दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग - ६ अंतिम

Submitted by आशुचँप on 17 August, 2012 - 13:38

बरेच दिवस लिहीन लिहिन म्हणत हा भाग राहूनच गेला होता. नुकत्याच झालेल्या पुरंदर भेटीने पुन्हा एकदा लिहण्यासाठी उचल खाल्ली आणि आता हा सादर करत आहे....मी हरवतो तेव्हा....
============================
आधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा
भाग १
http://www.maayboli.com/node/25815
भाग २
http://www.maayboli.com/node/25921
भाग ३
http://www.maayboli.com/node/26163
भाग ४
http://www.maayboli.com/node/27438
भाग ५
http://www.maayboli.com/node/29881
=============================
पारगड किल्ला वाटला होता त्यापेक्षा बराच मोठा निघाला...चांगलाच ऐसपैस पसरलेला आणि अजूनही चांगल्या स्थितीत...कोल्हापूरला जाऊन अगदी आवर्जुन भेट द्यावी असा हा किल्ला...
सर्वसाधारणपणे कोल्हापूर विभागातील किल्ले भोज राजाने बांधल्याचा उल्लेख आहे. पण पारगड त्याला अपवाद. हा शिवाजी राजांनी १६७६ मध्ये बांधलेला किल्ला. गोव्यातील पोर्तुगिज आक्रमणाला पायबंद वसावा तसेच कोकणातील सावंत यांच्यावरही अशा दुहेरी हेतूने.

ईतिहासात उल्लेख आहे की तान्हाजी मालुसरेच्या सिंहगडावरील तेजस्वी बलिदानानंतर महाराजांनी त्यांच्या मुलाला रायाजी (हाच रायबा असावा बहुतेक...जाणकारांनी माहीती द्यावी) या गडाची किल्लेदारी सोपवली होती. त्यानंतर १६८९ मध्ये संभाजी राजांच्या कारकिर्दीत औरंगजेब पुत्र मुज्जअम आणि खवासखानाने काढलेल्या मोहीमेत या गडाच्या परिसरात युद्धादी प्रसंग घडला. अर्थातच मोगलांच्या महापूराला गडावरील तुटपुंज्या शिबंदीने बिलकुल दाद दिली नाही. या धुमश्चक्रीत मराठ्यांचे तोफखाना प्रमुख विठ्ठल माळवे मारले गेले तरीही गनिमीकाव्याचा पुरेपुर वापर करत मराठ्यांनी शेवटी मुज्जअमला गडाची मिठी सोडण्यास भाग पाडले.
विशेष म्हणजेही इंग्रज राजवटीतही हा किल्ला वेगळाच राहीला. इंग्रजांनी लढून ताबा घेण्याऐवजी गडकर्यांना इंग्रज फौजेत भरती करून घेतले आणि अगदी स्वातंत्र्यानंतरही १९५४ पर्यंत गडकर्यांना तनखा मिळत असे. (संदर्भ - भगवान चिले)
गडावर छानपैकी चार तलाव आहेत. गुंजल, महादेव, फाटक आणि गणेश तलाव असे.
बुरुजांची गंमत म्हणजे एका बुरुजाचे नाव फडणीस बुरुज आहे. आपले नाव कुठेतरी गडाशी निगडीत झाल्यामुळे अगदी अगदी भरून पावलो. अर्थात हे फडणीस आणि आम्ही काही संबध नसेल पण तरीही...

आमचे शय्याकक्ष

सामानगडासारखेच इथेही काही ठिकाणी कृत्रिम तटबंदी उभारलेली. बांधकामातला सारखेपणा पाहून एकाच रेमडोक्याचे हे काम असणार हे जाणवत होते. असो.

थोडा आर्टीस्टिकपणा....:)

शाळेच्या आवारातील महाराजांचा छोटेखानी पूर्णाकृती पुतळा

कुठेही गेलो तरी आपला म्हणून एक फोटो पाहिजेच नाही का..:)

आता आमचा पुढचा टप्पा होता काळानंदी उर्फ कलानिधीगड...
घनदाट अरण्याने वेढलेला हा किल्ला आमच्या भ्रमंतीत जरा आव्हान देणारा होता कारण या एकाच किल्ल्यावर गाडी जात नाही. अर्थात जेव्हा किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो तेव्हा उत्साह मावळला. एकतर खरपूस उन पडले होते. रात्रीच्या कडाक्याचा काही मागमूस नव्हता आणि इतके दिवस डायरेक्ट गाडी घेऊन गडावर जाण्यामुळे सुखावलेल्या शरीराला चटक लागली होती आणि आता घाम गाळायला त्याने सपशेल नकार दिला.
शेवटी नेटाने पावले उचलायला सुरुवात केली. वाटेत रस्ता विचारून घेतला पण त्या पत्त्याचे इंटरप्रिटेशन मी आणि स्वप्नील या दोघांने वेगवेगळ्या प्रकारे केले. कधी नव्हे ते मी या सगळ्यांच्या पुढे चालत होतो. वाटेत सांगितल्याप्रमाणे उजवीकडे रस्ता सोडून एक वाट जाते तिकडे वळलो. पुढे जाताच एक शिल्प लागले. त्यामुळे रस्ता बरोबर असल्याची खात्री झाली. आणि महामूर झाडीत बिनधास्त घुसलो. पाठीमागून हे तिघे येत असणार या समजूतीने मी जंगलाचा आनंद घेत छानपैकी वेग पकडला.

बाजूने किल्ला दिसत होताच. पण त्यावर चढायची वाट कुठली आहे हे झाडीमुळे काही लक्षात येत नव्हते. नंतर नंतर जंगल अगदी दाट होत चालले तेव्हा मग मी एकट्याने जाण्यापेक्षा थांबण्याचा निर्णय घेतला आणि निवांत एका झाडाखाली पडून श्रमपरिहार करू लागलो.
दहा मिनिटे, पंधरा...अगदी अर्धा तास झाला तरी या मंडळींचा पत्ता नाही. बर जंगलात घुसल्यावर एकदाही फाटा फुटलेला नव्हता त्यामुळे वेगळा रस्ता पकडल्याचा संशयही नव्हता. अरेच्या मग यांना झाले तरी काय...फोनला अर्थातच रेंज नव्हती. अजून दहा मिनिटे वाट पाहीली आणि मग जाणीव झाली...काहीतरी चुकले आहे निश्चित..इतका वेळ लागणे सर्वथा अशक्य आहे...
मग खच्चून एओ ची हाळी दिली...आणि माझ्या आरोळीपाठोपाठ आजूबाजूला झाडावर बसलेल्या वानरांनी एकच आवाज करायला सुरुवात केली. त्यांच्या इशारेवजा चित्कारांनी अक्षरश नखशिखांत दचकलो. हुप्प्या वानरांचे ढालगज आवाज, त्यात काही चिरके आवाज असे करत इतका वेळ शांत बसेलेले अरण्य गजबजून उठले.
वानरांना थोडा वेळ देऊन पुन्हा एकदा आवाज टाकला. अर्थांत त्यांचा गोंधळ सुरुच होता. पण त्या कोलाहलातही मला कुठून तरी लांबून अमेयचा आवाज ऐकू आला.
अरे तु आहेस कुठे....
बोंबला..आता कुठे आहे ते कसे सांगणार...मी आपला सांगतोय की मी पुढे आलोय...पण त्याला कितपत कळले हे सांगता येईना. आता मला धीर धरवेना..ज्या दिशेने आवाज आला, त्याच दिशेला किल्ला होता. त्यामुळे मी मूळ वाट सोडून भस्सदिशी झाडीत घुसलो. जशी वाट मिळेल तसे भराभरा जात बरेच अंतर पार केले पण जंगल काय संपायचे नाव घेईना. पुन्हा एकदा आवाज दिला पण काही उत्तर नाही. पुन्हा एकदा आंधळेपणाने मुसंडी मारली आणि धक्का म्हणजे मी एका कातळापाशी आलो. बहुदा हाच किल्ला असावा...पण आजूबाजूने कुठेच वाट दिसेना...आणि आता झाडी इतकी वाढली होती, वेली, खुरटी झुडपे की एक पाऊल पुढे टाकणे अशक्य व्हावे....
आशिष फडणीस तुम्ही हरवले आहात....मी मोठ्यांने बोललो. पुन्हा एकदा स्वप्नील, अमेयला हाळी देऊन झाली. पण काही उत्तर नाही...
आता मात्र मला परिस्थितीचे गांभिर्य जाणवायला लागले. मी कुठल्या वाटेने आलो हे नक्की आठवत नव्हते...कुठेही कसाही घुसत आलो होतो त्यामुळे आल्या त्या वाटेला लागणे हे देखील सोपे नव्हते आणि त्या वाटेला लागल्याशिवाय गाडी गाठणे अशक्य होते.
थोडा वेळ तिथेच बसलो..पाणी प्यालो..जरा शांत डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न केला...(हे महत्वाचे होते...घाबरून गेल्याने काहीच करणे शक्य नसते झाले) माकडे आवाज करतायत का ते कान देऊन ऐकले...त्या दिशेने जाऊन वाट सापडली असती. पण आता ती इतका वेळ दंगा करून गपचिप बसली होती. आलो त्या वाटेने चालायला सुरुवात केली पण कुठेही काही ओळखीचे चिन्ह दिसेना...वर बघावे तर झाडांचे आच्छादन..आता तर किल्लाही कुठे दिसत नव्हता. च्यामारी....
पुन्हा एकदा हाळी दिली आणि कल्पना सुचली...जोरजोराने हाळ्या देत...हातात दगडे घेऊन ती झाडीवर फेकत धावायला सुरुवात केली. कुठेतरी माकडे असतीलच आणि ती पुन्हा ओरडायला लागली की मग दिशा सापडेल ही आशा होती. आणि ती बरोबर ठरली...डाव्या दिशेने लांबवर माकडांचे समूहगायन सुरु झाले होते. बहुदा हा तो आपला कळप असावा...(हो ना दुसराच कळप बोंबलू लागला असता तर मग आणखी पंचाईत)
पण सुदैवाने तीच माकडे होती कारण साधारण १५-२० मिनिटे चालल्यावर मी एकदम मोकळ्यावर आलो आणि तिथून वाट अगदी हाताच्या अंतरावर होती. अर्थात मी जिथून झाडीत घुसलो होतो ती जागा ही नव्हती पण किमान मी आता वाटेला लागलो होतो. इथून आलो त्या दिशेने चालल्यावर मला किमान गावात तरी पोहचता येणार होते. अक्षरश तिथून धावत सुटलो आणि काही मिनिटात त्या शिल्पापाशी आलो. घामेजलेल्या अंगाने तिथे बसकण मारली आणि फोनला रेंज आहे का तपासले...आश्चर्य म्हणजे होती...आणि अमेयला फोनपण लागला...
"अरे आहेस कुठे तु बाबा?"...तिकडे त्यांचा काळजीने पापड झालेला..."आम्ही तुला आता शोधायलाच निघालो होतो. आम्ही आत्ता गडावर आहोत"
"मी आलोय तुम्हाला ते काळ्या दगडातले शिल्प लागले का?"
"नाही..."
"च्यायला मग मी चुकलो कुठे?"
"अरे खडकाळ वाटेने चालत रहा आणि एक मोठी वाट डावीकडे फुटते की लगेच पायर्या आहेत...".
आयला...मी रस्ता ऐकताना अशक्य घोटाळा केला होता म्हणजे...
मग त्याने सांगितलेल्या रस्त्यावर पुन्हा एकदा धावत सुटलो आणि काही मिनिटात पायर्यांपाशी....
तिथून मग सुपरफास्ट वेगाने गड चढला आणि गडदारातून प्रवेश केला तो अगदी ओल्याचिंब अंगाने....
कस्ला अनुभव....

मग पटापटा गडफेरी उरकली...

नक्की कुठे चुकलो होतो आणि तिथून कुठे गेलो असतो याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला...
गडाला अगदी जंगलाचा वेढाच पडलेला होता..सगळीकडे महामूर झाडी.

मग थोडे फोटोसेशन

चांगला सणसणीत साडेपाच फुटी नागोबा असणार....आख्खाच्या आख्खा कातीतून पसार झालेला

परतीची वाट

या गडाचा इतिहास तसा फारस नाही...तांबूळवाडीकर सांवत आणि हेरेकर सावंत यांच्या ताब्यात काही काळ गड होता. पण मराठी माणसाचे लाडके दैवत पुल देशपांडे यांच्या पूर्वजांकडे या गडाची किल्लेदारी होती असा उल्लेख आहे...
संपूर्णपणे जांभ्या खडकात बांधलेला हा किल्ला अजूनही खणखणीत आहे...गडावर वॉच टॉवर आहे तिथून प्राणी निरिक्षण करत असावेत....एमएससीबीचा एक टॉवर आणि त्यांचे बरेचसे सामानही आहे गडावर....एक ऑफीसपण आहे....सिंहगडसारखे

आता शेवटचा किल्ला....महिपालगड...
या गडावर तर अजिबातच बांधकाम शिल्लक नाही...एक तुटका फुटका बुरुज आहे मात्र...

सायंप्रकाशात न्हायलेले महिपालगाव

एक वेगळ्या शैलीतली विहीरही आहे...पण तिथे जाईपर्यंत खूप उशीर झाला होता आणि माझ्या बॅटरी संपत आलेल्या कॅमेराने फ्लॅश टाकण्यास नकार दिल्याने अगदी खराब फोटो आले....

मग तिकडून आलेल्या रस्त्याने परत जाण्याऐवजी आणखी खाली बेळगावकडे गेलो आणि तिथून हायवेने रात्री सुसाट गाड्या मारत कोल्हापूरला पोचलो...प्रत्येक मोहीमेची सांगता आयस्क्रीमने होणे हा शिरस्ता पाळत एवढ्या उशीरा सुरु असलेले एक दुकान शोधून काढले...आणि आमच्या काकांकडे जाऊन पड्या टाकल्या...

दुसरे दिवशी घराच्या ओढीने कुठेही न थांबता कोल्हापूर - पुणे अंतर केवळ साडेतीन तासात पार करत ठसठसणारा पार्श्वभाग घेऊन घरी प्रवेशता झालो....

संपूर्ण

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सफर, आशुचँप..
प्रकाशचित्रे Happy

आशिष ,

तुझे मायबोलीवरील आणि ब्लोग वरील लिखाण मी नेहमीच वाचतो
छान लेखन शैली आणि प्र. ची .
वाचताना तुमच्या बरोबर हिंडल्या सारखे वाटते.
योग आला तर तुमच्या बरोबर एकदा ट्रेक जरूर करीन.

दिनेशदा - तुमच्याच प्रतिसादाची वाट पाहत होतो. आता कसं बरं वाटलं....:)
हो खूप दिवस, किंबहुना महिने लावले शेवटच्या भागासाठी....
आत्ता खरे मी दक्षिण कोकण भटकंतीवर मालिका सुरु करणार होतो पण तेवढ्यात लक्षात आले की अजून कोल्हापूर मालिका पूर्ण नाही केली. गेल्या वर्षीच्या जानेवारीत केल्यामुळे काही संदर्भ स्मरणातून निसटले पण काही प्रसंग असे असतात की आपण विसरूच शकत नाही...
आता दक्षिण कोकण लवकरच टाकीन म्हणतो...

थोडा आर्टीस्टिकपणा >> सुंदर आहे Happy
...काहीतरी चुकले आहे ..... मग खच्चून एओ ची हाळी दिली... कस्ला अनुभव ..>> हे वाचुन अंगावर काटा आला.
तुझी अवस्था काय झाली असेल Sad
पण भटकंतीत अस हरवुन सापडायला पण वेगळीच मजा असते. ( मला मजा लिहायला काय जातय) नुस्त्या कल्पणेन घसा कोरडा पड्तोय. महान आहेस तु Happy

अरे, सुरुवातीला माझी पण थोडा वेळ तंतरली होती.
पण भटकंतीत अस हरवुन सापडायला पण वेगळीच मजा असते.
नक्कीच मी अशी मजा खूप वेळेस घेतली आहे

मस्त रे. Happy

ती सापाची कात आहे म्हणुन फोटोसेशन सुचतय.
एवढा मोठा नागोबा बघितल्यावर कढी पातळ होइल Proud

मस्त वर्णन......
घनदाट जंगलात एकट्याने रस्ता चुकणे हा अनुभव काय असू शकेल याची कल्पनाही करता येत नाही........ लकी आहेस नक्कीच.... पण यापुढे तरी असे अनाठायी धाडस करु नये असे वाटले (काळजीपोटी).

ती सापाची कात आहे म्हणुन फोटोसेशन सुचतय.
एवढा मोठा नागोबा बघितल्यावर कढी पातळ होइल
Proud Proud

http://www.maayboli.com/node/16164

पण यापुढे तरी असे अनाठायी धाडस करु नये असे वाटले (काळजीपोटी).
नक्कीच

धन्यवाद रैना Happy

गंधर्वगड नाही केलास का ? त्या बद्दल काही उल्लेख नाही ये.

पारगड मग कलानिधी आणि महिपालच दिसताय.

योगेश - हो अरे, गंधर्वगड नाही केला वेळेअभावी. आम्हाला त्याच रात्री कोल्हापूर गाठणे आवश्यक होते.

सई - हे पूर्वीच्या पिकासा मधून टाकलेले फोटो आहेत, नवीन सेटिंग्ज नुसार मलाही माहिती नाही कसे दिसतील ते. मला दिसत आहेत सगळे फोटो पण

मस्त! माहिती आणि फोटो दोन्ही छान. ते महिपालगांव अगदी चित्रातल्यासारखं देखणं आहे. ओळखीची गावंनावं वाचताना मस्त वाटलं.
चुकण्याचा अनुभव भितीदायक. आणि रेमडोक्याचा नाही रे, रेम्या डोक्याचा Wink