घोडचूक

Submitted by डॉ अशोक on 7 August, 2012 - 12:46

घोडचूक

पैठणला असतांना जवळच जायकवाडी वसाहतीतल्या खुल्या कारागृहाला "व्हिजीटींग मेडीकल ऑफिसर" म्हणून आठवड्यात एक भेट द्यावी लागत असे. प्रभातच्या गाजलेल्या "दो ऑंखे बारह हात" या चित्रपटापासून प्रेरणा घेवून महाराष्ट्र शासनानं हा प्रयोग राबवला आहे. दीर्घ मुदतीची शिक्षा झालेले आणि शि्क्षेच्या कालावधीत चांगले वर्तन असणारे कैदी वेगवेगळ्या तुरूंगातून इथं पाठवले जातात. तुरूंगाच्या मालकीची बरीच शेतजमीन आहे. तिथं कैदी शेती करतात. संध्याकाळी परत येतात. रहायची, जेवणाची चांगली व्यवस्था आहे. एक वैद्यकिय अधिकारी किरकोळ आजारांवर उपचारासाठी आहे. तुरूंगातल्या करड्या शिस्तीच्या मानाने इथलं वातावरण बरंच मोकळं आहे. वर्षातून एकदा घरी जाण्याची परवानगी मिळते. सुटका झाल्यावर इथे केलेल्या कामाची जमा मजूरीची रक्कम रोख स्वरूपात मिळते आणि त्यातून नवं आयुष्य सुरूवात करायला आर्थिक बळ मिळते.
*
मी व्हीजीट दरम्यान तिथल्या वैद्यकिय अधिका-याला मार्गदर्शन करावे आणि एकुण वैद्यकिय आणि आरोग्य सुविधेवर तुरूंग प्रशासनाला मदत करावी अशी एकुण व्यवस्था होती. मी गेलो की आजारी कैदी तपासणे, किचनला भेट आणि तुरुंगातली इतर आरोग्य व्यवस्था पहाणे असा कार्यक्रम चाले. परत येतांना कैदी तुरुंगाच्या शेतावरची ताजी भाजी वांगी, कांदे, कोबी इत्यादी देत असत. कधी ऊस असायचा. वर्षातून एकदा तरी हुरडा खायला निमंत्रण असायचं. मला हा प्रकार सुरूवातीला पचवणं अवघड गेलं. पण तुरुंग अधिका-यांनी समजावलं की यात ऑकवर्ड वाटण्या सारखं काही नाही. एकदा भाजीचा गठ्ठा विसरून राहिला. तर संध्याकाळी उशीरा एक कैदी ते सगळं पार्सल टोपलीत घेवून घरी आला. जवळपास दहा किलोमीटर अंतर पायी चालत तो आला होता. अंगावर तुरुंगाचाच वेष होता. मी समजावून सांगितलं तरी तो खूर्चीवर न बसता खालीच फरशीवर बसला. आपण पिकवलेल्या वांग्यांची तारिफ करत त्यानं वांगी, कांदे इत्यादीचे टोपली रिकामी केली. सहज चौकशी करावी म्हणून मी त्याला कशाबद्दल शिक्षा झाली ते विचारलं. त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. चौदा वर्षापैकी दहा वर्षे शिक्षा भोगून झाली होती. तुरूंगातलं त्याचं वर्तन बघून त्याला आता खुल्या कारागृहात आणलेलं होतं. इथं दोन वर्ष काढली की तो बाहेर येवू शकणार होता. (खुल्या कारागृहात एक दिवस राहिला तर दोन दिवस शिक्षा भोगली असं गणित होतं). तो गेला तरी त्याचा विचार मनातून जाईना. पुढच्याच भेटीत तो परत दिसला. मी तुरुंगातल्या वैद्यकिय अधिका-याला विचारलं तेंव्हा कळलं की त्यानं त्याच्या बायकोचा खून केला होता. तिच्या चरित्र्यावर याला संशय आला अणि म्हणून एके दिवशी यानं तिला खतम केली इतकं कळलं.

*
त्यानंतर एकदा तो आजारी पडला. माझ्या व्हीजीट दरम्यान मी त्याला तपासत असतांना मला माझं मन स्वस्थ बसू देइना. मी त्याला विचारलं: "तू काय केलंस म्हणून तुला शिक्षा झालीय ही?" निर्विकरपणे माझ्याकडे पहात तो म्हणाला: "मड्डर! मड्डर केला मी माझ्या बायकूचा!" बापरे! मला हे महित होतं, पण त्याचा आवाज आणि हे सगळं सांगायची स्टाइल यानं मी नाही म्हटलं तरी चपापलोच. त्यानंतर प्रत्येक व्हिजीट मधे मी त्याच्याशी एक दोन शब्द बोलत असे. हळूहळू तो माझ्याशी खुलेपणानं बोलायला लागला. त्याची सगळी केसच मला कळाली. एकदा मी त्याला विचारलं: "तुला पश्चाताप होत नाही कां या सगळ्याचा? आपली चूक झाली असं नाही वाटत तुला?" त्यानं थोडा विचार केला आणि मग म्हणाला: "डॉक्टरसाहेब, चूक तर झालीच माझी. पण एक घोडचूक पण झाली की माझी. " मी विचारलं: "कोणती?" तो म्हणाला: "अहो, मड्डर केला त्या दिवशी माझ्या बायकू बरोबर जो झोपलेला होता त्याला नाय मारलं ना म्या ! बायकूलाच मारलं म्या फकस्त!" आता मात्र मला रहावेना, मी विचारलं: "कां नाही मारलं? कोण होता तो?" माझ्याकडे, जणू काही मीच "तो" असल्या सारखा पहात तो म्हणाला: "त्या दिवशी माझ्या बायकू बरोबर झोपलेला, दुसरा तिसरा कुणी नव्हता, माझा बाप होता डाक्तर! आणि म्या मारलं ते फकस्त माझ्या बायकूला ! माझ्या बापाला जित्ता सोडला की म्या ! घोडचूक नाय तर काय म्हननार याला डाक्तर?"

-अशोक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users