खलाशी

Submitted by वैभव फाटक on 3 September, 2012 - 11:08

शब्द सांभाळून आहे मी उराशी
दे मुभा, बोलायला थोडे तुझ्याशी

सागरामध्ये जरी एकाच असलो
काठ तू, मी वाट चुकलेला खलाशी

प्राक्तनाने साथ आहे सोडलेली
स्वप्न हल्ली नांदते केवळ उशाशी

विश्व सारे पालथे मी घातल्यावर
स्वर्ग सापडला मला माझ्या घराशी

अन्न जेव्हा गोड लागेना जिभेला
आसवांनी चव दिली तेव्हा जराशी

नेहमी 'मी' ऐवजी 'आपण' म्हणावे
नाळ आपोआप जुळते मग मनाशी

जिंकले साऱ्या जगाला त्याचवेळी
घेतले जेव्हा मला तू बाहुपाशी

--- वैभव फाटक ( २७/०८/२०१२) ---

http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/08/blog-post_27.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर गझल!
सर्वच शेर एकाहून एक आहेत!
सागरामध्ये जरी एकाच असलो
काठ तू, मी वाट चु
कलेला खलाशी
अलौकिक शेर!
प्राक्तनाने साथ आहे सोडलेली
स्वप्न हल्ली नांदते केवळ उशाशी
विश्व सारे पालथे मी घातल्यावर
स्वर्ग सापडला मला माझ्या घराशी
अन्न जेव्हा गोड लागेना जिभेला
आसवांनी चव दिली तेव्हा जराशी
नेहमी 'मी' ऐवजी 'आपण' म्हणावे
नाळ आपोआप जुळते मग मनाशी
हे सर्व शेर आवडले!
अभिनंदन!
वृत्तहाताळणी उत्तम!
.............प्रा.सतीश देवपूरकर

चांगली गझल झालेली आहे. बहुतेक सर्वच शेर आवडले. अभिनंदन!

===

विश्व सारे पालथे मी घातल्यावर
स्वर्ग सापडला मला माझ्या घराशी

अन्न जेव्हा गोड लागेना जिभेला
आसवांनी चव दिली तेव्हा जराशी

नेहमी 'मी' ऐवजी 'आपण' म्हणावे
नाळ आपोआप जुळते मग मनाशी<<<

हे विशेष!

===

'घेतले होतेस जेव्हा बाहुपाशी' अशी ओळ अधिक सुलभ वाटावी Happy

===

पहिले दोन शेर वाचून मला माझ्या (याच यमकांच्या गझलेतील ) शेरांची आठवण झाली. तुमचे शेरः

शब्द सांभाळून आहे मी उराशी
दे मुभा, बोलायला थोडे तुझ्याशी

सागरामध्ये जरी एकाच असलो
काठ तू, मी वाट चुकलेला खलाशी<<<

माझे शेरः

निराशा दाटली आहे जराशी
जरा बोलायचे आहे तुझ्याशी

तुझ्यामाझ्यातले नाते जणू की
दिशा विसरून गेलेला खलाशी

===

पुलेशु वैभव Happy

-'बेफिकीर'!

धन्यवाद मंडळी...
देव सर आणि बेफिजींचे विशेष आभार..
बेफिजी, आपली 'बाहुपाशी' मिसऱ्या साठीची सूचना आवडली..

>>अन्न जेव्हा गोड लागेना जिभेला
आसवांनी चव दिली तेव्हा जराशी>>

भन्नाट.....

बाकी शेरही मस्तच...

Happy