मराठी चित्रपट संगीतापासून दूर राहिलेले स्वर !!

Submitted by दिनेश. on 20 August, 2012 - 07:49

मराठी चित्रपटातील गाणी आठवताना, अचानक एक बाब मनात आली, ती अशी. अनेक गुणी आणि श्रेष्ठ कलाकारांनी, मराठी चित्रपटांसाठी गायन केले, त्यांनी गायलेली गाणी, लोकप्रिय देखील झाली, पण मग नंतर कधीही त्यांचा आवाज मराठी चित्रपटात ऐकू आला नाही, कारणे अर्थातच मला माहित नाहीत, पण सहज
आठवण काढत गेलो, तर असे कितीतरी कलाकार आठवले.
( हे सगळे उल्लेख आठवणीतूनच केले असल्याने काही चुकले माकले असेल तर अवश्य लिहा.)

१) पं. भीमसेन जोशी.
पंडितजींची मातृभाषा मराठी नसली, तरी त्यांनी कायम मराठीत गायन केले. अभंगवाणी हा कार्यक्रम ते अनेक वर्षे करत होते. चित्रपटासाठी, त्यांनी पुलंसाठी गायन केलेच पण रम्य ही स्वर्गाहून लंका, अशी अप्रतिम रचना गायली. त्यानंतर त्यांचा आवाज ऐकू आला तो थेट, देवकी नंदन गोपाला, मधे. विठ्ठलाच्या पायी थरारली वीट.. मधे. त्यानंतर कधीच नाही.

२) स्वरराज छोटा गंधर्व.

अत्यंत लडीवाळ गायकीसाठी छोटा गंधर्व, प्रचंड लोकप्रिय होते. वयाची साठी गाठली तरी ते नाटकात भुमिका करत असत. पठ्ठे बापूराव या चित्रपटासाठी त्यांनी गण, आणि मुंबई नगरी ग बडी बांका, ही लावणी गायली होती. गणराजाला करु मुजरा, हा आणखी एक गण गायला. नंतर मात्र कधीच गायन केले नाही. त्यांचे पेटंट गाणे, जरतारी लाल शाल जोडी, एका चित्रपटासाठी, आशाने गायले.

३) कुमार गंधर्व

देव दिनाघरी धावला आणि लहानपण देगा देवा अशा दोन नाटकांसाठी कुमारांनी उसना आवाज दिला.
त्यांनी काही भावगीते देखील गायली ( अजूनी रुसुनी आहे, कोणा कशी कळावी..) पण चित्रपटासाठी
एकही गाणे नाही !

४) सुलोचना चव्हाण

उसाला लागल कोल्हा, नेसव शालू नवा, या लावण्या मल्हारी मार्तंड चित्रपटातल्या. मग केला इशारा
जाता जाता मधे पण कृष्णा कल्ले यांच्या बरोबर त्यांच्या लावण्या आहेत. मग सतीच वाण चित्रपटात
अहो कारभारी, हे धमाल गाणे. मग काहीच नाही. त्या तर आताआतापर्यंत लावण्यांचे कार्यक्रम करत
होत्या.

५) माणिक वर्मा

घननीळा लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा हे गाने चित्रपटातले. मला चित्रपटाचे नाव आठवत नाही, पण
शुभा खोटेवर चित्रीत झालेय. त्यानंतर एकही गाणे नाही.

६) कृष्णा कल्ले

वर मी उल्लेख केलाच आहे. परीकथेतील राजकुमारा, मीरेचे कंकण, कशी मी आता जाऊ अशी सुरेल
गीते गाणाऱ्या कृष्णा कल्लॆ, चित्रपटासाठी नंतर गायल्याच नाहीत.

७) रामदास कामत

मराठी मंडळी गाण्याच्या भेंड्या वगैरे गायला बसली, तर प्रथम तूज पाहता या गाण्याची आठवण निघतेच.
मुंबईचा जावई, चित्रपटातील, कलावती रागावर आधारीत हे गाणे, वाटते तितके गायला सोपे नक्कीच नाही.
पण त्यानंतर कामतांचे एकही गाणे नाही. ते तर लंडनला जाईपर्यंत नाटकाचे प्रयोग करत होते.

८) डॉ. वसंतराव देशपांडे

पुलंसाठी वसंतराव काही गाणी गायले. इये मराठीचिये नगरी मधे पण त्यांचे गाणे आहे. मग मात्र थेट
अष्टविनायक मधे गायले. त्या दरम्यान तर ते कट्यार काळजात घुसली आणि हे बंध रेशमाचे, नाटकाचे
प्रयोग करत होते. बगळ्यांची माळ फ़ुले, कुणी जाल का.. अशी भावगीतेही ते गायले.

९) मधुबाला जव्हेरी

सांगत्ये ऐका मधल्या हंसाबाईंच्या लावण्या मधुबालांनी गायल्यात. इतर चित्रपटांसाठीही त्या गायल्या.
आळविते केदार अशी एक अप्रतिम रचना त्या गायल्या. भाग्यलक्ष्मी या चित्रपटासाठी ( जयश्री गडकर
रमेश देव ) जिवलग माझे मज सांगाति, आळविते जयजयवंति अशी एक अवीट गोडीची रचना त्या
गायल्या. नंतर काहीच नाही.

१०) श्री वाघमारे उर्फ़ वाघ्या

गं साजणी अशी एक खणखणीत रचना, पिंजरा चित्रपटासाठी ते गायले. पुढे काहीच नाही.

११) जयवंत कुळकर्णी

एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा अशा दादा कोंडके यांच्या आरंभीच्या चित्रपटासाठी ते गायले.
आयलय तूफ़ान बंदराला या चित्रपटासाठी, लता सोबत, आयलय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव
आज, असे एक अगदी वेगळे असे कोळीगीत गायले. ( हे गाणे फ़ारच क्वचित ऐकायला मिळते, दोघांनीही
मस्त गायलेय ते. ) दिसं म्हातारी हाय पर तरणी, असे एक छान गाणेही, ते हऱ्या नाऱ्या जिंदाबाद साठी
गायले. नंतर ते बिचारे विस्मतणातच गेले. त्यापुर्वी देखील, सावध हरीणी सावध गं असे गाणे
त्यांनी गायले होते, पण नंतर नाहीच.

१२) पुष्पा पागधरे

सोंगाड्या चित्रपटात, राया मला पावसात नेऊ नका, अशी सुरेल लावणी त्या गायल्या. नंतर काही तुरळक
चित्रपटात. आला पाऊस मातीच्या वासात गं, किंवा रफ़ीबरोबर, पोरी संभाला दर्याला तूफ़ान आयलय
अशी सुरेख गाणी त्या गायल्या, पण चित्रपटासाठी नाही.

१३) हेंमंत कुमार
मराठा तितुका मेळवावा, चित्रपटात, समर्थ रामदासांचा श्लोक लताने त्यांच्याकडून गाऊन घेतला. मग
थेट हा खेळ सावल्यांचा, ( गोमू संगतीनं... ) साठी गायले. मग नाहीच. मी डोलकर, हे कोळीगीत
चित्रपटातले गाणे नाही.

१४) पं. जितेंद्र अभिषेकी

गोमू माहेरला जाते.. हे एकच चित्रपट गीत. त्यांचे आवडते, सुहास्य तूझे मनास मोही, हे पण कृष्णार्जून
युद्ध या चित्रपटातलेच पण मूळ गाणे. मा दिनानाथांचे. शब्दावाचून कळले सारे, हे बिल्ह्ड या आकाशवाणी
संगीतिकेतले. माझे जीवन गाणे, हे भावगीत. पण थेट चित्रपटासाठी गायन नाहीच.

१५) पं हृदयनाथ मंगेशकर

पंडितजी जितके कुशल संगीतकार तितकेच कुशल गायकही. मानसीचा चित्रकार, शूर आम्ही सरदार, तूझे
नि माझे हिरवे गोकूळ, नाव सांग सांग, छडी लागे छमछम, नको देवराया, ती तेव्हा तशी हि सगळी चित्रपटगीते. नंतर संगीतकार म्हणूनही अगदी तुरळक चित्रपट. (चानी, आकाशगंगा, जैत रे जैत) गायन तर नाहीच.

१६) प्रभाकर कारेकर

प्रभाकर कारेकर थेट चित्रपटगीत गायले नाहीत. त्यांच्या आवाजात मानापमान नाटकातील एक पद
विक्रम गोखलेच्या तोंडी, कैवारी चित्रपटात होते. ते अभंग गायनही करत ( चंदनासी परीमळ ) पण
चित्रपटात नाहीच गायले.

१७) आशा खाडिलकर

वरच्याच कैवारी चित्रपटात आशा खाडिलकर यांचे एक नाट्यगीत, आशा काळे वर चित्रीत झालेय. आशा
खाडीलकर यांनी, धाडीला राम तिने का वनी, या नाटकातून पदार्पण केले. त्यातले, अभिषेकीबुवांची, घाई
नको बाई अशी, हि रचना भावगीताच्या अंगाने जाणारी होती. आशा खाडिलकरांच्या आवाजात, नोकरी
कसली ही, हि तर डोक्यावर टांगती तलवार, असे एक विनोदी गाणे मी ऐकले आहे. पण चित्रपटासाठी
त्या गायल्या नाहीत.

१८) जयमाला शिलेदार

जयमालाबाईंनी अगदी जून्या काळात चित्रपटसंगीत गायन केले. जयराम शिलेदार यांनी तर भुमिकाही
केली होती. पण त्यानंतर बाई कधी चित्रपटांकडे वळल्या नाहीत. मराठी रंगभुमी बाईंनी आपली कर्मभूमी
मानली. संगीत मंदोदरी आणि सखी मीरा या नाट्यप्रयोगांना त्यांनी संगीतही दिले. ( सखी मीरा नाटकातले
किर्तीने गायलेले, जोशिडा जूवो ने, हे गाणे यू ट्यूबवर आहे.)

१९) फ़ैयाझ

कोन्यात झोपली सतार, चे गायन, फ़ैयाझने घरकुल चित्रपटासाठी केले. जोगिया चे इतके सुंदर गायन, आणखी
कोणी करु शकेल असे मला वाटत नाही. मग मात्र त्यांनी कधीही चित्रपटासाठी गायन केल्याचे आठवत नाही.
हिंदी चित्रपटात, ( उदा. आलाप ) त्यांनी गायन केले. मराठी महानंदा चित्रपटात भुमिकाही केली, पण गायन
नाहीच.

२०) शोभा गुर्टू

अगदी पहिल्यांदा शोभा गुर्टू यांनी काही चित्रपटांसाठी गायन केल्याचे आठवतेय. मग त्यांनी एकदम, पिकल्या
पानाचा देठ कि गं हिरवा, मधे अनोखे रंग भरले. त्यादेखील शास्त्रीय गायनासोबत उपशास्त्रीय रचनादेखील
गात होत्या. ( त्यांनीच छेडीले गं..) पण चित्रपटासाठी कधी नाहीच.

२१) सुमति टिकेकर
संत ग्यानेश्वर चित्रपटासाठी, मुक्ताबाईने चांगदेवाला लिहिलेले पत्र, सुमतिबाईंच्या आवाजात होते. मग त्या
बाई झोका गं झोका, या गाण्यात सहभागी झाल्या. पण नंतर नाहीच. त्या दरम्यान त्यांनी, संगीत वरदान
नाटकातली पदे, डॉ वसंतराव देशपांडे यांच्या संगीतात गायली.

२२) शाहीर साबळे

शाहिरांचे ऐन उमेदीतले गायन आणि लोकनाट्य मी अनुभवले आहे. त्यांचा आवाज म्हणजे मराठी माणसाचे
स्फुर्तिस्थानच. मला नीट आठवत असेल, तर वावटळ चित्रपटात त्यांनी, दादला नको गं बाई हे भारुड
गायले होते, नंतर काही गायल्याचे मला आठवत नाही.

२३) महेंद्र कपूर

महेंद्र कपूर, दादा कोंडके यांच्यासाठी अनेक गाणी गायले हे खरे आहे, पण त्यातले शब्दोच्चार मला खटकतात.
सूर तेच छेडीता, हे चिंचेचे झाड दिसे, झटकून टाक जीवा मधली सूरेलता, नंतर कधीच जाणवली नाही.

२४) शाहीर दादा कोंडके

जीवाशिवाची बैल जोडी हे हृदयनाथांनी गायलेले गाणे, दादांवर चित्रीत झालेय. त्यापुर्वी ते विच्छा माझी पुरी
करा हे लोकनाट्य गाजवत होते आणि त्यापुर्वीही ते शाहीर होते. त्यांच्या आवाजातले, नाचे दर्यावर तारू थय
थय थय, चारी बाजूने तूफ़ान भरलय, हे मी ऐकले आहे. पण मग त्यांनी आपल्यासाठी पण आपला आवाज
वापरला नाही.

२५) मन्ना डे

धन धन माला नभी दाटल्या, अ आ आई म म मका, प्रीत रंगली गं कशी राजहंसी... हि सगळी मन्ना डे
यांनी गायलेली चित्रपटगीते. मधे बराच काळ गेला आणि देवकी नंदन गोपाला साठी ते परत गायले,
पुढे काही नाही...

२६) ज्योत्स्ना भोळे

कुलवधू नाटकातील त्यांची भुमिका चित्रपट अभिनेत्रीची होती. या नाटकाशिवाय त्यांनी भूमिकन्या सीता,
आंधळ्याची शाळा हि नाटके तर केलीच शिवाय अनेक भावगीते ( माझिया माहेरा जा ) दर्यागीते ( आला
खुषित समिंदर ) गायली. पण चित्रपट गीत नाहीच.

२७) पंडितराव नगरकर

अमर भुपाळीतली गाणी कोण विसरेल ! त्यात तर त्यांची भुमिकाही होती. ते आमचे स्नेही होते, त्यामूळे
घरी येत असत. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते.
मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली. पण चित्रपटाकडे नंतर फिरकले नाहीत.

अशी कितीतरी नावे मला सूचताहेत, ज्या कलाकारांनी आपले क्षेत्र संभाळत मराठीत सुगमसंगीत गायन केले
पण चित्रपटांसाठी मात्र त्यांच्या गायनाचा वापर झाला नाही.
मालिनी राजूरकर, किशोरी अमोणकर, किर्ती शिलेदार, प्रभा अत्रे, देवदत्त साबळे, दशरथ पुजारी, वीणा
सहस्त्रबुद्धे, आरती नायक, आशालता, अजित कडकडे, भीमराव पांचाळ....

कारणे अर्थातच मला माहित नाहीत, पण मनातून खुप वाटते. या कलाकारांना गावीशी वाटेल, अशी एखादी
संगीतरचना व्हायला हवी होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेंदीच्या पानावर, आठवणीतील गाणी असे जे कार्यक्रम होतात, त्यातल्या गायक कलाकारांचे मला कौतूक वाटते.
पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तर मूळ गाण्याइतके त्यांचे गायन उठावदार होत नाही. शिवाय त्यांनादेखील,
कुठली गाणी निवडावी यांचे नीट मार्गदर्शन होत नाही.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेली हि दोन गाणी बघा.

१) कृष्ण तूझा बोले कैसा, ऐक ग यशोदे
लपविलास चेंडू म्हणतो, उरी तूच राधे
परतूनी मला दे... ( चित्रपटाचे नाव आठवत नाही, पडद्यावर चंद्रकांत आणि नर्गिस बानू, गुरु शिष्येच्या भुमिकेत होते. चित्रपटात दुर्गा खोटे, मीना नाईक पण होते. आवडला मज मनी भारी, गडी तो घोड्यावरचा, कर्‍हाडचा कि कोल्हापूरचा, दिसतो मोठ्या घरचा, हे पण यातलेच.)

२) बेतात राहू दे नावंचा वेग, नावंचा वेग
रातीच्या गर्भात चांदाची रेघ, चांदाची रेघ (चित्रपट, जावई माझा भला, पडद्यावर रत्ना आहे पण गाणे तिच्या तोंडी नाही.)

दोन्ही गाणी अशी आहेत, की ऐकताक्षणीच आवडावीत. पण अशी गाणी कुठल्या कार्यक्रमात वाजतच नाहीत.

धर्मकन्या मधले, आशाचे देव नाही जेवलेला, हे तर सारगामा मधे पण कधी नाहीच गायले गेले. ( हे आहे नेटवर )
अत्यंत अवघड चाल आहे याची.

हे दोघे लोकप्रिय कलाकार असून त्यांची गाणी विसरली गेली, मग माझ्या यादीतल्या कलाकारांचे, काय सांगावे !

भरत नाट्यसंगीत आता परत लोकप्रिय झालेय, मध्यंतरी ते पार हरवले होते.
संगीत मंदोदरी नाटकातली गाणी ऐकलीत कधी ? जयमाला बाईंना विचारल्यावर त्या म्हणाल्या, कोण ऐकणार आता ? दिप्ती भोगलेने पण अजून उत्तर दिलेले नाही, मला. ( त्यात ती आणि राहुल सोलापूरकर असत.)

मस्त धागा आहे.

कृष्णा कल्ले यांनी 'अशीच एक रात्र होती' या चित्रपटातली बहुतेक सर्व गाणी गायली आहेत. हा मराठीतला बहुतेक पहिलाच रहस्यपट/भूतपट होता. जयश्री गडकर, अरुण सरनाईक यांनी यात काम केलं होतं. यातली सगळीच गाणी छान होती. 'ऐकशील का या गीताचे' हे गाणं ऐकताना लताच्या 'कही दीप जले कही दिल' चा खूप भास होतो तर 'नाही पर्वा सख्या जगण्या मरण्याची' ऐकताना आशाच्या 'और जरासी दे दे साकी' किंवा 'ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा' ची आठवण येते. यू ट्यूब वर सिनेमा उपलब्ध आहे. जरूर पाहा.

माणिक वर्मांचं कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम हे अजरामर आणि आजही आवर्जून ऐकले जाणारे गाणे आहे ना चित्रपटातलेच? माझ्या आठवणीत सुलोचनाबाई आहेत त्यात.

श्रीराम लागू आणि तनुजा यांच्या 'झाकोळ' या चित्रपटामध्ये कुमार गंधर्व आणि शोभा गुर्टु यांच्या गाण्याच्या मैफीली आहेत.

छान धागा आहे. आज वर आल्याने वाचता आला.

माणिक वर्मांनी गायलेली काही चित्रपटगीते आठवताहेतः
कबिराचे विणतो शेले, कुणि म्हणेल वेडी मला, (देव पावला)
जाळीमंदी पिकली करवंदं (पुढचं पाऊल),
श्रीहरी विदुराघरि पाहुणा (गुळाचा गणपती)

Pages