विषय क्र. १- 'रामसे बंधूंचा सिनेमा'

Submitted by लसावि on 13 August, 2012 - 06:26

रामसे बंधूंच्या सिनेमाकडे बहुतेकवेळा हेटाळणीच्या नजरेने पाहिले जाते. त्यांची अत्यंत कृत्रिम वाटणारी भुते, पठडीबाज वातावरण, एकंदरीत सामान्य दर्जा हे सगळे चेष्टेचेच विषय झाले आहेत. पण माझ्या चित्रपट अनुभवात रामसेंचे स्थान खास आहे कारण मी धडधडत्या हृदयाने पाहिलेला पहिला 'फक्त प्रौढांसाठी'चा सिनेमा होता रामसेंचा 'वीराना'!
रामसेंचा सिनेमा आला हे कळायचे ते त्याच्या भडक, उत्तान पोस्टर्समुळे. चोरट्या नजरेने ती पोस्टर्स डोळे भरुन पाहिली जायची. सिनेमात नक्की काय काय बघायला मिळणार आहे हे आपल्या निष्ठावान प्रेक्षकांना बरोबर कळावे हा उद्देश या पोस्टर्सने लगेच सफल व्हायचा. गावातल्या सगळ्यात गचाळ थिएटरमधे; घाम, पानमसाले, हातभट्टी आणि मुतारी अशा संयुक्त दरवळात पाहिलेले हे सिनेमे माझ्या वयात येण्याचा अविभाज्य भाग आहेत.

एक निर्मितीसंस्था म्हणून रामसे बंधू एकमेवाद्वितीय आहेत. सतत एकाच शैलीचे चित्रपट तयार करणारी ही अजब मंडळी आहेत. इतके की हिचकॉक आणि रहस्यपट यासारखेच रामसे म्हणजे भयपट हे समीकरण पक्के झाले आहे. रामसेंचा सिनेमा अजून एका अर्थानेही वेगळा आहे. प्रस्थापित हिंदी चित्रसृष्टीच्या मुख्य प्रवाहात त्यांना स्थान मिळाले नाही. पण त्याच प्रवाहातील सर्व घटक घेउन त्यांना रामसे स्टाईल फोडणी देउन हे सिनेमे बनले. नातेसंबंधांची, प्रेमाची, सुष्ट-दुष्ट संघर्षाची बॉलीवूडी चौकट, त्याचे मूलभूत गृहीतक याला धक्का न लावता ते सर्व त्यांच्या पद्धतीच्या भयपटांच्या शैलीत रामसेंनी मांडले.

त्यांच्या चित्रपटाच्या या रचनेमुळे मला ते प्रचंड मनोरंजक वाटतात. 'एक्स्पेक्ट द एक्स्पेक्टेड' असा काहीसा प्रकार त्यात असतो. उदाहरणार्थ, रामसेंच्या चित्रपटात सैतान-भूत जे काय असेल ते लोकांच्या मागे लागत नाही, लोकच स्वतःच्या पायाने त्याच्याकडे जातात. आणि हे होताना थिएटरमधे आमच्या गँगचा निव्वळ दंगा चाललेला- ए तो आला बग, आला बग; धरतेय बे तेनी, पळ्,पळ... इ.इ. पुन्हा तिथल्या किंकाळ्यावर आवाज काढून आमचा आरडाओरडा! गरम प्रसंग चालू असताना दुसर्‍याचे डोळे बंद करणे हे ही आलेच! थोडक्यात काय तर पडद्यावर काहीही होउदे, त्याचा वापर करुन आम्ही आमचे मनोरंजन करुन घ्यायचो. रामसेंच्या चित्रपटात कसलाही कलात्मकतेचा आव नाही, उगाच काहीतरी प्रतिकात्मक वगैरे नाही, आणि मला त्यांचा हा प्रामाणिकपणा प्रचंड भावतो.

रामसेंच्या प्रदिर्घ कारकिर्दीतील दोन सिनेमे मला फार आवडतात. त्यांच्या अगदी पहिल्या सिनेमांपैकी, 'दो गज जमीन के नीचे' एक मोठे धाडसच म्हणावे लागेल. १९७२ साली, राजेश खन्नाप्रणीत भावव्याकुळ सिनेमांच्या लाटेत, स्टार सिस्टीम पूर्ण भरात असताना हा चित्रपट आला आणि बर्‍यापैकी व्यावसायिक यशही मिळवून गेला. या चित्रपटात 'झाँबी' ही संकल्पना भारतीय सिनेमात पहिल्यांदा वापरण्यात आली. उत्तम वातावरणनिर्मीती, बर्‍यापैकी खिळवून ठेवणारी कथा आणि रामसे स्पेशल मसाला यामुळे मनोरंजनाची हमखास गॅरंटी म्हणून हा चित्रपट मी तुम्हाला नक्कीच सुचवेन!

या चित्रपटानंतर पुढची अनेक वर्षे रामसेंनी कमी-अधिक व्यावसायिक यशासकट 'होटल', 'दहशत', 'घुंगरु की आवाज' इत्यादी चित्रपट काढले. यातला 'घुंगरु की आवाज' तर चक्क नवकेतनचा होता! या सर्व काळात ते त्यांचा असा सिनेमा शोधत होते आणि तो त्यांना मिळाला १९८४ साली, 'पुराना मंदिर'च्या रुपाने. दुय्यम दर्जाचे कलाकार, अतिस्वस्त निर्मितीमूल्ये, अंगप्रदर्शनाचा सढळ वापर आणि भय-सूड कथा हा रामसे पॅटर्न या सिनेमाने कायमचा पक्का करुन टाकला. हॉलीवूडमध्ये गाजलेल्या अनेक भयपटातील वेगवेगळे प्रकार त्यांनी इथे वापरले.

हिंदी सिनेमाच्या इतिहासातला एक भयाण कालखंड म्हणून ८०च्या दशकाकडे पाहिले जाते. व्हिडीओ पायरसी आणि नव्यानेच आलेल्या इडीअट बॉक्सचा हल्ला, नव्या कल्पनांचा दुष्काळ, थिल्लर संगीत आणि एकंदरीतच सिनेमाच्या सर्व क्षेत्रात कमअस्सल लोकांचा धुमाकूळ अशी परिस्थिती होती. अशा या दशकाच्या मध्यावरचे १९८४ हे वर्ष स्वतंत्र भारताच्या इतिहासातले अत्यंत अवघड काळ; खलिस्तान चळवळ, ऑपरेशन ब्लूस्टार, पंतप्रधानांची हत्या, भोपाळ वायूकांड अशा अनेक घटनांनी संपूर्ण देश कडेलोटाच्या उंबरठ्यावर पोचला होता. लोक घाबरले होते, सैरभैर झाले होते. अशा काळोख्या परिस्थितीत 'पुराना मंदिर'सारख्या सिनेमाची निर्मिती होणे आणि तो तुफान चालणे हे दोन्ही सयुक्तिक वाटते.

रामसेंचा एक प्रातिनिधिक चित्रपट म्हणून 'पुराना मंदिर' वैशिष्ठ्यपूर्ण आहे. जनावरांची डोकी टांगलेल्या जुनाट अंधार्‍या हवेल्या, भुयारं, सैतानाचा अड्डा, जंगल, धुकं, पाउस, चित्रविचित्र प्रकाशयोजना, अत्यंत सरधोपट पार्श्वसंगीत याच्या मदतीने निर्माण केलेले भयाचे वातावरण. सैतानी कारवाया, शाप आणि त्यापासून मुक्ती या भोवती फिरणारी कथा. त्यात शहरातून येणारे नायक-नायिका, अजून एखादी उपजोडी, जंगलातले आदिवासी, ठाकूर ही मुख्य पात्रे. नायक-नायिका आणि त्यांचे मित्र शहरातून येत असल्याने त्यांच्या लैंगिक मोकळेपणाचे आपसूकच समर्थन होत असे आणि आदिवासी तर कमीच कपड्यात असणार नाही का! कथानकाशी पूर्ण फटकून असणारा द्वयर्थी विनोदाचा एक धागाही असे.

पुराना मंदिरचे यश रामसेंच्या खास निर्मितीप्रक्रियेचेही यश आहे. कमीत कमी बजेट, कमी पैशात मिळणारे नवे किंवा दुय्यम कलाकार (या चित्रपटात मोहनीश बहल, आरती गुप्ता, पुनित इस्सार आहेत), दिग्दर्शनापासून ते कॅमेरामन, ध्वनीसंयोजन, कथा-पटकथालेखकापर्यंत सगळी कामे पाच रामसे बंधूंनी एकमेकात वाटून घेतलेली. संगीताकडे दुर्लक्ष हे ही रामसेंचे विशेषच. बप्पी लाहिरी आणि सोनिक-ओमी हे त्यांचे मुख्य संगीतकार, पण त्यांच्या इतक्या सिनेमातील एकही गाणे विशेष गाजले नाही. त्याच त्या कलाकारांबरोबर, त्याच त्या लोकेशनवर चित्रित केलेले हे चित्रपट असल्याने एकापासून दुसरा वेगळा करणे मला अजूनही अवघड वाटते. त्यामुळे बरेच चित्रपट तर तो बघताना झालेल्या इतर गमतीजमतीमुळेच लक्षात आहेत.

चित्रपटाचे वितरण करताना ते तो फार थोड्या प्रिंट्सच्या मदतीने सुरवातीला फक्त मुंबई-दिल्लीसारख्या मोठ्या शहरात प्रदर्शित करीत. हळूहळू त्याच प्रिंट्स छोट्या शहरात नेल्या जात. शहर छोटे असो वा मोठे, रामसेंचा खरा प्रेक्षकवर्ग ज्या दुय्यम-तिय्यम दर्जाच्या चित्रपटगृहात येत असे तिथेच कमी तिकीट दरात हे सिनेमे दाखवले जात. सोलापूरात मी रामसेंचे जे काही चित्रपट थिएटरमधे पाहिले ती सगळीच बकाल आणि कळकट होती याचे कारण हेच!

खान त्रयीच्या उदयाबरोबरच हिंदी चित्रपटांनी वेगळे वळण घेतले आणि या नव्या हवेत रामसेंचा सिनेमा मात्र स्वतःला बदलू शकला नाही. पुढे केशू रामसेंनी स्वतंत्रपणे निर्मीती सुरु केली आणि सबसे बडा खिलाडी, खाकी अशा मुख्य प्रवाहातील चित्रपट बनवले. मात्र रामसे या नावाशी जुळलेला भयपटांचा अतूट संबंध आपल्या सिनेमाची इमेजच बदलून टाकेल हे त्यांना पक्के माहिती होते. त्यामुळे त्यांनी श्रेयनामावलीत आपले नाव केवळ 'केशू' इतकेच येईल ही काळजी घेतली.

माझ्या दृष्टीने हे रामसेंचे, त्यांच्या शैलीच्या चित्रपटांचे यशच आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलयस, आगावा.

'एक्स्पेक्ट द एक्स्पेक्टेड' >>> Biggrin

पुराना मंदिर हा एकमेव रामसेपट मी पाहिलाय, तोही व्हिडियो कॅसेटवर.

किरण....

ही रामसे गॅन्ग चक्क ७ भावांची आहे. पैकी आर्थिकदृष्ट्या खूप यशस्वी झालेले 'केशू रामसे' याना मी पाहिले आहे....अन् तेही चक्क बेळगांवात. "इंटरनॅशनल खिलाडी" चा प्रीमिअर शो होता कॅम्पात. त्या निमित्ताने आले होते....अर्थात तिथे जमलेल्या गर्दीला इंटरेस्ट होता तो अक्षयकुमारमध्ये.....जो आलाच नाही.

आम्हा मित्रांना 'केशू' हे रामसे बंधूपैकी आहेत हे माहीत नव्हतेच म्हणा, पण 'तरूण भारत' च्या सिनेसप्तरंग प्रतिनिधीने केशू ना दाखविले आणि वर तीदेखील माहिती दिली की त्यांचे पूर्ण नाव 'केशू रामसे...' पुराना मंदिरवाले.

हा त्यांचा फोटो :
keshu.jpg

मला वाटते मागील वर्षीच त्यांचे निधन झाले.

"....कि हे स्वतःच ..!!!!!!......"

~ व्वॉ....मस्तच की...क...क....क....क....किरण !

रामसे फॅमिलीलाही असेच स्वप्न पडत असेल की आपला 'केशू' मध्यरात्री कधीही कोणत्याही झरोक्यातून.....अगदी बाथरूम सिंकमधूनही मेन हॉलमध्ये येऊन टपकेल आणि अक्राळविक्राळ हास्य करेल....!!!

चक्क रामसे बंधुंवर आणि त्यांच्या चित्रपटांवर कोणी लिहील हे वाटलच नव्हत रे.
लिहिल आहेस मस्त. Happy

मी एकही रामसे पट पाहिलेला नाहिये...

मी एकही रामसे चित्रपट पाहिला नाहिये. पण लेख वाचुन एकतरी चित्रपट पहावा असे वाटत आहे. नेट वर मिळाला तर बरे होईल.

बाकी लेख उत्तम.

लेख आवडला.
आख्खा रामसे चित्रपट बघण्याचा योग आलेला नाही अजून. पण त्यातले काही तुकडे कुठे कुठे बघितल्याचे आठवतायत.

रामसेंच्या चित्रपटातलं ते भूत खरचं अजरामर पात्र आहे..पणा साला आज नाव पण माहित नाही त्याचं..
त्यांच्या टिव्ही सिरीयल पण होत्या ना?
..........................
लेख छानच... शुभेच्छा!

आगावा.. मस्त रे ..एकदम हटकेच .. रामसे पिक्चर्स वर कुणी लिहील असं वाटलं सुद्धा नव्हतं.. Happy
वीराना,पुराना मंदिर मी आईबरोबर अगदी थेटरमधे बसून पूर्ण पाहिलेत..
असले शिणेमे बघण्याची भारीच आवड होती लहानपणी कारण भीतीऐवजी उत्सुकता वाटायची कि शेवटी भुताचा पराभव कसा होणार..
या आवडीपायी ड्रॅकुला चे सर्व सिनेमे, एल्म स्ट्रीट ची सीरीज आणी बरेचसे असेच पाहून झाले.. तेही सिनेमागृहात..

मस्त लेख! त्यांचे अजून ३ पिक्चर पण सही आहेत - दरवाजा, बंद दरवाजा आणि तैखाना.
बादवे, त्यांच्या बहुतांश सिनेमांमधे असणार्‍या त्या भुताचे खरं नाव बहुधा अनिरुद्ध अगरवाल आहे.

रामसेंचे सिनेमे म्हणजे complete entertainers. त्यांच्या बहुतेक सिनेमांमधे एकच एक लोकेशन असायचं - अतिबळेश्वरचं मंदिर! Happy आणि भूत पण बहुधा तेच ते असायचं. फक्त मेकप वेगळा. तरी भन्नाट आवडायचे हे सिनेमे पहायला. आगाऊ, छान झालाय लेख.

उन्हाळ्याच्या सुट्टीत विराना पाहून आल्यावर डोक्यावरुन चक्क चादर घेऊन झोपलो होतो. परत ते घामाघूम अनुभव घेण्याचे धाडस झाले नाही. मात्र तुझ्या लेखाने रामसे बद्दल आदर निर्माण झालाय. :p

आगाऊ,
मस्तच लिहीलय... आणि शेवटचं वाक्य संपूर्ण लेखाचं सार आहे.. अजूनही आपण "रामसे स्टाईल" असे विशेषण वापरतो यातच काय ते आलं.
बाकी, "रामसे" सिर्फ नामही काफीं है! Happy

रामसे की दुनिया अचूक उभी केली आहेस!
गाणी गाजली नाहीत हे खरेच. त्यातल्या त्यात थोडेफार माहिती असलेले गाणे म्हणजे 'पुराना मंदिर'मधले 'वो बीते दिन'.
'रागोव'ला त्याच्यासाठी सर्वात भीतीदायक चित्रपटांची यादी विचारल्यावर त्याने ५ चित्रपट सांगितले, त्यात एकमेव हिंदी चित्रपट होता, 'दो गज जमीन के नीचे' -
http://specials.rediff.com/movies/2008/jul/28sld1.htm

Pages