डॉ. सुखात्मे - नीलफलकाच्या निमित्ताने

Submitted by kanksha on 15 August, 2012 - 05:51

image001.jpgआजच्या स्वातंत्र्यदिनी भारतमातेच्या एका सुपुत्राबद्दल लिहावं वाटलं, म्हणून ही पोस्ट. आजवर अनेक क्षेत्रात अनेक महान हस्ती होऊन गेल्या. पण बहुतेकदा त्या त्या क्षेत्रातील लोकांनाच त्यांच्या कार्याची महानता जाणवते. इतरांपर्यंत ती फारशी पोहोचतही नाही. कधी कधी तर अगदी आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या दिग्गजांचीही आपल्याला माहिती नसते. "पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती"च्या नीलफलक लावण्याच्या अतिशय स्तुत्य अशा उपक्रमामुळे आपण सामान्य लोक निदान आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ - श्रेष्ठांना ओळखायला लागूत.
नीलफलकाची ही कल्पना मुळात लंडनमधली. लोकमान्य टिळकांच्या तिथल्या वास्तव्यस्थानी असा फलक लावला गेला, तेव्हा त्याने प्रेरित होऊन जयंत टिळक आणि दीपक टिळक यांनी असा उपक्रम इथे सुरु केला. काळकर्त्या शि. म. परांजपेंपासून सुरुवात करून आजवर या समितीने पुण्यात 116 फलक लावलेत.
मागच्या रविवारी पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. सुखात्मेंच्या प्रभात रोडवरील "सांख्यदर्शन" या घरावर 116 व्या फलकाचे अनावरण झाले. डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे - संख्याशास्त्रात जागतिक स्तरावर पोचलेलं नाव. लंडनमध्ये संख्याशास्त्रात Ph. D. करून भारतात परतल्यावर बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी त्यांनी अर्ज केला. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू पं . मदनमोहन मालवीय डॉ. सुखात्मेंच्या शैक्षणिक गुणवत्तेने प्रभावित झाले खरे, पण संख्याशास्त्राचा भारताला गरिबीतून बाहेर काढायला कसा उपयोग होणार या पंडितजींच्या प्रश्नाला समर्पक उत्तर न देता आल्याने डॉ. सुखात्मेंनी याच प्रश्नाला आपलं जीवनध्येय बनवलं. बनारस विद्यापीठातील प्राध्यापकपद न स्वीकारता राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेत (ICAR) संख्याशास्त्रात संशोधक म्हणून त्यांनी काम सुरु केले. त्यांच्या अनमोल कार्यामुळे आज या संख्याशास्त्र विभागाचा विस्तार होऊन एक नवी संस्था IASRI उभी राहिलीये. भूक, कुपोषण या समस्यांवरील त्यांचं काम जगभर नावाजलं गेलं आहे.
केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या वतीने दर दोन वर्षाने एका ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञाला "डॉ. सुखात्मे पुरस्कार" दिला जातो. 2003-04 साली डॉ. बी. के. काळे तर 2011-12 साली डॉ. जे. व्ही. देशपांडे अशा दोन पुणेकरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साहजिकच या नीलफलकाचे अनावरण डॉ. जे. व्ही. देशपांडे यांच्याच हस्ते करण्यात आले. त्यामुळे डॉ. सुखात्मेंच्या कार्याबद्दल डॉ. देशपांडेंच्या तोंडून "सांख्यदर्शन" मध्ये ऐकायला मिळणं आणि त्यानिमित्तानं अनेक संख्याशास्त्रज्ञांना भेटणं ही माझ्यासारख्या संख्याशास्त्राच्या विद्यार्थिनीसाठी पर्वणीच होती. शिवाय पद्मश्री डॉ. सुहास सुखात्मेंची भेट आणि त्यांच्या तोंडून त्यांच्या वडिलांच्या आठवणी ऐकणं हा तर एक अनपेक्षित बोनस होता. अशा रीतीने स्वातंत्र्यदिना पूर्वीचा रविवार एका उत्तम कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद देऊन गेला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान बातमी.
आकांक्षा, तुम्ही या निमित्ताने डॉ. सुखात्मेंवर एक परिचयात्मक लेख मायबोलीसाठी लिहावा अशी विनंती. या अतिशय थोर आणि गुणी संख्याशास्त्रज्ञाची आणि समाजशास्त्रज्ञाची नव्याने ओळख आम्हा वाचकांना होईल.

पण बहुतेकदा त्या त्या क्षेत्रातील लोकांनाच त्यांच्या कार्याची महानता जाणवते. इतरांपर्यंत ती फारशी पोहोचतही नाही. >> +१
वरदाने सुचवल्याप्रमाणे लेख जरूर लिहा Happy

लेखाबद्दल धन्यवाद कांक्षा! Happy

इथे एक गफलत झालेली दिसते. सांख्यदर्शन या शब्दावरून ही वैदिक तत्त्वज्ञानातील सांख्य प्रणालीशी संबंधित वास्तू असावी असे वाटले. मात्र या इथे संख्यानैपुण्य हा अर्थ अभिप्रेत आहे. अर्थात या गफलतीत लेखिकेचा दोष नाही.

संज्ञांचा वापर काळजीपूर्वक व्हावा ही इच्छा.

आ.न.,
-गा.पै.

वरदा +१.

गामापैलवान, सांख्यदर्शन हे डॉ सुखात्मे यांच्या घराचे नाव आहे.

अरे वा! नीलफलकाचे माहित नव्हते.
धन्यवाद इथे लिहील्याबद्दल.
आपल्याला लेख लिहावासा वाटला तर जरुर लिहा. Happy

सर्वांना मनापासून धन्यवाद
खूपच उशीर झाला प्रतिसाद द्यायला.. त्याबद्दल sorry
जमतोय का बघुयात एखादा लेख डॉ. सुखात्मेंवर

मस्तच !!

डॉ. सुखात्मे ह्यांचे कार्य केवळ अप्रतिम आहे .
http://www.math.iitb.ac.in/pvs/pvs2.html

सांख्यदर्शन या शब्दावरून ही वैदिक तत्त्वज्ञानातील सांख्य प्रणालीशी संबंधित वास्तू असावी असे वाटले.
गा.पै , संख्या शास्त्राला सांखिकी असेही म्हणतात , त्यावरुन सांख्यदर्शन असे त्यांनी केले असावे .

(अवांतर : काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ह्या लेखाच्या निमित्ताने
सुखात्मे सर मुळचे आमच्या सातारचे ! बुध नावाचे गाव.
अजुन आठवतं मला
मी य.च .कॉलेजला असताना , आमचे जाधव सर म्हणाले होते " बघा सातार्‍यात सध्या तरी एकच ग्रेट संख्याशास्त्रज्ञ झाले आहेत , तुम्ही दुसरे अस्सु शकता !!")

----