चिलखत

Submitted by वैभव फाटक on 16 September, 2012 - 23:04

पाप भोगतो आहे कुठले ? समजत नाही
सुख आताशा चुकूनसुद्धा फिरकत नाही

कैसे झेलू मी काळाचे वार सारखे ?
मजपाशी आता दैवाचे चिलखत नाही

जिवंत आहे तुझ्यामुळे मी आज, अन्यथा
समईसुद्धा बिनतेलाची तेवत नाही

भेदभाव तू 'मनुष्य' जातीकडून शिकला
तुझ्यात असली कला ईश्वरा उपजत नाही

अपयशास तू जरी टाकले आहे मागे
नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही

मी मरताना, हळहळलेले तिला पाहु दे
यमा 'प्राण ने' खुशाल नंतर, हरकत नाही

वैभव फाटक ( १६ सप्टेबर २०१२)

http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/09/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम....

वैभव,
किती सुंदर आहे प्रत्येक शेर !

मला वाटते 'वैभव' नावातच काहीतरी दडलेले असावे.

जबरदस्त गझल, वैभव !

भेदभाव तू 'मनुष्य' जातीकडून शिकला
तुझ्यात असली कला ईश्वरा उपजत नाही

मी मरताना, हळहळलेले तिला पाहु दे
यमा 'प्राण ने' खुशाल नंतर, हरकत नाही

ह्या दोन शेरांसाठी तुला सलाम!!

वैभवराव प्रत्येक शेर ग्रेट करतात !!................. असे काल वैवकु मला म्हणाले ते तुमच्याबद्दल बोलत होते हे मला आत्ता ही गझल वाचून समजले
मस्त
वा वा

अपयशास तू जरी टाकले आहे मागे
नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही

चांगला शेर.

शेवटचाही छान, पण खयाल नेहमीचाच वाटला.

शुभेच्छा!

भेदभाव तू 'मनुष्य' जातीकडून शिकला
तुझ्यात असली कला ईश्वरा उपजत नाही

व्वा!!!!

चांगली झाली आहे गझल.

अपयशास तू जरी टाकले आहे मागे
नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही

मी मरताना, हळहळलेले तिला पाहु दे
यमा 'प्राण ने' खुशाल नंतर, हरकत नाही

>> छान!

भेदभाव तू 'मनुष्य' जातीकडून शिकला
तुझ्यात असली कला ईश्वरा उपजत नाही

अपयशास तू जरी टाकले आहे मागे
नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही
>>

वा छान शेर आहेत

वैभव फाटक,
गझल वाचली. बरी वाटली. काही गोष्टी मला तरी खटकल्या.
गुळमुळीत प्रतिसाद देणे, माझा स्वभाव नाही व हवेत गोळीबार करणे, दुस-याची री पुढे ओढणे मला जमत नाही, म्हणून स्पष्टपणे लिहीत आहे...........

मतला.....शेर नंबर १..........
पाप भोगणे व सुखाचे फिरकणे.........नाही बुवा पटले नाते!
शेर नंबर २.........
शेर सुमार, विधानात्मक व सपाट वाटला. तुला सुचलेला आशय ठीक वाटतो, पण अभिव्यक्ती दुर्बल वाटली.

शेर नंबर ३...........
दुसरी ओळ छान! पहिली ओळ दुस-या ओळीला अजिबात न्याय देणारी वाटली नाही.

शेर नंबर ४......
ठीक वाटला. पहिली ओळ अजून लालित्यपूर्ण करता आली असती.
‘तू शिकला’ ऎवजी ‘तू शिकलास’ असे हवे.

शेर नंबर ५..............
संदिग्ध खयाल! अपयशास मागे टाकले.........अर्थबोध होत नाही.
दोन्ही ओळीतून स्पष्ट अर्थबोध होत नाही. शेर थेट असायला हवा, अधांतरी नव्हे!
‘तू मागे टाकले आहे’ ऎवजी ‘तू मागे टाकले आहेस’ असे हवे.

शेर नंबर ६...........मूळ खयालच केविलवाणा वाटला, हृद्य वाटला नाही!
पाहु दे ऎवजी पाहू दे असे हवे.
.................................................................................................
वरील शेरनिहाय दिलेल्या माझ्या वैयक्तीक मतांनुसार तुझी ही गझल मी अशी वाचली...............

शाप कुणाचा भोगत आहे? समजत नाही!
उ:शापाचा किरण एकही फिरकत नाही!!

जिवावरी मी उदार होतो! वार झेलतो!
मजपाशी आता कुठलेही चिलखत नाही!!

प्राणज्योत, ही कशी तेवते तुझ्याविनाही?
समई सुद्धा बिनतेलाची तेवत नाही!

भेदभाव करतात माणसे!....मला वाटते;
तुझ्यात असली कला ईश्वरा उपजत नाही!

तुझी तुझ्याशी स्पर्धा आहे! नकोस विसरू.....
हार, जीत.....इतकी मर्यादित शर्यत नाही!

उधळू दे मज प्राण तिच्यावर......एकच इच्छा!
यमा, मला ने खुशाल नंतर, हरकत नाही!!

.........प्रा. सतीश देवपूरकर

टीप: वैभव! हा मी माझा वैयक्तीक प्रांजळ प्रतिसाद तुला दिलेला आहे. इतर अनेक सात्विक आत्म्यांची चिवचिव/कावकाव यावर ऎकू येईल, हे मी जाणतो. पण, मी असल्या कोणत्याही चिवचिवाटाला वा कावकावीला भीक घालत नाही. हा मामला तुझ्या व माझ्यातला आहे, तुझ्या या गझलेवरचा आहे! प्रत्येक जण आपला प्रतिसाद आपापल्या वकूबानुसार देत असतो. तुझे स्वत:चे मत मला वाचायला आवडेल!
................प्रा.सतीश देवपूरकर

अपयशास तू जरी टाकले आहे मागे
नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही

मी मरताना, हळहळलेले तिला पाहु दे
यमा 'प्राण ने' खुशाल नंतर, हरकत नाही

>>>
वाह! सुंदर!

प्राध्यापक साहेब,
माफ करा...स्पष्टच सांगतो...आपण दिलेल्या पर्यायी शेरांमधला एकही शेर मनाला भावला नाही..
तुमचा तिसरा शेर थोडाफार माझ्या मूळ विषयाला उलगडतो... बाकी सर्व शेरातील आशय वेगळाच आहे..
माझे खयालच जर बदलणार असतील तर त्या पर्यायी शेरांचा काय फायदा... नाही का ???
तेंव्हा एकही शेराचा स्वीकार न करता आल्या पावली सगळेच्या सगळे मी साभार परत पाठवत आहे...
धन्यवाद...

प्राध्यापक साहेबांसाठी -

कर्तरि, कर्मणि प्रयोग असतात ना... तो फरक आहे 'टाकले' आणि 'टाकलेस' अन 'शिकला' आणि 'शिकलास' मध्ये.
म्हणजे वैभवला इथे -

"भेदभाव शिकला" म्हणायचं आहे, ''तू शिकलास" नाही..

आणि

"अपयशास टाकले" म्हणायचं आहे, "तू टाकलेस" नाही.

====================================================

इतक्या वेळा साभार परत मिळूनही काय सोस आहे तुम्हाला 'पर्यायी' देण्याचा! हे पाहून तुमच्या चिवटपणाला दाद द्यावीशी वाटते, पण देणार नाही.. उगाच तुम्ही गांभीर्याने घ्याल !

वैभव फाटक!
मी दिलेले शेर आवडण्या न आवडण्यासाठी, वाहवा/निंदा करण्यासाठी नव्हते.
तुझ्या प्रत्येक शेरात मला काय त्रुटी जाणवल्या, काय खटकले ते मी शेर निहाय स्पष्ट लिहिले होते. त्यावर विचार केलास का? पर्यायी शेर ही दूरची बात झाली.
मी हे जे शेर दिलेत ते काही माझ्यासाठी वा माझे म्हणून दिले नव्हते.
ते एक demonstration होते, जाणवलेल्या त्रुटी कशा काढल्या जावू शकतात याचे.

समईचा शेर तुझा व मी दिलेला, कोणत्याही तज्ञ माणसास (तथाकथित तज्ञांना नव्हे) दाखव, उत्तर तुला मिळेल.

मी प्रतिसाद देताना गझलेच्या बहिरांगाबरोबर अंतरंगाचाही विचार करून तो दिलेला असतो. जिथे खयालच बदललेला दिसेल, तिथे तुझ्या मूळ खयालातच कमजोरपणा आहे, म्हणून खयाल बदलावा लागला. मला वाटले होते, तू समंजसपणे प्रतिसादाचा सखोल अभ्यास करशील. पण, असो. इथे मी काही शिकवू पहातो आहे असा तुझा समज असेल तर तो चुकीचा आहे. तुला जर फक्त वाहवा, छान, लाजवाब, बिनतोड, सलाम, हटके, सुंदर, ग्रेट असेच शेरे अपेक्षित असतील व आवडत असतील तर माझा नाईलाज आहे! कामयाब शेराच्या यातना मी भोगलेल्या आहेत! म्हणून सांगितले! तुला जर तोंडपुज्या प्रतिसादांच्या व प्रतिसादकांच्या गर्दीतच हरवायचे असेल तर मी इतकेच म्हणेन देव तुझे भले करो. कलेत अहंकारास जागा नसते, इतकेच सांगतो.

मी म्हटल्याप्रमाणे कावकाव/चिवचिव थोडी का होईना झालीच, पण मला त्याने काहीही फरक पडत नाही. असो.

आता शेर साभार परत पाठविण्याबाबत.............
मी शेर लिहिले ते काही कुणी स्वीकारावेत, छापावेत, नावाजावेत म्हणून दिलेच नव्हते. तो एक विचारप्रवर्तक, शेरांतून दिलेला पद्य प्रतिसाद होता. आता प्रतिसादकाला प्रतिसाद परत करणे म्हणजे वाढदिवसाला दिलेली प्रेमळ वस्तू, आवडली नाही, हलकी आहे, माझ्या योग्यतेची नाही, असे म्हणून परत करण्यासारखे असते. भावना महत्वाच्या असतात. अन्न आवडले नाही म्हणून ताटावरच्या ताटावरच अन्नास नावे ठेवीत नाहीत. असो. हा संस्काराचा प्रश्न आहे, सौजन्याचा प्रश्न आहे!
>...........प्रा.सतीश देवपूरकर

तिथे तुझ्या मूळ खयालातच कमजोरपणा आहे>>> साफ चूक आहे हे वाक्य

कामयाब शेराच्या यातना मी भोगलेल्या आहेत!>>>> स्वताच्या शेरास स्वतः कामियाब म्हणवून घेतल्यानंतर इतरांकाडून ज्या यातना होतात त्या ...असे म्हणायचे आहे का सर?...मग बरोबर असेल !!

समईचा शेर तुझा व मी दिलेला, कोणत्याही तज्ञ माणसास (तथाकथित तज्ञांना नव्हे) दाखव, उत्तर तुला मिळेल.>>>>>>>>> @ वैभवराव : मी तज्ञ नसल्याने (स्वकथित तर मुळीच नै!!)प्लीज मला याबाबत विचारू नका प्लीज!!

असो सर्वान्चे आभार

वैवकु, तुम्ही कसले मधेच आभार मानताय? गझल वैभव फाटकांची, प्रतिसाद प्रोफेसर साहेबांचे आणि रणजीतचे!

आणि 'सर्वांचे आभार' म्हणताय तुम्ही Biggrin

=====================================

तुझी तुझ्याशी स्पर्धा आहे! नकोस विसरू.....
हार, जीत.....इतकी मर्यादित शर्यत नाही!<<< सुंदर शेर आहे प्रोफेसर साहेब!

प्रोफेसर साहेब,

वैभव फाटक (माझ्या अंदाजाने) गझल लेखनात थोडे नवीन असावेत. त्यामुळे वृत्त हाताळणी योग्य असली तरी प्रवाहीपणा व सफाई थोडी कमी पडत असावी. मला वाटते आपण 'खयाल तेच ठेवून सफाईदार कसे लिहिता आले असते' अश्या प्रकारे मार्गदर्शन केलेत तर त्यांना योग्य उपयोग होईल त्या सल्ल्याचा. आपल्याला काय वाटते?

आपल्या काही मुद्यांवर वेगळा प्रतिसाद देतो.

-'बेफिकीर'!

छे: छे: ! मी मलाच आवरायला सांगतोय देवाला.. बघ माझी अवस्था -

DesiSmileys.com

हे देवपूरकर साहेब म्हणजे नॉनस्टॉप स्टँण्डींग कॉमेडी होत चालले आहेत !!

मुद्दा हा आहे बेफिजी की, वैभवने मार्गदर्शन मागितले आहे का ? त्याचे पोट भरलेले असेल, त्याचे पोट बिघडलेलेही असेल अश्या वेळी "हे खाऊन पाहा... जास्त स्वादिष्ट आहे/ पौष्टिक आहे" असं म्हणून समोर वाढावं का ? आणि मग त्याने नाकारलं तर राग का यावा..?

हे मार्गदर्शन आहे, आग्रह आहे की जबरदस्ती आहे ?

आणि मी म्हणतो; जे काही आहे, ते खाजगीत चालू द्यावं की आमच्या डोक्याला का खुर्राक ?

प्रोफेसर साहेब,

आपले हे मतः

>>>शेर नंबर ५..............
संदिग्ध खयाल! अपयशास मागे टाकले.........अर्थबोध होत नाही.
दोन्ही ओळीतून स्पष्ट अर्थबोध होत नाही. शेर थेट असायला हवा, अधांतरी नव्हे!
‘तू मागे टाकले आहे’ ऎवजी ‘तू मागे टाकले आहेस’ असे हवे.
<<<

हे मत वैभव फाटकांच्या या शेराबाबत आहे:

>>>अपयशास तू जरी टाकले आहे मागे
नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही <<<

वैभव म्हणत आहेत की (कवीला, कोणालातरी) अपयश गाठू पाहात आहे. पण त्या शर्यतीत ती व्यक्ती अपयशाला मागे टाकून पुढे निघालेली आहे. पण म्हणून काँप्लेसंट होणे योग्य नाही, निव्वळ अपयश मागे पडले आणि यशोगाथा आरंभली म्हणून विकास थांबवू नये, प्रयत्न थांबवू नयेत, असे म्हणायचे आहे / असावे.

'तू मागे टाकले आहेस' या आपल्या सल्ल्यातील 'स' योग्यच आहे. (यालाच सफाईदार असणे / नसणे असे मी म्हणतो व त्याबाबत आधीच्या प्रतिसादात लिहिले आहे).

मला असेही वाटते की या शेरातील खयाल त्या वृत्तासमोर अपुरा आहे. म्हणजे:

पहिल्या ओळीत फक्तः

१. टाकलेस अपयश मागे (गागागा गागा गागा)

किंवा

२. पडले अपयश मागे (गागा गागा गागा)

असे लिहूनही पहिल्या ओळीतला खयाल पूर्ण झाला असता. (म्हणजे 'नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही' हा खयाल मांडायला जश्या २४ मात्रा आवश्यक ठरतात - या वृत्तानुसार - तश्या आधीच्या ओळीतील खयालासाठी तितक्या मात्रांची ओळ आवश्यकच नाही आहे). (पण वृत्त पाळायचे असल्याने भरीचे शब्द यायला लागतात). (जसे पहिल्या ओळीत 'टाकलेस' असे घेतले तर 'तू' या शब्दाची आवश्यकताच नाही आणि पुढच्या ओळीत 'नकोस थांबू' असल्यामुले पहिल्या ओळीत 'जरी' हा शब्द नाही घेतला तरी - मी वर सुचवल्याप्रमाणे - निव्वळ 'टाकलेस अपयश मागे' किंवा 'अपयश पडले मागे' हेही पुरेसे ठरेल).

पण हेच बघितले जायला हवे. आपण जो विचार ओळीत मांडत आहोत तो मांडण्यासाठी ती ओळ कमी आहे का, फार लांब आहे का? लांब असली तर खयाल अधिक धारदार, टोकदार वा व्यापक होण्यासाठी काही करता येईल का, वगैरे. सहसा सुरुवातीच्या काळात वृत्तात लिहिता येणे ही उपलब्धी भासत असल्याने याकडे किंचित दुर्लक्ष होऊ शकते व या विधानातून वैभव फाटकांवर काही म्हणायचे नाही याची खात्री असू द्यावीत. हे विधान निव्वळ 'जनरल' आहे.

वैभवने मार्गदर्शन मागितले आहे का ?<<<

असे आहे रसप, की मैत्रीखातर गझलकार एकमेकांना आंतरजालावर सुचवण्या करत राहतात. अगदी खराखुरा प्रतिसाद कोणाच्या गझलेवर द्यायचा झाला तर गझलकारांचे धैर्य निर्माण होण्याआधीच खच्ची होईल.

पण प्रोफेसर साहेबांना दुसर्‍याचा अपमान करायचा नसतो, त्यांना स्वतःची मते लादायचीही नसतात, ते फक्त खुमखुमीतून बरेच मोठे प्रतिसाद देत बसतात. ज्याला ते प्रतिसाद नको आहेत त्याने 'धन्यवाद प्रोफेसर साहेब, पण मी आपल्या सूचना अपेक्षित करत नाही आहे' असे लिहून मोकळे व्हावे Happy

>> 'धन्यवाद प्रोफेसर साहेब, पण मी आपल्या सूचना अपेक्षित करत नाही आहे' <<

बेफि़जी,

हेच तर वैभवने म्हटले आहे ना ? (माझ्या एका गझलेवर मीही असंच म्हटलं होतं) पण (दोन्ही वेळेस) पर्यायी शेर नाकारल्यावर प्रोफेसर साहेबांचा पवित्रा आक्रमक झालेला दिसतो. ते मला पटत नाही. कुणी काही मागितलेले नसताना जर आपण काही देऊ करत असलो तर ते नाकरले गेल्यास वाईट मानून का घ्यावे ?

प्राध्यापक साहेब,
आपला गैरसमज होत आहे.
आपण आपल्या प्रतिसादात माझ्याबद्दल
"तुला जर फक्त वाहवा, छान, लाजवाब, बिनतोड, सलाम, हटके, सुंदर, ग्रेट असेच शेरे अपेक्षित असतील व आवडत असतील तर माझा नाईलाज आहे! "
असे लिहिले आहे...जे साफ चुकीचे आहे...

आजपर्यंत मी मायबोलीवर २० एक रचना टाकल्या असतील पण एकही रचनेवर एकाही वाचकाला मी प्रतिसाद असा लिहू नका..तसा लिहा.. चांगला लिहा अशा किंवा असल्या विनंत्या अथवा सूचना केलेल्या नाहीत...आणि याची हमी देतो की भविष्यात करणारही नाही.
मी फक्त आपले पर्यायी शेर देऊ नका असे म्हटले आहे...आणि ते माझे ठाम मत आहे.
आपण माझ्या गझलेवर आपल्याला जो योग्य वाटेल तो प्रतिसाद जरूर द्या. जरी तो मला पटलेला नसेल तरी त्याचा माझ्याकडून नेहमीच आदर केला जाईल.कारण ते एका रसिकाचे मत आहे.
पण पर्यायी शेर देऊ नका प्लीज. मला त्यात काहीही स्वारस्य नाही.
पुन्हा एकदा सांगतो सर्व गैरसमज सोडून देऊन गझलेवर लक्ष केंद्रित करूया.
धन्यवाद.

Pages