सर्वोकृष्ट `रिअ‍ॅलिटी शो’

Submitted by ललिता-प्रीति on 15 August, 2012 - 23:34

महिलांच्या पळण्याच्या कुठल्यातरी शर्यतीची (बहुतेक ४०० मीटर्स) एक प्राथमिक फेरी चालू होती. शर्यत सुरू होताच प्रेक्षकांचा सुरू झालेला गोंगाट हळूहळू वाढत गेला. स्पर्धक महिलांनी एक एक करून अंतिम रेषा ओलांडली. एकमेकींचं अभिनंदन केलं. ज्यांनी पात्रता निकष पूर्ण केले होते त्यांना कॅमेरावाल्यांनी घेराव घातला. शर्यत पूर्ण होताच प्रेक्षकांचा टिपेला पोहोचलेला टाळ्यांचा गजर थोडासा कमी झाला आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू झाला. आधी वाटलं, प्राथमिक फेरीतच एखादं रेकॉर्ड वगैरे मोडलं गेलं की काय; ते प्रेक्षकांच्या उशीराने लक्षात आलं की काय. पण नाही. कारण निराळंच होतं. शर्यत पूर्ण केलेल्या, थकल्या-भागल्या, कॅमेर्‍याला किंवा प्रेक्षकांना अभिवादन करणार्‍या धावपटूंवरून कॅमेरा एकदम पॅन झाला आणि पुन्हा एकदा ट्रॅकवर स्थिरावला. प्रथम तिथे कुणीच नजरेस पडलं नाही. नक्की काय प्रकार चाललाय--असं मनात येईपर्यंत ट्रॅकवरून धावणारी एक आकृती दिसली. कॅमेरा हळूहळू झूम-इन होत गेला आणि लक्षात आलं, की अजून एका धावपटूची शर्यत पूर्ण व्हायची होती. जरा आश्चर्यच वाटलं आधी. Faster, Higher, Stronger या शब्दांना लाजवेल अशा ऑलिंपिकपटूंच्या या तुफानी वेगाच्या युगात तो पळण्याचा वेग हास्यास्पद ठरू शकणारा होता. कॅमेरा अजून झूम-इन झाला. सोबत समालोचकाचे शब्द कानावर पडले. स्वतःला नखशिखांत कपड्यांत झाकून घेतलेली ती एक अफगाणिस्तानची महिला धावपटू होती; समालोचकानं तिचं नावही सांगितलं. प्रेक्षकांतून नव्या जोमानं टाळ्यांचा गजर सुरू झाला होता तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी, तिनं शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करावी यासाठी, हे लक्षात आलं आणि खरं सांगते, माझे डोळे भरून आले...
तिची शर्यत पूर्ण झाली होती. समालोचकानं माहिती पुरवली, की तिनं अफगाणिस्तानचा त्या शर्यतीतला राष्ट्रीय उच्चांक मोडला होता.

एक प्रेक्षक आणि क्रीडाप्रेमी म्हणून लंडन-२०१२मधली ही माझ्यासाठी सर्वात हृद्य आठवण!

क्रीडाक्षेत्रात राजकारण आणू नये या मताची मी पुरस्कर्ती आहे. पण मग वरच्या प्रसंगाला कुठल्या रकान्यात टाकायचं? प्रत्येकच शर्यतीत कुणी ना कुणी खेळाडू सर्वात मागे राहतोच. त्यात नवीन काही नाही. पण ती धावपटू अफगाणिस्तानची होती हा कळीचा मुद्दा होता. त्यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण होतं; बलाढ्य राष्ट्रांचा माज होता; त्यातले मतलबी डावपेच होते, कुरघोडीपणा होता. पण ते सर्व बाजूला सारून आज ती मायदेशी परतली असेल ती त्या टाळ्यांच्या गजराचं हृद्य संचित घेऊन.

लंडन-२०१२नं अशी किती किती अन्‌ काय काय संचितं देऊ केली संबंधितांना, त्याची गणती करणं कठीण आहे. ऑलिंपिक संपलं, की दरवेळी हीच एक भावना मनात भरून राहते.

संबंधित म्हणजे निव्वळ आयोजक, खेळाडू, प्रशिक्षक इतकेच नव्हे, तर इतरही बरेच जण. त्यांत तो पोरगेलासा तरूण स्वयंसेवक मुलगाही आला, जो युसेन बोल्टच्या लेनमधे त्याच्यासाठी बास्केट घेऊन उभा होता. बोल्टच्या डोक्यावरच्या टोपीनं त्याचं लक्ष वेधून घेतलेलं; त्यानं तसं बोल्टला सांगताच त्या पठ्ठ्यानं आपली टोपी त्या मुलाला लगेच भेट म्हणून देऊन टाकली. किती खूष होऊन तो दुसर्‍या दिवशी हे कॅमेर्‍यासमोर सांगत होता. हे त्या मुलाला मिळालेलं संचित, आयुष्यभरासाठीचं, की जगज्जेता होणं म्हणजे सतत तोर्‍यात मिरवणं नाही, तर त्यासोबत आपलं सर्वसामान्यपणही जपणं. महिलांच्या ट्रायथलॉन शर्यतीसाठी असेच एक साठी-पासष्टीचे आजोबा काम पाहत होते. ते स्वतः तरूणपणी विद्यापीठ पातळीवरचे ट्रायथलॉनपटू होते. नंतर काही कारणांनी त्यांना आपला खेळ पुढे चालू ठेवता आला नाही. पण त्यावरच्या प्रेमापोटी आता या वयात पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी होती. दिवस उजाडता उजाडता कामावर हजर झाले होते. खेळाडूंच्या सायकली एक एक करून आपल्या खांद्यावर उचलून त्यांच्या नियोजित जागी आणून ठेवत होते; पोटच्या पोराप्रमाणे त्या सायकलींची देखभाल करत होते; वार्ताहराला हे सर्व सांगताना अगदी मनापासून खूष होते. माझ्यासारखे पाहणारे त्यातून शिकत होते, की एखाद्या गोष्टीप्रति आपली निष्ठा व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असतात. त्यांत श्रेष्ठ-कनिष्ठ असं काहीही नसतं. श्रेष्ठ असते, श्रेष्ठ ठरते ती केवळ तुमची निष्ठा.

निष्ठा तर पदोपदी दृष्टीस पडतच होती. खेळाडूंच्या थकल्या-भागल्या चेहर्‍यांतून, त्यांच्या कपाळावरून गळणार्‍या घामातून, जिंकल्यावर, पदक गळ्यात पडल्यावर डोळ्यांतून नकळत ओघळलेल्या अश्रूंतून...
आणि हरल्यावरच्या निराश देहबोलीतूनही. चार वर्षं, पाच वर्षं, सहा, कदाचित सात-आठ वर्षं केलेली मेहनत डोळ्यांदेखत मातीमोल झालेली कुणाला पाहवणार? कारण ऑलिंपिक पदक, तिथला विजय हीच त्या मेहनतीची इतिश्री अशीच शिकवण सर्वांना मिळालेली.

या ऑलिंपिक पदकाचीही एक निराळीच मजा असावी. ते कमावणं कठीण हे तर खरंच, त्याहूनही कठीण असावं ते टिकवणं. नाहीतर चीनचा लिन डान बॅडमिंटन एकेरीचं सुवर्णपदक कायम राखण्यात यशस्वी झाल्यावर रॅकेट टाकून, कोर्ट सोडून, वाघ मागे लागल्यागत सैरावैरा पळत सुटला नसता. एखादा सामना, एखादी शर्यत जिंकल्यानंतर होणारा हा वैयक्तिक किंवा सामूहिक जल्लोष, त्यातल्या आनंद व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या तर्‍हा, त्यातली उस्फूर्तता मला फार म्हणजे फार भावते.

रशियाची जिम्नॅस्ट आलिया मुस्तफिना. सांघिक जिम्नॅस्टिक्स्‌मधे आपलं सुवर्णपदक थोडक्यात हुकणार आहे हे सर्वप्रथम तिनं ओळखलं होतं. कितीही प्रयत्न केले तरी तिला आपली निराशा लपवता येत नव्हती. कॅमेरा पूर्णवेळ तिच्यावरच स्थिरावलेला होता. निकालांवर शिक्कामोर्तब झालं आणि आपल्या कोचच्या कुशीत शिरून तिनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तीच आलिया मुस्तफिना एक आठवड्यानंतर वैयक्तिक स्पर्धाप्रकारात Uneven Barsचं सुवर्णपदक लीलया घेऊन गेली. त्यावेळचा गालातल्या गालात हसतानाचा तिचा चेहरा अजूनही डोळ्यांसमोर आहे माझ्या. जणू स्वतःलाच तिनं एक सडेतोड उत्तर देऊ केलं होतं. तिचे वडील १९७६च्या मॉण्ट्रियल ऑलिंपिकमधले पदकविजेते कुस्तीगीर. काय वाटलं असेल त्यांना आपल्या लेकीला पदक स्वीकारताना पाहून? १९७६ आणि २०१२ यांमधल्या फरकांची त्यांच्या मनात, घरात, बोलण्यात उजळणी होत असेल का? मग "आमच्यावेळेला असं नव्हतं" या प्रकारचे संवाद त्यांच्या घरातही झडत असतील का?

पण, सहभागी खेळाडूंच्या घरातच नव्हे, तर टेलिव्हिजन प्रेक्षक म्हणून आपल्या घरांतही असे संवाद घडावेत इतके बदल ऑलिंपिक खेळांत होत आलेले आहेत. मला यावेळी हे फार जाणवलं. त्यातला सर्वात पहिला घटक म्हणजे टेलिव्हिजन कॅमेर्‍यानं दाखवलेली कमाल. जमिनीलगत खेळाडूंच्या पायाशी, ते थेट त्यांच्या डोक्यावर दहा-पंधरा फुटांच्या उंचीवर, हे कॅमेरे जिथे-तिथे होते. एकही क्षण, एकही कोन, खेळाडूची बारीकशी एकही हालचाल त्यांच्या नजरेतून सुटण्यातली नव्हती. एखाद्या खेळाडूनं गळ्यात काय घातलंय, कुणाच्या हातात कुठलं घड्याळ आहे, कुणी नखांना कुठलं नेलपॉलिश लावलंय, त्यात त्यांच्या देशाच्या झेंड्याची नक्षी आहे, की अजून कशाची, एखाद्या खेळाडूच्या गणवेषावरचा त्याच्या देशाचा चिटुकला झेंडा, त्या झेंड्यातले रंग, आकार, डोळ्यांचा रंग, केसांचा रंग, अगदी सगळं या कॅमेर्‍यांनी लख्ख आणि स्वच्छपणे टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवलं. वेटलिफ्टर्सचे वजनं उचलतानाचे चित्र-विचित्र चेहरे, जलतरणपटूंच्या पाण्याखालून टिपलेल्या हालचाली, व्हॉलीबॉलला मारलेल्या थपडा, बास्केटच्या रिंगवरच घोटाळणारा, आत जाऊ की नको या विचारात हरवलेला बॉल, सगळंच प्रेक्षणीय झालं. बॉक्सिंग रिंगच्या बाहेरची किंवा अ‍ॅथलेटिक्सच्या ट्रॅकच्या आतल्या बाजूला ठेवलेली सोनेरी घंटा इतकी सुंदर आधी कधीही दिसली नव्हती. कॅनो-स्लालोमचं खळाळतं पाणी, ईटन डॉर्नी इथलं शांतपणे पसरलेलं पाणी, हाईडपार्कमधल्या विस्तीर्ण तलावातलं पाणी आणि अ‍ॅक्वेटिक सेण्टरमधलं ५० मीटरचं पाणी, चारही प्रकार एकमेकांपासून पूर्णपणे निराळे भासले.

पाण्यावरून आठवलं. स्टीपलचेसच्या शर्यतीदरम्यान खेळाडू जिथे अडथळ्यावरून पाण्यात उडी मारतात, तिथे एकजण अगदी जमिनीलगत कॅमेरा घेऊन बसलेला. मला चिंता त्याच्या कॅमेर्‍याची. तो पाण्याच्या इतक्या जवळ नेण्यासाठीच खास बनवलेला असणार हे माहित असूनही दरवेळी ते पाणी आलं, की माझं लक्ष पळणार्‍या खेळाडूंवरून त्या कॅमेर्‍याकडे जायचं.

असंच लक्ष वेधून घेतलं ते खेळाडूंच्या भडक पिवळ्या रंगाच्या बुटांनी, मोज्यांनी आणि खेळाडूंनी आपापल्या शरीराच्या दुखर्‍या भागावर लावलेल्या रंगीबेरंगी चिकटपट्ट्यांनी. त्या चिकटपट्ट्यांचे नुसते रंगच आकर्षक होते असं नव्हे, तर त्यांच्या चिकटवण्याच्या पध्दतीही वैशिष्ट्यपूर्ण होत्या. कशासाठी हे सारं? टी.व्ही.कॅमेर्‍यासाठीच, दुसरं काय! "आमच्या वेळेला असं नव्हतं"चा आमच्या घरातला एक अध्याय हा इथे झाला. मला आठवली अमेरिकेची फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर ऊर्फ फ्लो-जो. १९८८च्या सेऊल ऑलिंपिकमधे मेकअप वगैरे करून मैदानात उतरणारी, कॅमेर्‍याचं लक्ष अशा प्रकारेही वेधून घेणारी एकमेव खेळाडू. तिनं तिथे केलेले १०० आणि २०० मीटर्स धावण्याचे उच्चांक अजूनही अबाधित आहेत म्हणे.

एकदा ऑलिंपिक पार पडलं, की संबंधित खेळाडूंच्या जगभरच्या अन्य स्पर्धा, तिथली त्यांची कामगिरी यांच्याकडे आपण फारसं लक्ष ठेवत नाही. मग हळूहळू त्यांची नावं विस्मृतीत जातात. पुढल्या ऑलिंपिकमधे पुन्हा ते खेळाडू सहभागी असतील, तर ती नावं पुन्हा कानावर पडतात, मेंदूतल्या काही आठवणी ढवळल्या जातात. पीटर व्हान हुगेनबांड या हॉलंडच्या जलतरणपटूच्या बाबतीत माझं असंच झालं. बिजिंगमधे त्यानं फेल्प्सला तगडी टक्कर दिली होती. पण यावेळी तो कुठेच नव्हता. त्यामुळे समालोचकांनी त्याचा उल्लेख करेपर्यंत त्याचं नावही मला आठवलं नाही. तीच कथा इथियोपियाच्या तिरुनेश दिबाबाची. तिरुनेशला हरवून तिच्याच देशाची डेफार यावेळी ५००० मीटर्सच्या शर्यतीत विजेती ठरली आणि समालोचकाचे शब्द कानावर पडले - "She has finally come out of the shadow of Dibaba..." आम्हाला आपला सचिन आणि सौरवच्या कायमच सावलीत रहावं लागलेला राहुल तेवढा ठाऊक!! बाकी हे ‘शॅडो’ वगैरे प्रकरण प्रसारमाध्यमांनीच अधिक खतपाणी घालून वाढवलेलं असावं का? निदान मला तरी नेहेमी तसंच वाटत आलेलं आहे.

‘शॅडो’ प्रमाणेच अजून एक प्रचलित आणि प्रसिध्द शब्द म्हणजे ‘घोस्ट’. अथेन्समधे सुवर्णपदक पटकावलेला चीनचा ११० मीटर्स हर्डल्सचा धावपटू बिजिंगप्रमाणेच लंडनमधेही प्राथमिक फेरीतच बाद ठरला आणि तो ही अगदी एकसारख्याच नाट्यमय रीतिनं. दोन्ही प्रसंगी पहिला अडथळा पार करतानाच तो पडला आणि प्रसारमाध्यमांना ‘घोस्ट’ शब्द आठवला. दुखावलेला पाय वर उचलून एका पायानं लंगडी घालत मैदानाबाहेर जाताजाता तो अचानक वळला आणि तसाच लंगडी घालत ट्रॅक्सच्या कडेकडेनं शेवटच्या हर्डलपर्यंत जाऊन परतला. "How desperately he wants to reach that last haurdle..." पाहणारे हळहळले, चुकचुकले. मला मात्र त्यात ‘डेस्परेशन’पेक्षा नाटकीपणा अधिक वाटला.

Rhythmic Gymnastics आणि Synchronised Swimmingमधेही खेळाडूंच्या चेहर्‍यांवरच्या हावभावांमधे नाटकीपणा अधिक वाटला यावेळी. या दोन क्रीडाप्रकारांतली नजाकत, कलात्मकता, गेयता बाजूला सारली जाऊन तिथे निव्वळ तांत्रिकता वरचढ ठरताना दिसली. त्यामागे काहीतरी कारणं असतीलही. गुणांकनाच्या काटेकोर पध्दती म्हणा, तीव्र चढाओढ म्हणा. पण "आमच्यावेळेला असं नव्हतं" हेच शेवटी मनात भरून राहिलं, इतकं खरं.

Fencing या क्रीडाप्रकाराबद्दलही असंच काहीसं झालं. यातले खेळाडूंचे अंतराळवीराप्रमाणे भासणारे पोषाख अजूनही तसेच आहेत. पण पूर्वी त्यामागे एक लांबलचक दोरी बांधलेली असायची. खेळाडूंनी एकमेकांच्या हद्दीत फार पुढेपर्यंत जाऊ नये यासाठी असावी ती असा आम्ही आपला अंदाज बांधायचो. त्याजागी यावेळी लाल-हिरवे दिवे होते. खेळाडूंच्या पोषाखावर, त्यांच्या खेळायच्या हद्दीत सगळीकडे. काही एक विशिष्ट चाल अमलात आणली, की ते दिवे, ट्यूबलाईट्स, सगळं एक-दोन सेकंदांकरता प्रकाशमान व्हायचं. क्रिकेटमधल्या तिसर्‍या अंपायरप्रमाणेच तो त्या खेळातला तांत्रिक पैलू असावा. एकंदर गमतीशीर वाटलं ते पहायला. अंगावर दिवे वागवणार्‍या ‘सारा जमाना...’मधल्या अमिताभनंतर हेच की!

ती विशिष्ट चाल नक्की कुठली हे मात्र नाही तर नाहीच लक्षात आलं.

बाकी, नियम, डावपेच माहिती नसलेले खेळ, सामने पाहण्यात एक निराळीच मजा असते. सामन्यांदरम्यान नियमांबद्दल काहीएक अंदाज बांधणे, निष्कर्ष काढणे, ते चुकलेत हे लक्षात येताच अधिक बारकाईनं पुढचा खेळ पाहणे यात वेळ कसा जातो काहीच पत्ता लागत नाही. त्यापायी शेवटी स्कोअर काय, विजेता कोण हे जाणून घेण्याचं राहूनच जातं; पण खेळापेक्षा खेळाडू वरचढ न ठरण्याच्या प्रक्रियेचा आपणही एक कणभर वाटा उचलल्याचं जाणवून आत कुठेतरी समाधानही लाभतं.

आंतरिक समाधान हेच तर शेवटी महत्त्वाचं. क्रीडाप्रेमातून ते मला मिळतं. कुठल्याही स्पर्धात्मक क्रीडाप्रकारात कधीही सहभागी झाले नाही, तरी त्यातला थरार, ताण, अपेक्षापूर्तीचा आनंद, अपयशातलं दुःख, अपयशातून पुन्हा उभारी मिळवण्यासाठी लागणारी व्यक्तिमत्त्वातली जिगर, त्यामागची मानसिक आंदोलनं हे सारं मी टेलिव्हिजनच्या साहाय्याने अनुभवू शकते. ते अनुभवण्याची सर्वाधिक संधी मला ऑलिंपिकमुळे मिळते. जगाच्या कुठल्यातरी कोपर्‍यातले खेळाडू पदक स्वीकारण्याच्या वेळेस मंचावर एकत्र येतात, एकमेकांशी हस्तांदोलन करतात आणि मी शहारून उठते. तो शहारा त्यांच्या एकत्र येण्यासाठी अधिक असतो. दुखरा हात कसाबसा सावरत एखादी खेळाडू जिवाच्या आकांताने भालाफेक करते, वेदनेने तिथेच कोसळते आणि तिच्यासोबत मी देखील कळवळते. कोरियाचा सुन यांग अटीतटीच्या अंतिम शर्यतीच्या वेळी False Start करतो आणि या निष्काळजीपणाबद्दल मला त्याला जाऊन एक टप्पल माराविशी वाटते. अ‍ॅथलेटिक्समधल्या False Start करणार्‍या खेळाडूला थेट बाहेरचा रस्ता दाखवला जातो, मग जलतरणात तो नियम का नसावा याबद्दल मला पाठोपाठ अचंबाही वाटतो. घोडेस्वारीतल्या Jumping या स्पर्धाप्रकारात आधीच्या चार उड्या अगदी दिमाखात मारून प्रेक्षकांच्या भरघोस टाळ्या मिळवणारं एक घोडं पाचव्या उडीच्या वेळेस अडून बसल्यावर मी डोळ्यांत पाणी येईस्तोवर हसते. क्युबाच्या पोल-व्हॉल्टपटूच्या हातातला पोल अगदी ऐनवेळी तुटतो आणि तो दुखापतीपासून थोडक्यात बचावल्याचं पाहून मलाही हायसं वाटतं. वॉटरपोलोच्या खेळाडूंचे लहान बाळाच्या टोपड्यासारखे हेडगिअर्स्‌ पाहून मला मजा वाटते. त्यातल्या एका सामन्यादरम्यान एका संघाच्या नको इतक्या मधेमधे करणार्‍या प्रशिक्षकालाच रेड-कार्ड दाखवल्याचं ऐकून नियम बनवणार्‍यांचं मी मनोमन अभिनंदन करते.
ऑलिंपिक हे अशा प्रकारे मला आपल्यात सामावून घेतं. पण पंधरा दिवसांत आपला पसारा आटोपून मला माझ्या अन्य कामांची आठवणही करून देतं.

अजून एका ऑलिंपिकचा पसारा असाच आटोपलेला आहे. पुन्हा एकदा समस्त भारतीय क्रिकेटच्या कचाट्यात अडकतील. मी ही त्यातलीच एक असेन. दरम्यान रिओ-२०१६ची आतुरतेनं वाट पाहणं वगैरे काहीही होणार नाहीये हे मनोमन मी जाणून आहे. त्यात पुन्हा आपल्या आणि ब्राझिलच्या वेळेतल्या फरकामुळे ते कितपत फॉलो करता येईल हा प्रश्नही आहेच. पण ऑलिंपिक चळवळीला त्याची फिकीर करायचं कारण नाही. जगाच्या पाठीवर ती कुठेही जावो, अट्टल क्रीडाप्रेमी तिच्या मागेमागे त्याठिकाणी हजर असतीलच, खेळाडू म्हणून, स्टेडियममधले प्रेक्षक म्हणून किंवा माझ्यासारखे घरबसल्या आनंद लुटणारे टेलिव्हिजन प्रेक्षक म्हणून.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीलं आहेस ललिता. लेख आवडला. तुझी पॅशन आवडली.
आणि फॅशनकडे शक्य तितके दुर्लक्ष करणे हेही फार आवडले. Wink

झक्कास अन फ्रेश लेख. मस्त लिहिलंय.

>>त्यामागे आंतरराष्ट्रीय राजकारण होतं; बलाढ्य राष्ट्रांचा माज होता; त्यातले मतलबी डावपेच होते, कुरघोडीपणा होता. <<
नुस्तं इतकंच नव्हे. नखशिखांत कपडे घाल असा तालिबानी आदेशही होता, तरीही तिने खेळ सोडला नाही..

प्रिती

खुप आवडला लेख... खरच छान.... काही ठीकाणी वाचताना आवंढा आला..... खुप मस्त.... सगळ्या भावना पोहोचल्या....

अप्रतिम लिहीलं आहे ललिताजी! Happy

ऑलिंपिक मधे इतकं इन्व्हॉल्व झालियेस की तुलाच त्याबद्दल एक सुवर्ण पदक द्यावं Happy

सर्वच ओब्झर्वेशन्स सही आहेत.

>>Rhythmic Gymnastics आणि Synchronised Swimmingमधेही खेळाडूंच्या चेहर्‍यांवरच्या हावभावांमधे नाटकीपणा अधिक वाटला यावेळी. या दोन क्रीडाप्रकारांतली नजाकत, कलात्मकता, गेयता बाजूला सारली जाऊन तिथे निव्वळ तांत्रिकता वरचढ ठरताना दिसली<< ++१

तो अफगाणी मुलीचा सोहळा आठवतोय मलाही...

व्वा...ललिता जी.

सर्व प्रकारच्या देखण्या फुलांनी भरलेली परडीच समोर यावी आणि मन प्रसन्नतेने भरून गेल्यावर मग निवडून त्यातील 'हे घेऊ का ते घेऊ' अशा संभ्रमित अवस्थेत आपण बसतो, नेमकी तीच अवस्था माझी इतका सुंदर लेख [मनोगतच आहे] वाचताना झाली.

खेळातील हारजीत याहीपेक्षा त्यापलिकडे 'आणखीन्' काही असते हे जितके खरे तितकेच हेही खरे की त्याबद्दल इतके आससून लिहिणे सर्वानाच जमणार नाही, हेही तेवढेच सत्य, जे तुम्ही या प्रदीर्घ लेखात करून दाखविले आहे.

अफगाणिस्तान युवतीचा 'तसा' सत्कार प्रत्यक्ष टीव्हीवर मला पाह्यला मिळाला नाही, याचे आता मनस्वी दु:ख होत आहे, पण कधीनाकधी कुठून तरी ती क्लिप मी मिळविणे गरजेचे झाले आहे अशीच भावना मनी दाटली आहे याचे सारे श्रेय तुमच्या लेखणीला.

अथेन्स ऑलिम्पिक्समधील 'मॉडर्न पेन्टॅथिऑन' या इव्हेन्टमधील पाचपैकी चार गटात सर्वोत्तम कामगिरी करीत आलेल्या एका खेळाडूला त्यातील शेवटची ३ किमी.क्रॉस कंट्री स्पर्धा पूर्ण करता आली नव्हती [पहिल्या १००० मीटरमध्येच त्याचा पाय एका स्लोपवर मुरगळला आणि तो उठूच शकला नव्हता....], आणि नियमानुसार पाचही प्रकार पूर्ण न करू शकल्याने तो मेडलला अपात्र ठरला....ज्या स्लोपवर पडला तिथेच तो अगदी केजीमधील मुलासारखा धाय मोकलून रडू लागला. कारण त्याचे त्या खेळातील सुवर्णपदक जवळपास निश्चित होते. त्याची ती हतबलता पाहताना मन गलबलून गेले होते. मात्र दुसर्‍या दिवशी तिन्ही पदक विजेत्यांनी त्या हमखास विजेत्या खेळाडूला हॉटेलमध्ये गाठून त्याच्या गळ्यात तिन्ही पदके घातली आणि तो एक आगळा भावनाप्रधान असा 'पदकप्रदान' सोहळा ठरला होता.

ऑलिम्पिक स्मरणात राहते ते सोन्याच्या झळाळीमुळे नव्हे तर पडद्यामागील अशा काही आपुलकीच्या क्षणामुळे.

संग्रही ठेवावा आणि शाळेला जाणार्‍या सार्‍या पोरांना वाचायला द्यावा असा लेख आहे तुमचा....[हे मी करणार आहे.]

अशोक पाटील

पण, सहभागी खेळाडूंच्या घरातच नव्हे, तर टेलिव्हिजन प्रेक्षक म्हणून आपल्या घरांतही असे संवाद घडावेत इतके बदल ऑलिंपिक खेळांत होत आलेले आहेत. मला यावेळी हे फार जाणवलं. त्यातला सर्वात पहिला घटक म्हणजे टेलिव्हिजन कॅमेर्‍यानं दाखवलेली कमाल. जमिनीलगत खेळाडूंच्या पायाशी, ते थेट त्यांच्या डोक्यावर दहा-पंधरा फुटांच्या उंचीवर, हे कॅमेरे जिथे-तिथे होते. एकही क्षण, एकही कोन, खेळाडूची बारीकशी एकही हालचाल त्यांच्या नजरेतून सुटण्यातली नव्हती. एखाद्या खेळाडूनं गळ्यात काय घातलंय, कुणाच्या हातात कुठलं घड्याळ आहे, कुणी नखांना कुठलं नेलपॉलिश लावलंय, त्यात त्यांच्या देशाच्या झेंड्याची नक्षी आहे, की अजून कशाची, एखाद्या खेळाडूच्या गणवेषावरचा त्याच्या देशाचा चिटुकला झेंडा, त्या झेंड्यातले रंग, आकार, डोळ्यांचा रंग, केसांचा रंग, अगदी सगळं या कॅमेर्‍यांनी लख्ख आणि स्वच्छपणे टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवलं. वेटलिफ्टर्सचे वजनं उचलतानाचे चित्र-विचित्र चेहरे, जलतरणपटूंच्या पाण्याखालून टिपलेल्या हालचाली, व्हॉलीबॉलला मारलेल्या थपडा, बास्केटच्या रिंगवरच घोटाळणारा, आत जाऊ की नको या विचारात हरवलेला बॉल, सगळंच प्रेक्षणीय झालं. बॉक्सिंग रिंगच्या बाहेरची किंवा अ‍ॅथलेटिक्सच्या ट्रॅकच्या आतल्या बाजूला ठेवलेली सोनेरी घंटा इतकी सुंदर आधी कधीही दिसली नव्हती. कॅनो-स्लालोमचं खळाळतं पाणी, ईटन डॉर्नी इथलं शांतपणे पसरलेलं पाणी, हाईडपार्कमधल्या विस्तीर्ण तलावातलं पाणी आणि अ‍ॅक्वेटिक सेण्टरमधलं ५० मीटरचं पाणी, चारही प्रकार एकमेकांपासून पूर्णपणे निराळे भासले.
पाण्यावरून आठवलं. स्टीपलचेसच्या शर्यतीदरम्यान खेळाडू जिथे अडथळ्यावरून पाण्यात उडी मारतात, तिथे एकजण अगदी जमिनीलगत कॅमेरा घेऊन बसलेला. मला चिंता त्याच्या कॅमेर्‍याची. तो पाण्याच्या इतक्या जवळ नेण्यासाठीच खास बनवलेला असणार हे माहित असूनही दरवेळी ते पाणी आलं, की माझं लक्ष पळणार्‍या खेळाडूंवरून त्या कॅमेर्‍याकडे जायचं.
असंच लक्ष वेधून घेतलं ते खेळाडूंच्या भडक पिवळ्या रंगाच्या बुटांनी, मोज्यांनी आणि खेळाडूंनी आपापल्या शरीराच्या दुखर्‍या भागावर लावलेल्या रंगीबेरंगी चिकटपट्ट्यांनी. त्या चिकटपट्ट्यांचे नुसते रंगच आकर्षक होते असं नव्हे, तर त्यांच्या चिकटवण्याच्या पध्दतीही वैशिष्ट्यपूर्ण होत्या.

>>>>> सह्ही निरीक्षणं लले. मस्त लेख. अतिशयच आवडला.

आर्चरीतही प्रत्यंचा ताणल्यावर ओठ आणि नाक दाबलं जाऊन खुप मजेशीर मजेशीर चेहरे दिसत होते. बाण सोडल्यावर गाल डुलुडुलु हलायचे, धनुष्य टुपुकदिशी खाली पडायचं आणि हवेतून नागमोडी वळणं घेत गेलेला तो छोटुकला बाण स्वतःभोवती गोल गोल फिरत निशाण्यावर जाऊन घुसायचा हे ही खूप सुस्पष्ट दिसलं!

ललिता फारच मस्त लेख...

अजून काही भर घालण्यासारख्या गोष्टी..

पुरुषांची २० किमी चालण्याची स्पर्धा... त्यातला एक स्पर्धक अंतरराष्ट्रीय विजेता... तिसर्‍य क्रमांकानी धावत होता अचानक काय झाले कळालेच नाही आणि तो धाडकन बाजूच्या जाहिरात फलकावरच जाऊन आदळला... त्याच्यावरच कॅमेरा केंद्रीत होता कारण तो संभाव्य विजेता होता...

तलवारबाजीत जपानच्या खेळाडूचे कांस्य पदक हुकल्यावर २ तास तसेच बसून रहाणे... तलवारबाजीच्याच सांघिक लढतीतील प्रचंड चुरस

ऑस्कर पिस्टेरियस बरोबर शर्यतीचा विजेता असलेल्या खेळाडूने नावाची पट्टी आठवण म्हणून बदलून घेणे....
११० मी. हर्डल्समध्ये चीनचा स्पर्धक पडला आणि बाहेर गेला.. पण नंतर विजेत्यांनी त्याला धरुन बाहेर घेऊन जाणे..

फुटबॉलमध्ये परत एकदा ब्राझीलला सुवर्ण पदकाने हुलकावणी देणे... जसे काही रिओतच ते त्यांना मिळवायचे आहे...

महिला फुटबॉल जपान विरुद्ध फ्रान्स मधल्या उपांत्य सामन्यातली थरारक शेवटची वीस मिनिटे... जिवाच्या आकांतानी फ्रान्सच्या खेळाडूंचा प्रयत्न आणि त्यांना मिळालेली पेनल्टी किक कर्णधाराकडून चुकणे... इथे मला बेकहॅमच आठवला...

वेटलिफ्टींग मध्ये कित्येक जगज्जेत्त्या खेळाडूंना वजन उचलताच न आल्यामुळे त्यांची झालेली निराशा..

पुरुष बास्केटबॉल मध्ये अमेरिकेचे वर्चस्व आणि त्याला रशिया, स्पेन आणि लिथुयानियाच्या खेळाडूंनी दिलेली जोरदार टक्कर..

तिरंदाजीतल्या अत्यंत उत्कंठावर्धक लढती... जिंकतोय जिंकतोय वाटत असताना ७च गुण मिळाल्यामुळे हारलेले कित्येक स्पर्धक... आणि त्याच मोक्याच्या क्षणी परफेक्ट १० गुण मिळवून सुवर्ण पदक मिळवणारे खेळाडू...

महिला ट्रायथलॉन स्पर्धेचा शेवट... दोन्ही स्पर्धकांनी नोंदवलेली एकच वेळ पण केवळ फोटोफिनिश मध्ये लागलेला निकाल...

तलवारबाजी बद्दल थोडेसे अधिक...

एकूण तीन प्रकार आहेत.. त्यात वैयक्तीक आणि सांघिक लढती होतात...

१ . फॉईल - हलकी तलवार - धडावर कोठेही वार केला तरी चालतो (कंबरेच्या वर हात आणि डोके वगळून) - दुहेरी स्पर्श चालत नाही.. तलवारीच्या फक्त टोकानेच केलेला वार ग्राह्य धरला जातो

२. एपी - जड तलवार - पूर्ण शरीराव कोठेही वार केला तरी चालतो.. दुहेरी स्पर्श चालतो. - तलवारीच्या फक्त टोकानेच केलेला वार ग्राह्य धरला जातो

३. सेबर - हलकी व कापणारी तलवार - कंबरेच्या वर कोठेही वार चालतो.. (डोक्याचा मागचा भाग आणि हाताचा पंजा वगळून) - दुहेरी स्पर्श चालत नाही - तलवारीच्या टोकाने तसेच बाजूने केलेला वार ग्राह्य धरण्यात येतो

अधिक माहिती. http://en.wikipedia.org/wiki/Fencing

लले छान लिहिलयस. परवा बोलत होतो तेव्हा शंका आलीच Proud
पण भारताने पदक मिळवले तेव्हाचा एकही प्रसंग नाही?>>>> अगदी अगदी मला ही हेच आल मनात.

उत्तम लेख..खूप आवडला.
>>संग्रही ठेवावा आणि शाळेला जाणार्‍या सार्‍या पोरांना वाचायला द्यावा असा लेख आहे तुमचा...<<
अगदी..अगदी..

उत्तम लेख... Happy

ऑलिम्पिक स्मरणात राहते ते सोन्याच्या झळाळीमुळे नव्हे तर पडद्यामागील अशा काही आपुलकीच्या क्षणामुळे. > +१

फारच डिट्टेलमधे पाहिलेलं दिसतंय ऑलिंपिक!

मला जाणवलेल्या १/२ गोष्टी!

१. या ऑलिंपिकचे बहुतेक सर्व स्वयंसेवक स्वखर्चाने आले होते. ऑलिंपिक सुरू व्हायच्या आधी ४/५ वेळा लंडनमधे त्यांना ट्रेनिंगसाठी जावं लागलं. दुपारच्या जेवणाचा खर्च सोडता इतर सर्व खर्च स्वयंसेवकांनी केला. तीच गोष्ट ऑलिंपिकच्या १५ दिवसांची! हा सगळा खर्च £1000 च्या वर प्रत्येकी सहज झाला असेल. खर्च स्वतःला करावा लागणार आहे हे माहीत असून जवळपास २ लाखांच्या वर अर्ज आले, त्यातल्या सुमारे ७०००० लोकांना घेतलं. मला त्यांचं जास्त कौतुक वाटतं!

२. १६ वर्षांपूर्वीच्या ऑलिंपिकमधे इंग्लंडला फक्त १ सुवर्णपदक होतं. यावेळेस २९. एकूण पदकं ६५! कारण लॉटरीतून मिळालेले काही पैसे खेळाडूंचं प्रशिक्षण, निवड, साधनसामग्री यावर खर्च करायला सुरुवात केली म्हणून!

Rhythmic Gymnastics आणि Synchronised Swimmingमधेही खेळाडूंच्या चेहर्‍यांवरच्या हावभावांमधे नाटकीपणा अधिक वाटला यावेळी. या दोन क्रीडाप्रकारांतली नजाकत, कलात्मकता, गेयता बाजूला सारली जाऊन तिथे निव्वळ तांत्रिकता वरचढ ठरताना दिसली. त्यामागे काहीतरी कारणं असतीलही. गुणांकनाच्या काटेकोर पध्दती म्हणा, तीव्र चढाओढ म्हणा. पण "आमच्यावेळेला असं नव्हतं" हेच शेवटी मनात भरून राहिलं, इतकं खरं.

अगदी अगदी खरंच जाणवलंच हे!

लले, छान लेख, आणि शेवटचा 'तुला ऑलिम्पिक कसं सामावून घेतं स्वतःत' ते सांगणारा पॅरा अगदी मी ह्या डोळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे लेखातला तो सगळ्यात पटलेला भाग... अजूनही एखाद्या लहान मुलासारखी आरडाओरडा करत, खुष होत, अस्वस्थ होत, चरफडत कुठलाही क्रिडास्पर्धा प्रकार प्रचंड इन्व्हॉल्व होऊन बघणारी चाळीशीतली एकमेव महिला असशील तू... Happy

Pages