'चॅम्पियन्स्' - शुभारंभाचा खेळ - प्रतिक्रिया आणि वृत्तांत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 1 September, 2012 - 11:48

'चॅम्पियन्स्' या राष्ट्रीय पारितोषिकविजेत्या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ काल सिटिप्राइड अभिरुची इथे पार पडला.
मायबोली.कॉम या चित्रपटाची माध्यम प्रायोजक आहे.

या खेळाला काही मायबोलीकर उपस्थित होते.

या खेळाचा वृत्तांत आणि चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल 'चॅम्पियन्स' चित्रपटाच्या प्रिमियरला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली आणि वाटलं, की सध्या मायबोलीवर गाजत असलेल्या 'गाथाचित्रशती' मधल्या 'माझ्या अपेक्षेतला चित्रपट' ह्या विषयावर मला जे काही सांगावंसं वाटलं असतं, त्यातल्या बर्‍याच गोष्टी 'चॅम्पियन्स' मधे आहेत. आता, 'मी चित्रपट पहायला का जातो', किंवा 'मला चित्रपटात काय पहायला आवडतं' वगैरे विषयांबद्दल फार न बोलता, सरळ ह्या चित्रपटातल्या मला आवडलेल्या गोष्टींबद्दल बोलतो.

विषयाची हाताळणी: चित्रपटाचा विषय 'बालकामगार आणि त्यांचे शिक्षण' असा आहे. वास्तविक पाहता, हा विषय म्हणजे टिपीकली 'वाया घालवण्याचा' आणि 'महाप्रचंड कंटाळा आणण्याचं' भरपूर 'पोटॅन्शिअल' असलेला आहे, पण सुदैवानं दिग्दर्शक *रमेश मोरे यांनी तसं घडू नये यासाठी केलेला प्रयत्न नक्कीच दिसून येतो. ह्या विषयावर कधीच चित्रपट बनले नाहीत वगैरे म्हणणार नाही, पण इथली विषयाची हाताळणी नक्कीच वेगळी वाटली.

विश्रांतीसाठी गाणी: विषय थोडासा रुक्ष असल्यामुळे प्रेक्षकांना थोडी विश्रांती असं म्हणत, 'दुष्काळात पेरणी केलेली' गाणी नाहीत. विषयाला धरून नसेल, तर उगाचच प्रेक्षकांची अनावश्यक काळजी घ्यायला जाऊ नयेच.

तडका: जमाना, 'एन्टरटेनमेन्ट (तीन वेळा)' पाहिजेच असे म्हणणार्‍या आयटम साँगचा आहे. जमाना, 'गुरु (महा) आणि नृत्य-गायन (हेही महाच)' तसेच 'बायका (पुन्हा तीन) आणि फजिती' यांचा आहे. प्रेक्षकांची(च) आवड ह्या सदराखाली उगाचच घुसडले जाणारे भिकार तडके इथे नाहीत.

विनोद: अनावश्यक, आचरट, किळसवाणे, तेच ते घिसेपिटे, अंगविक्षेप करणारे, कोटी-कोटी विनोद इथे नाहीत.

संदेश: वेड्या बाईकडून, आज्जीबाईंकडून दिला जाणारा संदेश (जो वास्तविक एके काळी ओरिजनल होता, पण आता त्याचाही चा.चा.चोथा झालाय, तो ) इथे नाही.

* * * * * * * * * * * *

चित्रपटाची सुरुवात एका अत्यंत गरीब, पण त्याही परिस्थितीमधे बर्‍यापैकी सुखी असलेल्या एका चौकोनी कुटुंबात सुरु असलेल्या संवादाने होते. आपल्याला जे सुख मिळालं नाही, ते किमान आपल्या मुलांना तरी मिळावं अशी अपेक्षा सुसंस्कृत परिवारांमधे असते; त्यासाठी सुशिक्षित असावं लागतं असं नक्कीच नाही. परिस्थिती अनुरुप मग सुख सोडाच, किमान आपल्याला जी दु:खं भोगायला लागतायत ती तरी आपल्या मुलांना भोगावी लागू नयेत असा विचार करणारा सुसंस्कृत असा हा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुलं शाळेत शिकत असतात, चांगल्या मार्कांनी पास होत असतात. पण अचानक अशी परिस्थिती निर्माण होते, की त्यांचं शिक्षण बंद पडेल की काय असं वाटायला लागतं. काय होत असेल त्यांच्या आयुष्यात?

पुण्यातल्या 'नळ स्टॉप' जवळच्या 'पर्सिस्टंट' कंपनीच्या मागून जाणारी एक गल्ली आहे. सकाळी ऑफिसला जाताना जेव्हा त्या गल्लीतून जातो, तेव्हा उजव्या बाजूला छोट्या छोट्या घरांच्या अंगणात, आपापल्या आयाबहिणींना पापड लाटायला, ते वाळत घालायला मदत करणारी आठदहा वर्षांची मुलं दिसतात. ज्या वयात आम्ही कोणालाही न जुमानता केवळ क्रिकेट-क्रिकेट करत असू, त्या वयात ह्यांना काम करावं लागतंय. तसं म्हटलं तर हे काही बालकामगार नव्हेत, कारण हे काम करतात, ते कुटुंबाची गरज ओळखून. गरजेपूरतं काम करून मग ही मुलं आपली शाळा, शिक्षण चालू ठेवत असतील. पण बालकामगारांचं तरी ह्यापेक्षा वेगळं कुठे आहे? तेही गरज म्हणूनच काम करत असतात. पण दोघांची परिस्थिती मात्र प्रचंड वेगळी आहे. ह्यांच्या कामाचं स्वरूप, काम करण्याच्या पद्धती, कामाची जागा, त्यातून मिळणारे पैसे आणि हे सारं करण्याची 'आत्यंतिक गरज' एकवेळ आपण समजू शकू, पण इथे होणारं शोषण मात्र आपल्या कल्पनेच्या पलीकडेच आहे. एका दिवसाच्या पगाराचं मोल, रोजंदारीवर काम करणारेच जाणोत. अशा प्रतिकूल परिस्थितीमधे त्यांच्या डोक्यात शिक्षणाचा विचार येणं आणि विचार आला, तरी ते प्रत्यक्षात आणू शकणं किती अशक्यप्राय होऊन बसत असेल, हे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न बघायलाच हवा!

परिस्थिती लहानलहान मुलांना अकाली मोठं(प्रौढ!?) बनवते म्हणतात. चित्रपटातल्या ह्या मुलांचं वागणं पाहताना 'वपूर्झामधलं' ते वाक्य आठवतं, "प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं! " आयुष्यात बहुतेक सर्वांनाच हे समजतं, पण त्या कोवळ्या मनांवर इतक्या लवकर अशा गोष्टी येऊन पडणं हेच खरं दु:ख...

* * * * * * * * * * * *

चित्रपटासृष्टीमधे बराच काळ काम केल्यावर बर्‍याच कलाकारांना, "मग आता दिग्दर्शन करणार का?" वगैरे विचारलं जातं. मात्र "तुम्ही निर्माते होणार का?" असं सहसा विचारलं जात नसावं असं वाटतं. "आम्हाला बरंच काही करायचं असतं, पण शेवटी निर्माता सर्वात महत्त्वाचा ठरतो त्यामुळे चित्रपटामधे काही अ‍ॅडिशन्स(वाचा - भेसळ) कराव्या लागतात." वगैरे सूर (ज्याच्या सत्यतेबद्दल अजिबात वाद नाही) नेहेमी दिसतो. दुर्दैवाने, मूळचे उत्तम नट असलेले पण दिग्दर्शन करू लागल्यावर मात्र 'अरे!? ह्यापेक्षा पहिलं बरं होतं' म्हणावं अशा वाटेवर गेलेलेच जास्ती दिसतात. तसं पाहता हाही एक 'प्रश्नच' झाला, जो सोडवायला वेळ, पैसा आणि माणसं लागणार. म्हणून मग स्वत:च निर्माता बनून, एका चांगल्या विषयावर एखाद्या दिग्दर्शकाला काम करण्याचे स्वातंत्र्य देणारे, आणि हा प्रश्न सोडवू पहाणारे नारकरद्वयी त्यामुळेच दाद घेऊन जातात.

चित्रपटातल्या कलाकारांमधे अरुण नलावडे, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचे अभिनय चांगले आहेतच, पण "माझी बॅट म्हणून मीच पहिला बॅटींग करणार!" वगैरे प्रकारांचं नसणं हे नमूद करावंसं वाटलं, कारण शहीद भगतसिंगांच्या चित्रपटात चंद्रशेखर आझादांचा रोल अधिक मोठा असण्याचा हा जमाना आहे. उदय सबनीसांच्या 'मालकाची' संवादफेक एकदम अस्सल वाटते, कॉलरजवळ रुमाल गुंडाळून बसणंही अस्सल. सर्वात उल्लेखनीय काम हे शंतनु रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर ह्या मुलांचं वाटलं. निकालाच्या दिवशी, मनाप्रमाणे गुण न मिळाल्यावरचा दोघांचा संवाद, प्॑रिस्थिती निराशाजनक झाल्यावर मोठ्या भावाचं 'समजूतदारपणं-मोठं होणं', तसंच एकटा असताना धाकट्याचं 'तयार' होणं दाद घेऊन जातं. चित्रपटातलं विनोदाचं असणं, हे घुसडलं गेलेलं नसून नैसर्गिक वाटतं, आणि त्यामुळेच ते संवाद बोलणारं 'धाकटं' अर्थात 'मच्छिंद्र' मनावर छाप पाडून जातं.

चित्रपटातल्या उणीवांबद्दल बोलायचं झालं, तर चित्रपटाच्या तंत्राबद्दल निर्बुद्ध लोकांनाही दोनतीन गोष्टी सापडतील, जाणकारांना कदाचित त्याहूनही अधिक. मला दोनतीन सापडल्या. पण माझ्या मते मुद्दा तो नाही! मुद्दा हा आहे, की 'सध्याच्या' जमान्यात तोचतोपणा टाळून, वेगळा विषय घेऊन, त्याच्याशी प्रामाणिक राहून, कसलीही तडजोड न करता चित्रपट बनवणारे काही मोजके लोक पुढे येत आहेत. त्यांना आपल्याकडून प्रोत्साहन मिळणार आहे का? की "मराठी काय? हॅ!!!" म्हणत आपण "एक था... " वगैरे बघणार? दक्षिणेकडून येणारे देमार चित्रपट एका बाजूला, पण संवेदनाशील चित्रपटदेखिल तिकडून येतच असतात. त्याचे आपल्याकडे रिमेक बनतात. 'अस्सल(ओरिजिनल?!)' आणि 'प्रामाणिक' हे सूत्र धरून बनणार्‍या चित्रपटांची परंपरा मराठी चित्रपटांमधेही पूर्वी होती. ते जुने दिवस कदाचित परत येतील, पण त्याबरोबर तोचतोपणाही परत येऊ पहातोय. हे मोजकेच पण चांगले निर्माते-दिग्दर्शकही अनुभवातुन शिकतील पण तोवर त्यांना प्रोत्साहन देणं आपण नक्की करायला हवं...

* * * * * * * *

मायबोलीकर, कलाकारांसोबत Happy

* रमेश मोरे यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अशा तीन भूमिका पार पाडल्या आहेत.
# तीन वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर तयार केलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला परीक्षकांच्या पसंतीचं खास पारितोषिक जाहीर झालं. शंतनु रांगणेकर आणि मच्छिंद्र गडकर या दोघा बालकलाकारांना या चित्रपतासाठी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार मिळाले.

" 'चॅम्पियन्स'च्या निमित्ताने ऐश्वर्या व अविनाश नारकरांशी गप्पा " मधून साभार!

ऋयाम, खुप छान लिहिलयस Happy
>>> मुद्दा हा आहे, की 'सध्याच्या' जमान्यात तोचतोपणा टाळून, वेगळा विषय घेऊन, त्याच्याशी प्रामाणिक राहून, कसलीही तडजोड न करता चित्रपट बनवणारे काही मोजके लोक पुढे येत आहेत <<< वा ! +१००

ऐश्वर्या नारकर, शंतनु रांगणेकर आणि मछिंद्र गडकर यांच्याशी गप्पा झाल्या असल्याने खुप उत्सुकता होती या चित्रपटाबद्दल. त्यातून हे तिघेही इतके घरच्या व्यक्ती सारखे बोलले होते, कोणताही आव न आणता, अगदी मनापासून बोलले होते; की घरच्यांचा चित्रपट पहायचाय अशी काहीशी भावना होती मनात.

चित्रपट गृहात गेलो तर समोरच ऐश्वर्या नारकर उभ्या होत्या. प्रथम मनात आलं ते "वॉव काय मेन्टेन्ड आहेत" असंच. अगदी शीडशीडीत, हसरं, उत्साही आणि खुप सकारात्मक व्यक्तिमस्त्व ! अन चेह-यावर इतका सोज्वळ भाव की पटकन पुढे होऊन सहज बोलावसं वाटलं. ओळख देता क्षणी, "ओ, हो आपण बोललोय फोनवर" ही चटकन प्रतिक्रिया. कोणताही मुलामा नसलेले व्यक्तिमत्व. त्यांच्याशी बोलताना कळले की सकाळी मुंबईत प्रिमियर शो करून तडक पुण्यातल्या शो साठी आले होते सगळे. पण जराही दमलेले, थकलेले नव्हते. उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या पहिल्या निर्मितीचा सोहळा, त्या बद्दलचा आनंद, समाधान चेह-यावर फुललं होतं.

आमचे बोलणे चालू असतानाच शेजारी छोटं कोणीतरी उड्या मारत आल्याचं जाणवलं. अन लक्षात आलं हा मछिंद्र. अन त्याच्या मागे शंतनु. मग त्या दोघांशी थोड्या गप्पा मारल्या. अगदी साधी, सरळ, वलयाचा लवलेश नसणारी मुलं.

लांबूनच रमेश मोरे अन अविनाश नारकर दिसले, कोणाशीतरी गंभीर चर्चा चालली होती. अन तेव्हढ्यात चित्रपट सुरू होत होता म्हणून सर्व जण चित्रपट गृहात आम्हीही गेलो.
आम्ही आत जाई पर्यंत पहिली फ्रेम सुरू झाली होती. चिनुक्स, ऋयाम, एन स्वाती यांनी आपल्या मायबोलीचा लोगो झळकलेला पाहिला, मी नेमक्या वेळेस तिकिटावरचा नंबर पाहिला. अन मग हूरहूरले. चिनुक्स रागावलाही, "काय गं " म्हणुन. पण मग "रोज पाहतोच की आपण लोगो दिवसभर " या माझ्या मखलाशीवर गोड हसलाही Happy

चित्रपट सुरू झाला अन गोष्ट बरीचशी माहिती असूनही चित्रपटाने पकड घेतली. शंतनु अन मछिंद्र या चित्रपटाचे मुख्य कलाकार. दोघांनी अगदी जिंकून घेतलं. मछिंद्रच्या डोळ्यातली चमक आणि शंतनुच्या चेह-यातली समज फार फार भावून गेली. अनेक प्रसंगात त्या दोघांनी आपल्या अभिनयाची फार छान चुणुक दाखवली आहे.
मला सर्वात आवडला; जेव्हा शंतनुला मछिंद्र दिवसभर शोधत राहतो, अन रात्री त्याला त्याचा दादा घरी भेटतो; तो प्रसंग. दोघांनी अफलातून अभिनय केलाय त्या प्रसंगात.

बाकीच्या सगळ्यांनी ती, ती भूमिका अगदी पटेल अशीच केली आहे. प्रत्येकाची व्यक्तिरेखा, "हो ह्या प्रसंगात ही व्यक्ती अशीच वागेल", असंच वाटत राहतं. काही प्रसंगात काही गोष्टी नजरेस येतात, पण त्यांच्याकडे चित्रपटातल्या " टायपो " म्हणून दुर्लक्ष नक्की करता येतं. मूळ मांडणीला फार धक्का नाही लावत त्या.

दिग्दर्शक म्हणू रमेश मोरे यांचं आणि त्यांना हवी ती स्पेस दिल्याबद्दल निर्मात्यांचेही कौतुक. ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या मुलाखतीत म्हटल्या प्रमाणे, रमेश मोरे यांनी खरोखर दोन्ही मुलांकडून "अभिनय करताहेत हे जाणवून न देता अभिनय" करवून घेतला आहे. एव्हढा गंभीर विषय मुलांकडून करवून घेणं हे नक्कीच अवघड आणि जबाबदारीचे काम. अन मोरे यांनी फार छान निभावलं आहे ते. अशा गंभीर विषयावर काम करून घेताना कुठेही त्या मुलांचे मूलपण हरवणार नाही याची काळजी त्यांनी चित्रपटात अन वास्तवातही दाखवली आहे.

चित्रपटातील विषयाचे गांभीर्य आपल्याला जाणवते, अन ते अंगावर येतही नाही. अशा स्वरूपच्या विषयांमध्ये ही एक खुप मोठी भीती असते की, ते विषय आपल्या अंगावर येऊ शकतात, पण तसं न होऊ देण्याची काळजी रमेश मोरें नी घेतली आहे. इतक्या लहान वयात एव्हढी जाण खरच कौतुकाचीच आहे. त्या समोर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या निश्चित कानाआड करता येतील. भावी काळात त्यांच्याकडून अधिकाधिक चांगल्या चित्रपटांची आपण नक्कीच अपेक्षा करू शकतो. त्यांना खुप खुप शुभेच्छा!

निर्माते म्हणून नारकर पतीपत्नींचेही खुप कौतुक. स्वतःचा चित्रपट असूनही आपल्या भूमिकांची, गरज आहे तेव्हढी अन तेव्हढीच लांबी अन खोली ठेवणे मोठमोठ्या लोकांनाही जड जातं. पण सामाजिक जाणीवांमुळे ऐश्वर्या आणि अविनाश यांनी ते भान टिकवलं आहे. अगदी सहज शक्य असून अन जास्ती गर्दी खेचता येईल असा "ग्लोरिफाय" शेवट न करता सर्वात जास्त शक्य असा अतिशय व्यवहाराला धरून अन तरीही अतिशय सकारात्मक शेवट त्यांनी आणि मोरे यांनी ठेवला आहे. अनेकांना या शेवटामुळे चित्रपट अपूर्णही वाटेल. पण माझ्या मते असा शेवट करता येणं हे जास्त अवघड काम. कारण त्यात गोष्ट चालू राहते प्रेक्षकांच्या मनात. एक ठोक शेवट देण्यापेक्षा वास्तव देणं हे जास्त संयुक्तिक वाटलं नारकर आणि मोरे यांच्या वैचारिक पार्श्वभूमीवर.

ऊगाच कौतुक म्हणुन नव्हे पण खरोखर अतिशय वास्तव, सकारात्मक आणि तरीही अंगावर न येणारे आणि काही एक शक्य उत्तर देणारा चित्रपट ! मराठीत असा चित्रपट निघाला, ही खुप आनंद देणारी गोष्ट.

एक आवर्जून पहावा असा चित्रपट.

मायबोली खरोखर अतिशय योग्य चित्रपट निवडते प्रायोजक म्हणून. त्याबद्दल तिचेही अभिनंदन Happy

छान. विषय परीक्षण ही. Happy
सीडी विकत मिळेल काय चित्रपटाची? मला पुणेमुंबईला येऊअन चित्रपट पहाणे शक्य नाही म्हणून विचारते

ऋयाम आणि अवल- दोघांनी मस्त लिहिलंय. छान चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. मी नक्की बघणार. Happy

बित्तु, साजिरा, धन्यवाद. चित्रपटच इतका छान आहे ना Happy
अनघा, आताच आलाय चित्रपट तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष बघणं शक्य नसेलच तर थोडं थांबावं लागेल बहुदा.....

लवकर बघा. Happy
पहिल्या आठवड्यात जरा गर्दी झाली तरच चित्रपट दुसर्‍या आठवड्यात चित्रपटगृहात राहू शकेल.

छान लिहिलय Happy
लेकीला शाळेकडून दाखवला चित्रपट, तिला खूप आवडला, पूर्ण स्टोरी ऐकवली, तुमच्या मा बो चा लोगो दिसल्याच आवर्जून सांगीतल.
पुन्हा एकदा घरच्या बच्चे कं बरोबर पहिला. पिक्चर नक्कीच बघण्यासारखा आहे Happy
मायबोली खरोखर अतिशय योग्य चित्रपट निवडते प्रायोजक म्हणून. त्याबद्दल तिचेही अभिनंदन>>>+१