निराशा दाटली आहे जराशी

Submitted by बेफ़िकीर on 16 May, 2011 - 12:15

निराशा दाटली आहे जराशी
जरा बोलायचे आहे तुझ्याशी

तरीही चेहरे लाचार होते
कुणाचे कामही नव्हते कुणाशी

तिथे ती रोषणाई आणि येथे
भिकारी झोपला आहे उपाशी

तुझ्यामाझ्यातले नाते जणू की
दिशा विसरून गेलेला खलाशी

कितीही हुंदके देईन आता
तुझा संबंध आहे का कशाशी

हवे ते सर्व आहे लाभलेले
तरीही राहिलो आहे अधाशी

तिथे मी पाहिजे होतो खरा तर
खुन्यालाही जिथे नाहीच फाशी

मनाला मी खिसा शिवलाच नाही
तरी घेतात माझीही तलाशी

उद्या येतो असे ऐकून आहे
निजा, व्हा 'बेफिकिर', टेका उशाशी

गुलमोहर: 

निराशा दाटली आहे जराशी
जरा बोलायचे आहे तुझ्याशी >>> क्काय मतला दिला राव... व्वाह! निराशा दाटली आहे जराशी...
जरा बोलायचे आहे तुझ्याशी.........सही.

कितीही हुंदके देईन आता
तुझा संबंध आहे का कशाशी

हवे ते सर्व आहे लाभलेले
तरीही राहिलो आहे अधाशी

तिथे मी पाहिजे होतो खरा तर
खुन्यालाही जिथे नाहीच फाशी
>> अफाट.... अफाट गजल रचना, भुषणराव मनापासुन आवडली.

धन्यवाद!*

मतला आणि त्यापुढचा शेर मस्तच.
'खलाशी'सुद्धा आवडून गेला. मला असे शेर आवडतातच.

एकंदर गझल सुबक, उत्तम.

छान गझल..

कितीही हुंदके देईन आता
तुझा संबंध आहे का कशाशी

मनाला मी खिसा शिवलाच नाही
तरी घेतात माझीही तलाशी
>>> जियो हुजूर Happy

निराशा दाटली आहे जराशी
जरा बोलायचे आहे तुझ्याशी

बहारदार.......

तुझ्यामाझ्यातले नाते जणू की
दिशा विसरून गेलेला खलाशी

कसदार...

कितीही हुंदके देईन आता
तुझा संबंध आहे का कशाशी

जोमदार...

मनाला मी खिसा शिवलाच नाही
तरी घेतात माझीही तलाशी

ऐटदार... डौलदार...

बेफिकीर.. भुषणजी.... वाटते आता..गझलेला तुम्हीच आधार...

मस्त एका हून एक झोकदार शेर आणी अप्रतीम गझला...अभिनंदन आणी धन्यवाद या मेजवानी बद्दल

निराशा दाटली आहे जराशी
जरा बोलायचे आहे तुझ्याशी <<< अप्रतिम मतला >>>

तरीही चेहरे लाचार होते
कुणाचे कामही नव्हते कुणाशी <<< व्वा ! >>>

तुझ्यामाझ्यातले नाते जणू की
दिशा विसरून गेलेला खलाशी <<<< मस्त >>>

..... सुंदर गझल

व्वा..
खलाशी फारच आवडला..

मनाला खिसा>> बहोत खुब..
माझी ही तलाशी असे वाचले, ते ही आवडले

कवी बेफिकीर यांचे लेखन बंद झाल्यापासून एक ध्यानयोग्य मनःशांती मिळत आहे आम्हाला. कवी बेफिकीर यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच

कळावे

गंभीर समीक्षक