अहुपे घाट : एक स्वर्गीय अनुभव !

Submitted by Yo.Rocks on 23 August, 2012 - 07:33

फेसबुकवर शुक्रवारी रात्री स्टेटस अपडेट केला.. "Such a Big Weekend.. But nothing yet planned.. Only thing is Way to Ahupe on coming Sundey.. Think shower of rain is jst waiting for us to come outside ;)"

पावसाने यंदा निराश केलेच होते.. शिवाय पावसात हवा तसा चिंब चिंब ट्रेक काही झाला नव्हता.. आता हाताशी आलेला मोठा विकांत रिकामा का सोडावा म्हणून फारसा गाजावाजा न करता 'अहुपे ते भीमाशंकर' अशा मेगा-ट्रेकच्या प्लॅनची नेहमीच्या मायबोलीकरांमध्ये ठिणगी उडवली.. पेट घेतला खरा पण सगळ्यांना या ना त्या कारणाने जमत नसल्याने क्षणातच विझून गेली.. नि असा मोठा ट्रेक करायचा तर पाच सहा जणांचा गट असायलाच हवा.. शिवाय पावसाने दडी मारलीच होती.. अगदी शुक्रवार उजाडला तरी काहीच ठरले गेले नव्हते.. अखेरीस दोन-तीन दिवसीय ट्रेकचा नाद सोडून शेवटच्या क्षणाला एकदिवसीय ट्रेक आखला गेला.. दिनांक १९ ऑगस्ट २०१२ रोजी अहुपे घाट ! पण निघायचे शनिवारच्या रात्री...

घाटरस्त्याचा ट्रेक करण्याची तशी पहिलीच वेळ.. पण पावसात ह्या घाटाला स्वर्गीय रुप प्राप्त होते हे चांगलेच ठाउक होते.. कितीतरी पावसाळे हा ट्रेक करता करता शेवटी कोरडेच राहीले होते.. पण आता स्वर्गीय अनुभव घेण्यास आम्ही आतुर झालो होतो.. ग्रुप म्हणाल तर नेहमीची मायबोली गँग - हजर मायबोली आयडी: इंद्रधनुष्य (इंद्रा), गिरिविहार (गिरी), रोहीत..एक मावळा (रोमा), गिरीश जोशी (जो) नि अस्मादिक यो रॉक्स (यो).. मिळून हम पाँच !!

शनिवारी रात्री कल्याणहून सुटणारी मुरबाड एसटी आली नि एकच कल्लोळ झाला.. कल्लोळ होणारच.. कारण या एसटीला ट्रेकर्सलोकांचीच जास्त भरती.. आमच्याव्यतिरीक्त अजुन दोन ग्रुप होते.. एक जवळपास वीस जणांचा असलेला ग्रुप सिद्धगडाला जाणार होता तर बाकी ६-७ जणांचा ग्रुप गोरखगड करणार होता.. ही शेवटची एसटी जोपर्यंत मुरबाड स्थानकात पोहोचत नाही तोपर्यंत मुरबाडहून धसईला जाणारी एसटी सोडली जात नाही..

हो धसई.. सिद्धगड असो वा गोरखगड वा अहुपे असो.. हीच मुरबाड ते धसई व्हाया म्हासा ही एसटी पकडावी लागते.. अर्थात दिवसा गेलात की मुरबाडहून प्रायवेट जीप/वडाप उपलब्ध असतात.. सिद्धगडसाठी पहिले नारिवली स्टॉप नंतर गोरखगडासाठी डेहरी आणि मग अहुपेसाठी खोपिवली हे ठरलेले स्टॉप..

शेवटची एसटी तेव्हा पुर्णपणे भरलेली जिथे ट्रेकर्समंडळीच जास्त.. बाकी मुरबाडला नोकरीसाठी येणारी गावांतील मंडळी.. 'अहुपे घाटाच्या पायथ्याचे गाव' इतकीच आम्हाला 'खोपिवली' गावाची ओळख होती. बाकी काहीच माहित नव्हते.. एवढ्या रात्री जायचे तर मुक्कामाचा प्रश्ण होता.. गाव म्हटले तर शाळा अथवा देउळ असेलच एवढाच काय तो तर्क लावून आम्ही निघालो होतो.. कल्याण-मुरबाड आणि मुरबाड-खोपिवली असा जवळपास दोन तासांचा प्रवास करून आम्ही खोपिवलीला पोहोचलो.. आमच्याबरोबरच काही तेथिल स्थानिक गावकरी उतरले.. मग काय त्यांचीच मदत झाली.. नाहितर एवढ्या रात्री अंधारात देउळ शोधणे थोडे जिकरीचे होते.. खोपिवलीला उतरल्यावर सरळ वाट गावात जाते.. दहा पंधरा मिनीटाच्या अंतराने वाटेच्या डावीकडे हनुमानाचे मंदीर आहे..

आम्ही देवळापाशी पोहोचलो तर आधीच दोन जोडपी वस्तीला आले होते..अगदी फुरसतमध्ये त्यांचा ट्रेकचा कार्यक्रम होता.. हरिश्चंद्रगडावर तीन दिवस काढून आले होते.. आता अहुपे करणार नि मग लगेच गोरखगडाला हात घालणार होते.. जल्ला इथे आम्हाला एकदिवस ट्रेक करताना नाकेनउ.. असो.. देउळ बर्‍यापैंकी ऐसपैस.. हनुमानाच्या मुर्तीभवती जवळपास पंधराजण झोपू शकतील इतकी जागा आहे.. आम्ही झटपट जागा करून झोपून दिले.. डास, मुंग्या, उंदीर इत्यादी निद्रानाशक मंडळी बहुदा कुठेतरी दौर्‍यावर गेले असल्याने डोळा कधी लागला कळलाच नाही.. जाग आली ती अगदी अंगावर पाण्याचे थेंब पडू लागले तेव्हा.. बाहेर पाउस सुरु झाल्याने छप्परगळती सुरु झाली होती.. एक कुत्रा मात्र देवळात आमच्या पादत्राणांची राखण करत बसला होता.. एव्हाना पहाटेचे पाच वाजत आले होते.. थोडयाचवेळात इंद्रा, रोमा व मी बाहेरच्या परिसराचा अंदाज घेण्यास बाहेर पडलो.. ट्रेकच्या भाषेत सरळ सांगायचे तर डबा टाकण्याची सोय कुठे आहे हे बघायला बाहेर पडलो.. नि कळले गावाच्या मागेच काही अंतरावर नदी आहे.. काम संपले.. पण अगदी पहाटे पहाटे नदीकाठी बुळबुळीत दगडावरून पाय घसरुन पाण्यात पडणे कोणाला आवडेल.. जल्ला असल्या पडझडीचा तर मीच शुभमुहुर्त करुन दिला.. Proud

रात्रीच्या मुक्कामाचा प्रश्न सोडवला होता... आता अडचण चहाची सोय.. खरेतर फक्त चुलीची गरज होती.. कारण चहाचे सगळे सामान आमच्याबरोबर होतेच.. तिथेच मग बाजूच्या घरात मग इंद्राने ते सगळे सामान त्याच्या रामभरोसे पण पर्फेक्ट मापानुसार टोपात काढून दिले.. नि चहाचा प्रश्न मिटला.. त्यांच्याकडेच चौकशी करुन मग आम्ही गावच्या मागून जाणार्‍या वाटेने अहुपे घाटाकडे कूच केले.. पण आता आम्ही सहाजण होतो.. सहावा पार्टनर म्हणजे बिनबुलाये मेहमान अर्थात तो कुत्रा होता..

प्रचि १ : देवळातील मारुतीराय

पावसाची रिपरिप पहाटेपासून सुरुच होती... आजुबाजूचे डोंगर अजुनही ढगांना कुशीत घेउन निजले होते.. त्यामुळे काही अंदाज बांधता येत नव्हता.. त्यातच वाटेची सुरवातच मुळी भातशेतीच्या मळ्यातून होत असल्याने वाटेला अस्तित्व नव्हतेच.. या एकूण परिस्थितीमुळे काहीसा गोंधळ उडाला नि तोच एक मामा भेटले.. ! म्हणाले चला माझ्याबरोबर..

भातशेतींमधून बाहेर आलो नि जंगलातील वाट सुरु झाली.. इथेच मग मामांना डच्चू द्यावा की सोबतीला घ्यावे याबाबत संभ्रम झाला.. कारण जिथे जायचेय तिथे वरती पाहिले तर नुसती ढगांची दाटी.. त्यात रिपरिप पडणारा पाउस कधी जोर धरेल भरवसा नव्हता... शेवटी मामांनीच पाचशे रुपयांत पोहोचवतो असे म्हटल्यावर नाईलाजाने डच्चू द्यायचे ठरले.. पण आम्हाला कुठलीही जोखीम स्विकारायची नव्हती सो त्यांची दिडशे रुपयांमध्ये बोलती बंद केली.. आम्हाला दिडशे रुपये पण जास्तच देतोय असे वाटत होते.. जास्त विचार नको म्हणत पुढे निघालो..

प्रचि २ : अगदी सिद्धगडाला जाताना लागते तशी मिळतीजुळती पाण्याची पाउलवाट

आमची सुरवातच हिरव्या भातशेतींमधून झाली होती सो 'हिरवे हिरवे चोहीकडे' स्वाभाविकच.. या वाटेलाच काही अंतरावर दोन फाटे फुटतात.. उजवीकडची वाट (जिथे भगवा फडकवलेला दिसतो) गोरखगडाकडे तर डावीकडची वाट अहुपे घाटाकडे जाते.. हे सांगणारा फलक साहाजिकच दुरावस्थेत व पटकन दिसणार नाही अश्या जागी आहे.. आम्ही डावीकडे वळलो.. रात्रीचा मोठा पाउस पडून गेल्याने एकदम मस्त प्रसन्न वातावरण होते.. क्षणातच उजव्या बाजूस मच्छिंद्रगडाचा सुळका ढगांमुळे अंधुक अवस्थेत नजरेस पडला.. त्याच्यामागे असलेला गोरखगड मात्र गायब होता..

जंगलातून जाणार्‍या या वाटेला मध्येच एक काठी अडकवून ठेवली आहे.. कुणालाही वाटेल पुढील वाट बंद वा धोक्याची आहे.. खरेतर ती वनखात्याचे अभयारण्य सुरु झाल्याची खूण आहे.. हे सांगणारा फलकदेखील वाटेच्या डावीकडे उलटदिशेला तोंड करुन निपचित पडलेला दिसतो.. इथे रानमांजर, मोर, भेकरे, वानर, माकडं, बिवटे इत्यादी प्राणी असल्याची माहिती आहे.. ज्यातून आम्हाला वानरच भेटतील हे ठाउक होते.. कारण दुरवरून त्यांचे हुपहूप ऐकू येत होते.. याच वाटेने एक छोटा ओहोळ पार करावा लागतो.. इथूनच समोर अहुपे घाटाचे एकदाचे दर्शन झाले...

प्रचि ३: पसरलेला 'अहुपे घाट'

- - - -
<

अहुपे घाट गाठायचा तर समोर दिसणार्‍या डोंगररांगेतील इंग्लिश 'W' सदृश भागातून चढाई करायची होती.. ढगांमध्ये गुरफटलेला हा घाट बघता बघता पायाखालच्या वाटेचे भान राहीले नाही.. दिसायला सपाट नि सोप्पी वाटत असली तरी ओहोळच्या पाण्याने बुळबुळीत असलेली ती वाट.. साहाजिकच ती ओलांडताना गिरिविहार त्याच्या बुडावर आपटला.. नि हा उभा राहेस्तोवर मागून येणार इंद्रा समोरील घाटरांगेचा फोटो काढण्याच्या नादात हातावर पडला.. अश्याप्रकारे माझ्यापासूनच सुरवात झालेल्या या पडझडीचे जल्ला पडघम वाजले !! Lol

इथून मात्र खळखळाट म्युझिक कानावर पडू लागले.. दोन तिन मिनीटांतच एकदम मोठा खळखळाट कानवर पडू लागला.. नि आवाजाचा माग घेइस्तोवर वेगाने जाणार्‍या पाण्याचा लोट आडवा आला... दोन्ही बाजूस गर्द हिरव्या झाडीची झालर नि मधून छोटछोटया खडकांच्या डोईवरून फेसाळत उडया मारत निखळपणे वाहणारे शुभ्र पाणी.. पाण्याला जरी वेग असला तरी पातळी गुडघ्यापर्यंतच होती सो सहजपणे पार केला.. अगदी त्या सहाव्या पार्टनरनेदेखील कुणाची मदत न घेता पोहत पलिकडे पोहोचला.. !

प्रचि ४ :

प्रचि ५: तीन मायबोली टोपी..

इथून पुढे पुन्हा जंगल सुरु होते.. पण वाट अगदी ठळक आहे.. उजव्या बाजूला गोरख-मच्छिंद्रगडाचे सुळके मात्र डोकावताना दिसतात.. तरीसुद्धा गोरखगडाने हवे तसे दर्शन दिले नव्हते.. अजुनही ढगांमध्ये तो निद्रीस्तच होता..

प्रचि ६ : डावीकडचा गोरखगड नि उजवीकडचा मच्छिंद्रगड

वरती घाटाच्या डोंगररांगेकडे पाहिले तर ढगांनी नुसता हैदोस मांडलेला दिसत होता.. पावसाची संततधार सुरुच होती.. .. आता आमच्या वाटेतही ढगांचे धुके स्वागतासाठी येउ लागले..

प्रचि ७ :

अधुनमधून वानरांचा घोळका नजरेस पडत होता.. नि त्यांना घाबरवण्याचे काम आमचा सहावा सोबती 'कुत्रा' करत होता.. इथेच मग आमच्यासोबत असणार्‍या मामांनी अचानक परतण्याची भूमिका घेतली.. 'पुढची वाट सोप्पी आहे.. सरळ आहे.. माझी गुरे खालीच आहेत सो जायला हवे.. इति इति सबबी देउ लागले.. पण आमच्याबरोबर येउन त्यांना जेमतेम अर्धातासच झाला होता.. तेव्हा अजुन थोडी सोबत देण्याचा आग्रह केला.. आधीच सांगितले असते तर घेतले नसते.. शेवटी पुन्हा पंधरा मिनीटांच्या अंतराने ते पुढे येण्यास किरकिर करु लागले.. 'आता जवळपास आलेय.. मला १५ मिनीटे तर तुम्हाला २५-३० मिनिटे लागतील.. तेव्हा मी माघारी फिरतो' म्हणू लागले.. आम्ही जंगलात असल्यामुळे शिवाय ढगांची दाटी असल्याकारणाने वरती अजुन किती चढाई शिल्लक आहे याचा अंदाज लागत नव्हता.. नि मामाने चांगलीच टांग दिली असे मनात पुटपुटत त्यांना पैसे देउन मुक्त केले..

मामा माघारी फिरले नि पावसाने जोर धरला.. धुवाधार पावसात आमची संथगतीने चढाई सुरु झाली.. आम्ही घळीच्या (W सदृश) मार्गाला लागलो होतो.. पाउस सुरु झाला नि वाट फुटेल तिथून पाण्याचा खळखळाट सुरु झाला.. ह्याचा त्याचा फोटो काढावा असे खूप वाटत होते पण पाउसच इतका की कॅमेरा बाहेर काढूच शकलो नाही.. इथेच पुढे वाटेत अहुपे ग्रामस्थांनी बांधून काढलेली अगदी छोटी पाण्याची टाकी लागते.. ही वरतून अर्धी सिमेंट घालून झाकलेली आहे.. इथेच खडकांच्या घळीतून निघणारा पाण्याचा झरा आहे..

पावसाने जोर केला खरा.. पण खरी मजा जेव्हा वाटेत छोटा धबधबा लागला तेव्हा आली.. पाणी अतिशय वेगाने वरतून खाली वाटेवर ओघळत येत होते.. नि वाटेच्या उजव्या बाजूस असणार्‍या झाडींच्या दरीत कोसळत होते.. पुढची वाट काही दिसत नव्हती.. इथे तिथे पाहिल्यावर ह्या पाण्याच्या प्रवाहातूनच वरती जाणारी वाट दिसली !! वाह ! आणि काय पाहिजे.. ! इथेच मग छोटा "Chill Out" ब्रेक घेतला नि धमालमस्ती सुरु झाली.. आता मात्र कॅमेरा गुंडाळून ठेवण्यात अर्थ नव्हता.. तशी इंद्राने सोबतीला छत्री आणली होती.. तिचा काही फारसा उपयोग नसला तरी तेही नसे थोडके म्हणत तिच्याच छत्राखाली उभे राहून फोटो काढले..

प्रचि ८ : इथे रोमा, जो आणि गिरी ने यथेच्छ भिजून घेतले..

प्रचि ९ : जस्ट चिल चिल जस्ट चिल..

इथूनच पुढे चढाई सुरु केली नि अशी चिंब चिंब थंडगार पाण्याची वाट कोणाला नाही आवडणार.. एकदम मस्त मस्त..
प्रचि १० :

याच पाणवाटेने थोडेसे चढून होत नाहीतर कोपर्‍यात वरतुन पडणारे धबधब्याचे पाणी..
प्रचि ११:

चोहीकडे पाणीच पाणी दिसत होते.. कोसळणार्‍या पावसाने उच्छाद मांडून ठेवला नि कानात नुसता खळखळाट दुमदुमू लागला .. एवढे सगळे अनुभवताना मात्र कॅमेरा जपताना मात्र भंबेरी उडत होती.. वरती येउन खाली पाहीले तर जिथून पाण्याच्या वाटेने चढाई केली अगदी त्याच्या बाजूच्या कातळभिंतीमध्ये दोन रेखीव टाक्या खोदलेल्या दिसल्या.. एकदम सही..

प्रचि १२:

भरपावसात आता आमची चाल मंदावली होती.. पण मामांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनीटे कुठच्या कुठे राहून गेली होती.. त्यांची पंधरा मिनीटे म्हणजे आमची पंचेचाळीस मिनीटे.. पण इथे एक तास होउन गेला तरी अजुन काही घाटाचा माथा दृष्टीपथात पडत नव्हता.. मामाने आम्हाला चांगलेच 'मामा' बनवले होते.. असो, आम्ही अधुनमधून पावसातच पेटपूजा करत चढाई सुरु ठेवली.. पेटपूजा करताना सहा वाटे केले जात होते.. सहावा वाटा कुत्र्यासाठी जो कुणालाही न विचारता ओळखीशिवाय आमच्याबरोबर आला होता.. आम्हीसुद्धा हा काय आता अहुपे घाटापर्यंत साथ सोडणार नाही हे पक्के जाणून होतो.. Happy

अहुपे घाटाचा ट्रेक हा तसा आपला दम काढत नाही कारण अगदी अंगावर येणारे चढ नाहीयेत.. झिकझॅग वाट आहे.. त्यामुळे थकण्याचा प्रश्नच येत नाही.. शिवाय सोबतीला हे मंदधुंद वातावरण..

काहीही म्हणा, जंगलातला पाउस अनुभवणे हीच खरी मनाला गारवा देणारी गोष्ट असते.. गवतांच्या पात्यावर, झाडांच्या पानांवर थेंबांचा थयथयाट सुरु होतो नि तो आवाज निरव शांततेत ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला होते.. पावसाची सर थयथयाट करुन गेली की मग छोट्या-मोठे धबधबे त्यांच्या कुवतीनुसार खळखळाट संगीत सुरु करतात.. सोबतीला ओल्याचिंब झाडांवरून ओघळणार्‍या थेंबांचा टपटप आवाज बराच वेळ चालूच राहतो... तर एकीकडे ढग आणि थंडगार वारा यांचा पकडापकडीचा खेळ सुरु होतो.. वाटेत छोटयामोठया खेकडयांची लगबग सुरु असते... सारे काही पुन्हा शांत होत आहे असे वाटत असतानाच अचानक कुण्या पक्ष्याची शीळ कानावर पडते नि कुणीतर प्रेमळ साद घातलोय याचा भास होतो.. तर छातीला दडपून टाकेल असा वानरांचा 'हुप..हुप' आवाज तर दर्‍यांमधून घुमतच असतो... आजुबाजूच्या गर्द हिरव्यारानात फुललेली सुंदर अशी 'रानहळद' लक्ष वेधून घेण्याचे काम करते.. पावसाळी ट्रेकमध्ये असा काही अनुभव मिळाला की ट्रेक सार्थक झाल्याचे समाधान मिळते.. पुन्हा पुन्हा अनुभवले तरी ओढ मात्र वाढतच राहते.. Happy

प्रचि १३:

तासभरातच आम्हाला उघडीप मिळाली.. पावसाचे अधुनमधून विश्रांती घेणे नि मग पुन्हा डान्स सुरु असे चालूच होते.. मागे वळून पाहिले तर ढगांचे कवच अगदी भरभक्कम भासत होते सो काही दिसण्याचा प्रश्णच नव्हता.. लवकरच आम्ही अहुपे घाटाचा माथा गाठला.. पठारावरती आलो. नि 'आहाहा' 'सुपर्ब' 'सह्ही' 'सॉल्लिड' 'भारी' अशा कितीतरी आनंदाच्या डरकाळ्या देत सगळे सैरभैर झाले.. इकडे बघू की तिकडे बघू असे होउ लागले.. पठारावरती मनमुराद लोळता यावे यासाठी हिरवा गालिचा अंथरला होता हे सांगणे नकोच..

प्रचि १४:

आतापर्यंत एकत्र असलेलो आम्ही आता भान हरपून निसर्गाविष्कार बघण्यात काही काळ दंग झालो.. सगळ्यांचे कॅमेरे कामाला लागले... अपवाद फक्त गिरीचा.. जल्ला ह्याने कॅमेरा तर आणला होता पण बॅटरी घरीच रिचार्ज करत ठेवली.. Lol

अंदाजे ३८०० फूट उंची असणारा हा अहुपे घाट उत्तर-दक्षिण दिशेत पसरला आहे.. ह्या घाटाचे वैशिष्ट्य असे की एक बाजू सरळ कोकणात खाली उतरते तर बाकीच्या बाजू डोंगररांगांना जाउन मिळतात.. खालून पाहिले तर इथे पोहोचणे अशक्य भासते.. पण खोपिवली, जि. मुरबाड या कोकणच्या गावातून रस्ता सुरु होतो तो या अहुपे घाटरस्त्याने घाटावर जाउन मिळतो.. तिथूनच मग जुन्नर(१८किमी) , खेड(२०किमी), पुणे(५६ किमी) गाडीरस्त्याने गाठता येते..

आम्ही पहिला मोर्चा जिथून कोकणकडा दिसतो तिथे वळवला.. पठाराला अगदी मध्ये खाचा मारल्यागत दरी आहे... कातळभिंत अगदी सरळ तासल्यागत भासते.. याच दरीत ढगांची जत्रा भरली होती.. नुसता धुमाकूळ सुरु होता..

प्रचि १५: अहुपे घाटाच्या या कडयाला तर ढगांची लाभलेली बॉर्डर मस्त उठून दिसत होती.. त्या डोंगरा पलिकडे असणार्‍या दरीत ढग घुसळले जात होते नि त्याचा फवारा ह्या डोंगराला सफेद बॉर्डरचे स्वरुप देत होता..

प्रचि १६ :

क्षणाक्षणाला वातावरण बदलत होते.. नि मिळणार्‍या संधीचा फायदा घेत आम्ही त्यांचे बदल टिपत बसलो.. कधी एकदम स्वच्छ तर कधी एकदम धुसर.. पावसाने बर्‍यापैंकी मोठा ब्रेक घेतला होता सो धांदलीतच फोटो टिपत होतो.. पण शेवटी त्याने पाण्याचे तुषार उधळायला सुरवात केलीच.. आता मात्र आम्ही पावसाला न जुमानता रिस्क घेउन कॅमेरे वापरत होतो.. जणू काही अहुपे घाटाच्या मोहात फसले गेलो... त्यातलेच काही प्रचि

प्रचि १७ : कोकणकडा सदृश अश्या कडयावरुन कोसळणारे शुभ्रपाणी..

प्रचि १८ : वरच्या धबधब्याचे तुकडे

एका टोकाला पहायला गेलो तर अगदी खास आमच्यासाठी ढगांचा पडदा दूर झाला नि गोरखगड-मच्छिंद्रगड सुळक्यांची जोडी दिसून आली.. मागे आम्ही मायबोलीकर गोरखगडाच्या माथ्यावर जाउन आलो होतो.. आज त्याच्याहून उंच अशा जागेवरुन त्याला न्याहाळत होतो.. किती मस्त ना..

प्रचि १९:

प्रचि २०: काहि मिनिटांतच त्या सुळक्यांना ढगांचे ग्रहण लागले..

आम्ही पुन्हा कोकणकडयाच्या दिशेने वळालो तर इथे अचानक वातावरण स्वच्छ झाले नि हिरव्या रंगाची खुरट असलेला हा तासीव कडा अधिक आकर्षक वाटू लागला..

प्रचि२१ :

अश्या चैतन्यपुर्ण वातावरणात आम्ही नेहमीचा मजेशीर उडयांचा कार्यक्रम पार पाडला..

प्रचि २२:

बाकी गँग ऑफ उडीपुरकर्स इथे बघता येइलच..
http://www.maayboli.com/node/37279?page=1

आम्ही ज्या वाटेने चढाई केली होती तिच्या डाव्या बाजूस असलेल्या पठारावरती होतो.. तहानभूक हरपून आम्ही अश्या धुंद वातावरणाचा यथेच्छ आस्वाद घेत होतो.. अहुपेवाडी तशी अजून बरीच दुर होती.. त्यासाठी आम्हाला पुर्ण कडयाला वळसा घालून जायचे होते.. पण इथल्या जागेवरुन निघावेसे वाटत नव्हते... याच जागेच्या दुसर्‍या बाजूस (म्हणजेच ज्या वाटेने वरती येतो तिथून सरळ पुढे निघाल्यास) एक महाकाय धबधबा नजरेस पडला.. मग काय पुन्हा इथे फोटोशुट सुरु झाले.. ढगांच्या लोटात हा पांढराशुभ्र धबधबा आवेशाने दरीमध्ये झेपावत होता .. साहाजिकच दरीमध्ये फक्त ह्याचाच आवाज..

प्रचि २३ : अहुपे घाटावरचा सर्वात मोठा धबधबा

प्रचि २४: उतरलेले ढग नि कोसळणारा धबधबा..

वैशिष्टय असे की जिथून धबधबा कोसळतो तिथूनच आम्हाला अहुपेवाडीसाठी जायचे होते... वरील फोटोत धबधब्याच्या वरच्या बाजूस काही घरे नि पलिकडे डोंगररांगा दिसत असतीलच.. म्हणजे एवढे चढून आल्यावर पुन्हा या पठारावरती असे डोंगर बघून थोडे चकीतच व्हायला होते.. मग लक्षात येते की हा तर अहुपे घाट.. कोकणातून चढून येण्याचा शॉर्टकट !

प्रचि २५: धबधब्याचे विविध अंग

प्रचि २६: आम्ही लै सॉल्लिड आहोत !!

प्रचि २७: ओळख ना पाळख ना संवाद.. तरीपण आमच्यात सामिल झालेला हा सहावा पार्टनर !

प्रचि २८:

अगदी मनासारखा ट्रेक झाल्याने आमचे एव्हाना पोट भरले होते.. आता मात्र काहितरी गरमागरम पोटात ढकलण्याची वेळ होती.. तेव्हा आम्ही मोर्चा गावाकडे वळवला.. यासाठी मघाशच्याच वाटेने सरळ पुढे जावे लागते.. पावसाने आता विश्रांती जरी घेतली होती तरी ढगांचा घोळका मात्र इथुन तिथे अवतीभवती फिरतच होता... पाच मिनीटाच्या अंतरावरच वाटेत त्या महाकाय धबधब्याचा मूळ प्रवाह लागला.. इथे बंधारा घालून छोटे तळे तयार झाल्याचे दिसते.. जिथे शेतांमधून ठिकठिकाणचे साचलेले पाणी येउन मिळते.. या तळ्याचे दृश्य देखील मनमोहकच..

प्रचि २९:

पुन्हा मग या तळ्याकाठी थांबावेच लागले.. Happy

प्रचि ३०: बंधार्‍यातून पुढे जाताना फसफसणारे पाणी..

प्रचि ३१ : हाच प्रवाह मग या झाडांच्या पल्ल्याड दरीमध्ये सूर मारतो... !

आम्ही इथे टिपी करेपर्यंत आमच्यातला इंद्रा पुढे कुठल्या घरात चुल मिळते का बघायला गेला.. आता आम्ही पठारावर असल्याने चढण वा जंगल नव्हतेच.. सभोवताली डोळ्यांना प्रसन्न करणारी हिरवीगार भातशेती पसरलेली होती.. तर काही ठिकाणी गुराखी आपल्या गुरांना चरण्यासाठी घेउन आले होते.. हा सगळा नजारा बघताना थेट आपल्या कोकणात आल्याचा भास झाला..

प्रचि ३२:

प्रचि ३३: हितगुज

प्रचि ३४ :

डोळ्यांची पारणे फेडणारी ही दृश्ये बघत असतानाच दुरुन इंद्राने हाक दिली.. अहुपेच्या मुख्य वाडीपासून वेगळी दोन-तीन घरे होती.. त्यापैंकीच एका घरात इंद्राने प्रवेश मिळवला होता.. म्हटले चला गरमागरम मॅगी ढकलूया म्हणत पटापट त्या दिशेने गेलो..

प्रचि ३५ :

त्या घराच्याच अंगणात ठाण मांडले.. घराच्या अंगणात तुळस वृंदावन व्यतिरिक्त नेहमी बागडणारी प्राणीमंडळीसुद्धा होती..कोंबडी व तिची पिल्लावळ, मनिमाउ, कोंबडा इत्यादी.. आमच्याबरोबर असलेला कुत्रादेखील इथे हजर झाला.. अगदी गावच्या घरी गेल्याचा फिल येत होता.. घराच बच्चेकंपनी असल्याने घराला जाग होती..

प्रचि ३६:

प्रचि ३७ : अंगणातून दिसणारी अहुपे गावाची वाडी..

(झाडांच्या मागे जे ढग दिसताहेत ते मधल्या दरीतून वर येणारे आहेत !)

प्रचि ३८: आपला तर ह्यो एकदम फेवरिट

इंद्रा घरात चुलीवर मॅगी बनवतच होता.. शिवाय त्या घरातल्या ताईंना 'काही गरमागरम मिळेल का' विचारले असता कळले भाकरी व मुग बटाट्याचे कालवण मिळेल.. त्यांनी 'चालेल का' विचारताच 'काहीही घेउन या, आम्ही आनंदाने खाउ' म्हणत ट्रेकरलोकांची वृत्ती दाखवली.. एव्हाना इंद्रा मॅगी घेउन आला.. ती खायला घेतली नि त्या ताई एका भांडयातून मुग-बटाटयाचे कालवण (आमटीचा प्रकार) घेउन आल्या.. मग काय मॅगी बाजूला ठेवली नि त्या दिलेल्या भांडयातूनच आम्ही एकत्रितपणे खाउ लागलो.. कालवणासोबत त्यांनी अजुन एक स्वादीष्ट भाजी (कच्च्या मिरच्या व कांदा) व चार भाकर्‍या दिल्या होत्या.. भाजी चवीला एकदम जबरी.. कालवण तर सुपरलाईक !!! 'कसे झालेय' असे त्या ताईंनी आपुलकीने विचारले तेव्हा आमचे दिलेले एकत्रित उत्तर.. " याचसाठी तर आम्ही तंगडतोड करतो.. चुलीवर बनवलेले तुमाच्या हातचे असे चवदार अन्न खायला मिळते.. अशी चव मुंबईत कुठे मिळणार" Happy भाकर्‍या दोन मिनीटांत संपल्या.. कालवण शिल्लक होते.. चव जिभेवर रुळत होती.. सो आम्ही लगेच युक्ती लढवून झटपट 'कालवण- मॅगी' (उर्वरीत मॅगीत कालवण ओतले) तयार केली नि पुन्हा हात मारणे सुरु... Proud अश्या झटपट रेसिपी ट्रेकमध्येच सुचतात... Wink

प्रचि ३९: कालवण मॅगी

खरेतर ट्रेकच्या मध्यात आमचे ठरले होते की जमलेच तर इथून सिद्धगड वा दोनीचे दार वा तिरंगी घाट असा ट्रेक करायचा.. त्यासाठी अहुपे गावात दिडच्या सुमारास येणारी एसटी पकडणे गरजेचे होते.. पण खाणे वगैरे आटपण्यात वेळ गेला.. काय करणार आधी पोटोबा आणि पोटोबाच.. शिवाय या ट्रेकने आतापर्यंत भरपूर काही दिले होते सो इच्छा पुर्ण झाली होती.. आता इथून दुसरा ट्रेक करायचा तर गाईड शोधावा लागला असता.. कारण आज पाउसच इतका भारी झाला होता.. तोही कुठे मिळेना.. मग उगीच जोखीम न पत्करता आतापर्यंतच्या या सुखद ट्रेकचा शेवट चांगल्याप्रकारेच होउदे म्हणत तो विचार बाजूला ठेवला.. जेवण आटपून पैसे देउन आम्ही त्या घराचा निरोप घेतला..

प्रचि ४०: वचन दिल्याप्रमाणे बच्चाकंपनीचा ( एक वगळला तर बाकी सगळ्यांची नावे म्हणजे बॉलिवूडचे हिरो-हिरवणी..) एक ग्रुप फोटो घेतला..

प्रचि ४१ : म्याssव

इथूनच मग अहुपे गावात जाउन आलो.. पण एसटीने कधीच गुडबाय केला होता.. नि ती बहुदा शेवटचीच एसटी होती.. शेवटी आल्या वाटेने पटापट जाउ, पाण्यात डुबकी मारू नि साडेपाचच्या एसटीने मुरबाड जाउ म्हणत माघारी फिरलो..

प्रचि ४२ : अहुपे गावातून दिसणारी दरी..

येथील स्थानिक लोकांची आम्ही आलेल्या घाटरस्त्यानेच रोजची ये-जा सुरु असते..!! आम्हीसुद्धा आता आलेल्या वाटेनेच परतणार होतो.. परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा त्या जादुमय पठारावर पटकन जाउन आलो.. खाली पाहील तर ढगांचा जथ्था पुन्हा जमू लागला होता.. गोरख-मच्छिंद्रगडांचे सुळके कुठच्या कुठे हरवले होते..

प्रचि ४३ :

खरे तर वाटले होते उतरताना पटापट जाउ.. पण पावसाच्या पाण्याने वाटेतील दगड-खडक मस्तपैंकी गुळगुळीत झाले होते.. आम्हाला पाडायच्या इराद्याने जणू तयारीत असल्याचे वाटत होते.. सो आमचा स्पिड तिथेच मंदावला.. त्यातच आमचा सहावा पार्टनर मध्येच झटके आल्यागत वेगाने आमच्या ढेंग्याबाजुने वा अधुनमधून जात होता.. जल्ला आमची फजिती करु पाहत होता..

प्रचि ४४ :

पावसाने पुन्हा रिपरिप सुरु केली सो आता फोटोशुट बंद म्हणत कॅमेरा आत ढकलले.. पण उतरताना एका ठिकाणी क्षणभर विश्रांतीसाठी थांबलो होतो तोच ढगांच्या दाटीतून गोरखगड- मच्छिंद्रगड प्रकट झाले.. हे दृश्य खूपच लोभनीय होते.. जणू ढगांचा अभिषेक सुरु होता.. मग काय पुन्हा क्लिकक्लिकाट.. नशिब लागते अशी दृश्ये पहायला..

प्रचि ४५:

अधुनमधून ढगांचा निचरा होत होता नि हे दोन सुळके आमचे सारखे लक्ष वेधुन घेत होते..
प्रचि ४६ :

प्रचि ४७ : गोरखगडाची गुहा.. त्या गुहेतून जसे काही धूर निघाल्याचे भासत होते

पुर्णतः समाधानी होउन आम्ही जवळपास खाली उतरलो.. तिथेच मग अहुपे घाटाच्या पार्श्वभूमीवर एक ग्रुप फोटो झाला..

प्रचि ४८ :

आता कधी एकदाचा तो ओढा लागतोय नि मनसोक्त डुंबतोय असे झाले... इथवर येइपर्यंत आमच्यातल्या दोघा-तिघांची घसरुन पडझड झालीच होती.. अखेरीस ओढा आला नि पुन्हा थंडगार वाहत्या पाण्यात ' जस्ट चिल चिल जस्ट चिल' केले

प्रचि ४९ :

(फोटो by इंद्रा )

ट्रेकच्या शेवटी पाण्यात डुबकी मारुन बाहेर आले की एकदम तरतरी येते.. ट्रेक संपुर्णम वाटतो.. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजत आले होते.. आता खोपिवली गाव फारसे दुर नव्हते सो झपाझप वाट तुडवत आम्ही खोपीवली स्टॉपवर येउन थांबलो.. तिथेच मग एकाठिकाणी चहाची सोय केली.. त्यांच्याकडे दूध नव्हते पण आमच्याकडे दुधाची भुकटी होती.. चहा बनेस्तोवर खादाडी सुरु केली..

प्रचि ५० : थांबेन पण एसटीची वाट बघेन !

तो सहावा पार्टनर काय आमची साथ सोडायला तयार नव्हता.. आता हा एसटीत तर नाही ना घुसणार अशी धास्ती वाटत होती.. Proud

जशी संध्याकाळ होते तसे ढग पुन्हा डोंगराच्या कुशीत जाउ लागले.. मला हे न उलगडलेले कोडेच आहे.. दिवसभरात आकाशात मुक्त विहार करणारे ढग संध्याकाळ झाली की आपसुकच डोंगराच्या कुशीत जाउन बसतात.. मग त्यांच्या मुक्काम तिथेच.. अगदी सकाळचे उजडेपर्यंत...

प्रचि ५१:

प्रचि ५२:

प्रचि ५३ : पावसातल्या संध्याकाळी धुंद होणारे हे खोपिवली गाव

लवकरच एसटी आली आणि मुरबाडच्या दिशेने निघालो.. खिडकीची जागा मिळाली.. डोळे मिटले.. तर पुन्हा त्याच अहुपे घाटावरती.. ढगांची डोंगराशी होणारी झटापटी बघत त्या कडयावर उभा..


(फोटो by रो.मा)

समाप्त नि धन्यवाद Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्ट!!!
सह्यांकनच्या वेळी अहुपे पठारावरून खोपिवली गाव आणि आजुबाजूचा नजारा पाहिला होता.
आता हा घाट करायचा आहे एकदा... Happy

अवांतर: 'जो' ट्रेक ला आला हे मोठंच फळ! Proud

सह्हीच. एकदम सुरेख. या रविवारी पावसाने एकदम आनंद दिला होता. मी ही विही, खोडाळा भागातून भटकत होते. Happy

यो, झकास लेख....
आहुपे घाट रॉक्स...भन्नाट ट्रेक,
नागमोडी घाटवाट, जोरदार पाउस, थंड्गार वारा, कोसळते धबधबे, तासलेले कडे, भांड्णारा कुत्रा, कड्यावरच्या उड्या, पाण्यातल्या उड्या, बाजरीची भाकरी, मिरचीची भाजी, पुरण पोळी, मालपोहे, "कालवण मॅगी', सगळ काही मस्त....

व्वा .. मस्त रे यो ... जबरी लिव्हलय ..पुन्हा ट्रेक अनुभवला...
फोटु तर भा री च Happy

नागमोडी घाटवाट, जोरदार पाउस, थंड्गार वारा, कोसळते धबधबे, तासलेले कडे, भांड्णारा कुत्रा, कड्यावरच्या उड्या, पाण्यातल्या उड्या, बाजरीची भाकरी, मिरचीची भाजी, पुरण पोळी, मालपोहे, "कालवण मॅगी', सगळ काही मस्त.... >> +१

मस्तच भटकंती, रॉक्स.
प्र.चि. ३७ तर एकदम जबरदस्त, गावातील बसकी घर, मधोमध देऊळ, पाठीमागे उलघडत जाणार्‍या डोंगररांगा, अगदि 'पेंटिग' असल्याचा भास होतोय.

भिमाशंकर व्हाया आहुपेघाट असा ट्रेक गेल्यावर्षी जाने.-फेब्रु. मध्ये केला होता, त्यादिवसात भिमाशंकर पर्यंत अंत पाहीला होता या वाटेने.

बाकी, तुमचा सहावा पार्टनर एकदम 'डॅशींग' भेटला तुम्हाला 'एक कान वर, एक खाली'. आम्हाला पण भेटलेला पण इतका नव्हता. Happy

__/\__

आहाहा!
किती लकी आहात तुम्ही Happy
आणि आम्हीही (तुम्ही जाता म्हणुन आम्हाला घरबसल्या ते सौंदर्य तसच अनुभवायला मिळत Happy )

खरंच स्वर्गीय अनुभव!!!
वर्णन आणि फोटोज नेहमीप्रमाणेच सुपर्ब!!!

आमच्या गोरखगड ट्रेकच्या वेळी दिसलेले उन्हाळ्यातील अहुपे घाटाचे रांगडे सौंदर्य. Happy गोरखगड ट्रेकच्या वेळेस आम्ही खोपिवली मार्गेच गेलो होतो.

फोटो, वर्णन, अनुभव एकदम खलास!!! हेवा वाटला. सहाव्या सवंगड्याला खायला दिले की नाही? Happy ..

रॉक्स, एक प्रश्न. अशा ओल्या ट्रेकमधे बुट वगैरे ओले होतात, चिखलात बरबटतात, मोज्यांची तीच गत होते, मग चालणे जड होते, नकोसे होउ शकते.. ते सर्व कसे सांभाळता?

झक्कास. झक्कास. Happy लई भारी.
काय आठवण आली फोटु पाहुन.

अय्यो सुनिधी- द पॉईंट इज मुट. कपडे, बुट, मोजे, वस्तु वगैरे सांभाळायचे नाहीच. शक्यही नाही. नंतर घरी येऊन धुवुन टाकायचे. हाय काय आणि नाय काय. Happy अगदी प्लॅस्टिकमध्ये ठेवले तरी पैसे सुद्धा कोरडे रहायची मारामार. हे लोकं महागडे कॅमेरे घेऊन जायचे धाडस करतात याचेच अप्रुप वाटते.
चालणे जड वगैरे होत नाही. समोरचा निसर्गच ती प्रेरणा देतो.

भिजलेल्या मोज्यांचा वास (इतरांना) अरारारारा असतो खरा. True trekker could'nt care less. Proud

जबरी ट्रेक, जबरी वर्णन, जबरी ट्रेकर्स, जबरी फोटु............सो धम्माल केलीत तर....

पाऊस, धबधबे, हिरवेगार गालीचे पाहून डोळे आणि मन निवले अगदी.....

Pages