ऑफिस (३)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

राचय्या साधा भोळा गरीब आहे, पण कधीकधी वात आणणारा आहे. आपण साखरबिखरझोपेत असताना हा महाशय उठतो. काहीतरी कानडी श्लोक गाणी मंत्र पुटपुटतो. मग टेरेसच्या मोकळ्या जागेत जाऊन अगदी आवाज करकरून व्यायाम करतो. मग टेरेसच्याच एका कोपर्‍यात असणार्‍या बाथरूममध्ये दे दाणादण पाणी उपसून आवाज करून बेदम आंघोळ करतो. हाश्सहुश्श करत पुन्हा रुममध्ये आला, की पुन्हा आहेच श्लोक-आरत्या-गाणी. मग मी नाईलाजाने गोधडीतून तोंड बाहेर काढलं की समोर राचय्याचा सावळा बाळबोध चेहरा. गोडबिड हसत अगदी. मग आपल्या नाईलाजाची नि रागाची आपल्यालाच लाज वाटते.

मग ती कानडी आरत्या-गाणी पण गोड करून घ्यावी लागतात. अशी गोड करून घ्यायला लागली, की थोड्या वेळात ती खरंच कानाला गोड-मधूर वाटू लागतात. त्या नादात चक्क पुन्हा झोप पण लागते कधीकधी.

आज तसा प्रयत्न केला तर म्हणाला- उटो. तुमको मुंबयका रिपोट देना हय ना आज. चांगलं मस्त रिपोट तय्यार करायचं बग्ग. नवीन मानसामुळे सगळे इंप्रेस जाले पायजे.

नवीन माणूस? दोन महिन्यातच इथं इतका निब्बर नि हे सारं पाचशे वर्षांपासून पाहत असल्यागत मला वाटयाला लागलंय. कशाचा नवीन माणूस नि काय. मला काल नि परवाचे मुंबईतले दोन दिवस आठवले आणि पुन्हा एकदा वैतागाचा झटका आला. चाराण्याचा रिपोर्ट होणार हा.

राचय्या अत्यंत भक्तीभावाने त्याचा बाळबोध भांग पाडत असताना मी त्याच्याकडे बारीक नजरेने पाहत असताना विचार केला- माझी ब्याद ऑफिसातून बाहेर काढण्यासाठी तर असलं काम काढलं नसेल ना मास्तरनं?

कुठचे लांबच्या खोपच्यातले पत्ते नि क्लायंट शोधून म्हणे डेव्हलप करा. म्हणजे काय करा? चार क्लायंट्सची चारशे वैशिष्ठ्ये च्यामारि. एकाने चार तास बसवून ठेवलं, मग म्हणे आपण पुढच्या आठवड्यात नीट डिस्कस करू. एक पारशी म्हातारा आजच जन्माला आल्यागत इतकं बारीक विचारत होता सारं, की तोंडाला फेस यायची पाळी. एकानं इतकं वैशिष्ठपूर्ण टेक्निकल विचारलं, की शेवटी कुलकर्णी मास्तरांना फोन जोडून द्यावा लागला. आमचा माल घेईस्तोवर त्याच्या काय, पण माझ्याही गवर्‍या जातील बहुतेक. एकानं सांगितलं- मी खूप वर्षांपूर्वी तुमची प्रॉडक्ट्स घेतली होती. पण ढीगाने कंप्लेंट्स निघाल्या. मला त्याची रिप्लेसमेंट द्या, किंवा पेमेंट परत द्या. तरच पुढे वेव्हार होणार!- असं सिनेमास्टाईल सांगून मी बसलेला असतानाच माझ्यासमोर ऐटीत बोटांत चाव्या फिरवत निघून गेला.

कधीकाळच्या कंप्लेंट्स.. आजवर तशाच पडून. त र्हेवाईकपणा करण्यात अख्खं आयुष्य चाललं या कंपनीतल्या लोकांचं. कस्टमरकडे लक्ष देता येत नाही?- असं मी मागच्या आठवड्यात एकदा अमृतला विचारलंही होतं, तर तो अत्यंत धार्मिक अध्यात्मिकपणे म्हणाला- ते कंप्लेंट्स वगैरे सगळं व्हर्चुअल असतं. त्यांचा तर्‍हेवाईकपणा झाकण्यासाठी सुद्धा कधीकधी असतं. त्यांच्या चेअरमनला त्यांना रिपोर्ट देता यावा म्हणूनही कधीकधी असतं. तर ते अळवावरचं पाणी असं समज. आज आहे, उद्या त्यांचा चेअरमन बदलल्यावर एखाद वेळेस नाहीही. आता आपल्या बाजूने बोलायचं, तर ते आपण ऑन पेपर व्हर्च्युअल दाखवू शकत नाही. कारण आपल्यालाही चेअरमन आहेच! व्हर्चुअली का होईना, कंप्लेंट्सकडे बघावंच लागेल. त्यासाठीच तर तुम्हाला घेतलंय ना कंपनीने. आधी पटवर्धनला, मग कमलला. मग तुला. टोटल मेकोव्हर.. आता कंपनीला नवी व्हर्चुअल दिशा तुम्हीच दाखवणार. टोटल मेकोव्हर!

आणि मग एखाद्या ह.भ.प. च्या चेहर्‍यावर असतं तसं मंदस्मित वगैरे चेहर्‍यावर. अशा वेळी कुणालाच काही त्याच्यासमोर बोलता येत नाही हे फार वाईट. कुलकर्णी मास्तरांना पण हा अध्यात्म शिकवतो का, ते बघायची फार इच्छा आहे, पण तशी वेळच गेल्या दोन महिन्यात आली नाही. जातो कुठे पण. कधीतरी येईलच.

या कामाला कमलला का नाही पाठवलं? पटवर्धनची गोष्ट समजा सोडा, तो एक्स्पोर्टला आहे. म्हणजे आता मला पाठवलं आहे तर मी करणारच. नाही असं नाही. पण कारण तरी कळायला नको? कुलकर्णी मास्तरची भारी सवय म्हणजे काही काही गोष्टी सार्‍यांना अभेला बोलावल्यागत बोलावून सांगतो नि काही काही एकेकट्याला घेऊन. हे असं 'आत' जाऊन आल्यावर त्याच्याभोवती चारसहा जणं जमून आशाळभूतपणे - काय झालं? काय सांगितलं? काय खबर - असं छू केल्यागत जे येतात- ती परंपरा इथं यातूनच सुरू झाली असावी. दोन महिने म्हणजे काही फार नाही. पण दोन महिने म्हण्जे कमी पण नाही. तेवढ्यात कळतंच.

आणखी एक म्हणजे पटवर्धन एक्स्पोर्टच्या नावाखाली अनंत काय काय करतो असं रवीने मला गुपचुप सांगितलं होतं. आणि तो थोदा सिनियर असल्याने मस्तर त्याला फार काही बोलत नाही, हेही. हा एक्स्पोर्टला आहे म्हणजे कशाला आहे? आणि करतो काय? आणि त्याच्या डिपार्टमेंटची ती काया? एकदा महाबिलंदरपणे फिस्सकन हसत- ती आमच्या डिपार्टमेंटची काया आहे- असं तो त्रिंबकच्या टपरीवर पान खात म्हणाला होता, ते आठवलं. म्हणजे काय?

आणि हा कमल उठसुठ तिथं एक्स्पोर्टच्या क्युबिकल्सम्ध्ये काय जाऊन बसतो उगाच? तुम्हाला दोघांना एकदा साऊथ इंड्यात पाठवायचंय, असं एकदा कुलकर्णी साहेब म्हणाले, त्यानंतर काहीच नाही. कदम म्हणाला, त्यानंतर कमल आत एकटा जाऊन तासभर बसून आला. त्याला झाला महिना. मास्तरने त्यानंतर कशाचं नावच काठलं नाही. उलट 'अभ्यास' करायला म्हणून आठ दिवस मला कंपनीच्या कारखान्यात पाठवून दिलं.

आणि आता हे मुंबईचं.

ही असली काय काय भयंकर पद्धतीने बांधून टाकणारी विचारांची लांबचलांब दोरी शेंदत असताना माझं राचय्याकडे लक्ष गेलं, तर त्याचा भांग पाडून झाला होता. आईने हनुवटी पकडून नीटनेटका पाडून द्यावा आणि शाळेला जायला निघावा तसा तो दिसत होता.

त्याच्या तशा प्रसन्न चेहर्‍याशी मला बोलावं वाटालं, म्हणून मुंबईला काय काय झालं ते सांगितलं, आणि मला नुसतं बाहेर काढण्यासाठी, किंवा काहीतरी काम देण्यासाठी, किंवा कुणीच करायला तयार नाही मह्णून पाठवलं का काय असं मी त्याला स्वच्छच बोलून दाखवलं, तेव्हा तो भांग हलवत लख्ख आरशागत हसला. म्हणाला- असं नसतंय बग्ग. आपण आपलं कामं करावं. त्यात तू नवीनच असतो. कुठच्याही होपलेस कामातनं काहीतरी मिळतंच बग्ग. माजंच अनुभव. उगाच नाही सांगायचं. चार माणसं बगायला मिळनं म्हणजे छानच असतंय. त्यांचं अब्यास करायचं. कुनीच दुष्ट नसतं, कुणीच बिनंकामाचं नसतं. कुणाकुणात काहीकाहीतरी चांगलं असतं म्हणजे असतंच. नोक्रीत नाही, तर असाच आपल्याला आयुष्यात फायदा होतंच बग्ग..

मी गुमान उठलो. आवरायला घेतलं.
तो अमृत तिकडे अध्यात्मिक. हा राचय्या इकडे अध्यात्मिक. त्याचं अध्यात्म वेगळं. याचं अध्यात्म वेगळं.
या सार्‍यांत आपलं पर्सनल अध्यात्म म्हणजे घंटा.

***

क्रमश:

प्रकार: 
शब्दखुणा: 

मग ती कानडी आरत्या-गाणी पण गोड करून घ्यावी लागतात<<< सुंदर

नवीन माणूस? दोन महिन्यातच इथं इतका निब्बर नि हे सारं पाचशे वर्षांपासून पाहत असल्यागत मला वाटयाला लागलंय. कशाचा नवीन माणूस नि काय.<<< व्वा

ही असली काय काय भयंकर पद्धतीने बांधून टाकणारी विचारांची लांबचलांब दोरी शेंदत असताना माझं राचय्याकडे लक्ष गेलं, तर त्याचा भांग पाडून झाला होता. आईने हनुवटी पकडून नीटनेटका पाडून द्यावा आणि शाळेला जायला निघावा तसा तो दिसत होता.<<< मस्त

सं नसतंय बग्ग. आपण आपलं कामं करावं. त्यात तू नवीनच असतो. कुठच्याही होपलेस कामातनं काहीतरी मिळतंच बग्ग. माजंच अनुभव. उगाच नाही सांगायचं. चार माणसं बगायला मिळनं म्हणजे छानच असतंय. त्यांचं अब्यास करायचं. कुनीच दुष्ट नसतं, कुणीच बिनंकामाचं नसतं. कुणाकुणात काहीकाहीतरी चांगलं असतं म्हणजे असतंच. नोक्रीत नाही, तर असाच आपल्याला आयुष्यात फायदा होतंच बग्ग..<<< सुंदर

त्याचं अध्यात्म वेगळं. याचं अध्यात्म वेगळं.
या सार्‍यांत आपलं पर्सनल अध्यात्म म्हणजे घंटा.<<<

व्वा खंडेराव

या भागात कादंबरी वर वर जायला लागली