श्यामलादण्डकम् !

Submitted by चैतन्य दीक्षित on 31 July, 2012 - 16:14

मध्यंतरी माझ्या एका मित्राकडे त्याची आत्या आणि आतेबहीण काही कामानिमित्त आल्या होत्या. त्या दोघीही शास्त्रीय गायन शिकतात आणि त्या संदर्भात श्री. विकास कशाळकर यांच्याकडे त्यांचे काही काम होते. या मित्राशी शास्त्रीय संगीताबद्दल बर्‍याचवेळा बोलणे होते त्यामुळे त्याने त्याच्या आत्याच्या रियाजाबद्दल बोलता बोलता माहिती दिली. रियाजाला सुरुवात करण्यापूर्वी त्या दोघीही 'कालिदासविरचित श्यामलादण्डकम्' नावाचं स्तोत्र म्हणतात असे त्याने सांगितले. मी हे नांव प्रथमच ऐकल्याने त्याबद्दल त्याला 'आत्याकडून अजून काही माहिती मिळते का ते बघ' असे मी सांगितले. त्यावर त्याने सांगितले की 'हे स्तोत्र नित्य म्हटले असता, ज्या कुठल्या कलाक्षेत्रात तुम्ही अभ्यास करता आहात, त्यात तुम्हाला सुयश प्राप्त होते असे म्हणतात. खूप नादमय आणि अनुप्रासयुक्त असं स्तोत्र आहे.'
एकतर नादमय आणि अनुप्रासयुक्त काव्य, त्यात ते कालिदासानं लिहिलेलं मग ते खासच असणार! असा विचार करून लगेच मी जालावर ते कुठे मिळतंय का ते पाहिलं.
प्रथम सापडला तो तेलगु गायक घंटसाला यांनी गायलेल्या गाण्याचा व्हीडिओ.
ह्या व्हीडिओत स्तोत्र पूर्ण गायलं नाहिये सुरुवातीचा थोडा भाग आणि एकदम शेवटचा भाग असं गायलंय.
(सुरुवातीचा सतारीवरचा भूपालीतला झाला सुंदर आहे) म्हणून पूर्ण स्तोत्र असलेला ऑडियो किंवा व्हीडिओ मिळतो का ते पाहिले तर हा एक ऑडियो-व्हीडिओ मिळाला. यात कर्नाटकी पद्धतीने स्तोत्र गायलंय (गायिकांचा उल्लेख नाहिये :() यातलं व्हायोलीन आणि बासरीही श्रवणीय आहे. तरीही, घंटसाला यांच्या गायनातून अनुप्रास आणि त्या वृत्तातले खटके जसे जाणवतात तसे ह्या गायनात जाणवत नाहीत. अर्थात, हे एक 'स्तोत्र' आहे म्हटल्यावर त्याचे 'गायन' होणारच. तरी एक बरं आहे की त्या दोन्ही भल्या गायिकांनी गाताना संस्कृताची वाट लावली नाहिये. नाहीतर 'आराध्यो भगवान्व्रजेशतनयस्तद्धामवृंदावनं' ह्या चैतन्य महाप्रभूंच्या सुंदर श्लोकाचं 'गायन' कितीही चांगलं झालेलं असलं तरी संस्कृताचा पार बोर्‍या वाजलाय त्यात.
असो, तर मग असा विचार आला की आपणच हे स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करावं. विचार बरेच दिवस चालू होता आज मुहूर्त मिळाला. स्तोत्र (वरच्या लिंक मधली पीडीएफ फाईल) पाहूनच 'छ्या! अशक्य आहे हे म्हणणं.' असाच विचार आला होता. पण हळूहळू सराव केला आणि बरंच बरं म्हणता येऊ लागलं.:)
आज ४-५ वेळा प्रयत्न करूनही मनाजोगं रेकॉर्ड झालं नाही, म्हणजे बर्‍याच चुका होत होत्या म्हणताना. पण शेवटी झालं ठीक-ठाक रेकॉर्ड (एक दोन चुका आहेतच त्यातही :() असो. रेकॉर्ड इथे ऐकता येईल.

हे स्तोत्र कालिदासाला देवी शारदा प्रसन्न झाली त्यावेळी स्फुरलं असं म्हणतात.
अर्थात, या स्तोत्राचा कर्ता आणि मेघदूतादींचा कर्ता कालिदास हे एकच की वेगळे यावर निश्चित माहिती मिळत नाही. स्तोत्रात वापरलेल्या उपमांमुळे (उदा. चारुशिञ्चत्कटीसूत्रनिर्भत्सितानङ्गलीलाधनु' - जिचे कटिसूत्र हे कामदेवाच्या धनुष्यापेक्षाही उजवे वाटते अशी... इ.) तो महाकवी कालिदासच असावा असे वाटण्यास जागा आहे. ते काहीही असो, स्तोत्र आहे खास ! हे श्यामलादेवीचं म्हणजेच कालीमातेचं(?) स्तोत्र आहे.
स्तोत्रात अनेकानेक विशेषणं आणि उपमा वापरून देवीचं वर्णन केलं आहे.
अजून सगळ्या स्तोत्राचा अर्थ उमगेल किंवा जेवढा उमगला आहे तो नीट शब्दबद्ध करता येईल इतकी माझी पात्रता नाही असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे खरं तर मी केवळ स्तोत्र म्हणता येतं म्हणून रेकॉर्ड केलंय इतकंच. हे ऐकून किंवा स्तोत्र वाचून कुणाला हे स्तोत्र म्हणून बघण्याची किंवा थोडं पुढे जाऊन 'नक्की काय अर्थ असेल?' ह्या विचाराने संस्कृत शिकण्याची इच्छा निर्माण झाली तर तो नक्कीच या स्तोत्राचा प्रभाव असेल.

-चैतन्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेकॉर्ड ऐकली नाही अजुन.. पण पीडीएफ फाईल पाहुन खरंच अवघड वाटते आहे!

धन्यवाद... एक नविन स्तोत्राचा परिचय करुन दिल्याबद्दल. Happy

पीडीएफ पाहून अवघड वाटतेय हे खरं. मुळात उच्चार महत्त्वाचे आहेत. रेकॉर्ड ऐकायची आहे अजून. एक शंका... यातील सलग शब्दांचे विघटन करून मग त्यांचे उच्चार केले तर ते सोपे वाटतील का ? तसं करणं योग्य आहे की अयोग्य ?

छान.. जमेल बहुदा. तुझे ऐकले पण आवाज काही केल्या मोठा ऐकू येत नाहिये.

<<एक शंका... यातील सलग शब्दांचे विघटन करून मग त्यांचे उच्चार केले तर ते सोपे वाटतील का ? तसं करणं योग्य आहे की अयोग्य ?>> संधीविग्रह करून वाचले आणि लयीत बसवले तर योग्यच.

मी हे स्तोत्र बहुतेक दाक्षिणात्य गायिका पी. सुशीला आणि बॉम्बे सिस्टर्स च्या आवाजात आधी ऐकलं आहे.
ललितासहस्रनामाच्या पी सुशीलाच्या सीडीत आहे बहुतेक. दक्षिणेत, खास करून बंगळुरात हे स्तोत्र दुकानांमध्ये वगैरे सकाळी बर्‍याचदा लावलेले असते.

बॉम्बे सिस्टर्स

हे स्तोत्र कालिदास रचित आहे.
विकीवर मिळालेली ही माहिती << गढकालिका मंदिर : उज्जैन : गढ़कालिका मंदिर, मध्य प्रदेश के उज्जैन शहर में स्थित है। कालजयी कवि कालिदास गढ़ कालिका देवी के उपासक थे। कालिदास के संबंध में मान्यता है कि जब से वे इस मंदिर में पूजा-अर्चना करने लगे तभी से उनके प्रतिभाशाली व्यक्तित्व का निर्माण होने लगा। कालिदास रचित 'श्यामला दंडक' महाकाली स्तोत्र एक सुंदर रचना है। ऐसा कहा जाता है कि महाकवि के मुख से सबसे पहले यही स्तोत्र प्रकट हुआ था। यहाँ प्रत्येक वर्ष कालिदास समारोह के आयोजन के पूर्व माँ कालिका की आराधना की जाती है।>>

कौतुक, लईच मोठे आहे ते स्तोत्र वेळ लागेल एवढे संधी सोडवायला Happy

चिंचवडला विघ्नहरी देव महाराजांचे पूर्ण कुटुंब संस्कृत शिकवायचे चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यात..अगदी संस्कृतदिन सुद्धा साजरा व्हायचा (आता होतो की नाही माहित नाही).. टिमवीच्या परिक्षा आणि वेगवेगळी स्तोत्रे.. जाम मजा असायची.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
कौतुक,
मी आज-उद्यात संधीविग्रह द्यायचा प्रयत्न करतो.
लंपन, आवाजाबद्दल एकदा चेक करून पुन्हा अपलोड करतो.
अवघड वाटलं तरी प्रयत्नपूर्वक रोज एकदा म्हटलं तरी माझ्या मते १०-१२ दिवसात वगैरे व्यवस्थित म्हणता येऊ शकेल.
अकु,
कालिदासानेच लिहिलेलं स्तोत्र आहे ह्या विकीवरच्या माहितीबद्दल धन्यु Happy
माझा एक संस्कृत-पंडित मित्र आहे त्याने 'हा नक्की कोणता कालिदास आहे याची निश्चित माहिती नसल्याने
मेघदूताचा कर्ता कालिदास आणि हा भिन्न असावेत असा प्रवाद आहे' असं सांगितलं होतं.
बाँबे सिस्टर्स चं ऐकतो आता.
मी दिलेल्या कर्नाटकी दुव्यातही काही शब्द नीट संधी-विग्रह करून म्हटलेले नाहीत.
(अर्थात, श्वास पुरणार नाही म्हणा गायचं असेल तर) पण संस्कृत उच्चार मात्र स्पष्ट आहेत.
आराध्य असेल तर उगाच त्याचं 'अराध्य' झालेलं नाही Happy

चैतन्य,
माझ्या आवडत्या स्तोत्रांपैकी श्यामलादण्डकम् हे एक.
कानडी भाषेत कविरत्न काळिदास नावाचा एक चित्रपट आहे. डॉ. राजकुमार, जयाप्रदा वगैरे आहेत.
त्यातही कालिदासाला जेव्हा ज्ञानप्राप्ती होते तेव्हा ह्या स्तोत्राचा काही भाग गाताना दाखवला आहे.
तुम्ही दिलेल्या लिन्क्स आज पाहते.

रुणू, आईशप्पथ... हे मी कोणत्या तरी सौदिंडियन टीव्ही चॅनलवर पाहिलं होतं आणि तेव्हा जाम आवडलं होतं. बहुतेक सूर्या किंवा सन टीव्ही चॅनल. फार मस्त आहे हे. थँक्स! Happy
(ते चित्रीकरण पाहून चांदोबा मासिकातल्या चित्रांची आठवण होते फार!)

चैतन्य,
हो छान आहे ते. फक्त पूर्ण नाहीये.

अकु,
उदय किंवा इ टीव्ही कन्नडावर पाहिलं असशील.
तो आख्खा चित्रपटच लई भारी आहे.
कन्नड अज्जिबात कळत नसताना पाहिला होता, तरी बराच कळला आणि आवडला होता. कन्नड यायला लागल्यावर पुन्हा पाहिला.

खलास प्रकार आहे हा.
ध्यानामध्ये दिलेलं वर्णन (जेव्हढे कळले तेव्हढे) किती सुरेख आहे >>+१

चैतन्य दीक्षित,

स्तोत्रं खासच आहे. पीडीएफ पाहून भारी वाटतंय. सगळे संधि सोडवणार असाल तर कृपया इथे विग्रहित आवृत्ती टाकाल काय?

स्तोत्राच्या आधी साधारणत: छंद, कीलक इत्यादि माहिती दिलेली असते. या पीडीएफनुसार केवळ ध्यान आणि विनियोगच दइलेले अहेत. त्यामुळे हे स्तोत्र आपल्यालाच एखाद्या छंदात बसवावे लागेल. अर्थात त्यासाठी संधिविग्रह करून योग्य त्या जागी शब्द तोडावे लागतील. संस्कृतातल्या छंद या संज्ञेस मराठीत वृत्त असे म्हणतात. यादृष्टीने मायबोलीवरील वृत्तनिपुण साहित्यिकांची मदत घेता येईल काय हे चाचपण्यास हरकत नाही.

आ.न.,
-गा.पै.

चैतन्य, एवढे कठीण स्तोत्र तेही शोधाशोध करून ध्वनीमुद्रित करायचे तुमचे प्रयत्न अगदी स्तुत्य आहेत!
घंटसाला यांनी बरेच सुंदर स्तोत्र/भजनं गायली आहेत. त्यांचे उच्चारपण सुस्पष्ट असायचे.

गामापैलवान,
स्तोत्राच्या आधी साधारणत: छंद, कीलक इत्यादि माहिती दिलेली असते. या पीडीएफनुसार केवळ ध्यान आणि विनियोगच दइलेले अहेत.
>>>>>>>>>>>>>>
मुळात 'दण्डक' हेही एक वृत्त/छंद असावा असा अंदाज आहे. पीडीएफमध्येसुद्धा 'दण्डकम्' असा उल्लेख असल्याने, हा अंदाज बरोबर असण्याची शक्यता जास्त वाटते.
संधी-विग्रहासह स्तोत्र इथे द्यायचा प्रयत्न करतो आज.

http://www.sthothrarathnas.com/shyamala_dandakam
हा एक दुवा मिळाला. इंग्रजी भाषांतरही उपलब्ध आहे. फक्त तिथे मूळ श्लोक देवनागरीत नसून आंग्ललिपीत आहेत.

चैतन्य दीक्षित,

जर दण्डकम् हा छंद असेल तर याच नावाची इतर स्तोत्रे असू शकतील का? उदा : शिवदण्डकम् ...?

आ.न.,
-गा.पै.

गा.पै-
तुमच्या प्रतिसादामुळे थोडं अजून ढुंडाळलं. तर एक 'गरुडदण्डकम्' सापडलं. आणि दण्डक हे वृत्त/छंदापैकीच आहे याचाही एक दुवा मिळाला.

कौतुक,
संधी-विग्रह देईन म्हणालो खरा, पण स्तोत्र खूप मोठं असल्याने थोड्या थोड्या भागात देईन.
अजून एक म्हणजे, तुम्हाला नक्की संधी-विग्रहच हवा आहे ना? की स्तोत्र म्हणण्याच्या दृष्टीने कुठे थांबता येईल हे हवंय? त्यानुसार मला टंकायला Happy
संधीविग्रहाचा आणि कुठे कुठे थांबता येईल या दोन्हीचाही नमुना खाली देतो.
तुम्हाला कोणता हवा ते सांगा. म्हणजे टंकनश्रम वाचतील Happy

हा संधी-विग्रह असल्याने, जो पूर्ण सामासिक शब्द आहे (पारिभाषिक संज्ञेत ज्याला- समस्त पद असे म्हणतात ते) तो कितीही मोठा असला तरी कुठेही तोडला नाहिये. स्तोत्र म्हणण्याच्या दृष्टीनेही, खरे तर समस्त-पद आहे ते तसेच्या तसे म्हणावयास हवे, पण श्वासाची मर्यादा लक्षात घेता, एखादे समस्त पद सुद्धा तोडून म्हटले जाते अशी अनेक उदाहरणे आहेत. (अगदी श्वासाची मर्यादा नसली तरीही समस्त पद तोडून म्हटले जाते. उदा-
ह्याच स्तोत्रात जो ध्यानाचा मंत्र आहे त्यात 'पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते' असा पूर्ण शब्द आहे जो वृत्ताच्या हिशोबात 'पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाण-हस्ते नमस्ते जगदेकमातः' असा तोडला जातो.) त्यामुळे खाली दिलेल्या संधी-विग्रहात जिथे समस्त पद असूनही स्तोत्र म्हणण्याच्या दृष्टीने तोडून म्हणता येण्याजोगे आहे तिथे '-' अशी खूण केली आहे. जिथे स्पेस आहे तिथे तो शब्द संपला असे लक्षात घ्यावे.

---------------------------------------
जय जननि सुधासमुद्रान्तरुद्यन्मणीद्वीप-संरूढबिल्वाटवीमध्यकल्पद्रुमाकल्प-कादम्बकान्तारवासप्रिये
कृत्तिवासप्रिये सर्वलोकप्रिये | (म्हणण्याच्या दृष्टीने थांबण्यायोग्य जागा असलेली ओळ)
(संधीविग्रह- सुधासमुद्रान्तः+उद्यत्+मणीद्वीपसंरूढबिल्व+अटवीमध्यकल्पद्रुम+आकल्पकादम्बकान्तारवासप्रिये)
सादरारब्धसङ्गीतसम्भावना-सम्भ्रमालोलनीपस्रगाबद्धचूलीसनाथत्रिके सानुमत्पुत्रिके
(स+आदर+आरब्धसङ्गीतसम्भावनासम्भ्रम+ आलोलनीपस्रग+आबद्धचूलीसनाथत्रिके)
शेखरीभूतशीतांशुरेखामयूखावलीबद्ध-सुस्निग्धनीलालकश्रेणिशृङ्गारिते लोकसम्भाविते
(शेखरीभूतशीतांशुरेखामयूख+आवलीबद्धसुस्निग्धनील+ अलकश्रेणिशृङ्गारिते)
कामलीलाधनुस्सन्निभभ्रूलता-पुष्पसन्दोहसन्देहकृल्लोचने वाक्सुधासेचने
(कामलीलाधनु: सन्निभभ्रूलतापुष्पसन्दोहसन्देहकृत् + लोचने)
चारुगोरोचनापङ्ककेलीललामाभिरामे सुरामे रमे

प्रोल्लसद्ध्वालिकामौक्तिकश्रेणिकाचन्द्रिकामण्डलोद्भासि-लावण्यगण्डस्थलन्यस्तकस्तूरिकापत्ररेखा-समुद्भूतसौरभ्यसम्भ्रान्तभृङ्गाङ्गनागीत-सान्द्रीभवन्मन्द्रतन्त्रीस्वरे सुस्वरे भास्वरे
(अबब, एवढा मोठा सामासिक शब्द...असं झालं होतं पहिल्यांदा 'प्रोल्लसद् पासून तन्त्रीस्वरे' पर्यंत वाचून-
प्र+उल्लसत्+ध्वालिकामौक्तिकश्रेणिकाचन्धिकामण्डल्+उद्भासिलावण्यगण्डस्थलन्यस्तकस्तूरिकापत्ररेखासमुद्भूतसौरभ्यसम्भ्रान्तभृङ्गाङ्गनागीतसान्द्रीभवन् + मन्द्रतन्त्रीस्वरे)

चैतन्य दीक्षित,

भारी काम आहे तुमचं! तुम्हाला साष्टांग दंडवत!!

मला वाटतं की संधिविग्रह आणि पादखंड दोन्ही प्रकारे टंकावं. कारण की संधिविग्रहामुळे अर्थ समजून उच्चारायला मदत होईल. तुम्हाला मात्र दुप्पट काम पडेल! Sad

मात्र आपल्यासारख्या सदस्यांमुळे मायबोलीवर यावंसं वाटतं, हे आवर्जून सांगायला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

चैतन्य, अरे काय झक्कास काम चाल्लय तुझं... वाहून घेणं, झोकून देणं... शब्दशः..
ते स्तोत्रं वाचताना फेफे उडाली... आता सवडीने सगळ्या लिन्कांमधलं सगळं ऐकेन.
गामापैलवान, <<मात्र आपल्यासारख्या सदस्यांमुळे मायबोलीवर यावंसं वाटतं, हे आवर्जून सांगायला पाहि<<>> + मोदक

Pages