तिच्या हाताचे हाड (Reloaded)

Submitted by Kiran.. on 20 August, 2012 - 12:56

तिच्या हाताचे हाड
=============

"हे बघ गड्या, गडबड नाय पायजे. कुनी बगितलं म्हंजी आपुन कामतून गेलू समज."
"नाय गडबड नाय हुनार. म्या डोळ्यानी बगितलय. मुसलमानाची बायकूच गेली. आन ती पोटूशी व्हती."
"लई ब्येस. आता त्वांड वाईच गप ठिवायचं. कुणाला कसला शकबी नाय आला पायजे.. काय ? "

राम्याच्या या प्रश्नावर म्हाद्याने मान डोलावली.

हल्ली रोज ते एकत्र दिसत. गावाने वाळीत टाकलेले ते दोन जीव होते. सगळ्या प्रकारचे उद्योग करून झाल्यावर दोघेही कुठल्याच कामाचे नाहीत हे गावाला कळून चुकलेलं होतं. म्हाद्याकडून बाशा म्हणजे बादशहा खाटकाचे हजार रूपये दारूच्या नशेत कालव्यात पडून वाहून गेल्यानंतर त्याची दहा दिवस बेदम धुलाई झाली होती. खुद्द त्याच्या घरातल्यांनी बाशाला आणखी मारा म्हणून विनवलं होतं

राम्याची कहाणी थोडी निराळी होती. बायकोच्या गळ्यातले मंगळसूत्र जुगारात हरल्यानंतर पठ्ठ्याने घरावर कर्ज काढले होते. त्या पैशातून तो गंठन सोडवून आणणार होता. पण येताना रस्त्यात जुगाराचा अड्डा लागला आणि सगळी भरपाई करूनच घरी जावं असा नेक विचार त्याच्या मनात आला. पण हाय रे नशीबा ! सकाळी जेव्हां राम्या बाहेर आला तेव्हां कर्जाचे पैसेही घालवून बसला होता. सावकार जेव्हां जप्ती घेऊन घरी पोहोचला तेव्हां त्याच्या बापाने आणि भावाने याच्याशी आमचा कसलाच संबंध नसल्याचं सांगितलं आणि कर्ज त्याच्याकडूनच वसूल करा, हवं तर जीव घ्या असं निक्षून सांगितल्यावर सावकाराचा नाईलाज झाला. आणि मग धुलाई तर झालीच झाली नंतर पाच वर्षे वेठबिगार म्हणून राबवून घेतलं. तरीही कर्ज फिटत नसल्याने राम्यापेक्षा सावकारच वैतागला. इकडे राम्याच्या वेठबिगारीची तक्रार मास्तरांनी पोलिसात केल्याने सावकाराकडून कर्जापेक्षाही जास्त रक्कम पोलिसांनी उकळून प्रकरण दाबलं आणि राम्याचीही सुटका झाली. सावकाराचं डबल नुकसान झालं. अर्थातच राम्याबद्दल कुणाला वाईट वाटण्याचं कुणाला कारणच नव्हतं.

अशा या दोन जिवांची गट्टी न जमती तरच नवल. एकमेकांकडे रडायला ते अगदी समदु:खी असल्याने ते एकत्र दिसू लागले. घरदार सुटल्याने गावाबाहेरच्या माळावर तासनतास बसलेले असत. हल्ली हल्ली मात्र काळे कपडे घातलेल्या बाबांबरोबर दिसत असत. गाव म्हणत होते दोघे अघोर पंथाच्या नादाला लागलेत !!

गाव खरेच म्हणत होते. सगळे रस्ते बंद झाल्याने गुप्तधनाच्या आशेपोटी काळ्या जादूकडे वळालेल्या दोघांना काळ्या जादूच्या जगाची ब-यापैकी माहिती झाली होती. अर्धवट माहिती गोळा करत बरेचसे प्रयोगही करून पाहीले होते. मात्र गुरू मिळत नव्हता. अशातच काळे कपडे घातलेला बाबा गावाबाहेरच्या माळावर वसतीला असतो ही माहिती त्यांना मिळाली आणि ते बाबाचे तात्पुरते भक्त झाले. बाबाकडून कधी कधी काही माहिती मिळे. सलग असं काही शिकवणं होतच नव्हतं. पण कानावर पडेल ते ऐकून घ्यावं आणि लक्षात ठेवावं हा त्यांचा सध्याचा नेम होता. बाबासाठी कुणी न कुणी धान्य, दूध, साखर आदी जिन्नस देत असत. हे दोघे स्वतःहून स्वैपाक वगैरे करून देत. बाबाबरोबर यांच्याही पोटापाण्याची अशा प्रकारे सोय झाली होती.

बरंच काही कानावर पडायचं. कधी कधी प्रयोग चालत, ते लक्षपूर्वक पहात असत.

अशातच एकदा गर्भवती असताना मेलेल्या स्त्रीच्या हाताचे हाड जवळ असेल तर वाट्टेल ते करता येते हे कानावर पडलं मात्र.... त्यांना याच एका ध्यासाने झपाटलं. काहीही करून असे हाड मिळवायचेच या जिद्दीने दोघेही पेटले . स्मशानभूमीवर, पंचक्रोशीतल्या मयतींवर त्यांची घारीसारखी नजर होती. काही महिने घालवल्यावर हिंदूंच्या मयतीमागे मेहनत करण्यात काही अर्थ नाही हे त्यांना कळून चुकले होते. अग्निसंस्कारांमुळे काही काही शिल्लक राहत नव्हते.

म्हणून आता मुसलमानांच्या मयतीवर नजर होती आणि आज त्यांना आनंदाची बातमी मिळाली होती !
एक गर्भार बाई मयत झाली होती. बादशहा सय्यद उर्फ बाशा हा गावातला खाटीक. म्हाद्याचा माजी मालक ! बायको गर्भवती असल्याने सध्या खुशीतच होता. बेगमला कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्याला होऊन गेले होते. पण अचानक बेगमला त्रास सुरू झाला. सुईणीला बोलावणे पाठवले. बाळ पाच महिन्यांचे असल्याने आणि बेगमला होणारा त्रास लक्षात आल्याने तिने लवकरात लवकर डॉक्टरला बोलवा किंवा हिलाच तालुक्याच्या गावाला हलवा असा आग्रह धरला. प्रकरण गंभीर आहे हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते. ताबडतोब गाडी जोडून निघेपर्यंत पाऊण तास गेलाच. बैलगाडीतून धक्के बसल्याने बेगमचा जीव वरच्या वर अडकू लागला. बादशहा सारखा सहा फुटाचा गडी पण तोही हवालदिल झालेला. कदाचित बैलगाडीतच बेगम बाळंत होईल कि काय अशी शंका तिच्या सासूला येत होती. मात्र बेगमने आपला अंत ओळखला होता. ब्लडप्रेशर वाढलं होतं आणि आता शरीर साथ देणार नाही हे तिला कळून चुकलं होतं. बाळाचे तोंड बघायची तीव्र इच्छा आता पूर्ण होत नाही हे तिच्या लक्षात येऊ लागले होते. बादशाहा तिला धीर धरायला सांगत होता. त्याही परिस्थितीत तिला त्याच्याबद्दल कणव वाटली. त्याचे प्रेम पाहून तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली.

" क्या हुआ बेगम ?"

उत्तरादाखल मोत्यांची एक माळ ओघळली.

" बताओ तो बात क्या है ? "

" ए क.. बा त... क ह नी..... थी तु म्हे... वर्ना खुदा...... मुखे कभी मुआफ नही करेगा ..." एकेक अक्षर महत्प्रयासाने उच्चारत ती म्हणाली..

"तुम धीरज रख्खो..कुछ नही होगा.. मै हूं ना "

ती मान हलवीत राहिली. बेगमची सासू मां कासावीस होऊन तिला चूप करीत राहिली. बादशहा काहीच न समजल्यासारखा दोघींकडे पाहत राहिला... त्याच्या कानाशी बेगम काहीतरी खुसरफुसर करीत राहीली..

अचानक बेगमचे डोळे मोठे होत सताड उघडे राहिले आणि तिच्या सासूने ने हंबरडा फोडला. बेगम गेली होती.....!!

तिच्या दफनविधीची तयारी चालू होती. बादशहा यांत्रिकपणे सगळे विधी पाहत होता. जणू काही तो या फ्रेममध्येच नव्हता. नुकतेच त्याला जे काही कळाले होते त्याने त्याच्या पायाखालची जमीन खचली होती. कदाचित त्याला ते कळाले नसते तर त्याने उर्वरीत आयुष्य बेगमच्या आठवणीच्या सहाय्याने काढले असते. मात्र थोड्याच वेळापूर्वी झालेल्या रहस्योद्घाटनाने त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते.

तिला पाठीला टेकलेल्या अवस्थेतच पुरण्यात आले आणि सगळ्यांनी तिच्यावर माती टाकायला सुरूवात केली.

कब्र मे खुदा से हिसाब चुकाना .... मनातच तो बेगमला म्हणाला.

इकडे म्हाद्या या सगळ्यावर लक्ष ठेवून होता. मुसलमानाची बाई मेली. तिला पुरणार. सगळी पांगापांग झाली कि आपण आपले काम करायचे...

राम्याला पण ही आयडिया आवडली होती. अर्थातच ते सगळी काळजी घेत होते. इकडे पोटुशी बाई गेल्याने मुसलमानाच्या घरचे कुणी ना कुणी अधूनमधून काहीबाही निमित्ताने चक्कर टाकून जात असल्याने या दोघांचे काम जरा कठीण होत चालले होते. गावाकडे असल्या बाबतीत लोक खबरदार असतात. अर्थातच खूप थांबायची दोघांचीही तयारी नव्हती.

काही दिवस गेल्यावर मात्र त्यांचा संयम सुटला. आज रात्री काहीही करून बेत तडीस न्यायचाच....!! दोघांचाही निर्धार ठरला होता.

पावसाची रिमझिम चालली होती. चालताना साचलेल्या पाण्यातून फटाक फटाक असा स्लीपर्सचा आवाज होत असल्याने ते अनवाणी चालू लागले. रस्त्यावरचे दगड गोटे आणि पाऊस यांची त्यांना कसलीच तमा नव्हती. स्मशान जंगलाच्या बाजूला होते. जंगलाला वळसा घालून जाणेही शक्य होते, पण जंगलातून जाणारा शॉर्टकट त्यांनी निवडला होता. कुणाच्या नजरेला न पडण्यासाठी ही आडवाट सोयीची होती. जंगलात शिरल्यावर दोन तीन फर्लांग चालल्यावर उजवीकडे वळायचं आणि मग फारशी वहिवाटीची नसलेली रानवाट धरायची. थेट स्मशानाच्या मागच्या बाजूला निघता येत होतं.

लपतछपत ते स्मशानात पोहोचले....एव्हाना पाऊसही थांबला होता.

नुकतीच फुले वाहिलेली कबर शोधून काढायला त्यांना कष्ट पडले नाहीत.

झाडीमध्ये काळोखाने भेसूर रूप धारण केले होते. मिणमिणत्या चांदण्यांनी दोघांच्या कृष्णकॄत्याला झाकोळून टाकलेले होते. चिखलात होणा-या दोघांच्या पावलाच्या आवाजाने स्मशानातली कुत्री दचकून जागी झाली होती. त्यांनी दंगा करायला सुरूवात केल्यावर एकाच्या पाठीतच म्हाद्याने फावड्याचा वार केला त्याबरोबर कुत्रे कळवळून ओरडले. त्याची झालेली गत पाहून सर्व कुत्री मागे हटली. दूरवर जाऊन त्यांनी मोठ्याने गळा काढायला सुरूवात केली.

स्मशानाकडून येणा-या त्या अभद्र आवाजाने तिकडे येणा-या मुसलमानांनी कुत्र्यांना शिव्या घातल्या. स्मशानात दूरवरून कसलीच हालचाल नव्हती आणि गावाकडूनही कुणी जाताना दिसलेले नव्हते. कुत्र्यांचं रडणं एव्हाना भेसूर झालेलं होतं. हृदयाचा थरकाप होत होता. पुन्हा स्मशानात जायची कुणाचीच इच्छा न्वहती. त्यांनी आपला बेत बदलून पुन्हा घरचा रस्ता धरला.

राम्या आणि म्हाद्यानी त्यांचे दूर जाणारे आवाज टिपले आणि मग कबर उकरायला सुरूवात केली. रात्रीच्या त्या वेळी फावड्याचे आवाजही चांगलेच घुमल्यासारखे वाटत होते...

चंद्र आता माथ्यावर आला होता. थंड वारं सुटले होते. म्हाद्या झपाटल्यासारखा उकरत होता . त्याबरोबर कबरीची मऊ माती भराभर वेगळी होत चालली होती.

"हळू...!!!!"
,
,
,
,
,
,
,

अचानक आलेल्या त्या आवाजाने म्हाद्या केव्हढ्यांदातरी दचकला..

रामा त्याला आता हळू काम करायला सांगत होता.....!

खाली हाताला काहीतरी जाणवत होते. चंद्राचे मळभ दूर होत चालले होते. खालचे स्पष्ट दिसायला लागले होते. कदाचित ती चादर असावी. वरची वरची माती दूर केल्यावर चादर दिसत होती.

" हळू.. तिला पाठीला टेकल्याली हाय.. तशीच पुरल्याली हाय.."

म्हाद्या ने चादर हातात पकडली. इकडून रामाने दुसरे टोक पकडले आणि अज्जातच चादर उचलली गेली.

चंद्राचा प्रकाश बरोबर कबरीवर पडला.

आणि त्या प्रकाशात त्यांना जे काही दिसले ....ते पाहून दोघांचीही भीतीने गाळण उडाली. दातखीळ बसली....! रामाच्या अंगाला थरथर सुटली होती. पायात गोळे आल्याने हालचाल ही करता येईना. डोळे इतके विस्फारले गेले कि आता खोबणीतून बाहेर येतात कि काय असे वाटू लागले होते.. म्हाद्याची अवस्था त्याच्याहून वाईट्ट होती. तोंडातून आवाज देखील फुटत नव्हता.

त्यांना जे काही तिथे दिसले त्याची त्यांनी अपेक्षाच केली नव्हती... !! बेगमचे प्रेत सावकाश मान वळवून त्यांच्याकडे पहात होते................

ह्र्दयक्रिया बंद पडतेय असे वाटत होते. अंगाला दरदरून घाम फुटलेला होता. समोर एक फुटावर अमानवी प्रकार होता आणि जीवनमृत्यूमधले अंतरही..

त्या अवस्थेत कसेबसे धडपडत कबरीतून ते वर आले आणि ........

अवसान गोळा करून दोघांनीही पळायला सुरूवात केली...

कदाचित पाठीमागे अघटित असे काहीतरी घडत होते... आणि तिथून लवकरात लवकर दूर जायला हवे होते.

*********************************************

सगळ्या गावात चर्चा सुरू होती. कबर उकरल्याने कुणी हा प्रकार केला असावा याचीच चर्चा चालू होती आणि प्रत्येकाचा संशय या दोघांवर येत होता. गाव चांगलेच चिडलेले होते. पण जेव्हां दोघेही अचानक तापाने फणफणल्याची बातमी कानावर आली तेव्हां सगळेच बुचकळ्यात पडले.

इकडे रामाचा भाता वर खाली होत होता. त्याचे काही खरे दिसत नव्हते. पोलीस जबाब घ्यायला आले तेव्हां त्याला बरेच काही सांगायचे होते..पण त्याला सांगता येते नव्हते. फौजदार त्याच्या कानाला लागलेला होता. फौजदार उठून बाहेर आला तेव्हां त्याचे काम संपलेले होते. बाहेर गावातली जाणती मंडळी उभी होती.

"काय वं, काय झाल साहेब "

" काही नाही. दोघांनीच हे काम केलंय. पण नंतर तो काहीही बरळत होता. कशाला तरी घाबरलाय तो "

" म्हंजी ? काय झालं म्हणायचं ?"

" नाही... बाईने अंगठे धरलेत म्हणतोय "
ते ऐकल्याबरोबर मुल्लाने आभाळाकडे पाहून हात वर केले. कबरीत खुदा येऊन पापाचा पाढा वाचेपर्यंत अंगठे धरायचे असतात असा एक समज मुस्लिमांमध्ये आहे. बादशहा मुल्लाकडे पाहत राहिला.

" अल्लाह से अपना जुर्म कुबूल किया उसने.... छूट गयी... बेचारी " त्याच्या मनात आले.
बेगमला पाठीला टेकवलेल्या अवस्थेत पुरले होते. त्याला चांगलेच आठवले. अल्लाहला तिने जुर्म कबूल करतांनाच नेमकी या दोघांनी कबर खोदली.. !!

मुल्ला बाशाला विचारत होता. बेगमच्या हातून काय पाप घडले असावे या विचाराने तो अस्वस्थ झाला होता. बाशाला सांगायला कसंतरीच वाटत होतं. पण त्यालाही कुणाकडे ओकावंसं वाटत होतंच. आतल्या आत तो तरी किती कुढणार होता.

" मेरी बेगम को क्या हुवा ! आखरी वक्त मे वो बेवफा हो गयी, मेरी पीठ के पीछे उस दगाबाज म्हाद्या के साथ बेगम रंगरलिया मना रही थी... कैसे बताऊं समझ मे नही आ रहा. लेकिन दोनों का पाप ही उसके मौत की वजह बन गयी..... "

मुल्ला मान हलवत राहीला.

दोन दिवसांनी रामा आणि म्हाद्या दोघेही तापातच गेल्याची खबर पाठोपाठच आली.
,
,
,
,

तिच्या हाताचे हाड भलतेच महाग पडले होते.

- Kiran

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्णपणे काल्पनिक !... कथेतल्या कल्पनां किंवा समजुतींशी प्रत्यक्षात सहमत नाही.

अश्या भितिदायक गोष्टि लिहु नका. भिति वाटते. जीव घाबरतो. झोपेत मान वळवून बेगम बघते. मग जास्त घाबरतो.

झकास