विषय क्र. १ - "हरिश्चंद्राची फॅक्टरी" - माझ्या चष्म्यातून....

Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2012 - 07:15

विषय क्र. १ - "हरिश्चंद्राची फॅक्टरी" - माझ्या चष्म्यातून........

मराठी सिनेमाचा अगदी धावता आढावा घेतला तर पौराणिक, संतपट, तमाशा, सामाजिक, समाजप्रबोधन, वास्तव, विनोदी अशा वळणावळणाने जात असता अचानक समोर येतो तो या सगळ्यांपासून आपले वेगळेपण दाखवणारा - श्री . परेश मोकाशी दिग्दर्शित "हरिश्चंद्राची फॅक्टरी" हा चित्रपट - एखाद्या जलाशयावर असलेल्या अनेक पक्ष्यांच्या गर्दीत एखादा डौलदार राजहंस सहज अलगद उतरताना आपले लक्ष वेधून घेतो ते कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, आपल्या अंगभूत सौंदर्यानेच.... तसाच हा चित्रपट ......

चित्रपटसृष्टीचे आद्य जनक असलेले दादासाहेब फाळके यांच्यांवर बेतलेला हा चित्रपट असूनही "डॉ. कोटणीसकी अमर कहानी" सारखा यात त्यांचा जीवनपट रंगवलेला नाहीये ना त्याला एखाद्या डॉक्युमेंटरीची कळा (का अवकळा) आणलीये... हेच या चित्रपटाचे सर्वात मोठे वेगळेपण.

हा चित्रपट पाहिल्यावर सगळ्यात प्रथम माझ्या मनात आलं की एवढी प्रचंड आर्थिक उलाढाल असलेली ही इंडस्ट्री...... यातल्या एकाही सुजाण व्यक्तिला हे जाणवू नये की या चित्रपटसृष्टीचे आद्य जनक - श्री फाळके यांच्यावर आपण चित्रपट काढून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी..... किती शरमेची गोष्ट आहे ही....
पण लगेच दुसरा विचार आला पुढे की - या कलाकृतीला श्री. परेश मोकांशींचाच परिस स्पर्श झाला हेच खूप चांगले झाले, त्याऐवजी बेगडीपट, मेलोड्रामाटिक किंवा कुठलाही असा अमंगळ स्पर्श झाला असता तर !!! बापरे, नकोच, हा विचारही नको....

या चित्रपटात रंगवलंय ते फाळक्यांचे झपाटलेपण - "चित्रपट निर्मिती" या कल्पनेने त्यांना पुरते झपाटले होते - ती क्रेझ, ते वेड यात असे काही रंगवलंय की ते दिग्दर्शकाच्या हातातून (नजरेतून, डोक्यातून) कधीही सुटलेलं नाहीये. मोकाशींनीच म्हटल्याप्रमाणे फाळक्यांच्या जरा विक्षिप्त व त-हेवाईक वर्तनाचा इतका बेमालूम वापर दिग्दर्शकाने केलाय की जणू एक नवा बाजच या चित्रपटाने निर्माण केलाय. या बाजाला कोणी खेळकर, हलकाफुलका म्हणतील तर कोणी चार्ली चॅप्लीन वा लाईफ इज ब्यूटिफूलशी संबंध जोडायचा प्रयत्न करतील पण माझ्यामते हे एक अस्सल "मोकाशी वाण" च आहे.

दादासाहेब फाळके हे त्या वेडाने कसे पछाडले गेले होते व त्यांचे ते वेड कसे प्रत्यक्षात उतरते एवढीच या चित्रपटाची कथा...

फाळक्यांनी पहिल्यांदाच पाहिलेला तो इंग्रजी चित्रपट -
तो चित्रपट एकदा पाहिल्यावर पडद्याकडे पाठ करुन तो कसा दाखवला जातो हे बघत बसणे, पुढे त्या रिळे फिरवणा-या माणसाची ओळख काढून माहिती करुन घेणे अशा मोजक्या प्रसंगातून त्यांचे त्याविषयीचे वाढत जाणारे कुतूहल दिग्दर्शक आपल्यापुढे अतिशय कौशल्याने मांडतो.

फाळक्यांच्या हाडीमाशी हे चित्रपटनिर्मीतीचे खूळ शिरल्यामुळे त्यांच्या संसारात, मुलांमधे ते कसे उतरलंय हे ही अतिशय सहजपणे व सुंदररित्या दाखवलंय - फाळक्यांच्या मुलांचे खेळ काय तर नाटकच. त्याकाळात त्या नाटकी संवादांचे किती महत्व होते हे देखील एका मुलाच्या तोंडी जे वाक्य आहे यातून अलगदपणे आपल्या लक्षात येते.

कुठल्याही कर्तृत्ववान व्यक्तिचे "कर्तृत्व" हे त्याकाळाच्या पार्श्वभूमीवरच जास्त उठून दिसते हे लक्षात घेऊन दिग्दर्शकाने
त्याकाळात समाजाची मानसिक अवस्था कशी होती ते एका दृश्यातून चपखलपणे दाखवले आहे - फाळक्यांनी पहिल्यांदाच पाहिलेला तो इंग्रजी चित्रपट - त्यात एका पारशी प्रेक्षकाची बायको पडद्यावर धावत येणारा बैल पाहिल्यावर घाबरुन एकदम उठून बाहेर पळूनच जाते - निव्वळ मनोरंजनाची गोष्ट असूनही ती जर आपल्याला संपूर्णतः नवीन असेल तर सर्वात प्रथम आपल्या मनात काय प्रतिक्रिया उमटेल तर ती भितीचीच.......
नकळत माझ्या मनात तुलना होऊ लागली ती - साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याकडे कंप्युटर्स व सेल्फोन सर्वांच्याच आटोक्यात येऊ लागले होते त्याकाळातली..... आपले सर्व आजी-आजोबा कसे या गोष्टींना हात लावायलाही घाबरत त्याच्याशी. एखाद्या नव्या तंत्रज्ञानाकडे समाज कसा बघतो याचे हे सुरेख प्रातिनिधिक स्वरुप. या अशा काळात स्वतः ही चित्रपट निर्मिती करुन ती सर्व सामान्यांच्या गळी उतरवणे हे दादासाहेबांचे अतिशय असाधारण कर्तृत्व...........

त्याचबरोबर फाळके जे प्रारंभिक प्रयोग करत असतात तेव्हा त्या चाळीतील मुलांची प्रतिक्रिया - "करा हो काका हे... मस्तच आहे, आम्हाला खूप आवडतंय....." - मुले कायमच कुतुहल बाळगून, नैसर्गिकपणे नव्याचे स्वागत करणारी कशी असतात हे देखील समजून जाते.

दुसरी एक विशेष बाब म्हणजे या चित्रपटवेडापायी त्यांच्यासारख्या आर्थिक परिस्थिती अगदी सामान्य असणा-या व्यक्तिच्या संसारात कशी ओढाताण होत असणार हे मेलोड्रॅमॅटिक पद्धतीने न घेता त्या एका विशिष्ट बाजानेच दाखवले आहे - ज्यात तो खेळकर, मिश्किल बाजही सुटला नाही व ना त्या ओढाताणीचा प्रेक्षकाच्या हृदयावर ताण येत ....

त्याकाळातील सर्वसाधारण माणसाची विचारधाराही दिग्दर्शकाने त्याच बाजाने मांडली आहे जी कधी त्या चाळीतील आजींच्या वाक्यातून - "मंडालेला पाठवतील" यातून कळते तर कधी सर्व शेजारी मिळून फाळक्यांना वेड्याच्या इस्पितळात भरती करायचा प्रयत्न करतात त्यातून.

सर्व साधारण प्रपंच, पैशाची ओढाताण, समाजाचा विरोध या बरोबरच त्या वेडापायी डोळे खराब होणे, इंग्लडला कोणी ओळखीचेही नसणे, तिथल्या थंडीला आपल्या पद्धतीने तोंड देणे अशा वैयक्तिक हालाअपेष्टा होत असताना फाळक्यांनी जी जीवतोड मेहनत घेतली, वेगवेगळ्या प्रसंगात जी कल्पकता दाखवली हे सर्व दिग्दर्शकाने असे काही रेखाटलंय की आपण त्याला नकळत दादच देउन जातो.

या चित्रपटातील सर्व पात्रांचा सहज सुखद वावर (अ‍ॅक्टिंग म्हणणे हे अपमानच ठरेल) , वेषभूषा, संवाद वा इतर सर्वच तांत्रिक बाबी हे इतके अपिलींग आहे की सगळं हा चित्रपट एकदा पाहिल्यावर आपल्या लक्षात येतेच ते ....... पण ...........

या चित्रपटाचे मला जाणवलेले एक आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शकाने प्रेक्षकांनाच बहाल केलेला एक चष्मा - जादूचा चष्मा - जादूचा अशाकरता की चष्माधारकाच्या आवडीनुसार या चित्रपटातल्या अनेक प्रसंग, फ्रेम्स याकडे तो पाहू शकतो -"मंडालेला पाठवतील " हे त्या आजींचे अगदी फेमस वाक्य....पण यातून कोणाला जाणवेल
... एक निखळ विनोद
......कोणाला त्यातून दिलेला राजकीय संदर्भ
.....कोणाला त्याकाळी असलेली इंग्रजशाही बद्दलची भिती
....तर कोणाला प्रवाहाविरुद्ध पोहोणा-याकडे समाज कसा बघतो हे लक्षात येईल

गंमत म्हणजे हा चष्मा अगदी सहज सापडतो व एकदा सापडला की तो मोठ्या ऐटीत घालून तुम्ही त्यातून दिसलेली मजा स्वतःला वा दुस-या कोणाला सांगू जाता - जसे की चित्रपटातील शेवटचे दृश्य - ट्राममधून सर्व फाळके कुटुंबीय जात असताना एक हलती खेळणी विकणारा पो-या ओरडत असतो - फाळके चित्रे, हलती चित्रे...
यातून एकाला जाणवलं -
१] फाळके ब्रँडची खेळणी वगैरे. उथळ, अव्यवहारिक वाटणारा माणूस शेवटी एक ब्रँड म्हणून जनमाणसाच्या गळी उतरला हे अतिशय छान पद्धतीने परेशने शेवटच्या प्रसंगातून दाखवले - (साजिराची टिप्पणी http://www.maayboli.com/node/14017)

२] तर लगेच दुसरा म्हणेल - ते खेळणं कुठलं दाखवलंय - हत्तीचं - सगळ्यात मोठ्ठा प्राणी - दादासाहेबांनी तेव्हाच ओळखलं होतं - किती प्रचंड विस्तारणारे ही इंडस्ट्री...

३] तिसरा - असं आहे होय... - मला वाटलं गजान्तलक्ष्मी - केवढी वैभवशाली, पैसेवाली इंडस्ट्री होणारे हे दाखवलंय यातून -

आता हा संपूर्ण चित्रपट पहा, आठवा आणि त्याच्यावरच्या इतर कोणाच्या प्रतिक्रिया ऐका.... मग लक्षात येईल तो चष्मा कशी जादू दाखवतो - प्रत्येकाला त्याच्या दृष्टीनुसार लाभलेला अनुभव - तो पाहणे, ऐकणे, अनुभवणे - हा एक विरळाच अनुभव......
असा हा चित्रपट कितीहीवेळा पाहिला तरी दरवेळेस काही नवी दृष्टी देऊन जातो, नवीनच दाखवतो - हीच या "मोकाशी वाणा" ची एक आगळीवेगळी नजाकत ..... अर्थातच मला जाणवलेली - माझ्या चष्म्यातून........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच विषय,हाताळणी शशांकजी.
<<या चित्रपटाचे मला जाणवलेले एक आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शकाने प्रेक्षकांनाच बहाल केलेला एक चष्मा - जादूचा चष्मा - >> हे अगदी खरे !
याच हाताळणीमुळे एक सुरेख हलकाफुलका अनुभव चित्रपट देतो,पण फाळक्यांच्या आयुष्यातले तणाव, त्याचा शोकात्म शेवट दाखवत नाही.

अर्थात हे कलेतले स्वातंत्र्य.
एक आनंददायी अनुभव म्हणून फाळक्यांची स्मृती जागवणारा दर्जेदार चित्रपट.

छान लिहिलंय Happy

या सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या मुलाखतीवर आधारित एक कार्यक्रम तेव्हा पाहिला होता. परेश मोकाशी खूप छान बोलला होता. त्या दृष्टीकोनातून नंतर पुन्हा एकदा नव्याने हा सिनेमा मी पाहिला आणि तो आधीपेक्षाही जास्त आवडला होता Happy

मस्त. मस्त.
फॅक्टरी ला मिळालेली लोकप्रियता पाहुन मस्त वाटले होते.
काही भाग खूप क्रियेटीव्ह होता त्यातला.

सुरेख लेख!!!!

आमच्या कडे हा सिनेमा वारंवार पाहिला जातो. त्यातल्या "नानुआजी" आमच्या कडे एकदम हिट आहेत. एकमेकांना बोलताना देखिल त्यांच्या तोंडचे संवाद आम्ही बोलतो. " अटक होईल"..." मंडालेला पाठवतिल"..... उदा: मुलीचा अभ्यास राहिला तर " उरकुन टाक बघु लौकर नाहितर अटक होईल ( आजींच्या आवाजात)".....

नंदु माधव आणि विभावरी एकदम झकास!!!!!! विभावरी काकणभर सरसच !!!! तिचा साधा चेहेरा हा तिचा यु.एस.पी. आहे.....

ह्यात फाळकेंचा जिवन पट दाखवणे हा उद्देशच न्हवता.... भारतात सिनेमा उद्योगाची ठीणगी कशी पडली आणि तो एक ध्यास घेवुन एका सामान्य माणसाने त्याचा पाया रचला...हे महत्वाचे.

दादासाहेब फाळक्यांचा नातु अमित फाळके हाही अ‍ॅक्टर आहे. शाम बेनेगल च्या "मम्मो" मध्ये त्याने रोल केला होता.

दादासाहेब फाळक्यांचा नातु अमित फाळके हाही अ‍ॅक्टर आहे. शाम बेनेगल च्या "मम्मो" मध्ये त्याने रोल केला होता. >>> हे नव्यानेच कळले.

मध्यंतरी कुठे तरी (वर्तमानपत्रात असावे बहुतेक) श्री फिरोझ रानडे यांनी दादासाहेबांच्या एका चिरंजीवांविषयी लिहिलेले वाचले - श्री देवदत्त फाळके यांच्याविषयी - फारच हलाखीची परिस्थिती होती - मुंबईत उदबत्त्या विकून उदर निर्वाह करत होते असे काहीसे लिहिले होते, त्यांच्या (देवदत्त) मृत्यूनंतर लिहिलेला तो लेख होता. फारच गलबलून आले ते वाचून....

मस्त मस्त मस्त..!!
आवडत्या चित्रपटाबद्दल आवडत्या लेखकाने लिहीलं तर आवडणारच..! Happy
खुप छान लिहीलंय

छान लिहीलंय. चित्रपट मस्तच आहे.
झाड उगवतानाचं चित्रण आणि रोज एकच हॅन्डल फिरवून त्याचं रेकॉर्डिंग आणि नंतर ते सलग बघताना वाटणारं नवल- एकदम भारी वाटतं बघायला.

Pages