विषय क्र. १: निवडक दहा !

Submitted by मंजिरी सोमण on 28 August, 2012 - 01:24

त्याचं काय आहे, की आम्हाला सगळं हटके करायचा उगाचच चस्का होता एका वयात... आम्हाला म्हणजे मी आणि माझी मैत्रिण..... कॉलेजात असताना.
मुळात त्यावेळी हटके म्हणजे त्या वयाच्या चौकटी बाहेरचं असा समज असावा डोक्यात. बरोबरीची ४ मुलं मुली जे सहजपणे करू शकत नाहीत किंवा दूर राहतात त्यात थ्रील बिल वाटणं आणि ते जे जीव टाकून करतात त्याबद्दल तुच्छता दाखवणं हे ओघानेच आलं. आता त्यावेळी ठरवलेली आणि वाटत असलेली एकही हटके गोष्ट एकतर हटके राहिली नाही किंवा करता आली नाही आणि पठडीतली वाट पकडून आम्ही मुकाट्याने आपापली आयुष्य पुढे चालवत ठेवली, ते जाऊद्या. नाही म्हणायला हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या का होईना 'जरा हटके' गोष्टी करायचा प्रयत्न आम्ही केला, नाही असे नाही. अर्थात लोकांनी आम्हाला त्यावेळी आणि नंतरही त्यावरून वेड्यात काढायची एकही संधी सोडली नाहीच उदाहरणच द्यायचं झालं तर,
- १०वी नंतर कॉमर्स ला अ‍ॅडमिशन घेणे, म्हणजे सप ला सायन्स ला अ‍ॅडमिशन मिळत असून, लोकांनी वेड्यात काढलेलं असून आम्ही कॉमर्स ला अ‍ॅडमिशन घेतली, त्यावेळी ते प्रचंडच हटके वाटलं होतं.
- सप च्या कलामंडळात जाऊन पुरषोत्तम/फिरोदियात सहभागी व्हायची संधी असताना नाहीच जायचं ठरवलं. ज्यासाठी आम्ही स्वतःलाच वेड्यात काढतो अजूनही.
- लेक्चर बंक मारून अलकाला लागलेला इंग्रजी पिक्चर पाहणे. हे आम्ही दोनदाच केलं पण आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करतोय असं उगाचच फार्फार वाटलं होतं तेव्हा.
- लग्न न करण्याचा ठाम निश्चय करून दोघींनीच एकत्र राहण्याचे ठरवणे.
- कॉलेजमधल्या तेव्हाच्या सगळ्यात हिट आणि हॉट मुलाला जमेल तशी खुन्नस देणे.
- वर्गातली इतर मुलं सरळ सरळ तोंडावर समोरुन निघून जात असताना हताशपणे दारात उभ्या असलेल्या सरांच्या लेक्चरला बसणे... वगैरे वगैरे.
या सगळ्या हटके गोष्टींच्या गर्दीत, अगदी अतिशय आवडीने केलेली कोणती हटके गोष्ट असेल तर ती म्हणजे, समांतर किंवा हटके चित्रपट पहाणे.. शक्य असेल तर थेटरात जाऊन नाहीतर विडिओ कॅसेट आणून (यावरूनही त्यावेळी आमच्या मित्र-मैत्रिणींनी लई वेड्यात काढलं होतं, कैच्याकै बघत असता तुम्ही म्हणून)

पण या हटके चित्रपटांचा त्या वयात देखिल परिणाम झाला होता. खरं सांगायचं तर त्या वेळी सगळेच संदर्भ लागत होते असं नव्हे पण जे समोर दिसत होतं आणि ज्या समर्थ पद्धतीने हाताळून मांडलं जात होतं ते अस्वस्थ करणारं, विचाराला चालना देणार नक्कीच होतं. आपल्या समजुती बाहेरही काही वेगळ वास्तव आहे, जगणं आहे, त्या त्या संदर्भांचे असे वेगळे विचार आहेत आणि जे, 'छे! हे असलं काही प्रत्यक्षात नसतंच', असं म्हणून डावलता येत नाहीत. हे जाणवल्यावर, त्यावर वादावादी पर्यंत जाणार्‍या चर्चा होणं हे सगळं पुढच्या आयुष्यातल्या येणार्‍या प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी नकळतपणे एक प्रगल्भता म्हणा, ओपेननेस म्हणा तयार करून जात होतं. प्रसंग, परिस्थितीला वेगळे दृष्टीकोन असू शकतात, ते तसे पाहता आले पाहिजेत हे सहजपणे मनांत रुजत होतं. पण ह्याची दुसरीही एक बाजू होती. 'मला' असं वाटतं, हे ठाम होत गेलं. उमलण्याच्या वयातल्या सगळ्या नव्या नवलाईच्या निरभ्र उत्साहाला, ह्या काहीश्या असुंदर अश्या वास्तवाची जाणीव झाकोळत राहिली. सगळं सगळं सुंदर दिसत असण्याच्या वयांत ती पडद्यावरची सृष्टी मनातल्या प्रत्येक चित्रात वॉटरमार्क सारखी उमटत राहिली. माझ्या विचारांसाठी मला स्पेस हवी तर तुला ती मी आधी दिली पाहिजे हे इम्प्लीमेंट होऊ लागलं. पण जवळच्या नात्यामध्ये स्पेस देण्याचा अतिरेक झाला की ती स्पेस रहात नाही त्याचं अंतर होतं हे कळायला अजून अवकाश होता. आता विचार करता, खूप काही गर्भितार्थ असलेले चित्रपट आपण पाहिले त्या वयात याचं खूप छान फिलिंग येतं. सगळ्या पाहिलेल्या नाही तरी त्यातल्या काही चित्रपटांनी आपला खोलवर ठसा उमटवला आमच्यावर नक्कीच. आज जेव्हा हे चित्रपट कुठल्यातरी चॅनेलवर पहायला मिळतात तेव्हा आत्ताच्या परिस्थितीनुसार, वयानुसार, अनुभवानुसार त्याचे संदर्भ वेगळे लागतातही. पण कॉलेजविश्वातल्या, व्यक्तिमत्वाची वळणं तयार होण्याच्या वयात जोपासलेली ही समांतर/हटके चित्रपटांची हौस आज इतक्या वर्षांनीही फोल वाटत नाही. आणि म्हणूनच त्यावेळी खूप ट्रान्स मधे नेणार्‍या, परत परत पहाव्याश्या वाटलेल्या काही चित्रपटांविषयी लिहिल्यावाचून राहवत नाही.

१. इजाजत : नसिर आणि रेखाच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेला गुलजारचा अतिशय आशयघन चित्रपट. यातली गाणी ही कथेला सपोर्ट करणारी म्हणूनच अर्थपूर्ण. यातल्या अनुराधा पटेलची भूमिका बघून आपणही असंच काहीतरी वागलं पाहिजे असं त्यावेळेला वाटलं होतं. मैत्रीण आणि बायको या नात्यांमध्ये त्रिशंकू अवस्थेतली नायकाची कुतरओढ, बायकोची 'कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जिने दो, जिंदगी है' म्हणतानाची संयमी पण ठाम भूमिका, 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' मधला मैत्रिणीचा थोडासा इम्मॅच्युअर, हट्टी स्वभाव या सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे समोर येतात की बास! आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर ठाम निर्णय घेणं खरंच इतकं अवघड असतं का.... घेतलेल्या निर्णयावर पश्चाताप न करता समोर या क्षणी जे आहे ते आणि तेच फक्त आपलं आहे हि मानसिकता त्या वेळेपासून तयार झाली असावी का? आहे ते जसं च्या तसं स्वीकारणं आणि नसीरच्याच तोंडी असलेल्या एक वाक्य.. 'जो बित गया है उसे बित जाने दो, उसे रोक के मत रखो' हे आयुष्यातलं महत्वाचं तत्वज्ञान आत्मसात करण्याची प्रगल्भता वयानुसार आमच्यात त्यावेळी नसावी पण आता पुन्हा पाहताना इजाजत बरंच काही शिकवतो.

२. आस्था : परत एकदा रेखाच पण थोडी वयस्क. आपल्या मुलाच्या बेसिक गरजा भागवण्यासाठी शरीरविक्रय करून पैसे मिळवण्याच्या निर्णयाकडे असहाय्यपणे खेचली जाऊन त्यातच गुरफटत गेलेल्या नायिकेचा, पूर्णपणे मध्यमवर्गीय विचारसरणीला काट देणारा हा बासू भट्टाचार्यांचा चित्रपट. मनाची उलघाल, तथाकथित समाजमान्य चारित्र्य घालवून बसण्यातली तडफड रेखाने काय दाखवलीये! ओम पुरी सारख्या अभिनेत्यासमोर रेखाही तितक्याच ताकदीने उभी राहिली आहे. मात्र यात लक्षात राहतो तो सगळ्या गोष्टी कळल्यावरही बायको ला समजून घेणारा, ओम पुरी ने साकारलेला प्रगल्भ नवरा! नवरा असाही असू शकतो प्रत्यक्ष आयुष्यात... हे तेव्हा उमगण्याचं , पटण्याचं, कळण्याचं वय नव्हतंच पण लग्नाबद्दलच्या व्याख्या तयार होण्याचं नक्कीच होतं. आता विचार केला तर प्रत्येक वेळी नव्याने चित्रपट गवसत जाईल अशी आशा मात्र निर्माण होते.

३. अर्थ : महेश भट्ट मधला दिग्दर्शक रसातळाला जायच्या खूप आधीचा हा चित्रपट. शबाना आझमी काय चीज आहे हे आम्हाला हा चित्रपट पाहिल्यावर तेव्हा कळलं होतं. एका पार्टीत नवरा कुलभुषण खरबंदा जिच्यासाठी बायकोला सोडलं त्या स्मिता पाटील बरोबर येतो त्यावेळी दारू पिऊन 'बिस्तर में रंडी का रूप धारण करना चाहिये जो ये पूरा कर रही है' ह्या शबानाच्या लाजवाब अभिनयातून अंगावर आलेल्या वाक्याने आणि राजकिरण पार्टीत म्हणत असलेल्या 'है जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यू है' या गाण्याने आम्हाला अस्वस्थ करून सोडलं होतं. राजकिरण सारखा समजून घेणारा एखादा मित्र आपल्यालाही असावा असं तेव्हापासून, आजतागायत प्रकर्षाने वाटत राहिल आहे. नवर्याने हातात घटस्फोटाचे पेपर दिल्यानंतर 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो' अशी विचारपूस करणारा, दिलासा देणारा हा मित्र पण तरीही त्याला मैत्रीच्या पुढे येऊ न देता आणि शेवटी नवर्‍याला 'मेरी जगह तुम होते तो तुम क्या करते' असा सवाल करून नायिकेने एकटीनेच आयुष्याशी झगडा देत राहणं प्रचंड आवडून गेलं होतं. सगळं छान चालू असताना एकटी बायको पुरेनाशी का होते? ही मानसिक/शारीरिक गरज कुठून निर्माण होते? कुठल्या हव्यासाच्या मागे लागून आपल्या नीटनेटक्या मांडलेल्या आयुष्याची घडी एका क्षणात विस्कटायला माणूस मागे पुढे पाहत नाही? हे सगळे अनुत्तरीत प्रश्न मनाच्या कोपर्‍यात पडून आहेत जे या चित्रपटाने निर्माण केले.

४. मंडी : वेश्यांच्या जीवनावरचा, शबाना आझमीच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका असलेला मंडी. ह्या पिक्चर ने, त्यावेळेला अश्या समाजाबद्दल मनात एक प्रकारची कणव म्हणावं का उत्सुकता म्हणावी निर्माण केली होती, की खूप वेळा वाटायचं की बुधवार पेठेतून एखादी चक्कर मारावी, पण ते आमच्यासारख्या कॉलेज मुलींसाठी शक्य नव्हत. पण त्या बायकांबद्दल घृणा वाटून न घेण्याची मानसिकता आली हे मात्र खरं.

५. अनुभव : संजीव कुमार, तनुजा आणि दिनेश ठाकूर यांचा सहजाभिनय, साधीसुधी आणि अगदी आपल्या जवळची वाटणारी कथा, 'मुझे जान ना कहो मेरी जा', 'मेरा दिल जो मेरा होता' यासारखी अप्रतिम गाणी, आणि बासू भट्टाचार्यांचा दिग्दर्शनातला अनुभव, हे सगळं एक वेगळा परिणाम करून गेला होता. नेहमीचीच पठडीतली कथा, नवरा बायको चा नीटनेटका चाललेला संसार, आपापल्या उद्योगात एकमेकांकडे दुर्लक्ष होण्याच्या दिवसातच तिला परत नव्याने भेटलेला तिचा कॉलेज मधला मित्र आणि तिच्या आयुष्यात आलेली स्थित्यंतरं...... हे... हे.. असं पण घडू शकतं हे त्यावेळी स्वीकारायचं वय नव्हतंच.

६. अविष्कार : बासू भट्टाचार्य यांचा 'अ‍ॅन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एवर आफ्टर' या वाक्यानंतर सुरू होणारा आयुष्याचा खराखुरा प्रवास. आपल्या प्रत्येक चित्रपटात नायक आणि नायिकेची नावं अमर आणि मानसी घेणारे बासूदा पती पत्नीच्या नात्याचा वास्तववादी अविष्कार घडवतात. सुपरस्टार राजेशखन्ना आणि शर्मिला टागोर यांना आपल्या गुलछबू प्रतिमेतून बाहेर काढून अशा समांतर चित्रपटात घ्यायचं धाडस कसं काय बुवा साध्य केलं दिग्दर्शकाने असं आम्हाला तेव्हा आश्चर्य वाटलं होतं.

७. दृष्टी : निर्माता-दिग्दर्शक गोविंद निहलानींचा त्यावेळी आवडलेला चित्रपट. खूप काही त्याबद्दल आठवत नाही आता पण किशोरी अमोणकर चं नितांत सुंदर 'नेहा झर झर बरसत रे' हे गाणं आणि शेखर कपूर, डिम्पल आणि इरफान खान च्या त्रिकोणात बरंच काही शोधायला लावणारा वाटलेला हा पिक्चर असाच मनावर कोरला गेला. त्यावेळी आमचं मित्रमंडळ आम्हाला चिडवायचं की तुम्हाला असंच विवाहबाह्य बघायला कसं आवडतं... पण समाजातल्या प्रत्येक थरात आढळणार्‍या मोहाच्या या अश्या क्षणांवर मात करण्याचं सामर्थ्य संस्कारातून येतं हा विश्वास सुद्धा सापेक्षच आहे ही वयानुसार आलेली अक्कल त्यावेळी नव्हती. टिपिकल काही फार आवडत नव्हतं आणि हे असलं स्वीकारावं यासाठी मन तयार असणं शक्यच नव्हतं. आता लग्नानंतर इतक्या वर्षांनीसुद्धा सुरक्षित घरट्यात अश्या गोष्टी फक्त इमॅजिनच जरी करू शकत असलो तरी 'हे असं अजिबात घडूच शकत नाही' असं झिडकारून न टाकण्याचा मनाचा पाया नक्की तयार झाला असावा.

८. धारावी : ओम पुरी ने साकारलेला एक सामान्य माणूस जो माधुरी दिक्षितचा जबरदस्त फॅन असतो. त्याच्या स्वप्नात ती येत असते आणि तो तिच्याशी आपली सगळी सुखं दु:खं, आनंदाचे क्षण शेअर करत असतो. हा चित्रपट आम्ही, माधुरी यात काय करते आहे या कुतूहलापोटी बघितला होता. झोपडपट्टीत राहणार्‍यांचं विश्व, तिथले प्रॉब्लेम्स यांचं समर्पक चित्रीकरण, ओम पुरीचा सशक्त अभिनय पण बाज समांतर- त्यामुळे चित्रपट डब्यात गेला यात नवल नाही.

९. बाजार : स्टेज आर्टिस्ट्स ची तगडी टीम असलेला, खय्यामच्या संगीताने नटलेल्या अप्रतिम गाण्यांचा हा खूप परिणामकारक, वास्तववादी चित्रपट. स्मिता पाटील, नसिर, फारुख शेख, सुप्रिया पाठक यांना एकत्र स्क्रीनवर बघणं ही पर्वणीच. हा बाजार आहे मनांचा, मानवी स्वभावाचा, परस्पर संबंधांचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, समजुतींचा, गैर समजुतींचा, सुखाचा आणि दुःखाचाही. एक से एक अप्रतिम गाणी.... प्रत्येक गाण्यातून उलगडत जाणारी कथा, त्या अनुषंगाने प्रत्येक पात्राच्या व्यक्तिमत्वाचे गडद होत जाणारे पैलू.... 'दिखाई दिये यु, के बेखुद किया' या गाण्यातली सुप्रिया पाठक ची 'बाजारात' खेचले जात असण्यातली अनभिज्ञता... स्मिता पाटील ची अनुभवी तरीही अस्वस्थ नजर, प्रत्येक पात्राचा आपापल्या परीने गाण्याचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न .... 'करोगे याद तो हर बात याद आयेगी' मधली नसीर ने स्मिता पाटील साठी दाखवलेली हताशता, 'फिर छेडी रात बात फुलोंकी' मधलं सुप्रिया पाठक आणि फारुख शेख चं निरागस प्रेम, 'देखलो आज हमको जी भरके' मधली आपल्या प्रेयसीचं लग्न दुसर्‍याशी ठरल्यानंतरची फारुख शेखची परिस्थिती स्वीकारण्यातली असहाय्यता.... केवळ वर्णनातीत!

१०. (लास्ट बट नॉट द लिस्ट) माया-मेमसाब (नंतर नुसतंच माया) : काय होतं या चित्रपटात? केतन मेहता हे नाव त्यावेळी फारसं अ‍ॅट्रॅक्ट न करणारं.... दिपा साही वगैरे ठीके, फारुख शेख साठी जायला हरकत नाही असं म्हणायला लावणारं कास्टींग, किंग खान व्हायच्या आधी जरा बरा वाटणारा, म्हणजे ओव्हर अ‍ॅक्टींग न करणारा शहारूख.... हृदयनाथचं संगीत, गुलजारची गाणी.... काय.. नक्की कशामुळे आम्ही चित्रपट बघितला? आठवत नाही पण या चित्रपटाने असा काही परिणाम केला मनावर त्या वयात की वाटायचं आपल्याला भेटली पाहिजे ही माया कुठेतरी कधीतरी. थोडीशी विक्षिप्त, मनस्वी माया दिपा साहीने अतिशय ताकदीने उभी केली. कथेच्या गूढ बाजाला पूरक असणारं संगीत मनात घर करून राहिलं... या चित्रपटाचं वर्णन करू शकत नाही हा पहायलाच हवा. यातलं एक एक पात्र मानवी मनाचे कंगोरे दाखवणारं ... प्रतीकात्मक म्हणावं असं.... रस्त्याच्या कडेला अखंड गाणारा रघुवीर यादवचा भिकारी असो किंवा मायाच्या घराजवळच्या दुकानात काम करणारा छोटा मुलगा असो, किंवा राज बब्बरने रंगवलेला रंगेल पुरूष असो... प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा, जीवनाची परिभाषा वेगळी, जगण्याची रीत वेगळी आणि या प्रत्येकाचे मायाशी असलेले कनेक्शन वेगळे, आणि प्रत्येकाच्या मनातली माया ही वेगळीच. आम्हाला त्यावेळी फार आवडला होता हा चित्रपट. या चित्रपटातल्या गाण्यांनी तर अक्षरशः वेड लावलं होतं.... 'ओ दिल बंजारे' म्हणतानाचा मायाचा बेफिकीरपणा, 'इक हसीन निगाह का दिल पे साया है, जादू है, जुनून है, कैसी माया है, ये माया है' हे कथेचा गर्भितार्थ सांगणारं यथार्थ गाणं, 'इस दिल मी बस कर देखो तो, ये शहर बडा पुराना है' म्हणणाऱ्या स्त्रीचं अनोळखी रूप, 'खुद से बाते करते रेहना' म्हणत स्वतःच्याच व्याख्येत, विश्वात रमणारी, जगणारी माया.... हे हे सगळं खूप नवीन होतं आमच्यासाठी...

माया-मोह ! जे काही मूर्त , व्यक्त आहे ते सगळं मोहानेच तर व्यापून राहिलंय. कधी ते भोगाचा, आसक्तीचा विकृत, विद्रूप मुखवटा घेऊन येतं तर कधी सात्विकतेची, वात्सल्याची झूल पांघरून येतं. नाही नाही म्हणूनही त्यापासून सुटका नाही. पण हवी तरी कशासाठी सुटका. मी जन्माला आले तेच मुळी कुणाच्यातरी मोहातून कुणाच्यातरी मोहासाठी. एका मोहापासून दुसर्या मोहाकडे हा प्रवास अव्याहत चालू आहे. मोह म्हणजे लहानपणी आवडीने खेळलेल्या खांब खांब खाम्बोळी या खेळासारखा . एकाच खांबाला सतत चिकटून राहता येत नाही आणि खांब सोडून देऊनही चालत नाही. आयुष्य आयुष्य म्हणतात ते तरी काय असतं? मोह काढून टाकला आयुष्यातून तर सगळीकडे नुसती भकास अरसिक नैतिकता माजून राहील. पावलोपावली वाट बदलायला लावणारा हा मोहच तर जान आहे जगण्यातली. पण मग मी नक्की घ्यायचं तरी काय? अश्या संभ्रमात त्यावेळी ह्यातल्या प्रत्येक चित्रपटाने कमी अधिक प्रमाणात ढकललय. कुठलीही गोष्ट/व्यक्ती चांगली किंवा वाईट नसते, त्या त्या वेळची परिस्थिती माणसाला चांगलं किंवा वाईट वागायला भाग पाडते... शेवटी चांगलं काय नि वाईट काय सगळं सापेक्षच.... या सापेक्षतावादाचे संस्कार या चित्रपटांनी मनावर केले ते मात्र कायमचे! 'आहे हे असं आहे' या वृत्तीचे स्वभावात परिवर्तन होण्याकडे एक पाऊल टाकण्यात या चित्रपटांचा मोठा हातभार आहे.

हे आणि असे अनेक हटके म्हणावे असे समांतर चित्रपट. टाईमपास करण्याच्या वयात या चित्रपटांनी का भुरळ घातली, मनाचा का ठाव घेतला ह्या प्रश्नांची उत्तर शोधायचा कधी प्रयत्न करावासा वाटला नाही. आजही अश्यांपैकी कुठला एखादा चित्रपट टीव्ही वर दिसला की मन तिथे घुटमळत. हातातली कामं बाजूला ठेवावीशी वाटतात. आजूबाजूच्या लोकांकडून शिव्या खायची मानसिक तयारी होते. आणि पुन्हा एकदा... आधी पाहिलेल्या चित्रपटातून नवा अर्थ, संदर्भ शोधण्याची मनाची खोड डोकं वर काढते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखन साहाय्य : बंड्या जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचला पुर्ण लेख....
वरीलपैकी एकही चित्रपट मी पाहिला नसतानाही वाचला पुर्ण लेख..
माया मेमसाब मध्ये शाहरुख असूनही मी तो पुर्ण नाही पाहिला, मध्येच सोडला.. हे विशेष..

पण यापुढे यापैकी कोणता चित्रपट बघायची संधी आली आणि मी तो बघितला तर नक्कीच क्रेडीट गोज टू यू.. फारच छान विश्लेषण.. Happy

अगदी आतून असे वाटत होते की अश्या चित्रपटांवर एकंदरीत कोणीतरी लिहावे. (जसे इजाजतवर माधव यांनी लिहिले, तसे अश्या चित्रपटांवर एकाच धाग्यात लिहिले जावे असे) Happy

लेख पूर्ण वाचलेला नाही. पण सिलेक्शन जबरीच आहे. भावनाही पोचल्याच. अभिनंदन व शुभेच्छा

-'बेफिकीर'!

निवडक दहा आवडले Happy
बाजार बद्दल +१०००००० Happy
या स्पर्धेत जर मी काही लिहिले असते तर "बाजार" या चित्रपटाबद्दलच असते. Happy

मी जन्माला आले तेच मुळी कुणाच्यातरी मोहातून कुणाच्यातरी मोहासाठी. एका मोहापासून दुसर्या मोहाकडे हा प्रवास अव्याहत चालू आहे. मोह म्हणजे लहानपणी आवडीने खेळलेल्या खांब खांब खाम्बोळी या खेळासारखा . एकाच खांबाला सतत चिकटून राहता येत नाही आणि खांब सोडून देऊनही चालत नाही. आयुष्य आयुष्य म्हणतात ते तरी काय असतं? मोह काढून टाकला आयुष्यातून तर सगळीकडे नुसती भकास अरसिक नैतिकता माजून राहील. >>>>>>

मंजे, अगदी अगदी Happy

छानच !

त्यातल्या काही चित्रपटांनी आपला खोलवर ठसा उमटवला आमच्यावर नक्कीच. आज जेव्हा हे चित्रपट कुठल्यातरी चॅनेलवर पहायला मिळतात तेव्हा आत्ताच्या परिस्थितीनुसार, वयानुसार, अनुभवानुसार त्याचे संदर्भ वेगळे लागतातही >> अगदी पटले. पूर्वी खूप आवडलेले काही चित्रपट आता अगदीच कंटाळवाणे होतात तर काही मुरलेल्या वाईनसारखे अजूनच तरल करतात.

आस्था मध्ये पण किशोरी ताईंचे एक अफाट गाणे आहे.

लेख मस्तच.

सुंदर लेख, मंजिरी. फारच छान लिहिला आहेस. बर्‍याच स्पर्धेकांनी एक सिनेमा किंवा एक अ‍ॅक्टर याबद्दल लिहिलं आहे, ते वाचायला मजा आलीच, पण असा निवडक दहाचा आढावा ही कल्पनाच छान आहे. थोडक्यात लिहिलेली चित्रपटाची माहितीही छानच. तुझे निवडक १० माझ्याही निवडकमधलेच आहेत. एक अविष्कार सोडता बाकी सगळे पाहिले आहेत. अविष्कार आता शोधावाच लागेल. अशा एकत्रित यादीसाठी धन्यवाद.

फार सुरेख लिहिलेस मंसो. ह्यातले काही चित्रपट मीही पाहिले आहेत आणि खूप आवडतेही आहेत.
रैना म्हणते तसे लिहीत जा. Happy

मंजिरी.. सुर्रेख आवड आहे तुझी.. आणी खूप छान लिहिलेसही!!
या यादीतले सर्व पाहिलेत..माया मेमसाब चं रूप अगदीच 'हटके' होतं नै??
अत्यंत 'स्लो' मोड मधे असणारा आविष्कार' अजिबात आवडला नव्हता..
या यादीत बासू चटर्जी चा 'रजनीगंधा' आणी बासू भट्टाचार्य चा 'गृहप्रवेश- (संजीव्-शर्मिला-सारीका ) पण फिट होतील..
या दोन्ही सिनेमांतून हटके प्रश्न आणी हटके सोल्यूशन्स दाखवले आहेत

खूप छान विश्लेषण केले आहे .... मी आणि माझी मैत्रिण पण असे समांतर सिनेमे बघायचो ... आणी लोकांकडून शिव्या खायचो .... तेच आठ्वले .... सिलेक्शन खूप छान आहे

मंजिरी, निवडक दहा आवडले. बरेचसे पहिले आहेत आणि त्याबद्दल तुम्ही लिहिलेले अगदीच पटले.
असे हटके चित्रपटच खूप काही देऊन जातात.... उच्च अभिनय, आशयघन संवाद, अशक्य भिडणारी गाणी, वेगळा दृष्टीकोन आणि परीघाबाहेरचा विचार...
ह्यातले काही बघायचे बाकी आहेत.. ते आता पाहायलाच हवेत. ह्या सुंदर लेखाबद्दल खूप धन्यवाद! Happy

मस्त ! इजाजत, बाजार फारच आवडले होते. माया मेमसाब मधली गाणी फारच आवडली होती. त्यातल्या `हर अंत की कोई शुरूवात होती है' (किंवा असंच काहीतरी ) वर मैत्रिणींमधे चर्चा झालेली आठवतेय.

आस्था मध्ये पण किशोरी ताईंचे एक अफाट गाणे आहे. >>>>>माधव किशोरी ताईंचे कुठले गाणे??? "लबोंसे चूम लो, आंखो से थाम लो मुझको, तुम्ही से जन्मु तो शायद मुझे पनाह मिले..." हे एकच गाण आस्थामधले माहित आहे आणि ते पण श्रीराधा बॅनर्जी यांनी गायले आहे.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

सुंदर लिहिलंय !
ह्यातील काही चित्रपट पाहिलेत आणि खूप आवडलेत. उरलेले पाहीन.

<< "लबोंसे चूम लो, आंखो से थाम लो मुझको, तुम्ही से जन्मु तो शायद मुझे पनाह मिले...">> अफाट गाणं आहे. खूप आवडतं.

आत्ये, लेख प्रचंड आवडला. निवडक दहाची लिस्ट माझी पण सेम. त्यातल्या त्यात माया मेमसाब आणि बाजार हे प्रचंड आवडते चित्रपट.

मेरे सरहाने जलावो सपने
मुझे जरासी तो नींद आये....

खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांवमें चल रही हूं...
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
मै सहमी रहती हूं नींदमें भी
कही कोई ख्वाब डस न जाये.....

मेरे सरहाने जलावो सपने........ !!

मायामधल्या या गाण्याने मला 'गुलझार' नामक गुलजार वेड लावलं आणि गुलजारच्या नादाने इजाजत बघताना 'रेखा' नावाचं दुसरं व्यसन लागलं Happy

Pages