पाऊसवेळ

Submitted by अमेलिया on 31 July, 2012 - 05:53

असा येतोसच मग तू अचानक
झडझडत, सरसरत
आवरून धरणं स्वतःला फार काळ
तुलाही नाहीच जमत

तुझा आवेग मग बरसत राहतो
झाडा-पानांवर, रस्त्या-वाटांवर
सगळं, सगळं उधळून देतोस
उदार होतोस थेंबा-थेंबावर

अनावर, अविचल, अखंड...
बोलतोस न बोलता तसंही
पक्कं गारुड मनावर तुझं
कळतं थोडंसं... कळतही नाही

सैरभैर वाराही रमतो
खेळतो तुझा झिम्मड खेळ
घुमतो, झेपावतो उभा-आडवा
साजरी करतो पाऊसवेळ

अशा वेळी माझ्या मनात
मौन बोलकं होतं...
भिजत राहते मी तुझ्यात
सैल... निःशब्द...शांत !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!