भारतात यायचं खूप दिवस चाललं होतं. एकदाचं ते स्वप्न पूर्ण झालं. मी भारतात पोहोचले ते पावसाळ्याचे दिवस होते. पहाटे एक वाजता विमान सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. इतक्या पहाटे उतरल्यावर काय करायचं हा प्रश्न होताच. पण विमानतळावरची अद्ययावत व्यवस्था पाहून थक्क झाले. जगातले सर्व पर्यटक भारतातच का येतात हे विमानतळावरच समजतं. विमानापासून असलेले सरकते पट्टे (प्रवाशांसाठी ) आणि सामानासाठी वेगवेगळे असले तरी ग्रीन चॅनेलच्या तोंडाशी आल्यावर आपलंच सामान आपल्याकडेच येत असताना दिसतं. ही व्यवस्था जगात कुठेच पाहिलेली नसल्याने अनेक परदेशी पर्यटक देखील आश्चर्य व्यक्त करताना दिसले.
बाहेर आले तोच टॅक्सी ड्रायव्हर भेटला. अतिशय अदबीने त्याने कुठे जायचंय ही विचारपूस केली. पुणे असं उत्तर दिल्यावर त्याने पुण्यासाठी जाणा-या बसेस कुठे उभ्या आहेत याची माहिती दिली. दादरला जायचे असल्यास टॅक्सीने सोडू शकतो हे ही सांगितले. मी आपलं सहजच किती पैसे होतात हे विचारलं तर त्याने मीटरप्रमाणे जितके होतील तितकेच आम्ही घेऊ असं नम्रतेने सांगितलं. इथे आफ्रिकेत अडवणूक खूप. मला भरून आलं. हे कसं परवडतं तुम्हाला असं विचारताच त्याने भारताची सभ्यता आणि प्रतिमा यासाठी सगळेच इथे कसे जागरूक असतात हे अगदी थोडक्यात ऐकवलं. मी त्याचे आभार मानून शंभरची एक नोट देऊ केली तसं त्याने विनम्रतेने ती नोट नाकारीत भारतात पुन्हा असं काही करू नका हे ऐकवलं.
इथे आफ्रिकेत चो-यामा-या आणि लुटालूट यांची सवय झाल्याने माझ्यासाठी हे आश्चर्याचे धक्केच होते. एका कूलीला खूण करताच त्याने माझी सामानाची ट्रॉली पुणे - मुंबई - पुणे वातानुकुलीत बस सर्व्हिसकडे ओढत नेली. पुन्हा किती पैसे विचारताच त्याने काय द्यायचे ते द्या. सामान उचलावंच लागलं नाही, ट्रॉलीमधेच असल्याने काय सांगू असं म्हणत मलाच कोड्यात टाकलं. पुन्हा तीच शंभराची नोट त्याच्यापुढे नाचवली तेव्हां मॅडम दहा रूपये सुटे असतील तर बघा ना.. कशाला गरिबाची थट्टा करता म्हणत मला शरमिंदा केलं. मी निमूटपणे दहा रूपये काढून त्याला दिले. माझ्याकडचे डॉलर्स भारतीय चलनात बदलून घेताना दहा रूपयांची बंडल घेतल्याचा निर्णय सूज्ञपणाचाच होता हे त्यातल्या त्यात समाधान !
पुण्याला जाणा-या बसेस अतिशय स्वच्छ होत्या. दोन वाजताची बस दोन वाजताच सुटली. बस पूर्ण भरेपर्यंत इथे वाट पाहत नाहीत. वेळ पाळण्यात लोक अत्यंत जागरूक दिसले. सीटसाठी मळकट कापडाचे कव्हर्स असतील असा माझा अंदाज होता पण दिवे बंद व्हायच्या आधीच्या लख्ख प्रकाशात शुभ्र अभ्रे आणि नवे कोरे सीट कव्हर्स पाहून स्टाफला त्याबद्दल विचारलंच. त्यावर त्याने प्रत्येक ट्रीपला सीटचे कव्हर्स कसे बदलले जातात याची माहिती दिली. सकाळी सहा वाजता पुण्यात पोहोचले तेव्हां पावसाला सुरुवात झाली होती.
पुण्याच्या जमिनीवर पाय ठेवला आणि रिक्षावाला पळत आला. माझ्या हातात छत्री देऊन त्याने माझं सामान हातात घेतलं. मला रिक्षात बसायला सांगून तो चटकन सामान व्यवस्थित ठेवून पुढच्या सीटवर आला पण.
कुठे जायचंय मॅडम ? या प्रश्नाने पुण्याबद्दलच्या ऐकलेल्या सुरस कथा खोट्याच असाव्यात असं वाटू लागलं. इथे आफ्रिकेत रिक्षावाले वस्सकन अंगावर येतात. गुरगुरतात. जवळची भाडी नाकारतात. मी त्याला थेटच तसं विचारलं तेव्हा हसून त्याने आम्हाला भाडं नाकारायची कायद्याने परवानगी नाही असं सांगितलं. माझे असंख्य प्रश्न त्याला विचारायचा मोह आवरत नव्हता. समजा रिक्षा खराब असली तर.. या प्रश्नावर त्याने न वैतागता खराब रिक्षा रस्त्यावर आणणे हा कायद्याने गुन्हा असून आरटीओ कडून कडक दंड होतो ही माहिती दिली.
मूळचीच पुण्याची असले तरी आफ्रिकेत इतकी वर्षे काढल्याने मूळ पुणे कसं होतं हे काहीच आठवत नव्हतं. कदाचित आफ्रिकेच्या अनुभवामुळे भारताच्या या सुखद स्मृती पुसल्या गेल्या असाव्यात. रिक्षेवाल्याला घरचा पत्ता दिला तेव्हा त्याने एका प्रशस्त पार्किंग असलेल्या इमारतीत आणून सोडले. बॅगा घेऊन एका स्वच्छशा लिफ्टने वर नेले. दार उघडताच आई समोर दिसली आणि भावनावेगाने मी तिला मिठीच मारली. आमचा आनंदसोहळा पार पाडेपर्यंत रिक्षेवाला बिचारा दहा मिनिटे तसाच उभा होता. मी त्याला पैसे विचारताच त्याने टेरीफकार्ड दाखवले आणि रिक्षेच्या मीटरप्रमाणे ( जे मी आधीच पाहून घेतले होते ) भाडं सांगितलं. मी आश्चर्याने वेटिंग आणि सामान वर आणण्याचे पैसे विचारले असता त्याने नकार दिला. मला हे अनुभव अगदीच नवे होते. " मैत्रेयी , अगं तू सगळं विसरलीस का ?" असं बाबांनी विचारलं आणि मी आठवायचा प्रयत्न करू लागले. पण छे ! मला आपले ते अमेरिकेतले अव्वाच्या सव्वा भाडं आकारणारे टॅक्सीवाले आणि आफ्रिकेतले उद्धट कॅबवाले आठवले.
डोळ्यावर झोप असतानाही सकाळी सकाळी पुण्यात फिरायचा मोह आवरत नव्हता. नंतर काय झोपायचंच आहे असा विचार करून बाहेर आले तोच इमारतीच्या पार्किंगमधली स्वच्छता नजरेत भरली. रस्त्यावर आले तर तुरळक वाहने शिस्तीत चाललेली दिसली. मी रस्ता ओलांडायला रस्त्यावर पाय टाकला आणि तीन कार्सनी करकच्चून ब्रेक लावला. ओह ! मी स्वतःचाच निषेध केला. मग निमूटपणे थोडं दूर जाऊन झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडला. इथे झेब्रा क्रॉसिंगवरून तुम्ही डोळे झाकून रस्ता ओलांडला तरी चालण्यासारखं आहे हे माझ्या लक्षात आले. माझा रस्ता ओलांडून होईपर्यंत वाहने थांबून राहिली होती. कदाचित पुण्यात इतकी शिस्त असल्यानेच विपर्यास करून पुण्याबद्दलचे विनोद जगात प्रसिद्ध झालेले असावेत. मला इथलं काहीच कसं आठवत नव्हतं ? मी मनाशीच नवल करत राहीले.
कुठेही गप्पाटप्पा करणारे लोक दिसले नाहीत. जो तो आपल्या कामात बिझी ! पण माहिती विचारल्याबरोबर सगळे आपणहून योग्य ती माहिती देत होते. प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास पुणेकर विनयाने माफ करा हं.. असं म्हणत होते. चकचकीत पीएमपीएल च्या बसेस पाहून क्षणभर हेवा वाटला. पुणेकर स्वतःची वाहने विनाकारण रस्त्यावर आणण्याच्या विरोधात दिसले. चालत चालत जगप्रसिद्ध लक्ष्मी रत्यावर आले तेव्हां पार्किंगरहीत रस्ते पाहून भारावून गेले. प्रशस्त आणि मोकळे फूटपाथ, कुठेही विक्रेते नाहीत.. ! मला सहजच कुणाचा तरी पुण्यातला लुंगीखरेदीचा अनुभव वाचलेला आठवला. न राहवून एका दुकानात शिरले तो अगदीच उलटा अनुभव आला. ग्राहक पाहताच चहा कॉफी विचारणारे पुणेकर दुकानदार जगाच्या पाठीवर कुठेच भेटणार नाहीत. असं असताना लोक पुण्याबद्दल नेमकं उल्टंच का सांगतात ?
फक्त पाचच मिनिटात मला दुकानातला नवा माल दाखवून झाल्यावर दोन दिवसांनी येणा-या मालाबद्दल संगणकावर माहिती देताना विक्रेते जराही कंटाळल्याचे दिसले नाही. पुन्हा घ्या, नका घेऊ तुम्हाला प्रत्येक वेळी अशीच माहिती देऊ असं हसतमुखाने सांगितलं गेलं. माझ्या लहानपणी देखील पुणे आणि पुणेकर्स असेच असले पाहीजेत. पण मला हे काहीच कसं आठवत नाही ? मला खरंच काळजी वाटू लागली.
तुळशीबागेची आठवण पुण्यात झाली नाही असं कसं होईल. कशी होती बरं तुबा ? माझा टोटल रिकॉल मधला अश्वा झालेला बहुतेक! आठवेचना. पाचेक मिनिटात मी विश्रामबागवाड्यापाशी पोहोचले तेव्हां विश्रामबागवाड्याला कुंपण आणि भोवताली राखलेली सुंदर हिरवळ पाहून मन प्रसन्न झालं. समोरच पुण्यातले पुरातन वास्तू म्हणून जतन केलेले चितळे बंधू मिठाईवाले हे दुकान दिसले. सात मजली इमारत शेजारीच असली तरीही जुनी वास्तू पुरातत्व खात्याने सांभाळून ठेवली होती. पुरातत्त्व खात्याचं कार्यालय विश्रामबागवाड्यातच होतं. मधल्या कुमठेकर रस्त्याचे तर फोटोच काढायचा मोह झाला. कॅमेरा घरीच राहील्याबद्दल खूप हळहळले. दुमजली रस्ता. खालून मेट्रो रेल्वे. फूटपाथवर विश्रामबागवाडा रे. स्था कडे असा खालच्या बाजूला बाण असलेला फलक. मी चटकन पाय-या उतरून ते स्थानक डोळे भरून पाहून घेतलं. व्वाव ! फलाटाच्या लादीमधे चेहरा पाहून मेक अप करावा इतकं चकाचक स्थानक होतं.
तुळशीबागेत पाऊल टाकलं मात्र.. थक्कच झाले. सर्व दुकानं जणू काही आजच नव्याने उघडल्यासारखी सजवलेली आढळली. कुठेही गडबड गोंधळ नाही. आणि हॉकर्स हॉकर्स म्हणतात ते भिंग घेऊन पाहीले तरी आढळेना. मला तर केप टाऊनच वॉटरफ्रंट देखील तुबा पुढे फिक्कुटसं वाटू लागलं. कावरे चौकामधलं कारंजं तर इतकं सुरेख होतं कि बस्स्स ! विटांचे रस्ते असल्याने वाहनांना प्रवेशबंदी होती. कधी काळी इथे अरुंद बोळं होती याचा मागमूसही आढळत नव्हता. दोन गगनचुंबी इमारतींमधे इथल्या मूळ कुटुंबियांची घरं होती. या दोन इमारतीही किती सुंदर ! प्रत्येक तिस-या मजल्यावर बाग, शेती, खेळाची मैदानं असे निसर्गसंपन्न माळे राखलेले होते. आडव्या उभ्या फिरू शकणा-या लिफ्टस.. लिफ्टस कसल्या.. काचेच्या भिंतींवर चालणारी वाहनंच ती. कुठेही पान खाऊन थुंकल्याच्या खुणा नाहीत. गोरे लोक कसलेही आरोप करतात. कुठल्याशा चिनी संस्थळावर तर म्हणे काहीही प्रचि टाकतात भारताबद्दल !
अजिबात धक्काबुक्की न करता शांतपणे चालणा-या स्त्रिया हे तुबाचं एक ठळक वैशिष्ट्य. शिवाय मालाचे दर इतके चोख कि चिनी बनावटीच्या वस्तूही या दरात विकणे परवडले नसते. फसवाफसवीची वृत्ती दुकानदारांत आढळली नाही. तुम्हाला इथे दुकान चालवण्यासाठी लाच द्यावी लागते का असं भीत भीतच एका दुकानदाराला मी विचारलं तेव्हा तो विचारात पडला. लाच हा शब्द कानावरून गेलाय पण नेमकं काय असतं ते लक्षात येत नाही असं त्याने सांगितलं. तेव्हा मी त्याला सरकारी अधिका-यांना, नगरसेवकांना आपलं काम करून घेण्यासाठी द्यावे लागणारे पैसे असं समजावून सांगितलं तेव्हा तो हसायलाच लागला. मॅडम इथं अधिका-यांना त्यांचं काम करायचा पगार मिळतो आणि नगरसेवक स्वेच्छेने निवडून येतात असं काहीसं अगम्य उत्तर त्याने दिलं. माझ्याकडे मंगळावरचा प्राणी पहावा अशा नजरेने दुकानातले लोक पाहू लागल्याने मी तिथून काढता पाय घेतला. सकाळपासून सारखेच फजितीचे प्रसंग माझ्यावर येत होते.
बाहेर आल्यावर पाऊस सुरू झाला म्हणून आडोशाला थांबले. रस्त्यावर कुठेच पाणी साठल्याचं दिसलं नाही. कुठेही खड्डे देखील नव्हते. पावसाची पर्वा न करता डेक्कनकडे निघाले. लकडी पुलावर अगदीच तुरळक रहदारी दिसली. मी पुलावरून नदीकडे नजर टाकली. नितळ पाण्याने वाहणारी मुळा मुठा पाहून नदीत पोहायची इच्छा अनावर झाली. नदीपात्रातून जहाज वाहतूक सुरू होती. जगात अन्यत्र नदीपात्रातून रस्ते काढलेले असताना पुणेकरांनी मात्र पर्यावरणाचा विचार करून ते इथं टाळलेलं दिसत होतं. कधी काळी म्हणे धरणफुटीत शहर उद्ध्वस्त झालं होतं. त्या वेळी आलेल्या अनुभवातून नागरिक आणि नियोजनकर्ते शहाणे झाल्याचं दिसून आलं.
आश्चर्याचे धक्के बसत असताना मला भिजल्याने शिंक आली. मी जोरात शिंकताच एका महिलेने मला रुमाल देऊ केला. मला अगदीच ओशाळल्यासारखं झालं. मी झपाझप चालत घरी आले. कपडे बदलून पटकन झोपी गेले.
जाग आली तेव्हां कुणी तरी उठवत होतं. काकू होत्या... त्या इथं कशा आल्या आफ्रिकेतून ?
त्याच वेळी कानावर शब्द पडत होते.
" मैत्रेयी .. भारतात जायचंय ना ? चल बरं.. उठ लवकर !"
- Maitreyee
.
.
ओह तुम्ही स्वप्न बघत होतात तर
ओह तुम्ही स्वप्न बघत होतात तर !
चांगलं लिहिलयं.
विशफुल थिंकिंग!!!
विशफुल थिंकिंग!!!
छान लिहिलय. तुमचे हे स्वप्न
छान लिहिलय. तुमचे हे स्वप्न सत्यात येवो.
श्री, वर्षुतै, तोषवी आभार (
श्री, वर्षुतै, तोषवी आभार
( अप्रकाशित ठेवता येत नसल्याने राहून गेलेली तुळशीबाग आता अॅडलीये. आता संपूर्ण )
नवी तुळशी बाग..
नवी तुळशी बाग..
खि खि खि खि!!! पोट धरुन हसलीय
खि खि खि खि!!!
पोट धरुन हसलीय मी!
हे असं खरंच घडलं-बिडलं ना, तर बेशुद्ध व्हायची वेळ येईल!
छान
छान
आता हसाव की रडाव तेच समजेना!
आता हसाव की रडाव तेच समजेना! छान!!
मस्तच !!!!
मस्तच !!!!
खरेच असे झाले तर
खरेच असे झाले तर
मस्त स्वप्न दाखवलत तूमचा
मस्त स्वप्न दाखवलत
तूमचा निषेध
नमस्कार मैत्रेयी भागवत हे
नमस्कार मैत्रेयी भागवत
हे तुम्ही स्वतः लिहीले आहे का ? ( असल्यास अक्षर सुंदर आहे)
पुण्यामधे फिरताना बाहेरून देशातून आलोय हे सांगितलं तर लोक चटकन घरी जेवायला चला म्हणतात. अतिथी देवो भव हा इथल्या नागरिकांचा आणि ग्राहक देवो भव हा इथल्या दुकानदारांचा मूलमंत्र आहे.
मस्त!! I wish !!
मस्त!! I wish !!
लयचं गेले स्वप्नात! दोनदा
लयचं गेले स्वप्नात! दोनदा दिला प्रतिसाद !
सॉरी, हसू नाही आलं!
सॉरी, हसू नाही आलं!
कल्पना छान आहे. काश असं झालं
कल्पना छान आहे. काश असं झालं तर ??
मला तर केप टाऊनच वॉटरफ्रंट देखील तुबा पुढे फिक्कुटसं वाटू लागलं>>> मी तर कंपॅरीझन करण्याची हिंम्मतच नाही करु शकत
छान आहे.
तथास्तु !! आमेन ! इन्शाअल्ला
तथास्तु !!
आमेन !
इन्शाअल्ला !
सर्वांचे आभार. शागं मला तर
सर्वांचे आभार.
शागं
मला तर केप टाऊनच वॉटरफ्रंट देखील तुबा पुढे फिक्कुटसं वाटू लागलं>>> मी तर कंपॅरीझन करण्याची हिंम्मतच नाही करु शकत..
छान लिहिलय. तुमचे हे स्वप्न
छान लिहिलय. तुमचे हे स्वप्न सत्यात येवो.
अक्षर सुंदर आहे<<< अनुमोदन!
अक्षर सुंदर आहे<<<
अनुमोदन!
सर्वांचे आभार. इब्लीसजी आपले
सर्वांचे आभार. इब्लीसजी आपले पण.
सपने मे देखा सपना..
सपने मे देखा सपना..
कशाला चेष्टा करता राव गरीब
कशाला चेष्टा करता राव गरीब बिचार्या पुणेकरांची.
Dvinta
Dvinta
छान लिहीलय, उत्तम
छान लिहीलय, उत्तम कल्पनाविलास.

फक्त कल्पनाविलासात झक्कीन्नाही सोबत घेतले असते तर अधिकची फोडणी झाली अस्ती..... नै?
विस्मय ताई- छान लिहिले आहे ,
विस्मय ताई- छान लिहिले आहे , पण आताचे पुणे खूप बदलले आहे , तुमच्या म्हणण्याप्रमाणे अनुभव येतीलच असे नाही . पण ५० % पर्यंत आशा बाळगू शकता .
प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास
प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास पुणेकर विनयाने माफ करा हं.. >>>>>>>>> इथे जरा अतिच अतिशयोक्ती झाली.
बाकी लेख मस्त .. असे खरच घडो, तुमचे स्वप्न सत्यात उतरो..