापुरतीच मर्यादीत आहे. निसर्गातील इतर अनेक सजीवांना या शिकवणीची जरूर नसते. (काही प्राणिमात्रांमध्ये असेलही, मला माहीत नाही, पण प्रामुख्याने संस्कार, समाजस्वास्थ्य, विकसनशीलता, सुबत्तेचे न्याय्य वाटप व संधींची समसमान विभागणी हे मानवसृष्टीतील 'एक्स्लुझिव्ह' घटक ठरतात).

एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीला विशिष्ट भूमिकेतून आणि इच्छा नसतानाही आदर दिला पाहिजे ही मानवसमाजाने निर्माण केलेली अनैसर्गीक बाब आहे. आजची संस्कृती त्याचमुळे टिकून असली तरीही 'बळी तो कान पिळी' ही निसर्गाची स्वतःची संस्कृती आहे. मानवाने 'बळी तो कान पिळी' या निसर्गाच्या सहजसुलभ प्रवृत्तीला स्वतःच्या वागणुकीतून स्वतःपुरता आळा घातला असला तरी त्यामुळे ती प्रवृत्ती मानवात उफाळून येणेही थांबत नाही आणि मानवाला शिंगे, पंख, नख्या, सुळे असले अवयवही मिळत नाहीत.

याचा परिणाम असा होतो की निसर्गाची सर्व चक्रे, सर्व संकटे, सर्व सुबत्ता उपभोगत असताना माणूस स्वतःला 'न्याय्य वागणुकीचा' पुतळा मानत असतो आणि त्याचवेळी अप्रत्यक्षपणे किंवा लपून छपून 'बळी तो कान पिळी' ही प्रवृत्ती उफाळून आलेली आहे हेही 'विटनेस' करत असतो. पण तो बदलत नाही. बदलला तर अमेरिका पृथ्वीला जाळून स्वतःही नष्ट होईल. ते नको म्हणून आपण सगळे आंतरराष्ट्रीय कायदे करून व आंतरराष्ट्रीय न्यायालये स्थापन करून स्वतःला समाधानी मानतो व तरीही अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांपुढे काही प्रमाणात नमते घेतोच घेतो.

'बळी तो कान पिळी' या नैसर्गीक उर्मीला दाबून ठेवल्यामुळे तिचे ठायीठायी होणारे चोरटे शक्तीप्रदर्शन माणसाला संस्कृती बनवण्यास भाग पाडते व त्यातून समाज, कुटुंब, नातीगोती हे प्रकार निर्माण होऊ लागतात. मोठा भाऊ आदरणीय असतो ही आपली संस्कृती मुळात मोठा भाऊ लहानपणी आई वडिलांपासून लपवून लहान भावावर काही प्रमाणात दादागिरी करू शकतो या 'फॅक्ट'मधून आलेली असते. वडील फटका देऊ शकतात त्यामुळे त्यांना घाबरावे लागते हे मोठ्या प्रमाणावर असते. म्हणजे दोन वर्षाच्या मुलाचे वडील थोर समाजसुधारक असले तरी त्या मुलाला त्याच्या त्या वयात त्याच्या वडिलांबद्दल असलेला आदर हा त्यांच्या कार्यामुळे नसतो, भीतीमुळे असण्याची शक्यता अधिक असते. आपण हट्ट केला तर मार मिळेल ही भावना अधिक प्रखर असते. मग वीस वर्षांच्या मुलाला फक्त वडील म्हणून आदर असतो का? तर हो. पण तो आदर त्याच्यावर बिंबवला गेलेला असणे यातून तो सातत्याने टिकून राहिलेला असतो. आपण सर्वजण शाळेत शिकतो तशी सर्वच नाती निखळ नसतात हे आपल्याला हळूहळू आकलन व्हायला लागते. म्हणजे आजोळी इस्टेटीचे वाटप झाल्यावर आपल्या आईला मोठा भाग मिळाला म्हणून मामाने संबंध सोडले, हे कळल्यावर माम्माच्या गाव्वाला जाऊ या या गीताचा अर्थ नष्ट होतो, माधुर्य नष्ट होते. येथे बळी, म्हणजे सामर्थ्यवान कोण? तर आजी किंवा आजोबा ज्यांनी वाटप केले. त्यामुळे मामाला काही बोलता आले नाही. मग उरले मामा आणि आपली आई! यात बळी म्हणजे सामर्थ्यवान मामा, कारण संबंश सोडणे आणि लहानपणापासूनच्या शिकवणीला तडे देऊन नाती संपवणे हे तो करू शकला. आईला माहेर हवे होते, पण सुटले. आईला माहेर हवे होते कारण मुलाकडचे म्हणजे आपल्या वडिलांकडचे लोक हे नेहमीच वरचष्मा असलेले होते. त्यामुळे आईने तिचे लहानपण जिथे घालवले तेथील माणसे व ते घर तिच्यासाठी तिला सामर्थ्यवान बनवणारे बनून राहिले, सासरपेक्षा!

माणसाचा माणसावर अनावश्यक प्रभाव पडण्याची प्रक्रिया यातून सुरू होते. आपण लहानपणापासून कित्येकदा नको असतानाही काही माणसांबरोबर वेळ घालवत बसतो, कोणाचेतरी अनुकरण करतो, भावना गुंतवून ठेवून त्रास, मनस्ताप करून घेत असतो व भांडणेही करतो आणि गॉसिपही! याचे कारण आपण माणूस म्हणून मोठे होत असताना अनंत घटकांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव आपल्यावर पडलेला असतो.

त्यामुळे आपण जेव्हा माणूस म्हणून स्वतंत्र होतो, आर्थिक, सामाजीक दृष्ट्या, तेव्हा आपण एक शरीर म्हणून स्वतंत्र होत नसतो. अनंत आठवणी, अनंत अनुभव, अनंत विचार, अनंत प्रभाव व शेकडो माणसे यांचा त्यात कमीजास्त प्रभाव असतो. त्या सर्व गोष्टींचे एक 'विशिष्ट व नॉनरिपिटेबल आवृत्ती असलेले' मिश्रण मोठे व स्वतंत्र झालेले असते. आपण थोडी आपली आई असतो, थोडे आपले वडील असतो आणि असेच अनेक लोक आपण असतो.

थोडक्यात, आपण एक 'डोह' झालेले असतो.

निसर्गाकडून आपल्याला मिळालेले शरीर व त्या शरीराला आनंद होत राहील ही आपली इच्छा या दोन गोष्टी सोडल्या तर आपल्यात 'आपले खास' असे काहीच नसते. ते इतरांचेच असते. त्या दोन गोष्टी सोडल्या तर आपण करत असलेली प्रत्येक बाब, इन फॅक्ट स्वतःच्या शरीराला आनंद देण्याची वृत्तीसुद्धा, हा निव्वळ प्रभाव असतो. माणसे माणसाला भेटतात तेव्हा शरीरे समोर उभी राहतात आणि एकमेकांमधील प्रभावांची मिश्रणे एकमेकांशी संवाद साधतात. (एकमेकां'वरील' नव्हे, एकमेकांमधील प्रभावांची मिश्रणे).

कोण श्रेष्ठ हे ठरल्यावरती कुठे जायचे हे ठरते
दोनजणांच्या भेटी म्हणजे फक्त मुलाखत इच्छांची

प्रभावाच्या मिश्रणाची क्लिष्टता आपली आपल्याला पुरी कळली नाही तरीही त्याचा रंग, रूप, गंध जाणवत असतो. आपण कोणाच्या प्रभावाने हे करू लागलो हे आठवते. त्या व्यक्तीचा प्रभाव आपल्यावर पडावा इतपत ती व्यक्ती आणि आपण यांच्यात 'बळी आणि कान पिळून घेणारा' असे (अगदी शब्दशः नाही, पण काही प्रमाणात) नाते होते का? ती व्यक्ती आपल्याला त्या त्या गोष्टीपुरती आपल्यापेक्षा ग्रेट वाटायची का? मग पुढे काय झाले? त्या बाबी रिलेव्हंट राहिल्या का? राहिल्या नाहीत त्यानंतरही तो पभाव आपण वागवत आहोत का? त्या प्रभावाखाली आपण अजूनही त्या गोष्टी त्याच प्रकारे करत आहोत का? मग असेच आपल्या प्रत्येक कृतीचे होत असेल का? मग मी म्हणजे काय? मूळतः मी काय आहे? कुठे जाणे अपेक्षित आहे?

प्रत्यक्षात अपूर्णतेच्या प्रवासात माणूस कुठेच जात नाही. त्याच्यातील प्रभावांची मिश्रणे होईल त्या त्या वेगाने बदलत राहतात. प्रत्येकाचे स्वरूप बदलत राहणे व त्यास लागलेला कालावधी यावरून पुन्हा श्रेष्ठ कनिष्ठ हा भेदभाव निर्माण होत राहतो. अधिकाधिक क्लिष्टता निर्माण होत राहते.

मग माणसाच्या विचारांमधील स्वच्छता नष्ट होऊ लागते. आपल्याला प्रश्न पडत आहेत याचेच माणसाला अप्रूप वाटू लागते. हे प्रश्न निर्माण करण्यामागे मी स्वीकारलेले व अजून न नाकारलेले प्रभाव आहेत हे मान्य करण्यात कमीपणा तरी वाटतो की या पातळीला जायचा कंटाळा तरी केला जातो. पण समजा एखादा स्वतःच्याच आत अधिक खोल गेलाच... तर त्याला त्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. विचारांवरची प्रभावाची पुटे आणि थर एकेक करून काढले की काहीतरी मूळ दिसते, जे अधिकच भयावह असते, कारण ते फक्त एक शरीर असते. ते शरीर जर्जर झालेले असते. त्या शरीराला शरीरधर्माशिवाय काहीही नको असते. मग असे रूप बघून आपण साधे बुद्धीप्रामाण्यवादी मानवी अस्तित्वही नाही आहोत का ही शंका मनाला ग्रासू लागते. मग तेथवर पोचलेला माणूस पटकन वर, म्हणजे बाहेर येतो. आपल्या विचारांमध्ये पूर्ण, निखळ स्वच्छता यावी ही इच्छा मरते. ज्या विवाहबंधनात मला नको असलेल्या तमाम बाबी निरिच्छेने करता करता शेवटी तीच आपली यथोचित भूमिका आहे असे वाटायला लागते, ते विवाहबंधन 'विचारांची स्वछता प्राप्त झाल्यावर' मोडावेसे वाटेल याचीच भीती वाटायला लागते.

असे अनुभव आले की माणूस प्रभावांचे आणखी थर स्वतःवर बसवून घेतो. जपजाप्यही करतो किंवा डिस्कोथिकलाही जाऊन नाचतो. त्याला 'तो स्वतः मूळ रुपात कसा आहे' याची जाणीव हाकलून द्यायची असते, त्यासाठी तो जमतील ते उपाय योजतो. त्यातून अधिक प्रभाव पडत राहतात. मग त्याला हेच आठवेनासे होते की आपले मूळ रूप आपण कधी पाहिलेले होते, किंवा ते कसे होते. आता त्याला तो म्हणजे आत्ता जसा आहे तसाच वाटू लागतो. आणि अश्या माणसाचा 'डोह' होतो.

असा 'डोह' बनलेल्या एका माणसाने स्वतःच्याच पृष्ठभागावर निर्माण झालेल्या तरंगांनी कोड्यात का पडावे याचे उत्तर ह्या सर्वात आहे.

बस्केंचे हे प्रश्न! हे खाली कॉपीपेस्ट केलेले प्रश्न त्यांच्या लेखात आहेत. हे प्रश्न एका डोहावर उमटलेल्या तरंगाबद्दल डोहालाच काही माहीत नसणे अश्या स्वरुपाचे आहेत.

>>>किती धावणार आपण? आणि कुठे निघालो आहोत? भस्मासूरासारखे सगळं घाईघाईने गिळंकृत करून नक्की काय हवंय आपल्याला? <<<

>>>या आठवणींचे काय करायचे?<<<

>>>त्यामुळे सतत डील्स पाहणे सुरू. अरे खरंच हवी आहेत का पण<<<
====================================================

भारतीय संस्कृतीतील स्त्री (बहुधा, ऐकीव ज्ञानानुसार) पाश्चात्य स्त्रियांच्या तुलनेत अधिक बद्ध असते. प्रभावित असते. तिची कर्तव्ये ठामपणे नोंदवलेली असतात, पिढ्यानपिढ्या पुढे राबवली जातील याची शहानिशा जातीने केली जाते. साधारणपणे किमान शिक्षण (काही ठिकाणी हा घटक नाहीच), जमवून घेणे, सोशिकपणा, सौंदर्यवृद्धी, विवाह, परक्या घरातील माणसांमध्ये अचानक मिळून मिसळून जाणे, त्यांच्यासाठी जीव ओतणे, मुलांना जन्म देणे आणि निर्णयप्रक्रियेत दुय्यम ठरणे या साच्यामधून एक स्त्री जाते. या काळात ती अनेकांच्या संपर्कात येते. वर्तनातील मोकळेपणावर असलेल्या सामाजिक व कौटुंबिक दबावामुळे प्रभावित होत राहणे स्त्रीच्या बाबतीत सहसा अधिक होते.

आपले दैनंदिन आयुष्य आपण कसे जगावे याचे काही ठोकताळे ती याचमुळे ठरवून टाकते. मुलांची काळजी, थोडे वाचन, ज्ञानसंपादन, चारचौघात वागण्याचे कसब व एकंदर कुटुंबाला आधार, असे साचे तीही मग स्वतःसाठी कमीअधिक वैविध्याने ठरवून घेते.

वाचताना आपण पूर्वी कॉफी घ्यायचो हा विचार म्हणजे आपलाच आपल्यावर पडलेला प्रभाव. पण कॉफी घेतली म्हणून वाचन होईल असे नाही कारण बदललेली प्राधान्ये! मग ही आजची प्राधान्ये पाहून मागे आपण कश्या होतो आणि आज कश्या आहोत यातील फरकांमुळे चित्त विचलीत होणे. बदललेल्या तंत्रज्ञानात घरबसल्या शेकडो मित्रमैत्रिणींच्या संपर्कात सहज येता येत असल्याने वाचनाचा वेळ चॅटिंगला देऊ करण्याची इच्छा होणे!

ही सर्व लक्षणे फक्त बस्के यांची तर नाहीतच, पण बस्के यांना मी अजिबातच ओळखत नसल्याने यातील कोणतीच लक्षणे खरे तर बस्के यांची असतील असेही नाहीच.

पण इतर प्रदेशांच्या तुलनेत बुद्धीजीवी असण्यात बर्‍यापैकी वरचढ असलेल्या महाराष्ट्रातील वाचनसंस्कृती प्रभावित व दिशाहीन आहे असे आपले मला वाटते. स्वारस्य असलेले विषय माणूस वाचतो हे जितके खरे, तितकेच 'तू काय वाचायला पाहिजेस' हे आपल्या वागणुकीतून, स्वानुभवातून व शेखी मिरवण्यातून दुसर्‍याच्या मनावर ठसवले जाते हेही खरे! तुम्ही वाचलेत, त्याबद्दल सांगितलेत, मस्त! धन्यवाद! पण ते न वाचणारे आणि इतर काही वाचणारे हे कमी नाहीत ना?

अगम्य रुपकांनी नटलेल्या कविता, आज रिलेव्हंट नसलेला इतिहास आणि ग्रामीण / दलित किंवा गांभीर्याचा आव असलेले ललित साहित्य महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर डोक्यावर घेतो. सामान्य माणसाच्या कुवतीला चिकटून उभे राहणारे माधुर्ययुक्त साहित्य हिंदी समाज डोक्यावर घेतो. चांगले लिहिण्यासाठी फार गंभीर आणि वर्णनात्मक नाही लिहावे लागत. काय चांगले आणि काय चांगले नाही हे ज्याच्यात्याच्यावर हे मान्यच! पण बस्केंच्या लेखात उल्लेखले गेलेले वाचन हे मला प्रभावित वाचन वाटते. आणि जे प्रभावित असते त्याचबद्दल माणसाला कालांतराने प्रश्न पडतात. 'मी हे का करतो / करते' हे प्रश्न प्रभावित कृतीला उद्देशून बहुतेकदा विचारले जातात. डोळे मिटत आहेत म्हणून कसाबसा खेळ सोडून पहुडणार्‍याला थोपटणे हे अरुणा ढेरे आणि विंदांच्या कोणत्याही कविता, नेमाडेंची कोणतीही कादंबरी आणि ब्राह्मण मराठ्यांची लिहिलेला कोणताही परस्परविरोधी इतिहास वाचण्यापेक्षा चांगले वाचन आहे.

बस्के यांना पडलेला वाचन, पुस्तकांबद्दलचा प्रश्न सर्वांनी गौरवलेलाच आहे. पण आपण मुळातच या वाचनाच्या दिशेला गेलो तेव्हा ती आपली प्राधान्ये आहेत की प्रभाव यावर विचार केला गेला नसणार असे माझे मत. मग ते वाचन झाले असण्याची कारणे कोणाच्या तरी शेखी मिरवण्याचा किंवा काही विशिष्ट पुस्तके गाजण्याचा प्रभाव असणार. त्या पुस्तकांमधून मिळालेली माहिती आज कचरा, पसारा वाटते याचा अर्थच हा होतो की तेव्हा आपण हिरीरीने जमवत असलेले ज्ञान, माहिती हे आपल्याला फक्त 'जमवावेसे' वाटत होते.

एक माणूस हे एक तत्वज्ञान असते. तत्वज्ञान आपल्यातच असते. बाह्य माध्यमांनी त्याची धार फारशी वाढत नाही. पुस्तके न वाचणारे अडाणी लोक जगण्याच्या सोप्प्याश्या युक्त्या एका ओळीत सांगून जातात. आपण जे जगतो ते आपले वाचन असतेच की? आयुष्य ही प्रदीर्घ कादंबरी आपण सगळेच वाचत आहोत. वाचन करावे की नाही यावर काही म्हणण्याचा मला अधिकार तर नाहीच, पण तसा हेतूही नाहीच. पण इतकेच म्हणायचे आहे की आज बस्केंना जो पसारा वाटत आहे तो तेव्हा 'वाटला नव्हताच' का? यावर त्यांनी लिहायलाच हवे होते. तेव्हा काय व्हायचे? वेळ असायचा, जबाबदार्‍या नसायच्या यामुळे एक मग कॉफीवर एखादे पुस्तक मनाला खपायचे? चालायचे? की खरंच ते चालायचे? मग वाचन हे फारश्या जबाबदार्‍या नसताना केल्यास, भरपूर वेळ असताना केल्यास अधिक फायदेशीर ठरते का? वाचन करण्यासाठी एक पार्श्वभूमी आवश्यक असेल का?

की मध्यंतरी बराच काळ गेल्यामुळे आता ती सवय राहिलेली नाही? ती एक सवयच होती का? की आवड होती की सबकुछ होते? मग आज ते राहिलेले नाही किंवा करता येत नाही किंवा जे आधी केले तो पसारा वाटत आहे याचे अ‍ॅनॅलिसिस काय आहे?

वाचन हे आपल्या आयुष्यात काय स्थान प्राप्त करून बसलेले आहे? तेव्हाचे वाचन का आणि कसे व कशामुळे होते आणि आत्ताचे का, कसे व कश्यामुळे आहे वा नाही? मग पुढच्या पिढीला वाचनाबद्दल काय संदेश पोचवावासा वाटतो? हे फक्त एखाद्या स्त्रीलाच होत असावे का? की फक्त गृहिणीलाच? की कोणालाही?

>>>मला स्वतःला 'इनफॉरमेशन' जास्त झाली आणि मुख्य म्हणजे त्याचं 'क्नॉलेज' मधे रुपांतर झालं नाही, की अशी अस्वस्थता येते<<<

रार यांचे प्रतिसाद सर्वांनी गौरवले. बस्के फक्त 'इन्फॉर्मेशन' याविषयी बोलत आहेत का? बस्केंचे मन लेखात उतरलेले आहे. बस्क्वंच्या लेखनातून उद्भवणार्‍या अनेकपैकी एकाच मुद्याचे प्रोजेक्शन रार डिस्कस करत आहेत. मुळात ते डिस्कशनही तांत्रिक आहे. उदाहरणार्थ त्यांचा हा पॅरा:

>>>मला गाणी, सिनेमे, पुस्तकं याबाबत होतं असं... किती पाहणार, किती ऐकणार, किती वाचणार.
कधी कधी युट्युब चक्क नको वाटतं...
ऐकलंय ते, पाहिलंय ते, वाचलंय ते आधी पचवू दे, त्यावर विचार होऊदे.. मग नवीन काही असं होतं.. आणि असं झालं तर मी काही काळ नवीन काही पाहायला, वाचायला, ऐकायला जात नाही.<<<

बाह्य जगातून आपल्या मेंदूत संप्रेषित होणार्‍या माहितीचे कुशल व्यवस्थापन हा बस्केंच्या लेखाचा मध्यवर्ती मुद्दाच नाही आहे. बस्केंच्या लेखातील व्यक्ती काळागणिक बदललेली प्राधान्ये व त्यांचा मनोव्यापारावरील ठसा आणि या सोबत येणारी खिन्नता याबद्दल पोटतिडकीने आणि भावनिक होऊन बोलते. रार बोलतात माहिती व्यवस्थापनाबद्दल.

मुख्य मुद्दा हा आहे, की सुशोभीकरण करून लिहिलेला व कोणाचीही मने न दुखावणारा विस्तृत प्रतिसाद गौरवणे हा माणसाचा स्थायीभाव असल्याचे स्पष्ट दिसते. इतका, की मूळ लेखिकाच रार यांच्या प्रतिसादाने भारावून गेलेल्या दिसतात. म्हणजे आपण किती महत्वाचे मुद्दे एकामागे एक असे कोणत्याही सुसंगत शैलीशिवाय मांडत गेलो यापेक्षा रार यांचा प्रतिसादच महत्वाचा मानण्याची परिस्थिती उद्भवलेली दिसते. रार यांचा प्रतिसाद अत्यंत सुंदर असला तरी तो 'ज्ञान संपादन व माहितीचे संकलन व व्यवस्थापन' या विषयावर दिल्यास सुंदर आहे. बस्केंच्या खिन्नतेवर तो प्रतिसाद अस्थानी आहे. (हे मी रार यांच्या पहिल्या प्रतिसादाबद्दल म्हणत आहे). दुसर्‍या प्रतिसादात त्या मेंदूत माहिती साठवण्याच्या फॉर्मॅटिंगबद्दल बोलतात. एखाद्या गृहस्थाने आपल्या वारलेल्या आईची आठवण काढून सांगितले की आई शेवयांची खीर इतकी मस्त करायची, तर त्याला शेवयांची खीर करण्याचे सहासष्ट प्रकार हे पुस्तक भेट देण्यासारखे झाले हे!

बदललेली प्राधान्ये, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध असणे आणि वाचनाबाबतची स्पेसिफिक आवडनिवड व त्यात झाले असल्यास बदल, याबाबत बस्केंनी लिहायला हवे होते. (म्हणजे वैयक्तीक मते मांडायला हवी होती). कदाचित त्यातून हेही (त्यांच्याचसुद्धा, एखादवेळेस) समोर आले असते की त्या पूर्वीचे वाचन 'मिस' करतच नाही आहेत.

==========================================

जिज्ञासा:

जिज्ञासू प्रवृत्ती तापदायकही ठरू शकते हा मुद्दा बस्केंनी मांडला. मला ते प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडले. त्यावर उपाय म्हणून कंपार्टमेंटलायझेशन करावे हा मुद्दा त्यांनी काय किंवा प्रतिसादकांनी काय, मांडू नये असे वाटले. यात मला तरी दिशाहीनता जाणवली. ते तापदायक ठरते, ठरू शकते इज फाईन. पण म्हणून दिशा काय असावी? कोणाची असावी आणि कधी असावी? जनरलाईझ करता येणार नाही, पण बस्केंची पुढची दिशा काय असेल?

ज्ञान स्वीकारणे कितपत थांबवता येईल? मिळवणे थांबवता येईल, पण जे आदळले कानावर ते कसे थांबवणार? आधीच्या स्मृती आपोआप रिलेट होणे कसे थांबवणार? याची उत्तरे तांत्रिक असावीत का?

जिज्ञासा ही हाव असते का? मायावी जगापासून बाजूला झालो तर अध्यात्मिकतेची हाव पडेल का? की ती जिज्ञासा असेल? आणि मग ती जिज्ञासा आत्ता नसतेच का?

मुळातच मेंदूत स्टोअर झालेली माहिती मधूनच डोके वर काढते म्हणून पुढील माहिती मिळवण्याचा वैताग का येतो? यातील नेमके ध्येय काय?

आधीच असलेली माहिती आणि आठवणी यांचा पसारा आवरावा असे वाटणे याला काही वास्तव अर्थ आहे का? की एक कन्फ्यूझ्ड मनस्थिती लेखाद्वारे पोहोचवायची असावी? आपण आपल्याकडील माहितीच्या कॅटेगरीज ठरवल्या, की बुवा ही सर्व माहिती इंटरनेटबद्दल आहे, तर ती आपल्याला हवी तेव्हाच वर डोकावेल अशी यंत्रणा करावीशी वाटणे ही केवळ एक मनस्थितीच नाही का?

आधी म्हंटल्याप्रमाणे माणूस हे अनुभव, प्रभाव व ज्ञान यांचे मिश्रण असतो. यातील प्रभाव कमीकमी करत जाणे कदाचित शक्य होईल, पण आजवर घेतलेले अनुभव आणी मिळवलेले ज्ञान यांच्यापासून तात्पुरतीही फारकत 'जागेपणी' कशी घेता येईल?

कोणीतरी म्हणालेले आहे की 'एकदा एखादे ज्ञान मिळाले की पुन्हा 'ते ज्ञान नसणे' अशी अवस्था माणसाला शक्य नाही'. हे आपल्याला पटते बुवा.

भावनिकता, मुद्दे आणि उदाहरणे यांच्या चविष्ट भेळेला माझ्या या सामान्य लेखाचा पुठ्ठ्याचा चमचा हवा होता की नव्हता, यावर अवश्य प्रांजळ मते द्या.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव केव्हढं लिहीलंत तुम्ही!? तुम्हाला त्या लेखावर एव्हढा विचार करावासा वाटला, त्यासाठी धन्यवाद!

मी एकदा वाचल्याची पावती देते आत्ता फक्त. लेखावरील प्रतिसाद सकाळी देईन.

माझ्या या सामान्य लेखाचा पुठ्ठ्याचा चमचा हवा होता की नव्हता, यावर अवश्य प्रांजळ मते द्या. >>
नको होता. माझे मत.

तुमचे मत एका परिच्छेदात लिहिले असते तर बरं झाले असते. शब्दसंख्या फार होत आहे. त्याने मुद्दा ठळक होण्याऐवजी भरकटतोय. Uhoh

आज बस्केंना जो पसारा वाटत आहे तो तेव्हा 'वाटला नव्हताच' का? यावर त्यांनी लिहायलाच हवे होते. तेव्हा काय व्हायचे? वेळ असायचा, जबाबदार्‍या नसायच्या यामुळे एक मग कॉफीवर एखादे पुस्तक मनाला खपायचे? चालायचे? की खरंच ते चालायचे? मग वाचन हे फारश्या जबाबदार्‍या नसताना केल्यास, भरपूर वेळ असताना केल्यास अधिक फायदेशीर ठरते का? वाचन करण्यासाठी एक पार्श्वभूमी आवश्यक असेल का?की मध्यंतरी बराच काळ गेल्यामुळे आता ती सवय राहिलेली नाही? ती एक सवयच होती का? की आवड होती की सबकुछ होते? मग आज ते राहिलेले नाही किंवा करता येत नाही किंवा जे आधी केले तो पसारा वाटत आहे याचे अ‍ॅनॅलिसिस काय आहे?
वाचन हे आपल्या आयुष्यात काय स्थान प्राप्त करून बसलेले आहे? तेव्हाचे वाचन का आणि कसे व कशामुळे होते आणि आत्ताचे का, कसे व कश्यामुळे आहे वा नाही? मग पुढच्या पिढीला वाचनाबद्दल काय संदेश पोचवावासा वाटतो? हे फक्त एखाद्या स्त्रीलाच होत असावे का? की फक्त गृहिणीलाच? की कोणालाही?>>>>>>

माझे काही प्रचंड गाढे वाचन नाहीये. पण जे काही मी वाचायचे ते प्रचंड आवडायचे म्हणून वाचायचे. स्थळ-काळाचे-तहानभूकेचे भान विसरून. ते अर्थातच आता होत नाही. Happy माझ्यासाठी फारश्या जबाबदार्‍या नसताना केलेले वाचन खरंच फार बेस्ट होते. मी प्रचंड गुंतून जायचे त्यात, मैत्रिणींशी/आईबाबांशी चर्चा करायचे. आता माझ्याच्यानेच खरंखुरं कागदांचे पुस्तक हातात धरून पूर्ण वाचून होत नाही. फार फार कॉन्संट्रेशन गोळा करावे लागते, परिस्थितीजन्य अडचणी दूर कराव्या लागतात (दोनच शांत तास मिळतात वगैरे).. गेले १०-१२ वर्षं मराठी वेबसाईट्स, इतरही इंग्रजी फोरम्स व आता डिजिटल पुस्तकं इत्यादीवर वाचन जास्त झाल्यामुळे कागदी पुस्तक वाचणे ४-५ पानांपलिकडे होईलच असं नाही. पूर्वी ३-४०० पानांची पुस्तकं पूर्ण रात्र जागून संपवली असताना ते खुपतं.. पण त्या लेखात मी थोडेफार हेच लिहायला गेले, की कायम पूर्वीच्या आठवणींनी खिन्न होणे किंवा तो काळ किती बेस्ट इत्यादीने आत्ताचा क्षण नाही मनापासून एन्जॉय केला जात आहे. त्यासाठी स्वतःच्याच मनाला खडसावले आहे असं म्हणता येईल. दोनच तास शांत मिळत आहेत तर ते शांतपणे घालव बस्के! इत्यादी... (अर्थातच माझी हॉबी वाचन असल्याने त्याचाच उल्लेख येत आहे. त्याचा अर्थ वाचन हे सगळ्यात उच्च वगैरे असं नाही. कोणाबरोबर हे चित्रकला,गायन इत्यादी बाबत होऊ शकते.)

पुढचा मुद्दा: रारचा प्रतिसाद. तो तसा एका अर्थाने लेखाशी संबंधित आहेही व थोडा नाहीही. पण मला माझ्या लेखामुळे(च्या निमित्ताने) कोणी असं आत्मचिंतन केले तर आवडेलच, त्यामुळे मला तो प्रतिसाद आवडला. लेखात किंवा प्रतिसादात याचा उल्लेख नाही आला, पण रार,मी अजुन काही मैत्रिणी आमच्या अशा गप्पा झाल्या होत्या, की किती माहितीचा ओव्हरलोड होत आहे. मी माझ्या लेखात माझ्याशी रिलेटेड गोष्टी लिहील्या, रारने तिच्याशी संबंधीत गोष्टी लिहील्या. मुद्दा मला तरी वाटतं की तोच आहे. त्यामुळे तुमचा 'मुख्य मुद्दा हा आहे..." हा परिच्छेद मला पटला नाही.

आधीच असलेली माहिती आणि आठवणी यांचा पसारा आवरावा असे वाटणे याला काही वास्तव अर्थ आहे का? की एक कन्फ्यूझ्ड मनस्थिती लेखाद्वारे पोहोचवायची असावी? आपण आपल्याकडील माहितीच्या कॅटेगरीज ठरवल्या, की बुवा ही सर्व माहिती इंटरनेटबद्दल आहे, तर ती आपल्याला हवी तेव्हाच वर डोकावेल अशी यंत्रणा करावीशी वाटणे ही केवळ एक मनस्थितीच नाही का?>>>>

कन्फ्युज्ड मनस्थिती एक झाले. बराचसा मुद्दा आपण आपल्या आयुष्याचा कंट्रोल जमेल तितका आपल्या हातात ठेवणे/ठेवायचा प्रयत्न हा आहे. लेखातील सर्व विचार हे जवळपास वर्ष-दोन वर्षांपासून डोक्यात आहेत. पण कायम मी जे करत आहे त्याला स्पष्टीकरणं देत गेले, नाही..हे बरोबर आहे/हे फायद्याचे आहे/फेसबुक मी नाही बंद करू शकत, किती फ्रेंड्स भेटले परत. इत्यादी.. अर्थात तो लेख लिहीला म्हणजे मी फेसबुक बंद केले का?मायबोली बंद केली का? नाहीच... उपाय योजना करायला सुरवात करायलाच मला खूप काळ जाणारे, हे मला माहीत आहे. इनफॅक्ट त्याच लेखाची लिंक मी फेसबुकवर शेअर केली(खूप काळाने ब्लॉग लिहील्याने जे वाचतात त्यांना कळवावं हा हेतू होता).. पण नंतर त्या आयरनीचे इतकं हसू आलं.. ते व्यसन/ बंधन इतक्यात नाही सुटायचे. पण ठिके. विचार आला, प्रश्न पडले इतक्यातच मी समाधानी आहे सध्या! तुमच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं नाही माहीत मला. ती उगीच शोधत बसूही नये असं पण वाटतं मला. मी जात्याच कम्प्लेसंट आहे, एव्हढं झालं, पुष्कळ झालं! डोहावर तरंग येऊ शकत आहेत, त्याच्यावर शेवाळं येऊन त्याच्याखाली काय आहे हे सुद्धा कळू नये इतकी वाईट परिस्थिती नाही येऊ दिली डोहाने यातच डोह खुष!

बाकी, रैनाच्या प्रतिसादाशी अंशतः सहमत. मला प्रभाव हा सेक्शन फारसा लेखाशी संबंधीत नाही वाटला. त्याच्यात डीपर वाचन केले तर कनेक्शन्स लागतील. पण तो वेगळा लेख म्हणून वाचला गेला असता तर अधिक अप्रिशिएट झाला असता असे वाटते.
बाकी, परत एकदा धन्यवाद.

माझे काही प्रचंड गाढे वाचन नाहीये. पण जे काही मी वाचायचे ते प्रचंड आवडायचे म्हणून वाचायचे. स्थळ-काळाचे-तहानभूकेचे भान विसरून. ते अर्थातच आता होत नाही. माझ्यासाठी फारश्या जबाबदार्‍या नसताना केलेले वाचन खरंच फार बेस्ट होते. मी प्रचंड गुंतून जायचे त्यात, मैत्रिणींशी/आईबाबांशी चर्चा करायचे. आता माझ्याच्यानेच खरंखुरं कागदांचे पुस्तक हातात धरून पूर्ण वाचून होत नाही. फार फार कॉन्संट्रेशन गोळा करावे लागते, परिस्थितीजन्य अडचणी दूर कराव्या लागतात (दोनच शांत तास मिळतात वगैरे).. गेले १०-१२ वर्षं मराठी वेबसाईट्स, इतरही इंग्रजी फोरम्स व आता डिजिटल पुस्तकं इत्यादीवर वाचन जास्त झाल्यामुळे कागदी पुस्तक वाचणे ४-५ पानांपलिकडे होईलच असं नाही. पूर्वी ३-४०० पानांची पुस्तकं पूर्ण रात्र जागून संपवली असताना ते खुपतं..
>>>>> अगदी अगदी. बस्के + १०००००००००००००००००००००००

अनेक अस्तित्वविषयक प्रश्न, सामाजिक स्तर, स्त्री-पुरुष जडणघडणीशी संबंधित प्रश्न ,पूर्वग्रह आग्रह,प्रभावविषयक प्रश्न,वाचनाचे मिथक ,तत्संबंधी प्रश्न या सर्वांची सरमिसळ झालेला एक डोह म्हणजे हा लेख. आवडला कारण एक आवश्यक मंथन त्यातून होतेय.
काही मुद्द्यांवर माझ्या प्रतिक्रिया देत आहे-
>>हे सगळे का? >>
>>एकीकडे माया आहे म्हणून जगाचा त्याग करण्याचा 'स्पिरिच्युअल' मार्ग चोखाळावासा वाटणे आणि दुसरीकडून मोहमयी दुनियेतील आकर्षणस्थाने आपल्याला त्यांच्याकडे खेचत राहणे या ताणाताणीची तक्रार एक आत्मा करू पाहात आहे>>>>
>>पूर्णता हे जेथे कोणतेही अस्तित्व नसते ते गाव. विश्वातील कोणत्याही मटेरिअलला किंवा एनर्जीला हे गाव गाठणे शक्य नाही. अस्तित्वहीन असे काहीही आपल्याला ज्ञात नाही आणि इतकेच ज्ञात आह की काहीही अस्तित्वहीन असू शकत नाही>>.

पूर्वार्धातले हे मुद्दे अस्तित्वविषयक आहेत ,स्वतःचे आणि जगाचे अस्तित्वच का? अस्तित्व म्हणजेच मी असल्याची जाणीव. जग असल्याची जाणीवही प्रत्येकापुरती या जाणिवेतूनच उगम पावते. रोज झोपताना मालवणारी जागताना सर्व संदर्भांसकट धारावाहिक मालिकेसारखी प्रकटणारी ही उपजत अन तितकीच गहन जाणीव आपले अस्तित्वही कोणाच्या तरी स्वप्नातले एक भंगुर विधान आहे की काय (पक्षी विधात्याच्या मायास्वप्नातले)असा प्रश्न आपल्यासमोर उभा करते.
मोह हा नैसर्गिक भाव आणि त्याचा त्याग हा अनैसर्गिक इलाज हे अध्यात्मातील प्रगतीसाठी आवश्यक दमन! ते न-नैतिक असावे असे मला वाटते.अस्तित्वाच्या उर्जेचा मोहांपाठीमागे लागताना होणारा र्‍हास थांबवून ती उर्जा आत्मशोधाकडे ,पूर्णतेच्या शोधाकडे वळवण्याचे उद्योग,प्रयोग..

>>असे अनुभव आले की माणूस प्रभावांचे आणखी थर स्वतःवर बसवून घेतो. जपजाप्यही करतो किंवा डिस्कोथिकलाही जाऊन नाचतो. त्याला 'तो स्वतः मूळ रुपात कसा आहे' याची जाणीव हाकलून द्यायची असते,...आणि अश्या माणसाचा 'डोह' होतो.>>>>

प्रत्येकजण एक डोह असतोच. मुद्दाम काही करावे लागत नाही. वाढीच्या प्रक्रियेत प्रभाव अनुस्युत असतात. ते फक्त संस्कृतीने लादले असते तर सोपे झाले असते बंडखोरीतून ते उधळणे.कित्येक प्रभाव नेणिवेत, जाणिवेत स्वत; होऊन स्वीकारले जातात..
>>भारतीय संस्कृतीतील स्त्री (बहुधा, ऐकीव ज्ञानानुसार) पाश्चात्य स्त्रियांच्या तुलनेत अधिक बद्ध असते. प्रभावित असते. तिची कर्तव्ये ठामपणे नोंदवलेली असतात, पिढ्यानपिढ्या पुढे राबवली जातील याची शहानिशा जातीने केली जात>>>>
स्त्रीचे अधिक बद्ध असणे अन पुरुषाचे तुलनेने अधिक मुक्त असणे यातून अंतिमार्थाने काहीही साध्य होत नाही असे मला वाटते..हे दोन्ही समतुल्य प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या आत्मिक विकासासाठी..
>>. त्या पुस्तकांमधून मिळालेली माहिती आज कचरा, पसारा वाटते याचा अर्थच हा होतो की तेव्हा आपण हिरीरीने जमवत असलेले ज्ञान, माहिती हे आपल्याला फक्त 'जमवावेसे' वाटत होते >>

वाचनाचे हेतू भिन्न असतात्.त्यातल्या एका वर्गाला हे लागू पडेल. सर्वच वाचन व्यवहाराला नाही.

>>ज्ञान स्वीकारणे कितपत थांबवता येईल? मिळवणे थांबवता येईल, पण जे आदळले कानावर ते कसे थांबवणार? आधीच्या स्मृती आपोआप रिलेट होणे कसे थांबवणार? >>>
>>कोणीतरी म्हणालेले आहे की 'एकदा एखादे ज्ञान मिळाले की पुन्हा 'ते ज्ञान नसणे' अशी अवस्था माणसाला शक्य नाही'. हे आपल्याला पटते बुवा. >>>
ज्ञान अन स्मृतींचा स्वीकार अस्वीकार हा अस्तिवाच्या स्वीकाराशीच निगडित मुद्दा.'जाणुनी नेणता' होण्याचा अभ्यास वाढवता येतो असे मला वाटते..

एक तर मी मायबोलीवर सगळ्या लिखाणाला प्रतिक्रीया देत नाही. त्यात इतक्या मोठ्या प्रतिक्रीयाही देत नाही. पण बस्के यांच्या लेखावर मी ती दिली. खरं तर माझ्या विचारप्रक्रीयेचं मी कोणाला समर्थन देऊ इच्छित नव्हते म्हणून तिथे 'रारला लेख कळला नाही' या वैयक्तीक टीकेवरही मी माझे मत व्यक्त केले नाही.
पण त्या लेखाचं रारचं इंटरप्रिटेशन काय, आणि तिला कसं लेख कळला नाहीये - यावर आता तिथेही नाही तर इथेही चर्चा होत आहे, त्यामुळे आता मला उत्तर देणं आवश्यक वाटतं.
नुसत्या भावनेच्या भरात समोरच्या लिखाणात नसेल त्या मुद्द्यावर चर्चा करण्याची परवानगी मला माझा मेंदू देत नाही.
भले त्या लिखाणातले सगळे मुद्दे मी माझ्या प्रतिक्रीयेत मांडीन असं नाही. पण मूळ लिखाण वाचल्याशिवाय आणि त्यावर विचार केल्याशिवाय मी सहसा मत देत नाही.
त्यामुळे 'मला लेखच कळला नाही' हे विधान हे माझ्या बुद्धीला आवाहन करणारे आहे...आणि त्यामुळेच कोणत्याही भावना वगैरे न ठेवता त्याला उत्तर दिले पाहिजे असं मला (माझ्या मेंदूला to be specific) वाटतं.

उदा. बस्केच्या लेखातला खालील भाग

का नाही जमत बाई तुला सेल्फ़ कंट्रोल? इतकं कसं या गोष्टींमध्ये वाहवून जायचे. इतकं कसं टेक्नॉलॉजीचे अ‍ॅडीक्शन? कॉन्संट्रेशनचा वाजलेला बोर्‍या दिसतोय ना? अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर होण्याइतपत मन घुटमळतंय इथेतिथे! घुसमट. घुसमट नुसती! का कशाला कोण जाणे. हा जो उगीच ताण जाणावतो कधी कधी, तो काय आहे? कशाचा आहे..

किती धावणार आपण? आणि कुठे निघालो आहोत? भस्मासूरासारखे सगळं घाईघाईने गिळंकृत करून नक्की काय हवंय आपल्याला? गुगल पूर्वीचे दिवस काय होते ते आठवले तर our version of Arabian nights असावे इतकी सुरस वाटेल. एखादी गोष्ट माहीत नसेल तर चक्क आपण त्या तश्या अज्ञानात झोपायचो? झोप लागायची आणि? हो हो ! कितीतरी शांत लागायची.
मग आता काय अडलंय .. नाही कळलं अर्धाच घसा का दुखतोय. नाही कळले थायरॉईड, फॉर दॅट मॅटर जगातल्या प्रत्येक कंडीशनचे सिम्प्टम्स आणि मी नाही स्वत:ला त्यात बसवून पाहीले. नाही कळते पोटातल्या बाळाचे प्रत्येक दिवसाचे माईलस्टोन्स. नाही मी शोधली घरातील यच्चयावत प्लंबिंग/कुकींग/फायनान्स-बजेटींग आणि व्हॉट नॉट अडचणींवरची उत्तरं.. नाही कळ्लं ज्या व्यक्तींबरोबर आपण शाळेत एक अक्षरही नाही बोललो त्यांनी लॉंग विकेंडला काय केलं .. नाही आत्ताच्या आत्ता कळलं आत्ता झालेला भूकंप किती रिश्च्टर स्केलचा होता. काय बिघडतं? नाही.. खरंच माणसाने क्युरिअस असावे किंवा ज्ञान मिळवावे वगैरे सगळं ठिक आहे. पण खरंच किती गोष्टी आपण वाचतो/वाचायला जातो ज्याची खरंच गरज असते. की आपण डोक्यात अनावश्यक कचरा निर्माण करतोय. कारण ती प्रत्येक गोष्ट कधीनाकधीतरी डोकं वर काढून आपलं (आपल्या डोक्यातले) अस्तित्व दाखवून देतेच. ताण ! ताण येतो मला माझ्या मनातल्या विचारांचा. माहितीच्या स्फोटाचा ताण येतो. आई बाबा पिढीचे बरं आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगातले बर्‍याच टेक्निकल गोष्टी टेक्निकली चॅलेंज्ड असल्यास स्किपच होतात. आपलं नाही ना तसं. मुद्दमहून शिक्षण घेतलंय या सगळ्याचं..कळतंच बरचसं. नाही कळलं तर कळून घेण्याची धडपड सुरू. कधी कधी वाटतं कम्प्लेसंट असावं ब्वॉ माणसाने. निदान आपल्याला आपल्या जिज्ञासेचा त्रास होतोय हे जाणवलं तरी कम्प्लेसंट व्हायला शिकावे. पैसा काय, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काय नि ज्ञान काय. किती हवंय, झेपतंय हे पाहूनच झोळीत घ्यावं.

हे टेक्नॉलॉजी, ओव्हरलोड ऑफ इनफॉरमेशन, वाह्वत जाणं, कॉन्संट्रेशनचा वाजलेला बोर्‍या ,माहितीच्या स्फोटाचा ताण येणं, मग आता काय अडलंय .. नाही कळली एखादी गोष्ट- हे मुद्दे बस्केच्या मूळ लेखात नसते तर मी माझ्या प्रतिक्रीयेत कधीही त्यांचा उल्लेख केला नसता. ह्या गोष्टी मूळ लेखात होत्या म्ह्णून आणि म्हणूनच मी त्यावर भाष्य केलं.

इतरांच्या प्रतिक्रीया आणि माझ्या, आणि माझ्यासारखं मत असणार्‍यांच्या प्रतिक्रीया सारख्या नसल्या म्हणजे लगेच 'कोणाला मूळ मुद्दाच कळला' नाही असं विधान करणं योग्य आहे का?
एकाच लेखाकडे पाहायचे वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात ना? इतकेही आपण लोकांच्या मताच्या, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या बुद्धीचा आदर करणार नाही का?

रैना +१.

<< इतरांच्या प्रतिक्रीया आणि माझ्या, आणि माझ्यासारखं मत असणार्‍यांच्या प्रतिक्रीया सारख्या नसल्या म्हणजे लगेच 'कोणाला मूळ मुद्दाच कळला' नाही असं विधान करणं योग्य आहे का?>> +१

टॅब्लेटच्या प्रतिक्रियेनंतर जी भीती व्यक्त केली ती का याचा शोध घ्यावासा वाटला आणि पहिलाच लेख हा सापडला. बस्के यांचा लेख काही पाहिला नाही. पण त्यांच्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा स्वतंत्र लेखाची उठाठेव करणे हा पोरकटपणा नाही का ? त्या लेखाखाली देता आलीच असती कि प्रतिक्रिया.

असो. रिझल्टस चांगले यावेत या सदिच्छा !! थोडं खोदकाम करायचा विचार होता.. पण आता गरज वाटत नाही. ती वाटलेली भीती का होती हे लक्षात आलं. Lol

रैना +१०० .... रैना +१०० .... रैना +१००
हे असे वाटतेय की रैनाने सेंच्युरी मारली.. Proud

बाकी प्रतिक्रियांनीच समाधान झाल्याने लेख मी काही वाचला नाही, पण एक आहे, बेफिकीर एवढे बरेच काही ते ही एक दर्जा राखून लिहू शकतात याचे कौतुक वाटते, जे वरचे लिखाण बघूनही वाटले.