वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते

Submitted by बेफ़िकीर on 30 July, 2012 - 09:51

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते

माणसे देवाप्रमाणे वाटली असती
फक्त दोघांच्यामधे जर सोवळे नसते

ओल आल्यासारखे आकाश यंदाचे
अन्यथा हे पापण्यांचे सोहळे नसते

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते

आणले नाहीस ना वार्‍या तिला येथे
मग नको आणूस आता कळवळे नसते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<एकंदरीत, परवा सुप्रियांशी माझे जे बोलणे झाले त्याच्याशी मी जरा अधिक जुळवून घेत आहे>>>>१००% सहमत.... प्रगल्भ गझल बेफीजी ! Happy

-सुप्रिया.

भूषणराव! शेवटच्या शेरात नसतेच्या ऎवजी चुकून नुसते झाले आहे. क्षमस्व!
मी सुचवलेल्या मतल्याबाबत काय वाटते?

खुप छान...

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते
....आहा.....क्या बात्...मस्तच्...हे खुपच आवडल...

सावरी

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते

आणले नाहीस ना वार्‍या तिला येथे
मग नको आणूस आता कळवळे नसते

बहोत खुब!

किती छान आहे ही गझल!!!! Happy
"माणसे देवाप्रमाणे वाटली असती
फक्त दोघांच्यामधे जर सोवळे नसते " क्या बात है!!

"आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते " जबरदस्त शेर!
निवडक दहात नोंद Happy

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते

वेगळे म्हणजे ODD. वेगळे असणेहे वेगळे कसे नसते ? वेगळे असणे हे वेगळेच असते. कावळ्यात कोकीळ हा वेगळा असतो. बदकात राजहंस वेगळा ठरतो. तो वेगळा कसा नाही ?
मुळातच गडबड आहे. मुळीचच असा शब्द नाही. मुळीच इतका ठीक आहे. त्याला आणखी भरीचा च लावण्याची गरज नाही. मुळी आणि मुळात असे शब्द आहेत. यातला मुळी हा शब्द "आहेच मुळी" असा वापरला जातो. मुळीच असा वापर अपेक्षित असल्यास, मुळीच नाही. म्हणजे अजिबात नाही असा अर्थ ध्वनित होतो. basically असा अर्त हवा असल्यास मुळात हा शब्द योग्य आहे. शेरातला आशय चुकीचा आहे. यावर कुणीच भाष्य केलेले नाही किंवा हेतूपुरस्सर टाळलेले आहे.

>>वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते >>
अतिशयोक्त वाटणार्‍या विरोधाभासातून गझलकार जीवनाचं एक सत्य सांगतोय.शाब्दिक चमत्कृतीचा आश्रय घेऊन त्याने परिणामकारकता वाढवलीय .
'काहीतरी वेगळं' असणं हे शब्द सर्रास अन स्वस्तपणे वापरले जातात, पण जगात जिथे कोणतीही एक गोष्ट दुसर्‍यासारखी नाही, तिथे वेगळ्याचा वेगळेपणा काय राहिला ?!!
अगदी यथार्थ निरीक्षण..

दुसर्‍या ओळीतला खयाल 'मोकळे असणे' . हा पहिल्या ओळीतल्या खयालापेक्षा 'वेगळ्या' शब्दसमुच्चयाकडे गेलाय ही एक गंमत. (म्हटले तर संबंध प्रस्थापित करता येतो.जे 'वेगळं' ते नित्यनियमांपेक्षा 'मोकळं' असं आपल्याला वाटत असतं .असो.)

आता इथेही मोकळं असणं हेही बद्धतेपासून मुक्त नसते, त्या मोकळेपणाचे 'वेगळे' नियम असतात,तो तथाकथित मोकळेपणाही आतून कशाशीतरी कुठेतरी बांधलाच गेला असतो,काहीच अधांतरी नाही, सगळं परस्पर संबद्ध आहे, वेगळं अन मोकळं वरवर वाटणारंही.

गझलेत या अंतर्विरोधांचा नेहमीच सुंदर वापर केला जातो,इथे बेफिकीरनी कमालीची सुरुवात करून ठेवलीय.

भारतीतै
कविता किंवा शेर याचा अर्थ बघणा-याच्या दृष्टीवर असतो. आधीचा प्रतिसाद हा हेतूपुरस्सर दिलेला आहे. दृष्टी ठेवावी तसा अर्थ दिसतो म्हणूनच नकारात्माक प्रतिसाद देणं हे जास्त जबाबदारीचं काम असतं. इतरांच्या लिखाणावर आंबट तोंड करून हसू आलं नाही किंवा तिलकधारी आला आहे असे बालिश प्रतिसाद आवरले जावेत हा हेतू.

उदाहरण म्हणून इथे अवश्य भेट द्यावी. http://www.maayboli.com/node/31008

आपल्या प्रतिभेला सा. दंडवत.

माणसे देवाप्रमाणे वाटली असती
फक्त दोघांच्यामधे जर सोवळे नसते

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते

हे विशेष आवडले!
सुंदर गझल !े विचार करायला लावणारी.

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते

अतिशय सहज सुंदर मत्ला.
शेवटचा शेरही छान आहे.

धन्यवाद भूषणराव!
मतल्यातला मुळीचच शब्दाचा प्रश्न आम्ही दिलेल्या मतल्यात मिटतो असे आपणास वाटत नाही का?
शिवाय सानी मिस-यात बद्धतेपासूनऐवजी बंधनातूनम्हणणे जास्त सुलभ वाटत नाही का?
मतल्याबद्दल काही बोलाल काय?
आम्ही दिलेल्या मतल्याच्या शेरात आपल्या मनातील अर्थास बाधा पोचते काय?
पाचव्या शेरात गंधवार्ता नसणे/असणे//आणणे वगैरे अधिक बोली वाटत नाही काय?
ओल आल्यासारखे म्हणण्यापेक्षा ओलसर म्हणणे अधिक बोली, सुलभ वाटत नाही काय?
डुंबायला येतो तुझ्याकाठी
म्हणणे थोडेसे खटकत नाही काय? काठावर राहून डुंबता येत नाही असा विचार मनात आला म्हणून आम्ही लिहिले होते........
आजही हमखास मी डुंबायला येतो.....
असे केल्याने डोळ्यातील तळे हा सस्पेन्स उला मिस-यात वाढत नाही काय?
फक्त दोघांच्यामधे म्हणण्या ऐवजी, एकमेकांच्यामधे म्हणणे जास्त संयुक्तिक वाटत नाही काय? शिवाय शेराची व्याप्ती वाढत नाही काय?

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते >>> हा सर्वात आवडला.

>> आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते
खूप मस्त!

Pages