दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग - ४

Submitted by आशुचँप on 18 July, 2011 - 14:03

भाग १
http://www.maayboli.com/node/25815
भाग २
http://www.maayboli.com/node/25921
भाग ३
http://www.maayboli.com/node/26163

====================================================================

रांगणाई देवीचे मंदिर आणि दिपमाळ

रात्र अगदीच शांततेत पार पडली. मुक्कामाला छानसे मंदिर मिळाल्यामुळे टेन्ट उभारा, गुंडाळा भानगड वाचली होती त्यामुळे एरवीपेक्षा पटापट आवरून आम्ही किल्ला भटकंतीला सुटलो.

ही मारूतीची मूर्ती आहे का?

रांगणा किल्लाही चांगलाच आडवातिडवा पसरलेला आणि पार्टीसाठी येणारे लोक पाणवठ्याच्याच आजूबाजूला फिरणार. त्यामुळे छानपैकी झुडपे वाढलेली. त्यातूनच मार्ग काढत जावे लागते. नंतर नंतर तर झुडपे इतकी वाढली की रस्ताच मिळायला तयार होईना. पण स्वप्नील एक दिशा धरून चालत राहिल्याने आम्हीपण त्याच्या मागोमाग चालत राहीलो. वाटेत जवळपास प्रत्येक झुडपाने बरेच दिवसांनी कुणीतरी मिळाल्याच्या आनंदात मनसोक्त ओरबाडून घेतले. जवळ जवळ अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर हा सासुरवास संपला आणि जरा मोकळ्यावर आलो. मला खात्रीच होती की ही वाट चुकली होती आणि झालेही तसेच. येताना आम्हाला खरीखुरी वरिजिनल वाट सापडली.

हे काय होते देव जाणे

असो, आता आलोच आहोत तर किल्ला पाहून घेऊ म्हणून तंगड्या दुखेपर्यंत भटकत राहीलो. तसे आता किल्ल्यावर पाहण्यासारखे काही नाही. काही बुरुज आणि तटबंदी थोडीफार शाबूत आहे.

काही ठिकाणी तटबंदी राजगडच्या संजिवनी माचीप्रमाणे दुहेरी तटबंदीने संरक्षित केली आहे.

रांगणा किल्ला चहुबाजूनी घनदाट अरण्याने वेढला गेला आहे आणि ते किल्ल्यावरून पाहताना चांगलेच जाणवते. पण आणखी किती काळ हे हिरवे आच्छादन राहणार आहे देव जाणे.

जितके शक्य होते तितके भटकून पुन्हा मंदिरापाशी आलो. सॅक उचलल्या आणि आल्या वाटेने निघालो.
वाटेत पाणवठ्यापाशी थांबून आदले दिवशीच्या स्वयंपाकाची भांडी घासणे हे मोठे काम होते. आणि नेहमीप्रमाणे मी आणि रोहननी भांड्याचा ताबा घेतला. आम्ही दोघे मन लाऊन भांडी घासत असतानाच खालच्या गावातून एक मोठा ग्रूप आला. आल्याआल्याच त्यांनी साफसफाई करून जेवणाची तयारी सुरू केली. समिष भोजनाचा बेत होता हे दिसतच होते त्यातच मंडळी टाकूनच आली होती.
त्यांच्याबरोबर जेवायला बसायचे आमंत्रण नाकारत आम्ही भांडी स्वच्छ करून निघालो तोच एकाने नाही त्या चौकश्या करायला सुरूवात केल्या. उगाच कशाला वाद म्हणून आम्ही शांतपणे उत्तरे देत गेलो. आम्ही ट्रेकर असून असे सगळे किल्ले आमच्या खर्चाने बघत फिरतो एवढे त्याला कळले.
"आरीच्या, मग तुमास्नी आमच्या चुलत्यांचा नंबर देतो. ते रेल्वेत हायेत, तुम्हाला कंदीपण लागला तर बिनधास्त फोन लावायचा काय"
अरे वा, रेल्वेत ओळख असलेली कधीपण चांगली असे म्हणत मी लगेच कागद पेन काढला. काय नाव त्यांचं
आत्ता सांगतो, असं म्हणत महाशय मेंदूचा कानाकोपरा धुंडाळू लागले. Happy
"किशन्या, आमच्या चुलत्यांचं नाव काय रे लेका. आम्ही त्यांस्नी दादाच म्हणालोय ना. पर खरं नाव काय, भाड्या लवकर सांग, ते खोळंबलेत,"
"आरं तिच्या, तुझा चुलता काय *&^&^ मी त्याच नाव सांगाया, तुझा चुलता तुलाच ठावकी." Happy
"त्याचं काय आहे साहेब, आत्ता थोडीशी घेतलीये ना, मंग डोस्क अजिबात आउट होऊन जाता. तुमचा नंबर देऊन ठेवा, उतारली की आटवून लग्गीच फोन करतो."
अरे देवा, हे भलतेच प्रकरण होते. मग मनात येईल तो नंबर कागदावर लिहून, भलतेच नाव सांगून त्याच्या हातात ठेवला आणि तिथून सुटका करून घेतली.
पुन्हा एकदा तो अद्भुत रस्ता पार करून, हाडे खिळखिळी करत पाटेवाटीत पोहोचलो. आता वेध लागले होते गढींग्लजचे.

गढींग्लज हे माझे आजोळ. माझे आजोबा सावकारी करायचे पण त्यांच्या भोळ्या आणि तापट स्वभावामुळे ती सावकारी फारशी चाललीच नाही. पुढे बाबा आणि त्यांचे भाऊ नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडले आणि मग गावात कुणीच राहीले नाही.
सगळेच भाऊ कोल्हापूर, पुणे, बंगलोर इथे स्थायिक झाल्यावर आजोबांनीही राहते घर विकून उर्वरीत आयुष्य मुलांकडेच काढले. आज्जी (तिला आम्ही अक्का म्हणायचो) तर वयाच्या ९८ पर्यंत खणखणीत होती. विशेष म्हणजे माझ्या जन्माच्या आधी एक वर्ष ते घर विकून टाकले आणि इतक्या वर्षांत कुणीच फारसे फिरकले नव्हते. फडणीस घराण्याचा वंशज तर बहुदा पहिल्यांदाच. त्यामुळे मला जामच एक्साईट व्हायला झाले होते. जिथे माझे आजोबा, पणजोबा राहीले, माझे वडील, काका वाढले त्या जागी याची देही याची डोळा भेट देण्याच्या भावनेनेच मला एकदम नॉस्टाल्जिक करून टाकले होते.
अर्थात गढींग्लजला पोहचल्यावर मनातल्या कल्पनांचा पार अगदी चुराडा झाला. बाबांनी त्यांच्या आठवणी सांगताना आख्खे गाव माझ्या डोळ्यासमोर उभे केले होते. ते कसे शाळेत जायचे, घर कसे होते, गाव वगैरे आणि मला हे अजिबातच लक्षात आले नाही की या गोष्टीला किमान ३०-४० वर्षे उलटून गेली आहेत. मी आपले बाबांच्या आठवणीतले जुने गाव शोधत होतो आणि सामोरे आले ते शहरीकरणाच्या मार्गावरचे, कसेही वेडेवाकडे वाढलेले गढिंग्लज.
बाबांचे एक वर्गमित्र आमची वाट पाहत थांबलेले होते. त्यांना तर काय करू काय नको असे झाले होते. माझ्या बाबांनी कॉलेजमध्ये असताना कोल्हापूर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला होता. आता मी पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन चाललोय असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते. Happy
दरम्यान, गावात कसलीतरी जत्रा भरली होती. मग काय काकांना गुडनाईट करून आम्ही गावाची (गावाची आपली नावाला...पुण्याला चतुश्रुंगीची भरते तशीच काहीतरी) जत्रा अनुभवयाला निघालो. वाटेत मस्त चमचमीत चायनिजवर हात साफ केला आणि पुढे गेल्यावर दिसले थिएटर. पिक्चर लागला होता अजय देवगणचा दिल तो बच्चा है जी. असेही आता जेवण झाल्यामुळे सामानगडावर जाऊन फक्त पडीच टाकायची होती. त्यामुळे फारसा विचार न करता घुसलो. तिकीटाचे दर होते - स्टॉल १० रु आणि बाल्कनी २० रु. Happy
मल्टीप्लेक्सची सवय झालेल्या आम्हाला हा धक्काच होता. अर्थात गावाकडचे थिएटर म्हणजे त्याच दर्जाचे होते. पिक्चर सुरु झाला आणि जो शिट्या, आरडा-ओरडा सुरु झाला. अरे देवा...कानाची वाट म्हणजे तीन तासांनी काही ऐकू येईल का अशी शंका वाटायला लागली. एकतर ९ ते १२ चा शो, त्यातून चुंबनसम्राट इम्रान हाश्मी...मग काय विचारता, कॉमेंटसना तर उत आला होता, हे व्हॅल्यू एडीशन आम्ही पिक्चरपेक्षा जास्त एन्जॉय केले. Happy
रात्री सामानगडावर जाताना पुन्हा एकदा अपघात होता होता वाचला. उस गाळपाचे दिवस असल्याने सतत ट्रक आणि ट्रॉल्या भरून उसाची वाहतूक सतत सुरु होती. असाच एक ट्रॅक्टर समोर आला. त्याला नेमके पुढच्या बाजूचे लाईट मला अगदी डोळ्यावर आले आणि त्यामुळे त्या ट्रॅक्टरच्या मागची ट्रॉली किती पसरलीये याचा अंदाजच आला नाही. उसाची कांडकी ज्यावेळी हाताला आणि सॅकला घासली तेव्हा एकदम मला धक्का बसला. थोडक्या अंतराने मी बाजूला होतो अन्यथा आंधळेपणाने जाऊन ट्रॉलीलाच धडकलो असतो. बापरे, हे लक्षात येताच पायातले एकदम त्राणच गेले. कालचा तो झोपेचा किस्सा आणि आता हा यामुळे माझा गाडी चालवायचा कॉन्फिडन्सच गेला. Sad
शेवटी अमेयने माझी बाईक घेतली आणि मी रोहनच्या मागे बसून सामानगड गाठला. तिथल्याच एका देवीच्या नविनच बांधलेल्या सभामंडपात पथार्या टाकल्या आणि पुढील प्रवास सुरक्षित होवो अशी प्रार्थना करत डोळे मिटले.
क्रमश:
http://www.maayboli.com/node/29881 भाग ५

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग अगदीच थोडक्यात आटोपलाय...आणि प्रचिपण कमी आहेत त्याबद्दल माफी असावी...
पुढच्या भागात याची कसर भरून काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल. Happy

हा भाग पण आवडला.

बाकी 'यामुळे माझा गाडी चालवायचा कॉन्फिडन्सच गेला.' >> सांभाळुन.

आशु, हाही भाग मस्त रे Happy

बाकी 'यामुळे माझा गाडी चालवायचा कॉन्फिडन्सच गेला.' >> सांभाळुन.
आशु, बाबांनो, असे रात्री-अपरात्री नका गाड्या चालवत जाऊ!>>>>>अनुमोदन.

आशू, हाही भाग चांगलाच वठलाय. तूला झोपेबद्दल मुद्दाम सांगावेसे वाटतेय (त्या दिवशी संभाजी पार्कात पण, तूला झोप अनावर झाली होती). मला वाटतं तूला पुरेशी झोप एरवीही मिळत नाही. रात्री जेवल्यानंतर दिडेक तासाने, दम लागेपर्यंत व्यायाम करुन झोप घेऊन बघ. सकाळी मस्त ताजेतवाने वाटते.
आता वयाचा भाग आहे म्हण, पण मला पाच तासाची झोप पुरेशी होते. माझी रोजची झोप तेवढीच असते.

दिनेशदा माझे रात्रीचे जेवण साधारणपणे १२-१२.३० ला होते. त्यानंतर दीड तासाने म्हणजे दोन वाजता मी व्यायाम करायला लागलो तर घरच्यांना भलत्याच शंका येतील हो...
तरी पण उपाय वेगळा वाटतोय आज करून पाहतो.

आणि त्या दिवशी संभाजी पार्कात मला पित्त झाल्यामुळे जांभया येत होत्या. ते पण एक मला विचारायचे होतेच की मला पित्ताचा त्रास झाला की जांभया यायला लागतात. का ते कारण माहीती नाही.

हा ही भाग छान लिहला आहेस Happy
प्रचि ही सुंदर...

त्या मुर्ति हनुमानाच्याच असाव्यात.

जरा सांभाळुन ट्रॅक करत जा लेका! वचतानाच कळजी वाटते.

..आणि आता पावसाळ्यातल्या भ्रमंत्या जर मोसावरुन असतील तर आणखी जपून रे बाबा! फोटो नि लेख भारीच.. लई फुटेज खातो पन तू..

हेमू, अरे मी जपूनच चालवतो गाडी...आता पाठोपाठ अशा घटना घडल्या म्हणून तुला किंवा सगळ्यांनाच असे वाटतेय...पण मी कधीच रॅश ड्रायव्हिंग करत नाही...

फुटेजचे काय नाही रे...खरंच आता वेळ होत नाही...कामाचा लोड खूप वाढलाय...