ऑफिस (२)

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

कुलकर्ण्यांच्या भयंकर थंडगार केबिनीतून बाहेर आलो तेव्हा उत्तर ध्रुवावरून एकदम विषुववृत्तावर आल्यागत वाटलं. इतका वेळ आपण आत जिवंतच होतो की काय अशी एक शंकाही मनाला चाटून गेली.

जो 'आत' जाऊन आला, त्याच्याभोवती चारेक जणांनी तरी जमलंच पाहिजे अशा शिरस्त्याप्रमाणे रवी, कदम, कमल आणि पटवर्धन सभेला आल्यागत जमून आले आणि एकाग्रतेने माझ्याकडे पाहत राहिले. झालंच तर पाठक्याही शेजारच्या क्युबिकलमध्ये होता. त्याला असलं जमून बिमून यायची गरज भासत नसावी. त्याचे कान आणि अदृष्य डोळे इकडे टवकारलेले असावेतच. तो शरीराने इथं असला तरी शंभरेक फूट पलीकडे असलेल्या डेटा सेंटरमध्येही मनाने असू शकतो याची खात्री एव्हाना सार्‍यांना झाली होती. इतकंच काय, पण देहाने त्याच्या चार बाय चार फुटांच्या क्युबिकलमध्ये फाईलीत डोकं खूपसून बसलेला पाठक्या मनानेच काय, पण डोक्यानेही कधीकधी नव्वद किलोमीटर दूर असलेल्या आमच्या फॅक्टरीतही असतो असं कमल एकदा मला म्हणाला होता.

कमल माझ्यापेक्षा सहाच महिने आधी जॉइन झालेला. माझ्याच सेल्स मार्केटिंग डिपार्टमेंटला. पण एवढ्या अवधीत त्याने भरपूर हुशारी कमवली होती, हे मान्यच केलं पाहिजे. यापेक्षाही पुढचं म्हणजे- अध्यात्मिक अमृत म्हणतो तसं - कमवलेली हुशारी खिशात न ठेवता जरूर तिथं पटकन दाखवता आली पाहिजे- या वैशिष्ठ्यपूर्ण उक्तीप्रमाणे तो दिवसभर वागत असे.

उदाहरणादाखल सांगायचं तर सकाळी दहा वाजता आणि दुपारी चार वाजता महिपत सार्‍यांसाठी खूप सारे चहाचे कप ठेवलेला भलामोठा ट्रे घेऊन येई, तेव्हा तो एखादा कप निवडून घेई आणि तेही डाव्या हाताने. मग तसाच डाव्या हातात कप धरून चहा प्यायचा.

म्हणजे त्याचं हे वैशिष्ठ्य हे असं झटकन लक्षात येण्याइतका मी काही शार्प नव्हतो, पण असं करताना एकदा त्याने मला खासकरून सांगितलं होतं. मग ही डाव्या हाताची काय थेअरी आहे, हे मी विचारावं अशी त्याची अपेक्षा असल्याने मी तसं विचारलंही. मग तो म्हणाला- नव्व्याण्णव टक्के लोक उजव्या हाताने कप उचलतात आणि तसाच उजव्या हातात धरून नॉर्मली पितात. डाव्या हाताने कप उचलून तसाच डाव्या हातात कप धरून चहा प्यायला, की फारसे कुणी ओठ-तोंड न लावलेली, कपाची अस्पर्शित बाजू आपल्या वाट्याला येते. व्हर्जिन साईड!

सारे नव्व्याण्णव येडघाटी, आणि तूच एकटा व्हर्जिन व्हॉईसराय- असं त्यावर पटवर्धन कमलला चिडून म्हणालाही होता. त्यावर कमलने नेहमीप्रमाणे त्याचं वैशिष्ठ्यपूर्ण छद्मी हसू फेकलं होतं. तो जरा जास्त छद्मी हसला, की त्याचा गोरा चेहरा, घारे डोळे आणि बारीक अंगकाठी हे काँबिनेशन जरा विचित्र आणि भयंकर दिसू लागे. अशा स्थितीत मला तरी तो दोन चार सेकंदांच्यावर बघवत नसे.

हे सारं माझ्या मनात चाललेलं असताना जमलेल्या सार्‍यांची उत्सुकता शिगेला वगैरे पोचली होती. मग मी हातचं राखून सांगितल्यागत सांगितलं- न्यू क्लायंट्स डेव्हलपमेंट जरूरी आहे म्हटले. दोन दिवस मुंबईला जाऊन चार ठिकाणी भेटून यायला सांगितलंय.

कमलनेही हातचं राखून विचारल्यागत कावेबाज घारे डोळे करून कही प्रश्न विचारले. तेवढ्यात रवीचं - हे काय नवीनच खूळ - असं काहीतरी चाललंच होतं. वाघमोडे टाईपरायटरच्या बाहेर टाईप होऊन अर्ध्या कागदाने बाहेर पडावं तशी जीभ बाहेर काढून आवासून निर्बुद्ध असल्यागत बघत होता. तेवढ्यात कमलची आणि पटवर्धनची नेत्रपल्लवी झाल्याचं माझ्या लक्षात आलंच. पटवर्धन कमलला हाताशी धरून त्याच्या क्युबिकलमध्ये घेऊन गेला.

रवी - मुंबईला टॅक्सीने जा हां. टॅक्सीचं बिल पाहिजे तर मी देतो. लक्षात ठेव- असं काहीसं मला जवळ येऊन कुजबुजत सांगितल्यागत म्हणाला आणि तेवढ्यात केबिनमधून त्याला बोलावणं आलं. म्हणजे घंटी वाजली. तो तसाच खूप आज्ञाधारक असल्यागत घाईने निघून गेला.

चार प्रॉस्पेक्ट्सचे डिटेल्स प्रिंट काढून द्या म्हणून मी वाघमोडेला सांगितलं. पाटे बाईंकडे सी-फॉर्म दिला. त्यांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात दोन बोटांचा व्ही करून तो माझ्या डोळ्यांकडे रोखत - माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ - असं म्हणत खुदूखुदू हसायला सुरूवात केली. ही बाई चांगल्या मुडमध्ये असली की असं करायची. मी थोडा चकना दिसतो असं तिचं प्रामाणिक मत होतं. मला असं म्हणणारी जगातली ही एकच व्यक्ती होती. मी अनेकदा आरशात बघून आणि अनेक लोकांना विचारून मी चकना नसल्याची रीतसर खात्री करून घेतली होती. त्यामुळे तिनं असं केलं की शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा मीही हसायचो. खरोखर चकना असतो तर असा हसलो नसतो. पण मग पाटे बाईनेही असलं काही म्हणलं नसतं, हेही तितकंच खरं. आमचे चेअरमन कितीही सांगत असले की बाबा, स्वतःवर हसता आलं पाहिजे - तरी ते शंभरातल्या नव्व्याण्णव वेळेला तसं करता येत नसतं, हे त्यांनाही ठाऊक असावंच.

मी क्युबिकलमध्ये येऊन विचार करत बसलो. गेले उडत कमल नि पटवर्धन. आपलं काहीतरी वैशिष्ठ्य निर्माण करायची हीच वेळ आहे, असं स्वतःला बजावलं. तेवढ्यात पॅसेजमधून दाणदाण पावलं टाकत रवी आला आणि महिपतवर जोरजोरात ओरडू लागला. हा ड्रायव्हर असला, तरी तोरा मालकाचा दाखवण्याची त्याला फार हौस. साहेबाच्या गाडीतून काही सामान नि फायली महिपतने काढून आणल्या नाहीत असला काही तरी आरडाओरडा त्याने सुरू केला. माझी नोकरी घालवशील- असंही तेव्ढ्यातल्या तेवढ्यात दोनतीनदा त्याचं बोलून झालं.

हा हलकट माणूस आहे. याची खरंच गेली पाहिजे नोकरी. म्हणजे इथलं वातावरण तरी शांत राहील- असं पाठक्या शेजारच्या केबिनमधून पुटपुटला. ते पुटपुटणं नसून बर्‍यापैकी मोठ्याने होतं, आणि मला, वाघमोडेला ऐकू गेलं- हे बघून तो थोडा ओशाळला.

मग जवळ येऊन म्हणाला- हा बघ, करड्या रंगाचा नि तांबड्या रेघांचा शर्ट.

आता हा तर मी मघाशीच पाहिला होता, त्यावरून त्याचं नि पटवर्धनचं चीड आणणारं खुसूखुसू हसूही सहन करून घेतलं होतं. आता त्यात काय पुन्हा बघायचं?

पुर्वेला असूनही नाव पश्चिम बंगाल असतं की नाही? तसंच हा शर्ट म्हणजे फक्त शर्टच नाही. तो निर्जीव असला तरी जिवंत आहे. मंतरलेला आहे तो- पाठक्या म्हणाला.

वेड्याकडे बघावं तसा मी पाठक्याकडे बघू लागलो. तो खरोखर वेडसर दिसत होता आणि डोळे चक्क चकने दिसत होते.

मग भयंकर गुप्त गोष्ट सांगावी तसं खालच्या आणि खर्जातल्या आवाजात तो म्हणाला- हे बघ. कमीत कमी चार वेळा मला अनुभव आला आहे. मी हा शर्ट घालून आलो रे आलो की या ऑफिसातला कुणीतरी एकजण उडतो. उडतो म्हणजे काढून टाकला जातो, किंवा तोच राजीनामा देतो. काहीतरी डेंजर होतं म्हणजे होतंच. बघच तू.

मी नवीनच जन्माला आलेल्या बाळाच्या नजरेने पाठक्याकडे आश्चर्यचकित आणि अगम्य चेहरा करून बघू लागलो. पाठक्या सिनेम्यातल्या खलनायकासारखा खुनशी हसत तिथून निघून गेला. माझ्या क्युबिकलमधल्या माझ्यासमोरच्या सॉफ्ट बोर्डकडे मी मग आताच सिनेमा सुरू होतो की काय अशा उत्सुकतेने कितीतरी वेळ बसून राहिलो.

***

क्रमशः

***

प्रकार: 
शब्दखुणा: 

आम्ही कथानक वाचत आहोत व समरसही होत आहोत. नेमकी दिशा माहीत नाही कथानकाची. विस्तृत व्यक्तीचित्रणापलीकडे जाऊन मध्यमवर्गीय नोकरदार संस्कृती रेखाटनही असू शकेल. सकाळी सवयीने पेपर हातात घेतला जातो पण बातम्या कालच टीव्हीवर पाहिलेल्या असतात असे काहीसे अजूनतरी होत आहे आमचे.

कळावे

गंभीर समीक्षक

नेमकी दिशा माहीत नाही कथानकाची >>
'कथानक' शेवटपर्यंत सापडणार नाहीच. Proud

मध्यमवर्गीय नोकरदार संस्कृती रेखाटन >>>
हे चारही शब्द वेगवेगळे म्हणून कितीही सामान्य असले, तरी त्या सगळ्यांमिळून जे काय होतं, ते निर्माण करायला प्रचंड ताकद लागते. अफाट परिणामकारक शैली लागते. ती शैली नि कुवत- दोन्ही माझ्यात नाही. Happy श्याम मनोहर किंवा मनोहर तल्हारांसारख्या लाखोंतून एखाद्यात ती असते.