पैठणी

Submitted by बागेश्री on 4 August, 2012 - 01:24

बहरलेल्या यौवनावर हिरवीकंच पैठणी रूबाबदार दिसावी,
तसं जगणं...

इच्छांना जरतारीचे असंख्य धुमारे, पदराला न पेलवतील असे
म्हणूनच पदर सांभाळत वेगाने वाटचाल करणं जिकीरीचं होत जाणारं!

जरीचे काठ, गोल फिरून पायापर्यंत उतरणारे, तसाच कर्तव्यांचा विळखा..
दिसताना लोभस पण तितकाच आवळणारा...

रंग खुलणारा, आमंत्रण देणारा- रस्त्यातले काटेही त्याच रंगात मिसळलेले,
म्हणूनच न जाणवणारे, खोल रूतून बसणारे, आपल्या आणि आमंत्रिताच्या!

त्या भुलवणार्‍या यौवनात, नक्की काय खुणावतंय
हे समजेपर्यंत होणारी सांज...
लोपलेले धुमारे,
पूर्ण- अपूर्ण कर्तव्य,
जीर्ण होत गेलेला रंग.....

पण जीवापाड जपलेल्या पैठणीला कुरवाळून छातीशी धरताना,
घामाचा नि अत्तराचा विरत आलेला गंध, त्याचा कैफ, काही औरच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यौवनात आलेल्या कुमारिकेने घरातील रितीरिवाजानुसार वागताना तिचा झालेला कोंडमार या कवितेतुन प्रकट दिसतो. चु.भु.दे.घे.

यौवनात आलेल्या कुमारिकेने घरातील रितीरिवाजानुसार वागताना तिचा झालेला कोंडमार या कवितेतुन प्रकट दिसतो. चु.भु.दे.घे.

>> प्रत्येकाने हा अर्थ असाच घेतला असल्यास कविता फसल्याचे मान्य करते आहे.

बहुधा म्हणूनच वास्तव व प्रतिमा यांचा धूसर संबंध असता तर व्यापक वाव मिळाला असता हे माझे विधान बर्‍यापैकी योग्य ठरते असे वाटते

बहुधा म्हणूनच वास्तव व प्रतिमा यांचा धूसर संबंध असता तर व्यापक वाव मिळाला असता हे माझे विधान बर्‍यापैकी योग्य ठरते असे वाटते>> सॉरी, अजूनही सहमत नाही.
हा वेगळा - जरा थेट तरीही बराचसा तर्क लावू शकत असणारा आ़कृतीबंध होता, थोडी सवड व गहन विचारांअंती "कदाचित" पोचला असता. तसेही, लिहीताना एखादा ज्या तरतेला जाऊन लिहीतो, अगदी त्या तरतेला वाचकाने जाऊन वाचणे, ग्रहण करणे हे अपे़क्षा चूकीचीच आहे म्हणा... (मी वाचक असताना हाच नियम मला लागू) प्रत्येकाचा रस, आवड, अभ्यास जाण वेगवेगळी आणि तरलताही. कविता फसण्यामागचे कारण थेट प्रतिमा (अर्थाच्या) दिल्यात हे आहे, हे स्वतःला पटवण्याचा प्रयत्न करूनही पटले नाही, क्षमस्व.

कविता फसलेली आहे याच्याशी मी सहमतच नाही आहे मुळात. माझ्यामते ही परीपूर्ण कविता आहे. निव्वळ एका कुमारिकेशी अथवा अश्या मनोवस्थेतील स्त्रीशी संबंध जुळू नये म्हणून तो 'प्रतिमा - वास्तव' पूल धूसर असता तर, असे म्हणत आहे

'लाईफ अ‍ॅट अ ग्लान्स' असे या कवितेचे मूळ स्वरूप!

आयुष्यातील सुखद व दु:खद घटकांची हतबुद्ध करणारी पण तरीही गुंतवून ठेवणारी भेसळ मुक्तपणे व्यक्त होऊ देणे हा या कवितेचा सांगाडा असावा. फ्रेमवर्क!

मन (म्हणजे मनातील, मेंदूतील विचार, या विचारांमागे अनेक वर्षांचे अनुभव व स्वतःचा स्वभाव यांची पार्श्वभूमी) एका 'स्वतःलाच - त्या मनाच्या मालकालाच - जेथे पोचता येत नाही' अशा अवस्थेत असताना त्या मनाला हातातील कबूतराला उडवावे तसे उडू देताना वरील मुक्तछंद आविष्कृत झालेला वाटतो.

काही फरक पडत नाही अश्या कविताच काय, कोणत्याच कविता वा काव्यरचना जगात नसल्याच तर! माणसाचे आयुष्य चालूच राहते. ते तसेही बरेचदा गद्य असतेच. त्यामुळे फरक पडत नाही.

पण चॉकलेट आतमध्ये असलेले व वरून वेगळेच आवरण असलेले आईसक्रीम किंवा बिस्किट खाताना आतले चॉकलेट पहिल्यांदा जिभेवर जाणवते तशी कविता वाचायची सवय असण्यात गैर काय? वरवर वाचली की पुन्हा वाचावी आणि 'ह्यॅ, मला अज्जिबात आवडली नाही' असा एक हेतूपुरस्पर हेतू मनात धरून आणखीन एकदा वाचावी. असा हेतू धरून वाचली की आपल्याला खिजवत खिजवत कवितेतील बलस्थाने वाकुल्या दाखवून सरफेसवर यायला लागतात आणि व्हॅनिलाच्या थराच्या आत काही वेगळे असल्याचे जाणवते.

पण ते कवीने स्वतःहून सांगणे योग्य नाही - की आत आणखीन एक, त्याही आत आणखीन एक, असे काही थर आहेत

(बाकी आंतरजालावर, जेथे त्वरीत प्रतिसादांची सोय असते तेथे कवीला व रसिकांना कवितेवरील संवादाचा मोह होणे हेही नैसर्गीकच. आधीच्या पुस्तकातून भेटलेल्या कवींची 'पोस्टपब्लिशिंग' हळहळ कशी व्यक्त होत असेल कोण जाणे)

मुद्दआ अन्का है अपने आलमे तकरीरका या गालिबच्या उक्तीनुसार त्याच त्याच शब्दांना वळवून आणि त्यांच्या मिश्रणांचे पुरण घालून मैफिलीचा सण साजरा केला जातो व तसाच तो करणे शक्य असते. मराठी कवितेत अरबी भाषेतील सौंदर्य कसे मिसळता येईल?

त्यामुळे वरील कवितेत मराठीतील तेच तेच शब्द आलेले आहेत. पण त्यांच्या मिश्रणाचे पुरण काय घेऊन आलेले आहे, 'मुद्दआ अन्का' आहे की नाही हे बघण्यात खरी गंमत!

पैठणीला स्वतःचे शरीर गृहीत धरले तर कवितेचा अर्थ उलटाच्या पालटाच होईल नाही का?

पण तो ज्याचा त्याचा चॉईस!

कविता सुरू झालेली तर आहे, पण संपलेली, संपवलेली मुळीच नाही. एक सुखद अर्धवटपणा, 'अधुरेपन' 'तोंड चाळवले गेले' असे जसे म्हणतो तसे 'अजून काही लिहायला हवे होते' अशी भावना निर्माण करते.

कवितेचे वर्णन फार झाले.

रसग्रहण करू जमेल तसे:

माझ्यामते या कवितेला 'लिंग' नाही. पुरुषाच्या अनुभुती तितक्याच समर्थपणे मॅच होतील अशी कविता केली गेली आहे. निव्वळ पैठणी, काठ, जरतारी या उल्लेखामुळे लिंग ठरवले जाईल , पण नाही ठरवले गेले तर एक आतला चॉकलेटचा थर मिळावा.

हिरव्याकंच पैठणीला कवयित्री (सोयीसाठी 'कवी') श्रेय देत नाही. (तात्पुरते) श्रेय मिळते 'बहरलेल्या यौवनाला'! मनातील स्वप्ने, योजना, ध्येये ही केवळ तारुण्यावस्थेतच असतात असे नाही. सत्तरीतही सर्व भावना त्याच असतात ज्या तारुण्यात असतात, पण सत्तरीत पैठणी चांगली दिसत नाही आणि तारुण्यात काहीही चांगले दिसते.

यामुळे पैठणीचे श्रेय नाही. मग श्रेय उभारीचे का? स्वप्न पाहण्याच्या, योजना करण्याच्या वगैरे? तर असे दिसते की तेही तात्पुरतेच! म्हणूनच कवी म्हणतो की 'हे समजेपर्यंत होणारी सांज'!

फोकस सतत बदलता राहतो, या संदेशावर ही कविता 'हे समजेपर्यंत होणारी सांज' या ओळीद्वारे अतिशय अलगद उतरते. पण माणसाचे (येथे, रसिकाचे, वाचकाचे) मन अजूनही पैठणी आणि जरतारीत गुंतवले जाते. (हे हेतूपुरस्पर केले असल्यास कवीचे कसब मोठे, नाहीतर लकीली 'हेही' झाले असे म्हणता येईल).

म्हणजे पुढचे स्टेशन येऊनही माणसाला मागच्याच स्टेशनवर थांबावेसे वाटत आहे, अशी कविता बहुतेकदा झिंग आणू शकते.

तर पैठणीही नाही, बहरलेले यौवनही नाही आणि 'समजायच्या आत आलेली सांज'ही नाही. कवयित्री 'भुलभुलैय्या'तून नेल्याप्रमाणे रसिकाला फिरवत राहते. आमंत्रितही काट्यांच्या जखमा सोसत आहेत आणि कवी स्वतः आपणही. पण तरीही आमंत्रणे आहेत, आमंत्रीतही आहेत. याचा अर्थ असा की आपल्या क्षमतेबाहेरचे, नियंत्रणाबाहेरचे असे काहीतरी आहे, जे कशा ना कशात आपल्याला गुंतवत राहात आहे. मग जखमा होवोत नाहीतर सांज!

हस्ती अपनी हुबाबकीसी है या मीरसाहेबांच्या भावनेचा एक कंपोनन्ट येथे दिसतो. शब्द सगळे तेच तेच, पण संभाषणाची शैली निराळी. (तसेही, हजारो वर्षे काव्य निर्माण होत राहिल्यावर आता कवी निराळे काय सांगणार म्हणा)

पण सगळेच संपते तेव्हा काय जाणवते? तर गेलेल्या काळालाच (कसा का असेना, अत्तराचा वा घामाचा, सुगंध वा उग्र दर्प) असा गंध येत होता जो हवाहवासा आहे. म्हणजे यापुढे 'हवेहवेसे' वाटेल असे काही नवीन निर्माण होणार नाही. जे हवेहवेसे आहे ते मागेच घडून गेले आणि तो काळ, ज्या काळात ते घडले, तो काळच एकमेव हवाहवासा घटक आहे. त्या घटना नाहीत, ते सणवार नाहीत, ते आमंत्रीत नाहीत, तो कर्तव्यांचा लाघवी पण बोचरा विळखा नाही. निव्वळ काळ! काळ हवाहवासा आहे आणि तो आणता येत नाही आता पुन्हा

या कवितेत मृत्यू नाही. मृत्यू आणून कविता 'क्षुल्लक' केलेली नाही. अजून जीवन आहे, पण आताच्या जीवनाची एकमजली इमारत फक्त गतकाळाच्या पायावर, गतकाळाच्या भिंतींची व गतकाळाच्या छपराची आहे. या इमारतीला इतर कोणतेही स्वरूप नाही, रंग नाही, स्वाद नाही.

-'बेफिकीर'!

या कवितेला 'लिंग' नाही.>> खूप आभार.
फोकस सतत बदलता राहतो, या संदेशावर ही कविता 'हे समजेपर्यंत होणारी सांज' >>
या इमारतीला इतर कोणतेही स्वरूप नाही, रंग नाही, स्वाद नाही>>
आमंत्रितही काट्यांच्या जखमा सोसत आहेत आणि कवी स्वतः आपणही. पण तरीही आमंत्रणे आहेत, आमंत्रीतही आहेत.>>
हा आणि त्यापुढील सबंध अर्थ...

मन अजूनही पैठणी आणि जरतारीत गुंतवले जाते>> ह्या शब्दांचे वलय कातील आहे, त्या वलयाचा मी फक्त फायदा घेतलाय.

धन्यवाद बेफिकीर!
बरेचसे हायसे वाटले.

पुस्तकातून भेटलेल्या कवींची 'पोस्टपब्लिशिंग' हळहळ कशी व्यक्त होत असेल कोण जाणे>> मनातले बोललात.

रसग्रहण म्हणज सौंदर्यस्थळं शोधणं !
कवितेत जेव्हां रंग. उपमा येतात तेव्हां ती दृश्य उभी करते. हिरव्या रंगाचा वापर यौवनासाठी करताना हिरवीकंच हा वापरलेला शब्द सुंदर वाटतो. इच्छा आकांक्षांसाठी जरतारी पदराची उपमा.. बेमालूम वापरलीये. साडी नेसताना काठ जसा अंगाभोवती येतो ही उपमा कर्तव्यांसाठी वापरण्याला दाद द्यायलाच हवी. अगदी टिपीकल स्त्रीवादी उपमा.. पण वाह अशी दाद घेणारी !

पुढे रंग जीर्ण होत गेलाय हे सांगताना कवयित्री बरंच काही सुचवते. कवितेत गेयता नाही मात्र उपमांची ही उधळण दंग करणारी आहे.

गूढार्थ : हिरवा रंग हा लालसा, इच्छा, मोह दर्शवतो. यौवनाच्या टप्प्यावर या सर्व भावना तीव्र असतात. ती तीव्रता हिरवाकंच हा शब्द ठळक करतो. तसंच ते यौवन बहरलेलं आहे हे ही सूचित करतो. जरतारी पदर ही कडेकडेची सजावट असते. म्हटली तर अनावश्यक, म्हटली तर सौंदर्यसक्त, कलासक्त मनाचे निदर्शक ! पण ज्या पदराला ही सजावट आहे त्या पदराला ती पेलवत नसेल तर.... हा विचार सामान्यांच्या जगण्याशी निगडीत आहे. झोळीची क्षमता जितकी तितकी स्वप्नं पाहता येतात. जरतारी स्वप्नं पेलवत नसतील तर त्या स्वप्नांनी जीवन अवघड होतं.

कर्तव्यांचा विळखाही संपूर्ण आयुष्याला पडलाय. त्यातून सुटका नाही. हे भरजरी वस्त्र आहे जे शरीराला नेसणं भागच आहे. शरीराला वस्त्र जितकं आवश्यक तितकंच जिण्याला कर्तव्य. टाळू म्हणता टाळता येत नाही.

खुलणारे रंग अर्थातच वेगवेगळ्या आशा, अपेक्षा. या आशा आकांक्षांच्या फे-यात अनेक कडू गोड, काटेरी अनुभव येतात. काही मनाच्या कोप-यात खोलवर व्रण देऊन जातात. विसरता न येणारे. हा टप्पा अल्लडपणाचा. प्रगल्भतेच्या वयात प्रवेश करेपर्यंत या प्रवासात काय चुकलं काय बरोबर हे ही समजलेलं नसतं. जेव्हां समजतं तेव्हां आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. काही इच्छांचे धुमारे असेच दफन झालेले असतात. काही पूर्ण अपूर्ण असा लेखाजोखा मांडायची ही वेळ.

एकंदर कविता कुठल्याही आयुष्याचा प्रवास दाखवते.

आशय, विषय आणि मांडणी अप्रतिम आहे.

पैठणीला स्वतःचे शरीर गृहीत धरले तर कवितेचा अर्थ उलटाच्या पालटाच होईल नाही का?>>>>>

बेफीजी :: मीही हेच म्हणालो होतो की त्या पहिल्या ओळीत देहाला जगणं अन पैठणीला यौवन म्हणायला पाहिजे म्हणून

बाकी कवितेचा मी काढलेला अर्थ तुमच्या अन सांजसंध्या यान्च्या इतका सराईत नाहीय पण अगदीच चुकीचा नाहीये ...

असो अजूनही मी सुचवलेला बदल करावा वाटल्यास बागेश्रीचे स्वागतच

वैवकु

'क्षमस्व' .........म्हणू नका बेफीजी .प्लीज !!

असो
मुळात मुद्दा असा आहे की तुम्ही -मी जे सान्गायचा प्रयत्न करत आहोत ते बागेश्रीला पटतय की नाही ?

अन पटल्यास ती काही अ‍ॅक्शन घीईल की नाही वगैरे वगैरे ,,,,,,,

संध्ये, धन्स गो Happy
मी लिहीताना ज्या भावनेत लिहीली, त्या तरलतेला पोहोचून शब्द शब्द उलगडलास, तू लिहीलेले वाचून मलाच ही रचना पुन्हा भावली!

नमस्कार वैवकु,
वैभव तू सुचवलेला बदल, निर्विवाद छान आहे, तो बदल धरून दुसरी एक वेगळी रचना करता येईल इतका चांगला.
सुरूवातीची एक ओळ ह्या कवितेचा/ रचनेचा आत्मा आहे, तोच कसा बदलू?

बहरलेल्या यौवनावर हिरवीकंच पैठणी रूबाबदार दिसावी,
तसं जगणं...>> जगणं कसे आहे, हे वर्णायचे आहे, यौवन नव्हे. जगण्यातला "निव्वळ" एक टप्पा ते यौवन

बागेश्रीजी

आपली कविता आम्हांस कळाली नाही याबद्दल उदार मनाने माफ करण्यात यावे ही विनंती करणेत येत आहे. ज्याप्रमाणे स्व. सुरेशचंद्र पाध्ये यांनी प्रतिपादन केले आहे कि कविता वाचणे याकामी देखील प्रतिभा अत्यंत आवश्यक आहे त्याप्रमाणे अशी प्रतिभा आम्हा अज्ञ जनांच्या ठायी निवास करीत नसल्याने हे असे झाले असावे. यात कवीचा काही एक दोष नसून ग्रेस सारख्या मोठ्या कवीस देखील काही फुटकळ वाचकांनी दुर्बोध म्हटले होते यावरून त्यांचे मोठेपण तत्किंचितही कमी होत नसल्याचे आपल्या निदर्शनास आणून दिले जात आहे. यानिमित्ताने आम्ही एका महत्वाच्या मुद्याला हात घालीत आहोत. कवितेच्या तांत्रिक गोष्टी घोटून पाठ करता येतात, गेयता महत्प्रयासाने साध्य करता येते पण अंगभूत तरलता आणि प्रतिभा या दोन गोष्टी सहजसाध्य नाहीत. ही दैवी देणगीच होय. हे सत्य उमजल्याने आम्ही निमूटपणे विडंबन या काव्यप्रकाराकडे वळालेलो आहोत.

ही कविता सादर केल्याबद्दल कवयित्रिचे आणि कवितेचा अर्थ उलगडून दाखवणा-या विद्वानांचे आभार मानण्यात येत आहे. कृपया या पोष्टीतील कळकळीची भावना लक्षात घेणेत यावी.

रसग्रहण म्हणज सौंदर्यस्थळं शोधणं ! >>> सांजसंध्या - अप्रतिम रसग्रहणाबद्दल मनापासून अभिनंदन.

असं काही सुंदर चर्चात्मक, खेळीमेळीतील साद -प्रतिसाद वाचले की मनापासून आनंद होतो.

पैठणीच असल्याने भरजरी, तलम, सुंदर वगैरे असणारच - पण त्यातील नजाकत दाखवणारा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तिचे वेगळेपणही लक्षात येत नाही ना ....... - सांजसंध्याने हे काम फारच जाणकारीने, कुशलतेने केले आहे.

Pages