गाथाचित्रशती लेखन स्पर्धा .विषय क्र.१ -जो जीता वोही सिकंदर

Submitted by ambar on 17 August, 2012 - 00:35

आत्ता आत्ताच घडल्यासारखं आठवतंय सगळं अगदी तारखेसकट
१ जुन १९९९३
माझा बारावीचा रिझल्ट. सकाळी ११ वाजता कॉलेजमध्ये समजणार होता, १० वी नंतरची २ वर्ष आठवत होती. मनाविरुद्ध कॉमर्सला टाकल्यामुळे २ वर्षात काहीही अभ्यास केलेला नव्हता. आमच्याच शाळेतल्या ज्यूनियर कॉलेजला असल्याने फक्त ''पूर्वसंचिताच्या ''जोरावर ११ वीला नापास न होता १२वीत दाखल झालो होतो. पण परत अख्या वर्षभर अभ्यासाला हातही नव्हता लावला.पण एखाद्या भाविकाने न चुकता देवळात जावं तेवढ्याच ; खरंतर त्याहून जास्त श्रद्धेने जवळपास रोज कुठूनही ५-१० रुपये जमवून morning /matinee टाकत होतो. बरोबरच्या १५-२० मित्रांबरोबर अगदी कुठलेही टुकार चित्रपट पण एन्जॉय करत होतो. आणि बेफिकीरीत अगदी त्याच दर्जाचे पेपरही देउन टाकले होते. आणि गंमत म्हणजे त्याचे काहीही वाईट वाटत नव्हते. तरीही निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता होतीच. सकाळी लवकर कॉलेजला पोचलो तर समजलं निकाल ३ वाजता लागेल. आम्ही २-३ मित्र लगेच पिक्चर शोधायला लागलो. निलायमला ऋषी कपूर, शाहरुखचा 'दिवाना ' सुपरहिट चालला होता .खरंतर पाहायचा राहूनही गेला होता,पण तेवढ्यात लक्ष्मीनारायणला ''जो जीता वोही सिकंदर ''लागल्याचं समजलं. आमीर खान पहिला Choice !!चला..आमच्या सायकल्स सातारा रोडच्या दिशेनी निघाल्या.
इंटरवलपर्यंत आमीर खानच्या खोड्या पाहून वयाला साजेसं हसुनही घेत होतो, त्याच वेळी दुपारच्या निकालाची प्रतीक्षाही लागून राहिली होती. इंटरवल नंतर सगळंच बदललं , आमीर खान भावाच्या अपघातानंतर एकदम जवाबदार झाला,भावाची,वडिलांची काळजी घ्यायला लागला , वडिलांच्या सायकल रेस जिंकण्याच्या स्वप्नाला स्वतःचं स्वप्न मानून बाकी सगळं विसरून स्वतः मध्ये १८० डिग्रीत बदल करून मेहनत करायला लागला. आणि फायनली रेस जिंकला...पिक्चर संपला . बाहेर आलो ३ वाजले होते. पटकन कॉलेजला पोचलो, आणि २ वर्षात पहिल्यांदाच रिझल्टचं प्रचंड टेन्शन आलं. प्रचंड धाकधुक वाढलेली असतानाच मार्कलिस्ट हातात आली.. नको होता पण मनातून कुठेतरी अपेक्षित होता असाच निकाल. आयुष्यात पहिल्यांदाच नापास ...क्षणात हताश झालो.सगळे मित्र पास आणि मी ?लहानपणापासून चांगल्यापैकी हुशार समजला जाणारा ,मुख्य म्हणजे कधीही नापास न होणारा नापास?? कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच हा निगरगट्ट माणूस ढसाढसा रडत होता. अख्या वर्गातले एकूण एक मित्र मला धीर देत होते.मला फक्त आई बाबांचा चेहेरा दिसत होता.त्यांना काय वाटेल? काय म्हणतील ?आता काय करायचं ..आत्महत्या करायचं डेअरिंग नाही होणार मग काय कोणालाही नं सांगता कुठेतरी लांब निघून जायचं??
पण त्याच वेळी आमीर खानचा जो जीता मधला ComeBack आठवला .आणि ठरवलं शिस्तीत घरी जावून सगळं खरं सांगायचं,बघू तरी काय होतंय ?पण पळून न जाता आमीर खान सारखाच ComeBack करायचा हे नक्की .पिक्चर मधल्या त्याच्यात आणि आपल्यात खुप गोष्टी कॉमन आहेत. अगदी सायकलसकट ...धीर करून घरी जावून खरं सांगितलं . कोणीच काही बोललं नाही ते पाहून जास्तच घुसमट झाली.रात्री उशिरापर्यंत जागाच होतो ,पहाटे कधीतरी झोप लागली . सकाळी उठल्यावर कोणाशीही काहीही न बोलता आमच्या कारखान्यात गेलो. निमुटपणे जे मशीन मोकळं दिसलं त्याच्यावर काम सुरु केलं. घरून पैसे घेणं बंद केलं. (मागितले असते तरी मिळायची खात्री नव्हती ). पण येताजाता इतर लोकांचे टोमणे खातच होतो ,अगदी कारखान्यात वडिलांच्या हाताखालच्या कामगारांचेही.
पहिला गुरुवार आला ,आठवड्याची सुट्टी परत एकट्याने जावून ''जो जीता'' पाहिला , आणि नंतर कांय चांगलं करु शकतो हे चक्क लिहून काढलं.
आणि मग ठरवलं बास.. आता काहीतरी मोठं करून दाखवायचं तरच आपण आपल्या विषयीचे समज दूर करु शकतो.सकाळी उठलो की आमीर खानचं सायकलिंग डोळ्यासमोर आणायचो.
220px-Jo_Jeeta_Wohi_Sikandar_1992_DVD_cover.jpg
अभ्यासाकरता काकांकडे राहायला गेलो ,चुलत बहिण Pregnent असतानाही तिने अभ्यास घेतला , परीक्षा दिली पास झालो. BMCC कॉलेजला Admission मिळवली . पण त्याचवेळी ठरवलं होतं ,आता हे शिक्षण फक्त दुसऱ्यांना दाखवायला , आपण मास्टर मात्र ' बिझनेस 'मध्ये व्हायचं. १ जुन २००३ ला आपल्याला बोललेल्या लोकांनी इतरांना आपलं उदाहरण द्यायला पाहिजे .
मग चालू झाली खरी धावपळ….
रोज सकाळी उठून कॉलेजला हजेरी लावून कंपनीत जायचो ते संध्याकाळी उशिरा घरी. परत नाईट शिफ्टला सुपरव्हीजन करायला जायचो ते थेट १२.३० घरी यायचो. पण ह्यात एकही दिवस आमीर खानच्या प्रयत्नांची आठवण झाली नाही असं झालंच नाही. कधी कधी तर स्कूटर चालवतानाही आमीर खानसारखी रेसर सायकल चालवल्यासारखा स्वतःलाच भास व्हायचा.कधी कधी खुप हेक्टिक व्हायचं पण नेटाने प्रयत्न करत गेलो,कामाच्या बाबतीत वडिल सांगतील ते ऐकत राहिलो .कारण फक्तं १च ''जो जीता वोही सिकंदर''.....
हळू हळू इमेज बदलत गेली,रिझल्ट मिळायला लागले. सायकलवरून स्कूटर,स्कूटरवरून बाईक ,बाईकवरून गाडी कधी हातात आली ते कळलंही नाही.बघता बघता १० वर्ष कशी गेली हेही समजलंच नाही.मधल्या काळात एकिकडे Graduate झालो ,त्यातून वाढलेल्या Confidence च्या जोरावर Management मध्ये Post Graduation पण करून झालं होतं .ज्या दिवशी Degree मिळाली त्या दिवशी अक्षरशः आमीर खान जसा रेस मध्ये जिंकल्यावर करंडक उंचावतो तस्सच वाटल ..आता कधीतरी विचार करायला लागलो की गंमत वाटते .
त्या दिवशी आमीर खानच्या ऐवजी ''दिवाना ''बघायला गेलो असतो तर पुढच्या काळाकरता ,कामाकरता जे Inspiration मिळायला पाहिजे होतं ते कुठून आणणार होतो कांय माहिती ..पण मग वाटतं वो सब गया जहन्नुम में ''जो जीता वोही सिकंदर''!!!
--समाप्त ----
मित्रहो असं काही तरी येवढ् सार्वजनिकरित्या शेअर करायची सवय नाहीये मला.लिखाणात काही चुका दिसल्या असतील तरी गोड मानून घ्या अर्थात येवढं सगळं वाचलं असेल तर तुमच्या कडे दुसरा पर्याय नाहीये ह्याची संपूर्ण जाणीव आहे मला Wink
लिखाणाची संधी दिल्याबद्दल प्रिय मायबोली आणि अजय गल्लेवाले ह्यांचे मनापासून आभार ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा,ललिताप्रिति,दीपांजली ,अभिषेक,मंजिरी,इंद्रधनुष्य ,आगाऊ,साजिरा,दिनेश्,माधव्,पौर्णींमा,रुणुझुणू,हिम्सकुल्,विशाल्,नीलुताई,गुरुकाका-एकदम येवढ्या छान प्रतिक्रिया येतिल ह्याचा खरच अन्दाज नव्हता मला.मनापासुन आभार. हर्षल-धन्यवाद अरे अजुनही लिही कि मित्रा मी काही चित्रपटाचा कॉपीराइट नाही घेतलेला Wink

ग्रेट!! Inspiration चा स्त्रोत चित्रपटामध्येही असु शकतो हे जितकं खरंय तितंकच तुला inspired व्हावंस वाटलं हे खूप छान आहे!

एखाद्या हिन्दी सिनेमामुळे माणसात काही पॉझिटीव्ह इन्स्पिरेशन येऊ शकते याचे आश्चर्य वाटले आणि आनन्दही झाला.....

बहुतेकांच्या आयुष्यात असा एक क्षण येतो (आणि यावाच) जो पुढचं आयुष्य बदलून टाकतो. काहींच्य लवकर येतो तर काहींच्या उशीरा. तुझ्यात तो योग्य वेळी आला. अभिनंदन..

Happy

एखादा चित्रपट आयुष्याचा चांगला 'टर्निंग पॉइंट' झाल्याचे अतिशय उत्तम उदाहरण.
अर्थात ह्यात चित्रपटाचा जितका हात आहे त्यापेक्षा तुमच्या जिद्दीचा आणि कष्टांचा हात आहे!

लेख अतिशय इंटरेस्टींग वाटला. त्याचं मुख्य कारण त्यातली साधी, सरळ भाषा, जणू काहीतरी आपल्या हृदयातलं रहस्य आपल्या बहीण-भावाला सांगतो आहोत असं सहजपण.
लेखातील अतिशय प्रामाणिक नायक. नको असलेल्या कोर्सला जावे लागल्यामुळं दोन वर्षं अभ्यास न करणारा, वर्षं वाया गेली तरी बेहेत्तर अशी आत्मघातकी प्रवृत्ती असणारा युवक चुकूनच पाहिलेल्या चित्रपटातील प्रभावी कथानकामुळे इतका बदलून जातो ही जाणीवच विलक्षण थरारवते.
या तुमच्या लेखातूनही मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. या साठीतल्या म्हाता-याचे तुम्ही शिक्षक ठरलात. त्यासाठी धन्यवाद.

अंबर मस्तच रे! कधी काय कसे इन्स्पिरेशन देऊन जाईल... जो जिता एक मिरर तुमच्या महत्वकांक्षेला मिळालेला आणि परिक्षेतील अपयश एक कारण ति जागी व्हायला!! पण कष्ट आणि सातत्य तुमचेच... आवडलेच हे लिखाण

ambar,

तुमच्या लेखनातला प्रांजळपणा आवडला. तुलनेने कमी वेळात बरंच काही शिकलात असं वाटतं. लगे राहो भाय! सत्य हे कल्पिताहून अद्भुत असतं हे तुमच्या कथनावरून अगदी पटलं. Happy

जोजिवसि मलाही आवडला. पहिल्यांदा बघितला तेव्हा हॉस्टेलचे मित्र सोबत होते. आम्ही कुचकटपणे काही चुका काढल्याच, ते सोडून द्या! तुम्ही जी प्रेरणा घेतलीत ती आमच्या गावीही नव्हती.

आ.न.,
-गा.पै.

ललितादेवी,

>> आधी 'पहला नशा'चा व्हिडियो शोधून टाकला होता. नंतर कधीतरी जाणवलं, की तो व्हिडियो नाही, तर
>> ऑडियो आपल्या जास्त आवडीचा आहे

या गाण्याची धून मलाही आवडते. कुठल्याश्या पाश्चात्य धुनीची नक्कल वाटते. पण इथे म्हंटलंय की ती राग कीरवाणीवर बेतलेली आहे (ctrl-F : kirwani). हेच तर कारण नसेल आपल्याला आवडायचं?

कुणी तत्ज्ञ प्रकाश टाकेल काय!

आ.न.,
-गा.पै.

सहीये! अगदी एखाद्या सिनेमाची स्टोरी असावी तशी वाटतेय तुमच्या आयुष्याची कथा. सिनेमात इतकी ताकद असते हे सिनेक्षेत्रात सगळ्यांना कळलं तर आपल्याला अजून चांगले सिनेमे मिळतील. :विशफुल थिंकिंग:

पहला नशा माझे पण फेवरिट गाणे. आयेषा फार फ्रेश दिसते. पूजा बेदी पीळ मारते. ही तेव्हा ग्लॅमरस वाटत असे? हर हर.

भ्रमर ,बाळू जोशी,मनी ,सन्दिपचित्रे ,नीलमपरी,मृदुल ,बस्के ,राधिका,बिनू ,राखी ,नताशा ,वेका ,फारएन्ड ,अश्विनीमामी ,श्री -धन्यवाद वाचुन उत्साह वाढवल्याबद्दल हेही मोठ ' इन्स्पिरेशनच' आहे माझ्यासाठी :)आभारी आहे.
प्रद्युम्नसन्तु -सर ,माझ्यामते ति वेळ माझ्या साठी खुप महत्वाची होती ,त्या वेळी मी खरच कुठल्याही दिशेला जावु शकत होतो,केवळ ''उपरवाले की मेहेरबानी ''आणी आई वडील काढत असलेल्या खस्ता जर डोक्यात नसत्या तर बरोबर उलट्या मार्गाने गेलोच असतो (मनाचा कल त्या बाजुलाच जास्त होता )ती वेळ निघुन गेली येवढच खर.त्यात माझा हातभार खरच कमी .ह्यातुन जर काही शिकला असाल तर तो तुमचाच मोठेपणा Happy
गामापैलवान -आपल्या ह्या पठठ्यावर अशीच धुळ पाखरत रहा .
विनय,जया ,योग-:)
मित्रानो -मी सध्या बाकीच्या जवाबदार्यामुळे नेट फार अ‍ॅ़क्सेस करु शकत नाहिये.त्यामुळे ह्या पुढील प्रतिक्रियाना उत्तर देण कदाचित शक्य होणार नाही.क्षमस्व

खुप छान लिहीले आहे.:)
सिनेमा प्रेरणादायक ठरला, पेक्षा आयुष्य बदलून जाणारे वळण आले अन त्याचा तुम्ही पाठपुरावाही केला. लिखाणासाठी अन मेहेनतीने आपले जीवन बदलून टाकण्या च्या जिद्दीसाठीही तुमचे कौतुक !! Happy

मस्त लिहिलय.

एकदा असंच हॉस्टेलमधे एकामुलीने आज दुपारी टीव्हीवर जोजिवसी लागणार आहे असं म्हणाली. दुसरीने जोजिवसी म्हणजे काय म्हणून विचारलं आणि पायावर कुर्‍हाड मारून घेतली. Proud त्यानंतर आम्ही तिने काहीही म्हटलं की "तुम तो बोलोही मत. तुम्हे तो जोजिवसी पता नही" हे ऐकवायचो. Happy

पहला नशा.. गाणं फराह खानने कोरीओग्राफ केलय, हे पूर्ण गाणं स्लोमोशनमधे आहे, आणि लिप सिंकपण स्लोमोशनमधेच आहे.

Pages