----------------……..----रिप्ले----…….

Submitted by प्रकाश कर्णिक on 10 August, 2012 - 07:34

धनंजय अगदी सवयीनं हावरा मेल सुटायला पाच मिनिटं असताना फलाटावर आला. त्याला कितवा डबा कुठून लागतो आणि किती अंतर आहे हे विचार करायला लागले नाही कारण मुंबई ते जळगाव रात्रीचा प्रवास त्याच्या अनेक वर्षे अंगवळणी पडला होता. झपाझप ढांगा टाकत ठराविक डब्यापाशी येण्यापूर्वी त्याने वाटेतल्या स्टॉल वरून सफाईनं एक फिल्मी मासिक माधुरी दीक्षितचा कवरवर फोटो बघून उचललं, आणि पैसे टाकून पुढे सरला. विक्रेत्याने मान सुद्धा वर केली नाही . गाडी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणार होती आणि रात्रीची ती शेवटची गाडी होती. दिवसभरच्या श्रमानंतर हावरा मेल सुटता क्षणी विक्रेत्याला स्टॉल बंद करून माल फलाटावरच्या मोठ्ठ्या लाकडी पेटाऱ्यात भरायचा होता. त्यानंतरच झोपायला मिळणार होते. आणि आत्ता तर तो पेटीतील नोटा हिशोबासाठी मोजत होता. धनंजय डब्याच्या दारापाशी थबकला आणि त्यानं खळीनं चिकटवलेल्या लिस्ट कडे नजर टाकली . एकदम डी मध्ये जाऊन धनंजय देशमाने नावा पुढचा बर्थ नंबर पाहिला आणि डब्यात चढण्यापूर्वी त्याच्या लक्षात आले कि त्याच्या कुपे मधली दुसरी बर्थ मनमाडची राखीव बर्थ आहे. धनंजयने घड्याळाकडे बघितले तेंव्हा बरोबर १० वाजून ४५ मिनिटे झाली होती.
त्याला बरं वाटलं. आता कुपे मधला दिवा ठेऊन मनमाड पर्यंत वाचायला कोणाची हरकत नसेल. त्याच्या इतक्या वर्षांच्या अनुभवाने त्याला माहित होते कि दोन प्रकारचे सह प्रवासी त्याला भेटत. एकतर बहुतेक लोक तो डब्यात चढण्यापूर्वीच डोक्यावर चादर घेऊन झोपलेले असत किंवा त्याच्या सारखा विरळा प्रवासी निद्रानाशा मुळे गप्पा मारायला कोण मिळतो या अपेक्षेने वाट पाहत असे.
मनमाड साधारण एक वाजेस्तोवर येईल तोपर्यंत वाचायला आज काही अडथळा नव्हता . नंतर एक कॉफी आणि मग जळगाव येण्याची वाट पाहणे. जास्तीत जास्त सव्वा तीन होतील घरात पोचायला. मग काय , ताणून द्यायची कारण सकाळी लवकर उठण्याची घाई नाही. सकाळी आईच्या हातचा नाश्ता खायला मिळणार. तिचा तर शनिवारचा उपास असतो पण उद्या तो उठण्याच्या अगोदर काहीतरी झणझणीत पदार्थ करून ठेवेल हे ठरलेले. आई वाढताना तणतणणार हे पण ठरलेले “किती वर्ष तू आईच्या हातचं खाणार ? बोळ्यानं दुध पिण्यासारख आहे. घेऊन ये आता एक सुगरण. मी आता थकले रे बाबा !" हे ऐकत असताना त्याला खात्री असे कि आज बेत वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी नि खमण ढोकळा आणि नैवेद्याला गुळाचा सांजा यापैकी अदलून बदलून काहीतरी असणारच.
डब्यात शिरताक्षणी धनंजयच्या लक्षात आले कि आज फारशी गर्दी नाही . मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्यात वाटते ! पण काही आठवड्यातच सुट्ट्या सुरु होतील आणि गाड्या भर भरून लोक प्रवासाला, गावाला निघतील. त्याला काही प्रॉब्लेम नव्हता . बुकिंग ओपन होताच रेल्वे मधला कारकून त्याचा नंबर लावत असे. आज तुरळकच गर्दी होती आणि प्रवासी गाडी सुटल्या क्षणी झोपायच्या तयारीत होते. कुपेत शिरल्यावर सवयीनं पडदा बंद केला आणि आपले बेडिंग तपासून पहिले. त्याला बेडिंगची काही गरज नव्हती तरी आपल्या बर्थच्या वस्तूंचा ताबा घेऊन तो खिडकीकडे बसला एवढ्यात गाडीने पहिला हिंदोळा दिला.
धनंजयने आपल्या छोट्या स्लिंग बॅग मधून पाण्याची बाटली काढली आणि पाण्याचा घोट घेऊन नुकतच घेतलेलं फिल्मी मासिक चाळायला सुरुवात केली. मासिकाच्या मुखपृष्टावर माधुरी दीक्षितचा चेहरा न्याहाळून धनंजय खुलला. माधुरीचा नवीन चित्रपट नुकताच मराठा मंदिर मध्ये लागला होता आणि होस्टेल मधल्या चांडाळ चौकडीने तिकिटे बुक करून सिनेमाला जायची रात्र अगोदरच ठरवली होती. धनंजयला कसलीच तोशीश नव्हती.
धनंजय आठवडाभर इंजिनीरिंगच्या विविध विषयांची लेक्चर घेतल्यावर आणि होस्टेलचा रेक्टर म्हणून विद्यार्थ्यांचे अनेक उपद्व्याप लपवण्यास खर्च झालेले तास वगळता कॉलेजच्या फिल्म क्लब चा सेक्रेटरी म्हणून काम खूप आत्मीयतेने तरीही सहज पणे हाताळत असे. सिनेमा हा त्याच्या आवडीचा छंद होता आणि विद्यार्थी होस्टेलचा रात्री बाहेर न जाण्याचा नियम मोडायला लालूच म्हणून धनंजयला सिनेमाला घेऊन जात. तसं पाहायला गेलं तर धनंजय अविवाहित होता , तरुण होता आणि मुख्य म्हणजे उत्साही होता हे त्याच्या विद्यार्थ्यामध्ये पॉपुलर असण्याचे एक कारण होते. चार वर्षांपूर्वी जळगावहून मुंबईच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये त्याची बदली झाली होती आणि तेंव्हा पासून त्याचा मुंबई - जळगाव -मुंबई हा नियमित प्रवास चालू होता. मुंबईत घर होण्याची शक्यता नव्हती म्हणून लग्न पुढे ढकलले जात होते आणि मुली नाकारल्या जात होत्या. त्यात खरे कारण म्हणजे आता मुंबई सोडून दुसऱ्या शहरात बदली घ्यायला त्याचे मन राजी होत नव्हते. आई एकटी जळगावला होती आणि सारी लहानपणापासूनची मित्र मंडळी पण . धनंजय नी मुंबईत विद्यार्थी गृहात राहण्याची तडजोड केली होती पण मित्रांची त्याला खूप ओढ होती आणि मित्रांना पण त्याची.
मासिक चाळता चाळता त्याला कधी डोळा लागला हे कळलेच नाही. त्याला अर्धवट झोपेत बाबांची आठवण आली. बाबांना जाऊन आता बरीच वर्षे झाली होती. पिढीजात घर आणि बाबांनी केलेली गुतंवणूक , त्यांचा फंड , विम्याची रक्कम यामुळे शिक्षणात काही अडथळे आले नाहीत आणि नोकरी लागल्यापासून तर काहीच प्रश्न नव्हते तरी बाबांना तो मिस करत होता आणि आई हेच त्याचे सर्वस्व होते. म्हणून दर आठवड्याला जमले नाही तरी दर पंधरा दिवसात त्याची जळगावला फेरी असे पण आईला फोन अगदी नियमित ! आता धनंजयची तिशी उलटली होती पण त्याच्या मनात सध्या चाललेले रुटीन विस्कळीत करण्याचा कुठलाही प्लान नव्हता.
धनंजयची अतिशय आवडती नायिका कोण असेल तर माधुरी दीक्षित . तिचा “लज्जा” हा सिनेमा त्याने तीन वेळा बघितला होता. आता नुकत्याच लागलेल्या “देवदास” या पिक्चरची तिकिटे तर होस्टेलच्या मुलांनी काढलेलीच होती. धनंजयने घेतलेल्या मासिकावर याच पिक्चर मधील माधुरीचा फोटो होता. धनंजयने मासिकातील देवदास चे परीक्षण वाचायचे ठरवले आणि डोळे उघडले.
धनंजयला क्षणभर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्याला वाटले अजून आपण झोपेत तर नाही नं ? डोळे चोळून त्याने पहिले आणि आता त्याला खात्री झाली कि आपण पूर्ण जागे आहोत. गाडी थांबली होती. बहुतेक मनमाड असणार . त्याच्या समोरच्या सीट वर एक अतिशय सुंदर मुलगी बसली होती. तिची मान खाली होती तरीही धनंजयला तिच्या नितळ गोऱ्या रंगाची जाणीव झाली. तिने निळ्या आकाशी रंगाचा सलवार कमीज घातला होता आणि डोक्यावर निळी ओढणी होती. हातात बऱ्याचशा रंगांच्या बांगड्या होत्या आणि हाथ सुरेख मेंदीने रंगवलेले होते. केसांची जाड वेणी खांद्यावरून पुढे आलेली. धनंजयचे लक्ष पायांकडे गेले . पाउले पण मेंदीने रंगवलेली होती आणि पायात पैंजण होती. पायात नाजूक चप्पल होती. उगाचच त्याच्या कल्पना शक्तीनं भरारी मारली. पुष्कळ सिनेमा बघत असल्याचा परिणाम असेल. त्याला वाटले कि सिनेमात जसे नववधू आपल्या पतीची वाट पाहत लाजेने मान खाली घालून बसल्याचे दाखवतात तशी ती मुलगी बसली आहे.
काही सुचेना म्हणून तो म्हणाला " मनमाड आले वाटत." त्या मुली कडून काही उत्तर आले नाही. "तुम्ही आताच गाडीत आलात का? " त्यांनी दुसरा प्रश्न केला
एक अतिशय मंजुळ आवाज आला “हां. मै अभी दो मिनिट पहले आयी हुं. तुम्ही झोपलेले होते.”
तिने वर पहिले. धनंजय तिच्या सौदार्याकडे पहातच राहिला.
ती अतिशय सुंदर होती. तिचं नाक धारधार होतं आणि रंग अतिशय नाजूक गोरा होता जसा इंग्रजी सिनेमातील हिरॉईनचा असतो तसा. कपाळावर उभी नाजूक बिंदी लावली होती , कोरलेल्या भुवया आणि डोळ्यात काजळ. तिचे वय बरेच कमी असणार . त्याने अंदाज लावायचा प्रयत्न केला . एकोणीस, वीस असेल आणि एवढी लहान आणि सुंदर मुलगी एकटी रात्रीची काय करते आहे? त्याला प्रश्न पडला. तिच्या बरोबर एक हँड बॅग होती. त्यांनी तिला जरा चिंतीत स्वरात विचारले
" तुमच्या बरोबर दुसऱ्या डब्यात कोणी आहेत का? रात्री या वेळी प्रवास करता म्हणून विचारलं. म्हणजे मी बर्थ बदलू शकतो हवं असेल तर ! मी काय जळगावला उतरणार आहे. "
“नही भाईजान, मै अकेली हुं.” ती परत गोड आवाजात बोलली. धनंजयला तिच्या आवाजात एकाच वेळी काचेची किणकिण आणि बासुरीचा मधुर स्वर आला. एका गोड वाक्यातच तिने आपले नाते जोडून टाकल्याची जाणीव पण झाली. त्याला बहिण नव्हती तरीही अचानक आपण मोठ्ठा भाऊ असल्यासारखे वाटले. तिची मान आता खाली होती जशी कि ती आपल्या पाउलांकडे पाहते आहे. अचानक तिने मान वर केली आणि धनंजय कडे बघितले. तिचे सुंदर काळेभोर डोळे त्याला अतिशय अगतिकपणे आर्जव करत होते . धनंजय पुढे बोलायच्या आताच ती म्हणाली “आय एम इन ट्रबल , भाईजान. मेरी मदत किजीये ” .
धनंजयच्या तोंडाचा आ वासला . त्याला क्षणभर काय होते आहे हेच कळेना . त्याच्या चार वर्षांच्या मुंबई -जळगाव -मुंबई प्रवासात कधी सुंदर मुलगीच काय पण एखादी कुरूप मुलगी सुद्धा भेटल्याचे आठवत नव्हते . बहुतेक करून त्याला फिरते मेडिकल रेप्स , त्याच्यासारखे एकटे गावाला जाणारे तरुण किंवा म्हातारे आणि कोणी बंगाली कुटुंब भेटायचे. कितीतरी वेळा त्याला आपली सीट माणुसकी म्हणून द्यायला लागायची , पण हे सर्व प्रवासात करावेच लागते. त्यात भर म्हणून मुंबई -जळगाव -मुंबई ट्रॅक आपला घरगुती वाटायचा त्यामुळे कोणी क्षुल्लक मदत मागितली तर तो पाहुणचार केल्याच्या भावनेने करत असे.
आज अनपेक्षित पणे एक सुंदर मुलगी काय भेटते , आपल्याला भाऊ काय बनवून टाकते आणि काही कळायच्या आताच " आय एम इन ट्रबल " काय म्हणून टाकते याचा धनंजयला धक्काच बसला होता .
धनंजय स्वताला सावरून उभा राहिला " काय ? काय झालंय. बरं नाही का ? तुम्हाला काही हवंय का ? म्हणजे पाणी ? का कॉफी आणू? लगेच आणतो , मला पण घ्यायची आहे. " त्याला आपल्या आवाजातील कंप आणि अडखळतेपणा लक्षात आला.
"नाही , नको. बसा तुम्ही . " ती मुलगी बोलली. "माझ्या मागे काही लोक लागलेत . म्हणून तुम्ही अनोळखी असून लगेचच सांगावेसे वाटले."
"काय ? कशासाठी ?" धनंजय आता घाबरला आणि त्याला जाणवले कि त्याच्या कपाळावर बारीक घाम फुटलाय.
धनंजय तसा मुळातच घाबरट आणि त्यात बाबा गेल्यापासून कोणी रक्षण कर्ता मोठा भाऊ , वडीलधारी माणुस नसल्याची भावना सतत मनात घर करून होती. शाळेत तर कोणाला न दुखावता सुद्धा दांडगट मुलांचा बराच मार त्याने खाल्ला. त्यामुळे जेथे वाद, मारामारी , दुखापत किंवा भांडण होण्याची शक्यता असेल त्या प्रसंगापासून तो कटाक्षाने दूर राही. पण आज अनाहूतपणे या प्रसंगात तो ओढला गेला होता ज्याची त्याला सुतराम कल्पना नव्हती.
" अहो , तुम्ही पोलिसाना सांगितलं का ? नाहीतर असं करू. आपण स्टेशन मास्तरला सांगू . गाडी काही वेळ येथे थांबते , इंधन भरायला , का इंजिन बदलायला का वेळ काढायला माहित नाही. पण आपल्याला वेळ आहे. " धनंजय एका श्वासात बोलत राहिला.
"नको . मै घरसे भागके निकली हुं. पोलीस आणि स्टेशन मास्तरचा काही उपयोग नाही आत्ता. मुझे मुर्तजापूर पहुचना है."
एका क्षणात धनंजयला रिलीफ वाटला. कोणीतरी बराच वेळ मुस्कट दाबून ठेवल असेल आणि श्वास रोखून धरला असेल त्यानंतर नाकावरचा हात काढल्यावर कसे वाटेल तसे धनंजय ला वाटले .
ओ , ही भानगड आहे तर. ओके , गुंड बिंड मागे नाहीत तर. घरचे लोक शोधात असतील म्हणून ! मग बरोबर आहे, अशी लपून छपून जाते आहे. धनंजय ला आता खूप धीर आला. तो खाली बसला.
" पण कोण तुम्ही आणि का अशा घरी न सांगता रात्रीचे निघाला आहात ? कोण आहे मुर्तजापुरला आणि का एवढी घाई आहे तेथे पोचायची?." धनंजयने एकाच वेळी मनात आलेले सर्व प्रश्न एका दमात विचारून टाकले. आता त्याचा आवाज जरा जरबीचा झाला.
" सांगते भाईजान. मी जवळ जवळ तीन तास वेटिंग रूमच्या लेडीज टॉयलेट मध्ये बसून काढलेत. आणि आता गाडी लागताच डब्यात शिरले आहे. काफी देर पानी भी नही मिला. बडी प्यास लगी है”
धनंजयने आपली पाण्याची बाटली पुढे केली. आता त्याला खूप धीर आला होता आणि घरातून रात्री बेरात्री वेड्यासारखी पळून आलेल्या मुलीची जबाबदारी वाटू लागली होती.
पाण्याचा घोट घेऊन ती मुलगी म्हणाली " माय नेम ईज यासीन "
" डॉक्टर यासीन मोहम्मद शेख "
“मी मालेगाव हून आले. मेरे अब्बाजान कि पावर लूम है, मालेगाव मे. क्या भाईजान आप, मुझे मुर्तजापूर तक साथ दे सकते है. बडी मेहेरुबानी होगी आपकी. आपको भगवान खूप आशीर्वाद देणार. प्लीज . “ धनंजयला काय उत्तर द्यावे हेच सुचेना.
"भाईजान , मुझे मालूम है कि आप जळगाव उतरने वाले है- तीन बजे - चार्ट मे लिखा पढा मैने. मुर्तजापूर सुबह सात बजे आयेगा. आपको तकलीफ होंगी मगर ये मेरे “लाईफ अॅ ण्ड डेथ “ का सवाल है. "
आता धनंजय खूपच गोंधळात पडला. मुलगी सुंदर , सुशिक्षित, म्हणजे चक्क डॉक्टर , चांगल्या सधन घरातली दिसते. बापाचा कारखाना आहे. त्याला काही कळेना कि हे काय गौड बंगाल आहे. त्याला संशय आला ,कि ही वेडी तर नसेल? नाही , मुलगी धीट वाटते पण वेडी नाही आणि दिसते त्यापेक्षा मोठ्ठी आहे , साधारण बावीस वर्षांची असेल , धनंजय ने आपल्या वयोमानाच्या अंदाजात फेरफार केला. तरीही घरचे लोक शोधतायत हा काही “लाईफ अॅलण्ड डेथ” चा प्रश्न होऊ शकत नाही!
हा काही रेल्वेतल्या फसवणुकीचा तर प्रकार नाही ? त्याने बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या कि प्रवाशांना कसे लुबाडले जाते ते. पण त्याच्याकडे तर काहीच सामान नव्हते . पाकिटात सुद्धा परतीचे तिकीट आणि थोडी कॅश . नाही हे प्रकरण काही तरी बालंट आणू शकतं. असं तर नाही ना कि काही ब्लॅकमेल वगैरे. त्याच्या मनात पाल चूकचूकली . आता त्या मुलीच्या सौदर्याचा आणि गोड आवाजाचा त्याच्यावर प्रभाव पडेनासा झाला.
“मुर्तजापूरला कोण आहे. का जाताय तुम्ही तेथे घर सोडून ? आणि मालेगावहून बस नि जाता येतं. उलट मनमाडला का आलात ? " धनंजयने संशय आवाजात आणून प्रश्न केला.
“मै बससे जाती तो कबकी पकडी जाती. “लगेच उत्तर आले.
" मुर्तजापूरको मेरे शोहर है. " यासीनने एक मोठ्ठा बॉम्ब टाकला.
“माय हसबंड इज इन मुर्तजापूर. ही इज ऑलसो अ डॉक्टर ”
" व्हॉट?" धनंजय उदगारला
यासीन त्याच्या या उदगाराकडे दुर्लक्ष करून पुढे म्हणाली “"डॉक्टर अभय अकोलकर "
धनंजयच्या डोक्यात आता प्रकाश पडला. बरोबर आहे , मुसलमान मुलगी आणि हिंदू मुलगा. घरचा विरोध असणारच.
"अच्छा , असं आहे तर. कधी लग्न झालंय तुमचं ? " धनजंयने आता जरा सहानुभूती पूर्वक प्रश्न विचारला.
" दो दिन पहेले, मालेगाव कोर्टमे. आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. तीन वर्षापूर्वीच आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. अभयच्या घरी विरोध होता पण मी त्याच्या आई वडिलांना भेटल्यावर विरोध पूर्ण गेला पण त्यांना काळजी वाटत होती . त्यांची एकच अट होती आणि मला ती मान्य होती ती म्हणजे अभय धर्म नाही बदलणार. मलाही अभयने मजहब बदलणे मान्य नव्हते. मला माझी मुलं उनके बाप के मजहबकी होना पसंद है . अभय का मेरे उपर मजहब बदलनेका कोई प्रेशर नही है मगर मैने अम्मीजान को बोल डाला कि मै हिंदूओ कि तरह सारी रस्मे करूंगी और मंदिर भी जाऊंगी."
"दोनच दिवस झाले? मग तुझा नवरा ...अभय कुठे आहे? " धनंजयला पडलेला प्रश्न स्वाभाविक होता.
“मी अभयला कोर्टातूनच मुर्तजापुरला परत पाठवले. त्याला सागितले की अब्बाजान आणि अम्मीला मी समजावेन आणि मग तुला मालेगावला भेटायला बोलवेन.” यासीन म्हणाली
"मग ? पुढे काय झालं? आई वडिलांनी मानलं नाही का तुमचं लग्न?" धनंजयने जे अपेक्षित होतं तेच विचारलं.
“नही, पण मला वाटलं नाही एवढा विरोध झाला. अब्बाजान नि मेरे बडे चाचाजान को प्रॉमिस दिया था के बँकका कर्ज वो चुकाएन्गे तो मेरा निकाह उनके बेटे से होगा. “
धनंजयला कळेना कि तो हे सगळ का ऐकतो आहे आणि त्याचा काय संबंध ?
यासीन पुढे सांगू लागली “मुझे मालूम न था और होता तो भी मै कभी नही मानती. चाचाका लडका एक अनपढ गुंडा है. उसका तलाक भी हुवा है. उमरमे मेरेसे दस साल बडा है. सारी बुरी आदतोसे खराब. उन लोगोके पास बहुत पैसा है बस मगर तमीज जरा भी नही. आणि अभय वर प्रेम मी कॉलेज मध्ये भेटल्यापासून करते आहे.”
"अहो यासीन , पण तुमचे आता लग्न झाले आहे. तुम्ही आई वडिलांना सांगितले आहे. त्यांनी मानले नाही म्हणून घर सोडून निघाला आहात आणि आता मुर्तजापूरच्या ट्रेन मध्ये आहात. आता फक्त सहा तासांचाच प्रश्न आहे . तुम्ही तुमच्या नवऱ्याला भेटाल , सर्व ठीक होईल. काळजी करू नका. आपण जागे राहू. कोणीतरी सोबत तुम्हाला जळगावला येईलच. काय? "
"भाईजान . खूप कॉम्प्लिकेशन झालेत. अम्मी मान गई पर अब्बाजान , चाचाजान और अब्बास नही माने. कल मेरा निकाह अब्बास के साथ रचानेके लिये दूरसे मौलवी लाये. ये देखिये, सारी मेहंदी करी."
आता धनंजयच्या लक्षात परिस्थितीचे गांभीर्य येऊ लागले होते. त्याच्या कडे दोन पर्याय होते. एक तर या मुलीबरोबर कुपेत राहायचे आणि तिला सोबत द्यायची , नाहीतर डबा बदलून दुसरीकडे जाऊन बसायचे. पण काय हरकत आहे तिला सोबत द्यायला ? निदान तिला थोडा धीर येईल. समजा तिच्या घरचे लोक आलेच तर तिला घेऊन जातील . आपला काय संबंध. धनंजयचे मन आता रेसच्या घोड्या प्रमाणे पळत होते.

धनंजयने पाण्याची बाटली यासीन च्या हातात दिली आणि तो उठून दाराकडे गेला. एवढा वेळ गाडी मनमाडलाका थांबली आहे असा प्रश्न पडे पर्यंत गाडी हलली . हातात रंगीत लॅम्प घेऊन गार्ड त्याच्या डब्यावरून शेवटच्या डब्याकडे जात होता . धनंजयने विचारणा केली " साहब, क्या बात है? क्यो लेट हो गया? " गार्डनी उत्तर दिले " कुछ लोगोने काफी डीब्बोमे चेन खीचा था " धनंजयच्या छातीत धस्स झाले. तो घाईत आत वळला . त्याला वाटले कि याचे काहीतरी कनेक्शन यासीनशी असेल.
त्यांनी आत येऊन यासीनला प्रश्न केला " कोण माणसं तुझ्या मागावर आहेत ?"
यासीन म्हणाली " अब्बासची माणसं सगळी कडे शोधताहेत . त्याला वाटते कि मी आणि अब्बाजाननी गद्दारी केली. चाचाजानने लाखोंका कर्जा जो चुकाया है मेरे अब्बाजानका !"
"पण मग तू बुरख्यात असतीस तर तुला कोणी ओळखल नसतं" धनंजयने आपला साधा सुधा विचार बोलून दाखवला.
"भाईजान , उलट आहे. मी मुद्दाम पर्दा केला नाही. मला अब्बासची माणसं ओळखत नाहीत म्हणून वाचले. हिंदू मुलगी दिसते कि नाही मी सांगा बरं ? " यासीन मधली निष्पाप आणि बालिश मुलगी बोलली.
या क्षणी धनंजयला तिची कणव आली. हीच मुलगी मुंबईत असती तर कुणी ती हिंदुशी लग्न करते का ख्रिस्ती मुलाशी याचा विचारही केला नसता. पण आपण मुंबईच्या बाहेर एका जंगलात आहोत याची आता जाणीव झाली. येथे श्वापदाची झडप झाली तर कोणीही वाचवायला नाही या विचारांनी त्याच्या अंगावर काटा आला.
"हो पण, नाऊ यु आर ऑल राईट ." धनंजय म्हणाला " मी आता मुर्तजापूर पर्यंत यायची काय गरज?”
"भाईजान , आहे. जरा सोचो. तुम्ही जर असाल बरोबर तर आपण दोघे शोहर आणि बिवी दिसू. " धनंजयला त्या परीस्थितीत हसू आले.
" भाईजान , सॉरी सॉरी. शोहर आणि बिवी नाही तर नवरा आणि बायको. बराबर ? "
धनंजयने तिच्या हो मध्ये आपला हो मिळवला.
"तुम्ही मला अभय कडे पोचवलेत कि मी खोटा नवरा सोडून खऱ्या बरोबर जाईन." ती स्वताच्या इनोसंट विनोदावर गोड हसली.
"पण नंतर तूझे लोक मुर्तजापुरला येतीलच. " धनंजयने भीती व्यक्त केली.
"हम बंबई जाके बसने वाले है. वहां दोनो प्रॅक्टिस करेंगे. अभयके पिताजीने बंबईमे कोई इंतजाम किया है. " यासीन कडे उत्तर तयार होते. धनंजयला वाटले की खूप विचार करून यासीन बोलतेय.
गाडीने वेग घेतला होता आणि यासीन फिल्मी मासिक घेऊन चाळत बसली.
धनंजयची बुद्धी मात्र आता गारठली होती. त्याला आता खूप भीती वाटू लागली होती. त्यांनी यासिनला गार्ड काय म्हणाला ते सांगितले नव्हते. नाहीतर ती खूप घाबरली असती. त्यात यासीन काय म्हणाली त्याचीच आता धनंजयला जास्त भीती वाटत होती. यासीनला अब्बासचे लोक ओळखत नाहीत . अर्थात अभयला पण ओळखत नसणार . पण जर त्यांना त्या दोघांचा संशय आला तर ते त्यालाच अभय समजतील! या विचारांनी तो खूप अस्वस्थ झाला.
पुढचं स्टेशन चाळीसगाव आता काही मिनिटावर होतं. धनंजयनी स्टेशनला उतरून थोडी चाहूल घ्यायचं ठरवलं. आता त्याला कॉफीची नितांत गरज होती.
त्यांनी यासीन कडे पाहिलं. किती सुंदर आणि निष्पाप मुलगी दिसत होती. सुंदर पणात इनोसन्स असेल तर सौंदर्य किती दैवी वाटतं असा विचार धनंजयच्या मनात आला . अभय खरच भाग्यवान आहे. धनंजयला आपल्या भावी पत्नीची रूपरेखा आता दिसू लागली. त्याला वाटले कि आई म्हणते ते खरे आहे . आता उगीचच उशीर करण्यात काही अर्थ नाही. नाहीतरी आयुष्य होस्टेल मधल्या मुलात आणि जळगावला मित्र मंडळीत टवाळक्या करण्यातच जात आहे न. आता सिरिअस व्हायला हवे.
गाडी चाळीसगाव स्टेशनात आवाज न करता आली. एक चहाचा स्टॉल उघडा होता. यासिनला तो म्हणाला " शांत बस, मी कॉफी घेऊन आलोच." दोन्ही बाजूला पाहून धनंजय गाडीतून उतरला.
स्टॉल पाशी एक कुत्र पहुडल होतं. धनंजय जवळ येताच ते संशयाने त्याच्या कडे बघू लागलं आणि न आवाज करता शेपटी आत घालून आदरानी त्याच्या कडे बघत बघत दूर झालं. स्टॉलच्या पोरानं कॉफीचे दोन ग्लास ओतले. धनंजय ते घेऊन वळला तोच त्याला पळण्याचा आवाज ऐकू आला. एका डब्यातून एका माणसाने उडी घेतली त्याच्या पुढे एक माणूस पळत होता. दोन्ही माणसांनी पठाणी सलवार आणि लांब कमीज घातलेले होते. त्यांच्या चेहेऱ्याकडे त्याला बघता आले नाही कारण दाढीने चेहेरे झाकले गेले होते पण त्यांनी डोक्यावर पांढऱ्या गोल विणलेल्या टोप्या घातल्या होत्या हे त्याला दिसले.
धनंजयच्या छातीत कळ आली. तो घाई घाई नं आपल्या डब्याकडे परतला. हातातील कॉफी हिदकळत होती. धनंजय डब्यात शिरला आणि दारातून कुपे कडे जायला वळला . फलाटावरचा उजेड आत येत होता. त्यांनी हळूच हाक मारली "यासीन" . काही उत्तर आले नाही. पडदा बाजूला करून त्याने पाऊल कुपेत टाकले आणि तो तेथेच गारठला. त्याच्या हातातून कॉफीचे ग्लास खाली निसटले. त्याच्या तोंडातून आवाज फुटेना. त्यांनी पहिले कि यासीन खाली जमिनीवर निपचित पडली आहे आणि तिच्या गळ्यातून वाहिलेल्या रक्ताचे मोट्ठे थारोळे झाले आहे. त्यांनी तिच्या अचेतन देहाकडे बघितलं आणि त्याला कळलं कि ती आता जिवंत नाही.
त्याला आता काय करायचं हे कोणी सांगण्याची गरज नव्हती. त्यांनी डब्यातून अक्षरशा उडी घेतली आणि दिसेल त्या दिशेने धावायला सुरुवात केली. फलाटावर काही मदत दिसत नव्हती. काही काळ त्याला कोणतीही गोष्ट लक्षात येत नव्हती का सुचत नव्हती . नंतर त्याच्या लक्षात आले कि आता पोलीस त्याच्या शोधात निघतील आणि तोच पहिला संशयित ठरेल. तेंव्हा त्याने आपला पळण्याचा वेग कमी केला .
पुढे त्याला स्टेशन मास्तरच्या रूम ची आडवी पाटी दिसली. तो धडक आत शिरला. आत काळा कोट आणि पांढरी पँट घालून स्टेशन मास्टर कानाला फोन लावून बोलत होता. बहुतेक पुढच्या स्टेशनशी त्याचा संपर्क चालू होता. प्रथम धनंजयच्या तोंडून शब्द फुटेना. जेंव्हा फुटला तेव्हा आरोळी सारखा आवाज त्याच्या तोंडातून आला. स्टेशन मास्तर दचकून त्याच्याकडे बघत होता. चार वाक्यात धनंजयने त्याच्या डब्यात खून झाल्याचे सांगितले. धनंजयकडे स्टेशन मास्टर अविश्वासाने बघतच राहिला. धनंजयने त्याच्या कोटावर असलेला नावाचा बिल्ला पाहिला त्यावर डी. बसु असे लिहिले होते. धनंजय मोठ्याने ओरडला "मिस्टर बसु. चलो जल्दी " .
दोघे धावतच डब्याकडे पोहोचले . धनंजयचे मन आत जायला धजावत नव्हते. त्याने नुसतीच हाताने खूण केली. बासू प्रथम आत शिरले. त्याच्या मागोमाग धनंजय शिरला त्यांनी कुपे दाखवला. बासू पडदा बाजूला करून आत शिरले . त्यांच्या मागून धनंजय आत डोकावला. त्यांनी खाली पहिले. यासीन किंवा तिचे शरीर तेथे नव्हते.
धनंजय सुन्न झाला होता. बासू बाहेर पडून रूम कडे निघाले. त्यांना जळगाव स्टेशनला फोन करून सांगायचे होते. तसेच पोलीस बोलावण्यासाठी तेथे सूचना द्यायच्या होत्या. गाडीला सिग्नल मिळाला होता. गाडी थांबवून ठेवण्यात काही अर्थ नव्हता.
रूम मध्ये शिरता क्षणी बासू फोन कडे धावले आणि धनंजय खुर्चीत कोसळला . काही सेकंद झाले असावेत पण त्याला काहीतरी पूर्व सूचना झाली आणि त्याने दाराकडे पहिले. तीच दोन माणसे आत शिरत होती.
पहिल्यांदा त्यांनी बासू वर हल्ला केल्याचे धनंजयने पहिले. त्या माणसांच्या हातात सुरे होते. आता काय होतंय याची वाट न बघता धनंजयने दरवाज्याकडे झेप घेतली आणि बाहेर येता क्षणी धावत सुटला. काही काळ दिशाहीन पळाल्यावर त्याच्या लक्षात आले कि आपण फलाटाच्या शेवटी पोचलो आहोत . त्याने मागे वळून पहिले . ती दोन माणसे त्याच्या मागे पळत येत होती. धनंजयला आता कोणताही पर्याय नव्हता . तो रुळावर उतरून पळायला लागला.
किती काळ लोटला असेल हे त्याचे त्यालाच कळले नाही. अंधारात काहीच दिसत नव्हते . अडखळत आणि धापा टाकीत तो फक्त रुळांच्या बरोबरीनं धावत होता. मागे ते लोक येताहेत का नाही हे सुद्धा त्याला माहित नव्हते. सगळीकडे, आजूबाजूला , पुढे आणि पाठीमागे अंधाराचे साम्राज्य पसरले होते आणि धनंजय वेळ, जागा आणि भान या सर्व गोष्टींच्या पलीकडे गेला होता.
आता त्याला उजेड दिसू लागला . हळू हळू त्याला दिसू लागले कि स्टेशन आले. फलाटाचे दिवे दिसायला लागले. गाडी उभी होती वाटतं. कसाबसा फलाटावर तो पोचला . चहाच्या स्टॉल पाशी कुत्रे बसले होते. कुत्र्यानी त्याच्याकडे बघून आदराने माघार घेतली. स्टॉलचा पोऱ्या अजून कॉफी ओतत होता. पुढे गेल्यावर स्टेशन मास्तरच्या रूमची पाटी आली. खूप पळण्यानी त्याची दृष्टी आता धूसर झाली होती. त्याने आत पाऊल टाकले तर स्टेशन मास्टर फोन वर बोलत होते. बोलता येईना म्हणून धनंजयने टेबलावर हात आपटला. स्टेशन मास्तरांनी वळून पाहिल. धनंजयला आश्चर्य वाटलं. त्याच्या समोर डी. बसु उभे होते.
धनंजयनं मागं वळून पाहिलं. गाडी स्टेशन मध्ये उभी होती. तो गाडीच्या दिशेने धावायला लागला. डब्यापाशी येऊन त्याने आत झेप घेतली आणि पुढे जाऊन कुपेचा पडदा बाजूला केला . यासीन त्याच्या कडे अगतिक पणे बघत होती. त्याला यासीनचे शब्द ऐकू आले " आय एम इन ट्रबल. भाईजान. मेरी मदत किजीये " आणि त्याच्या भोवतीचे सर्व जग विरून गेले.

धनजंय आता फलाटावर झपाझप चालत होता. डब्यापाशी येण्यापूर्वी वाटेतल्या स्टॉल वरून सफाईनं एक फिल्मी मासिक माधुरी दीक्षित चा कवर वरचा फोटो बघून उचललं, आणि पैसे टाकून पुढे सरला. विक्रेत्याने मान सुद्धा वर केली नाही . धनंजय डब्याच्या दारापाशी थबकला आणि त्यानं खळीनं चिकटवलेल्या लिस्ट कडे नजर टाकली . एकदम डी मध्ये जाऊन धनंजय देशमाने नावा पुढचा बर्थ नंबर पाहिला आणि डब्यात चढण्यापूर्वी त्याच्या लक्षात आले कि त्याच्या कुपे मधली दुसरी बर्थ मनमाडची राखीव बर्थ आहे. धनंजयने घड्याळाकडे बघितले तेंव्हा बरोबर १० वाजून ४५ मिनिटे झाली होती……… ………………………..

----------------……..----रिप्ले----…….
----------------……..----रिप्ले----…….

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Avadli...
Fakt tapshilat ek gaflat ahe... Mumbai hawrah mail hee 'mumbai' hun ratri 8.40 chya darmyan sutate. Agdi hi kalpanik hawrah mail ahe mhatle tari 10.45 la mumbai (mhanje cst kinva dadar) hun sutlelelya train ne jalgaon 3 wajta yenar nahi.) Happy

कथा आवडली. सुरुवात जरा संथ होते पण नंतर चांगला वेग घेते. त्यांनी खाली पहिले. यासीन किंवा तिचे शरीर तेथे नव्हते. हा उच्च बिंदू आहे.

शेवट छान पण कदाचित अजून जरा खुलवता आला असता का?

छान... Happy