स्वैर त्याची ही कहाणी...

Submitted by बागेश्री on 15 September, 2012 - 00:42

आला आला हा पाऊस
नको एकटी जाऊस,
सखे, उनाड हा द्वाड
तुज पाडेल भरीस...
जरी सखा हा लाडका
पण नाठाळ गं भारी,
सांभाळून वाट चाल
आहे लबाड रंगारी..

स्वैर रूप तो धारिता
राधा तूही रंगशील,
रंग त्याचा तुझा एक
कशी विलग होशील?
बरसेल आसुसून
तुज करील बेधुंद,
परि सावर स्वतःला
नको होऊस बेबंद..

क्षणी भान तू हरता
त्याचे आयते फावेल,
चिंब तुजला करून
मनाजोगते साधेल...
वारा मदतीस त्याच्या,
तुझा पदर ढाळाया..
धाव- धावशील कोठे?
चराचरी त्याची माया

तुझे वेड त्याला आहे,
जशी त्याची तू दिवाणी
परि जप तुज सखे,
लाज राखूनिया मनी...
आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!!

-ब्लॉगवर पूर्वप्रकाशित- http://venusahitya.blogspot.in/2012/09/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages