वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते

Submitted by बेफ़िकीर on 30 July, 2012 - 09:51

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते

माणसे देवाप्रमाणे वाटली असती
फक्त दोघांच्यामधे जर सोवळे नसते

ओल आल्यासारखे आकाश यंदाचे
अन्यथा हे पापण्यांचे सोहळे नसते

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते

आणले नाहीस ना वार्‍या तिला येथे
मग नको आणूस आता कळवळे नसते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओल आल्यासारखे आकाश यंदाचे
अन्यथा हे पापण्यांचे सोहळे नसते ......................... क्या बात है!!!

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते .......................... Happy

खयाल नेहमीसारखेच हटके ...गझल वाचताना तुम्हीच बोलत आहात मला काहीतरी सान्गत आहात असे वाटत होते

मक्त्यात रदीफ खूप मस्त वापरलीत

गझल आवडली

ओल आल्यासारखे आकाश यंदाचे
अन्यथा हे पापण्यांचे सोहळे नसते.... आहा!

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते.....वा! वा!

आणले नाहीस ना वार्‍या तिला येथे
मग नको आणूस आता कळवळे नसते..... सुंदर!

मतलातर सुपर्ब!

>>
माणसे देवाप्रमाणे वाटली असती
फक्त दोघांच्यामधे जर सोवळे नसते
<<

वा! Happy

>>
आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते
<<
मस्त. Happy

गालगागा गालगागा गालगागा गा>>>>

ओहो....या अक्षरगणवृत्ताची लय आहे होय ही .......
मी अत्ता चौथ्यान्दा वाचतोय तर अत्ता लक्षात येतय
असं कधी घडत नाही माझ्यासोबत,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, आज असं कसं झालं बुवा !!
मी आधी मात्रावृत्तात असल्यासारखी वाचून काढली तब्बल तीनदा............

आता माझा आधीचा प्रतिसाद तसा का उमटला हे लक्षात आलं...<<<<.गझल वाचताना तुम्हीच बोलत आहात मला काहीतरी सान्गत आहात असे वाटत होते>>>>>>>>>> ,
असो असो,,,,,,

चांगली आहे गझल.
फक्त सुरुवातीचा तो 'मुळीचच' हा शब्द खटकला थोडा मला.
मुळातच हा शब्द वृत्तात बसेल पण चालेल का?
मुळीचच असे वापरलेले मी कुठे वाचले नाही म्हणून खटकत असेल मला.
चूभूदेघे.

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते >>> मस्त मतला. 'मुळीचच' ह्या शब्दाच्या वापरावर विचार करतो आहे.

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते

आणले नाहीस ना वार्‍या तिला येथे
मग नको आणूस आता कळवळे नसते

दोन्ही शेर सुंदर!!

नसतेचा वापर शेवटच्या शेरात खूप आवडला.

मस्त गझल.

माणसे देवाप्रमाणे वाटली असती
फक्त दोघांच्यामधे जर सोवळे नसते

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते

हे दोन्ही फार आवडले.
सुरेख गझल.

भूषणराव! आपली ही गझल सुंदर आहे. आवडली.
पण, आपल्या शेरांचे मला उमजलेले अर्थ मी देत आहे. ते बरोबर आहेत का?
आपल्या मनातही हेच अर्थ आहेत का या शेरांचे? कृपया उलगडा कराल का?

मला समजलेले आपल्या शेरांचे अर्थ खालील प्रमाणे...........

सारखे असतात! कोणी वेगळे नसते!
बंधनामधुनी कुणीही मोकळे नसते!!

माणसे देवाप्रमाणे वाटली असती;
एकमेकांच्यामधे जर सोवळे नसते!

ओलसर आकाश झाल्यासारखे दिसते!
अन्यथा हे पापण्यांचे सोहळे नसते!!

आजही हमखास मी डुंबायला येतो.....
पण, तुझ्या डोळ्यात पूर्वीचे तळे नसते!

गंधवार्ताही तिची ना आणली वा-या?
मग नको आणूस आता कळवळे नुसते!

...........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

ओल आल्यासारखे आकाश यंदाचे
अन्यथा हे पापण्यांचे सोहळे नसते >>>> वाह!

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते>> मस्तच!

आणले नाहीस ना वार्‍या तिला येथे
मग नको आणूस आता कळवळे नसते>>> क्या बात है!
आवडलीच Happy

.आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते

आणले नाहीस ना वार्‍या तिला येथे
मग नको आणूस आता कळवळे नसते >>> वाह! क्या बात!

मतला तर खासच! Happy

चैतन्य व कणखर,

फारच वेळ मी 'मुळातच' हा शब्द मतल्यात ठेवलेला होता. अती विचार करून तो रिप्लेस केला मुळीचच या शब्दाने.

मुळातच - काहीतरी आहे, ज्याच्या मुळातच ते नाही, असे म्हणणे

मुळीचच - बेसिकली असे असूच शकत नाही

मतला:

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते<<<<<<

अ‍ॅक्चुअली या मतल्यासाठी मुळातच हा शब्द योग्य आहे. पण 'मुळीळच' या शब्दात एक मानवी कर्तेपण आहे, जे मुळातचमध्ये नाही आहे. (म्हणजे, हा मुळातच यांचा मुलगा आहे, त्यामुळे तसाच वागणार! हा मुळातच यांचा मुलगा नाही, त्यामुळे तुमचा आरोप पटत नाही. हा मुळीचच यांचा कोणी नाही, कारण कोणी कोणाचे नसतेच - इत्यादी स्वरुपाचे सुधारीकरण त्यात घेतलेले आहे)

प्रोफेसर साहेब,

तुमचा दुसरा व पाचवा शेर, मला माझ्या दुसर्‍या व पाचव्या शेरांइतकाच आवडला (आवडले). पण (माझ्यामते) मी जरा अधिक बोलून गेलेलो आहे, ते चुकीचेही असू शकेलच

प्रतिसादकांचे आभार

-'बेफिकीर'!

फक्त प्रोफेसर साहेब,

तुमच्या या सुचवणीमध्ये:

(पाचवा शेर)

<<<<<<गंधवार्ताही तिची ना आणली वा-या?
मग नको आणूस आता कळवळे नुसते!>>>>>>

रदीफ 'नसते' च्या ऐवजी 'नुसते' आली आहे Happy

(जे चालणार नाही हे अर्थातच आपण व सर्व जाणतातच, फक्त नसते ही रदीफ घेऊन शेर केला गेला की झाले)

Happy

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते

आणले नाहीस ना वार्‍या तिला येथे
मग नको आणूस आता कळवळे नसते..

व्वा... जबरी.....

गझल आवडली..

कौतुक व शाम,

वाटली याही शब्दाऐवजी वागली हा पर्याय मी खूप वेळ ठेवलेला होता गझलेत.

पण वागली यातून जातीयवादावर शेर आहे असे ध्वनीत झाले असते. वाटली या शब्दात निव्वळ व निखळ जाणीव होण्याचा रंग आहे, त्यामुळे बराच विचार करून मग वाटली हा शब्द ठेवला Happy

अतिशय छान बेफिजी.. पुर्ण गझल आवडली. Happy

.... विशेष म्हणजे गझलेत शेवटच्या रदीफेचा अर्थ सहसा बदलत नाही. पण बदललाच तर ती एक गझलेच्या सौंदर्याची बहार ठरु शकते असे मला वैयक्तीकपणे वाटते. जे तुम्ही शेवटच्या शेरामध्ये छान साधले आहे.

.... अभिनंदन.

बेफि,

माझा मुद्दा 'मुळीच' असा शब्द असावा आणि 'मुळीचच' असा नसावा ह्यापुरता मर्यादीत होता.

मुळीचच हा शब्द कसा उत्पन्न झाला किंवा रुढ झालाय ह्याबद्दल माहिती नाही.

आवडली !

जातीयवादावर शेर आहे असे ध्वनीत झाले असते.>>>>>>

बेफीजी माझे मतः...........मी हा शेर वाचल्यावाचल्याच मला जातीयवाद आठवला होता
सोवळेवरून मला "जानवे " आठवत होते

मग मी ;हा शेर माझाच आहे असे वाटून घेतले (नेहमीप्रमाणे) आणि कामाला लागलो ....

आणि मी आपला हा शेर असा वाचून पाहिला ...... (तत्पूर्वी देवसरान्च्या नावाची एक माळ ओढली हे उघडच आहे Wink !!)

माणसे देवाप्रमाणे वाटली असती
माणसांचे मन असे जर कोवळे नसते

आपले मत वाचायला आवडेल

आपला नम्र
वैवकु

माणसाचे वय कधीही कोवळे नसते

भोवती हे इंद्रियांचे सापळे नसते

अंग कृष्णाचेच केवळ सावळे नसते

इत्यादी मिसरे (माझ्यामते बर्‍यापैकी व ओघवते) होते पण बसले नाहीत कुठेच. एकंदरीत, परवा सुप्रियांशी माझे जे बोलणे झाले त्याच्याशी मी जरा अधिक जुळवून घेत आहे. तुमच्याशीही फोनवर बोलेनच

धन्यवाद

Pages