विषय क्रमांक १: गुंतले भावबंध..

Submitted by रैना on 23 August, 2012 - 15:14

Everyone has two jobs – that of a film critic and what they do for a living...असे म्हणतात.

मराठी चित्रपटांशी (आणि खरंतर चित्रपटांशीच) नाळ जोडली जाणे याचे श्रेय माझ्या आईवडिलांना आणि दूरदर्शनला द्यावे लागेल. त्याकाळी दूरदर्शनवर मौज असायची (असे म्हणायची पद्धत आहे), पण खरंच, बरेवाईट, सर्व प्रकारचे चित्रपट मराठी, प्रादेशिक आणि हिंदी - हे दूरदर्शनवर पाहिलेत. त्यातही शासकीय टुमीबरहुकुम असले, तरी त्यांच्या रँडम (कधीकधी बिनडोक) का होईना, निवडपद्धतीने काय केले असेल तर बर्यावाईटाचे संस्कार. इतके चित्रपट पाहिले, की आपोआप एक प्रेक्षकवर्ग तयार होत गेला असे आता वाटते. (तेव्हा वैताग यायचा. शासकीय दुखवटा असल्यावर तर फारच) 'कसं काय पाटील बरं हाय का' नंतर थेट अदुर गोपालकृष्णन किंवा सत्यजित राय यांचे चित्रपट आणि मग थेट 'कर्ज' किंवा 'कानून अपना अपना'. कशाला कशाचा पत्ता नसे (किंवा सर्व प्रकारचे चित्रपट पहावेत, ऊंचनीच/ भेदभाव न करता) म्हणूनच अपघाताने प्रेक्षक तयार होत गेला की काय कोण जाणे. (आणि गंमत नाही, वर्षाकाठी १०४ चित्रपट कशाला पाहता असे वडिल म्हणायचेही. तरी त्यांना आम्ही बरेच प्रादेशिक भाषेतील चित्रपटही पहायचो ते बहुधा ठाऊक नसावे. मेंदुच्या हार्डडिस्कमध्ये इतका भयानक कचरा साठलेला आहे, की ती क्रॅश होणार असे वाटतच असते नाहीतरी. आता वर्षाकाठी १०४ चित्रपट पहायचा विचारही करु शकत नाही.)

माझ्या मर्मबंधातील हे काही निवडक मराठी चित्रपट, गाणी, आठवणी. या लेखनाला काहीच शिस्त नाही, अभ्यासपूर्ण नोंदी नाहीत की काळानुरुप यादी नाही. नुसतीच स्मृतिचित्रे आहेत. तुमच्या आमच्या मनातली..

नवे, तरुण, ताज्या दमाचे, मनोरंजक चित्रपट. उगाच रडायचे काम नाही. मराठी म्हणावी अशी अभिव्यक्ती, भाषा काही मरायला बिरायला टेकलेली नाही अशी आशा निर्माण करणारे. थांबवा आता ते रुदन असे मला वाटले, ते या नव्या चित्रपटांच्या लाटेमुळे. 'वळू, देऊळ, शाळा, गंध, मसाला, निशाणी डावा अंगठा, हरीश्चंद्राची फॅक्टरी, पक पक पकाक'. या 'नवीन' लोकांचा दृष्टीकोन मला आवडतो आहे. (सध्या!!!). एकतर ते चित्रपट 'चला मुलांनो, आता बरंकाSS' थाटाचे वाटत नाहीत. ताजा दृष्टीकोन वाटतो. गंमत आहे या चित्रपटांमध्ये. एक पॉश साधेपणा आहे. नवीन प्रयोग करायची तयारी आहे आणि 'थँक्यू फॉर दॅट', अभिनिवेश कमी आहे!!

हां, आता थोडेसे सुलभीकरण होते, 'हसत- खेळत' या मात्रेचा वळसा अंमळ जास्त पडतो, पण तो माझ्या अपेक्षेतला मनोरंजक चित्रपट आहे. त्यामुळे चालतेय. (सध्या!!!)

'डोंबिवली फास्ट' ते 'श्वास 'ते अगदी पार 'मातीच्या चुली' /'उत्तरायण' पर्यंत उदाहरणे असताना मराठी चित्रपटात राम नाही असे रडायचे कारणच काय? म्हणजे ठीक आहे, आहेत त्या समस्या माहीत आहेत, कबूलही आहे. तरीही वैचारिक दिवाळखोरी आली आहे असे (अजूनतरी) वाटत नाही.त्या अशोक-लक्ष्या-सचिनपटांपेक्षा बरीच बरी परिस्थिती आहे की सध्या! तरी त्यांच्या काळाला वगळून चालणार नाहीच, कारण आम्ही लहान असताना ते चित्रपट पहावे लागायचेच. आदळायचेच. इच्छा असो वा नसो. आता लक्षात आहेत ते फक्त 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका' , 'गुपचप गुपचूप', 'नवरीमिळे नवर्‍याला'.

आणि मला सर्वात आवडते ती या नवीन तरुण पब्लिकची दंभ दाखवून द्यायची वृत्ती. कानफटात न वाजवताही 'सोनाराने कान टोचले'असे वाटते की नाही पाहताना?
ह्या नवीन चित्रपटातली/ त्यातली पात्रं अशी आपल्या भोवतालची, आणि म्हणूनच 'खरी' वाटतात की नाही? तो जातीवाद, देवभोळेपणा, राजकारण. ते आपल्या मनातले छोटे गाव असते, तिथली साधी माणसे आणि दंभ, तिथला साचलेपणा, दुसर्यावर कुरघोडी करण्याची वृत्ती, ठकास महाठक बेरकी माणसे, आपल्या चांगल्याच परिचयाचे असतात.
संवाद, संगीत लक्षात राहतात की नाही ?
कथा, पटकथा, दिग्दर्शनाला आपण दाद देतो की नाही?
त्याहीपेक्षा, आपण प्रेक्षागृहातून त्या धुंदीत बाहेर पडतो की नाही?

(अवांतर
१) आणि काळजी करायचीच तर ती आधी मराठी भाषेची करावी. मराठी असे काही राहिलेच नाही हल्ली, आडातच काही नाही तर मग तो दिग्दर्शकांचा दोष कसा हेच मला कळत नाही.
२) बाकी सर्वात राग येतो तो स्वतःच्याच अति प्रेमात असलेल्या कलाकारांचा, पण ते असो. आपण त्यांच्या जागी असतो तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन शोभा करुन घेतली नसतीच अशी खात्री देता येत नाहीच, पण डोक्यात जाते हे खरे.
३) आणि नटमंडळी सारखे वर्तमानपत्रातून का लिहीत असतात ? असोच. तो एक वेगळाच विषय आहे.
४) मराठी भाषेतील लघुपट, डॉक्युमेंटरी यांच्यापर्यंत आम्ही सामान्य प्रेक्षक सहजासहजी पोचू शकत नाही)
...

काही वर्षांपूर्वीचे 'अस्मिता चित्र' चे चित्रपट माझ्या घरगुती स्मृतीचित्रांमध्ये विसावले आहेत. 'सवत माझी लाडकी', 'कळत नकळत', 'चौकटराजा' .... संयत अभिनय ही त्यांची जमेची बाजू. बाकीचेही पाहिलेत,पण विशेष आवडले नाहीत. आता हे चित्रपट पाहिले तर हे जरासे(च) अतिरंजक वाटतात, नाही असे नाही. पण तेव्हा विलक्षण ताजे वाटायचे हे खरं. त्यातली पात्रे आणि ते साकारणारे कलाकार संस्मरणीय होते. त्यातल्या स्त्री व्यक्तीरेखाही सशक्त होत्या. संवाद जबराट टाळीखाऊ असायचे, त्यामुळेच 'सातच्या आत घरात' आला तेव्हा, 'अरे! यांचे (अख्ख्या टीमचे) हे असे काय झाले?!' असे वाटले होते.

मोडकांचे संगीत कहर सुरेख होते. काव्य सुंदर होते. भट्टी जमली होती. 'मुक्ता' हा चित्रपट आवडत नाही फारसा. तरी त्यातली गाणी अफाट सुंदर होती. मराठी चित्रपटसंगीताला मधुमेही गोSSSड गाण्यांतून सूट दिली ती मोडकांनी आणि (काही अंशी) हृदयनाथ मंगेशकरांनी असे वाटते. आम्ही कॉलेजात होतो. बॉम्बेचे संगीत धुमाकूळ घालत होते. त्या वेळेसच मोडकांचे संगीत वसतीगृहाच्या (काही) खोल्यांतून वाजत असे ही गोष्ट खरी आहे. आजच्या पोरांच्या मोबाईलवर, आयपॉडवर 'लल्लाटी भंडार'ची धून वाजते तशीच.

भावे-सुकथनकर यांची सिनेमा बनवायची पॅशन, प्रयोगशीलता आणि कमी खर्चात बनणारे, तशी चांगली मजबूत संहिता असलेले नावाजलेले चित्रपट पाहिलेत. त्यांचे मराठी चित्रपटांना दिलेले योगदान मोलाचे आहे याबाबत दुम्त नाही. ते चित्रपट इंटुकांना आवडतात, त्याबद्दल नेहमी लिहून येत असते वगैरे, पण ते माझे फार आवडते चित्रपट नाहीत. आधीच त्या चित्रपटांबद्दल इतके वाचावे लागते, म्हणजे ते डोळ्यासमोर आदळतच असते, की पाहीपर्यंत त्यातली मजाच निघून जाते.
का ते नाही सांगता येत. एक 'प्राण' मिसिंग वाटतो त्यांच्या चित्रपटांमध्ये. त्यातले सगळे सुटे आवडते: संवाद, स्थिरचित्रे, चौकट, अभिनय, कथा' पण एकत्रितरीत्या पाहताना काहीतरी कमी वाटते. ते पडद्यावर दाखवलेले नाटकच वाटते समहाऊ, आणि कलाकारांची निवडही नाही आवडत. दफ्तरदार बाईंच्या संवादाचा 'पिच' रसभंग करतो.एलकुंचवारही स्टिफ वाटतात पडद्यावर. पण भावे-सुकथनकरांच्या चित्रपटांच्या सीड्या मिळतात, त्यामुळे हे चित्रपट निदान पहायला मिळतात आणि वेगळा प्रयोग म्हणुन नेहमी आवर्जून पाहिले जातात. माझ्या स्मृतीचित्रांत 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'नितळ', 'दोघी' .

आणि फारसे न आवडतानाही हे चित्रपट मनात कुठेतरी राहतात.. कारण बहुतेक वेगळे विषय, सुरेख संहिता,अभिनव सादरीकरण.
पण मग आवड आणि नावड म्हणजे काय?
आपण मराठी चित्रपटांची आणि प्रेक्षकांचीच स्ट्रॅटेजी वापरुया. अशा गहन प्रश्नांच्या अरण्यात शिरायचेच नाही. बाहेरुनच प्रदक्षिणा मारायची. सोपेच करुन ठेवायचे सगळे. अल्बम चे पान पलटूया.

पालेकरांचे चित्रपट.....'ध्यासपर्व' आणि 'बनगरवाडी'. दोन्ही मला फार आवडतात.त्यातल्या चौकटी चित्रवत होत्या ना. बनगरवाडीला वनराज भाटियांनी दिलेले पार्श्वसंगीत प्रयोगशील, अभिनव आणि गोडही होते. किशोर कदम या अभिनेत्याचे चित्रपट सहसा चुकवायचे नाहीत हे मी माझ्यापुरते ठरवलेले आठवते. नंतर त्यांना 'नारायण सुर्व्यांवरील लघुपटात पाहिले, 'जोगवा'मध्ये पाहिले.
कुठल्याही भूमिकेत ते दीर्घकाळ स्मरणात राहतील. खरोखरी गुणी कलाकार हो.

अल्बम मधले अजून एक पान. खरे तर सोनेरी पिंपळपान. या पानावर 'शामचीआई', 'साधीमाणसं', 'मराठा तितुका मेळवावा,' 'ब्रम्हचारी', 'कुंकू', 'माणूस', 'तुकाराम'. यातल्या प्रत्येक चित्रपटावर कितीतरी लिहीता येईल. लिहील्या गेले आहे. माझ्या कुटुंबातील मुलांना हे चित्रपट कधी पहायला मिळतील का? निदान वारसा म्हणून तरी .. असे मला कधीतरी वाटून जाते. यातला प्रत्येक चित्रपट निदान दोनतीनदा पाहिला तो दूरदर्शनच्या कृपेने. त्यातली गाणी पाहिली ती दूरदर्शनवर. चित्रपट पाहिला की दुसर्या दिवशी आम्ही शाळेत दुष्टपणे 'नगं,नगं' वगैरे आवलीबाईंची नक्कल करायचो, पागनीसांच्या आमच्या मते 'संत' (मरीयल)टोन मध्येबोलायचो. माझी धाकटी बहिण 'कशाला उद्याची बात' मधल्या शांताबाईंची नक्कल हुबेहुब करायची, तेव्हापासून ते आत्ता आत्तापर्यंत. 'प्रभात' आणि 'व्ही.शांताराम' आणि 'जयप्रभा' आणि 'चित्रतपस्वी भालजी पेंढारकर' ही काय चीज होती ते फक्त वाचूनच कळले नंतर. 'देव, देश आणि धर्म' यांनी झपाटलेल्या भालजींच्या चित्रकर्तृत्वाने, किंवा प्रभातच्या क्रियेटीव्हीटीने दिपून जायला होते. निदान सांस्कृतिक वारसा म्हणून हे चित्रपट पहायला मिळाले हेच नशीब. ते मला आवडतात का, हा प्रश्नच गौण आहे. आज माझ्या स्मृतीचित्रांत 'आधी बीज एकले', 'कुंकू' मधल्या शांताबाई आपटे, 'माणूस' (आणि 'पिंजरा') चे स्टायलिश दिग्दर्शन आणि कहर खत्तरनाक गाणी आणि लागू-संध्या, 'साधी माणसं' मधील लताबाईंच्या सुरेख चाली, खेबुडकरांचे शब्द आणि जयश्रीबाई आणि त्यातील खलनायक.

दोन परिच्छेदांत काय काय सामावणार. तरीही ही छोटीशी पोच. माझ्या मनात 'सेपिया टोनची जादू' रुजली ती या चित्रपटांनी. हा सांस्कृतिक वारसा आवडनिवडीच्या पलिकडच्या कप्प्यात आहे. एकदा कपाट उघडले की ठेवणीतल्या भरजरी पैठण्यांसारखे हे. किती भरजरी आहे. कोण नेसणार रोज? काय हे भडक रंग.. वगैरे..अस्थानी.

आणि या अशा तथाकथित सोज्वळ, पवित्र, समाजाभिमुख, तत्ववादी अँड ऑल दॅट चित्रपटनिर्मीती करणार्‍या मराठी चित्रपटसृष्टीतले राजकारण, पैसा, प्रसिद्धी, आयुष्याची शोकांतिका, नशेचा अंमल, अनेक स्त्रियांशी संबंध वगैरे अटळ दशावतार. नंतर 'कुण्या एकाची भ्रमणगाथा', 'सांगत्ये ऐका', 'उषःकाल- 'उषा किरण यांचे आत्मचरित्रापासून ते अगदी अलिकडे आलेल्या 'परतीचा प्रवास' मध्ये वनमालाबाईंच्या विस्कळीत आठवणी, 'नाथ हा माझा' यातून तुकड्या तुकड्यातून उमजत गेले तेव्हा मराठी साहित्याबाबत वाटला, तो त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा आदरच.
कष्ट, कष्ट म्हणजे किती कष्ट. फडक्यांच्या स्ट्रगल बद्दल, वणवणीबद्दल 'जगाच्या पाठीवर' मध्ये वाचले तेव्हां काय वाटले ते शब्दात सांगणे अवघड आहे. त्यांना त्याबद्दल फारशी खंत नाही, त्रागा नाही की काही नाही. झळझळीत यशामागची ही बाजू वाचताना, ते यशही ज्यांना आजन्म लाभले नाही, असे कित्येक कमनशीबी असतील हा विचार डोकावतोच.

आणि ज्या उल्लेखाशिवाय माझी रुपेरी पडद्यावरील स्मृतीचित्रे अपूर्ण आहेत ते जब्बारपट. 'सामना', 'सिंहासन', आणि अविस्मरणीय 'उंबरठा' !! स्मिता पाटलांनी प्राण फुंकलेली 'सुलभा महाजन' कोण विसरु शकेल. आजसुद्धा उंबरठाच्या तोडीचा त्याच विषयावरचा मराठी चित्रपट सहजासहजी आठवत नाही. कुटुंब व्यवस्थेत घुसमटणारी, स्वतःला शोधणारी ती स्त्री, तिची आपल्या कामाप्रती असलेली स्वच्छ व्यावसायिक निष्ठा, भोवतालचा पोखरलेला, गंजलेला, सडका समाजव्यहार आणि पोकळ नात्यांचे डोलारे, आणि शेवटी घराचा उंबरठा कायमचा ओलांडण्याच्या निर्णयाप्रत आलेली ती स्त्री. (१९८२ साली समलैंगिकताही न कचरता दाखवली याबाबत पटेल, तेंडुलकरांचे प्रचंड कौतुक वाटते.) आजही सुलभा महाजन knows no parallel. प्रचलित व्यवस्थेविरुद्धच्या झगड्यात 'दीवार'चा अमिताभ आणि ही मनस्वी बाई माझ्या डोक्यात सारखेच फीट आहेत. त्यांच्या नजरेतील ती धग, चीड, त्वेष आणि बरंच काही मला अस्वस्थ करतं, सोबत करतं आणि झपाटुनही टाकते. (आणि त्यांच्याजागी इतर कुणाची कल्पनाही करवत नाही)
आणि गाणी?
.....आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळु दे.....
खरंतर नुसत्या गीतांवरच एक वेगळा लेख लिहिला जावा. त्या भट/ बापटांच्या अस्सल कविता आहेत आणि संगीत एका झपाटलेल्या फकीराची कमाल आहे. ते शब्दांना फुटलेले मोहर आहेत, गोंडस सुकोमल नव्हेत, शाल्मलीच्या मोहरासारखे ज्वालाग्रही भासणारे..

..या भाराभार चिंध्या तर खरेच....
आम्ही रहात होतो त्या एका देशात, मंदिरासमोर झाडाला चिटोरे बांधुन मन्नत मागायची पद्धत आहे. हिवाळ्यात ती पर्णहीन झाडे आणि कोणाकोणाच्या अपूर्ण इच्छांची रंगीबेरंगी कागदी भूते वार्‍यात फडफडत असतात. ह्या माझ्या स्मृतीतील तशाच कागदी चिंध्या समजा....

आणि या अजून सोबत असताना कशाची वानवा ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, छान लिहिलयंस Happy चार दोन सिनेमे वगळता फारसे मराठी सिनेमे पाहिले नाहीत अन् त्यातल्या त्यात जुन्यातला सिंहासन, अन् नव्यातला घरोघरी मातीच्या चुली फार आवडला.

खूप आवडला लेख!! ते दूरदर्शनवरचे प्रादेशिक मुव्हीज बद्दल तर अगदी अगदी! मीही फार उत्सुकतेने बघायचे ते मुव्हीज! नावं काहीच लक्षात नाहीयेत पण ते बरेचसे चित्रपट आवडले होते एव्हढं नक्की!

या स्पर्धेच्या निमित्ताने (माझ्या) विस्मरणात गेलेले अप्रतिम चित्रपट समोर येत आहेत. काही महिने आता हे चित्रपट पाहण्यात जाणार. Happy

रैना, चांगलं प्रमाणिक लिहिलं आहेस.

लेख आणि प्रतिक्रिया वाचताना अनेक चांगल्या मराठी 'पिच्चरां'च्या आठवणी मनात जाग्या झाल्या.

अशोक सराफ आणि लक्ष्याचे चित्रपट कसेही असले तरी ल्हानपणी शाळेत दोस्तांच्याबरोबर चर्चिण्यासाठी लय भारी होते. धडाकेबाज एक लंबरावर.

किशोर-कदम-अभिनय फक्त ध्यासपर्व आणि जोगवातच आवडला.

स्मृतिचित्रे आवडली.

ते मधले 'अवांतर' अगदी माझ्याही मनातले. मराठीच काय पण अगदी हिंदी, इंग्रजी भाषांतील लघुपट, डॉक्युमेंटरी मिळणारे मुंबैतले ठिकाण मलाही हवय.

सुंदर आणि वेगळा लेख!

माझ्या दूरदर्शनच्या आठवणीत वजिर, चौकटराजा, पाठलाग, सुगंधी कट्टा, आणि एक होता विदुषक इत्यादी.

नवीन खुपशा चित्रपटांसाठी - माफ करा!

मस्त लिहिलंय Happy

अस्मिता चित्रचा परीच्छेद आणि <<(१९८२ साली समलैंगिकताही न कचरता दाखवली याबाबत पटेल, तेंडुलकरांचे प्रचंड कौतुक वाटते.)>> हे वाक्य वाचताना 'अगदी, अगदी' असे आपसुकच झाले Happy

नेहेमीप्रमाणे छानच लिहिलय.. मला दोघी, वास्तुपुरुष हे आवडतात आणि तू लिहिलेल्या उणीवा ह्या दोन्ही चित्रपटात दिसत नाहीत.. खोटे कशाला बोला अशी ही बनवाबनवी सुद्धा लय म्हंजी लय आवडतो. मला वाटले उत्तरायण विसरशील.. पण आहे हो उल्लेख Happy

रैना, लेख वाचनीय झाला आहे ..

>> मते आणि प्रतिक्रिया वैयक्तिक असल्या, तरी हा प्रदीर्घ काळाचा आढावा आहे, जे करणं सोपी गोष्ट नाही

+१

सगळ्यांचे आभार.
लेखाबद्दल अजिबात खात्री वाटत नव्हती. पण फारसे कोणी मराठी चित्रपटांबाबत न लिहिल्यामुळे अस्वस्थ वाटत होते.

साजिर्‍या हो, खूप चित्रपट सुटुन गेले. फ्लो मध्ये कसे बसवायचे कळत नव्हते.
लपंडाव (श्रावणी देवधरांचा), सोंगाड्या, पाठलाग, लाखाची गोष्ट, तार्‍यांचे बेट वगैरे.

एकामागून एक चित्रपट पाहिले की मेंदू हँग झाल्यासारखा वाटतो. >> +१

हो नीधप, 'तार्‍यांचे बेट' मस्त होता. त्याच्या व्हीसीडीज आल्या तेव्हा घरी, बहिणीला, नणंदेला, मैत्रिणींना वगैरे पाठवल्या होत्या. काहीच फीडबॅक आला नाही. Happy

छोट्या छोट्या पातळ्यांवर अनेकांचे प्रयत्न चालू असतात पण म्हणावं तसं बाळसं या प्रयत्नांनी अजून धरलं नाहीये. आशा करूया हे घडेल अशी. >> +१

माधव +१.

रंगल्या रात्री अशा आठवतो आहे. एक गाव बारा भानगडीही आठवतो. >> हो मलाही. Happy

नटरंग, बालगंधर्व- माफ करा>> खरंच 'जौ द्या झालं' होते ते. पण व्यावसायिक यश मिळाले त्याचे मात्र कौतुक वाटले. त्यांच्यामुळे का होईना प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटांबाबत चर्चा करु लागले..

Pages