घुम्मड घुम्मड..

Submitted by प्राजु on 30 July, 2012 - 09:35

झुकती माडे, झुलत्या तारा
बेभान वारा, हुम्मण हुम्मण

विजेची रेघ, नभाची पाटी
मेघांची दाटी, झुंबड झुंबड

गळती कौले, पन्हाळ सडे
होडीही बुडे, अल्लड अल्लड

पाऊस प्राण, तहान शमे
घुमट घुमे, घुम्मड घुम्मड

डोंगर कडे, नाचरी दरी
झेलीत सरी, झिम्मड झिम्मड

ओढाळ झरा, खळाळ भारी
डोंगर पारी, हुल्लड हुल्ल्ड

पाऊल माझे, पाण्यात नाचे
अंगणी वाजे, घुंगूर घुंगूर

पाऊस माझा, साजण होई
थेंबांचे देही, गोंदण गोंदण

देऊनी मला, ओलेती मिठी
ओलेत्या ओठी, चुंबन चुंबन

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभन्ग या कव्यशैलीचा सुन्दर अविष्कार (एक नवा अवतार )

बहिणाबाईनी ओवीची जशी अष्टाक्षरी केली तशी !!छान

काविता म्हणून बघता छानच आहे यात सन्शय नाही

चौथ्या चरणात एकाच शब्दाची द्विरुक्ती यशस्वीपणे पन्च निर्माण करते दरवेळी
हुम्मण शब्द खूप आवडला ......

विजेची रेघ, नभाची पाटी
मेघांची दाटी, झुंबड झुंबड

पाऊस माझा, साजण होई
थेंबांचे देही, गोंदण गोंदण

मस्तय हे ...आहाहा!

वाह! ही कविता म्हणजे एखाद्या मस्तमौला माणसाने पावसात भिजतांना उत्स्फूर्त निघालेल्या नादांची रेलचेल आहे Happy शेवटची दोन कडवी खासच Happy

प्राजूजी
आपल्या काव्यप्रतिभेला व क्षमतेला पूर्ण न्याय न देऊ शकणारी अशी वाटली ही कविता.
कदाचित घाईत लिहिली असावी.