उत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती

Submitted by नरेंद्र गोळे on 7 September, 2012 - 09:57

उत्तराखंड हिरवागार आहे. असंख्य वनस्पतींनी सदाबहार सजलेला असतो. त्यातील काही निवडक वनस्पती, ज्या मला विशेष वाटल्या आणि ज्यांची प्रकाशचित्रे जरा तरी बरी काढू शकलो आहे ती इथे देत आहे. मला जाणीव आहे की हल्ली जी प्रकाशचित्रे पेश केली जात आहेत, त्यांच्या मानाने ती कदाचित एवढी उल्लेखनीय नसतीलही पण प्रातिनिधिक आहेत.


ह्या मनोर हाऊस मध्ये आम्ही उतरलेलो होतो.


हे झाड जकारांडा असल्याचे मला नंतर कळले.


आणि ही काफळे. बोरांसारखी दिसणारी तांबडी. पण मला फारशी आवडली नाहीत. पाठीमागे दिसणारी हिरवी फळे आहेत जर्दाळू. ते मात्र मला जाम आवडले होते. इतरांनाही.


देवदारू वृक्ष (कोनफळाचे झाड, कोनिफरस पाईन)

गडद हिरव्या रंगांची सुईसारखी पाने असलेले हे कोनफळाचे वृक्ष, सदाहरित असतात. त्यास महादेवास प्रिय असलेला पवित्र वृक्ष मानतात आणि त्याच्या खोडाचा चंदनाप्रमाणे उपयोगही करतात. उंच वाढणार्‍या ह्या वृक्षास, वरवर जावे तसतशा आखूड होत जाणार्‍या क्षैतिज-आडव्या फांद्या असतात. त्यामुळे झाडाचा आकारही दुरून, उभ्या कोनासारखाच दिसतो.


कोनफळे


ही आहेत आणखी एका वेगळ्या प्रकारची कोनफळे.


उत्तराखंडात मोठी थोरली ईडलिंबे मिळतात. त्या लिंबांचे सरबत म्हणजे ’शिकंजी’. त्याचीच ही जाहिरात.


हे झाड जंगली बदामाचे आहे. तिकडे ह्याला ’कठाळ’ म्हणतात.


लिचीची ही झाडे कॉर्बेट स्मृतीसंग्रहालयासमोरची आहेत.


आपला फणस तिथेही दिसला म्हटल्यावर, फणसाला सुद्धा बरे वाटले.


हे वृक्ष हरिद्वारचे आहेत. साधना म्हणते की ही रुद्राक्षे आहेत.


खरे तर आळकुड्या आणि रताळी आपल्याकडेही मिळतात. पण म्हणून काही त्याची कोणी चाट करून खात नाही! पण तिथल्या अंदाजाने आपल्याला नव्या पाककृती सुचल्या तर हव्याच आहेत की.


ह्या देखण्या वृक्षाची ओळख मायबोली डॉट कॉम वरील दिनेशदांनी पटवली आहे. ’सिल्व्हर ओक’ म्हणून.


ह्या देखण्या वृक्षाची ओळख मायबोली डॉट कॉम वरील दिनेशदांनी पटवली आहे. ’तुतारी’ म्हणून.

लोकहो, इतरही अनेक वनस्पतींनी उत्तराखंड संपन्न झालेला आहे. ही आहे केवळ एक झलक.
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, सुंदर टिपलेत वृक्ष. कोनिफरस ला कोनफळ हे नाव पण शोभतय खरे ( तेच नाव गराडू ला पण आहे. )

जांभळ्या फुलाचे ते झकरांदा, मराठीत नीलमोहोर !

कोनिफरस ला कोनफळ हे नाव पण शोभतय खरे>>>>

दिनेशदा, हे नाव मी नाही, दुर्गा भागवत ह्यांनी वापरले आहे.
"त्या दिवशी मी कोनफळी रंगाची साडी नेसले होते."
हे त्यांचे कुठेतरी वाचलेले वाक्य मला पक्के आठवते आहे.

नरेंद्र काका, सुंदर फोटोज..
कोनफळं पण देखणी आहेत.. Happy
'गराडू' ला कोनफळ म्हणतात?? दिनेश दा ही नवीन माहिती दिली तुम्ही..
उज्जैन, रतलाम कडे 'गराडू' उकडून ,त्याच्या चकत्या तळून वर गराडू मसाला टाकतात. मस्त चमचमीत
लागते. Happy

आमच्याकडे कोनफळ एक प्रकारच्या लांबट रानमूळाला म्हणतात. टिपीकली जानेवारीत मुंबैत येतं. संक्रातीला उकडून खातात.
त्यामुळॅ त्या पाइनकोनला कोनफळ् मला ऑडच वाटतंय Happy

नरेंद्र जी, मला तुम्ही गतकालविव्हल (nostalgic) केलेत. तिथे व्यतित केलेली २० वर्षे डोळ्यामागे झरझर धावू लागली. खरच खूप समृध्द भूमी आहे ती-म्हणूनच देवभूमि,
धन्यवाद
सुंदर चित्रे आणि माहिती.
Happy

मस्त फोटो आहेत सगळे.. अगदी नावांसकट.

मला लिचीचे झाड आवडले. ब-याच वर्षांपुर्वी सिमल्याला गेलो होतो तिकडे एकदा पाहिलेले लिचीचे झाड. मस्त आपल्या आंब्यासारखे डवरलेले आणि पानागणिक लिच्या लगडलेल्या. तेव्हापासुन मनात भरलेय अगदी.

कोनफळ हा एक कंद आहे सुरणासारखा. रताळ्यापेक्षा जाड, ओबडधोबड पण तरीही थोडाफार गोल दिसणारा. आपल्याइथे डिसेंबरात येतो. त्याचे काप करुन खातात, उंधियोमध्येही वापरतात. तो कापला की आत मस्त बैंगनीपेक्षाही जास्त ब्राईट असा रंग दिसतो. दुर्गाबाईंनी या कोनफळी रंगाचा उल्लेख केला असणार.

दिनेश, यालाच गराडु म्हणतात काय?

सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

साधना,
तो कापला की आत मस्त बैंगनीपेक्षाही जास्त ब्राईट असा रंग दिसतो. दुर्गाबाईंनी या कोनफळी रंगाचा उल्लेख केला असणार.>>> असेलही. साड्यांच्या रंगांना जी नावे दिली जातात ती मात्र अतिशय मौलिक असतात. हेच ह्या निमित्ताने सांगता येईल.

रच्याकने ... गराडूचा बैंगनी रंग मला कसा बाजारात दिसला नाही कधी?

व्वा. छान माहिती आणि प्रचि.
हा जॅकरांडाचा झब्बु..... गेल्या ऑक्टोबर मधे मी याचे बरेच प्रचि टाकले होते ...आता इथे नुकताच स्रिंग सुरु झाला आहे ... महिन्या भरात जॅकरांडाची झाडे परत बहरु लागतिल Happy

गराडूचा बैंगनी रंग मला कसा बाजारात दिसला नाही कधी

कोनफळ वरुन काळसर, ग्रे असते. कापल्यावरच आतला सुंदर रंग दिसतो.

konfal.jpg

अतिशय सुंदर माहिती आणि प्रकाशचित्र.

तुती (mulberry) - आपल्याकडे फक्त महाबळेश्वरला मिळते. तुम्हाला तिथे खायला मिळाली की नाही? अंजीर, लिची झाडावर लगडलेले पाहून मस्त वाटले Happy

"त्या दिवशी मी कोनफळी रंगाची साडी नेसले होते." -- दुपानी / ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी. साधनाने वर प्रकाशचित्र दिलय. मी आणि माझ्यासारखे अनेक त्याला गुलाबी रंग म्हणून मोकळे होतात. पण दुर्गाबाईंनी अचूक शब्द वापरलाय.

"त्या दिवशी मी कोनफळी रंगाची साडी नेसले होते." -- दुपानी / ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी. साधनाने वर प्रकाशचित्र दिलय. मी आणि माझ्यासारखे अनेक त्याला गुलाबी रंग म्हणून मोकळे होतात. पण दुर्गाबाईंनी अचूक शब्द वापरलाय. >> अगदी अगदी.....

रच्याकने.....

कोनफळी रंग = हा रंग किंवा त्या रंगाला ही संज्ञा पहिल्या पासुन वापरली जात असावी . माझी आजी सुध्धा "कोनफळी" रंग असेच म्हणते. ( वय वर्ष ८५). मग हा शब्द 'दुर्गा बाईं" शी संबंधीत का आहे? त्यांनी ती संज्ञा प्रचलित केली का? माझ्या आजीची एकंदरीत बॅकग्राउंड बघता ( तिचा सगळा जन्म धुळे, रावळगाव, जळगाव ला गेला), तिला दुर्गा बाई म्ह्णजे कोण हे ही माहित नसेल.... जसे काही शब्द सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले, त्या प्रमाणेच हे आहे का?

कोनफळी रंग बराच प्रचलित आहे. मी खुप वेळा ऐकलाय. साडीच्या रंगात आणि कोनफळातही. Happy

तुती (mulberry) - आपल्याकडे फक्त महाबळेश्वरला मिळते

सह्याद्रीत ब-याच ठिकाणी आहे तुती. रेशिम किडे तुतीचीच पाने खातात त्यामुळे ह्या केंद्राबाहेर तुतीची लागवड केलेली असते. आंबोलीतही तुतीची भरपुर झाडे आहेत. माझ्या घरीही होती.

पण महाबळेश्वरला जशी तुती, रास्प्बेरी आणि इतर वेगवेगळ्या आकाराच्या बे-या इ.इ. सगळे विकत मिळते तसे सह्याद्रीत इतरत्र विकत मिळत नाहीत. रानमेवा म्हणुन मिळतो तो आपला आपण शोधायचा नी तोडुन खायचा Happy

@ शापित गंधर्व, किती सुंदर गर्द जांभळा रंग उमटला आहे. वृक्षाचा डौलही डेरेदार. एकदम प्रेक्षणीय.

@ साधना, वा! गराडूचा रंग, पोत सगळेच और आहे. मी अजूनपर्यंत खाल्ला कसा नाही?
तुतीची फळे रानमेवा असून स्वतः तोडून खाण्यात निश्चितच मौज असते.
वरच्या फोटोतल्या झाडावर चढून काही लोक तुतीचीच फळे खात आहेत की!
http://srujanashodha.blogspot.in/2012/04/blog-post_15.html#links
इथे आणखीही तुतीची फळे आहेत.

@ माधव, शशांक माझ्या आठवणीची पुष्टी केल्याखातर मन।पूर्वक धन्यवाद! मात्र मी समजलो ते कोनफळ त्यांच्या मनात नव्हते त्याला कोण काय करणार!

@ मोहन कि मीरा, तुमची आजी तरी "कोनफळ" म्हणजे कोनिफरस समजत होती का की गराडूच?