मराठी चित्रपट संगीतापासून दूर राहिलेले स्वर !!

Submitted by दिनेश. on 20 August, 2012 - 07:49

मराठी चित्रपटातील गाणी आठवताना, अचानक एक बाब मनात आली, ती अशी. अनेक गुणी आणि श्रेष्ठ कलाकारांनी, मराठी चित्रपटांसाठी गायन केले, त्यांनी गायलेली गाणी, लोकप्रिय देखील झाली, पण मग नंतर कधीही त्यांचा आवाज मराठी चित्रपटात ऐकू आला नाही, कारणे अर्थातच मला माहित नाहीत, पण सहज
आठवण काढत गेलो, तर असे कितीतरी कलाकार आठवले.
( हे सगळे उल्लेख आठवणीतूनच केले असल्याने काही चुकले माकले असेल तर अवश्य लिहा.)

१) पं. भीमसेन जोशी.
पंडितजींची मातृभाषा मराठी नसली, तरी त्यांनी कायम मराठीत गायन केले. अभंगवाणी हा कार्यक्रम ते अनेक वर्षे करत होते. चित्रपटासाठी, त्यांनी पुलंसाठी गायन केलेच पण रम्य ही स्वर्गाहून लंका, अशी अप्रतिम रचना गायली. त्यानंतर त्यांचा आवाज ऐकू आला तो थेट, देवकी नंदन गोपाला, मधे. विठ्ठलाच्या पायी थरारली वीट.. मधे. त्यानंतर कधीच नाही.

२) स्वरराज छोटा गंधर्व.

अत्यंत लडीवाळ गायकीसाठी छोटा गंधर्व, प्रचंड लोकप्रिय होते. वयाची साठी गाठली तरी ते नाटकात भुमिका करत असत. पठ्ठे बापूराव या चित्रपटासाठी त्यांनी गण, आणि मुंबई नगरी ग बडी बांका, ही लावणी गायली होती. गणराजाला करु मुजरा, हा आणखी एक गण गायला. नंतर मात्र कधीच गायन केले नाही. त्यांचे पेटंट गाणे, जरतारी लाल शाल जोडी, एका चित्रपटासाठी, आशाने गायले.

३) कुमार गंधर्व

देव दिनाघरी धावला आणि लहानपण देगा देवा अशा दोन नाटकांसाठी कुमारांनी उसना आवाज दिला.
त्यांनी काही भावगीते देखील गायली ( अजूनी रुसुनी आहे, कोणा कशी कळावी..) पण चित्रपटासाठी
एकही गाणे नाही !

४) सुलोचना चव्हाण

उसाला लागल कोल्हा, नेसव शालू नवा, या लावण्या मल्हारी मार्तंड चित्रपटातल्या. मग केला इशारा
जाता जाता मधे पण कृष्णा कल्ले यांच्या बरोबर त्यांच्या लावण्या आहेत. मग सतीच वाण चित्रपटात
अहो कारभारी, हे धमाल गाणे. मग काहीच नाही. त्या तर आताआतापर्यंत लावण्यांचे कार्यक्रम करत
होत्या.

५) माणिक वर्मा

घननीळा लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा हे गाने चित्रपटातले. मला चित्रपटाचे नाव आठवत नाही, पण
शुभा खोटेवर चित्रीत झालेय. त्यानंतर एकही गाणे नाही.

६) कृष्णा कल्ले

वर मी उल्लेख केलाच आहे. परीकथेतील राजकुमारा, मीरेचे कंकण, कशी मी आता जाऊ अशी सुरेल
गीते गाणाऱ्या कृष्णा कल्लॆ, चित्रपटासाठी नंतर गायल्याच नाहीत.

७) रामदास कामत

मराठी मंडळी गाण्याच्या भेंड्या वगैरे गायला बसली, तर प्रथम तूज पाहता या गाण्याची आठवण निघतेच.
मुंबईचा जावई, चित्रपटातील, कलावती रागावर आधारीत हे गाणे, वाटते तितके गायला सोपे नक्कीच नाही.
पण त्यानंतर कामतांचे एकही गाणे नाही. ते तर लंडनला जाईपर्यंत नाटकाचे प्रयोग करत होते.

८) डॉ. वसंतराव देशपांडे

पुलंसाठी वसंतराव काही गाणी गायले. इये मराठीचिये नगरी मधे पण त्यांचे गाणे आहे. मग मात्र थेट
अष्टविनायक मधे गायले. त्या दरम्यान तर ते कट्यार काळजात घुसली आणि हे बंध रेशमाचे, नाटकाचे
प्रयोग करत होते. बगळ्यांची माळ फ़ुले, कुणी जाल का.. अशी भावगीतेही ते गायले.

९) मधुबाला जव्हेरी

सांगत्ये ऐका मधल्या हंसाबाईंच्या लावण्या मधुबालांनी गायल्यात. इतर चित्रपटांसाठीही त्या गायल्या.
आळविते केदार अशी एक अप्रतिम रचना त्या गायल्या. भाग्यलक्ष्मी या चित्रपटासाठी ( जयश्री गडकर
रमेश देव ) जिवलग माझे मज सांगाति, आळविते जयजयवंति अशी एक अवीट गोडीची रचना त्या
गायल्या. नंतर काहीच नाही.

१०) श्री वाघमारे उर्फ़ वाघ्या

गं साजणी अशी एक खणखणीत रचना, पिंजरा चित्रपटासाठी ते गायले. पुढे काहीच नाही.

११) जयवंत कुळकर्णी

एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा अशा दादा कोंडके यांच्या आरंभीच्या चित्रपटासाठी ते गायले.
आयलय तूफ़ान बंदराला या चित्रपटासाठी, लता सोबत, आयलय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव
आज, असे एक अगदी वेगळे असे कोळीगीत गायले. ( हे गाणे फ़ारच क्वचित ऐकायला मिळते, दोघांनीही
मस्त गायलेय ते. ) दिसं म्हातारी हाय पर तरणी, असे एक छान गाणेही, ते हऱ्या नाऱ्या जिंदाबाद साठी
गायले. नंतर ते बिचारे विस्मतणातच गेले. त्यापुर्वी देखील, सावध हरीणी सावध गं असे गाणे
त्यांनी गायले होते, पण नंतर नाहीच.

१२) पुष्पा पागधरे

सोंगाड्या चित्रपटात, राया मला पावसात नेऊ नका, अशी सुरेल लावणी त्या गायल्या. नंतर काही तुरळक
चित्रपटात. आला पाऊस मातीच्या वासात गं, किंवा रफ़ीबरोबर, पोरी संभाला दर्याला तूफ़ान आयलय
अशी सुरेख गाणी त्या गायल्या, पण चित्रपटासाठी नाही.

१३) हेंमंत कुमार
मराठा तितुका मेळवावा, चित्रपटात, समर्थ रामदासांचा श्लोक लताने त्यांच्याकडून गाऊन घेतला. मग
थेट हा खेळ सावल्यांचा, ( गोमू संगतीनं... ) साठी गायले. मग नाहीच. मी डोलकर, हे कोळीगीत
चित्रपटातले गाणे नाही.

१४) पं. जितेंद्र अभिषेकी

गोमू माहेरला जाते.. हे एकच चित्रपट गीत. त्यांचे आवडते, सुहास्य तूझे मनास मोही, हे पण कृष्णार्जून
युद्ध या चित्रपटातलेच पण मूळ गाणे. मा दिनानाथांचे. शब्दावाचून कळले सारे, हे बिल्ह्ड या आकाशवाणी
संगीतिकेतले. माझे जीवन गाणे, हे भावगीत. पण थेट चित्रपटासाठी गायन नाहीच.

१५) पं हृदयनाथ मंगेशकर

पंडितजी जितके कुशल संगीतकार तितकेच कुशल गायकही. मानसीचा चित्रकार, शूर आम्ही सरदार, तूझे
नि माझे हिरवे गोकूळ, नाव सांग सांग, छडी लागे छमछम, नको देवराया, ती तेव्हा तशी हि सगळी चित्रपटगीते. नंतर संगीतकार म्हणूनही अगदी तुरळक चित्रपट. (चानी, आकाशगंगा, जैत रे जैत) गायन तर नाहीच.

१६) प्रभाकर कारेकर

प्रभाकर कारेकर थेट चित्रपटगीत गायले नाहीत. त्यांच्या आवाजात मानापमान नाटकातील एक पद
विक्रम गोखलेच्या तोंडी, कैवारी चित्रपटात होते. ते अभंग गायनही करत ( चंदनासी परीमळ ) पण
चित्रपटात नाहीच गायले.

१७) आशा खाडिलकर

वरच्याच कैवारी चित्रपटात आशा खाडिलकर यांचे एक नाट्यगीत, आशा काळे वर चित्रीत झालेय. आशा
खाडीलकर यांनी, धाडीला राम तिने का वनी, या नाटकातून पदार्पण केले. त्यातले, अभिषेकीबुवांची, घाई
नको बाई अशी, हि रचना भावगीताच्या अंगाने जाणारी होती. आशा खाडिलकरांच्या आवाजात, नोकरी
कसली ही, हि तर डोक्यावर टांगती तलवार, असे एक विनोदी गाणे मी ऐकले आहे. पण चित्रपटासाठी
त्या गायल्या नाहीत.

१८) जयमाला शिलेदार

जयमालाबाईंनी अगदी जून्या काळात चित्रपटसंगीत गायन केले. जयराम शिलेदार यांनी तर भुमिकाही
केली होती. पण त्यानंतर बाई कधी चित्रपटांकडे वळल्या नाहीत. मराठी रंगभुमी बाईंनी आपली कर्मभूमी
मानली. संगीत मंदोदरी आणि सखी मीरा या नाट्यप्रयोगांना त्यांनी संगीतही दिले. ( सखी मीरा नाटकातले
किर्तीने गायलेले, जोशिडा जूवो ने, हे गाणे यू ट्यूबवर आहे.)

१९) फ़ैयाझ

कोन्यात झोपली सतार, चे गायन, फ़ैयाझने घरकुल चित्रपटासाठी केले. जोगिया चे इतके सुंदर गायन, आणखी
कोणी करु शकेल असे मला वाटत नाही. मग मात्र त्यांनी कधीही चित्रपटासाठी गायन केल्याचे आठवत नाही.
हिंदी चित्रपटात, ( उदा. आलाप ) त्यांनी गायन केले. मराठी महानंदा चित्रपटात भुमिकाही केली, पण गायन
नाहीच.

२०) शोभा गुर्टू

अगदी पहिल्यांदा शोभा गुर्टू यांनी काही चित्रपटांसाठी गायन केल्याचे आठवतेय. मग त्यांनी एकदम, पिकल्या
पानाचा देठ कि गं हिरवा, मधे अनोखे रंग भरले. त्यादेखील शास्त्रीय गायनासोबत उपशास्त्रीय रचनादेखील
गात होत्या. ( त्यांनीच छेडीले गं..) पण चित्रपटासाठी कधी नाहीच.

२१) सुमति टिकेकर
संत ग्यानेश्वर चित्रपटासाठी, मुक्ताबाईने चांगदेवाला लिहिलेले पत्र, सुमतिबाईंच्या आवाजात होते. मग त्या
बाई झोका गं झोका, या गाण्यात सहभागी झाल्या. पण नंतर नाहीच. त्या दरम्यान त्यांनी, संगीत वरदान
नाटकातली पदे, डॉ वसंतराव देशपांडे यांच्या संगीतात गायली.

२२) शाहीर साबळे

शाहिरांचे ऐन उमेदीतले गायन आणि लोकनाट्य मी अनुभवले आहे. त्यांचा आवाज म्हणजे मराठी माणसाचे
स्फुर्तिस्थानच. मला नीट आठवत असेल, तर वावटळ चित्रपटात त्यांनी, दादला नको गं बाई हे भारुड
गायले होते, नंतर काही गायल्याचे मला आठवत नाही.

२३) महेंद्र कपूर

महेंद्र कपूर, दादा कोंडके यांच्यासाठी अनेक गाणी गायले हे खरे आहे, पण त्यातले शब्दोच्चार मला खटकतात.
सूर तेच छेडीता, हे चिंचेचे झाड दिसे, झटकून टाक जीवा मधली सूरेलता, नंतर कधीच जाणवली नाही.

२४) शाहीर दादा कोंडके

जीवाशिवाची बैल जोडी हे हृदयनाथांनी गायलेले गाणे, दादांवर चित्रीत झालेय. त्यापुर्वी ते विच्छा माझी पुरी
करा हे लोकनाट्य गाजवत होते आणि त्यापुर्वीही ते शाहीर होते. त्यांच्या आवाजातले, नाचे दर्यावर तारू थय
थय थय, चारी बाजूने तूफ़ान भरलय, हे मी ऐकले आहे. पण मग त्यांनी आपल्यासाठी पण आपला आवाज
वापरला नाही.

२५) मन्ना डे

धन धन माला नभी दाटल्या, अ आ आई म म मका, प्रीत रंगली गं कशी राजहंसी... हि सगळी मन्ना डे
यांनी गायलेली चित्रपटगीते. मधे बराच काळ गेला आणि देवकी नंदन गोपाला साठी ते परत गायले,
पुढे काही नाही...

२६) ज्योत्स्ना भोळे

कुलवधू नाटकातील त्यांची भुमिका चित्रपट अभिनेत्रीची होती. या नाटकाशिवाय त्यांनी भूमिकन्या सीता,
आंधळ्याची शाळा हि नाटके तर केलीच शिवाय अनेक भावगीते ( माझिया माहेरा जा ) दर्यागीते ( आला
खुषित समिंदर ) गायली. पण चित्रपट गीत नाहीच.

२७) पंडितराव नगरकर

अमर भुपाळीतली गाणी कोण विसरेल ! त्यात तर त्यांची भुमिकाही होती. ते आमचे स्नेही होते, त्यामूळे
घरी येत असत. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते.
मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली. पण चित्रपटाकडे नंतर फिरकले नाहीत.

अशी कितीतरी नावे मला सूचताहेत, ज्या कलाकारांनी आपले क्षेत्र संभाळत मराठीत सुगमसंगीत गायन केले
पण चित्रपटांसाठी मात्र त्यांच्या गायनाचा वापर झाला नाही.
मालिनी राजूरकर, किशोरी अमोणकर, किर्ती शिलेदार, प्रभा अत्रे, देवदत्त साबळे, दशरथ पुजारी, वीणा
सहस्त्रबुद्धे, आरती नायक, आशालता, अजित कडकडे, भीमराव पांचाळ....

कारणे अर्थातच मला माहित नाहीत, पण मनातून खुप वाटते. या कलाकारांना गावीशी वाटेल, अशी एखादी
संगीतरचना व्हायला हवी होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख आहे.
हृदयनाथ मंगेशकरांबद्दल लिहिलेले अगदी बरोबर आहे. त्यांचे " ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निनादत होता " हे गाणे अगदी आर्त आणि मनाला अस्वस्थ करणारे आहे. त्याचा आवाज अगदी हृदयाला भिडतो.

शेळी,

मद्रास प्रांतात अगदी व्यंकोजी राजे यांच्या काळापासून मराठी लोक स्थायिक झाले आहेत. (आता त्यांची मराठी आपल्याला अनोळखी वाटेल, एवढी बदलली आहे.) त्यांनी भरतनाट्यमसाठी मराठीतून रचनाही केल्या होत्या.
सुचेता भिडे चाफेकर त्या सादरही करत असत. कर्नाटकातही मराठी गायनाची परंपरा आहे. बडोदा, ग्वाल्हेरमधे तर आहेच आहे. पण आपण तिकडे कधी बघितलेच नाही.

जिप्स्या, थोडा दिलासा मिळाला, फैयाज ने गाणे गायलेय आणि मी ऐकले नाही, याची हुरहूर लागली होती.

त्यांनी स्वतःच नंतर गाण्याकडे लक्ष दिले नाही. रमेश भाटकर आणि भारती आचरेकर यांनी पण घराण्यात गाणे असून, त्या क्षेत्रात कामगिरी केली नाही.

वर्षा भोसले च्या आवाजात, चांदोबा चांदोबा भागलास का, मधल्या काही ओळी आहेत पण आशाने तिला निर्धाराने,
या क्षेत्रापासून दूर ठेवले.

दिनेशदा... भरघोस माहिती

यातली बरीच नावं कानावर पण नाही पडलेली. कधीच वाचनात नाही आलं. हे इथंच कळतंय पहिल्यांदा >+१

दिनेशदा...

छान लेख वाचनात आला...

गजाननराव वाटवे, अरुण दाते... हे लोकप्रिय गायक 'भावगितां'तच रमले. त्यांनी कधी मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केल्याचे आठवत/ ऐकिवात नाही... संगित रंगभूमी वरील श्री. प्रसाद सावकार, प्रकाश घांग्रेकर... त्याच प्रमाणे गायीका पद्मजा फेणाणी जोगळेकर, ज्योत्स्ना हर्डीकर (एक अत्यंत सुरेल आणी गुणी गायीका) - या दोन गायीकांचं गाणं 'निवडूंग' नंतर कुठल्याही मराठी चित्रपटा मधुन ऐकायला मिळालं नाहि...

मोठ्या गायकांचं एकवेळ समजू शकतं- उदा. पं.भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, डॉ. वसंतराव देशपान्डे... यांच्या गायकीचा अंदाज आणी एकुणच बाज लक्षात घेतला तर, चित्रपटासाठी मर्यादीत वेळेत (साडेतीन ते पाच मिनिटात एक गाणं गाऊन मोकळं होणं) गाणं म्हणणं, यांच्या स्वभाव प्रकृतीला मानवणारं नव्हतं. गाणं सुरु असताना(च) लक्षात आलेलं Improvization करायची या गायकांना सवय असल्यामुळे, हे महान गायक चित्रपट संगीत-गायना पासून स्वतः होवून दूर राहीलेले असावेत...

वर्षाला क्वालिटीच नव्हती. >> जैत रे जैत मधले 'कोण्या राजानं राजानं' यात तिचा आवाज आशा इतकाच भारी वाटतो.

हेमन्त भोसले दिलेले तथाकथित संगीताचेही तसेच... >> 'जा जा जा रे नको बोलू जा ना' हे त्याचेच ना? Happy

बाजो, वर्षाला मी स्वतः प्रत्यक्ष ऐकले आहे.. आणि खरेच सांगतो, आपण एका चांगल्या कलाकाराला मुकलो.

विवेक, तिच तर या कलाकारांची खासियत होती, नुसत्या तीन मिनिटात ते आपल्या तयारीची झलक दाखवू शकत होते. शिवाय ३ मिनिटांचे लिमिट, ध्वनिमुद्रिकांना होते, आता ते राहिले नाही.

देरे कान्हा चोळी लुगडी, दत्त दर्शनला जायाचं, कोण होतास तू.. हि गाणी ३ मिनिटांपेक्षा जास्त कालावधीची आहेत
आणि ती २ भागात आकाशवाणीवर वाजवत असत.

रम्य हि स्वर्गाहून लंका, हे गाणे ज्या हिंडोल रागावर आधारीत आहेत त्याच रागातले, लपविला लाल दिनकर, हे
संगीत स्वयंवर मधले पद, नागपूरच्या कल्याणी देशमूख यांच्या आवाजात नेटवर आहे. तब्बल साडेसात मिनिटांचे
गायन आहे. काय तो थरार महाराजा ! पण त्यांच्या आवाजात दुसरे कुठलेच मराठी गाणे उपलब्ध नाही.

पंडीतराव नगरकरांना आम्ही खुपदा विचारायचो, चित्रपटात का गात नाही, त्यावर ते नुसतेच हसून विषय टाळायचे.
त्यांनी कधी कुणाबद्दल कठोर उदगार काढलेही नसते. म्हणून तर म्हणतो, कारणे मला माहित नाहीत.

कान्होपात्रा किणीकर आणि किर्ती शिलेदारही मुलाखतीत हा प्रश्न, हसून सोडून देत असत.

दिनेशदा, तुमचा अभ्यास सुरेल आहे यात शंका नाही. यातली कित्येक गाणी अनेकदा कानावरून गेली आहेत. बरीच कानावाटे आत रमली आहेत. पण इतका विचार कधी केला नाही. बहुतेकवेळा सूरांच्या नादात गायक, संगीतकार, कवी यांच्या नावांकडे दुर्लक्षच झालय. पण तुमच्या लेखाच्या निमित्ताने अनेक गाण्यांची उजळणी झाली हेही नसे थोडके ! Happy

विषय वेगळा असूनही लेख तितका परिणामकारक नाही उतरलेला. निराशा झाली.

एक दोन दुरुस्त्या सुचवाव्याशा वाटतात. 'चंदनासी परिमळ आम्हां काय त्याचे' हे प्रभाकर कारेकरांचे नसून शरद जांभेकरांचे आहे, तर 'घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला' हेही आशा खाडीलकरांचे नसून बकुळ पंडितांनी गायले आहे.

वर्षा भोसलेने 'संसार' चित्रपटात सुरेश वाडकरांबरोबर 'गीत होऊन आले सुख माझे आले साजणा' हे युगुलगीत गायलेले आहे. आशासोबतचे तिचे 'तालासुरांची गट्टी जमली, नाचगाण्यांत मैफील रमली' हे गाणेही प्रसिद्ध आहे. चित्रपट मला आत्ता आठवत नाही.

वर्षाचा गायनाचा मर्यादित आवाका बघता आशाने तिला निर्धाराने दूर ठेवले या विधानाबद्दल शंका आहे, पण बाळू जोशींचे हेमंत भोसलेंबद्दलचे विधान मात्र अन्यायकारक वाटले. तो देवदत्त साबळेंच्या वाटेवरचाच अगदी मोजकं पण चांगलं काम केलेला गुणी संगीतकार आहे. त्याने संगीतबद्ध केलेली 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात', ' जा जा जा रे नको बोलू जा ना', 'शारद सुंदर चंदेरी राती' ही गाणी पठडीबाहेरची आहेत, उत्तम आहेत आणि मुख्य म्हणजे लोकप्रियही आहेत.

असो. विषयांतराबद्दल क्षमस्व.

घाई नको बाई अशी - बकुळ पंडितांचे? आकाशवाणीवर या आणि 'धाडिला राम तिने का वनी' याच नाटकातलं ' लेऊ कशी वल्कला' या दोन्ही गाण्यांसाठी गायिकेचे नाव आशा खाडिलकर असेच सांगितले जाते. (आवाजही त्यांचाच असतो). बकुळ पंडित यांनी पुन्हा या गाण्याची वेगळी रेकॉर्ड काढली असल्यास कल्पना नाही.

मराठी चित्रपटांत नायकाला साजेसे पार्श्व-स्वर फारच कमी आहेत असे मला वाटते. रवींद्र साठे हा त्यातला एक. त्यांना अगदीच मोजकी गाणी मिळाली. तसाच आवाज चंद्रशेखर गाडगीळ यांचा.

सई, तूला लिहावेसे वाटले हेच मोलाचे !
खुपसे आठवणीतून लिहिलेय, संदर्भ नाहीच तपासले. आता प्रतिसादातून मलाच नवीन महैती मिळतेय.

भरतने लिहिल्याप्रमाणे हि दोन्ही गाणी आशा खाडिलकरचीच. नंतर कदाचित मैफिलीत बकुल पंडितने गायली असतील. त्या नाटकात रजनी जोशी ( अवमानिता मी झाले ) पण असत, कैकयीच्या भुमिकेत.

या क्षेत्रातील राजकारण आणि स्पर्धा यामूळे आशाने तिला या क्षेत्रात येऊ दिले नाही, असे आशानेच सांगितले होते.
आशाशिवाय आणखी कोण याबाबतीत जास्त जाणकार असेल ?

भरत, मराठी चित्रपटात नायक अशी एक प्रतिमा नाही उभी राहिली. आणि ते चांगलेच आहे म्हणा. नटरंग काय, वळू काय किंवा बालगंधर्व काय, यातले नायक हे पारंपारीक नायक नाहीतच.

सुरेश वाडकर देखील नायकाचा आवाज म्हणून फारसे लोकप्रिय नाही झाले. (त्यांच्या आवाजातली नाट्यसंगीताची सिडी आहे माझ्याकडे. वेगळ्या शैलीतले अप्रतिम गायन आहे ते.)

भरत, असू शकते मी चुकीची, कारण मीही आठवतंय तेच लिहीलंय न तपासता. मीही तुमच्याप्रमाणे आकाशवाणीच्याच भरवश्यावर! पण त्या गाण्यानंतर अलकनंदा वाडेकर असं ऐकलेलं का आठवतंय मला?

विलक्षण साम्य आहे त्या दोघींच्या आवाजात. मी चेक करते, आता जाम उत्सुकता लागली आहे मला. प्लीज तुम्हीही सांगा.

बकुल पंडित अर्थात अलकनंदा वाडेकर यांच्या आवजातली नाट्यगीते : 'का धरिला परदेश', 'विकल मन आज झुरत असहाय', 'उगवला चंद्र पुनवेचा' आणि 'प्रीती सुरी दुधारी'

आलं का मंगेशकरांचं नाव? तरी या वरच्या यादीत बरीच नावं पुरुष गायकांची आहेत म्हणून बरं!

विषय थोडासा पुढे नेऊन - श्रीनिवास खळे आणि यशवंत देव या दोघांनी किती कमी चित्रपट केले.

अरे वा छान माहिती.
परवाच पेपरात पुष्पा पागधरेंबद्दल वाचलं ...खूप वाईट वाटलं.
त्यांना कुणीच नाहीये आणि फक्त महिना १४०० रु. मिळकतीवर त्या अत्यंत हलाखीत झोपडपट्टीत रहाताहेत. आणि शेजारीच त्यांचा स्टुडिओतलामस्त हेडफोन्स लावून गातानाचा फोटो.

भरत, लावणी झाली गं रागिणी नावाचा चित्रपट मला आठवतही नाही, पण त्यातली गाणी धिंगाणा वर आहेत,~~
लता आशाची तर आहेतच, पण मन्ना डे आणि सुलक्षणा पंडीत यांनी गायलेले एक छान गाणे पण आहे.
चाल थेट, झूठे नैना बोले ची आणि शब्दही हिंदी..

मुंबईत कुणी गणेशोत्सवात कार्यकर्ता असेल त्यांना सांगून, पुष्पा पागधरे यांना बोलवता येईल. गायल्या नाहीत तर निदान पाहुण्या म्हणून तरी !

लावणी झाली गं रागिणी हा चित्रपट नन्दाचा भाऊ अरुण कर्नाटकी यांनी निर्मिलेला/दिग्दर्शित केलेला चित्रपट. याची घोषणाच झालेली मला आठव्ते आहे. नन्दा होती त्यात. मला वाटते मनोजकुमारच्या शोर च्या दरम्यान याची घोषणा झाली होती . नन्द्दच्या करीअरला बूस्ट देण्याचाही विचार असेल्.कारण तेव्हा नन्दाचे वयही झाले होते. नायिका म्हणून तशी ती थोराडच होती. मला वाटते तो पिक्चर तयार झालाच नाही.

नंदाने मनमोहन देसाईंशी लग्न केले होते ना? Uhoh

ओ पी नय्यरने हीरा मोती व टॅक्सी ड्रायव्हर (१९७५)मध्ये पुष्पा पागधरे , कृष्णा कल्ले इ गायिकांना घेऊन पुन्हा संगीत करीअर करण्याचा प्रयत्न केला. 'खाकर तूने पान कसमसे लेली मेरी जान' तेही आशा भोसलेला चॅलेन्ज करण्यासाठीच. पण ते उसने अवसानच होते. नन्तर ओ पी ची आणि या गायिकांची व्यवस्थित कोंडी करण्यात आली असा आरोप होतच राहिला. ओ पी आणि आशा यांचे का फाटले हा प्रश्न तसा अनुत्तरितच आहे. पण लताच्या साम्राज्यात झाकोळून गेलेल्या आशाचे अस्तित्व केवळ नय्यर मुळेच टिकून राहिले अन्यथा तिची 'उषा मंगेशकर'च झाली असती.
लता मंगेशकरशिवाय कारकीर्द यशस्वी करून दाखवणारा नय्यर हाच एकमेव खुद्दार संगीतकार.
त्याने लताला एकही गाणे दिले नाही.

बाजो, पण त्याची गाणी आहेत नेटवर. मनमोहन देसाईने मग आत्महत्या केली.

नंदा नायिका म्हणून त्यावेळी यशस्वीही झाली नसती म्हणा. तिला नाचाचेही अंग नव्हते. (तरी तिचा नर्तकी नावाचा, हिंदी चित्रपट आला होता.)

ओपीने त्या चित्रपटासाठी तिसरी गायिका म्हणून बहुतेक वाणी जयरामला घेतले होते. रिना रॉय, शत्रुघ्न सिन्हा आणि बिंदू होते त्यात.

वर्षाला क्वालिटीच नव्हती. >> जैत रे जैत मधले 'कोण्या राजानं राजानं' यात तिचा आवाज आशा इतकाच भारी वाटतो.>>>>>माधव +१

"संसार" चित्रपटातील "गीत होऊनी आले सुख माझे, माझे साजणा..." हे आशा काळे आणि यशवंत दत्त यांच्यावर चित्रीत झालेले आणि वर्षा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले युगलगीतही सुरेख आहे.

दिनेश, अगदी खरं, मनातलं सांगू? तुला राग येईल कदाचित याची कल्पना आहे, पण आपण दोघेही मायबोलीवर बरेच वर्ष येतो आहोत (मी त्यामाने फारच अनियमित) म्हणूनच केवळ लिहिण्याचं धार्ष्ट्य तरी करते आहे. पण लेखाचा उद्देश तर कळला नाहीच पण लेखही आवडला नाही, अगदी माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर असूनही.

तू लिहिलेल्या बर्‍याचश्या गायक-गायिकांचे गायनाचे मुख्य क्षेत्र वेगळे आहे. तेव्हा त्यांनी आपले क्षेत्र सोडून चित्रपटासाठी पार्श्वगायन का केले नाही या मुद्द्याला माझ्या मते काहीच अर्थ नाही. त्या सगळ्यांनी त्यांना प्रिय असणार्‍या क्षेत्रात भरघोस कामगिरी केली आहे की! अमराठी गायकांच्या बाबतीत त्यांचे उच्चार मराठी धाटणीचे नसतात ही गोष्ट विसरून चालणार नाही. लताने हिंदी/ उर्दू उच्चार साफ होण्यासाठी खास कष्ट घेतले कारण तिला हिंदी चित्रपटात कारकीर्द करायची होती. बाकीच्या अमराठी गायकांचे तसे नाही. शिवाय मराठीत त्यांना हिंदीसारखे मानधनही मिळण्याची शक्यता नव्हती असे म्हणायला कोणाचीच हरकत असणार नाही.

केवळ हे गायक चांगले गातात म्हणून त्यांनी चित्रपटासाठीही गायन करावे ही तुझी स्वत:ची इच्छा असली तर ठीक आहे, पण लेखात तक्रारीचा किंवा अन्यायाचा सूर जाणवतो, तो काही पटला नाही. शिवाय चित्रपटासाठी गाणे हा गुणवत्तेचा किंवा लोकप्रियतेचा मापदंड होऊ शकत नाही ना?

लेखाच्या शेवटी तू काही नावांचा उल्लेख, त्यांनी सुगमगायन केले पण चित्रपटासाठी नाही असे लिहीले आहेस, त्यातल्या बर्‍याचश्या जणांनी सुगमसंगीतातही मोजकीच वाटचाल केली - हे सगळे प्रतिभावंत कलाकार आहेत, तेव्हा तो त्यांचा स्वतःचा निर्णय असू शकत नाही का?

मुख्य म्हणजे, हे सगळे कलाकार बहरात होते तेव्हा संगीतकारही तितकेच दर्जेदार आणि चोखंदळ होते - बाबुजी, दत्ता डावजेकर, मा. कृष्णराव, वसंत देसाई, वसंत पवार आणि तो मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळही मानला जातो, सगळ्याच दृष्टीने. त्यामुळे जरा जास्तच खटकले.

आणि हो, 'घननीळा लडिवाळा' हे गाणं 'उमज पडेल तर' या चित्रपटातलेच आहे, पडद्यावर तरुणपणची शुभा खोटे आणि प्रेक्षकांत चित्रपटाचे नायक-नायिका, रमेश देव आणि चित्रा आहेत.

तुला दुखवायचा हेतू अजिबातच नव्हता; अजाणता तसे झाले असले तर क्षमा कर.

धन्यवाद भरत, ही गाणी तर आहेतच. दिनेश, माझ्या चुकीसाठी क्षमस्व.

प्रिया, पूर्ण अनुमोदन. अतिशय मुद्देसुद स्पष्टीकरण.

'रुपेरी वाळूत माडांच्या बनात' - अनिल अरुण यांचं असावं.
हेमंत भोसलेंची वर लिहिलेल्या शारद सुंदेरी, जा जा जा रे यांव्यतिरिक्त : मी ही अशी भोळी कशी ग आणि जो जो गाई अंगाई गाते. हिंदीतही एक चित्रपट आहे.

आशा-वर्षा यांचं 'तालासुरांची गट्टी जमली' हेही गाणं आहे.

आलं का मंगेशकरांचं नाव? <<< Lol

===============

हा लेख कालच वाचला होता. अगाध आहात तुम्ही, एवढी माहिती एखाद्याकडे असते हेच नवल आहे.

संदर्भ घेण्यास अतिशय उपयुक्त लेख आहे. धन्यवाद

नंदाने मनमोहन देसाईंशी लग्न केले होते ना?>>>>

नाही!!!. त्यांचे तिच्या वर अतोनात प्रेम होते. पण दुसरी बायको व्हायला तिचा नकारच होता. जेंव्हा त्यांची पहिली पत्नी चे निधन झाले १९७९ मध्ये तेंव्हा ही नंदा लग्नाला तयार झाली नाही. शेवटी १९९२ ला ती तिच्या मैत्रिणीच्या "वहिदा रेहेमान" च्या सांगण्या वरुन तयार झाली. पण ते व्हायच्या आधीच मनमोहन देसाईंनी आत्महत्या केली. त्या नंतर पेपर मध्ये नंदाची खास मैत्रिण वहिदा रेहेमान हिचा त्या बद्दल लेख आला होता असे आठवत आहे. नंदा च्या नशीबात लग्न न्हव्हतेच!!!!!

प्रिया, कदाचित माझी खंत मी नीट मांडली नसेल.
हे सर्व कलाकार थोर होतेच पण त्यांचे गायन सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला कदाचित चित्रपट संगीत उपयोगी पडले असते. माझ्या लहानपणी नाट्यसंगीत मागे पडू लागले होते. संगीत नाटकाचे प्रयोगही तुरळक होत गेले.
त्यामानाने चित्रपट्संगीत आणि काही खाजगी संग्रह लोकप्रिय होत होते ( मी डोलकर, लताच्या महानोरांच्या लावण्या ) वगैरे.

या कलाकारांनी चित्रपटासाठी गाणे का थांबवले, त्याची कारणे मला कळली नाहीत. केवळ मानधन हे कारण नसावे.
जर त्यांना गावेसे वाटले नाही तर त्याचे कारण त्यांना आवडतील अशा रचना झाल्या नाहीत किंवा त्यांना कुणी
विचारलेच नाही, असे असेल का ?

बरं या कलाकारांनी गायनच थांबवले असेही नाही. मध्यंतरी अनेक भरताड मराठी चित्रपट निघत होते, त्यात कोण गात होते आणि कुणाचे संगीत होते, हे मलातरी आठवत नाही. कथा, अभिनय या बाबींसोबत संगीताचाही र्‍हास झालाच.

उच्चाराबाबत मन्ना डे यांचे मराठी उच्चार सदोष होते पण महेंद्र कपूर यांचे उच्चार नंतर बिघडले कि तसे उच्चार
त्यांना करायला लावले ( एकह मुकहाने बोहला !! )

पिंजरा साठी जर फक्त एका लावणीसाठी लताचा आग्रह धरला गेला तर हे वागणं बरं नव्ह साठी सुलोचना चव्हाण, जास्त योग्य होत्या असे मला वाटते. आणि चंदनाची चोळी मधली गाणी, मला तरी आवडली नव्हती.

छोटा गंधर्वांच्या पठ्ठे बापुरावमधल्या लावण्या धिंगाणा डॉट कॉम वर आहेत, त्यावेळी अर्थातच रेकॉर्डींगचे तंत्र
सुधारलेले नव्हते. त्यामानाने गणराजाला करु मुजरा, हे चांगले रेकॉर्ड झालेय. मग त्यांच्या प्रिये पहा, लाल शाल
जोडी या नाट्यगीतांच्या रेकॉर्ड्स आल्या, त्यावेळी तर तंत्र खुपच सुधारल्याने, ती गाणी सुंदरच आहेत.
पण जर त्यांनी चित्रपटात गायले असते ( गं साजणी सारखी एखादी रचना ) तर आजच्या पिढीला, छोटा गंधर्व
यांची ओळख राहिली असती.

सुगम संगीत गायकांपैकी अरुण दाते यांना देखील मराठी उच्चारांची सवय नव्हती, पण त्यांचा उल्लेख मी केला
नाही, कारण भावगीतात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
पण बाकी कलाकारांना मराठी सुगम संगीताचे वावडे नक्कीच नव्हते. प्रसंगानुरुप, कार्यक्रमांच्या दरम्यान ते
सुगम संगीत गातच होते, पण ते गायन आता विस्मरणात गेले.
कुठे मिळाले तर श्रुती साडोलीकरच्या आवाजात, रंगीन पालना हौसेनं केला हि रिवायत आणि पांडुरंग कांती हा
अभंग अवश्य ऐकून बघा. अशोक रानडे यांच्या देवगाणी कार्यक्रमात केवळ ही दोन गाणी त्या गात असत.
त्यांच्या आवाजात जर एखादे चित्रपट गीत असते, तर ते निदान आपली आवड मधे वाजले तरी असते.
माझ्याकडे पण ही दोन गाणी आता नाहीत. कॅसेट होती, ती पुरात वाहून गेली. आता कुठे मिळतही नाही.

तर परत माझा मुद्दा आणि अर्थातच आवड म्हणू शकता, कि या कलाकारांचे गायन मी ऐकतच असतो. पण त्यांच्या आवाजात जर चित्रपटगीते असती, तर अनेक जणांना हि नावे अनोळखी वाटली नसती, आणि त्यांच्या
थोर गायकीचा परिचय आजही लोकांना राहिला असता. (म्हणून तर हरवलेले सूर, म्हणतोय.)

दक्षिणेकडे, सुबलक्ष्मी यांचे सुप्रभातम आवर्जून ऐकले जाते, त्या परंपरेनुसार आपल्याकडे अमर भूपाळी ऐकली
गेली असती तर !

पण मराठीत चित्रपटसंगीतासारखीच, किंबहुना अधिक सशक्त अशी नाट्यसंगीताची आणि भावगीतांची धारा आहे ना. मग काही लोकांनी चित्रपटगीते गायली नाहीत म्हणून त्यांचे आवाज लोकांपर्यंत पोचले नाहीत असे कसे म्हणता येईल?

हेमंत भोसले ह्यांचे संगीत चांगले होते. हिंदीत ही त्याने एक दोन चित्रपट केले होते ( दामाद आठवतो आहे)

देवदत्त साबळे एकदम मिटुन गेले. आमच्याच कॉलनीत रहातात ( परळ ला, आंबेकर नगर मध्ये. तिकडे मी लग्न झाल्यास ३-४ वर्ष राहिले. सध्या जाउन येउन) नेहेमी दिसायचे. येवढा चांगला कलाकार.. पण मिटुन गेला. कॉलनी खुप चांगल्या कार्येक्रमांसाठी ( गणेशोत्सव) आणि कलाकारां साठी प्रसिध्ध आहे ( शाहीर साबळे, शिवाजी साटम, रुजुता देश्मुख, माया जाधव आणि खुपसे बाल कलाकार). तरीही देवदत्त जीं नी कधीच ह्यात भाग घेतला नाही. मी जेंव्हा नवी नवी रहायला आले तेंव्हा इतके प्रसिध्ध कलाकार तिकडे रहातात म्हणुन मी एकदा सगळ्यांना उगाचच भेटुन आले होते. तेंव्हा पासुन गेली १५ वर्ष कधीही भेटले की देवदत्त फक्त हसतात आणि " बरं आहे ना?" येवढेच बोलतात.

त्यांची गाणी मला स्वतःला खुपच आवडतात. त्यांचे हे मिटुन जाणे नकोसे वाटते.

Pages