मराठी चित्रपट संगीतापासून दूर राहिलेले स्वर !!

Submitted by दिनेश. on 20 August, 2012 - 07:49

मराठी चित्रपटातील गाणी आठवताना, अचानक एक बाब मनात आली, ती अशी. अनेक गुणी आणि श्रेष्ठ कलाकारांनी, मराठी चित्रपटांसाठी गायन केले, त्यांनी गायलेली गाणी, लोकप्रिय देखील झाली, पण मग नंतर कधीही त्यांचा आवाज मराठी चित्रपटात ऐकू आला नाही, कारणे अर्थातच मला माहित नाहीत, पण सहज
आठवण काढत गेलो, तर असे कितीतरी कलाकार आठवले.
( हे सगळे उल्लेख आठवणीतूनच केले असल्याने काही चुकले माकले असेल तर अवश्य लिहा.)

१) पं. भीमसेन जोशी.
पंडितजींची मातृभाषा मराठी नसली, तरी त्यांनी कायम मराठीत गायन केले. अभंगवाणी हा कार्यक्रम ते अनेक वर्षे करत होते. चित्रपटासाठी, त्यांनी पुलंसाठी गायन केलेच पण रम्य ही स्वर्गाहून लंका, अशी अप्रतिम रचना गायली. त्यानंतर त्यांचा आवाज ऐकू आला तो थेट, देवकी नंदन गोपाला, मधे. विठ्ठलाच्या पायी थरारली वीट.. मधे. त्यानंतर कधीच नाही.

२) स्वरराज छोटा गंधर्व.

अत्यंत लडीवाळ गायकीसाठी छोटा गंधर्व, प्रचंड लोकप्रिय होते. वयाची साठी गाठली तरी ते नाटकात भुमिका करत असत. पठ्ठे बापूराव या चित्रपटासाठी त्यांनी गण, आणि मुंबई नगरी ग बडी बांका, ही लावणी गायली होती. गणराजाला करु मुजरा, हा आणखी एक गण गायला. नंतर मात्र कधीच गायन केले नाही. त्यांचे पेटंट गाणे, जरतारी लाल शाल जोडी, एका चित्रपटासाठी, आशाने गायले.

३) कुमार गंधर्व

देव दिनाघरी धावला आणि लहानपण देगा देवा अशा दोन नाटकांसाठी कुमारांनी उसना आवाज दिला.
त्यांनी काही भावगीते देखील गायली ( अजूनी रुसुनी आहे, कोणा कशी कळावी..) पण चित्रपटासाठी
एकही गाणे नाही !

४) सुलोचना चव्हाण

उसाला लागल कोल्हा, नेसव शालू नवा, या लावण्या मल्हारी मार्तंड चित्रपटातल्या. मग केला इशारा
जाता जाता मधे पण कृष्णा कल्ले यांच्या बरोबर त्यांच्या लावण्या आहेत. मग सतीच वाण चित्रपटात
अहो कारभारी, हे धमाल गाणे. मग काहीच नाही. त्या तर आताआतापर्यंत लावण्यांचे कार्यक्रम करत
होत्या.

५) माणिक वर्मा

घननीळा लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा हे गाने चित्रपटातले. मला चित्रपटाचे नाव आठवत नाही, पण
शुभा खोटेवर चित्रीत झालेय. त्यानंतर एकही गाणे नाही.

६) कृष्णा कल्ले

वर मी उल्लेख केलाच आहे. परीकथेतील राजकुमारा, मीरेचे कंकण, कशी मी आता जाऊ अशी सुरेल
गीते गाणाऱ्या कृष्णा कल्लॆ, चित्रपटासाठी नंतर गायल्याच नाहीत.

७) रामदास कामत

मराठी मंडळी गाण्याच्या भेंड्या वगैरे गायला बसली, तर प्रथम तूज पाहता या गाण्याची आठवण निघतेच.
मुंबईचा जावई, चित्रपटातील, कलावती रागावर आधारीत हे गाणे, वाटते तितके गायला सोपे नक्कीच नाही.
पण त्यानंतर कामतांचे एकही गाणे नाही. ते तर लंडनला जाईपर्यंत नाटकाचे प्रयोग करत होते.

८) डॉ. वसंतराव देशपांडे

पुलंसाठी वसंतराव काही गाणी गायले. इये मराठीचिये नगरी मधे पण त्यांचे गाणे आहे. मग मात्र थेट
अष्टविनायक मधे गायले. त्या दरम्यान तर ते कट्यार काळजात घुसली आणि हे बंध रेशमाचे, नाटकाचे
प्रयोग करत होते. बगळ्यांची माळ फ़ुले, कुणी जाल का.. अशी भावगीतेही ते गायले.

९) मधुबाला जव्हेरी

सांगत्ये ऐका मधल्या हंसाबाईंच्या लावण्या मधुबालांनी गायल्यात. इतर चित्रपटांसाठीही त्या गायल्या.
आळविते केदार अशी एक अप्रतिम रचना त्या गायल्या. भाग्यलक्ष्मी या चित्रपटासाठी ( जयश्री गडकर
रमेश देव ) जिवलग माझे मज सांगाति, आळविते जयजयवंति अशी एक अवीट गोडीची रचना त्या
गायल्या. नंतर काहीच नाही.

१०) श्री वाघमारे उर्फ़ वाघ्या

गं साजणी अशी एक खणखणीत रचना, पिंजरा चित्रपटासाठी ते गायले. पुढे काहीच नाही.

११) जयवंत कुळकर्णी

एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा अशा दादा कोंडके यांच्या आरंभीच्या चित्रपटासाठी ते गायले.
आयलय तूफ़ान बंदराला या चित्रपटासाठी, लता सोबत, आयलय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव
आज, असे एक अगदी वेगळे असे कोळीगीत गायले. ( हे गाणे फ़ारच क्वचित ऐकायला मिळते, दोघांनीही
मस्त गायलेय ते. ) दिसं म्हातारी हाय पर तरणी, असे एक छान गाणेही, ते हऱ्या नाऱ्या जिंदाबाद साठी
गायले. नंतर ते बिचारे विस्मतणातच गेले. त्यापुर्वी देखील, सावध हरीणी सावध गं असे गाणे
त्यांनी गायले होते, पण नंतर नाहीच.

१२) पुष्पा पागधरे

सोंगाड्या चित्रपटात, राया मला पावसात नेऊ नका, अशी सुरेल लावणी त्या गायल्या. नंतर काही तुरळक
चित्रपटात. आला पाऊस मातीच्या वासात गं, किंवा रफ़ीबरोबर, पोरी संभाला दर्याला तूफ़ान आयलय
अशी सुरेख गाणी त्या गायल्या, पण चित्रपटासाठी नाही.

१३) हेंमंत कुमार
मराठा तितुका मेळवावा, चित्रपटात, समर्थ रामदासांचा श्लोक लताने त्यांच्याकडून गाऊन घेतला. मग
थेट हा खेळ सावल्यांचा, ( गोमू संगतीनं... ) साठी गायले. मग नाहीच. मी डोलकर, हे कोळीगीत
चित्रपटातले गाणे नाही.

१४) पं. जितेंद्र अभिषेकी

गोमू माहेरला जाते.. हे एकच चित्रपट गीत. त्यांचे आवडते, सुहास्य तूझे मनास मोही, हे पण कृष्णार्जून
युद्ध या चित्रपटातलेच पण मूळ गाणे. मा दिनानाथांचे. शब्दावाचून कळले सारे, हे बिल्ह्ड या आकाशवाणी
संगीतिकेतले. माझे जीवन गाणे, हे भावगीत. पण थेट चित्रपटासाठी गायन नाहीच.

१५) पं हृदयनाथ मंगेशकर

पंडितजी जितके कुशल संगीतकार तितकेच कुशल गायकही. मानसीचा चित्रकार, शूर आम्ही सरदार, तूझे
नि माझे हिरवे गोकूळ, नाव सांग सांग, छडी लागे छमछम, नको देवराया, ती तेव्हा तशी हि सगळी चित्रपटगीते. नंतर संगीतकार म्हणूनही अगदी तुरळक चित्रपट. (चानी, आकाशगंगा, जैत रे जैत) गायन तर नाहीच.

१६) प्रभाकर कारेकर

प्रभाकर कारेकर थेट चित्रपटगीत गायले नाहीत. त्यांच्या आवाजात मानापमान नाटकातील एक पद
विक्रम गोखलेच्या तोंडी, कैवारी चित्रपटात होते. ते अभंग गायनही करत ( चंदनासी परीमळ ) पण
चित्रपटात नाहीच गायले.

१७) आशा खाडिलकर

वरच्याच कैवारी चित्रपटात आशा खाडिलकर यांचे एक नाट्यगीत, आशा काळे वर चित्रीत झालेय. आशा
खाडीलकर यांनी, धाडीला राम तिने का वनी, या नाटकातून पदार्पण केले. त्यातले, अभिषेकीबुवांची, घाई
नको बाई अशी, हि रचना भावगीताच्या अंगाने जाणारी होती. आशा खाडिलकरांच्या आवाजात, नोकरी
कसली ही, हि तर डोक्यावर टांगती तलवार, असे एक विनोदी गाणे मी ऐकले आहे. पण चित्रपटासाठी
त्या गायल्या नाहीत.

१८) जयमाला शिलेदार

जयमालाबाईंनी अगदी जून्या काळात चित्रपटसंगीत गायन केले. जयराम शिलेदार यांनी तर भुमिकाही
केली होती. पण त्यानंतर बाई कधी चित्रपटांकडे वळल्या नाहीत. मराठी रंगभुमी बाईंनी आपली कर्मभूमी
मानली. संगीत मंदोदरी आणि सखी मीरा या नाट्यप्रयोगांना त्यांनी संगीतही दिले. ( सखी मीरा नाटकातले
किर्तीने गायलेले, जोशिडा जूवो ने, हे गाणे यू ट्यूबवर आहे.)

१९) फ़ैयाझ

कोन्यात झोपली सतार, चे गायन, फ़ैयाझने घरकुल चित्रपटासाठी केले. जोगिया चे इतके सुंदर गायन, आणखी
कोणी करु शकेल असे मला वाटत नाही. मग मात्र त्यांनी कधीही चित्रपटासाठी गायन केल्याचे आठवत नाही.
हिंदी चित्रपटात, ( उदा. आलाप ) त्यांनी गायन केले. मराठी महानंदा चित्रपटात भुमिकाही केली, पण गायन
नाहीच.

२०) शोभा गुर्टू

अगदी पहिल्यांदा शोभा गुर्टू यांनी काही चित्रपटांसाठी गायन केल्याचे आठवतेय. मग त्यांनी एकदम, पिकल्या
पानाचा देठ कि गं हिरवा, मधे अनोखे रंग भरले. त्यादेखील शास्त्रीय गायनासोबत उपशास्त्रीय रचनादेखील
गात होत्या. ( त्यांनीच छेडीले गं..) पण चित्रपटासाठी कधी नाहीच.

२१) सुमति टिकेकर
संत ग्यानेश्वर चित्रपटासाठी, मुक्ताबाईने चांगदेवाला लिहिलेले पत्र, सुमतिबाईंच्या आवाजात होते. मग त्या
बाई झोका गं झोका, या गाण्यात सहभागी झाल्या. पण नंतर नाहीच. त्या दरम्यान त्यांनी, संगीत वरदान
नाटकातली पदे, डॉ वसंतराव देशपांडे यांच्या संगीतात गायली.

२२) शाहीर साबळे

शाहिरांचे ऐन उमेदीतले गायन आणि लोकनाट्य मी अनुभवले आहे. त्यांचा आवाज म्हणजे मराठी माणसाचे
स्फुर्तिस्थानच. मला नीट आठवत असेल, तर वावटळ चित्रपटात त्यांनी, दादला नको गं बाई हे भारुड
गायले होते, नंतर काही गायल्याचे मला आठवत नाही.

२३) महेंद्र कपूर

महेंद्र कपूर, दादा कोंडके यांच्यासाठी अनेक गाणी गायले हे खरे आहे, पण त्यातले शब्दोच्चार मला खटकतात.
सूर तेच छेडीता, हे चिंचेचे झाड दिसे, झटकून टाक जीवा मधली सूरेलता, नंतर कधीच जाणवली नाही.

२४) शाहीर दादा कोंडके

जीवाशिवाची बैल जोडी हे हृदयनाथांनी गायलेले गाणे, दादांवर चित्रीत झालेय. त्यापुर्वी ते विच्छा माझी पुरी
करा हे लोकनाट्य गाजवत होते आणि त्यापुर्वीही ते शाहीर होते. त्यांच्या आवाजातले, नाचे दर्यावर तारू थय
थय थय, चारी बाजूने तूफ़ान भरलय, हे मी ऐकले आहे. पण मग त्यांनी आपल्यासाठी पण आपला आवाज
वापरला नाही.

२५) मन्ना डे

धन धन माला नभी दाटल्या, अ आ आई म म मका, प्रीत रंगली गं कशी राजहंसी... हि सगळी मन्ना डे
यांनी गायलेली चित्रपटगीते. मधे बराच काळ गेला आणि देवकी नंदन गोपाला साठी ते परत गायले,
पुढे काही नाही...

२६) ज्योत्स्ना भोळे

कुलवधू नाटकातील त्यांची भुमिका चित्रपट अभिनेत्रीची होती. या नाटकाशिवाय त्यांनी भूमिकन्या सीता,
आंधळ्याची शाळा हि नाटके तर केलीच शिवाय अनेक भावगीते ( माझिया माहेरा जा ) दर्यागीते ( आला
खुषित समिंदर ) गायली. पण चित्रपट गीत नाहीच.

२७) पंडितराव नगरकर

अमर भुपाळीतली गाणी कोण विसरेल ! त्यात तर त्यांची भुमिकाही होती. ते आमचे स्नेही होते, त्यामूळे
घरी येत असत. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते.
मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली. पण चित्रपटाकडे नंतर फिरकले नाहीत.

अशी कितीतरी नावे मला सूचताहेत, ज्या कलाकारांनी आपले क्षेत्र संभाळत मराठीत सुगमसंगीत गायन केले
पण चित्रपटांसाठी मात्र त्यांच्या गायनाचा वापर झाला नाही.
मालिनी राजूरकर, किशोरी अमोणकर, किर्ती शिलेदार, प्रभा अत्रे, देवदत्त साबळे, दशरथ पुजारी, वीणा
सहस्त्रबुद्धे, आरती नायक, आशालता, अजित कडकडे, भीमराव पांचाळ....

कारणे अर्थातच मला माहित नाहीत, पण मनातून खुप वाटते. या कलाकारांना गावीशी वाटेल, अशी एखादी
संगीतरचना व्हायला हवी होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

११) जयवंत कुळकर्णी

याना प्रसिद्ध कोकिळेने पारध केलं आणि त्यांचं करियर संपवलं असं ऐकून आहे.

अष्टविनायक चित्रपटासाठी जयवंत कुळकर्णी गायले होते.

टाळ बोले चिपळीला हे गाणे पंडितजींचे होते ना? पं. भीमसेन जोशींची अजूनही चित्रपटगीते आहेत, सापडली की इथे लिंक देते.
लेखाचा नक्की उद्देश कळला नाही. वरच्या यादीत महेंद्र कपूर यांचेही नाव आहे. दादा कोंडक्यांच्या बर्‍याच चित्रपटांसाठी महेंद्र कपूर गायले होते. आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचेही नाव आहे Uhoh Sad

टाळ बोले मधे ते आणि वसंतराव होते. असा संयोग परत मात्र झाला नाही,

माझ्याकडे पुलंच्या एका कार्यक्रमाची सिडी आहे त्यातधे दोघे आणि भार्गवराम आचरेकर एकत्र गायले आहेत.

छान लेख दिनेशदा.:-)

गेल्या आठवड्यात लोकसत्तामध्ये "पुष्पा पागधरे" यांच्या संदर्भात एक बातमी आली होती. पावसाची पहिली सर कोसळल्यावर आठवणारं आणि इतक्या वर्षातही तितकाच आनंद देणार्‍या "आला पाऊस मातीच्या वासात गं..." या सुप्रसिद्ध गाण्याची गायिका आज हलाखीच्या परीस्थितीत, मुंबईच्या एका झोपडपट्टीत आपले उर्वरीत आयुष्य व्यतित करत आहे. वाचुन खरच खुपच वाईट वाटलं. काही करता येईल का?

‘इतनी शक्ती हमें देना दाता’...एका ‘एकाकी’ सुराची अगतिक ‘प्रार्थना’ !

दिनेशदा

कसली प्रचंड माहिती आहे तुमच्याकडे. दादा कोंडकेंनी जिवाशिवाची.. हे गाणं गायलंय हे माहीतच नव्हतं.

जयवंत कुलकर्णींनी बरीच गाणी गायली असतील ना ? रफीने देखील शोधिसी मानवा हे एकच गाणं गायलंय का ?

पुष्पा पागधरे हीही त्या जयवंत पारध प्रकरणातील शिकार आहे म्हणे. Sad

( पुष्पा पागधरे याना रेडिओवर एक्गाणे मिळाले होते म्हणे. ते कोकिळेने संगीतकाराकडून काढून घेतले. त्यामुळे जयवंत कुलर्णीनी कोकिळेला फोन करुन विनंती केली असे करु नका म्हणुन .. त्यामुळे कोकिळा घराण्यानेच या दोघांवर राग धरला आणि त्याना डिलिट केले म्हणे. )

दादा कोंडकेंनी जिवाशिवाची.. हे गाणं गायलंय हे माहीतच नव्हतं. >>>>किरण, जिवाशिवाची...हे गाणं दादा कोंडकेवर "चित्रित" झालंय आणि ते गायलय पंडितजींनी. Happy

लोकसत्ताच्या माधव गडकरी यांनी अशा कलाकारांसाठी निधी सुरु केला होता. शांता हुबळीकरांच्या वेळी.
त्यांना कळवता येईल. शिवाय आता बातमी लोकसत्तामधेच आलीय, तर वाचक मदत करतीलच. आपणही करु.

शेळी, या सगळ्या सांगीवांगीच्या कथा असतात. लताच्याच गाण्यांचे जे संकलन निघाले होते त्यात या गाण्याचा (आयलय बंदरा ) अंतर्भाव होता.

लेकीनच्या प्रिमियरला, सुमन कल्याणपूरला निमंत्रण होते.

ओ पी नय्यरने ज्यावेळी परत संगीत द्यायला सुरवात केली (हिरामोती) त्यात पुष्पा पागधरे ला संधी दिली होती.

काही दोष आपण रसिकांनी पण आपल्यावर घ्यायला हवा. आपण जर सातत्याने त्यांच्या गाण्याची मागणी केली असती, तर त्यांनाही संधी मिळालीच असती.

"हात धरी रे हरी पहा पण, करात माझ्या वाजे कंकण " हे गाणं म्हणजेच तुम्ही म्हणताय ते मीरेचे कंकण का ?
माझं अत्तिशय आवडतं गाणं आहे. अचानक कधीही मनात धून वाजत राहते.
हृदयनाथांनी निवडुंगची गाणी गायलीत ना.

मीरेचे कंकण, भक्तीचे दर्पण
स्मरे ते रंगून, हरीनाम
पायीच्या पैंजणी, बोलतो घुंगरू
कसे ते विस्मरु, हरीनाम ...........असे गाणे आहे ते.
(गोविंदा रे गोपाळा, या संचात आहे.)

बरोबर निवडुंगाचा उल्लेख राहिला, तसे चानीला पण त्यांचेच संगीत होते पण उल्लेखही करु नये, एवढे वाईट होते.
पंडितराव नगरकरांचा उल्लेख राहिला, तो करतो.

रफीने मराठी भाषेमधे १४ गाणी गायली आहेत.....आणि सगळ्या गाण्याना श्रीकान्त ठाकरेनी सन्गीत दिले आहे.......

दिन्या काय हे?
'हा अमका तिथं नाही गायला, तो तिथं गाऊन पुन्हा नाही गायला, तो पुन्हा गाऊन पुन्ह्यांदा नाही गायला' हा भंपकपणा का म्हणून? Angry

लेखाचा नक्की उद्देश कळला नाही.>>>> 'मला बुआ इतकी काही माहीती आहे, इतकं ज्ञान अगाध आहे की इथे कुणीच तसा नाही आणि तरीही मी स्पर्धेतही नाही' ह्याच सुरासाठी.

दिनेश...

रफी, मन्ना डे, महेन्द्र, तलत, हेमंतकुमार आदी दिग्गजांनी जरी मराठी चित्रपटांसाठी {फुटकळ म्हणावे असे} गायन केले असले तरी त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटसृष्टीच असल्याने त्यानी इथे फार योगदान दिले नसले तरी काही बिघडले नाही. किंबहुना मी तर असेच म्हणेन की संगीतकारांनी उलटपक्षी इथल्या मातीतीलच गायकांना जास्तीतजास्त संधी द्यायला हवी होती.

अरुण दाते, रामदास कामत, रविन्द्र साठे, चंद्रकांत काळे, आनंद शिंदे, उदयराज गोडबोले अशा अनेक गुणी, प्रतिभावान गायकांची गायकी केवळ भावगीत, नाट्यगीत, लोकगीत, भक्तीगीत याच क्षेत्राशी बांधील राहण्यामागे सर्वात मोठे कारण कुठले असेल तर १९५० ते १९९० पर्यंतचा मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास हा जास्तीतजास्त तमाशापट, विनोदीपट अशासारख्या दोन दरीत घुटमळत राहिली आणि वर उल्लेख केलेले सारे गायक शास्त्रीय संगीताची तयारी केलेले होते. असे असले तरी सुधीर फडके, सी.रामचंद्र, प्रभाकर जोग, राम कदम, बाळ पार्टॅ आदी प्रतिभावंतांनी यांच्या आवाजाला 'चित्रपट संगीता' साठी योग्यच मानले नाही की काय अशी शंका यावी इतकी याची गायकी चंदेरी पडद्यापासून दूर राहिली.

कै.अरुण सरनाईक याना प्रत्यक्ष गाताना मी पाहिले आहे. ते अगदी पहाटे तास-दीडतास रियाझ करत असत. खूप चांगली तयारी होती त्यांची गायनाची, कोल्हापूरच्या देवल क्लबशी त्यांनी सातत्याने यासाठी संपर्क ठेवल्याचे तिथले ज्येष्ठ पदाधिकारी आजही सांगतात. दुसरीकडे एक यशस्वी नायक म्हणूनही ते पडद्यावर चमकत होते. असे असूनही त्यांना गायची संधी मिळाली ती फक्त 'चंदनाची चोळी....' मधील 'एक लाजरा न साजरा मुखडा..' आणि 'घरकुल' मधील 'पप्पा सांगा कुणाचे...' या दोन सीमित गाण्यापुरतीच.

कृष्णा कल्ले या गुणी गायिकेचा तुम्ही लेखात उल्लेख केलेला आहेच, पण यानाही प्रामुख्याने संधी मिळाली ती 'जोड गायिका' म्हणूनच. कधी उषा मंगेशकर तर कधी पुष्पा पागधरे तर कधी सुलोचना चव्हाण यांच्यासमवेत. युगल गीत तर एकही नसेल.

उषा टिमोथी [किंवा तिमोथी असेही आडनाव असेल] हे एक दुर्लक्षित नाव. 'बहकलेला ब्रह्मचारी' मधील 'शुक शुक मन्या' हे तसे चांगले गाजलेले गाणे, पण त्यानंतर ही उषा अंतर्धानच पावली.

असो....या लेखाच्या निमित्ताने का होईना, अशा गुणी गायकगायिकेंच्या आठवणी तरी मनी जाग्या झाल्या.

अशोक पाटील

यातले बहुसंख्य आवाज हे कुठले तरी वैशिष्ट्य बाळगून असणारे होते. ते वैशिष्ट्य हे जसे त्या आवाजाचे सामर्थ्य होते तसे ते त्यांची मर्यादाही होते. आता कुमार/भीमसेनांची शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी कितीही ग्रेट असली तरी तरुण नायक त्यांच्या आवाजात अवखळ प्रेमगीत गातोय ही कल्पना तरी करता येउ शकेल काय? त्यामुळे शक्यतो भिकार्‍यापासून तर नायकापर्यन्त सर्वानाच 'सूट' होणारा आवाज असलेले 'सार्वभौम' गायकच यशस्वी होतात आणि वापरलेही जातात. पुन्हा या दर्जेदार गायकाना बर्‍याचदा फिल्मी संगीत गाणेही कम अस्सल वाटते.

बाळू जोशी यांच्याशी सहमत!

बर्‍याचदा वाटतं कि अमुक्-तमुक भुमिकेला मुळ कलाकारापेक्षा अमुक्-ढमुक कलाकाराने चांगला न्याय दिला असता. तसंच काहिसं गाण्यांबद्दल वाटतं का तुम्हाला दिनुभाऊ?

उदा: भिमसेनजींच्या आवाजात, "दाटुन कंठ येतो...". अर्थात वसंतराव देशपांड्यांनी या गाण्याचं तर सोनं केलंय; परंतु हेच गाणं भिमसेनजींच्या आवाजात हि ऐकण्यात एक वेगळीच मजा आली असती...

दिनेशदा,

कितीएक आठवणी तुम्ही परत जागवल्या, जयवंत कुलकर्णींच नाव पाहील आणि जाणवल.

बरेच गायक तुम्ही एका लेखात कव्हर केलेत. काही राहीले असतील पण चलेगा !!

व्यवसाय / नोकरी सांभाळून तुम्ही जपलेला तुमचा व्यासंग दिसून येतो / जाणवतो.

या ऋणानु बंधाच्या ... कुठून पडल्या गाठी . हे गाणे एकदा एकले .. खूप आवडले .. कोण गायक / संगीतकार ? कुठे याची लिंक मिळेल का ?

जयवंत कुलकर्णी, महेंद्र कपूर, सुलोचना चव्हाण यांची नावे या यादीत कशी काय यावीत ते कळले नाही. सुलोचना चव्हाण यांनी हिंदीतले गाणे थांबवले म्हटले तर पटले असते. त्यांच्या नावावर मराठीत २-३च चित्रपट आहेत? किमान २०-३० असावेत. माणिक वर्मांचीही चित्रपटगीते आहेत.’जाळीमंदी पिकली करवंद’ ही प्रसिद्ध लावणी. ’घननीळा लडिवाळा’ चित्रपटगीत असल्याचे ऐकले नाही.

नाट्यगीतगायकांनी, शास्रीय गायकांनी, हिंदीत गाणार्‍यांनी मराठी चित्रपटांसाठी गायलेच नाही हे म्हणण्यातला अर्थ कळला नाही.

"लोकसत्ताच्या माधव गडकरी यांनी अशा कलाकारांसाठी निधी सुरु केला होता. शांता हुबळीकरांच्या वेळी. त्यांना कळवता येईल." - माधव गडकरी आता हयात नाहीत.

लेख आवडला. अनेक गायकांचा थोडक्यात पण उत्तम आढावा घेतला आहे. व्यक्त केलेली खंत मला योग्य वाटते.
मला असे वाटते की अलीकडे आलेली धुगधुगी सोडल्यास मराठी चित्रपट व अन्य संगीत हे तसे दरिद्रीच. भरपूर पैसे मिळण्याची शक्यता नसायचीच. अगदी हिट सिनेमांकरता गायलेल्या गाण्यांचे मानधन यथातथाच असेल असे वाटते. त्यामुळे गायकांना उदरनिर्वाहासाठी अन्य मार्ग जसे ऑर्केस्ट्रा, स्वतःचे कार्यक्रम करणे वा हिंदीत गाणे हे सगळे करावे लागले असेल.

घननीळा लडिवाळा हे गाणे उमज पडेल तर ह्या सिनेमात आहे असे दिसते आहे.

हृदयनाथ मंगेशकरांबद्दल लिहिलेले अगदी बरोबर आहे. संगीत दिग्दर्शक म्हणून थोर आहेतच पण आवाजही अत्यंत सुरेल, मंगेशकर ह्या नावाला साजेसाच! पण त्यांनी अजून गायला हवे होते.
मला वाटत नाही की कुण्या व्यक्तीने कारस्थान करुन जाणूनबुजून ह्यातल्या कुठल्या गायक गायिकेला हटवले असेल.
निदान ह्या निमित्ताने ह्या विस्मृत होऊ घातलेल्या कलाकारांच्या स्मृतीला उजाळा मिळाला.
आभारी आहे.

वा दिनेशदा मस्त लेख, अभ्यासपुर्ण, यातली बरीच नावे पुढच्या पिढीला माहितही नसतील.

जयवंत कुळकर्णी यांचा आवाज दादा कोंडकेना अगदी फिट होता. खूप पुर्वी दूर्दर्शनवर त्यांना गाणी गाताना पाहिलं आहे. त्याना गाताना पहाणंही आनंद दायी असायचं.

निवडूंगचा उल्लेख राहिला तसा महेश सातोस्कर यांच्या ‘कस’ या चित्रपटाला हृदयनाथांचं संगित आहे.

फ़ैयाझ यांनी "एक उनाड दिवस" मधे एक गीत गायलं आहे आणि त्या पुरतं सिनेमात कामही केलाय.

अरे वा काही नवीन उल्लेख मिळाले.
भरत, सुलोचना आणि माणिक वर्मा, यांनी अचानक चित्रपटासाठी गाणे थांबवले.
नाट्यगीत काय, भावगीत काय किंवा शास्त्रीय संगीत काय, सगळे गायनप्रकारच आहे. त्या धर्तीची गाणी चित्रपटात का आली नाहीत. छोटा गंधर्वांची चित्रपटगीते, नाट्यसंगीतापेक्षा खुपच वेगळी आहेत.

रेखा डावजेकर हे पण नाव राहिले ( दिसले मला कधीचे फुल उंबराचे, तू नको रे बोलूस माझ्याशी, शेपटीवाल्या प्राण्यांची.. ही तिन्ही गाणी आशाबरोबर .. नंतर नाही. )

माझ्या लेखाचा रोख आहे तो या लोकांनी, नंतर गायन थांबवले याकडे.

हिंदीमधे अनेक थोर शास्त्रीय संगीत गायकांना, काही गाण्यासाठी आवर्जून आमंत्रण देण्यात आले, (यात बडे गुलाम अलि खान, पंडित पलुस्कर यांच्यापासून राजन साजन मिश्रा सर्वच आले.) मालिनी राजूरकर मैफिलीत
आवर्जून मराठी बोलतात. निव्वळ आवड म्हणून त्यांनी, पांडुनृपती जनक जया, नरवर कृष्णासमान, शिवहरा हे भवहरा, हि नाट्यगीते गायली. पण चित्रपटासाठी त्या नाही गायल्या. त्यांचाच वारसा पुढे नेणारी, आरती नायक च्या आवाजात, बिर्‍हाड बाजलं या नाटकातले, माझ्याच पावलांची,, हे नाट्यगीत यू ट्यूबवर आहे, पण !

अशोक,
उषा तिमोथि आमच्या समोरच्याच बिल्डींगमधे रहात असत. त्यांची मातृभाषा मराठी नव्हती, पण आमच्या कॉलनीच्या गणेशोत्सवात आवर्जून हजेरी लावत. जो ऑर्केस्ट्रा आलेला असेल, त्यांच्या सोबत काही गाणी गात.

जिवलगा राहिले.. हे त्यांचे आवडते गाणे. तयांना काळीज नाही कसे.. असे शब्द असलेली एक लावणी पण त्यांचा
आवाजात आहे. पण त्यांना हिंदीतही संधी मिळाली नाही. माझ्या आठवणीत फक्त, हिमालय कि गोद मे, या चित्रपटातले, रफिबरोबरचे, नि तू रात खडी थी छत मे, के मै समझा के चाँद निकला.. हे एकच गाणे आहे.

अशोकजी, दिनेशदा

नतमस्तक !
यातली बरीच नावं कानावर पण नाही पडलेली. कधीच वाचनात नाही आलं. हे इथंच कळतंय पहिल्यांदा. मनापासून धन्यवाद.

अशोकमामा मस्त प्रतिसाद Happy

फ़ैयाझ यांनी "एक उनाड दिवस" मधे एक गीत गायलं आहे आणि त्या पुरतं सिनेमात कामही केलाय.>>>एक उनाड दिवस चित्रपटात फैयाज आहे पण "हुर हुर असते तीच उरी, दिवस बरा कि रात्र बरी" हे गाण शुभा जोशी यांनी गायलंय. अर्थात चित्रपटात फैयाजवर चित्रीत आहे. Happy

Pages