ऑफिस (१)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

देशपांडे बाई मतिमंद आहे. म्हणजे तशी कधीकधी हुशारही आहे, पण अशी हुशार असताना देखील मतिमंदच दिसणारी आहे. इन्क्रीमेंट घेताना, नाकारताना देखील मतिमंदच दिसणारी आहे. रवी म्हणतो ही ड्युप्लिकेट मतिमंदता आहे.

रवी पेट्रोलपंप आहे. शिवाय लावालाव्या करणारा आहे. शिवाय साळसूद आहे. शिवाय सतत काहीतरी मदत करू का- असं झाडून सार्‍यांना विचारणारा आहे. त्याचा आणि एकंदरच सार्‍यांचा साहेब, म्हणाजे कुलकर्णी मास्तर अत्यंत चक्रम पद्धतीचा हुशार आहे, आणि रवीला त्याचं - तू प्लीज फक्त मला मदत कर. इकडे तिकडे उगाच मदत करत तडफडू नकोस - हे रोजचं पालुपद सार्‍यांचं पाठ झालं आहे.

अमृत अध्यात्मिक वगैरे आहे, पण धार्मिक वगैरे मात्र नाही. संतासारखा चेहरा करून तो चतुर्थीला तंदूर चिकन सहज खातो. तेही अध्यात्मिकपणे.

वर्मा एक नंबरचा कंजूष आहे. ऑफिसने त्याला दिलेली गाडी तो चक्क भाड्याने देतो अशी माहिती एकदा कदमने आणली होती, पण त्याला पुरावा मात्र नाही. काहीही असलं, तरी सार्‍या ऑफिस स्टाफची चहाची रोज गोळा झालेली कुपनं तो मोजत बसतो- हे भयंकर विनोदी दृश्य असतं. कुणी डबल चहा प्याला असेल तर त्याला लगेच कळतं. फायनान्स मॅनेजरने साक्षात असं करणं हे आणखीच विनोदी वैशिष्ठ्य.

काया उद्या लग्न करते की आज की आताच- अशा मुडमध्ये सततच आहे. तिचं घोळत चालणं नि घोळात बोलणं सार्‍यांना आता सवयीचं आहे.

कदम भयंकर लाऊड आहे. शिवाय त्याचं पाटे बाईशी लफडं असल्याचा दाट संशय आहे. पाटे बाईंच्या हुशारीचा मात्र तिला अभिमान आहे. ती बर्‍यापैकी हुशार आहे, असं कुलकर्णी मास्तरचंही मत आहे, असं रवीने आणि कदमने अनेक वेळा ऑफिसात पसरवून दिलं आहे. हे मॅच फिक्सिंग आहे असं एकदा अध्यात्मिक अमृत म्हणालाही, पण ते करायलाही हुशारी लागते हे मला मान्यच असल्याने पाटे बाईंकडे थोडं आदरानेच बघायचं असं मी ठरवून टाकलं होतं.

सीमा रोज नवीन काहीतरी अंगात येत असल्यागत आहे. आज बहुतेक अंगावरचे कपडे सारखे आवरत सावरत बसायचं तिच्या अंगात आलं आहे. उद्या एखाद्याकडे जगबुडी होईस्तो टक लावून बघायचंही अंगात येईल.

वाघमोडे मठ्ठ टायपिस्ट आहे. त्याला काँप्युटर दिला याइतका दुसरा मोठा अपमान काँप्युटरचा या जगात झाला नसेल.

पाठक्या जागतिक आहे. म्हणजे थोडक्यात हलकट पाजी खुनशी आणि मधात सुरी बुडवून खायला घालतो म्हणून थेट पोटात खुपसणारा आहे.

आता अशी काही उदाहरणं म्हणून कोण कोण कसं कसं आहे. पण मला काय घेणं आहे..? मी कामाशी काम का ठेवत नाही? आता इतकी माणसं आहेत म्हणल्यावर एकेक उदाहरणादाखल म्हणून कोण कोण कसं कसं असणारच. तर अशा या कोणाच्या कोणाच्या कशा कशा असण्यावर आपला काय कंट्रोल आहे? आणि तेही, हे ऑफिस जॉइन करून फक्त एकच महिना झालेला असताना?

इतर कुठं यापेक्षा मोठं किंवा यापेक्षा छोटं ऑफिस जॉइन केलं, तर यापेक्षा जास्त जागतिक किंवा यापेक्षा जास्त उदाहरणादाखल स्वभावांची एकेक माणसं सापडणारच. मग काय फायदा? आणि लोचा असा आहे, की आपण उदाहरणादाखल कसे आहोत हेच मुळात कधी कळत नाही. म्हणजे होतं काय की क्युबिकलमध्ये काम करताना आपलं वैशिष्ठ्य असं असं आहे, हे लक्षात येतं, पण कुलकर्णी मास्तरच्या केबिनमध्ये एकदा का गेलं, की ते वैशिष्ठ्य पार बदलून नवीनच वैशिष्ठ्ये जन्माला येतात. पाठक्या तर नेहमी म्हणतो की बाबा, जास्तीत जास्त शिव्या खाऊन दाखवणं हेच आपलं वैशिष्ठ्य.

तर तो रवी कितीही पेट्रोलपंप असला, तरी तो जे सतत म्हणत असतो, की बाबा डोक्याला त्रास अजिबातच करून घ्यायचा नाही, हे मात्र तो एकदमच बरोबर बोलतो.

पण शेवटी आपलं वैशिष्ठ्य नेमकं आहे तरी काय, हे तरी कळायला नको का? हे असं एकदा विचारल्यावर अध्यात्मिक अमृत म्हणाला- असं काहीच वैशिष्ठ्य नसणं हे पण फार मोठं आणि दुर्मिळ वैशिष्ठ्य आहे. पण ते सार्‍यांत नसतं. मग काय करायचं? तर इतरांची वैशिष्ठ्ये बघत राहायची न्याहाळत राहायची. बाहेरच्या लॉबीत बसून जेवणाच्या सुटीत केव्हा केव्हा कसं नि काय काय चघळत येतं नि जातं, ते बघत राहायचं, वर्तमानपत्रं वाचण्याचं नाटक करत. याने दुहेरी फायदा असा होतो, की भूक लागायच्या आधीची नि पोट भरल्यानंतरची एकेकाची वैशिष्ठ्ये नीट मोजपट्टी लावून चेक करता येतात, आणि शिवाय त्याचवेळी वर्तमानपत्रातून राजकीय नेते, धर्म, कॉलेजची मुलं, एस्टीगाड्या, गावं, देश यांची वैशिष्ठ्ये कळतात. यातलं काहीच वाया जात नाही. कधी ना कधी कामी येतंच आयुष्यात.

हा अध्यात्मिक अमृत सरळ बोलण्याचं नाटक करून अत्यंत अगम्य बोलतो असं माझ्या लक्षात आलं आहे. तसं एकदा बोलून दाखवल्यावर तो म्हणाला- तेच तर माझं वैशिष्ठ्य आहे.

आज त्याच्या नादी लागायला नको, म्हणून रिसेप्शनवरल्या सीमेकडे बारीक नजरेने बघत सिग्रेट प्यायला बाहेर पडलो, तर खाली त्रिंबकच्या टपरीवर पटवर्धन आणि पाठक्या.

बोलता बोलता पाठक्या म्हणाला - बघ मी आज करड्या रंगाचा आणि लाल रेषा असलेला 'तो' शर्ट घातला आहे.

हे ऐकल्यावर ढेरपोट्या पटवर्धनाच्या तोंडातून पान खाता खाता एकदम लाल गुळणी बाहेर पडली, आणि पोट सावरत तो गुदगुल्या होत असल्यागत खुदूखुदू हसू लागला.

मी सिग्रेटचा वैशिष्ठ्यपूर्ण धूर काढत त्यांच्याकडे बघत राहिलो.दोघेही अगदी जागतिक दर्जाचे हलकट दिसत होते. 'तो' शर्ट घातला आहे म्हणजे काय? आणि त्यावर ढेरपोट्या पटवर्धन बायकांगत खुसूखुसू काय हसतो?

शक्यतो जास्त काही विचारायचं नाही- हे वैशिष्ठ्य मी एक महिना जपलं होतं. पण कधीकधी काही पर्यायच राहत नाही. ते शर्टाचं आणि हसण्याचं काय गौडबंगाल- असं मी विचारलं तेव्हा पाठीवर हात ठेऊन पटवर्धनने पोट सावरत विचारलं- हां. तू पहिले हे सांग बघू, की बाबा, पश्चिम बंगाल हे भारताच्या कुठच्या दिशेला आहे? आणि का आहे?

एकतर असे लहान मुलांच्या पीजेसारखे प्रश्न विचारणार्‍यांचा मला फार कंटाळा येतो. इथं तर मी दुसरंच काही विचारलेलं असताना हा शहाणा तिसरंच काहीतरी उलट मला विचारतो. मी पश्चिम बंगालच्या दिशेचा विचार करत पटवर्धनाकडे डोळे मोठे करून बघू लागलो, तर वैशिष्ठ्यपूर्ण कुजबुजीच्या आवाजात खाली वाकून तो म्हणाला- तो शर्टचा एक अतिभारी सस्पेंस आहे. सांगेन कधीतरी.

आता पाठक्या खुसूखुसू हसू लागला. त्याच्या शर्टाकडे पाहत विचार करत इलायची खात मी ऑफिसात आलो, तेव्हा रिसेप्शनवर सीमाचं कपडे झटकणं, नीट करणं वगैरे नव्या जोमाने आणि स्फुर्तीने चाललेलं होतं.

मग कुलकर्णी मास्तरचं बोलावणं आलं, तेव्हा हे सारं, एखाद्या कागदाचा बोळा करून फेकून द्यावा, तसं मनातून फेकून दिलं, आणि आपल्या वैशिष्ठ्याचा नीट भरपूर स्फूर्ती आल्यागत विचार करू लागलो.

तुमचं वैशिष्ठ्य काय आहे- ते नीट ओळखायला शिकलं पाहिजे - असं एका सभेत आमचे चेअरमन म्हणाले होते, तेव्हा ते मनात ठसलं होतं आणि पटलंही होतं. ते आता पुन्हा मनात घोळवत मी मास्तरच्या केबिनची वाट चालू लागलो.

केबिनच्या पॅसेजमध्ये देशपांडे बाई क्रॉस झाली तर मला उगाच अपशकून झाल्यागत वाटलं. ते तसलं काही नसतं असं स्वतःला बजावलं. न जाणो आज मास्तरने आपलं एखादं वैशिष्ठ्य लक्षात आणून दिलं, किंवा किमान मदत तरी केली, तर देशपांडे बाईला शुभशकुनी ठरवायचं, असं ठरवत मी मान झटकत आत गेलो.

शकुनी शूभ कसा असेल, अस आपलं उगाचच मास्तरच्या दाढीकडे बघताना वाटलं. मग नंतर अनेक मिनिटं मास्तरची दाढी नि त्यासोबतचं बोलतानाचं हलणारं तोंड बघत राहिलो. सिग्रेटच्या धुराने गच्च भरलेल्या बर्फासारख्या थंडगार केबिनमध्ये आपण इतकी मिनिटे शांतपणे कुणाचं तरी बोलणं साक्षात दगड होऊन ऐकू शकतो शकतो, हे एक स्वतःचं वैशिष्ठ्य मला जाणवलं आणि किंचित बरं वाटलं.

मग नवा दम गोळा करत मी मास्तरला लक्षपूर्वक ऐकत राहिलो.

***

क्रमशः

प्रकार: