५० वर्षांनंतरची मराठी कशी असेल?
५० वर्षांनंतर मराठी भाषकांपैकी ९५% पर्यंत युवक आणि ७५% पर्यंत प्रौढ किमान दोन भाषा जाणणारे असतील - एक मराठी आणि दुसरी इंग्रजी. आपल्याला मराठी येते असं म्हणणार्या तरुणांपैकी बहुतांश जणांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असेल त्यामुळे ते अगदी जेमतेमच मराठी लिहू किंवा वाचू शकतील. त्यांची बोली भाषा 'मिंग्लिश' असेल. मराठी प्रसार माध्यमंही 'मिंग्लिश' भाषेचाच प्रामुख्याने वापर करतील. 'शुद्ध' मराठीचा वापर अगदी मर्यादित राहिल आणि तिचं स्थान जवळपास एक classical भाषा असं झालेलं असेल. [संस्कृत किंवा लॅटिन प्रमाणे].
शाळा-कॉलेजातून मराठी साहित्य विषयाची निवड करणार्यांसाठी contemporary आणि classical असे दोन पर्याय उपलब्ध असतील. classical मराठी विषय घेणार्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती दिली जाईल.
सरकारी कारभारात मराठी वापरण्याचा अट्टाहास टिकून राहील परंतु शासनाकडून येणारं प्रत्येक पत्र किंवा नमुना-पत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषात पाठपोट किंवा एकाखाली एक [सध्या रेल्वे आरक्षणाचा फॉर्म हिंदी आणि इंग्रजीत असतो त्याप्रमाणे] असेल. शासनाकडून दरसाल उत्कृष्ट मराठी पुस्तकांना पुरस्कार देण्याची प्रथा सुरू राहिली तरी त्यातही contemporary आणि classical असे दोन विभाग असतील. classical मराठीत निर्माण होणारी वर्तमानपत्रं, नियतकालिकं, चित्रपट आणि संगीत या सर्वांना सबसिडी आणि \ करपरतावा देण्याची योजना सरकारला सुरू करावी लागेल.
छापील वर्तमानपत्रं किंवा साहित्य 'नेट'च्या वैकल्पिक स्वरूपात उपलब्ध असेल आणि ती व्र्तमानपत्रं किंवा पुस्तकं 'नेट-साहित्या'पेक्षा खूपच महाग असतील. 'नेट'वरही 'द्वैभाषिक' म्हणजे 'मिंग्लिश' आणि 'मराठी' असे दोन पर्याय उपलब्ध असतील. 'शुद्ध' मराठी भाषेत प्रसिद्ध होणारं ललित साहित्य बहुतांशी अनुवादित असेल आणि मुळात मराठी भाषेतून लिहिलेलं साहित्य एकाचवेळी मराठी आणि इंग्रजी अशा दोन versions मध्ये प्रकाशित करण्याचा प्रघात रुळलेला असेल. मराठी समीक्षा फक्त प्राध्यापक लिहितील आणि ती फक्त प्राध्यापकच वाचतील. मराठी वर्तपानपत्रं आणि नियतकालीकांमध्ये नव्या मराठी पुस्तकांच्या फारतर जाहिराती येतील, परीक्षणं येणार नाहीत. मराठी चित्रपट आणि टिव्हीवरचे कार्यक्रम यांच्यावर तुलनेनं जास्त काही लिहिलं जाईल. मनसे सारख्या स्वभाषा- अभिमानी संघटना आपलं आस्तित्व टिकवून ठेवतील पण अधूनमधून 'रस्ता रोको' आणि 'राडा' करण्यापलीकडे त्यांना फारसं काही काम उरणार नाही कारण उपजीविकेसाठी इंग्रजी शिकणं आणि वापरणं अनिवार्य झालेलं असेल. 'पोट आधी, मातृभाषा नंतर' हे तत्व जनमानसात रुळलेलं असेल.
-प्रभाकर [बापू] करंदीकर.
५० वर्षांनंतरची मराठी
Submitted by pkarandikar50 on 12 September, 2012 - 01:00
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर, पटले बरेचसे. धन्यवाद
सुंदर, पटले बरेचसे. धन्यवाद
बापूसाहेब हेही एक डोळ्याखालून
बापूसाहेब हेही एक डोळ्याखालून घाला अशी विनंती
नाही पटला
नाही पटला
बापू, येत्या ५० वर्षात
बापू, येत्या ५० वर्षात महाराष्ट्रातील खेडोपाड्यात इंग्रजी शिकण्याची सोय झालेली असेल, असे वाटते का, खरेच ?
परीस्थीती एवढी वाईट नाहीय हो.
परीस्थीती एवढी वाईट नाहीय हो. भाषा हि माणासाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यात बदल होत असतातच; आज आपण प्राकृत बोलत नाही ना? शासनाला बाजुला ठेवून, आपण स्वता: किती मराठी वाचतो, बोलतो, ह्यावर मराठीचं भवितव्य अवलंबुन आहे. आणि नुस्ती "मायबोली" ची गेल्या काही वर्षांतली प्रगती, इतर मराठी ब्लोग्ज हे नक्कीच आशादायक आहे. आपणच आपल्या मुलाबाळांना मराठीची गोडी लावायला हवीय. इंग्रजी माध्यमात शिकणारे किती भयानक, कच्च आणि दर्जाहीन इंग्रजी बोलतात हे दाखवून द्यायला हवय. मराठी माणुस मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सोडून दुरदेशी जाउ लागलाय. त्यामुळे त्याला आपली भाषा आपली संस्कृती ह्याच अधिकच महत्व वाटतय.
आपण एक एक आपला खारीचा वाटा उचलुय, आपला मायमराठीला अमर करुया.
मंडळी, माझ्याकडून किंचित
मंडळी,
माझ्याकडून किंचित अतिशयोक्ती झाली असेल, कबूल. पण ती ती अगदीच अनाठायी नव्हती.
एक म्हणजे, मी आशा / निराशा अशा कोणत्याच 'वादी' भूमिकेतून हे स्फुट लिहिले नव्हते. शरीर शास्त्राचासुद्धा नियम आहे की ज्या अवयवाची उपयुक्तता संपते, तो अवयव कालांतराने झडून जातो. उदा. माणसाचं शेपूट. तसंच भाषांचंही झालं तर त्यात खेद / आनंद मानण्यासारखं विशेष काही नाही. मानवाच्या उत्क्रांतीत अनेक भाषा अशा प्रकारे यापूर्वी लुप्त झाल्या आहेत आणि इथून पुढे ही प्रक्रिया बंद पडावी असं काही कारण दिसत नाही. मराठी भाषेची उपयुक्तता संपण्याची एक शक्यता मला जाणवली इतकंच. कदाचित ५० वर्षात नाही पण १०० वर्षात? कुणी सांगावं? बदलाची दिशा स्पष्ट नाही का?
दुसरं असं की. ज्या झपाट्याने 'बदलांचा वेग' [Rate of Change] गेल्या ५० वर्षात वधारला आहे [आणि तो बेटा सारखा वधारतोच आहे] तो पहाता ५० वर्षे हा खूप मोठा कालखंड आहे. पुढे काय काय घडणार आहे याचा नेमका अंदाज बांधणं खरंच फार कठीण काम आहे. खेडोपाड्यातून इंग्रजी शाळा नक्की निघतील किंवा नक्की निघणार नाहीत हे सांगणं अशक्य वाटावं अशीच परिस्थिती आहे. प्रश्न फक्त शाळांचा आहे का? जर सार्वत्रिक इंग्रजी शिक्षणाची सोय झाली तर कोणी मराठी शिकणारच नाही असं गृहीत धरायचं का?
तिसरं असं की ५० वर्षांनंतर मी नक्कीच जिवंत नसणार. मग त्यावेळी मराठी भाषेचं स्वरूप काय असेल याविषयी मी आजच चिंतातूर होण्याचं खरं म्हणजे काहीच कारण नाही.
आणखी एक असं पहा की मायबोली किंवा माय विश्व यांसारख्या portalsची लोकप्रियता वाढते आहे हे मान्य पण यावरून, मराठी भाषेची लोकप्रियता [किंवा उपयुक्तता] सिद्ध होते असं मला तरी वाटत नाही. तंत्रज्ञानामुळे एक नवीन साधन आपल्याहाती लागलं आहे एव्हढाच त्याचा अर्थ. ज्यांना मराठी भाषेतून व्यक्त व्हावंसं वाटतं अशांसाठी हे एक नवं माध्यम उपलब्ध झाल्यामुळे मराठीतून व्यक्त होऊ इच्छिणार्यांची संख्या वाढते आहे किंवा वाढणार आहे असा निष्कर्ष यातून निघतो का? शिवाय अशा पोर्टल्स वरची मराठी हळू हळू 'मिन्ग्लिश' कडे झुकत चाललीय हे तुम्हाला जाणवतंय का?
बेफिकीर यांचं http://www.maayboli.com/node/34707 हे स्फुटही मननीय आहे. त्याला मी अशी प्रतिक्रिया दिली आहे:-
बहुतांशी सहमत आहे. प्रश्न मराठी माणसाच्या बर्यावाईट गुणांपेक्षाही त्याचा अर्थकारणावर असणार्या प्रभावाचा आहे. मराठी उद्योजक आणि व्यापारी यांची संख्या आणि आर्थिक बळ मर्यादित आहे आणि ते इथून पुढे वाढण्याची शक्यता दिसत नाही.चाकरमान्यांची संख्या आणि महत्व दिवसेंदिवस वाढतं आहे पण ते 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी' या तत्वाने चालणार यात नवल नाही.
शेतकरी आणि शेतमजूर यांची टक्केवारी खूप मोठी असली तरी आपल्या राज्याच्या उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा सातत्यानं घटतो आहे. कृषी क्षेत्राच्या वाढीचा दरही खूप कमी आहे. त्यामुळे या मंडळींचा राज्याच्या अर्थकारणावरचा प्रभाव खालावत चालला आहे. संख्याबळामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात अजूनही भरपूर महत्व आहे हे खरं पण राज्याचं झपाट्याने नागरीकरण सुरू आहे आणि आता नागरी लोकसंख्येची टक्केवारी जवळपास निम्म्यावर जाऊन ठेपली आहे. महानगरं फुगतायत आणि त्यापेक्षा थोडी लहान शहरंही खूप वेगानं विस्तारत चालली आहेत. नागरी क्षेत्रातलं दरडोई उत्पन्न ग्रामीण क्षेत्राच्या तुलनेनं जस्त आहेच परंतु वाढीचा वेग ही खूपच जास्त आहे. ज्या नागरी क्षेत्रात आणि अकृषिक क्षेत्रात अशा तर्हेनं आर्थिक बळ केंद्रीत होतं आहे, त्या क्षेत्रात मराठीपेक्षा इंग्रजीला जास्त महत्व आहे ही वस्तुस्थिती आहे. हे trends किंवा कल ओसरण्याचं चिन्ह नाही.
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर सर्वात जास्त प्रभाव अर्थकारणाचा असतो हे [कुणाला हे मार्क्सिस्ट तत्वज्ञान आहे असं वाटलं तरी] नाकारता येणार नाही. हे वास्तव लक्षात न घेता 'मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे का?' असा टाहो फोडण्यानं काहीच साध्य होणार नाही.
-प्रभाकर [बापू] करंदीकर.
@दिनेशदा | 12 September, 2012
@दिनेशदा | 12 September, 2012 - 11:07 नवीन
बापू, येत्या ५० वर्षात महाराष्ट्रातील खेडोपाड्यात इंग्रजी शिकण्याची सोय झालेली असेल, असे वाटते का, खरेच ?<<
आता १ली पासूनच इंग्रजी विषय शिकविला जातो असे कलते.
थोबाडपुस्तकावरून
थोबाडपुस्तकावरून साभार....
बालगीत (शासकीय मराठीत) पु.ल. कृत
चंद्रम्या चंद्रम्या
श्रमलास का ?
निंबतरूपार्श्वी
लुप्तलास का ?
निंबफलपादप करवंदी
मातुलप्रासाद चिरेबंदी
मातुलप्रासादी आगमुनी जा
घृत न शर्करा भक्षुनी जा
घृती मक्षिका हो पतिता
चंद्रमा राही अभक्षिता
>>>> बालगीत (शासकीय मराठीत)
>>>> बालगीत (शासकीय मराठीत) पु.ल. कृत
शासकीय????
हे बनविणार्याला बहुधा "(पेठी मराठीत)" असे लिहीणे अपेक्षित असावे, घाबरला असेल बिचारा म्हणून "(शासकीय मराठीत)" असे म्हणाला!
[पण खर पहाता शासनाचा अन सन्स्कृत वा संस्कृतोत्भव संस्कृतीचा काही संबंध असतो अशा भ्रमात आम्ही नाहीच! त्यामुळेच त्याचे हे पुणेरीपेठीच्या ऐवजी शासकीय असे लिहीण्याचे बिन्ग फुटले ]
लिम्बू महाराज की जय! अहो कुठे
लिम्बू महाराज की जय! अहो कुठे होतात लिम्बूभौ... तुमची अनुपस्थिती किती जाणवली माहिताय?
येलकम..
लिंबुजी, ते गाणे खुद्द पुलनी
लिंबुजी, ते गाणे खुद्द पुलनी लिहिले आहे.
मनसे सारख्या स्वभाषा- अभिमानी संघटना आपलं आस्तित्व टिकवून ठेवतील पण अधूनमधून 'रस्ता रोको' आणि 'राडा' करण्यापलीकडे त्यांना फारसं काही काम उरणार नाही कारण उपजीविकेसाठी इंग्रजी शिकणं आणि वापरणं अनिवार्य झालेलं असेल.
तुमच्या तोंडात साखर पडो.